नरकचतुर्दशीची पहाट. घरोघरी बायकांची धांदल उडालेली होती. अजूनही गाढ झोपेत असलेल्या पोरासोरांना रट्टे दिले जात होते. नवीन कपडे घालून थोडंसं मिरवायच्या मनःस्थितीत असलेल्या मुली उगाचच पुन्हा पुन्हा अंगणात येऊन परत घरात जात होत्या. बाप्ये लोक मात्र निवांत घोरत पडलेले होते. वातावरणात चांगलाच गारठा होता. काही तरूण मंडळींनी शेकोटी पेटवून गप्पांचा अड्डा जमवलेला होता. थंडीनं हैराण झालेली कुत्री देखील त्यांच्यापासून आदबशीर अंतर ठेवून शेकोटीच्या उबेला सुस्तावली होती.
गावाच्या मधोमध असलेल्या विठ्ठल मंदिरात मात्र अंधार होता. त्याच मंदिरात एका कोपर्यात तो आईने दिलेल्या शालीत गुरफटून झोपलेला होता. साधारण सूर्योदयाची वेळ झाली असेल. अचानक मंदिराचा लोखंडी दरवाजा करकरत उघडला. देऊळ झाडणारा माणूस आला होता. दरवाजाच्या आवाजानं त्याची झोप मोडली. आपण आत्ता पहात होतो ते स्वप्न की सत्य, हे कळायला त्याला थोडा वेळ लागला. जे काही स्वप्नात पाहिलेलं होतं, त्याचा अर्थ त्याला समजत नव्हता. कुणा तरी माहितगाराला विचारावा हा अर्थ, असा विचार करून आह्निके आटोपण्यासाठी तो बाहेर पडला.
गावाबाहेरच्या विहिरीवर स्नान करून त्यानं रानातील शिवमंदिराचा रस्ता पकडला. ऊन आता बर्यापैकी तावलं होतं. थोडीशी थंडी आणि थोडा उन्हाचा चटका असं मजेदार वातावरण होतं. त्या मंदिरात नियमित येणारा एक बैरागी अजून असेल तर त्याच्याशी थोडं बोलता येईल या विषयावर, असा त्याचा अंदाज होता. रानात जिकडं तिकडं हळदुलं ऊन सांडलं होतं. सण असल्यामुळे रानात माणसं देखील दिसत नव्हती. कुठेतरी एखाद-दुसरा चुकार पक्षी, बस! मंदिर अगदी हाकेच्या अंतरावर आलं. तसं त्यानं चालण्याचा वेग वाढवला.
अगदी प्राचीन काळातील मंदिर. काळ्या दगडात बांधलेलं. थोडंसं मोडकळीला आल्यासारखं दिसणारं. पण तितकंच मनाला भारून टाकणारं. काही ठिकाणी थोडी पडझड देखील झालेली. चिर्यांमधील फटीतून हातहात लांब गवताचे तुरे उगवले होते. पावसाळ्यात भिंतीवर धरलेल्या शेवाळाचे आता पोपडे सुटू लागले होते. एक पारव्याचं जोडपं छतावर बसून निवांत ऊन खात होतं. ती शांतता भंग करण्याची त्यांची देखील इच्छा नसावी.
शेजारी एक छोटंसं कुंड. केवळ पावसाळ्यातील पाण्यावर भरणारं. दर्शनास आलेल्या लोकांच्या हातपाय धुण्याची सोय म्हणून केलेलं. त्याची चाहूल लागताच दोन-तीन बेडकांनी ‘डुबुक्क’ करून लांब उड्या मारल्या. शेवाळाचा तवंग बाजूला सारून त्याने कुंडातून पाणी काढून हातपाय धुतले. त्या थंड स्पर्शाने त्याला अगदी बरं वाटलं. देवळात प्रवेश करून प्रथम त्याने नंदीला नमस्कार केला. घंटानाद करून अंधार्या गाभार्यात प्रवेश केला. आत बैरागी रूद्रपाठ करीत बसलेला होता. देवाची छान पूजा केलेली होती. पांढर्या भस्माचे पट्टे ओढलेले होते. पिंडीवर थोड्या थोड्या अंतरावर स्वस्तिकाची फुले कल्पकतेने मांडलेली होती. अभिषेक पात्रातून टपटप पाणी पिंडीवर पडत होतं. तिथंच थोडी बेलाची पाने आणि तांदूळ वाहिलेला.
