पूर्वी मुंबई सोडली तर इतर शहर, गावांत आतासारखी बाजारपेठ खूप कमी होती. मॉल तर अस्तित्वातच नव्हते. मग काही नित्य गरजा भागवणार्या वस्तूंसाठी दारावर येणार्या फेरीवाल्यांची आतुरतेने वाट पाहिली जायची. बहुतेक फेरीवाले तेच ठरलेले असल्याने ह्या लोकांबरोबर चांगला परिचय होऊन एक आपलेपणाही तयार होत असे. त्यांच्या रस्त्यावरून दारापर्यंत येणार्या आरोळीवरून कोण व्यक्ती आली असेल हे कळायची. कुठल्या कुठल्या दूरवरच्या गावातून ही लोक व्यवसायासाठी पायी भटकत यायची. वस्तू विकता विकता ते त्यांचे सुख,दुःखही आपल्याबरोबर शेयर करायचे त्यामुळे पुढच्यावेळी आल्यावर काय गं आता कशी आहे तुझी लेक, का रे बाबा काल चांगला धंदा झाला ना? अशा प्रकारची विचारपूस आवर्जून व्हायची. माझ्या आठवणीतल्या काही दारावरच्या फेरीवाल्यांच्या आठवणी मी खाली देत आहे. तुमच्या आठवणीही येऊद्या.
१) सूर्योदयापूर्वी किंवा सूर्योदय होताच ट्रिंग ट्रिंग बेल अंगणात घुमायची. बेल वाजवून दूध$$ आवाजाने दारावरच्या फेरीवाल्यांच्या फेरीचा आरंभ होत असे. दूध वाला येणार म्हणून आधीच सुटे पैसे काढलेले असायचे. वडील दूध आणायला जाताच तो नमश्कार शाब म्हणून सलाम ठोकायचा. कधी कधी आपल्या धंद्याबद्दल म्हणजे किती लवकर उठावे लागते किती कष्ट करावे लागतात ह्यांबद्दलही त्याच्या सुरात वडिलाशी हितगुज करायचा.
२)थोड्याच वेळात दुसरी ट्रिंग ट्रिंग ऐकू यायची. पण हा बेल सोबत आधीच पाव$$$$ ओरडत यायचा. ह्याचा धंदा रोजच चाले असे नाही. कारण पाव अधून मधूनच घेतले जायचे. पावा मध्ये दोन प्रकार असायचे एक नरम पाव आणि दुसरा कडक पाव. पाव हवे असतील तर त्यासाठीही सुटे पैसे बाजूला काढलेले असायचे. बेकारीतून आणलेल्या त्या ताज्या पावांना एक चविष्ट उबदार वास असे. पाव हातात पडताच तो चहात बुडवून खाण्याची इच्छा होत असे. कडक पाव कधीतरीच आम्ही घ्यायचो त्यामुळे तेही सहज न तुटणारे, कष्ट करून खावे लागणार्या पावाचीही चव कडक असायची. स्मित
३) १०-११ च्या सुमारास जिचे मला खास आकर्षण असायचे अशी हाक यायची. ओळखलंच असेल तुम्ही स्मित म्हावरा घ्या गो$$$$$$$$$/कोलबी घ्या गो$$$$$$$$$$ बुधवार, शुक्रवार, रविवार ह्या तीन दिवशी कोळणी आमच्याकडे नेहमीचे गिर्हाईक म्हणून यायच्याच. त्यांची रस्त्यावरून हाक ऐकली की मी खेळत असेल तिथून किंवा घरात अभ्यास करत असेल तर ते सगळे टाकून माश्यांची टोपली आणि कोळीणही पाहायला यायचे. कोळी साडी नेसलेल्या, कानात भावनगरी गठ्ठ्याएवढ्या जाडीच्या रिंगा घातलेल्या, डोक्यावर चुंबळ, चुंबळीवर माश्यांची टोपली त्यावर प्लायवूडचा तुकडा झाकलेला, हातात एका झाडाची छोटी फांदी माश्या हाकलण्यासाठी तर कधी माश्यांच्या वासावर तिच्या पाठी येणार्या कुत्रे किंवा मांजरांना