गेले १०-१२ दिवस म्युन्स्टर मधले तपमान साधारण -७ ते -१२ याच दरम्यान होते. दिवसभर थंडगार वारे, रस्त्याची कडेला गोठलेले दंव, झाडाच्या पानांवर त्याच हिमदवाची झालेली नक्षी असे एकंदरीत चित्र होते. 'अशी थंडी सतत तशीच आहे म्हणजे उद्या परवा 'आझे' नक्कीच गोठेल' गेल्या शुक्रवारी आम्ही असा विचार करत असतानाच आमच्याच इमारतीत वरच्या मजल्यावर रहाणारा श्रीनिधी शनिवारी सांगायला आला, ' मी आत्ताच बाहेर जाऊन आलो, आझे पूर्ण गोठला आहे. आज दुपारी जाऊया का तिथे?' आम्ही दोघं लगेचच उत्साहाने तयार झालो.
आझे म्हणजे 'आ' नावाच्या म्युन्स्टरमधील नदीवरचे मोठे सरोवर. हे सरोवर साधारण २.५ किमी लांब आहे. जर अनेक दिवस तापमान खूप कमी म्हणजे उणे असेल तर हे सरोवर गोठते आणि इथली नगरपालिका या सरोवरात उतरून चालण्याची, खेळण्याची परवानगी देते.
एरवी आझे असा दिसतो. (जालावरुन साभार)
शनिवारी दुपारी आम्ही बाहेर पडलो. इमारतीच्या बाहेर आल्याआल्याच थंडगार बोचर्या वार्यांनी आमचं स्वागत केलं. स्वेटर, जर्किन, हातमोजे इतकं सगळं घालूनही थंडी वाजतच होती. -१० मध्ये आपल्याला एवढी थंडी वाजत्ये तर -२५, -४० मध्ये लोकांचं काय होत असेल? असा विचार करतच आम्ही बसमध्ये बसलो. आझे पर्यंतचे अंतर फार नाही. १५ ते २० मिनिटेच लागतात. आमची बस आझे वरच्या पुलावरून जात असता बाहेर खूपच सुंदर दृश्य दिसत होते. लांबवर पसरलेला, पूर्ण गोठलेला आझे आणि त्यावर उतरलेली, खेळत असलेली अनेक माणसे. कधी एकदा उतरून तिथे जातोय असं आम्हाला झालं.
खाली बघून हळू चाला, कॅमेरे सांभाळा, खूप निसरडं आहे असं एकमेकांना सांगतच आम्ही सरोवरात उतरलो. बुटांच्या आतुनही खालच्या बर्फाचा थंडगार स्पर्श अंगावर शिरशिरी आणून गेला. कुडकुडतच एकेक पाऊल पुढे टाकू लागलो. गुळगुळीत थंडगार काचेवरून चालावे तसे वाटत होते. एकमेकांचा हात धरून हळूहळू जपून एकेक पाऊल टाकताना अजून ४०-४५ वर्षांनी साध्या रस्त्यावर सुद्धा आपण असेच चालू ना? :) असं म्हणत म्हणत आम्ही पुढे जात होतो. आमच्या आसपासच काही माणसे बर्फावर मजेत हॉकी खेळत होती. काही आई-बाबा आपल्या लहानग्यांना घेऊन आले होते. त्यांची छोटी छोटी मुले आईच्या हाताला धरून 'एक पाय नाचव रे गोविंदा' अश्या तालावर चालत होती. तर थोड्या मोठ्या मुलांना आई-बाबांचा हात सोडून एकट्यानेच चालायचे होते. मग ती २-३ पावलं टाकत होती, मग पडत होती, परत उठत होती.. असे त्यांचे मजेत चालले होते. काही माणसे आपले स्केटींगचे बुट घालून जोरजोरात इकडून-तिकडे स्केटींग करत होती, तर काहींनी आपल्या टॉमी, कोको, आणि डेझीलाही फिरायला आणले होते. एवढंच नाही तर आमच्या पलिकडून २ कॉलेजवयीन मुली चक्क आपली सायकल हातात घेऊन गप्पा मारत चालत गेल्या.