नमस्कार करून एका कोपर्यात शांतपणे ऐकत बसला. बैराग्याचा पाठ चालूच होता. एका बाजूला तेल माखलेला पितळी दिवा शांतपणे तेवत होता. उदबत्तीतून मंद मंद सुगंधी वलये बाहेर येत होती. आतील हलका अंधार गडद गडद होत गेला. त्याचे डोळे जड झाले. श्वास मंदावला. सार्या शरीरातील संवेदना जणू गायब झाल्या. आणि प्रकाशाच्या एका लोळासरशी तो एका उत्तुंग पर्वतशिखरावर पोहोचला. ऊनपावसाचा खेळ चालू होता. सूर्यावरून भराभर काळे मेघ सरकत होते. अंगावर हलक्या हलक्या पर्जन्यधारा पडत होत्या. भन्नाट वेगाने वाहणा-या वा-याने गवतात लाटाच्या लाटा पसरत होत्या. अतर्क्य वेगाने वृक्षवेलींवर मादक सुगंधी फुले उमलत होती, कोमेजत होती. पूर्वी कधी न ऐकलेले पक्ष्यांचे आवाज कानात घुमत होते. आकाशातून मोत्यासारखे चमकणारे तारे तडातड तुटून कोसळत होते. विश्वाच्या भयाण काळोख्या पोकळीत ग्रहगोल गरागरा फिरत इतस्ततः फेकले जात होते. त्याची जाणीव, अस्तित्व, अहंकार सारं काही द्रवरूप झालं आणि प्रचंड वेगाने एका प्रपाताचे रूप घेऊन डोंगरमाथ्यावरुन कोसळू लागलं. त्या प्रपाताच्या वाटेत येणारं सारं काही भक्षण करीत तो पुढे पुढे जाऊ लागला…
अचानक कुणीतरी दूरवरून जोरजोरात हाका मारू लागलं. संवेदना परत जागेवर येत त्याने हळूहळू डोळे उघडले. त्या पुरातन शिवमंदिरातच होता तो. समोर बैरागी चिंताक्रांत उभा. “अरे, तुला झालं तरी काय? कधीचा हाका मारतोय मी? श्वासदेखील चालत नव्हता. म्हटलं मेलाबिलास की काय भुकेनं?”
“तसं नाही काही. झोप आली असावी अचानक.” तो थोडासा खजील होत उत्तरला.
“बोल, अचानक का आलास भेटायला?”, बैराग्यानं विचारलं.
“मला तुम्हांला एक विचारायचं होतं. आज पहाटे मी एक अद्भुत स्वप्न पाहिलं. साधारण सूर्योदयापूर्वी. एक स्त्री समोरून चालत आली. मी एक लहान बालक होतो. रडत होतो. तिनं मला प्रेमानं जवळ घेतलं आणि पदराखाली घेऊन स्तनपान करवू लागली. त्या दुधाची गोडी खरंच अमृतासारखी होती. इतकं सत्य वाटत होतं ते स्वप्न की, जागा झालो तरी बराच वेळ मला ती अमृताची चव जाणवत होती.”
बैराग्याचे डोळे उजळले. “अरे, ते दूध म्हणजे ब्रह्मज्ञान. जे मिळवण्यासाठी लोक जन्मोजन्मी प्रयत्न करतात, ते तुला जगदंबेच्या कृपेनं प्राप्त होणार आहे. पण आता तुला गुरुची खरेच गरज आहे. तू त्र्यंबकेश्वरला एकदा जाऊन ये. तिथे उत्तरेकडील काही शाक्त साधू आलेले आहेत. कुणाशी काही बोलू नकोस. कुणाला काही विचारू नकोस. फक्त जाऊन शांतपणे देवाचं दर्शन घे. जो तुझा खरा गुरु असेल, तो स्वतःच तुला शोधत येईल.”
(क्रमशः)
प्रतिक्रिया
3 Sep 2015 - 11:48 am | शिवोऽहम्
फार प्रभावी, चित्रदर्शी लिखाण करता तुम्ही मांत्रिकबुवा!
3 Sep 2015 - 11:56 am | मांत्रिक
धन्यवाद.
3 Sep 2015 - 11:49 am | शिवोऽहम्
गोनिदांची सय येते तुमच्या लेखणीला.
3 Sep 2015 - 12:07 pm | मांत्रिक
फार मोठ्या लेखकाशी तुलना केलीत हो! गोनिदा ते गोनिदाच!