हुसकावण्यासाठी. चालण्यात व बोलण्यातही त्यांची लकब असायची. कोळीण आली की जर पाटी (टोपली) जड असेल तर हात लावायला एक जण लागायचा. आई किंवा आजी पाटी खाली उतरवायला मदत करायची. टोपलीत मेणकापडावर कोलंबी/करंदी एका बाजूला एका बाजूला बोंबील कधी कधी बोईटे, छोटे पापलेट वगैरे असे मासे असायचे. मासे खराब होऊ नये म्हणून त्यात मध्ये मध्ये बर्फाचे तुकडे असायचे. हा बर्फ वितळत जायचा तसे मेणकापडाला न जुमानता टोपलीतून पाणी ठिबकत राहायचे. ती फळीवर वाटे लावायची. ते लावत असताना तिची हाताची हालचाल मला विशिष्ट वाटायची. कधी वेळ असेल तर करंदी, कोलंबी निवडून पण द्यायची. मग ती निवडता निवडता घरातून तिच्यासाठी एक चहाचा गरमागरम कप ठरलेला असे.
४) दुपार नंतर खूप फेरीवाले असायचे. ते रोज नाही पण आठवड्याने वगैरे त्यांची फेरी असायची प्रत्येकाची. एक साडी विकणारा यायचा. तो सुरत वरून साड्या आणायचा. त्याच्या साड्या अगदी मऊ आणि चांगल्या रंगात असायच्या. त्या साड्यांना हात लावायला मला खूप आवडायचे. गार आणि मऊ लागायच्या त्या हाताला. त्यांची एक एक प्रिंटही फार सुंदर असायची. बायका मिळून डझनावर साड्या घ्यायच्या त्याच्याकडून कारण रीझनेबलही असायच्या त्या. साडीवालाही गोड बोलून आणि चांगल्या साड्या दाखवून त्याने आपला इतका जम बसवला की आज त्याचे एक मोठे दुकान आहे बाजारात.
५) गरुडी पुंगी वाजवत आला की कुत्र्यांच्या भुंकण्याची त्याला साथ असायची. हाहा हा गरुडी जाडजूड आणि पोट पुढे आलेला असल्याने लगेच ओळखून यायचा. हा आला की नागोबाचे दर्शन जवळून व्हायचे. त्याच्या टोपलीत तो गुप गुमान बसलेला असायचा. पुंगी वाजवली की फणा काढायचा. मग आजी माझ्या हातात पैसे द्यायची. त्या गारुड्याला द्यायला. ते मिळाले की टोपलीच झाकण बंद व्हायचं व नागोबा डोलीत बसल्याप्रमाणे पुढे प्रवासाला निघायचे.
६) स्टोव्ह रिपेरिंग वाला आला हे तो लांब असतानाच समजायचं. कारण त्याची आरोळीच एवढी लांबलचक असायची. इस्टो रिपेर$$$$$$$$$$$$$$$ असा ओरडत यायचा. त्यावेळी प्रत्येकाच्या घरात स्टोव्ह असल्याने ह्याला खूपच डिमांड असायचं. मग त्याला आणण्यासाठी खास रस्त्यावर जाऊन अगदी प्रमुख पाहुणे आणतात तसे त्याला आणले जायचे. आमच्या स्टोव्हच्याही तक्रारी असायच्या. पिन मारूनही तो पॅरॅलिसिस झाल्याप्रमाणे एकाच बाजूला पेटतोय, त्याचा वायसर, बर्नर गेलाय अशा काही बाही तक्रारी असायच्या. मग स्टोव्ह रिपेरिंग वाला ठीक ठाक करून जायचा.
त्या काळी सगळ्यांकडे पितळी भांडी असायची व त्या भांड्यांना कल्हई लावावी लागायची. कल्हई वाल्यांची हाकही ठणठणीत असे. कल्हाई$$$$$$$$$$. आमची ठश्यांची पितळी पातेली/टोपे कल्हईसाठी बाहेर यायची आणि कल्हई करून परत मांडणीवर जाऊन बसायची.
