===================================================================
उड उड रे प्लोव्हू... ३०,००० किमीची फेरी मारून येऊ ! :
०१ : प्लोव्हरची महाभरारी... ०२ : महाभरार्यांबद्दल थोडेसे...
०३ : प्रवासी पक्षांची दिशादर्शक प्रणाली... ०४ : डोळे हे चुंबकीय गडे !...
०५ : बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात... ०६ : चिमुकल्या साँगबर्डचे नाव छोटे, लक्षण मोठे...
===================================================================
हे सर्व बदल पक्षांसाठी आणि शास्त्रज्ञांसाठी दु:खद व चिंताजनक आहेत. पक्षांना या सर्व घडामोडींत आवाज नाही आणि शास्त्रज्ञांच्या आवाजाकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. तरीसुद्धा शास्त्रज्ञ आपल्यापरीने जे करणे शक्य आहे, ते करतच आहेत... ते म्हणजे अधिकाधिक माहिती गोळा करणे, तिचे निष्कर्ष लोकांपर्यंत पोहोचवणे आणि त्या पुराव्यांच्या दबावाने शक्य तितका योग्य परिणाम साधण्याचा प्रयत्न करणे.
२०१५ मध्ये जॉन्सनने एका नवीन प्लोव्हरवर जिओलोकेटर बसवला आणि त्याला त्याच्या सफरीवर सोडून दिले दिले... जिओलोकेटरच्या तरंगलांबीवरून या नवीन उड्डाणपटूचे नामकरण झाले आहे "क्रमांक ३६".
चुंबकीय डोळे
निसर्गाबद्दल जेवढा खोलवर अभ्यास केला जातो तेवढ्या निसर्गात बनलेल्या अधिकाधिक अविश्वनिय आणि मानवी कल्पनेपलीकडच्या करामती उघड होऊ लागतात हे सर्वव्यापी आणि सार्वकालिक सत्य आहे ! पक्षांच्या बाबतीतही हे खरे ठरले नसते तरच आश्चर्य होते.
हिरव्या-निळ्या डोळ्यांच्या माणसांकडे इतर माणसे चुंबकाकडे लोह आकर्षित व्हावे तशी ओढली जातात हे आपल्याला माहीत आहेच. पण, जर खरोखरची चुंबकीय शक्ती असलेले आणि भोवतालच्या चुंबकीय क्षेत्राची संवेदना जाणणारे डोळे अस्तित्वात आहेत असे सांगितले तर अविश्वास वाटेल, नाही का ?! तुमचा असा अविश्वास किंवा गैरसमज असेल तर तो आजपासून दूर करा !
अनेक प्राण्यांना आणि पक्षांना पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राची जाणीव आहे आणि त्याचा उपयोग ते आपल्या महाप्रवासांसाठी करतात हा आडाखा तसा पाच एक दशके जुना आहे. पक्षी आणि प्राणी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा अंदाज आपल्या डोळ्यांचा उपयोग करून बांधतात हा दावाही अनेक वर्षे जुना आहे. हे नक्की कसे केले जाते हे आज आपल्याला माहीत नसले तरी त्या दिशेने चाललेल्या संशोधनात मिळालेले धागेदोरे अत्यंत रोचक आहेत... अगदी एखाद्या सायफाय चित्रपटाला लाज वाटायला लावतील, इतके ! लवकरच, त्या दाव्यांचे शास्त्रीयदृष्ट्या सबळ पुराव्यात रूपांतर होईल असे दिसते आहे !
चुंबकीय रॉबीन
पक्षांवरील चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाचे प्राथमिक पुरावे 'युरोपियन रॉबीन' सारख्या प्रवासी पक्षांमध्ये दिसून आले आहेत. पकडून पिंजर्यात ठेवल्यावरही हे पक्षी त्यांच्या प्रवासमार्गाच्या दिशेकडे डोके/डोळे येतील असे आपले शरीर ठेवून बसतात असे आढळते... आणि त्यांच्या भोवताली विरुद्ध दिशेचे चुंबकीय क्षेत्र निर्माण केले तर ते पक्षी बरोबर विरुद्ध दिशा पकडून बसतात !
