बृहन्भारत (आग्नेय आशिया) : भाग ६ – थाईलँड प्रस्तावना

समर्पक's picture
समर्पक in भटकंती
10 Jun 2016 - 10:25 am

1
ब्रह्मदेश भाग १ : प्रस्तावना भाग २ : मंडले भाग ३ : बगान भाग ४ : रंगून भाग ५ : लोकजीवन
थाईलँड भाग ७ : सुखोथाई भाग ८ : उत्तर सीमा
लाओस भाग ९ : सुवर्णत्रिकोण
कंबोडिया भाग १० : नॉम पेन्ह व परिसर भाग ११ : अंगकोर वट

बव्हंशी अपरिचित असा नितांतसुंदर ब्रह्मदेश हा या लेखमालेचा मुख्य प्रेरणास्त्रोत जो आपण आधीच्या भागांमध्ये पाहिला. या भागापासून थाईलँड विषयी. हा देश आता अगदी 'परसातले पर्यटन स्थळ' होऊन गेला आहे. परंतु तरीही 'पॅकेज टुरीझम' चा पगडा असल्याने बराचसा भाग आजही तसा अपरिचितच आहे. त्याविषयी थोडे या भागापासून पुढे…
प्रथम थाईलँड ची थोडी ओळख; इथून पुढे मी 'सयाम' हे जुने नावच केवळ 'लिहायला सोपे' या कारणाने वापरणार आहे. देशाचे राजकीय नाव स्थानिक भाषेत 'रात्च अनाचक थाई' व व्यवहारातील स्थानिक नाव 'प्रथेत थाई' असे आहे. दोन्ही संस्कृतोद्भव शब्द, 'राज्य आज्ञा चक्र थाई' व 'प्रदेश थाई' असे. यातील थाई शब्द समुदाय संबोधक. या प्रदेशातील भाषा 'ताई' कुटुंबातील असून त्यातली एक 'ताई' म्हणजे आजची 'थाई', ती बोलणारे लोक, व त्या लोकांचा प्रदेश असा साधारण व्युत्पत्ती विस्तार. आपल्याकडेही या 'ताई'च्या २-४ लेकी अतिपूर्वेकडील राज्यात नांदत आहेत.
सद्य भौगोलिक सयाम हा पाच भागांचा मिळुन बनला आहे. सुदूर दक्षिण किनारी भाग : हा ऐतिहासिक 'श्रीविजय' साम्राज्याचा भाग होय. फुकेत, क्राबी, सुरत थानी (सुरत वरून ठेवलेले नाव) ही मोठी/प्रसिद्ध शहरे. सध्या ब्रह्मदेशाने हाकलून दिलेल्या व मलेशियाने न स्वीकारलेल्या त्रासदायक मुसलमानांमुळे हा भाग सयामचे अवघड जागचे दुखणे आहे. मुख्य भूमीचा दक्षिण भाग हा सर्वात समृद्ध व प्रगत, बँकॉक, पाथ्थया ही सर्वश्रुत ठिकाणे या भागातील. मध्य भाग हा सयाम चे सांस्कृतिक केंद्रस्थान. अयुथ्थया (अयोध्या) ही थोड्या पलीकडल्या काळातील राजधानी, त्याही पलीकडल्या काळातील नाव 'द्वारावती'. जवळच समृद्ध असा प्राचीन सुखोथाई राज्याचा भाग, सुखोथाई (सुखोदय) व सी सत्चनालाई (श्री सज्जनालय) ही प्राचीन शहरे या भागातील. उत्तर सीमावर्ती भाग हा डोंगराळ प्रदेश, मेकाँगच्या खोऱ्यातील ऐतिहासिक 'लान-ना' उर्फ 'हरीपुंजया' राज्याचा भाग. उर्वरित पूर्वेकडील भाग इसान (ईशान्य) म्हणून ओळखला जातो, हा खरा ख्मेर (कंबोडिया) राज्याचा भाग परंतु सध्या सयाम मध्ये समाविष्ट आहे. इथे हिंदू प्रथांचा बराच प्रभाव आढळतो.
संदर्भासाठी नकाशा
आधी लिहिल्याप्रमाणे सयाम तसा फारसा अनोळखी राहिलेला नाही त्यामुळे झगमगाटातील जागांविषयी लिखाणाची पुनरावृत्ती टाळून या प्रस्तावनेच्या भागात बँकॉक व लगतच्या प्रदेशाची थोडक्यात चित्रयात्रा. पुढील भागात काही अल्प परिचित भागाविषयी सविस्तर.