माचीवरला बुधा आणि त्या तिथे रुखातळी तर जीव ओवाळून टाकावा अशा कलाकृती.
4 Sep 2015 - 6:39 am | प्रचेतस
अगदी अगदी.
3 Sep 2015 - 12:02 pm | अमृत
लिखाण आवडले. वर म्ह्टल्याप्रमाणे फारच चित्रदर्शी लिखाण.
3 Sep 2015 - 12:30 pm | रुस्तम
पु भा प्र....
3 Sep 2015 - 12:41 pm | कविता१९७८
छान झालाय हा भागही
3 Sep 2015 - 12:45 pm | प्यारे१
मोठे भाग टाका ओ...
ख़ास लिहीताय.
3 Sep 2015 - 3:00 pm | एस
लेखनशैली छान आहे.
3 Sep 2015 - 3:17 pm | पद्मावति
हाही भाग फारच छान. पु.भा.प्र.
3 Sep 2015 - 3:19 pm | तुडतुडी
१ नंबर . मांत्रिकभाऊ . अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर गोनीदां चं लिखाण आवडत नाही . लिहिण्याची हातोटी छान असेल पण अध्यात्मिक सत्याचा लवलेश नसतो . पु भा प्र....
3 Sep 2015 - 4:42 pm | द-बाहुबली
ह्म्म...!
अगदी साद देती हिमशिखरे पासुन ते पार मिश्टर एम. पर्यंत काही तुरळक साहित्य वाचलेले असल्याने अशा कथानकांचा आरंभ अन अंत व्यवस्थीत माहित आहे त्यामुळे जेंव्हा हे लिखाण (एखाद्याचे चरित्र नसेल तर) नक्कि काय देते हा प्रश्न मनात नेहमी येतो. इश्वर तर स्वप्नरंजनाची नक्किच अपेक्षा करत नसावा...
या प्रतिसादातुन लेखकाचा त्याच्या ओघवत्या शैलीचा उपमर्द मला अजिबात प्रस्तुत नाही याची शहाण्यांनी नोंद घ्यावी.
3 Sep 2015 - 5:40 pm | तुडतुडी
त्यामुळे जेंव्हा हे लिखाण (एखाद्याचे चरित्र नसेल तर) नक्कि काय देते हा प्रश्न मनात नेहमी येतो.
लई इचार नका करू . हे लिखाण कोणाला काय देतं हे ज्याच्या त्याच्या घेण्यावर अवलंबून आहे . कुणी कितीही दिलं तरी आपली झोळीच फाटकी असेल तर कै उपयोग आहे का ?
3 Sep 2015 - 5:45 pm | द-बाहुबली
ते तर शाहरुख खानच्या डर चित्रपटालाही लागु आहे. मुद्दा हा आहे द्यायचं काय आहे आणी घ्यायचं काय आहे ?
मि लाख तुम्हाला इथे शिव्या देइन पण जर त्या तुम्ही घेतल्याच नाहीत तर त्या कोणाकडे जातील ? माझ्याकडेच ना असा विचार करुन जर मी इथे अक्षरे लिहली तर ते (संपादाकना) चालेल काय ? अर्थातच नाही. तेंव्हा कोनी काय घ्यायच ते ज्याच्या त्याच्यावर आहे ही बालवाडी छाप वाक्ये प्रसवु नये ही विनंती.
4 Sep 2015 - 5:40 am | स्पंदना
अतिशय सुंदर प्रभावी लेखन!!
4 Sep 2015 - 7:12 am | कंजूस
इकडे सगळे गुरुच्या शोधात का निघतात?
5 Sep 2015 - 10:27 am | मांत्रिक
कदाचित तुमचा सद्गुरु या संकल्पनेवर विश्वास नसावा. पण गुरु सर्व क्षेत्रात आवश्यक आहेच. मग ते शालेय शिक्षण असो, युद्धकला असो, स्वयंपाक असो, गायन वादन असो की अध्यात्म! आजकालच्या भानगडखोर बाबा आणि बुवांंमुळे लोकांचा या गोष्टींवरून विश्वास उडत आहे, यात चूक काहीच नाही. तरी पण त्यामुळे खर्या, नि:स्वार्थी, त्यागी गुरुंचे महत्व कमी होत नाही. माझा अशा काही मोजक्याच साधु संतांशी योगायोगाने संबंध आला, आणि त्यांच्या कृपेचे अनुभव देखील मला आले. त्यामुळे कुणी काही मत मांडो, ज्याची प्रचिती मला आली, ते मी खरेच मानणार!