हे पाहून शास्त्रज्ञांनी पक्षांच्या शरीरात चुंबकीय प्रभाव असणारे द्रव्य शोधायला सुरुवात केली. सुरुवातीला पक्षांच्या चोचीत सूक्ष्म प्रमाणात असलेल्या मॅग्नेटाईट या द्रव्याच्या संशोधनावर भर दिला गेला. नंतर, १९९० मध्ये, संशोधकांच्या असे लक्षात आले की पक्षांमधली चुंबकीय संवेदना आणि प्रकाशसंवेदना यांत खूप जवळचा संबंध आहे. खूपसे पक्षी केवळ अतिनील (अल्ट्राव्हायोलेट) व हिरव्या प्रकाशातच चुंबकीय क्षेत्र जाणू शकतात. यावरून, असा अंदाज बांधला गेला की, प्रकाश आणि चुंबकीय क्षेत्र यांचा संयोग (सुपर-इंपोझिशन) करून पक्षी एक आकृतिबंध (पॅटर्न) तयार करत असावेत.
अनेक प्रवासी पक्षांच्या डोळ्याच्या प्रकाशसंवेदनाशील पडद्यात (रेटायना / रेटिना) असलेल्या क्रिप्टोक्रोम्स (cryptochromes) नावाच्या प्रोटीन्समुळे हे शक्य होते अशी कल्पना इलिनॉय विद्यापीठातील क्लाऊस शुल्टन नावाच्या जीवभौतीकशास्त्रज्ञाने (biophysicist) इ स २००० मध्ये मांडली. क्रिप्टोक्रोम्सचा प्रकाशाशी संबंध आल्यावर ते इलेक्ट्रॉन्स उत्सर्जित करतात. आजूबाजूचे चुंबकीय क्षेत्र बदलल्यावर त्या उत्सर्जनात बदल होतात.
या दिशेने चाललेल्या संशोधनात असेही ध्यानात आले की ही प्रक्रिया केवळ प्रवासी पक्षांची मक्तेदारी नाही. त्यांच्यापेक्षा उत्क्रांतीच्या टप्प्यावर खूप पायर्या खाली असलेल्या फ्रूट फ्लाय या कीटकांतही ही शक्ती आहे. प्रयोगाने बनवलेली क्रिप्टोक्रोम-विरहित फ्रूट फ्लाय चुंबकीय क्षेत्र ओळखण्यास अक्षम असते.
कॅन शी (Can Xie) या पेकींग विद्यालयातील संशोधकाने "क्रिप्टोक्रोम्सना आपले काम करण्यासाठी दुसर्या एका लोह मूलतत्व असलेल्या अणूची गरज आहे" असे मत मांडले. कारण, पृथ्वीवर आढळणार्या द्रव्यांपैकी लोह हेच द्रव्य चुंबकीय क्षेत्राने सर्वात जास्त प्रभावित होते आणि म्हणून तेच डोळ्यामधल्या दिशादर्शकाचे काम सर्वोत्तमरीत्या करू शकेल असा त्याचा अंदाज होता. या सैद्धांतिक भांडवलावर त्याने फ्रूट फ्लायमध्ये असा अणू शोधायला सुरुवात केली की (अ) ज्याच्यात लोहाचा परमाणू असेल आणि (आ) जो क्रिप्टोक्रोम्सना चिकटून राहत असेल.
या संशोधनाचे निष्कर्ष अधिक विश्वासू बनवायला त्याने अजून एका गोष्टीची मदत घेतली, ती म्हणजे या अणूचे आणि क्रिप्टोक्रोम्सचे कार्य नीट तपासण्यासाठी त्यांचे काम चालू/बंद करणारी जनुके.
कॅन शीच्या गटाने वरच्या अटींत बसणारे अनेक अणू शोधून काढले. त्यापैकी सर्वोत्तम ठरलेल्या अणूला त्यांनी “MagR” हे नाव दिले आहे. हा अणू क्रिप्टोक्रोम्सच्या संयोगात आल्यावर होणार्या संयुगाचे प्रभावी चुंबकीय गुणधर्म असलेले स्फटिक तयार होतात. हे स्फटिक चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाने दिशा बदलतात इतकेच नाही, तर प्रयोगात वापरलेल्या लोहयुक्त धातूंच्या साधनांनाही चिकटून बसतात !
इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपाखाली या अणूचे स्वरूप, "दिशादर्शकाच्या (कंपासच्या) अतिसूक्ष्म सुयांसारख्या दिसणार्या लोह-परमाणूंच्या रांगा असलेला लंबगोल (रॉड) (rod containing neat rows of iron atoms, like a nano-sized compass needle)" असे दिसते. कॅन शीच्या दाव्याप्रमाणे हा अणू पक्षाला दक्षिण दिशा "पाहायला" मदत करतो. कॅन शी ने हे संशोधन Nature Materials या मासिकात प्रसिद्ध केले आहे.
