बावरे प्रेम हे - एक दिव्यपट

समीरसूर's picture
समीरसूर in जनातलं, मनातलं
26 Jul 2016 - 5:06 pm

रविवारची संध्याकाळ भंकस असते. एकदम टुकार! दुसऱ्या दिवशी सोमवार नावाचा अजगर जबडा उघडून बसलेला असतो. रविवारी संध्याकाळी कुठे बाहेर जाण्याचादेखील हुरूप नसतो. उगीच मॉलला वगैरे जाऊन फिरून येण्यावर माझा विश्वास नाही. का कुणास ठाऊक रविवारी संध्याकाळी चित्रपटगृहात किंवा नाट्यगृहात जाऊन चित्रपट किंवा नाटक बघायला मला आवडत नाही. घरी सोफा खालून टोचत असतो. सगळी रविवार संध्याकाळ कुत्र्याने दोन्ही पायात तोंड खुपसून निपचित पडून रहावं तशी अर्थहीन पसरलेली असते. शुक्रवारची उत्साहाने सळसळणारी संध्याकाळ आणि शनिवारची सुखावह निवांत संध्याकाळ आठवून रविवारच्या संध्याकाळी मन अधिकच खिन्न होतं. टीव्हीवरही टुकार कार्यक्रम असतात. 'इंद्र द टायगर', 'खतरनाक खिलाडी', 'नंबर वन बिझनेसमन', 'मर्द का अटॅक' वगैरे फालतू चित्रपट सुरु असतात. इंग्रजी चॅनल्सवर 'अनाकोंडा', 'स्पायडरमॅन', 'नेशनल ट्रेजर', 'मिशन इंपॉसिबल' वगैरे चोथा चित्रपट सुरु असतात. परेशान आदमी करें तो आखिर क्या करें? गेल्या रविवारी मी असाच मद्दड अवस्थेत बसलेलो असतांना स्टार प्रवाहवर 'बावरे प्रेम हे' सुरु असलेला दिसला. नुकताच सुरु झाला होता बहुतेक. म्हटलं चला बघू या.

तर या दिव्यपटात नायिका गोव्यात एका सुंदर घरात तिच्या दु:खी चेहऱ्याच्या आईसोबत राहत असते. नायक असाच, गल्लीतलं कुत्रं कसंही कुठेही बिनबोभाट फिरत असतं, तसा सहज तिच्या घरी येणं-जाणं करत असतो. नायिकेची सदादु:खी आई त्याच्याशी दु:खी दु:खी हसून गोड गोड बोलत असते. नायिका रिसर्चपण करत असते. कसला ते गुपित कुणालाच कळत नाही. मी आधीच वैतागलेले होतो. म्हटलं बघू अजून काय काय दाखवतात या दिव्यपटात.

नायक हा तरुण, हसतमुख, उमदा, देखणा वगैरे असतो. नायिका ही नायिका नसतेच; ती साठ (की पन्नास?) किलो वजनाची साखरेने काठोकाठ भरलेली रेशमी, मुलायम अशी गोणी असते. डोळ्यांमध्ये गोड गोड भाव, जिभेवर साखरेच्या पाकाचे जिवंत झरे आणि चेहऱ्यावर सतत एक अतिप्रचंड गोड स्मित अशी नायिका बघून मला नायकाचा भयंकर झणझणीत असा हेवा वाटला. त्यांचं बोलणं किती गोड असतं म्हणून सांगू.

"नाही रे, गंपू, काहीतरीच तुझं. असं नसतं रे राजा. कित्ती छान कविता करतोस तू. वेडा आहेस नुसता."

"नाही गं, झंपे. तू किती सालस आहेस. तुझ्या डोळ्यात मला मी दिसतो. तुझ्या हृदयात किती प्रेम आहे..."

"नाही रे, गंपू. काहीतरीच तुझं. तू कित्ती कित्ती मनकवडा आहेस. कसं जमतं तुला हे सारं..."

हे असं बिनबुडाचं बोलणं चालू असतं. मध्ये मध्ये नायिकेची दु:खी दु:खी आई 'काहे दिया परदेस' मधल्या गौरीच्या आईसारखी दु:खाचे कढ पचवत या सगळ्या गोडगचक्यात अजून साखर ओतत असते.

असेच एकदा नायक आणि नायिका काहीतरी बोलत असतात. कवितावाचनाची स्पर्धा असते आणि नायिका नायकाला त्या स्पर्धेत भाग घ्यायला सांगते. नायक कवी असतो. नायिकाच स्पर्धेची परीक्षक असणार असते. कवितावाचनाच्या स्पर्धेचं परीक्षण करण्याइतकी ती मोठी कवयित्री असते का हे मात्र कळू शकलं नाही.

