खरं सांगावं,खरं ओकूं नये!
"स्पिक ट्रुथ डू नॉट स्पिक-औट ट्रुथ"
रामदुलारीची आणि माझ्या भावाची अलीकडे बरीच गट्टी जमली आहे.रामदुलारी कधीकधी आमच्या घरी येतो.कधी माझ्या भावाच्या क्लिनीक मधे माझगावला जातो नाहीतर माझ्या भावाला फोन करून विचारून ते दोघे कधी गिरगाव चौपाटीवर तर कधी जुहूच्या चौपाटीवर सूर्यास्त पहायला आणि गप्पा मारायला भेटतात.
ह्यावेळी तो आमच्या घरीच आला होता.इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर माझा भाऊ त्याला म्हणाला,"रामदुलारी आज तू कसला इष्यु घेऊन आला आहेस?"
तो माझ्या भावाकडे बघून हंसत हंसत म्हणाला,
"त्या दिवशी मी ऑफिसात संध्याकाळी घरी जायची वेळ झाल्यावरही जास्त वेळ बसलो होतो.माझा एक सहकारी अरविंद कानविंदे आणि त्याची सहकारी मैत्रीण सुलभा महात्मे आमच्या ऑफीसच्या स्टेशनरी ठेवतात त्या रुममधे बसून त्यांचे बिनदास काही प्रेमचाळे चालले होते.मी मला थोडे कोरे कागद हवे म्हणून त्या रूमकडे जाऊन दार उघडलं.मी थोडा लेट बसलो होतो ते त्याना माहित नव्हतं असावं. त्यांचा हा प्रकार माझे एक सिनीयर सहकारी मोहन मोकाशी यांना मी दुसर्या दिवशी सवित्सर सांगण्याचा प्रयत्न केला.त्यांना ते सर्व माझ्या तोंडून ऐकायला लाज वाटत होती.मला ते म्हणाले,
"रामदुलारी एक चिनी म्हण आहे,"खरं सांगाव खरं ओकू नये"
माझ्या भावाला रामदुलारी म्हणाला,
"मला ह्या म्हणीचा अर्थ कळला नाही."
हे त्याच ऐकून झाल्यावर मधेच मी त्याला इंटरप्ट करीत म्हणालो,
"अरे रामदुलारी,मी तुला त्या म्हणीचा अर्थ सांगतो.
त्यासाठी माझ्या मानसशास्त्रज्ञ भावाची जरूरी नाही.
तू मोहन मोकाश्यांना,"ती दोघं प्रेमचाळे करीत होती" एव्हडं जरी सांगतलं असतस तरी त्यांना ते सत्य काय ते समजलं असतं.पण तू जेव्हा त्याना त्या प्रकाराची सवित्सर माहिती सांगायला गेलास त्यावर त्यानी तुला ती चिनी म्हण सांगितली.
म्हणजे त्या म्हणीचा अर्थ असा की खरं सांगावं आणि ज्यावेळेला आवश्यक्यतेपेक्षा जास्त खरं सांगितलं जात त्यावेळी त्याला खरं ओकणं म्हटलं जात असावं."
"बरोबर ना रे?"
असं मी माझ्या भावाला विचारलं.
त्यावर माझा भाऊ मला म्हणाला,
"अगदी बरोबर.मी हवं तर रामदुलारीला आणखी एक उदाहरण देतो.
समजा एखाद्दाची पत्नी आपल्या मैत्रिणीला म्हणाली,
"आमचे की नाही हे, रात्रीचे खूपच घोरतात."
हे तिचं मैत्रिणीला सांगणं म्हणजे खरं सांगणं.
पण ती जर का मैत्रीणाला म्हणाली,
"आमचे की नाही हे रात्रीचे खूपच घोरतात. घॉर,घूर,टॉंस,फूंस असा आवाज काढतात. पिंजरा चित्रपटातल्या निळू फुले काढायचा अगदी तसा गं!."