Cryptochrome-MagR जोडगोळीचे हे काम सद्यातरी फक्त प्रयोगशाळेच्या टेस्ट ट्यूबमध्येच झालेले आहे. ते जिवंत पक्षात अथवा इतर कोणत्याही प्राण्यात सिद्ध करता आले तर ते प्रवासी प्राण्यांवरील संशोधनात एक मैलाचा दगड ठरेल, हे नि:संशय आहे !
जोपर्यंत पक्षांचे डोळे त्यांचे गुपित आपल्यासमोर उघड करत नाहीत, तोपर्यंत हे खालचे गीत गाणे-ऐकणे इतकेच आपल्या हातात आहे ! :) ...
(यु ट्युबवरून साभार)
(क्रमश : )
===================================================================
मुख्य संदर्भ :
१. https://en.wikipedia.org/wiki/Plover
२. https://www.allaboutbirds.org/guide/Wilsons_Plover/id
३. https://cosmosmagazine.com/life-sciences/epic-journeys-plover
४. https://cosmosmagazine.com/life-sciences/built-compass-helps-birds-find-...
===================================================================
उड उड रे प्लोव्हू... ३०,००० किमीची फेरी मारून येऊ ! :
०१ : प्लोव्हरची महाभरारी... ०२ : महाभरार्यांबद्दल थोडेसे...
०३ : प्रवासी पक्षांची दिशादर्शक प्रणाली... ०४ : डोळे हे चुंबकीय गडे !...
०५ : बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात... ०६ : चिमुकल्या साँगबर्डचे नाव छोटे, लक्षण मोठे...
===================================================================
लेखमालेतील सर्व फोटो लेखाखाली दिलेल्या यादीत उर्धृत केलेल्या जालावरील संदर्भलेखांतून
किंवा इतर जलस्रोतावरून घेतलेले आहेत.
===================================================================
प्रतिक्रिया
28 Apr 2016 - 10:56 pm | एस
रोचक!
29 Apr 2016 - 9:41 am | लालगरूड
हा भाग आवडला... ज्ञान वाढले... पुलेशु
29 Apr 2016 - 10:04 am | प्रचेतस
खूपच माहितीपूर्ण.
29 Apr 2016 - 11:52 am | ज्ञानोबाचे पैजार
या लेखमाले नंतर माणसाकडे काय काय नाही याची यादी बरीच मोठी होणार असे दिसते.
ही असली चुंबकिय दृष्टीची कल्पना सुध्दा मी या आधी कधी केली नव्हती.
पैजारबुवा,
29 Apr 2016 - 12:16 pm | सनईचौघडा
खरे तर आपल्यापेक्षा प्राणी जगत हे संदेश दळणव़ळणामध्ये खुपच प्रगत आहे. डॉल्फिन विषयी तर सगळेजण जाणतातच के ते सोनार व्हेव्हज वापरुन एकमेकांशी संभाषण करतात.
मागे डिस्कवरीवर दाखवले होते की हत्ती सुध्दा अशा प्रकारचे आवाज काढातात जे मानावाला जाणवतच नाहीत. जी ने ३० वर्षे संशोधन केले आहे अशा एका शास्त्रज्ञ बाईने ते आवाज रेकॉर्ड केले व ऐकण्याचा प्रयत्न केला तेव्हा अवाज ऐकु आले नाहीत. पण जेव्हा ती कॅसेट १०००० का काहीश्या पटीने वेगात फिरवली तेव्हा काही तरी बारीक कुचुकूचु असे आवाज ऐकु आले.
तिला आढळले की हत्ती प्रवास करताना एक कळप ३० कि.मी लांब असलेल्या कळपाला सोनार व्हेव्हजने पुढे काही धोका आहे का किंवा पाणी उप्लब्ध आहे की नाही हे कळवतात. मग भले मधे डोंगर जरी आडवा असला तरी काही अडथळा येत नाही. सगळे अजब आहे.