मग नायक एका जिन्याजवळ बसून कविता खरडतो. आसपास कागदाचे बोळे पसरलेले असतात. तिथे नायिका येते. नायक तिला लक्ष विचलित होऊ नये म्हणून जिन्याने खाली पाठवतो. नायिका पुन्हा गोग्गोड हसून खाली जाते. स्पर्धेचा दिवस उजाडतो. संयोजक असाच एक दुसरा उमदा, देखणा वगैरे तरुण असतो. तो नायकाला सूत्रसंचालन करण्याची विनंती करतो. इतका वेळ नायिकेच्या घरात घुसून - घुसून कविता करणाऱ्या नायकाला ती स्पर्धेला येणार नाहीये याचा पत्ताच नसतो. शेवटी गोड आग्रहाला बळी पडून नायक गोडपणे सूत्रसंचालन करण्याची तयारी दर्शवतो. सात - आठ लोकांचा महाप्रचंड श्रोतृवृंद बघून आपली छाती दडपते. असं वाटतं नायक सगळं व्यवस्थित करेल ना! आता काय होईल या विचारानेच आपल्याला घाम फुटतो कारण 'आपल्याला सूत्रसंचालनाचा अनुभव नाही' असं नायकाने गोड हसून ठामपणे सांगीतलेले असते. आपण श्वास रोखून बघतो. तेवढ्यात बायको 'चहा घेणार आहेस का?' असा तथ्यहीन प्रश्न विचारते. मी 'शश्श्श..’असं खेकसून मान न वळवता हातानेच (माझ्या) बायकोला ‘गप’ राहण्याची सूचना करतो.

नायक सूत्रसंचालन सुरु करतो पण हाय रे देवा, नुसतंच पार्श्वसंगीत सुरु असतं. एक एक कवी मंचावर येऊन कविता सादर करतो. कुणाचीच कविता ऐकू येत नाही कारण पार्श्वसंगीत सुरु असतं. मग नायकाची पाळी येते. पुन्हा माझ्या कपाळावर घर्मबिंदू जमा होतात. मी श्वास रोखून बघतो. आणि नायक अस्सल मराठी कविता (नुकतीच अंकुश चौधरीच्या एका गाण्यात मी 'माझ्या मनातील एहसास' अशी ओळ ऐकली. उद्या 'माझ्या दिलातील धडकन, द्यावी तुला कानाखाली खाडकन' असे गाणे ऐकू आले तर दचकू नका) सुरु करतो. त्याला नायिका समोर बसलेली दिसते. नायक कवितेतून गाण्यात घुसतो. एनीवे, त्याला इकडे - तिकडे घुसायची सवय असतेच. मग आपसूकच नायिकादेखील गाण्यात घुसते आणि तद्दन निरर्थक शब्द असलेले पांचट गाणे सुरु होते. स्पंदन, सांजवेळ, हृदय, अवचित, मन, मोहरणे वगैरे शब्द इकडून तिकडे गुंफले की आजकाल मराठी रोमँटिक गाणं तयार होतं.

"तुझ्या स्पंदनात मोहरतो मी अन गाते माझे मन, सांजवेळी अवचित तुजसमवेत वेचतो मी धुंद क्षण"

हे चित्रपटातलं गाणं नाही. अशाच गुळगुळीत छापाचं, निर्बुद्ध असं ते गाणं असतं. असले भरपूर निरर्थक शब्द गुंफून बनवलेलं ते गाणं संपल्यावर नायक होशमध्ये येतो. सात-आठ जणांचा तो अतिविशाल जनसमुदाय नायकाच्या काव्यप्रतिभेने वेडा झालेला असतो. टाळ्यांच्या कडकडाटात आसमंत बुडून जातो. नायक होशमध्ये आल्यावर त्याच्या लक्षात येतं की नायिकेने त्याला गंडवलेलं असतं. ती तिथे नसते आणि त्याच्या होपलेस गाण्यातही नसते. त्याला प्रश्न पडतो की आत्ता होती, गेली कुठं! बक्षीस ऑफ कोर्स नायकाला मिळतं. पण नायकाला त्या लाख - दोन लाख डॉलर्सच्या बक्षीसाची तमा नसते. तो नायिकेला शोधायला निघतो. नायिका उगीच एका सुंदर रस्त्यावरून झकपक कपडे घालून गोग्गोड स्मित-बित करत कुठेतरी जात असते. कुठे? ते माहीत नाही. का? विचारायचं नाही. मग नायक तिला गाठतो आणि एखादं शाळेतून घरी आलेलं पोरगं कसं आईला 'घ्यायला का नाही आलीस? शाळेत काय जम्माडीजम्मत झाली...' वगैरे बडबड करून भंडावून सोडतं तसा नायक नायिकेला भंडावून सोडतो. तेवढ्यात तिथे तो देखणा संयोजक कार घेऊन येतो. तेव्हा पहिल्यांदा नायिकेच्या चेहऱ्यावर कष्टी भाव येतात आणि ती निमूटपणे संयोजकांसोबत निघून जाते. नायक बावळटासारखा बघत बसतो.

