===================================================================
ऊड ऊड रे प्लोव्हू... ३०,००० किमीची फेरी मारून येऊ ! :
०१ : प्लोव्हरची महाभरारी... ०२ : महाभरार्यांबद्दल थोडेसे...
०३ : प्रवासी पक्षांची दिशादर्शक प्रणाली... ०४ : डोळे हे चुंबकीय गडे !...
०५ : बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात... ०६ : चिमुकल्या साँगबर्डचे नाव छोटे, लक्षण मोठे...
===================================================================
थोडक्यात, दर वर्षाच्या प्रवासात बदलत जाणार्या गरजांप्रमाणे स्वतःच बदलणारे (auto-modifying to suit the changing needs during the perennial travel) व वर्षानुवर्षे पुनर्वापर शक्य असणारे (reusable over years) असे हे डिझाईन मानवाने बनवलेल्या कोणत्याही डिझाईनपेक्षा फार फार उच्च दर्जाचे आहे. मुख्य म्हणजे हे नैसर्गिक डिझाईन आपले सर्व काम कमीत कमी संसाधनात, निसर्गात उपलब्ध होणारा कच्चा माल वापरून व कोणत्याही यांत्रिक साधनांशिवाय साधले जाते. डिझाइनिंगची ही अत्युच्च्य पातळी गाठण्यासाठी मानवाला अजून खूप वेळ लागेल !
लीन मीन लाँग डिस्टन्स फ्लाईंग मशीन
गेल्या भागात आपण सागरप्रवासी पक्षांची शरीरे महाभरार्यांसाठी अत्युत्तम डिझाईन्स असतात याचे अनेक पुरावे पाहिले. त्यापैकी प्लोव्हर्समधे असलेली काही वैशिष्ट्ये खालील चित्रात दिसतील...
१. वजन आणि पट्टीची खव्वयेगिरी : मूळ कमी वजन आणि अधाश्यासारखे खात ते काही दिवसांतच जवळ जवळ दुप्पट करण्याची शारिरीक क्षमता. प्लोव्हरचे सर्वसाधारण वजन १०५ ते ११० ग्रॅम असते भरारीपूर्वी ते २०० ग्रॅमपर्यंत वाढलेले असते.
२. पंखाचा पसारा : या पक्षाचे पंख पूर्ण पसरल्यावर त्यांची लांबी ५१ सेमी होते.
३. अप्रतिम उड्डाणपट्टू : १० दिवसांत विनाथांबा १०,००० किमी उडून जाण्याची क्षमता !
४. तीव्र ज्ञानेंद्रिये : पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र, पृथ्वीच्या पोटातील हालचालींची गुरगुर आणि सागराच्या लहरींचे आवाज यांचा समन्वय साधून प्रवासी नकाशा बनवण्याची क्षमता
...आणि मानवाला अजून न समजलेले बरेच काही.
.
प्रवासी पक्षांची दिशादर्शक प्रणाली
जमिनीवरून भरारणाऱ्या पक्षांना वाटेवर अनेक ठिकाणी त्यांच्या सोईने उतरून विश्रांती व अन्न घेता येते. त्यामुळे त्यांना शरिरात मोठ्या प्रमाणात उर्जा साठवून ठेवण्याची गरज भासत नाही. त्याचबरोबर, दीर्घ कालावधितही न बदलणाऱ्या पर्वतराजी, दऱ्याखोऱ्या, नद्या, जंगले, इत्यादीं जमिनीवरच्या असंख्य खाणाखूणांची वाट शोधण्यास मदत होते.
विनाथांबा महाभराऱ्या मारणाऱ्या सागरप्रवासी पक्षांमध्ये अचाट शारीरिक क्षमतेच्या प्रणाली असणे गरजेचे असते व ते कसे साधले जाते त्याचा उहापोह यापूर्वी आपण केला आहे. पण विनाथांबा महाभराऱ्या मारण्यासाठी तेवढेच पुरेसे नाही. महासागरांवरून विनाथांबा भरारी मारताना 'वर आकाश आणि खाली समुद्राच्या लाटा' हाच न बदलणारा नजारा अनेक तास किंवा अनेक दिवस दिसत असतो. महासागरात एकमेकापासून अनेक शे अथवा हजारो किलोमीटर दूरवर असलेल्या बेटांशिवाय इतर काहीही खाणाखुणा नसतात. असे असूनही, सागरप्रवासी पक्षी आपल्या गंतव्यावर अचूकपणे कसे पोहोचतात, हा प्रश्न शास्त्रज्ञांना फार काळापासून छळत आहे. काही तार्किक अथवा अर्धशास्त्रिय आडाखे सोडले तर आजही हा प्रश्न बहुदा अनुत्तरीतच राहिला आहे.