सामान्यज्ञानचा अभिलाषी पम्या
29 Apr 2016 - 6:06 pm | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
एकमेकाशी संवाद साधण्याच्या अनेक दृश्य व आवाजी पद्धती अनेक प्राण्यांमधे विकसित झाल्या आहेत यात वादच नाही. तसेच इतर बर्याच प्राण्यांची ज्ञानेंद्रिये मानवी ज्ञानेंद्रियांपेक्षा खूप वेगळ्या पद्धतिने विकसित झाली आहेत, उदा: कुत्रे व डॉल्फिन मानवी कानाच्या क्षमतेच्या श्रेणीबाहेरील (रेंज) खूप कमी तरंगलांबीचे आवाज ऐकू शकतात. पण ही सगळी वेगवेगळ्या प्राण्यांमधे त्याच संवेदना (उदा आवाज) स्विकारण्याच्या वेगवेगळ्या क्षमतेची उदाहरणे आहेत.
याविरुद्ध, "पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राची संवेदना असणे आणि त्याचे पृथ्वीच्या पोटातील हालचालीने होणार्या आवाजाबरोबर एकत्रिकरण करून प्रवासी नकाशा बनविण्याची क्षमता इवल्याश्या मेंदूत असणे", ही अत्यंत वेगळी आणि कल्पनेपलिकडील क्षमता प्रवासी पक्षांत आहे. हे खूपच विशेष आहे.
मुख्य म्हणजे अश्या "साय्-फाय् चित्रपटात"ही अविश्वसनिय वाटणार्या गोष्टी मानवापेक्षा उत्क्रांतीच्या अनेक पायर्या खाली असलेल्या प्राण्यांत सतत उघडकीस येत आहेत ! याचा साधा सरळ अर्थ असा की, माणुस आज जरी उत्क्रांतीच्या सर्वात वरच्या पायरीवर उभा असला तरी, फक्त त्याच्याकडेच सर्वोत्तम उत्क्रांत झालेल्या क्षमता आहेत असे नाही ! खरे सत्य हेच की, माणसात उत्क्रांत झालेल्या क्षमतांनी त्याला गेल्या २ लाख वर्षांत पृथ्वीवरील सर्वात प्रबळ प्राणी बनण्यास मदत केली आहे... पण तरीही, तो निसर्गात तयार झालेले सर्व बाबतीतले सर्वोत्तम उत्पादन आहे, असे अजिबात नाही !
जीवभौतीकशास्त्राच्या संशोधनात अशी अनेक उदाहरणे उघड होत आहेत की ज्यांचा मानवाला आपली साधने (टूल्स) अधिक विकसित करण्यासाठी उपयोग होत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे : मानवी कानांना ऐकू न येणार्या तरंगलांबींचा आवाज करून आणि त्याचे परावर्तन (एको) ऐकून वटवाघळे त्यांच्या उडण्याचा मार्ग ठरवतात. त्यामुळेच ती अंधार्या गुहेतही, भिंतींवर अथवा एकमेकावर न आदळता उडू शकतात. या माहितीचा उपयोग करून विमानांचा मागोवा घेणारे "रडार (radar)" हे उपकरण बनवले गेले आहे. निसर्गात अश्या चमत्कृतीपूर्ण गोष्टींचे मोठे भांडार दडलेले आहे... ते इतके मोठे आहे की त्याला समजून घेण्यासाठी सर्वात मोठी मर्यादा (लिमिटेशन), निसर्गातल्या सर्वात जास्त उत्क्रांत प्राण्याच्या (मानवाच्या) विचारशक्तीची मर्यादा, हीच आहे ! :)
29 Apr 2016 - 12:53 pm | स्वीट टॉकर
अतिशय रोचक माहिती! चालू राहू दे!
29 Apr 2016 - 3:06 pm | पद्मावति
मस्तं! पु.भा.प्र.
29 Apr 2016 - 6:18 pm | सुधांशुनूलकर
(या पूर्वीच्या भागांना प्रतिसाद देऊ शकलो नाही.)
माझ्या आवडीचा आणि अभ्यासाचा विषय. अशाच अभ्यासासाठी या वर्षी (कदाचित) पक्ष्यांना कडं लावण्याच्या प्रकल्पात सहभागी व्हायची संधी मिळण्याची शक्यता आहे. बघू या कसं जमतंय ते...
तुम्ही फ्रूट फ्लाय या कीटकाचा संदर्भ दिला आहे. कीटकांमध्ये काही जातींची फूलपाखरंही स्थलांतर करतात - काही स्थानिक, तर काही खूप लांब अंतरावर स्थलांतर करतात. मोनार्च हे फूलपाखरू या बाबतीत दादा मानलं जातं, त्याच्या स्थलांतराचा बराच अभ्यास झाला आहे. अलीकडे असं आढळलंय की त्यांच्या पोटावर आडवी पसरलेली, ठिपक्यांसारखी केंद्रं असतात. ती चुंबकीय क्षेत्राला संवेदनशील असतात, त्याद्वारे त्यांना चुंबकीय क्षेत्राचं ज्ञान होतं आणि स्थलांतरासाठी दिशाज्ञान होतं.