4 Sep 2015 - 7:16 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
छान लिहिलय :)
4 Sep 2015 - 10:15 am | नाखु
लिखाण
पुभाप्र.
4 Sep 2015 - 10:45 am | कैलासवासी सोन्याबापु
प्रचंड कब्ज़ा घेते तुमचे लेखन! वाह!! अशक्य डिटेलिंग अन ते ही कुठेच ओवर द बोर्ड न वाटणारे , मुजरा घ्या _/\_
4 Sep 2015 - 10:59 am | मांत्रिक
धन्यवाद बापूसाहेब! अशा मनापासून दिलेल्या प्रतिसादांनी खूप हुरुप येतो.
4 Sep 2015 - 11:05 am | प्रमोद देर्देकर
तिनही भाग आताच वाचुन काढले.
मालक तेव्हढं मागील भागांच्या लेखांचा दुवा देत चला की प्रत्येक पुढच्या लेखामध्ये.
बाकी पु.भा. प्र.
4 Sep 2015 - 11:11 am | मांत्रिक
अहो मला खरंच अजून देता येत नाही दुवा. ठीक आहे, आता सं.म. ला विनंती करतो.
4 Sep 2015 - 11:07 am | नीलमोहर
हाही भाग उत्तमच..
4 Sep 2015 - 12:11 pm | तुडतुडी
हो का ? आम्हाला कॉलेज छाप वाक्ये पण प्रसवता येतात . पण संपादकांना नैत ना अशी वाक्य . तुम्हाला ह्या लिखाणातून काही घ्यावंसं वाटत नसेल तर कुणी वाचायची सक्ती केलीय का ? आणि नक्की काय म्हणायचय ते तुमच तुमचं तुम्हाला तरी समजतंय का ?
4 Sep 2015 - 1:50 pm | द-बाहुबली
माझं म्हणन तुम्हाला समजत नाही की मला समजत नाही यापैकी कोणता मुद्दा मी प्रथम विषद करु ?
4 Sep 2015 - 10:42 pm | पैसा
आधी सांग कटाप्पाने बाहुबलीला का मारले!
5 Sep 2015 - 4:05 pm | द-बाहुबली
त्याचं डोकं ठीकाणावर न्हवतं...
5 Sep 2015 - 4:28 pm | कट्टप्पा
असले काहीतरी बोलायचा म्हणून मारले.
5 Sep 2015 - 4:33 pm | अभ्या..
हानतिज्यायला
5 Sep 2015 - 4:34 pm | द-बाहुबली
_/\_ जय हो :D :D :D
5 Sep 2015 - 4:40 pm | प्यारे१
खिक्क्क!
6 Sep 2015 - 9:43 am | अजया
=))
11 Sep 2015 - 12:49 pm | बॅटमॅन
ठ्ठो =)) =)) =))
-शेख बॅटमॅन खान.
6 Sep 2015 - 9:39 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
तुम्हाला आणि बाहुबली ब्योमकेश बक्षी ला वेगळा धागा देउ का काढुन वाद घालायला. चांगल्या धाग्याचा कात्रज करु नका उगाच. वादचं घालायचा असेल तर त्या वृद्धाश्रमामधे जा नैतर इच्छामरण आहेचं. चॉइस इज युअर्स. धन्यवाद.
4 Sep 2015 - 12:29 pm | पैसा
खूप सुंदर लिखाण होतंय. ओघवतं आणि चित्रदर्शी!