गेला जवळजवळ अर्धा तास आम्ही बर्फावरच होतो. आता मात्र पायाची बोटे आणि नखं दुखायला लागली. बाहेर पडावेसे वाटत होते. असेच अजून ५ -१० मिनिटे चालत किनार्यापाशी आलो. पायर्यांवरून चढून वरती आलो तरी पायात काही संवेदनाच नव्हत्या. आपण अजूनही बर्फावरच आहोत की काय असे वाटत होते. आता खरी गरज होती ती गरमागरम चहा प्यायची. आम्ही घरूनच जातानाच थर्मासमध्ये आम्हा चौघांसाठी चहा नेला होता. अहाहा.. तिथल्या काठावर उभे राहून आजुबाजूची मजा बघत वाफाळता चहा पिण्याची मजा औरच होती. आणि इथली लोकं रस्त्याच्या कडेला असणार्या चहाच्या टपरीशिवाय कशीकाय राहू शकतात असे प्रकर्षाने वाटून गेले. आता मात्र कधी एकदा घराच्या उबेत जातोय असं झालं होतं. भयानक थंडी वाजत होती. हाता पायाची बोटं अगदी दुखून आली होती. बसथांब्यावर आलो तर बसला यायला अजून १० मिनिटे अवकाश होता. बापरे.. अक्षरश: एकेक मिनिट जाता जात नव्हतं. गप्पाही मारवत नव्हत्या. अंगात अगदी हुडहुडी भरली होती. आता अजून फक्त २ मिनिटं, १ मिनिट अस करत करत बस आली एकदाची. बसमधली उबदार हवा अगदी हवाहवीशी वाटत होती.
--शाल्मली.
प्रतिक्रिया
19 Jan 2009 - 1:29 am | प्राजु
खरंच हे गोठलेलं पाणी खूप सुंदर दिसतं. कनेक्टीकट रिव्हरही मस्त दिसते एकदम. पण इथे कोणाला खेळताना नाही पाहिले त्या गोठलेल्या नदिवर.
थंडीने तर इथे कहरच केला आहे. आज सकाळी सुद्धा स्नो झालं. आता खरंतर बर्फाचा कंटाळा आला आहे. पण तरीही जेव्हा स्नो पडत असतं तेव्हा त्या हिमपाकळ्या (मीनल कडून साभार)सुरेख दिसतात.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
19 Jan 2009 - 4:48 am | मदनबाण
मस्त फोटो आणि वर्णन...
मदनबाण.....
"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."
- Indian Armed Forces -
19 Jan 2009 - 5:10 am | रेवती
सगळे फोटू मस्त आलेत.
वर्णन छान केले आहेस. मलाही लगेच थंडी वाजायला लागली.
प्राजू म्हणते ते बरोबर आहे. आज सकाळी आमच्याकडे अर्धा फूट तरी बर्फं झालं असावं.
रेवती
19 Jan 2009 - 11:05 pm | छोटा डॉन
असेच म्हणतो.
मस्त जमला आहे हा लेख, अगदी तिकडे बर्फात हुंदाडुन आल्यासारखे वाटले, शिवाय "साल्झबुर्गच्या आठवणी" जाग्या झाल्या ते वेगळेच. फोटोही अगदी क्लास आहेत.
येऊ द्या अजुन असेच "थंडी स्पेशल" लेख ...!
बाय द वे, तुझा हा तिकडचा पहिलाच बर्फोत्सव ना ?
मग अजुनच धमाल ..!
मी काय काय मिस करतो आहे ह्याची हळुहळु कल्पना येते आहे.
असो.
अवांतर :
+१, असेच म्हणतो.
आज सकाळी आमच्याकडे अशी थंडी पडाली होती की कमीत कमी "अर्धा लिटर तरी घाम" निघाला असेल.
असो, ते काय जास्त महत्वाचे नाही.
------
छोटा डॉन
19 Jan 2009 - 6:30 am | विसोबा खेचर
लै भारी वर्णन! गोठलेले सरोवर मस्तच..
येऊ द्या अजून असेच काही मजेशीर..
आपला,
(गारठलेला) तात्या.
19 Jan 2009 - 7:11 am | सहज
गोठलेल्या तळ्याचे फोटो, वर्णन मस्त
>इथली लोकं रस्त्याच्या कडेला असणार्या चहाच्या टपरीशिवाय कशीकाय राहू शकतात असे प्रकर्षाने वाटून गेले.
