अवधूत (भाग-१०)

प्रभास's picture
प्रभास in जनातलं, मनातलं
16 Sep 2016 - 3:32 pm

अवधूत भाग - 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9

त्या भटक्या लोकांच्या तळावरुन भल्या पहाटे तो निघाला तेव्हां अद्याप अंधार होता. तारे छानपैकी आकाशात चमकत होते. जळत्या शेकोटीतीलच एक लांबलचक पेटलेलं लाकूड घेतलं त्याने. अंधारात रस्ता दिसायला मदत व्हावी म्हणून आणि भराभर त्र्यंबकेश्वरकडे त्याचे पाय चालू लागले.

पूर्वेकडे सूर्य उगवता उगवता तो गावात पोहोचला. बाहेरच एक भलं मोठं वडाचं झाड येणा-यांचं स्वागत करीत होतं. झाडाला एक मजबूत दगडी पार बांधलेला होता. चालून चालून थकल्याने आता थोडी विश्रांती घ्यावी या हेतूने तो तिथे बसला. तिथेच पारावर एक त्रिकोणी घुमटी होती. आत हनुमानाची शेंदूर चर्चित मूर्ती. नुकतीच कुणीतरी पूजा केलेली असावी. एक मोठा दिवा भकभक करीत जळत होता. पहाटेच्या गार वा-यात त्याच्याकडे पहायला देखील किती समाधानकारक वाटत होतं. सुगंधी अगरबत्त्या देखील कुणीतरी लावलेल्या होत्या. धुरांची वलये एखाद्या लहान मुलासारखी अंगाखांद्यावर लडिवाळपणे घोटाळत होती.

ते सुंदर वातावरण अनुभवत तो तसाच शांत बसून राहिला. किती वेळ गेला त्याला कळलं नाही. एव्हाना सूर्य बराच वरती आला होता. त्याच्या प्रकाशाचे छोटे छोटे कवडसे पानांतून वाट काढत काढत खाली येत होते. अशाच एका मोठ्या कवडशात तो जाऊन बसला. आता उबदार वाटू लागलं ब-यापैकी. इतक्या सुंदर वेळेस आजूबाजूला त्रास द्यायला, चौकशा करायला कुणीही रिकामटेकडी माणसे नव्हती हे भाग्यच म्हणायचं!

त्याच वेळीस अचानक एक छोटासा मुलगा त्याच्या दिशेने येताना दिसला. मुलाच्या हातात काहीतरी वस्तू होती. पहाता पहाता तो मुलगा जवळ आला देखील. त्याच्या हातात एका छोटासा द्रोण होता आणि त्यात तुपात बनवलेला शिरा.

“हे घ्या. देवाचा प्रसाद आहे.”

त्याला आश्चर्य वाटलं. कदाचित हा आपल्याला कुणीतरी दुसरा समजला असावा.

“अहो घ्या की पटकन! मला अजून बरेच ठिकाणी प्रसाद वाटत फिरायचं आहे.”

त्याच्या हातात तो द्रोण कसाबसा कोंबत तो मुलगा आला तसा झरझर निघून पण गेला. त्याला मात्र हा फार शुभशकुन वाटला. आपल्या कामासाठी आपण येथे आलो काय आणि आल्या आल्या प्रसाद देखील मिळाला! चांगला योगायोग!
बाकी शिरा मात्र अगदी छान होता आणि पोटभर होता. हे एक बरं झालं. आता ब्रह्मगिरीवर जाणं फारसं अवघड नाही. भुकेचा प्रश्न मिटला.

थोडा वेळ निवांत बसून राहिल्यावर मग अचानक तो उठला. ज्या कामासाठी इथे आलोय ते काम तर पहिलं पूर्ण केलंच पाहिजे.

चला… पर्वत चढायला सुरुवात करा… त्र्यंबकेश्वराचे दर्शन काय नंतर पण करता येईल! ती कपार शोधून काढायची आहे पहिली! काय असेल तिथे माझ्यासाठी?

***

ब्रह्मगिरी चढायला सुरुवात केली तेव्हां फारसे कुणी त्याच्या सोबतीला नव्हते. या वेळीस इकडे फारशी गर्दी नसते. अगदी तुरळक लोक दिसत होते. त्याने भराभर पावले टाकायला सुरुवात केली.

सूर्य चांगलाच डोक्यावर आला होता. पण गरम मात्र होत नव्हते. एक हलकीशी मंद उबदार हवा सर्वत्र जाणवत होती. वर आकाशात पाहिलं तर हलक्या निळ्या रंगाचं सुरेख आकाश! दृष्टी जाईल तिकडे पसरलेलं. अथांग अनंत परमेश्वरासारखं! अधून मधून पांढ-या ढगांचे पुंजके चुकार मेंढ्या रानोमाळ पसरलेल्या असाव्यात तसे पसरलेले होते. त्यांच्यावर उड्या मारायला किती मजा येईल? आणि या विचारासरशी त्याला स्वतःचंच हसू आलं. काय पण विचार करतोय आपण लहान मुलासारखा! खरेतर हा इथल्या निसर्गाच्या सौंदर्याचाच प्रभाव असावा. माणसाचं मन एखाद्या लहान मुलासारखं स्वच्छ स्वच्छ होत असावं.