मध्येच नायिका आईच्या गळ्यात पडून 'माझा रिसर्च संपला' असं डिक्लेअर करते. कसला रिसर्च माहीत नाही. आईला पण बहुधा माहीत नसतं पण डोक्याला नसता ताप कशाला करून घ्या म्हणून ती 'अरे वा, गुणांची बाई माझी ती' असं काहीसं थातूर-मातूर पचकून प्रसंग निभावून नेते. आता या रिसर्चचा आणि कथेचा काय संबंध हे काही कळत नाही.

नंतर (की आधी? आठवत नाही आणि ते महत्वाचंही नाही) नायक एक साधारण पाच मिनिटात प्रतिथयश कवी-लेखक होतो. तो मुंबईचा असतो आणि त्याच्या आईचा मोठठा बिझनेस असतो. नायकाच्या कादंबऱ्या धडाधड प्रकाशित होत असतात. सेकंदाला एक अशा रेटने नायक कादंबरी प्रकाशित करतो. मग एक दिवस त्याला नायिकेची आठवण येते. आपलं एक पुस्तक घेऊन नायक गोव्यात येतो आणि नायिकेच्या घरी जातो. नायिकेची आई काहीच बोलत नाही. नायक 'झंपी कुठे आहे' असा साधा प्रश्न विचारतो पण नायिकेच्या आईला बहुतेक तो प्रश्नच कळत नाही म्हणून ती गप्प बसते. नायक भंजाळतो. त्याच्या मेंदूला झिणझिण्या येतात. मग नायक संयोजकांच्या कार्यालयात जातो. तिथे तो बेंबीच्या देठापासून ओरडून विचारतो 'कुठे आहे झंपी?' पण संयोजक नुसताच कसनुसा चेहरा करून कार्यालायातून बाहेर पडून कारमध्ये बसून भुर्रर्र निघून जातो. नायकाचा मेंदू भेगाळतो. डोळे कासावीस-बावीस होतात. मग अचानक एक ख्रिश्चन माणूस नायकाला कुठेतरी घेऊन जातो. तिथे तो ख्रिश्चन माणूस अगम्य बडबड करतो आणि एकदम नायिका आटोपली असे जाहीर करतो. नायक चित्काळतो. असं कसं झालं? तो माणूस पुन्हा काहीबाही बडबडतो आणि नायकाला अचानक ती दिसते. नखशिखांत साखरेच्या पाकात अंघोळ करून आलेली नायिका पुन्हा तसलेच स्वीट टूथ दाखवत हसत असते. मग नायक तिच्याकडे जातो आणि अजून काहीतरी फालतूपणा घडून हा दिव्यपट संपतो.

खरंच, रविवारची संध्याकाळ भंकसच असते...

चित्रपटआस्वाद

प्रतिक्रिया

स्पा's picture

26 Jul 2016 - 5:17 pm | स्पा

=)) +))

खपल्या गेले आहे

मी-सौरभ's picture

26 Jul 2016 - 7:33 pm | मी-सौरभ

हा कदाचित 'बावरे प्रेम हे' नावाचा चित्रपट असावा
ळिन्कः http://marathistars.com/movies/baavare-prem-2014/

हो, माफ करा. शीर्षकात चुकून 'बावरे मन हे' झालंय. पहिल्या परिच्छेदात नाव बरोबर (बावरे प्रेम हे) आहे. अर्थात त्याने काही फरक पडत नाही. 'बावरे मन हे', 'बावरे प्रेम हे', 'बावरे हृदय हे', 'बावरे नयन हे', 'बावरे स्पंदन हे'....काहीही टाका; सगळं सारखंच! शेवटी बघणाऱ्याला 'बावरे गेम हे' असंच वाटतं.

शीर्षक दुरुस्त करता आले तर बघा ना प्लीज सं. म.

चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद!

अनिरुद्ध प्रभू's picture

27 Jul 2016 - 3:46 pm | अनिरुद्ध प्रभू

याच चित्रपटाचा दिग्दर्शक श्री. अजय नाइक 'बावरे मन असे' नामक चित्रपट काढत आहे असे ऐकिवात आहे.....परिणामी बचके रहना रे बाबा........

मी-सौरभ's picture

27 Jul 2016 - 5:14 pm | मी-सौरभ

अर्थात त्याने काही फरक पडत नाही. 'बावरे मन हे', 'बावरे प्रेम हे', 'बावरे हृदय हे', 'बावरे नयन हे', 'बावरे स्पंदन हे'....काहीही टाका; सगळं सारखंच! शेवटी बघणाऱ्याला 'बावरे गेम हे' असंच वाटतं.

