मुक्तछंदात काही ओळी लिवायचा आमचा एक प्रयत्न!
कुणी मत देता का मत?
एका गायकाला कुणी मत देता का मत?
खरं सांगतो बाबांनो, गायक आता लाचार झाला आहे!
झी, सोनी, आणि स्टारप्लस आणि कुणी कुणी त्याला लाचार केला आहे...!
कुणी मत देता का मत?
एका गायकाला कुणी मत देता का मत?
कुणी सांगितलं की कलाकार एखादाच असतो, अभिमानी असतो?
कुणी सांगितलं की त्याचं फक्त कलेशीच इमान असतं म्हणून?
खरं सांगतो बाबांनो, गायक आताशा एस एम एस मुळेच लहानमोठा ठरतो!
कुणी सांगितलं की एस एम एस मुळे वाहिन्यांना लाख्खो रुपये मिळतात?
कुणी सांगितलं की संगीतकला ही वाहिन्यांच्या दारातली
एक बाजारबसवी रांड झाली आहे म्हणून?
तसं काही नाही बाबांनो, संगीतकला खूप थोर आहे!
खूप खूप थोर आहे!!
दीड दमडींच्या एस एम एस ची मिंधी असली म्हणून काय झालं?
संगीतकला खरंच खूप थोर आहे!
कुणी मत देता का मत?
एका गायकाला कुणी मत देता का मत?
बरं का बाबांनो, बरं का दादांनो, बरं का तायांनो,
गायकाचा कोड नंबर 'अबक' आहे.
त्याला प्लीज प्लीज प्लीज मत द्या, तुमच्या एस एम एस ची भीक द्या!
कारण त्याला व्हायचंय अजिंक्यतारा!
त्याला व्हायचंय इंडियन आयडॉल!
आणि त्याला व्हायचंय 'महा'गायक!
आणि अश्याच अजून काही पदव्या त्याला मिळवायच्या आहेत!
म्हणूनच सांगतो बाबांनो, एका गायकाला मत द्या मत!
त्याला वाढा तुमच्या एस एम एस चा जोगवा!
पण जोगवा तरी कसं म्हणू बाबांनो?
त्या शब्दात तर एक पवित्रता आहे,
त्या शब्दात तर अंबाबाईची पूजा आहे,
तुळजाईचा गोंधळ आहे!
जोगवा म्हणजे भीक नव्हे, नक्कीच नव्हे!
एस एम एस मागणे ही मात्र भीक आहे, नक्कीच आहे!
पण भीक मागितली म्हणून काय झालं?
कुणी सांगितलं की कलाकाराने कुणाकडे भीक मागू नये म्हणून?
कुणी सांगितलं की कलाकार भिकारी नसतो म्हणून?
म्हणूनच सांगतो बाबांनो, गायकाला मत द्या मत!
त्याचा कोड नंबर 'अबक' आहे! त्याला मत द्या मत!
कारण त्याला व्हायचंय अजिंक्यतारा!
त्याला व्हायचंय इंडियन आयडॉल!
त्याला व्हायचंय 'महा'गायक!
आणि अश्याच अजून काही पदव्या त्याला मिळवायच्या आहेत!
म्हणूनच सांगतो बाबांनो, गायकाला मत द्या मत!
त्याचा कोड नंबर 'अबक' आहे! त्याला मत द्या मत!
पण त्याला गायक तरी कसं म्हणायचं?
काय म्हणालात?
"हरकत नाही, भिकारी म्हणूया!"??
ठीक आहे बाबांनो, भिकारी तर भिकारी!
एका भिकार्याला मत द्या मत!
तुमच्या एस एम एस ची भीक त्याला घाला!
घालाल ना नक्की?
कारण त्याला व्हायचंय इंडियन आयडॉल!
त्याला व्हायचंय अजिंक्यतारा!
त्याला व्हायचंय 'महा'गायक!
-- तात्या अभ्यंकर.