पावले चालतच होती. पण त्याला आता तहान लागलेली होती. सोबत घेतलेल्या कमंडलूतील पाणी कधीच संपलं होतं. घशाला कोरड पडलेली होती बरीच. सुदैवाने थोड्याच अंतरावर त्याला पाण्याचं एक कुंड सूर्यप्रकाशात चमचम करताना दिसलं. तो उत्साहाने तिकडे वळला. पायवाटेपासून डाव्या हाताला थोडा तीव्र उतार गेलेला होता. तिथेच थोडं खाली कातळाचा पट्टा होता. त्याला लागूनच एक काळ्या दगडात चांगलं भक्कम कुंड बांधून काढलेलं होतं. कातळावर कसलंसं पाणी झिरपून येत होतं आणि त्या ओघळांवर छोट्या छोट्या पिवळ्या रंगाच्या फुलपाखरांचा थवा बसलेला होता.

त्याची चाहूल लागताच एकदम सगळी फुलपाखरे पंख फडफड करीत उडाली. ते कोवळ-कोवळं ऊन, निळं-निळं आकाश, थंडगार हवा आणि ती भिरभिरत उडणारी फुलपाखरं… एकदम खिळून गेल्यासारखा तो त्या दृश्याकडे पाहत राहिला. किती सुंदर जग निर्माण केलंय परमेश्वराने…

अचानक पाठीच्या कण्याच्या तळापासून काहीतरी अद्भुत लहरी वर वाहू लागल्या… सगळ्या अंगात कसल्यातरी वेगळ्याच चैतन्य लहरी पसरु लागल्या... डोळ्यांतून अश्रू घळाघळा येऊ लागले… श्वासावरील नियंत्रण सुटलं… आकाशाकडे दोन्ही हात पसरून त्याने त्याला हाक मारली…

“तू कुठे आहेस…”

मंद वा-याच्या लहरींवर त्याचे शब्द हळुवार वाहत गेले… ते निळसर आकाश अद्याप तसंच स्तब्ध होतं… आकाशात विखुरलेल्या मेंढ्या पण अद्याप तशाच स्तब्ध होत्या…

किती वेळ तो तसाच भानरहित अवस्थेत होता ते कळलं नाही त्याला. पण काही वेळाने तो जाणीवेत परत आला.
हे काय होतं? मी कुठे होतो आत्ता? आत्ता कोण होतं माझ्यामध्ये?

तो तिथेच कातळावर बसला. शरीर कापसासारखं हलकं झाल्याचं जाणवत होतं. मन एका वेगळ्याच आनंदानं भरुन गेलेलं होतं. वा-याच्या मंद मंद लहरींवर कुंडातील पाण्यात हलकेच लाटा उमटत होत्या. हिवाळ्यातील प्रसन्न उबदार सूर्यकिरणे त्या लाटांवर चांदीसारखी चमचम करीत होती. पुढे होऊन त्याने कुंडातील पाणी पोटभर पिऊन घेतले. आता अगदी प्रसन्न वाटू लागलं.

जे काही घडलं त्याचा विचार मनातल्या मनात करीत त्याने पुढचा मार्ग चालायला सुरुवात केली…

***

दिवस अगदी मध्यावर आला होता तेव्हां तो तिथे पोहोचला. त्या कपारीपाशी. उत्सुकता अगदी कळसाला पोहोचली होती. सावकाशपणे त्याने आत वाकून पाहिलं. तीन-चार माणसे बसू शकतील अशी प्रशस्त जागा. तिथेच जमिनीवर एक पांढरं कांबळं अंथरलेलं. बाजूला एका केशरी झोळीत काही वस्तू ठेवलेल्या. तिथेच एक चुलवाण पेटवल्यासारखं तीन मोठे दगड मांडलेले. त्यांच्या शेजारी एक कुत्रं पहुडलेलं. दोन्ही कान खाली पाडून मान तिरकी केलेली आणि कुतुहलाने डोळे मोठे करुन त्याच्याकडे पाहत असलेलं. बाकी कुणी नव्हतं तिथं.

बाहेर गेले असतील कदाचित! इथेच बसूया वाट पहात…
पण का आणलंय मला इथं? कोण आहे इथे राहणारी व्यक्ती? माझा त्यांचा काय संबंध???