ख्या ख्या ख्या!!!

सस्नेह's picture

26 Jul 2016 - 5:19 pm | सस्नेह

माझ्या दिलातील धडकन, द्यावी तुला कानाखाली खाडकन'

हे खासच !
परीक्षण एकदम खंग्री !!

नाखु's picture

26 Jul 2016 - 5:27 pm | नाखु

सिनेमा आहे ?
आणि हा सिनेमा आल्यानंतर साखरेचे भाव वाढलेत की काय?
बाकी इतका वेळ सिनेमा पाहू शकल्याबद्दल घरच्यांनी सहनशक्ती वाढल्याची काही पावती वगैरे दिली की नाही?

बरेच प्रश्न आहेत सध्या इतकेच... फर्मास चिरफाड

दूर चित्रवाणी बंद करून विना वाहिनीचा प्रेक्षक नाखु

कपिलमुनी's picture

26 Jul 2016 - 5:28 pm | कपिलमुनी

पहिला पॅरा तुफान आवडला :)

किसन शिंदे's picture

26 Jul 2016 - 5:38 pm | किसन शिंदे

प्रत्येक परिच्छेद खंग्री आहे. =)) =))

असंच आणखी एका मराठी वाहिनीवर मी बेफाम कि बेधूंद असा खत्तरनाक मराठी सिनेमा पाह्यला होता.

पगला गजोधर's picture

26 Jul 2016 - 5:54 pm | पगला गजोधर

परीक्षणा ऐवजी, पहिला पॅरा, लेखं म्हणून सहज स्पर्धेत बक्षीस मिळवेल...

स्मिता श्रीपाद's picture

26 Jul 2016 - 6:02 pm | स्मिता श्रीपाद

रवीवार संध्याकाळ बद्दल लिहिलेलं अगदी अगदी मनातलं....पहिला पॅरा बेस्ट ...
आणि बाकी परीक्शण तूफान.....
>>माझ्या दिलातील धडकन, द्यावी तुला कानाखाली खाडकन>> ...एकच नंबर....पुढे सुचत असेल तर लिहुन काढ ;-)

इतकं पाहून पण वेडे झाला नाहीत आणि परीक्षण लिहिलात, खरंच कमाल आहे

सतिश गावडे's picture

26 Jul 2016 - 6:09 pm | सतिश गावडे

हसून हसून फुटलो.
पहिला परीच्छेद अतिशय वास्तवदर्शी =))

आदूबाळ's picture

26 Jul 2016 - 6:09 pm | आदूबाळ

अहो, तुम्ही "हम ने जीना सीख लिया" नावाचा प्रकार बघा. देवदयेने त्याची डिव्हीडी मिळत नाही.

संदीप डांगे's picture

26 Jul 2016 - 7:51 pm | संदीप डांगे

शाळा ची भ्रष्ट कापी...???

बाकी लेख खुमासदार समीरसर... ;)

चतुरंग's picture

26 Jul 2016 - 10:07 pm | चतुरंग

प्रेक्षकांना खरोखर "हमनें जीना सीख लिया" असे वाटत असणार! ;)

अभ्या..'s picture

26 Jul 2016 - 10:19 pm | अभ्या..

माझ्याकडे आहे. त्यात चक्क मिलिंद गुणाजी हाय. लैच बोगस फिल्म.
ह्या समीरला सुद्धा कुठे कुठे काय सापडतय कुणास ठाऊक. सॉल्लिड मापं काढलायस.

काय काय बघत बसता राव! :-P

शॉल्लेट!

पुंबा's picture

26 Jul 2016 - 6:33 pm | पुंबा

हेहेहे.....
भारी आहे हे..

मी-सौरभ's picture

26 Jul 2016 - 7:28 pm | मी-सौरभ

पहिले दंडवत स्वीकारा

"तुझ्या स्पंदनात मोहरतो मी अन गाते माझे मन, सांजवेळी अवचित तुजसमवेत वेचतो मी धुंद क्षण"

हे चित्रपटातलं गाणं नाही.

क्काय सांगता, माझ्या डोक्यात तर हे गाणे स्वप्निल बांदोडकरच्या अति गोड आवाजात वाजायला सुरुवात होत होती ;)

समीरसूर's picture

27 Jul 2016 - 11:06 am | समीरसूर

मी चार शब्द जुळवून ही ओळ खरडली (जिलबी). पण ते गाणं असंच निर्बुद्ध होतं. :-) नुसते शब्दांचे बुडबुडे! आठवणं या जन्मात शक्य नाही. :-)

ही घ्या अजून एक जिलबी:

तुज नयनी गुंफतो मी स्वप्ने मलमली
तव रेशीमस्पर्शाने होते सांज ही मखमली
स्पर्श तुझा होता मोहरती हृदयाची स्पंदने
माझा स्पर्श होता नाजूक कळी ही उमलली

उडन खटोला's picture

27 Jul 2016 - 11:16 am | उडन खटोला

हल्ली पाऊस किंवा तत्सम काही असलं की 'झिम्माड' हा शब्द अस्तोच.
नवोदित कवींचा शब्दसंग्रह प्रतिभेसारखाच् खुंटला आहे का?