प्रतिक्रिया
26 Jan 2008 - 8:41 pm | प्राजु
आहे ही. एस्.एम्.एस. मुळेच तर गायक .. नव्हे महागायक तयार होतात. आणि कित्येक तपं साधना करणारे मूर्ख ठरून "जोश" इ. घराण्यात काही महिने शिकून महागायक ही पदवीही भूषवितात. घराणी फक्त जयपूर, ग्वाल्हेर, किराना , आग्रा ... ही सामान्य लोकांसाठी आहेत. महागायकांची वेगळी असतात.
आवांतर : तात्या, मुक्तछंदात चांगलं लिहिता तुम्ही. उगाच पद्याच्या नावने खडे का फोडता.. लिहा ना अशीच आणखी मुक्तछंदात काव्ये.
- प्राजु.
26 Jan 2008 - 9:08 pm | धनंजय
यात तळमळ आहे. हे विडंबन नसून नवी कृती शोभते.
पण तरी एक प्रश्न विचारतो - कलाकाराला टाळ्या/वाहावा ची गरज पूर्वीही नव्हती का? हे एसेमेस म्हणजे त्याचाच प्रकार नाही काय?
सवंग टाळ्या-जमवू कलाकार, नव्या माध्यमात वावरून जुन्या, तप केलेल्या गायकांवर लोकप्रियतेत विजय मिळवतात, असे पूर्वीही झालेले आहे.
"हमिदाबाई" हे पात्र या विषयाला हात घालते - रेकॉर्डिंग आणि सिनेमागाण्यांचा पाणचट रतीब घालत पोरकट गायक-गायिकांनी बाजारपेठ काबीज केली, आणि आभिजात संगीत आळवणारी हमिदाबाईची कोठी ओस पडली. हे तर मागच्या (च्या मागच्या) पिढीत झाले. पण शेवटी असेच होते की जे नवीन तंत्रज्ञानातले "महागायक" असतात, ते फोल ठरतात, पाचोळ्यासारखे उडून जातात, आणि खरे कलाकार नवे माध्यमही काबीज करतात.
हमिदाबाई बेजान डब्यात आवाज बंदिस्त करणार्या कलाकारांना तुच्छ लेखते. पण रेकॉर्डिंग हे माध्यम भिमसेन वगैरे श्रेष्ठ कलाकारांनी जिंकले आहे. बेजान डब्यात आवाज भरला म्हणून त्यांना तुच्छ लेखायची कोणाला छाती होऊ नये. एसेमेसची नवलाई संपून खरी स्पर्धा या माध्यमांत येईल तेव्हा उत्तम कलाकार टीव्ही वाहिन्या हे माध्यमही जिंकून दाखवतील.
खुद्द नटसम्राटातही त्या महान कलाकारावर, काळ बदलता, थेटराच्या बाहेर उष्टे खायची वेळ येते. पण ते हृदयद्रावक सत्य मानले, तरी त्या नवीन नाट्यसृष्टीत पुढे उत्तम कलाकार निपजले हेही नकारता येत नाही.
हे अवांतर विचार, बरे का... तुमची कविता/नाट्यमय गद्य आवडले, हे आधीच सांगितले आहे.
27 Jan 2008 - 11:02 am | विसोबा खेचर
धन्याशेठ,
कलाकाराला टाळ्या/वाहावा ची गरज पूर्वीही नव्हती का? हे एसेमेस म्हणजे त्याचाच प्रकार नाही काय?
मुळीच नाही! माझ्या मते टाळ्या, वाहवा वेगळ्या आणि समस वेगळे! समस मागवण्यात पैशांचे राजकारण फार मोठ्या प्रमाणावर आहे! टाळ्या किंवा वाहवा याबद्दल कलाकाराला कुणाकडे भीक मागावी लागत नाही. टाळी ही उत्स्फूर्तपणे वाजवली जाते, वाहवा ही हृदयापासून नकळत उमटते!समसच्या बाबतीत, 'माझे गाणे आवडले असेल तर मला प्लीज प्लीज प्लीज समस करा हो' अशी जशी भीक मागितली जाते तशी टाळ्यावाहवांच्या बाबतीत मागितली जात नाही! कलाकाराचे काम म्हणजे प्रामाणिकपणे अधिकाधिक उत्तम रितीने आपली कला सादर करणे हे आणि एवढेच होय!लोकांकडे समस मागणे, टाळ्या-वाहवा मागणे हे कलाकाराचं काम नव्हे/असू नये!