एरावन (ऐरावत) ब्रह्मदेव मंदिर, प्रमुख देवतांपैकी एक
सुवर्ण बुद्धाचे मंदिर
सुवर्ण बुद्ध
राजप्रासाद
राजप्रासाद
राजवाड्यातील प्रमुख स्तुपाबाहेरील मूर्ती
अन्य बुद्धमूर्ती
मरकत बुद्ध : सयामची सर्वात महत्वाची बुद्धमूर्ती, जेड पासून बनलेली असली तरी 'एमरल्ड बुद्धा' म्हणायची पद्धत आहे.
अजून एक महत्वाची सुवर्ण बुद्धमूर्ती
राजप्रासादातील भित्तिचित्र, रामायण प्रसंग
भित्तिचित्र : राजाच्या जीवनातील एक प्रसंग
वट रात्चनाथराम लोह प्रासाद: कमी माहितीतली परंतु अतिशय सुंदर वास्तू, सध्या एक विद्यालय
वट रात्चनाथराम
बँकॉक पासून पूर्वेकडे साडेतीन तासांवर फिमाई (मूळ नाव 'विमयपुरी') व फानोम रुंग ही ख्मेर/अंकोर शैलीतील पुरातन शैव मंदिरे आहेत. बरेच बांधकाम पुनर्रचित असले तरीही मूळ मंदिर आजही अतिशय देखणे आहे. अंकोर शैलीप्रमाणे मोठे प्रांगण, उपमंदिरे व जलकुंड असा बराच भव्य विस्तार दोन्ही ठिकाणी आहे. कोरीवकाम फारसे उरलेले नाही परंतु अंतरावरून हि मंदिरे फारच सुंदर दिसतात. दोन्हीकडे जाण्यास बस सेवा नॉर्थ टर्मिनल वरून उपलब्ध आहे (कोरात मार्गे)

फिमाई : मंदिर प्रांगण
फिमाई : मुख्य मंदिर

फानोम रुंग : मंदिर प्रांगण
फानोम रुंग : मुख्य मंदिर
बँकॉक पासून उत्तरेकडे तासाभरावर अयुत्थया हि ऐतिहासिक राजधानी. रेल्वे, नाव व बस तिन्ही प्रवासी सेवा इथे जाण्यासाठी उपलब्ध आहेत. ब्रह्मदेशाने स्वारी करून हि नगरी लुटली व आता बऱ्याच मोठ्या इमारतींचे केवळ अवशेष शिल्लक आहेत. परंतु तरीही त्यावरून गतवैभवाची कल्पना येते.

अयुत्थयेचा जगप्रसिद्ध बुद्ध
वट चैवत्थ्नराम
वट चैवत्थ्नराम
वट याई छाईमोंगखोल
वट याई छाईमोंगखोल
वट याई छाईमोंगखोल

पुढील भागात उत्तरेकडची भटकंती…

अन्य भटकंती : दक्षिण अमेरिका - पेरू, दक्षिण अमेरिका - अमेझॉन ब्राझील, मध्य अमेरिका - ग्वाटेमाला होंडुरास एल साल्वाडोर बेलीझ, ईशान्य भारत - मणिपूर, ईशान्य भारत -त्रिपुरा, आग्नेय आशिया - ब्रह्मदेश थाईलँड लाओस कंबोडिया मध्य व पश्चिम आशिया - उझबेकिस्तान ताजिकिस्तान अफगाणिस्तान अझरबैजान तुर्कस्तान

प्रतिक्रिया

स्पा's picture

10 Jun 2016 - 10:35 am | स्पा

अप्रतिम, फोटो तर दृष्ट लागण्याजोगे आलेत

__/\__

खेडूत's picture

10 Jun 2016 - 10:39 am | खेडूत

अगदी भारी..!
आता या प्रवासाची तयारी करायलाच हवी.