रच्याकने एखाद्या रविवारी 'मितवा' पण बघा.
लेख लिहायला ताकद शिल्लक राहणार नाही याची खात्री.

कोठार्‍यांच्या सूनबै असलेला चित्रपट का हा?

समीरसूर's picture

27 Jul 2016 - 11:07 am | समीरसूर

होय. उर्मिला कानिटकर, सिद्धार्थ चांदेकर, सुप्रिया विनोद, विद्याधर जोशी (तो ख्रिश्चन बाबा).

टवाळ कार्टा's picture

26 Jul 2016 - 8:15 pm | टवाळ कार्टा

बेक्कार =))

पद्मावति's picture

26 Jul 2016 - 8:32 pm | पद्मावति

=))

रविवारची संध्याकाळ भंकस असते. एकदम टुकार! दुसऱ्या दिवशी सोमवार नावाचा अजगर जबडा उघडून बसलेला असतो. रविवारी संध्याकाळी कुठे बाहेर जाण्याचादेखील हुरूप नसतो. उगीच मॉलला वगैरे जाऊन फिरून येण्यावर माझा विश्वास नाही. का कुणास ठाऊक रविवारी संध्याकाळी चित्रपटगृहात किंवा नाट्यगृहात जाऊन चित्रपट किंवा नाटक बघायला मला आवडत नाही. घरी सोफा खालून टोचत असतो. सगळी रविवार संध्याकाळ कुत्र्याने दोन्ही पायात तोंड खुपसून निपचित पडून रहावं तशी अर्थहीन पसरलेली असते. शुक्रवारची उत्साहाने सळसळणारी संध्याकाळ आणि शनिवारची सुखावह निवांत संध्याकाळ आठवून रविवारच्या संध्याकाळी मन अधिकच खिन्न होतं

हज्जार वेळा सहमत!!!

पूर्वी ऑनसाईट असताना रविवारी संध्याकाळीच ऑफशोअरवाले चावायला लागायचे त्याची आठवण झाली. असो. तेव्हा रविवार संध्याकाळचे काय भजे व्हायचे ते सांगणे नको.

चित्रगुप्त's picture

26 Jul 2016 - 9:59 pm | चित्रगुप्त

एकदम झकास लेखन. (या नावाचा सिनेमा खरोखरच अस्तित्वात आहे का हे जालावर शोधले, पण मिळाला नाही).

हो, माफ करा. शीर्षकात चुकून 'बावरे मन हे' झालंय. पहिल्या परिच्छेदात नाव बरोबर (बावरे प्रेम हे) आहे.

चतुरंग's picture

26 Jul 2016 - 10:04 pm | चतुरंग

तुम्हालाच या प्रकारचे सिनेमे बघायला मिळावेत याची विधात्याने (म्हणजे त्या "विधात्याने" बरंका नाहीतर तुम्हाला "विधाता" हा सिनेमा आठवायचा) खास सोय केलेली दिसते आहे! :)
का म्हणाल तर सिनेमाला काही प्रतिसाद नसेनाका त्याच्या परीक्षणावरतरी भरभरुन प्रतिसाद यावेत आणि सिनेमा काढल्याचं सार्थक व्हावं अशी त्याची इच्छा असणार! ;)

(बावरें)रंगा

खटपट्या's picture

26 Jul 2016 - 10:31 pm | खटपट्या

लैच मस्त...यापेक्षा बाहेर फीरुन आला असतात तर बरे वाटले असते. पण रवीवारी संध्याकाळी कैच करावेसे वाटत नाही...

हे परीक्षण हुकलं नसतं का मग?
केवढी सोय केली त्यांनी आपल्या हसण्याची!! :)

(जोहोताहैअच्छेकेलिएहोताहै)रंगा

खटपट्या's picture

26 Jul 2016 - 10:57 pm | खटपट्या

व्हय तर...

जिन्गल बेल's picture

27 Jul 2016 - 12:40 pm | जिन्गल बेल

+1 फॉर "पण रवीवारी संध्याकाळी कैच करावेसे वाटत नाही..."

रातराणी's picture

26 Jul 2016 - 11:40 pm | रातराणी

महान! बघीतलाच पाहिजे आता!

उडन खटोला's picture

27 Jul 2016 - 12:11 am | उडन खटोला

या रविवारी सकाळी दयाळू परमेश्वराकडे आपल्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना(बेहरे) करेन.