मानवाच्या आकलनशक्तीपलिकडील कोणती प्रणाली वापरून हे पक्षी, कोणत्याही दृश्य खुणांविना, त्यांच्या महासफ़री अचूकपणे पुऱ्या करू शकतात ? ही प्रणाली मानवाला सापडली तर मानवी दळणवळणात क्रांती घडून येईल हे नक्की ! अर्थातच, हे गुपीत शोधून काढायला शास्त्रज्ञ कंबर कसून प्रयत्न करत नसते तरच आश्चर्य होते ! या दिशेने झालेल्या प्रयत्नांत अनेक रोचक प्रसंग घडलेले आहेत. त्यातून काही मजेशीर कहाण्या तर काही अत्यंत उपयोगी निष्कर्श मिळालेले आहेत.
रॉयल पिजन रेसिंग असोशियनची स्मॅश :
आपले मूळ ठिकाण शोधून काढण्याच्या कबुतरांच्या क्षमतेचा उपयोग मानवाने गेली अनेक शतके केला आहे. संदेशवाहक कबुतरांच्या (homing pigeons) स्पर्धांना स्मॅश असे म्हणतात. अश्या एका स्पर्धेतील दुर्घटनेमुळे एक खास संशोधन पुढे आले. २९ जून १९९७ रोजी ब्रिटनच्या रॉयल पिजन रेसिंग असोशियनने त्यांची शतकपूर्ती साजरी करण्यासाठी एक स्पर्धा (स्मॅश) आयोजित केली. सकाळी ६:३० ला सुरू झालेल्या त्या स्पर्धेत फ्रान्समधे सोडलेली ६०,००० कबुतरे ८०० किमीचे अंतर पार करून इंग्लिश खाडीवरून प्रवास करून इंग्लंडमधिल त्यांच्या घरांत परतणे अपेक्षित होते. त्यातली सर्वात जलद कबुतरे त्याच दिवशी उशीरा दुपारपर्यंत पोहोचतील अशी अटकळ होती. उशीरा सकाळपर्यंत सर्व आलबेल होते आणि कबुतरे इंग्लिश खाडीच्या दिशेने मार्गक्रमण करत होती. नंतर काही घडले आणि एकही कबुतर त्या दिवशी घरी परतले नाही. पुढच्या काही दिवसात काही हजार कबुतरे घरी परतली पण काही दशसहस्त्र कधीच परतली नाही ! अश्याप्रकारच्या स्पर्धेसाठी हे मोठे आणि अनाकलनिय अपयश होते !!
या घटनेला एक वर्ष लोटून गेल्यावर जोनाथन हॅगस्ट्रुम या नावाच्या कबुतरबाजीत रस असलेल्या भूगर्भशास्त्रज्ञाच्या नजरेस ही कहाणी पडली. त्याला एक कल्पना सुचली. त्याने स्पर्धेच्या वेळेस झालेल्या सर्व स्थानिक विमानउड्डाणांचे वेळापत्रक ताडून पाहिले... आणि त्याचा संशय खरा ठरला ! त्या दिवशी पॅरीसच्या विमानतळावरून उडालेल्या एका काँकॉर्ड विमानाने स्पर्धेच्या मार्गावरून प्रवास केला होता.
प्रवासी पक्षी आपल्या प्रवासासाठी वातावरणातल्या मानवी कानाला ऐकू येणार्या आवाजापेक्षा कमी तरंगलांबीच्या आवाजावरून एक प्रवासी नकाशा (infrasonic map) बनवतात अशी तेव्हापर्यंत एक अटकळ होती, पण तिला सबळ पुरावे नव्हते. आवाजाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने प्रवास करणारे काँकॉर्ड हे विमान आवाजाच्या वेगाची सीमा पार करते तेव्हा एक प्रचंड आवाज (सोनिक बूम, sonic boom) होतो. हॅगस्ट्रुमच्या मते, sonic boom मुळे पक्षांचा infrasonic map बिघडून किंवा नष्ट होऊन ते मार्गभ्रष्ट झाले होते. त्याचे हे संशोधन २००० साली Journal of Experimental Biology मधे प्रसिद्ध झाले आहे.