७) हातात लोखंडी टाचण आणि हातोडा घेऊन पाट्याला टाकी लावायला पाथरवट यायचे. पाट्याचा भरपूर वापर झाला, की पाट्याची टाकी, म्हणजे धार कमी होत असे. आठवड्यातून किंवा पंधरा दिवसांतून एकदातरी त्या काळी पाथरवट, किंवा पाट्याला टाकी लावणारे दारावर येत असत. त्यांची "टाकीयेsssssss " अशी हाक ऐकू आली की आई त्यांना बोलवून पाट्याला टाकी लावून घेत असे. ही टाकी लावणारा एक लोखंडी जाड तासणी पाट्यावर ठेवून त्यावर हातोडीनं ठकठक करत ठोकून गाळलेल्या जागा भराच्या तुटक रेषांप्रमाणे पूर्ण पाट्यावर टाकीच्या रेषा ठोकत. हे बघताना मला तसं करण्याची फार इच्छा होई. मी कधीतरी खेळ म्हणून आमच्या घरातली तासणी घेऊन हातोड्यानं तासणी पाट्यावर ठोकायचा प्रयत्न करायचे. पण पाटा फार शिस्तीचा कडक होता. ज्याचं काम त्यानंच करावे, या तत्त्वाचा. माझ्यासाठी कध्धीकध्धी त्यानं नरमाई म्हणून घेतली नाही आणि मला कधी एका शब्दाचीही गाळलेल्या जागेची रेषा बनवता आली नाही.
८) संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर हमखास यायचा तो म्हणजे खारी-बटर वाला. त्याच्या पेटीच मला फार आकर्षण असायचं. सायकलच्या कॅरियरला तो ती मोठी पेटी लावून आणायचा. पेटी अॅल्यूमिनियमची आणि चकचकीत असायची. त्या पेटीला आत ओढायचे कप्पेही असायचे. त्यात खारी, बटर, टोस्ट रचलेले असायचे. आणि एक कप्पा अजून आकर्षक असायचा तो म्हणजे केक पेस्ट्रीजचा. तेव्हा मॉन्जीनीज सारखी केकची दुकाने माहीतही नव्हती त्यामुळे ह्या केकच फार आकर्षण असायचं. पण आतासारखा दिसत म्हणून रोज घ्या अस तेव्हा नव्हत. कधीतरी पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून एखादी पेस्ट्री घेतली जायची. आई घरी केक बनवायची पण ह्या पेस्ट्रीज रंगीत आयसिंगने फुलापानांनी सजवल्यामुळे मोहक दिसायच्या. दोन तीन बटरवाले असायचे त्यातल्या एका सुस्वभावी बटरवाल्याला नेहमी बोलवायचो म्हणून तो आला की आपला बटरवाला आला असे उद्गार निघायचे.
९) हिवाळा, उन्हाळ्यात गोळेवाल्याची गाडी फिरायची. टिंग टिंग वाजले की आम्ही मे महिन्याच्या सुट्टीत एकत्र जमलेली भावंड २५ पैसे, ५० पैसे घेऊन रस्त्यावर धावत सुटायचो. जर कधी जास्त भावंडे जमलेले असलो तर कोणीतरी त्या गोळेवाल्याची गाडीच अंगणात घेऊन यायचो. गोळे वाला प्रत्येकाच्या आवडीनुसार लाल, ऑरेंज, हिरवा, पिवळा असे कलर गोळ्यावर ओतून द्यायचा. गोळा संपेपर्यंत गोळेवाल्याला सोडायचे नाही. जरा का गोळ्यातला रस संपला की लगेच गोळा त्याच्यासमोर धरायचा मग तो त्यावर रंगाची बाटली ओतायचा. असा हा गोळेवाला रंगिबिरंगी थंडगार आस्वाद देऊन टिंग टिंग करत परत जायचा. गोळे वाल्याप्रमाणेच कुल्फीवाला यायचा. त्याच्याकडे कवटही मिळायचे. अंड्याच्या आकारासारखे. ते जरा महाग म्हणजे ५० पैसे किंवा १ रुपयाला असायचे. तेही मधून मधून घ्यायला आवडायचे. तसेच तो रिकाम्या कुल्फीच्या साच्यात आणि त्या कवटात जे दुधाच मिश्रण भरायचा ते पाहायला गंमत वाटायची. रिकाम्या साच्यात भरलेलं दुधाच मिश्रण त्याच डब्यातून आइसक्रीम होऊन बाहेर यायाचं तेव्हा जादू झाल्यासारखी वाटायची. अर्थात तो आधी लावलेले साचे बाहेर काढायचा हे नंतर कळू लागलं.