सवंग टाळ्या-जमवू कलाकार, नव्या माध्यमात वावरून जुन्या, तप केलेल्या गायकांवर लोकप्रियतेत विजय मिळवतात, असे पूर्वीही झालेले आहे.
याचे उत्तर तुझ्या वरील वाक्यातच दडलेले आहे. टाळ्या-जमवू (हल्लीच्या युगात समस-जमवू!) कलाकारांच्या बाबतीत तूच सवंग हा शब्द वापरला आहेस! सो, यू सेड इट!
"हमिदाबाई" हे पात्र या विषयाला हात घालते - रेकॉर्डिंग आणि सिनेमागाण्यांचा पाणचट रतीब घालत पोरकट गायक-गायिकांनी बाजारपेठ काबीज केली, आणि आभिजात संगीत आळवणारी हमिदाबाईची कोठी ओस पडली. हे तर मागच्या (च्या मागच्या) पिढीत झाले. पण शेवटी असेच होते की जे नवीन तंत्रज्ञानातले "महागायक" असतात, ते फोल ठरतात, पाचोळ्यासारखे उडून जातात, आणि खरे कलाकार नवे माध्यमही काबीज करतात.
अगदी खरे आहे! परंतु लोकांकडून, तेही खास करून गायन स्पर्धेकरता समस मागवणे, ज्यात पैशांचे मोठे राजकारण आहे, तसेच समस पद्धतीत मोठे मॅन्युप्युलेशनही होऊ शकते, या प्रकाराला 'नवे तंत्रज्ञान' हा शब्द वापरणे हे मला अत्यंत चुकीचे, दिशाभूल करणारे, तसेच हास्यास्पदही वाटते! गाण्याची स्पर्धा असेल तर त्याबाबत निकाल देण्याचा अधिकार हा फक्त तज्ञ मंडळींकडेच असावा असे माझे मत आहे. शेवटी मायबाप रसिक ही आम जनताच असते, तेव्हा कुणाला दाद द्यायची, कुणाला नाही, कुणाला डोक्यावर घेऊन नाचायचे, कुणाला नाही, हे जनताच ठरवते हे मलाही मान्य, परंतु as far as spardhaa is concerned, त्या बाबतीत मात्र निकालाचे सर्वाधिकार फक्त आणि फक्त तज्ञ मंडळींच्या पॅनलकडेच असावेत.
सध्याची समस पद्धती ही कलेला घातक तर आहेच, शिवाय खरोखरंच गुणी आणि लायक स्पर्धक कलाकाराच्या हिताच्या दृष्टीनेही घातक आहे असे माझे मत आहे...
हमिदाबाई बेजान डब्यात आवाज बंदिस्त करणार्या कलाकारांना तुच्छ लेखते. पण रेकॉर्डिंग हे माध्यम भिमसेन वगैरे श्रेष्ठ कलाकारांनी जिंकले आहे. बेजान डब्यात आवाज भरला म्हणून त्यांना तुच्छ लेखायची कोणाला छाती होऊ नये. एसेमेसची नवलाई संपून खरी स्पर्धा या माध्यमांत येईल तेव्हा उत्तम कलाकार टीव्ही वाहिन्या हे माध्यमही जिंकून दाखवतील.
खुद्द नटसम्राटातही त्या महान कलाकारावर, काळ बदलता, थेटराच्या बाहेर उष्टे खायची वेळ येते. पण ते हृदयद्रावक सत्य मानले, तरी त्या नवीन नाट्यसृष्टीत पुढे उत्तम कलाकार निपजले हेही नकारता येत नाही.
माझ्या मते स्पर्धेकरता आम जनतेकडून समस मागवून केवळ अन केवळ पैशांचे राजकारण करून समस मागवणे आणि 'ध्वनिमुद्रण-तंत्रज्ञान' या दोन्ही गोष्टी पूर्णत: भिन्न आहेत. या दोन गोष्टींचा आपापसात दुरान्वयेही संबंध नाही. सबब, माझ्या मते वरील दाखला सदर चर्चेसंदर्भात अत्यंत गैरलागू व चुकीचा आहे!