फारएन्ड's picture

27 Jul 2016 - 4:16 am | फारएन्ड

धमाल लिहिले आहे! मजा आली :)

टीव्हीवरही टुकार कार्यक्रम असतात. 'इंद्र द टायगर', 'खतरनाक खिलाडी', 'नंबर वन बिझनेसमन', 'मर्द का अटॅक' वगैरे फालतू चित्रपट सुरु असतात. >>> आणि तरीही रविवार संध्याकाळ बोअर होते तुम्हाला? :)

मृत्युन्जय's picture

27 Jul 2016 - 12:14 pm | मृत्युन्जय

यातले बहुतांशी चित्रपट एव्हाना त्यांचे पाठ झाले असतील. इंद्रा द टायगर तर माझा पण पाठ आहे. नंबर वन बिझनेसमॅन आणी मर्द का अटॅक हे चित्रपट बघण्याचा योग अजुन आला नाही. सेट मॅक्स आणि स्टार गोल्ड चालु असतानाही हे २ चित्रपट कसे सुटले याचे आश्चर्य वाटते आहे.

बाकी सुर्यवंशम चा उल्लेख नसल्याने ठाकुर भानुप्रताप सिंग आणि हीरा ठाकुर फॅन क्लब चा मानद सदस्य या नात्याने मी निषेध व्यक्त करतो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Jul 2016 - 4:57 am | डॉ सुहास म्हात्रे

=)) =)) =))

असे पिक्चर बघत बसता, ते ही न विचारता मिळणार्‍या चहाला नाकारून, आणि वर, रविवारची संध्याकाळ भंकसच असते असं म्हणताय, यात त्या बिचार्‍या निर्मात्याचा काय बरे दोष ?! ;) :)

स्रुजा's picture

27 Jul 2016 - 6:06 am | स्रुजा

a

पार पंचनामा केलात राव ! चौफेर फटकेबाजी केलीत .. मजा आली.. असले टुकार सिनेमे काढणार्‍यांना आणि ते टिव्ही वर दाखवणार्‍यांना विनाचौकशी येरवड्याला पाठवायला पाहिजे खरं म्हणजे.

ज्योति अळवणी's picture

27 Jul 2016 - 9:38 am | ज्योति अळवणी

मजा आली वाचून. असही परीक्षण असू शकत.... नाहीतर कुठल्या तरी चानेलवर काहीतरी चालू असत आणि ते आपण शून्य डोळ्यांनी बघत असतो... त्यानंतर लिहायला सुचण ही कमाल.

मुक्त विहारि's picture

27 Jul 2016 - 9:38 am | मुक्त विहारि

एकदम खूसखूशीत.

ज्ञानोबाचे पैजार's picture

27 Jul 2016 - 9:41 am | ज्ञानोबाचे पैजार

रविवार संध्याकाळचे वर्णन फार आवडले.

तुम्ही फार वरच्या पदाला पोचलेले महात्मा वगेरे दिसताय. एवढा तद्दन भिकार सिनेमा मन लाउन पहायचा, त्याचे डिटेल्स लक्षात ठेवायचे आणि वर त्यावर असा झणझणीत लेखही लिहायचा. या साठी फार मोठे तपोबल लागते.

पैजारबुवा,

मुक्त विहारि's picture

27 Jul 2016 - 11:31 am | मुक्त विहारि

वाक्या-वाक्याशी सहमत.

निखिल निरगुडे's picture

27 Jul 2016 - 9:43 am | निखिल निरगुडे

पहिला परिच्छेद खरोखर अफलातून लिहिलाय....

चिनार's picture

27 Jul 2016 - 10:27 am | चिनार

जबराट परीक्षण !!
तुमच्या सहनशक्तीला सलाम !!

स्पंदन, सांजवेळ, हृदय, अवचित, मन, मोहरणे वगैरे शब्द इकडून तिकडे गुंफले की आजकाल मराठी रोमँटिक गाणं तयार होतं.

हेच्च म्हणतो !!

अंतरा आनंद's picture

27 Jul 2016 - 10:51 am | अंतरा आनंद

क्या बात है. हे 'बावरे' दिव्य हलाहल पचवून एवढा खुमासदार लेख लिहीलात. मजा आली वाचताना.
तुमचा पुढचा रविवारही अश्याच टुकारपटाने साजरा होवो या शुभेच्छा ;)

भाग्यश्री कुलकर्णी's picture

27 Jul 2016 - 11:35 am | भाग्यश्री कुलकर्णी

भारी लेख. फक्त रैवारी सुट्टी असलेल्या आमास्नी तर रैवार सकाळच फकस्त बरी वाटतीया.भारी लिवलायसा.