4 Sep 2015 - 12:56 pm | ज्ञानोबाचे पैजार
अविद्यागुणे मानवा उमजेना। भ्रमे चुकले हीत ते आकळेना॥
परीक्षेविणे बांधले दृढ नाणें। परी सत्य मिथ्या असें कोण जाणें॥
जगी पाहतां साच ते काय आहे। अती आदरे सत्य शोधुन पाहे॥
पुढे पाहतां पाहतां देव जोडे। भ्रम भ्रांति अज्ञान हें सर्व मोडे॥
सदा वीषयो चिंतितां जीव जाला। अहंभाव अज्ञान जन्मास आला॥
विवेके सदा स्वस्वरुपी भरावे।जिवा ऊगमी जन्म नाही स्वभावें॥
दिसे लोचनी ते नसे कल्पकोडी। अकस्मात आकारले काळ मोडी॥
पुढे सर्व जाईल कांही न राहे। मना संत आनंत शोधुनि पाहे॥
फुटेना तुटेना चळेना ढळेना। सदा संचले मीपणे ते कळेना॥
तया एकरूपासि दूजे न साहे। मना संत आनंत शोधुनि पाहें॥
निराकार आधार ब्रह्मादिकांचा। जया सांगतां शीणली वेदवाचा॥
विवेके तदाकार होऊनि राहें। मना संत आनंत शोधुनि पाहे॥
जगी पाहतां चर्मलक्षी न लक्षे। जगी पाहता ज्ञानचक्षी निरक्षे॥
जनीं पाहता पाहणे जात आहे। मना संत आनंत शोधुनि पाहे॥
नसे पीत ना श्वेत ना श्याम कांही। नसे व्यक्त अव्यक्त ना नीळ नाहीं॥
म्हणे दास विश्वासतां मुक्ति लाहे। मना संत आनंत शोधुनि पाहे॥
(मनाचे श्लोक १४३ ते १५०)
जय जय रघुवीर समर्थ.
पैजारबुवा
4 Sep 2015 - 8:27 pm | मांत्रिक
सुंदर! पैजारबुवा, अगदी सुंदर वर्णन आहे.
4 Sep 2015 - 1:33 pm | बोका-ए-आझम
पु.भा.प्र.
4 Sep 2015 - 8:52 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर लेखनशैली ! पुढच्या भागांचे कुतुहल वाढले आहे.
5 Sep 2015 - 5:30 am | चाणक्य
सोन्याबापूंनी म्हटल्याप्रमाणे डीटेलिंग मस्त जमलंय.
5 Sep 2015 - 8:47 am | असंका
अहो थोडे मोठे भाग टाकायचं मनावर घ्या हो.....
फारच सुंदर
धन्यवाद!
5 Sep 2015 - 4:29 pm | प्यारे१
बाहुबली, माहिष्मती राज्यावर हल्ला झालाय. चला. आपली तिकडे जास्त गरज आहे.
5 Sep 2015 - 4:36 pm | द-बाहुबली
हम्म बाहुबलीला द-बाहुबलीचा पाठींबा आहे.
11 Sep 2015 - 12:51 pm | बॅटमॅन
निम्डा...च्यक....डोज्रस्टेल्मी...उना कास्ट्रा...च्यक्...मेनोपीज्रा...होकुवे....
11 Sep 2015 - 1:25 pm | प्यारे१
त्यानं बोलताना चिंच खाल्ली असावी असा डाउट आला.
5 Sep 2015 - 4:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चित्रदर्शी लेखन. सुंदर. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
-दिलीप बिरुटे
5 Sep 2015 - 5:11 pm | द-बाहुबली
मला स्वतःला साधारण असेच स्वप्न पडले होते साधारण १ वर्षापुर्वी. योगायोग असा की मी त्यावेळी विपश्यना शिबीरात होतो व तो ९ वा दिवस होता. अर्थातच गेले ९ दिवस कशातच मन ठेवले नसल्याने तरलता व समता पुष्ठ झाली होतीच पण शिबीरात मौन मनाचेही पाळायचे असते व स्वप्नात रमल्यास मनाचे मौन सुटु नये म्हणून मी तरलतेनेच पण चटकन डोळे उघडले कारण मला स्वप्न पुर्ण करायचे न्हवते. मी योग्य केले की अयोग्य ? या स्वप्नाला काही सिग्नीफिकन्स आहे की फक्त असेच पडले समजावे ?
5 Sep 2015 - 5:11 pm | एक एकटा एकटाच
सुरेख.......
सगळ अगदी डोळ्यांसमोर उभं रहात.
पुढिल लिखाणास शुभेच्छा
6 Sep 2015 - 9:27 am | स्रुजा
सुरेख !! तुम्हाला विलक्षण कसब आहे.. ओघवतं आणि तपशीलवार, माझ्या डोळ्यासमोर तो अख्खा परिसर उभा राहिला कथा वाचता वाचता.. लिहीत राहा.. आणि दुवे मी टाकते या भागांमध्ये.
10 Sep 2015 - 7:55 pm | दमामि
वा! आवडले. लवकर पुढील भाग येऊद्या.
11 Sep 2015 - 5:05 am | यशोधरा
सुरेख लिहिलंय. अतिशय चित्रदर्शी.