१०) अजून एक इंटरेस्टिंग फेरीवाला म्हणजे भंगारवाला. ह्याच्यासाठी काय काय जमा करून ठेवलेले असे. कुठे पडलेले लोखंडाचे तुकडे, डबे, बाटल्या काय काय ते सगळं जमा करायचं. तो रद्दी पण घ्यायचा म्हणून घरात जमा झालेले वर्तमान पत्र, रिझल्ट लागल्यानंतर कोरी पाने काढून राहिलेल्या वह्या द्यायच्या. (तेव्हा कोरी पाने जमवून बाईंडींङ करून एक वही रफ वही म्हणून केली जायची) मग भंगारवाला हे सगळं सामान त्याच्या त्या स्प्रिंगवाल्या काट्यात अडकवायचा आणि आपण काटेकोरपणे पाहायचे किती वजन होते ते. मग झालेल्या वजनाचे पैसे त्याने दिले की किती मोठी कमाई झाल्यासारखी वाटायची. मग त्या कमाईचा खाऊ आणला जायचा. एक प्लास्टीकवालाही फिरायचा. तो प्लास्टीकवर लसूण द्यायचा. पण हा लसूण इतका बारीक असायचा की सोलताना नखं दुखायची.
११) माझी अजून एक आवडती फेरीवाली म्हणजे बोवारीण/बोहारीण. पाठीवर कपड्यांचं गाठोडं, डोक्यावर भांड्यांची टोपली आणि हातात एखादं लहान मूल घेऊन भांडीय्ये$$$$$$ करत ती यायची. पंधरा दिवसांनी ते महिन्यांनी हिची फेरी ठरलेली असायची. ती आली की घरातील सगळे जुने कपडे बाहेर निघायचे. मग ती कुठे फाटलंय का, किती उसवलंय वगैरे अगदी नीट पाहून घ्यायची. साड्या, पँट असतील तर मोठं भांड म्हणजे बालदी किंवा टब द्यायची छोट्या कपड्यांवर छोटी भांडी त्यात स्टीलच्या चमच्या, कालथ्या पासून ते टोपांपर्यंत काही वस्तू असायच्या. तिला कपडे कितीही द्या तरी सांगायची एक साडी बघा असेल तर, एखादा शरट तरी. खूप घासाघीस करून नंतर ती एखादं भांड, द्यायची. तिची टोपली पाहायलाही मला खूप आवडायचं. वेगवेगळी भांडी त्या टोपलीत रचलेली असायची. ही जवळ जवळ अर्धातास तरी मुक्काम ठोकायची. मग कधी जेवणाच्या वेळेवर आली तर जेवण नाहीतर चहापाणी करून जायची.
अशा प्रकारे अनेक फेरीवाले पूर्वी दारावर येत असत ज्यांचे लहानपणी आपल्याला कुतूहल वाटायचे. आताही भंगारवाले, चादरवाले, कांदावाले येतात पण आता ते कुतूहल राहिले नाही म्हणण्यापेक्षा त्यांना बोलवायलाही वेळ नसतो. तुमच्याकडे येणार्या तुमच्या आठवणीतल्या फेरीवाल्यांविषयीही नक्की शेयर करा.