हे अवांतर विचार, बरे का... तुमची कविता/नाट्यमय गद्य आवडले, हे आधीच सांगितले आहे.
धन्यवाद धन्याशेठ! तुझ्यासारख्या चोखंदळ समिक्षकाने आणि प्रतिभावंताने माझ्या प्रकटनाला क्षणभर का होईना परंतु 'कविता' असे म्हटले, आपल्या प्रतिसादाचे शीर्षक 'शिरवाडकरांना अप्रूप वाटेल' असे ठेवले, हे पाहून काव्यातले फारसे काही न कळणार्या माझ्यासारख्या माणसाला लाजेने गोरेगुलाबी अन चूरचूर व्ह्यायला झाले आहे! आज रविवार दुपारचे जेवण अंमळ दोन घास जास्तच जाऊन माझ्या अंगावर संध्याकाळपर्यंत मूठभर मास अधिक चढणार एवढे मात्र खरे! :)
आपला,
(नवा नवा कवी!) तात्या
:))
27 Jan 2008 - 1:17 am | बिपिन कार्यकर्ते
खासच आहे कविता.
पण धनंजय चा विचार ही थोडा फार पटला...
बिपिन.
27 Jan 2008 - 10:13 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तात्या,
सर्वप्रथम कविता या प्रांतात आपल्या प्रवेशाचे कवींच्या वतीने प्रातेनिधीक स्वरुपात आम्ही आपले स्वागत करतो. :)
( इथे शाल, श्रीफळ आणि एक फुलांचा गुच्छ दिला असे चित्र डोळ्यासमोर आणावे )
मुक्तछंदातील कवितेच्या आशयाच्या संदर्भात डॊ. धनजय यांच्या मताशी आम्ही सहमत आहोत.
काही काही गायक खरेच छान गातात. पण, ज्या पद्धतीने ते एस.एम.एस ने मते मागतात, ते दृष्य पाहवत नाही.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
27 Jan 2008 - 11:16 am | विसोबा खेचर
( इथे शाल, श्रीफळ आणि एक फुलांचा गुच्छ दिला असे चित्र डोळ्यासमोर आणावे )
वा वा! आपल्या शाल आणि श्रीफळामुळे मी भारावून गेलो आहे! धन्यवाद शेठ...:)
काही काही गायक खरेच छान गातात. पण, ज्या पद्धतीने ते एस.एम.एस ने मते मागतात, ते दृष्य पाहवत नाही.
यू सेड इट, मला अगदी हेच म्हणायचे आहे!
दुसरा मुद्दा म्हणजे समस पद्धत!
स्पर्धा जरूर असाव्यात, परंतु सर्वात लायक आणि पात्र स्पर्धक हा समस पद्धतीने ठरवला जाऊ नये, तर त्याचा अधिकार हा फक्त तज्ञ मंडळींनाच असावा! हल्लीची समस पद्धत म्हणजे केवळ मोबाईल कंपन्यांचे आणि वाहिन्यांचे लाखो कऱोडो रुपये कमवायचे एक माध्यम झाले आहे, चरायचे कुरण झाले आहे!
आणि या सगळ्या गदारोळात खरोखरंच एखाद्या गुणी स्पर्धक कलाकारावर अन्याय होऊ नये, तसेच लाखो-हजारोंमध्ये परमेश्वर एखाद्यालाच थोर गायककलेचे दान देऊन सन्मानित करतो अश्या व्यक्तिने, "माझा कोड अबक आहे, मला प्लीज प्लीज प्लीज समस करा हो" अशी लाचारी करणे मला अत्यंत चुकीचे, संतापजनक, लज्जास्पद, आणि घृणास्पद वाटते म्हणूनच केवळ वरील प्रकटनवजा कविता!
असो...!
आपला,
(कुणाकडेही कधीही 'समस' करता हात न पसरलेल्या भीमण्णा-बाबूजींचा एकलव्य शिष्य!) तात्या.
27 Jan 2008 - 11:42 am | इनोबा म्हणे
तात्यांची कविता आवडली आणि त्यांचे विचारही....