11 Sep 2015 - 12:50 pm | बॅटमॅन
एकदम सुरेख अन चित्रदर्शी, पुढील भागाच्या प्रतीक्षेत!!!!
11 Sep 2015 - 4:07 pm | ब़जरबट्टू
आवडले.. अजून येऊ द्या,.
11 Sep 2015 - 6:02 pm | तुडतुडी
द-बाहुबली , तुम्हाला पडलेलं स्वप्न असेल . पण त्याला पडलेलं ते स्वप्न नव्हतं . अध्यात्मिक अनुभव कोणाला सांगू नयेत म्हणून तो स्वप्न पडलं असं म्हणत असावा .
ह्या वरच्या वर्णनात खूप गहन अर्थ आहे . अगदी असाच अनुभव स्वामी विवेकानंदांना राम्कृशांनी पहिल्या भेटीत करून दिला होता . मुक्तानंदांना नित्यानन्दांनी करून दिला होता .
12 Sep 2015 - 2:27 pm | द-बाहुबली
चान. वास्तवात पडतात ती स्वप्न. अन कथेत घडतात त्या सत्यघटना... फार रोचक स्पष्टीकरण आहे. आवडलं.
11 Sep 2015 - 11:57 pm | रातराणी
सुरेख! पुभाप्र :)
12 Sep 2015 - 2:51 pm | सत्य धर्म
अतिशय सुंदर भाषा मांत्रिक बुवा..............
12 Sep 2015 - 2:51 pm | सत्य धर्म
अतिशय सुंदर भाषा मांत्रिक बुवा..............
12 Sep 2015 - 2:53 pm | प्यारे१
आता पुढचा भाग लिहायला २०१६ उजडवणार का?
द बाहुबलि-चोन्च्लुसिओन पूर्वी येवो म्हणजे मिळवली.
-प्यारेनाराज ठाकरे
12 Sep 2015 - 3:04 pm | द-बाहुबली
लेखकाने त्यांच्या चाहत्यां असे वाट बघायला लावु नये अशी विनंती सर्व चाहत्यांतर्फे मी करतो. बाकी जे कोणी समिक्षागीरी करतील त्यांना फाट्यावर मारा हो असेच म्हणेन. मला तरी बहुसंख्य वाचकांची या कथेचा पुढील भाग वा शेवट समजुन घ्यायची अनाकलनीय तगमग मनाला फार भिडली आहे. व त्यांच्यासाठीच हे माझे सांगणॅ आहे. चाहत्यांना आसुसलेले ठेवणे बरे न्हवे तीकडे दुश्काळ अन इकडे ***. अहो सामांन्यांनी सुखी रहायचे तरी कसे ? एकवेळ कट्टापाने बाहुबलीला का मारले हे समजले नाही तरी चालेल पण अवधुतच्या पुढील भागात काय घडते हे वाचकांना कळणे त्यांचा अधिकार आहे असेच मी मानतो.
15 Sep 2015 - 2:10 pm | सत्य धर्म
अवधूत. मस्त जमत आहे भट्टी.........,,,,,,,
16 Sep 2015 - 12:01 pm | शित्रेउमेश
आता पुढचा लवकर येवु दे...!!!!
16 Sep 2015 - 12:19 pm | असंका
मांत्रिक बुवा पुढचा भाग कधी ????
16 Sep 2015 - 12:27 pm | मांत्रिक
काही वैयक्तिक कारणे होती त्यामुळे थांबलो होतो, पण येईन लवकरच!
24 Nov 2015 - 2:53 am | रेवती
वाचतिये.
12 Sep 2016 - 11:55 am | पथिक
वर्णन खूप आवडले. एकेक भाग वाचून काढतोय.
एक कवी मधुकर केचे यांच्या काही ओळी तुम्हाला आवडतील म्हणून देतोय:
दिंडी गेली पुढे
अर्ध्यात मी अडे
अंतराय वाढे
सोबत्यांशी
पुढे गेलेल्यांच्या
पावलांचे ठसे
चेतविती पिसे
लंगड्याचे
12 Sep 2016 - 5:07 pm | प्रभास
वा! सुंदर... मूळ कविता व कवी यांच्याविषयी माहिती देऊ शकाल थोडक्यात?
13 Sep 2016 - 1:15 pm | पथिक
कवींबद्दल तर काही माहिती नाही.. पण कवितासंग्रहाचं नाव "दिंडी गेली पुढे" असं आहे. बाजारात उपलब्ध पण आहे.