सौ. प्राजक्ता प. म्हात्रे
इतर ठिकाणी लेख शेयर करताना नावासकट शेयर करावे ही नम्र विनंती.
प्रतिक्रिया
27 Jul 2016 - 4:08 pm | प्रसाद_१९८२
मस्त लेख, जुन्या आठवणी जाग्या झाल्या. :)
आमच्या इथे ही दुधवाला यायचा, पण तो कधी नेपाळी असल्याचे पाहिले नाही. :)
27 Jul 2016 - 4:23 pm | जागु
नेपाळी नाही भैया होता. तो गावठी हिंदी बोलायचा.
27 Jul 2016 - 4:08 pm | कविता१९७८
मस्त लेख
27 Jul 2016 - 4:09 pm | संदीप डांगे
वा! मस्तच!!!
27 Jul 2016 - 4:26 pm | अमितदादा
मस्तच...अजूनही गावामध्ये परिचयाची मासे विकणारी, भांडी विकणारी बाई येते. मला नेहमी केसावरती प्लास्टिक भांडी, चाफ व इतर गोष्टी देणाऱ्या एका बाईचं कौतुक वाटायचं, केसांची किंमत हि त्या प्लास्टिक च्या किमतीच्या 10 ते 30 % व्हायची उरलेले पैसे रोखीने द्यायला लागायचे. म्हणजे घरच्यांना केसावरती गोष्टी मिळतात याचे समाधान आणि त्या बाई ला केसाचे आमिष दाखवून माल खापतोय याचे समाधान.
27 Jul 2016 - 4:31 pm | पगला गजोधर
या फेरीवाल्यांबरोबरच, लहानपणी वेगळ्या प्रकारचे फेरीवाले पाहिलेत ...
१. गधी का दूध (गाढविणीचं दूध लहान बाळांच्या पोटदुखीवर इलाज म्हणून काही लोकं घ्यायची)
२. लाचकंड, बिब्बे, मुलतानी माती विकणाऱ्या बायका ...
अजून आठवलं की अँडवतो ...
27 Jul 2016 - 4:31 pm | अभ्या..
एक गोडं तेल विकणारा माणूस लहानपणी पाहिलेला. तो गोड्तेल असं म्हणायचा की गुरुदेव म्हणायचा मला कळायचंच नाही.
ह्या फेरीवाल्यांवर लिहायला पैजेल राव. लै आठवणी आल्या एकदम पाणलोटासारख्या.
27 Jul 2016 - 4:43 pm | सिरुसेरि
छान लेख . पुर्वी साखरेची भिंगरी , चुईंगगमच्या दाढी मिशा विकणारे फेरिवाले आठवले . कल्हईवरुन कल्हईवाले पेंडसे आठवले .
27 Jul 2016 - 4:46 pm | सन्जय गन्धे
सुंदर लेख!!!
याच विषयाशी संबंधित पुलंचे लिखाण आठवले "आवाज...आवाज". त्यात पण त्यानी अशा रोज येणार्या फेरीवाल्यांच्या आवाजांचा मस्त आढावा घेतला आहे. पु. ल. एक साठवण मध्ये त्या त्या फेरीवाल्यांची चित्रे पण आहेत बहुतेक सरवटे यांची.
27 Jul 2016 - 4:52 pm | बरखा
या लिस्ट मधे अजुन एक फेरीवाला मला आठवतोय तो म्हणजे, कापुस पिंजणारा..., तो आरोळी कमी द्यायचा आणी त्याच्या सायकलला लावलेली लांब तार तुन-तुन्या सारखी वाजवायचा. त्याचा एक वेगळच आवाज यायचा. मग आम्ही त्याच्या मागे जायचो. तो गादीतील कापुस साफ करुन पुन्हा गादी भरुन द्यायचा. मला ते बघायला फार आवडायचे.