टवाळ कार्टा's picture

10 Jun 2016 - 11:05 am | टवाळ कार्टा

थायलंड हा अप्रतिम निसर्गसौंदर्याने भरलेला देश आहे...दुर्दैवाने सध्ध्या त्याची प्रसिध्धी पुर्वेचे अ‍ॅमस्टरडॅम अशी होत आहे...जी काही बाबतीत खरीही आहे ;)...नाईटलाईफ सोडून देश बघायचा असेल तर कमीत कमी २ आठवडे तरी हाताशी हवेत

टवाळ कार्टा's picture

10 Jun 2016 - 11:08 am | टवाळ कार्टा

बाकी या जागेचा फोटो नसल्याने लेख अपूर्ण आहे ;)

maya bay

हा मोह टाळणे फारच कठीण होते, परंतु वेळचा विचार करून ठिकाणे ठरविताना सर्व किनारे बाद केले. त्याशिवाय थाईलँड प्रवास अपूर्ण हे मान्य, पण अनोळखी वाट एकल प्रवासासाठी विचारपूर्वक निवडली.

किनारी भाग दुकट्याने पुन्हा कधी :)

प्रचेतस's picture

10 Jun 2016 - 11:08 am | प्रचेतस

छान.

मेघना मन्दार's picture

10 Jun 2016 - 3:08 pm | मेघना मन्दार

काय सुरेख फोटो काढले आहेत !! एकदम खलास !!!

फार सुरेख. नेहमीप्रमाणेच.

सिरुसेरि's picture

10 Jun 2016 - 5:33 pm | सिरुसेरि

या विषयावरील सगळेच लेख आणी फोटो मस्त.. +१००

अजया's picture

10 Jun 2016 - 5:36 pm | अजया

अप्रतिम अप्रतिम फोटो.
ती जुनी मंदिरे बघायला थायलंडवारी परत करणे आलेच.

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Jun 2016 - 6:33 am | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर प्रवासवर्णन ! अप्रतिम फोटो !

हा भाग टाकायला बरेच दिवस घेतलेत. आता पुढचे भाग शक्यतो लवकर टाकावे.

rahul ghate's picture

11 Jun 2016 - 3:21 pm | rahul ghate

अर्थात तुमची हरकत नसल्यास ह्या संपूर्ण सहली चे नियेजन कसे केले व साधारण किती खर्च आला हे सांगाल का ?
तुमची लेखमाला वाचून मी पण ब्रम्हदेश जायचे प्लान करत आहे पण योग्य नियोजन जमत नाही आहे .

समर्पक's picture

13 Jun 2016 - 10:34 pm | समर्पक

नियोजनाबाबत पुढे लिखाण करण्याचा मानस आहे, तोपर्यंत प्रदेशाची साधारण माहिती लेखातून आलेली असल्याने त्याचा संदर्भ जुळवणे उत्सुक वाचकांस सोपे जाईल. त्वरित हवे असल्यास व्यनि संभाषण करू.

प्राथमिक थोडेसे: भारतातून मंडले/रंगून थेट विमानसेवा नाही. पण एक थांब्याचे तिकीट सुद्धा ३० पेक्षा जास्त पडते. पेक्षा जर बँकॉक चे तिकीट काढले तर ते १०-१२ किंवा त्याहीपेक्षा कमीत बऱ्याचदा मिळते. बँकॉकहून रंगून परतीसकट फार तर ५-७ हजार, वर थाई ट्रांझिट/टुरिस्ट व्हीझा तिथे फिरण्याचीही संधी देतो त्याचे २ हजार. म्हणजे केवळ ब्रह्मदेश करण्यापेक्षा ब्रह्मदेश+सयाम स्वस्तात पडते असा अनुभव.

माझा एकूण खर्च चार देशांसाठी ५८,०६३ ₹ (~९००$ /~८००€)

पुभाप्र.
आधीच्या भागात कॅमेरा सांगितल्याबद्दल आभारी आहे. :)

बोका-ए-आझम's picture

16 Jul 2016 - 9:09 am | बोका-ए-आझम

हे तर जगद्विख्यात अंगकोर वाट सारखेच दिसतात. बाकी फोटो आणि लेख नेहमीप्रमाणेच अप्रतिम!

समर्पक's picture

16 Jul 2016 - 10:10 am | समर्पक

दोनही अंकोरच्या ख्मेर राजवंशानेच बांधलेली आहेत. त्यातले फिमाई हे अंकोरवट चे प्रायोगिक बांधकाम म्हणता येईल इतपत साम्य आहे...