लेखमाला मस्त चालली आहे. एकूण मेजवानी आहे. त्यासाठी धन्यवाद.
29 Apr 2016 - 8:51 pm | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
अशाच अभ्यासासाठी या वर्षी (कदाचित) पक्ष्यांना कडं लावण्याच्या प्रकल्पात सहभागी व्हायची संधी मिळण्याची शक्यता आहे. बघू या कसं जमतंय ते...
भन्नाट ! नशीबवान आहात !
मोनार्क फुलपाखरू तर प्रवासी प्राण्यांच्या यादीत फार फार वर आहे. एवढासा जीव, इवलासा मेंदू आणि इवलेसे कांपाउंड डोळे... पण भरारी मानवाला लाजवेल अशी ! जमल्यास त्याच्यावरही एक लेख या लेखमालेत टाकायचा विचार आहे.
30 Apr 2016 - 9:35 am | प्रचेतस
मोनार्क फुलपाखरांच्या स्थलांतराचा अतिशय सुंदर व्हिडियो बीबीसी च्या प्लॅनेट अर्थ ह्या कार्यक्रमात पाहिलेला होता.
1 May 2016 - 9:57 am | बोका
या निमित्ताने मिपा वरील किलमाऊस्की, (हेमांगी के ) यांच्या मोनार्क लेखमालेचा दुवा ...
मोनार्क - १
मोनार्क - २
मोनार्क - ३
मोनार्क - ४
30 Apr 2016 - 8:12 pm | डॉ सुहास म्हात्रे
सर्व प्रतिसादकांसाठी व वाचका़ंसाठी धन्यवाद !
30 Apr 2016 - 11:17 pm | चैतन्यकुलकर्णी
आपण आत्तापर्यंत लिहिलेल्या सर्व लेख मालिकांचे प्रत्येकी ई-बुक बनवावे हि विनंती.
उत्तम संग्रह होईल.
जागतिक भरारी न मारणार्या पण इतर वैशिष्ट्ये असलेल्या इतर पक्षांबाबतही लिहावे.
उत्तम लेखमालिका अशीच चालू राहो...
2 May 2016 - 1:30 pm | चाणक्य
आत्ता सगळे भाग वाचून काढले. काका, खूप मस्त लिहिता आहात. काय स्टॅमिना आहे या प्लोव्हर चा.
2 May 2016 - 5:43 pm | चौकटराजा
मेडिसिन च्या क्षेत्रातील पदवीधर असूनही अनेक ज्ञानशाखांमधून भरारी मारणारे आहेत ते. व स्ट्यामिनाही जबरी.
2 May 2016 - 4:03 pm | बोका-ए-आझम
पक्ष्यांना जर माणसाप्रमाणे प्रगत मेंदू लाभला असता तर पृथ्वीवर त्यांनीच राज्य केलं असतं. पण उडताना वजनाचा अडथळा होऊ नये म्हणून तो आकाराने छोटा असतो. तरीही ते त्याच्या सहाय्याने जे काही करतात ते निव्वळ अफाट आहे!
2 May 2016 - 5:09 pm | मार्मिक गोडसे
आकार छोटा असल्यामुळे ह्या पक्षाला हवेत तरंगण्यासाठी पंखांची अधिक वेळा हालचाल करावी लगते. आकाराने मोठे असलेल्या इतर पक्षांप्रमाणे ह्या पक्षाला ग्लाइड करता येते की नाही ते माहीत नाही. मोठे पक्षी स्थलांतर करताना पंखांची मर्यादीत हालचाल करतात व उर्जा वाचवतात. जसे उष्ण हवेच्या प्रवाहाचा उपयोग करुन एअर लिफ्ट घेणे, पंख न हलवता ग्लाइड करुन अधिक अंतर कापणे, वार्याच्या झोताचा योग्य वापर करणे, समुहाने 'व्ही' आकारात उडणे इ. प्रकारे आपला प्रवास अधिक कार्यक्षमतेने करतात. त्यामुळे हा पक्षी आपल्या महाभरारीत नेमक्या कोणत्या कार्यक्षम पद्धती वापरतो ह्याबदल उत्सुकता आहे.
2 May 2016 - 10:16 pm | पैसा
खूप माहितीपूर्ण लिहिता आहात.