असाच अजुन एक फेरीवाला सायकलवर यायचा. त्याच्या सायकलीवर च्विंगम सारखा पदार्थाचे वेगवेगळे आकारातील काय काय बनवुन ठेवलेले असायचे. आम्हा सगळ्या बहिणींना तो पदार्थ खायला फर आवडत आसे.
27 Jul 2016 - 4:53 pm | रंगासेठ
आमच्याकडे पूर्वी भाजीवाला यायचा, सायकलवर भाज्या आणायचा.. तो कॉलनीत आला की ... "भाआआजेय" अशी आरोळी द्यायचा. पण आम्हा लहान मुलांच्यात समज झाला होता की तो "भाच्चे.." अशी हाक मारुन त्याच्या भाची/भाच्याला बोलावतोय.
भंगारवाल्यांबाबतीत पण सहमत. जबरदस्त कमावलेला आवाज, त्याची रेंजच अचाट होती.
27 Jul 2016 - 5:02 pm | किसन शिंदे
"दह्हीऽऽऽये" असं ओरडत एक भैय्या यायचा आमच्याकडे दर दोन दिवसांनी. भली मोठी किटली डोक्यावर घेतलेली असायची आणि चेहरा उन्हाने रापलेला. आवाज मात्र खणखणीत असायचा एकदम.
आणि एक भैय्या यायचा "ताजा चीऽऽऽऽक" म्हणून ओरडत आणि ते ही रोजच्या रोज. कुठली गाय रोजच्या रोज याच्याकडे व्यायली असेल याचा विचार यायचा तेव्हा डोक्यात, पण विचारले नाही कधी. =))
आणि एक यायचा गोळावाला.. त्यासंबंधीचा एक जुना प्रतिसाद आठवला जागूताईंच्याच धाग्यावरचा.
27 Jul 2016 - 5:04 pm | नाखु
म्हणजे शाळेत जातानाचे बहुतांशी पहिली ते चौथी खेड्शिवापुर आणि पाचवी ते सहाव्वी पारनेरमधील खेड्यात (वडील निर्वतल्याण्म्तर) गेले.
खेड शिवापुरला कुल्फी वाल्यांच्या आरोळ्या कधी नीट समजायच्या नाहीत पण घंटी बडवण्याच्या पद्धतीवरून कुठला कुल्फीवाला आहे ते कळायचे,
एक जण टर्र्र$$ र्ह असा कर्क्क्कस्श्स्श खाजविल्यासारखा आवाज करणारा येत असे नक्की काय विकायचा माहीत नाही,बहुधा गाद्या उश्यांचा कापुस पिंजून देत असावा,
धारवाल्याला कायम खेडशिवापुरच्या दर्ग्या आसपास पाहिले आहे, तेव्हा आम्ही राहायला दर्ग्या पलिकडे आणि शाळा दर्ग्या अलिकडे त्यामुळे जाता येता दिसायचाच.
गावाकडे बिब्बा,सुया वाल्या बाय्कांना आरोळी देताना पाहिले. त्या हेल काढून सुया बिब्बे असे ओरडतच पण शिवाय काही कानकोरणे आणि वाळे (लहान मुलांच्या हातात घालण्यासाठी) वा$$$$$$$$$$$$ळ्ळे असेही म्हणत असे.
गावाकडची शाळा सरकारी क्रिपेने पंचायती आणि मारुती देवळाशेजारी असल्याने सगळे फेरीवाले (जे काही फिरत भांड्याला कल्हई पासून ते पेरुवाले) थेट शाळेतून दिसत , पहिले तीन चार वर्ग तर देवळातच असल्याने हा अलभ्य लाभ चकटफू होता.
गोंदणवाल्यांनाही पाहिले आहे पण ते फारसे जत्रेतच दिसत. गावकडे उसाचा गाडा घेऊन फिरणारे फार क्वचीत दिसले पण पुण्यात दिसलेच त्यांच्या गाडीच्या आवाजाने (घुंगराच्या) कुणाला आरोळी देताना पाहिले नाही.