समस पद्धती चालू झाल्यामुळे,कलाकार लोक भिकार्यासारखे वागू लागले आहेत.समस पद्धतीने खरेतर चांगला व गुणी कलाकार येण्याऐवजी नको तेच निवडून येतात कारण सर्वात जास्त समस अमूक अमूक विजेत्याला मिळाले('सर्वात चांगला भिकारी'म्हणा हवे तर). मध्यंतरी हिंदी वॉईस ऑफ इंडीया मधे आसामच्या देबोजीतला भांडून भांडून विजय मिळाला,असला विजय काय कामाचा? आणि असले कलाकार तरी काय कामाचे? यांना कलाकार तरी कसे म्हणायचे?
मराठीतील हास्यसम्राट मधेही असाच किस्सा घडला होता.या कलाकाराने आपला (समस पद्धतीने) पराजय होणार हे आधीच हेरले होते जणू,म्हणूनच अंतीम फेरीपुर्वीच्या कार्यक्रमात त्याने एक किस्सा ऐकवला तो असा....
एका कुस्तीच्या लढती दरम्यान एक नावाजलेला पैलवान जिंकणार जिंकणार असे वाटत असताना एका किरकोळ वाळक्या बांबू एवढ्या पैलवानाकडून चित होतो. आश्चर्याने एक दर्शक त्याला कारण विचारतो तेव्हा तो सांगतो,"मी जिंकणारच होतो,पण मला समस कमी पडले हो!".
कालाय तस्मै नमः-दूसरे काय?
(हताश) -इनोबा
27 Jan 2008 - 12:18 pm | धोंडोपंत
वा तात्यासाहेब,
आपले मुक्तछंदातील प्रकटन आवडले. तुम्ही वेदना उत्कृष्टपणे मांडली आहे. अभिनंदन.
आयुष्यभर संगीतसाधना करूनही अत्यंत महान कलाकार आजच्या जमान्यात पडद्याआड गेले आहेत.(काळाच्या नव्हे.) आणि दोन चार अनुकरणे करणारे इंडियन आयडॉल आणि काय काय म्हणून मिरवून घेत आहेत.
या परिस्थितीवर आपले भाष्य अत्यंत चांगले झाले आहे. मुक्तछंदातील अजून लेखन आपणाकडून अपेक्षित आहे.
आपला,
(उतावळा) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
27 Jan 2008 - 8:39 pm | ऋषिकेश
आपले मुक्तछंदातील प्रकटन आवडले. तुम्ही वेदना उत्कृष्टपणे मांडली आहे. अभिनंदन.
असेच म्हणतो. रचना आवडली आणि व्यथा भिडली
-ऋषिकेश
27 Jan 2008 - 4:11 pm | स्वाती राजेश
कवितेचा प्रकार वगैरे काही माहिती नाही पण वाचताना मजा आली.
आमच्या भाषेत जी मनाला आनंद देते ती कविता उत्तम.
27 Jan 2008 - 6:24 pm | सहज
तात्या तुम्हाला संगीत/गायन आवडते पण हे ऐसेमेस मतदान प्रकरण नाही पण म्हणुन कविता हा प्रांत तुमचा नसला (असे तुम्ही म्हणता) तरी एक कविता निर्माण झाली हे तर छान झाले ना :-)
शिवाय असो कलाप्रेमी तात्याला हा ऐसेमेस प्रकार आवडत नसेल पण शेयरसम्राट तात्याला मोबाइल कंपन्यांच्या समभागातून त्या त्रासाची नुकसान भरपाई (थोडी का होईना) होतीय ना? ;-)
अहो चालायचेच!!!
27 Jan 2008 - 7:29 pm | संजय अभ्यंकर
तात्यांच्या वरिल कवितेत व विवेचनात म्हटल्याप्रमाणे हा उद्वेगजनक प्रकार बदलायला हवाय.
अंतिम विजेता हा तज्ञांच्या निर्णयावर ठरविला जावा.
ह्या एस्.एम्.एस. पद्धतीत काही गैरप्रकार घडतात उ.दा., स्पर्धा सुरु असताना एस्.टि.डि. बूथ अडवून, सारखे स.म.स. पाठवणे (त्यासाठी माणसे नेमुन त्यांना त्या कामाचे पैसे देणे इ.).