जव्हेरगंज's picture

27 Jul 2016 - 11:35 am | जव्हेरगंज

300

मृत्युन्जय's picture

27 Jul 2016 - 11:37 am | मृत्युन्जय

नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट चिरफाड. रद्दी चित्रपटांची चिरफाड करण्यात समीरसूर आणि फारएण्ड यांचा हात कोणीही धरु शकत नाही.

चित्रपटाचे नाव आणि एकुण कथानक लक्षात घेता या चित्रपटात श्रुती मराठे आणि संतोष जुवेकर असावेत अशी उगाचच शंका आली होती पण गुगलुन बघितले असता सिद्धार्थ चांदेकर आणि उर्मिला कानेटकर आहेत असे लक्षात आले. इतके गोग्गोड रोम्यांटिक पिच्चर बघितले की डायबिटीस होइल की काय असे वाटते. तो होउ नये म्हणुन बहुधा उर्मिलाला शेवटी मारले असावे.

...... समीरसूर आणि फारएण्ड यांचा हात कोणीही धरु शकत नाही."

असे नाही, तुम्ही पण काही कमी नाही.

आणि रजनीकांत रडला....धूम-३, http://misalpav.com/node/26509, हा लेखच बघा ना.

मृत्युन्जय's picture

27 Jul 2016 - 12:41 pm | मृत्युन्जय

कसचं कसचं. आम्ही आपले सुर्यापुढे काजवे.

पण तुम्हाला धूम चे परिक्षण आवडले असेल तर ही खालची २ पण नजरेखालुन घाला:

जानी दुष्मन एक अनोखी प्रेम कहानी - http://misalpav.com/node/21940

भोग - सावरियाचे परीक्षण - http://misalpav.com/node/17330

समीरसूर's picture

27 Jul 2016 - 1:45 pm | समीरसूर

मुविसाहेबांशी लय वेळा सहमत. आपली परीक्षणे एकमेवाद्वितीय असतात. जबराट एकदम! :-) मी तर किस झाड की पत्ती आहे हो...खरंच!

या लेखात एक किस्सा सांगायचा राहून गेला...

नायक आपले पुस्तक घेऊन नायिकेला भेटायला गोव्याला जातो हा भाग फ्लॅशबेकमध्ये आहे. त्याचं होतं असं की नायक पाच - दहा मिनिटात सुपरस्टार लेखक - कवी होतो. त्याच्याकडे एक आलिशान गाडी असते. स्वीय सहायक असतो. एके रम्य सकाळी नायक कडक सूट - बूट घालून कुठेतरी हुंदडायला निघतच असतो तितक्यात त्याची एक चाहती त्याच्या घरी येऊन थडकते. या प्रसंगाआधी ती चाहती दाखवली आहे. ती नायकाची लेटेस्ट कादंबरी वाचून संपवते. आणि हृदयविकाराचा झटका आल्यावर एखादा रुग्ण कसा अस्वस्थ होतो तशी अस्वस्थ होते. मग ती स्वत:शीच बडबडायला लागते. "असं कसं झालं? असं होणं शक्यच नाही. झंपीचं काय झालं? गंपू असं कसं वागू शकतो झंपीशी? नाही नाही. ये ना चोलबे. ये अनहोनी है. धिस इज इम्पोस्सिबल. मला गेलंच पाहिजे. मला गंपूला जाब विचारायलाच हवा." अशी भयाण बडबड करून ती चाहती सगळे काम-धंदे सोडून नायकाच्या घरी येऊन थडकते.

हिला बहुधा नवरा, पोरं - बाळं, घर - दार, सासू - सासरे, काम - धंदा, व्हॉट्सएप, पोकेमॉन गो, कॅंडी क्रश, पोरांचे आयआयटी - जेईईचे क्लासेस, धाकट्या मेसीचा फुटबॉलचा सराव, लहानग्या मल्लिका साराभाईची कथ्थकची (बरोबर का?) प्रॅक्टीस, फ्लिपकार्टवर सुरु असलेला शरारा - लेहेंग्याचा सेल, सोसायटीमधल्या मैत्रिणींची ‘सीक्रेट ब्रीझर’ पार्टी वगैरे एका बापुडवाण्या गृहिणीची कुठलीच व्यवधाने नसतात. घरी एका देखण्या चाहतीला बघून नायक जाबडतो. स्वीय सहाय्यकाला विचारतो. स्वीय सहायक गेंगाण्या आवाजात 'मी म्हटलं त्यांना अपॉइंटमेंट घेऊन या...' असं म्हणतो. नायक 'असू दे' करतो. चाहती पेटलेली असतेच. ती त्याला कोडी घातल्यासारख्या भाषेत जाब विचारते.