तर असं सांगणं हे खरं ओकणं झालं.घोरणारा असाच आवाज काढणार.तो कसा आवाज काढतो हे पुढे सांगणं अनावश्यक आहे.
"ऐसा क्या?"
असं म्हणून रामदुलारीने निःश्वास टाकला.
श्रीकृष्ण सामंत
प्रतिक्रिया
30 Jan 2009 - 2:01 pm | मॅन्ड्रेक
आवड्ल.
Mandrake - the magician.
30 Jan 2009 - 3:03 pm | योगी९००
खरंच किती छान शब्दात तुम्ही वर्णन केले आहे.
खरं सांगावं,खरं ओकूं नये!
अगदी खरं..
खादाडमाऊ
30 Jan 2009 - 11:02 pm | सर्किट (not verified)
सामंतकाका,
तुमच्या लेखनाने नेहमीच प्रबोधन होत असते.
पुढील लेख वाचायला उत्सुक आहे.
-- सर्किट
30 Jan 2009 - 11:10 pm | प्राजु
खरं सांगावं.. खरं ओकू नये..!
प्रसंग आणि त्यावरून प्रबोधन... छान जमला आहे लेख.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
30 Jan 2009 - 11:34 pm | पिवळा डांबिस
पण आमच्या डोचक्यात एक शंकरराव! (शंकरराव = शंका!! आमचं मन हे तिच्यायला असलंच वढाळ वढाळ!!:))
चिनी लोक घोरतांना कसा आवाज काढत असतील?
आपल्या सामंतकाकांनी वर्णन केल्याप्रमाणे "घॉर,घूर,टॉंस,फूंस असा?"
की दुसरा काहीतरी,
"चिंग, व्यँय, ग्यँय, वाँऽऽ" असा?
जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा!!!
सर्किटकाका, तुमच्या गावांत पैशाला पसाभर चिनी आहेत, तुम्हाला ठाऊक आहे?
-पिडांकाका
:)
30 Jan 2009 - 11:43 pm | सर्किट (not verified)
सर्किटकाका, तुमच्या गावांत पैशाला पसाभर चिनी आहेत, तुम्हाला ठाऊक आहे?
पसाभर चिनी इथे नक्कीच आहेत. पण कुठलाही/कुठलीही चिनी घोरताना मी आजवरतरी त्याच्या/तिच्या बाजूला नव्हतो. त्यामुळे आपला प्रश्न अनुत्तरित राहणार ह्याचे दु:ख होते.
-- सर्किट
30 Jan 2009 - 11:50 pm | पिवळा डांबिस
कुठलाही/कुठलीही चिनी घोरताना मी आजवरतरी त्याच्या/तिच्या बाजूला नव्हतो.
अरेरे!!!
आपल्या दु:खात आम्ही सहभागी आहोत...
शे शे!
30 Jan 2009 - 11:34 pm | रेवती
छोटासा लेख आवडला.
आता सारखं स्वत:च्या बोलण्याकडे लक्ष ठेवावं लागणार की मी खरं बोलतीये की...
धन्यवाद सामंतकाका!
रेवती
30 Jan 2009 - 11:52 pm | पिवळा डांबिस
आता सारखं स्वत:च्या बोलण्याकडे लक्ष ठेवावं लागणार की मी खरं बोलतीये की...
(खुद के साथ बातां: रंगाने कुठला देव पूजला होता ते एकदा व्यनि करून विचारून घ्यायला पाहिजे!!!!:))
सामंतांनु, थोडक्या विषयांतर केलां, मापी करा...
30 Jan 2009 - 11:55 pm | अविनाशकुलकर्णी
आमच चिनि मित्र माओ त्से युंग याला आम्हि विचारले कि घोरताना चिनि कसे आवाज काधतात??// घॉर,घूर,टॉंस,फूंस असा?"
"चिंग, व्यँय, ग्यँय, वाँऽऽ" असा?
त्यावर् युंग् म्हणाला कि... चिंग् माउ..मिंग् चाउ कमलिन्,चुंग् फा मूचुरिन् .. चाउ चाउ चाउ कमलिन्, चाउ मिंग् ,चाउ मिंग् चाउ,हॉट् अऍन्ड् सोर्??