तसेच, गावात घरोघरि जाउन, स्पर्धकाचे माता-पिता, काका-मामा, आजी-आजोबा स.म.स. चा जोगवा मागतात.
माझ्या माहितितल्या एका स्पर्धकाच्या संबंधितांनी ह्या साठी अमाप पैसे खर्चले होते.
आपल्या पाल्याला सहज सोप्या जीवनाची सवय लावल्यावर, त्याला यशही सहज सोपे हवे असते. पालकही ते मिळवून द्यायचा प्रयत्न करतात. शालेय जीवनात, मार्कांसाठी जसे विद्यार्थ्यास घासावे लागते, तेव्हडेच संगीतात (किंबहुना सर्वच क्षेत्रात उच्च गुणवत्तेसाठी) घासावे लागते, हे पालकांनी मुलांवर बिंबवणे आवश्यक आहे.
स.म.स. बद्दल बोलायचे, तर, मोबईल कंपन्यांच्या आश्रयाशिवाय, तो सेटचा झगमगाट, परिक्षकांची फी, स्पर्धकांची झगमगीत प्रावरणे कोठुन येणार?
आणि स्पर्धा आयोजक पैसे कोठुन कमावणार?
संजय अभ्यंकर
27 Jan 2008 - 11:23 pm | केशवसुमार
तुझी तळमळ समजते आहे.. पण तू म्हणतोस त्या स्पर्धा नसून तो एक मोबाईल कंपन्याचा मार्केटींगचा भाग आहे..पाश्चिमात्य देशातून उचललेले खूळ आहे
कोणाला ही कला , कलाकार यांच्याशी मतलब नाही.. ना भाग घेणार्याला.. ना त्या परिक्षकाला.. ना त्या प्रयोजकाला..सब से बडा रुपया.. हेच खर बाबा.. उगाच त्रास करून घेऊ नको.. हे कर्यक्रम सुरु झाले की तो इडियट बॉक्स सरळ बंद करत जा..
आवांतर : तात्या, मुक्तछंदात चांगलं लिहिता तुम्ही. उगाच पद्याच्या नावने खडे का फोडता.. लिहा ना अशीच आणखी मुक्तछंदात काव्ये... प्राजुशी एकदम सहमत आहे..
28 Jan 2008 - 4:24 am | बेसनलाडू
उपरोधिक काव्य आवडले.
(आस्वादक)बेसनलाडू
28 Jan 2008 - 7:30 am | सुनील
तात्या,
कविता आवडली. मुक्तछांदाचा फॉर्म छान जमलाय.
समसमध्ये मोबाईल कंपन्यांचे हितसंबंध गुंतलेले असतात. ते केवळ गाण्याच्या कार्यक्रमाताच नव्हे तर "करोडपती" सारख्या प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमातदेखील जाणवून येत होते.
मागे ठाण्यातच एका व्य्क्तीला आपल्या पत्नीलाच अश्लील समस पाठवला म्हणून अटक झाली तेव्हा हेही उघडकीस आले की, कार्यक्रमातील व्यक्तीच अनेक सीमकार्डे वितरीत करून आपल्याला अधिक समस येतील याची व्यवस्था करते!
पण, ह्या तरुण, नवोदित कलाकारांना समसचा जोगवा मागावासा वाटला तर ते समजून घेता येईल. कारण शेवटी त्या स्पर्धेत जिंकणे ही त्यांचे अंतीम धेय नसते तर त्यांच्या करीयरची ती सुरुवात असते! आणि त्यासाठी जाणकारांच्या नजरेसमोर येणे जरूरीचे असते. आजच्या कित्येक बुजूर्ग नटांनी आपल्या करीयरचा सुरुवातीचा काळ नामवंत स्टुडियोबाहेरील फूटपाथवर घुटमळत घालवला आहे, तोही त्याच कारणासाठी!
अर्थात समसपेक्षाही नामवंत परीक्षकांनी दिलेल्या निकालावर स्पर्धेचे विजेते ठरवावेत हे मान्य होण्यासारखे!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.