पक्षांचे दिशादर्शक यंत्र (होकायंत्र) :
कोणत्याही हवाई प्रवासासाठी दिशादर्शक यंत्र आवश्यक असते हे सांगायला नकोच. याकरिता पक्षी अनेक प्रणाल्या वापरतात :
अ) दिवसा सूर्याचे स्थान व रात्री तार्यांची स्थाने.
आ) पृथ्वीचे चुंबकिय क्षेत्र : यासाठी पक्षांच्या शरिरात अजूनपर्यंत नीट माहित न झालेले संवेदक (सेन्सॉर्स) असतात असा अंदाज आहे. ते केवळ उत्तर-दक्षिण असे चुंबकिय क्षेत्रच नाही तर त्या क्षेत्रामधे होणारे बदलांचीही नोंद घेऊन एक नकाशा बनवतात.
इ) गंध : वाटेवरच्या वृक्षांचे वास आणि शहरी वस्त्यांवरच्या धुरांचे वास पक्षाच्या मेंदूतील नकाशात महत्वाचे बिंदू असतात.
सागरावरच्या महाभरारीतील समस्या अशी आहे की, (अ) सूर्य आणि तारे ढगाळ वातावरणात दिसत नाहीत; (आ) समुद्रावर झाडाचे अथवा वस्त्यांचे वास नसतात; आणि (इ) महासागरांवर सतत होणार्या बदलांमुळे पृथ्वीच्या चुंबकिय क्षेत्रांचा खात्रीलायक नकाशा मिळविणे शक्य होत नाही. मग आता काय ?!
ई) हॅगस्ट्रुमच्या मते सागरप्रवासी पक्षी भूगर्भातील हालचालींमुळे तयार होणारे कमी तरंगलहरीचे आवाज (पृथ्वीच्या पोटातली गुरगुर) आणि समुद्रलहरींचे आवाज ऐकून आपल्या प्रवासाचा नकाशा बनवतात... या आवाजांना त्याने infrasounds असे नाव दिले आहे आणि त्यांच्या नकाशाला soundscape व song of the sea !
उ) व्यापारी वारे : सागरप्रवासी पक्षी वार्याचे खास जाणकार असतात. प्रवासाची भरारी घेण्यापूर्वी ते अनेकदा किनार्याच्या जवळपास भरार्या घेऊन वार्याची चाचपणी करत राहतात व किनार्यावर परततात. योग्य जोर व दिशा असलेला वारा असल्याशिवाय ते आपली सफर सुरू करत नाहीत असे आढळून आले आहे. पक्षांच्या नंतर अनेक हजार वर्षांनी (कदाचित पक्षांचे निरिक्षण करून) मानवाने या वार्यांच्या झोतांचा आपल्या जलप्रवासासाठी उपयोग करणे सुरू केला आहे... जुन्या काळात शिडांच्या बोटी त्यांचा उपयोग मुख्यतः दूरदेशीच्या व्यापारासाठी करत असत. म्हणून या वार्यांना "व्यापारी वारे" असे नाव पडले आहे. दिशादर्शनाबरोबरच या वार्यांची पक्षांना भरारीत मदत होऊन श्रम व उर्जेची बचत हे फार महत्वाचे फायदेही होतात ! "पक्षांना वाहून नेणारे कन्व्हेयर बेल्ट्स" असे या वार्यांना संबोधणे गमतीचे वाटले तरी ते नक्कीच समर्पक आहे.
सागरप्रवासी पक्षांचे भवितव्य काय ?
हे पक्षी कणखर आहेत व त्यांच्या प्रणाली खूपच विकसित आहेत. परंतू, प्रणाली जेवढी जास्त विकसित होत जाते तेवढा वातावरणातील छोट्या छोट्या फरकाने तिचा तोल जाण्याचा संभव वाढत जातो. या पक्षांची प्रवासी जीवनशैली आधीच त्यांच्या शारिरीक ताकदीची परिसीमा पाहते आहे. त्यातच, दुर्दैवाने, मानवी हस्तक्षेपाने आणि इतर कारणांनी बदलणारे पर्यावरण त्यांच्या समस्यांत भर टाकत आहे. या समस्या सागरप्रवासी पक्षांपुढे अनेक महत्वाची आव्हाने उभी करत आहेत:
१) भरारीला मदत करणार्या वार्यांच्या ताकदीत व दिशेत होणारे बदल : हे बदल पक्षांना आपल्या गंतव्याकडे जाण्यात अडथळे उभे करू शकतात, जे त्यांच्या जीवावर बेतू शकतात.