:-)
19 Jan 2009 - 6:37 pm | केशवसुमार
सुंदर फोटो आणि वर्णन ही..
हे तेच तळ आहे का? जिथे आपण काळा राजहंस बघितला होता?
केशवसुमार
21 Jan 2009 - 8:25 pm | शाल्मली
हो.. ते तेच तळं आहे काळ्या राजहंसाचं!
आणि सध्या पाणी गोठल्यामुळे त्याला म्युन्स्टरच्या प्राणी संग्रहालयात ठेवले आहे. अशी इथल्या वर्तमानपत्रात आलेली बातमी वाचली मी.. :)
--शाल्मली.
19 Jan 2009 - 7:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गोठलेल्या सरोवराचे फोटो आणि वर्णनही झकास !
-दिलीप बिरुटे
19 Jan 2009 - 7:09 pm | बिपिन कार्यकर्ते
वा!! वा!! काय मजा आली असेल ना? बर्फावर चालणे म्हणजे मस्तच.
बिपिन कार्यकर्ते
19 Jan 2009 - 7:29 pm | आपला अभिजित
गोठलेले सरोवर झकासच!
इथे आम्ही फक्त गोठलेल्या रक्ताच्या माणसांचा सामना करतो. असो.
बाकी, त्या बर्फावरून कुत्रीबित्री फिरवायची हौस म्हणजे पुणेकरांच्या वर ताण दिसतेय!
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत ३ वर्षांपूर्वी मध्यरात्री दंगल झाली, तेव्हाही पहाटे तिथेच कुत्रे फिरवायला आणणारे महाभागही पाहिले आहेत! इथे एवढे रामायण झाले आहे, याचे त्यांना सोयर-सुतकही नव्हते!!
19 Jan 2009 - 11:13 pm | चतुरंग
काचेसारख्या पृष्ठभागावरुन चालताना मजा येते सरास्सर घसरते. थंडीने गारठून जायला होते. वर्णनही छान केले आहे.
आमच्याकडेही मागल्या आठवड्यात गुरुवारी-शुक्रवारी रात्री -२२ सें तपमान होतं!
:( घराच्या आत असतानाही नळाच्या पाण्यात हात घातला की बोटं बधीर व्हायची!
आमच्या जवळच दोन तलाव आहेत आणि दोन्ही आता गोठलेत एकावर कालपरवाच मुले खेळताना बघितली. चक्कर टाकायला हवी पुन्हा.
चतुरंग
19 Jan 2009 - 11:24 pm | छोटा डॉन
>>आमच्याकडेही मागल्या आठवड्यात गुरुवारी-शुक्रवारी रात्री -२२ सें तपमान होतं!
आयला काय सांगताय रंगाशेठ ?
अहो ही तर "क्रायोजेनीक" का काय म्हणातात ती रेंज झाली की, अशक्य थंडी आहे बॉ ...
बाकी ते परिमाण "डिग्री सेंटीग्रेड आहे की फॅरेनहाईट " ???
-२२ सें म्हणजे लै लै लै कमी झाले हो, चुक काढत नाही तुमची पण एवढ्या "भयाण थंडीची" कल्पना करु पाहतोय ..!
------
( गारठलेला ) छोटा डॉन
19 Jan 2009 - 11:21 pm | यशोधरा
शाल्मली, लेख आवडला. फोटोही एकदम झकास आले आहेत!
20 Jan 2009 - 12:08 am | मुक्तचमचा
फार आवडले. आणखी काय बोलू?
तळ्यावरील गोठलेले जल तरंग बघुन माझ्या मनातील शब्दच गोठून गेले.
--
बंध मी आहे तरीही, मुक्त झालो आज मी!
21 Jan 2009 - 10:22 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
छान वर्णन आणि फोटोही मस्तच! शाल्मली, मलाही असल्या थंडीत लोकांना गरमागरम चहा प्यावासा वाटत नाही का असाच प्रश्न पडायचा!
अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
22 Jan 2009 - 3:59 pm | शाल्मली
सर्व वाचकांचे मनापासून आभार!
:)
--शाल्मली.