कोपरगावला एक रस्ता आहे बँक रोड तिथे (मावशी कडे गेल्यावर) त्याच गल्लीत कुल्फीवाल्यांची रोज रात्री फेरी असते अगदी १०-१५ कुल्फीवाले एका मागोमाग कुल्फे$$$$$$$फ्फे करीत जातात लोक आपाप्ल्या भांड्यात कुल्फी खरेदी करतात.
सगळ्यात कुतुहल असे ते "बुढ्ढीके बाल आणि सतत पान खाऊन येणार्या नंदी बैलवाल्यांचे" एक्दोनवेळा त्यांच्याकडे पाठीवर पाचवा पाय असलेली गायही पाहिली आहे.
पुण्यात पिंपरी चिंचव्डभागात ईडली वाले एक भोपू (जो पुर्वी रिक्षाला असायचा स्काऊटवाला) तो वाजवत विकायला येतात.
तुर्त इतकेच.
बर्याच आठवणी जाग्या झाल्या "जागु" यांचे आभार.
जागृत नाखु
27 Jul 2016 - 6:24 pm | सुधांशुनूलकर
कुर्ला पूर्वेला, शिवसृष्टी-नेहरूनगरमध्ये सकाळी बर्याचदा '..द्यांला' अशी किरट्या आवाजातली हाक (तिला आरोळी म्हणता येणार नाही इतकी ती क्षीण असते) ऐकू येते. ंद्यांला म्हणजे 'चिंधीवाला'चा अपभ्रंश / संक्षिप्तरूप. चिंध्या गोळा करणारे एक म्हातारे आजोबा ही हाळी देतात.
रात्री ८-९नंतर, कमावलेल्या आवाजातली 'फ्फीssय्येss' अशी आरोळी म्हणजे अस्सल कुल्फी मिळण्याची ललकारी.
काळानुरूप बंद झालेले काही फेरीवाले आणि त्यांचे आवाजही आठवले - 'पाट्याला टाकीssय्येss' आणि 'खडे मीssठ'..
मोटारींच्या यांत्रिक आवाजाच्या कल्लोळातही हे मानवी आवाज आपल्याला आपल्या माणूसपणाची आठवण करून देतात.
जागुताई, मस्त धागा, धन्यवाद.
27 Jul 2016 - 7:04 pm | भाग्यश्री कुलकर्णी
भारी धागा .
27 Jul 2016 - 7:17 pm | पद्मावति
+१
27 Jul 2016 - 7:22 pm | एस
सेम पिंच!
27 Jul 2016 - 7:34 pm | असंका
औरंगाबादला असताना एक फेरीवाला पुंगी वाजवत यायचा. त्याच्याकडे लै भारी डोनट मिळायचे...आठवड्यातनं दोन तीनदा तरी घेतले जायचेच! तसे डोनट नंतर नाही मिळाले...
27 Jul 2016 - 9:41 pm | सोंड्या
1. डोईवर टोपली त्यात सुया , बिब्बे वगैरे आणि खांद्यावर लटकवलेली काचेची पेटी त्यात मणी , गिलीटाचे नकली कानातले , गळ्यातलं डोरलं, आमच्यासाठी आकर्षण शिट्ट्या पिपाणी इ.इ.
पाठीवर बांधलेलं पोर
आणी एक टिपिकल आरोळी - "सुया घे.....फनी घे......बिब्बे घे. ...मनी घे"
2. सायकलच्या कॅरिअरच्या दोन्ही बाजूला बांधलेली पोती आणी हँडलला अडकवलेली मोटारसायकलची जुनी मोडकी डिकी त्यात वजनकाटा आणी अनारकली.
आणी चिरका आवाज- पलाऽऽसटीक ..... बाऽऽऽऽटली .........भंगाऽऽऽऽऽऽरवालेएएएएएएएय
मग धावलोच आम्ही आडगळीत बाटल्या आणी भंगार हुडकायला
देशी संत्री खंब्याचीबाटली दिड रुपये
क्वाटर बाटली 4 रुपये डझन. बियर बाटलीचे जास्त मिळायचे
28 Jul 2016 - 12:13 am | संदीप डांगे
आमच्याकडे एक भाजीवाला भाज्यांची नावं आणि त्यांचे भाव गाण्यासारखे सुरांमधे गुंफून गात यायचा.