अचानक विचारशृंखला अर्ध्यातच तुटली. कपारीतून त्याने बाहेर पायवाटेकडे पाहिलं. मावळत्या सूर्याच्या तिरीपीमुळे प्रथम काहीच दिसलं नाही. पण कुणीतरी उभं होतं तिथं.
थोडी नजर सरावल्यावर त्याला ‘ते’ दिसले.
थोडेस स्थूल. अंगावर भगवी कफनी. दाढी वीतभर वाढलेली. पांढरेपणाकडे झुकलेले केस. शांत डोळे…

त्याने सहजपणे त्यांना नमस्कार केला.
‘मी वर चाललेलो दर्शनाला. इथे कपारीत थोडी सावली दिसली म्हणून थांबलो.’
‘हरकत नाही. बसू शकतोस तू निवांतपणे. घाई असेल तर मात्र जाऊ शकतोस.’ त्यांच्या डोळ्यात मिस्किलपणा दिसत होता.
तो वरमला.
“नाही! खरं तर मला याच जागी यायचं होतं. काही संकेत मला तशा अर्थाचे मिळत गेले.”
“बरं… मग काय मिळालं तुला इथे येऊन?”
“मला माहीत नाही. तुमच्याशी भेट होणे हा कदाचित योगायोग असावा.”
“असो. आता अंधार पडेल लवकरच. खाली उतरताना त्रास होईल. आजची रात्र इथेच रहा माझ्यासोबत. उद्या सकाळी पाहिजे तर निघून जा.”
“चालेल.”

***

मावळत्या उन्हात त्या बाबाजींनी त्याला काही सुकलेली लाकडं मिळतात का ते पहायला पाठवलं. संध्याकाळी चूल आणि उबेसाठी म्हणून…

इकडे तिकडे काटक्या शोधत फिरताना त्याच्या डोक्यात सतत विचार चालू होता. काय हेतू असेल मला इथे आणण्यामागे? ही व्यक्ती कोण? यांचं काय स्थान माझ्या आयुष्यात?

दोन्ही हातांचा विळखा घालावा लागेल एवढी मोळी तयार झाल्यावर तो माघारी वळला. एव्हाना कपारीत बाबाजींनी डाळ तांदूळ एका छोट्याशा मातीच्या भांड्यात काढलेली होती. त्याला मोळी आणताना बघून त्यांना आनंद झाला.
“ये लवकर. थंडी पडू लागलीये.”

त्याच्या हातातून मोळी काढून घेत त्यांनी त्यातील चांगली जाडजूड लाकडे काढून चुलवाणात सारली. मंद झालेली चूल आता धडाधडा पेटली. तिच्यावर त्यांनी मातीचे भांडे ठेवले. त्यात डाळ-तांदूळ घालून वर पाणी ओतले. सरपणातीलच एका काटकीने ते एकदा ढवळून मग ते निवांत त्याच्यासमोर येऊन बसले.

‘अरे गंमत म्हणजे आज मला दुप्पट भिक्षा मिळाली. जणू काही तू येणार आहेस इथे, हे लोकांना अगोदरच कळलेलं असावं. मजाच आहे ना?”
“हं…”
“असो. तू काय साधन करतोस?”
“मला काहीच माहिती नाही किंवा कुणी काही शिकवलेलं पण नाही. गेली काही वर्षे सप्तशृंगी येथे राहून जगदंबेची उपासना करीत होतो. पण मार्ग काहीच मिळेना म्हणून बाहेर पडलो शोधाशोध करायला.”
“तुझ्याकडे पाहताक्षणीच मी ओळखलं की तुझा आध्यात्मिक प्रवास चुकीचा होतोय म्हणून. तो शास्त्रशुद्ध नाहीये.”
“ते कसं काय?”
“तसंच. अनुभव आहे पाठीशी म्हणून ओळखलं…”
“तुम्ही मला सांगाल मी काय केलं पाहिजे ते?”

बाहेर पूर्ण अंधार दाटलेला होता. धडधडत्या चुलीच्या प्रकाशात तो बाबाजींकडे मोठ्या अपेक्षेने पाहत होता. बाबाजी थोडे विचारात पडलेले दिसले.
“बरं… पण मी जसं सांगेन तसंच मार्गक्रमण करशील का?”
“हो करेन ना.”
“प्रत्येक पावलाला मी तुझ्यासोबत नसेन. पण तुझ्यासाठी सर्व आखून देईन मार्ग. तुला एकट्यालाच त्यावर चालावं लागेल.”
“होय. मान्य आहे. तसाही गेली अनेक वर्षे मी एकटाच रहातोय.”
“मग तर ठीक आहे. आता लवकर खाऊन घेऊया. उद्या पहाटेच आपल्याला मोठ्या प्रवासाला निघायचे आहे.”

बाबाजींनी दोन केळीच्या पानाचे तुकडे पण आणलेले. त्यावर त्यांनी वाफाळती खिचडी वाढली.