शप्पथ सांगतो, ती नेमकं काय विचारते हेच कळत नाही. या चित्रपटात कुठलेच पात्र सरळ भाषेत बोलत नाही. टॅंजंट भाषेत बोलून सगळी पात्रे डोक्याला वात आणतात. बहुधा चित्रपटाला साहित्यिक उंची मिळवून द्यावी असा दिग्दर्शकाचा प्रयत्न असावा. पण ती रिकामटेकडी चाहती काय बोलते हे नायकाला कळतं. मग तो आपली सगळी कामे सोडून फ्लॅशबेकमधली कथा सांगायला सुरुवात करतो. मला सांगा, कोणाला एवढ्या उचापती करायला वेळ असतो? नायिका चुलीत का जाईना, आपल्या बाचं काय जातंय या न्यायाने वाचक असल्या कादंबऱ्या वाचत असतात. पण 'बावरे प्रेम हे' मध्ये सगळे बावरे आहे. अभिनय, कथा, अभिनेते, गाणी, दिग्दर्शन, संवाद...सगळं फुल टू बावरेल...

केडी's picture

27 Jul 2016 - 12:09 pm | केडी

आणि हा प्रतिसाद सुद्धा एक नंबर! असल्याचं धर्तीवर मागे एक असाच मराठी सिनेमा बघितला "कॉफी आणि बरंच काही" असं काहीबाही नाव होत.
उगाच वेळ वाया, त्यापेक्षा अर्धा तास झोपलो असतो!

केडी's picture

27 Jul 2016 - 12:09 pm | केडी

आणि हा प्रतिसाद सुद्धा एक नंबर! असल्याचं धर्तीवर मागे एक असाच मराठी सिनेमा बघितला "कॉफी आणि बरंच काही" असं काहीबाही नाव होत.
उगाच वेळ वाया, त्यापेक्षा अर्धा तास झोपलो असतो!

अरे ह्या बावरलेपणाचे कारण कळले मला, ह्याचे क्रेडिट नेम्स पाह्यलं. डायरेक्शन, संवाद, कथा, पटकथा, निर्मिती वगैरे बरेच काही एकटाच कुणी अजित नाईक का कुणी बावरा आहे म्हणे. असेल हौस बाबा.

रातराणी's picture

27 Jul 2016 - 12:26 pm | रातराणी

_/\_ किती हसवाल! गेंगाना आवाज जामचं आवडलं आहे!

संत घोडेकर's picture

27 Jul 2016 - 11:49 am | संत घोडेकर

जबराट, हहपुवा.

स्मिता चौगुले's picture

27 Jul 2016 - 12:30 pm | स्मिता चौगुले

भारीए पंचनामा ... :))

योगी९००'s picture

27 Jul 2016 - 12:33 pm | योगी९००

जबरदस्त चिरफाड...!!

तुमचा लेख घेऊन चित्रपट पहावा म्हणतो. खरंच मजा येईल आणि रविवार संध्याकाळ चांगली जाईल.

याआधी असाच फारएण्ड यांचा तिरंगा या चित्रपटावरला लेख घेऊन तो चित्रपट पाहीला होता. आता तुमचा नंबर..!!

सतीश कुडतरकर's picture

27 Jul 2016 - 12:48 pm | सतीश कुडतरकर

एकदम खूसखूशीत

उडन खटोला's picture

27 Jul 2016 - 12:55 pm | उडन खटोला

ष ष्ठय ब्दी पू र्ति (जमला एकदाचा) निमित्त समिरसूर यांना कावरे चे आइसक्रीम.

सिरुसेरि's picture

27 Jul 2016 - 1:44 pm | सिरुसेरि

"मन झाले बावरे..बावरे" असे काहितरी गाणे पाहिले आहे . पुर्वी मराठी ९एक्स झकास वर "फिल्मी फिल्मी हुआ" , " थोडी हुरहुर तु .. प्रेमिका प्रेमिका " आणी "मन झाले बावरे..बावरे" हि गाणी बरेचदा रोज सलग लागत असत .

प्राची अश्विनी's picture

27 Jul 2016 - 1:49 pm | प्राची अश्विनी

:):)

पियुशा's picture

27 Jul 2016 - 3:11 pm | पियुशा

बापरे काय लिवल्य लवल्य :)

नीलमोहर's picture

27 Jul 2016 - 3:31 pm | नीलमोहर

किती पंचेस एका लेखात, वाट लागली ना हसून =) =)
बाकी त्या रविवार संध्याकाळ वाल्या फिलींगशी अगदीच सहमत.

परीक्षणातून चित्रपटाची कथा एक कणभरही कळाली नाही :)

जबरीच.. हसून हस्सोन वेड लागलय

अभिजीत अवलिया's picture

27 Jul 2016 - 7:28 pm | अभिजीत अवलिया

हे असले टिनपाट चित्रपट बघायला खरंतर खूप मजा वाटते मला.