"फुलकोबी पाच रुपयाला, फुलकोबी पाच रुपयाला
अन् आलू दहा रुपयाला.. दहा रुपयाला.. दहा रुपयाला आलू दहा रुपयाला.."
"चवळी, दोडकी, मेथी, पालक, काकडी, कांदाssss...
घ्या हो ताजा ताजा आंबटचुका ssss..."
28 Jul 2016 - 2:00 am | गामा पैलवान
ठाण्याला आमच्या इथे रिक्षेस असतो तसा रबरी भोंगा पुक पुक वाजवत इडलीवाला यायचा. डोक्यावर पातेलं आणि हातात (बहुतेक सांबाराचं) भांडं असा अवतार असायचा.
-गा.पै.
28 Jul 2016 - 8:03 am | चौकटराजा
अइये चत्री रेपेर,,,,,,
कारीये ...... ( खारी)
चीकू केला दालिम लिंबू पेऊ मुसम्बी.....ये ( फळवाला साई )
चाया चाया ( रेल्वेतला चाहावाला )
कॉप्पी..... कॉप्पी..... ( साउथ मधला कॉफीवाला)
अये जीकी वालाये......चीकी चीकी..... ( लोणावळा चिक्की)
पीरू....लई ग्वाड ....पीरू ( पेरूवाला )
चीक घ्यायचा का चीक ( दुधाचा चीक विक्रेता)
आन्याला वाटा... गिन्नीला वाटा ( १९६२ सालच्या दर्म्यानची आरोळी )
28 Jul 2016 - 8:28 am | कैलासवासी
१) गावी आज पण ती आजी येते आणि....सुया ल्या, पोत ल्या, फणी ल्या..(रोज)
२) दर आमावस्येला, आमावस्या काढी ठेवा व माय....म्हणणारी आजी पण येते.
३) मोड तोड भंगार रद्दी ....भंगारवाला.(रोज)
४) सोलापुरी चादर वाला..महिन्यातून कधीतरी.
५) भाजी ल्या भाजी...वांगी, बटाटा, कोथमेर, दोडका, कारली, कांदानी पात, मुया...एकाच दमात बोलून जाणारा भाजी वाला.
६)घंटीचा आवाज आला कि समजायचे कि कुल्फी वाला आला..त्याला ओरडायची गरज नव्हती फक्त..टन टन टन टन, बारक्या पोरांच्या मनात उत्साह आणि मोठ्यांच्या डोक्याला ताप...
28 Jul 2016 - 11:40 am | नि३सोलपुरकर
" सोलापुरी चादर वाला..महिन्यातून कधीतरी.".... साहेब पहिल्यांदाच ऐकतोय .
30 Jul 2016 - 11:38 am | जागु
सगळ्यांच्या आठवणीतले फेरीवाले खुप छान. मलाही त्यामुळे विस्मरणात गेलेले फेरीवाले आठवले.
30 Jul 2016 - 3:35 pm | विवेकपटाईत
जुन्या दिल्लीतल्या बालपणाची आठवण आली. गतकाळात गेल्यासारखे वाटले. बर्याच वर्षानंतर गेल्या दोन दिवसापासून दिल्लीत सतत पाऊस सुरु आहे. आज दुपारी जुने फोटो कित्येक वर्षानंतर बाहेर काढले. सौ. व्यवस्थित लावते आहे. फोटो बघताना गतकाळात हरवून गेलो. त्यात पुन्हा हा लेख वाचला.
12 Aug 2016 - 1:27 pm | avinash kulkarni
उन्हाळयात डोक्यावर टोपलीत करवंदे घेऊन " डोंगरची काली मैना " म्हणणाऱ्या बाईकडे करवंदांच्या रतीब लावलेला असे .
आईचा पगार झाल्यावर महिन्याचा हिशोब दिला जायचा .