थोड्याच वेळात दोघे काहीही न बोलता गरमागरम खिचडी खाऊ लागले. त्याच्या मनात मात्र विचारांचे वादळ सुटलेले…
कोण हा माणूस? हा मला खरेच योग्य मार्ग दाखवेल का? काय पुढे मांडून ठेवलंय? हे सगळं इतकं क्लिष्ट का?

(क्रमशः)

संस्कृती

प्रतिक्रिया

जेपी's picture

16 Sep 2016 - 3:38 pm | जेपी

वाचतोय..
पुभाप्र..

यशोधरा's picture

16 Sep 2016 - 4:19 pm | यशोधरा

वाचते आहे..

प्रीत-मोहर's picture

16 Sep 2016 - 4:39 pm | प्रीत-मोहर

लवकर टाका आता पुढला भाग.

क्षमस्व's picture

16 Sep 2016 - 5:34 pm | क्षमस्व

दंडवत।।।

तुमची लेखनशैली फार सुरेख आहे. वाचुन मनाला खूप छान प्रसन्न वाटतं.
पु.भा.प्र.

प्रभास's picture

16 Sep 2016 - 6:44 pm | प्रभास

धन्यवाद... :)
ईतरही वाचक व प्रतिसाद देणारे यांना धन्यवाद...

पैसा's picture

16 Sep 2016 - 6:53 pm | पैसा

खूप छान! हे लिखाण वेगळंच आहे!

जव्हेरगंज's picture

16 Sep 2016 - 6:58 pm | जव्हेरगंज

पहिल्या भागापासून लिखाणाची शैली कुठेच ढिली पडली नाही.

मस्त!

प्रभास's picture

16 Sep 2016 - 7:33 pm | प्रभास

धन्यवाद जव्हेरभाऊ... तुमच्यासारख्या मनस्वी लेखकाने दिलेली दाद खूप महत्वाची वाटते...

धन्यवाद पैसाताई! आजपर्यंत मला मिळालेल्या सर्व प्रतिसादांत हा मला सर्वाधिक उत्तम वाटला... हा एक आध्यात्मिक प्रवास आहे... आपल्या "स्व"ला शोधण्याचा... व त्याचे वेगळेपण तुम्ही अचूक हेरलेत... धन्यवाद मनापासून...

अक्षरशः शब्दप्रभू आहात!!!

______/\_______

धन्यवाद हिशेबनीस साहेब... :)

एक एकटा एकटाच's picture

16 Sep 2016 - 10:07 pm | एक एकटा एकटाच

मस्त

उत्तम

नेहमीप्रमाणेच !!!!!!!!

इनिगोय's picture

16 Sep 2016 - 10:51 pm | इनिगोय

पुढचे भाग अ-खंड टाका आता.

पिवळ्या फुलपाखरांचा प्रसंग छान जमलाय, त्यामुळे यापुढलं कसं शब्दबद्ध करणार हे कुतुहल वाटतं आहे.

तो प्रसंग वाचताना एक कविता आठवत होती. तुमच्याच ब्लाॅगवर सापडली. :)

प्रभास's picture

17 Sep 2016 - 8:32 am | प्रभास

धन्यवाद... :)

इशा१२३'s picture

17 Sep 2016 - 7:52 am | इशा१२३

वाचतेय! पु भा प्र.

सिरुसेरि's picture

17 Sep 2016 - 9:09 am | सिरुसेरि

एका साधकाची शोधयात्रा .. अप्रतिम .

अशोक पतिल's picture

18 Sep 2016 - 12:13 am | अशोक पतिल

मी ह्या मालिकेतील भागांची अगदि आतुरतेने वाट बघतो .

भम्पक's picture

18 Sep 2016 - 12:16 am | भम्पक

एकदम खास....!

कवितानागेश's picture

18 Sep 2016 - 1:18 am | कवितानागेश

छान वर्णन करताय.

प्रभास's picture

18 Sep 2016 - 12:20 pm | प्रभास

सर्वांना धन्यवाद...

शित्रेउमेश's picture

20 Sep 2016 - 11:24 am | शित्रेउमेश

अगदी सगळं समोर बसुन बघतोय असा वाटतय....
लवकर येवुदे पुढचा भाग...

या भागातील काही वर्णने फार आवडली. शांत, सुगंधित, कवडशांनी सजलेला एकांत..नंतरचं आकाशाचं वर्णन..फुलपाखरं.. सुंदर.
कथेचं एकूणच वातावरण, त्यातला साधेपणा, निळ्या आकाशाची अन निसर्गाची पार्श्वभूमी, त्यात स्वतःच्या शोधाचा प्रवास. भावतंय..

लवकर येवुदे पुढचा भाग

याचा पुढचा भाग कधी येणार कोण जाणे...