अरे आमच्या भाषेत् सांग् ना..मी म्हणालो
त्या वर् तो म्हणाला कि आमच्यात् "खरं सांगावं,खरं ओकूं नये!"अशी म्हण् आहे..पण् मला सत्य् ओकायची सवय् आहे म्हणुन् नाहि सांगु शकत्..
म्य्ंग् मींग् ग्प्प्यांग् बसाम्ग्...
म्हणजे मग् मी पण् गप्प् बसलो
31 Jan 2009 - 12:07 am | भडकमकर मास्तर
मला वाटलं रामदुलारी हे बाईचं नाव असतं...
रामदुलारी : सीता
(समर्पक दाखला : संतोषींच्या लज्जा सिनेमातसुद्धा रेखाचं नाव रामदुलारी आहे)...
..
किंवा 'राममुरारी'सारखं रामदुलारी असेल... काहीही असेल , कोणीही काहीही नाव ठेवावं हेच खरं...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
31 Jan 2009 - 12:09 am | पिवळा डांबिस
मला वाटतं काकांना "रामदुलारे" म्हणायचं असावं.
31 Jan 2009 - 3:10 am | धनंजय
सीतेच्या आणि अन्य देव्यांच्या नावांना "सिंह" जोडून काही पुरुष नावे बनवली जातात.
पण अशा नावांचा पुन्हा स्त्री नाव असा संक्षेप केला जातो, असे ऐकल्यासारखे वाटते.
31 Jan 2009 - 12:58 am | यशोधरा
छान लिवल्यात हां काका.. आवाडला..
31 Jan 2009 - 8:03 am | शितल
काका,
बोलणे आणि ओकणे ह्यातील फरक सांगणारा लेख आवडला..:)
31 Jan 2009 - 9:56 am | श्रीकृष्ण सामंत
मंडळी,
आपणा सर्वांच्या प्रतिक्रियेबद्दल आभार.
खरं सांगायचं तर आमचा(माझा,माझ्या भावाचा आणि रामदुलारीचा) संवाद संपता संपता, मालवणहून दाजीकाका त्यावेळी घरी आले होते.
"मालवणीत पण ह्या म्हणीचं एखादं उदाहरण देता येईल का हो दाजीकाका?"
असं माझ्या भावाने दाजीकाकाना विचारलं.
दाजीकाकानी सहजगत्या जे उदाहरण दिलं ते मी ह्या लेखनात देण्याचं टाळलं.कारण,
ते उदाहरण कदाचीत काही "घृणास्पद" म्हणतील.
स्त्रीवाचक कदाचीत " अवाचनीय" म्हणतील.
काही वाचक "सामंतकाकाना,वेडलागलंय,बाळं लागलंय,काका तुम्हाला असं लिहिणं शोभत नाही "असं म्हणतील,म्हणून मी तो संवाद नाही दिला.
"जनरल डायर कदाचीत कात्री लावतील"
(मनात येतं ते लिहिणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे.आणि तो वापरल्या शिवाय राहणार नाही..... वगैरे वगैरे)
दाजीकाकांचा मालवणीत संवाद असल्याने मी व माझा भाऊ "खो,खो" हंसलो.
कदाचीत मालवणीत सहजासहजी सुसंस्कृतपणे सांगणं कठीण जात असावं. नव्हेतर "उज्जू" उदाहरण द्दायला मालवणी शिवाय "बोली" नाही असं मी म्हटलं तर कदाचीत माझं धारिष्ट होईल.
नंतर रामदुलारीने आम्हाला हंसताना बघून कुतूहलापोटी मराठीत समजावून सांगण्याचा आग्रह धरला आणि माझ्या भावाने त्याला समजावून सागितल्यावर तो पण खूदखूदुन हंसला.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
31 Jan 2009 - 9:57 am | सहज
कधी तरी ओका हो.
:-)