२) मार्गातील थांब्यांच्या जागांमधे व प्रजननाच्या जागेमधे होणारे बदल : हे बदल पक्षांच्या अन्नपुरवठ्यामधे आणि प्रजननामधे अडथळे उभे करू शकतात. सागकिनार्याच्या उथळ, दलदलीच्या जागा जगभर फार वेगाने नष्ट होत आहेत व त्याचे पक्षांवर दुष्परिणाम होताना दिसत आहेत. क्रमांक ९७ च्या मार्गाने प्लोव्हर्सबरोबर इतर अनेक जाती-प्रजातीचेही पक्षी मार्गक्रमण करतात. हा परतीचा मार्ग चीन व कोरिया यांच्यामधील पीतसमुद्राच्या किनारपट्टीवर असलेल्या यालू नदीच्या त्रिभुज प्रदेशावरून जातो. या त्रिभूज प्रदेशातील केवळ १८०,००० हेक्टर आकाराच्या एका जागेवर या मार्गावरचे ४०% पक्षी थांबतात. या जागेवर असणार्या छोटया सागरी जीवांत व कीटकांत पक्ष्यांना त्यांच्या प्रजननाच्या जागेपर्यंत पोहोचविणार्या भरारीसाठी आवश्यक अन्न असते. ते न मिळाल्यास, विणीच्या जागी योग्य वेळेवर पोहोचून नवीन पिढी निर्माण करण्यास पक्षी असमर्थ होतील. यावरून, केवळ एक थांबा नष्ट झाला तरी त्याचा या पक्षांवर किती घातक परिणाम होईल याची कल्पना येईल. चीन व कोरियातील जलद विकासकामांमुळे या त्रिभूज प्रदेशावर होणारे दुष्परिणाम याआधीच दिसू लागले आहेत. तथाकथित विकासाच्या नावाखाली दलदलीच्या जागांवर आक्रमण करून तेथे काँक्रिट्ची जंगले उभी राहणे सर्व जगभरच होत आहे. अनेक आंतरराष्ट्रिय करार होत असतानाही जगभरात गेल्या ५० वर्षांत समुद्रकिनार्यांवरची ६५% दलदलीची ठिकाणे नष्ट झाली आहेत आणि हा वेग दरवर्षी वाढत चालला आहे.
३) वातावरणांतल्या बदलाने निर्माण होणारी वादळे : या वादळांची वारंवारता आणि ताकद दर वर्षी वाढत चालली आहे. मार्गातील वादळे या पक्षांना त्यांच्या मार्गापासून दूरवर अनोळखी व खडतर जागेकडे भरकटवू शकतात; आपल्या फटकार्याने जीव घेऊ शकतात; किंवा क्रमांक ९७ च्या सफरीप्रमाणे मार्गात बदल करायला लावून पक्षाच्या अंगात साठवलेल्या उर्जेचा अपव्यय करू शकतात. हा शेवटचा पर्याय वाटतो तितका साधा नाही. कारण थांब्यावर उशीरा पोहोचणार्या पक्षाची नेहमीची खाण्याची किंवा विणीची जागा दुसरा कोणी पक्षी अगोदरच बळकावून ठेवण्याची शक्यता असते. हे त्या पक्षासाठी घातक ठरू शकते. सन २०१५ मधे नोममधे पोचलेला 'क्रमांक ९७' जॉन्सनला नेहमीच्या जागेवर नजरेस पडला नाही, त्याचे हे शेवटचे कारण असावे असा जॉन्सनचा अंदाज आहे.
हे सर्व बदल पक्षांसाठी आणि शास्त्रज्ञांसाठी दु:खद व चिंताजनक आहेत. पक्षांना या सर्व घडामोडींत आवाज नाही आणि शास्त्रज्ञांच्या आवाजाकडे पुरेसे ल़क्ष दिले जात नाही. तरीसुद्धा शास्त्रज्ञ आपल्यापरीने जे करणे शक्य आहे, ते करतच आहेत... ते म्हणजे अधिकाधिक माहिती गोळा करणे, तिचे निष्कर्ष लोकांपर्यंत पोहोचवणे आणि त्या पुराव्यांच्या दबावाने शक्य तितका योग्य परिणाम साधण्याचा प्रयत्न करणे.
२०१५ मधे जॉन्सनने एका नवीन प्लोव्हरवर जिओलोकेटर बसवला आणि त्याला त्याच्या सफरीवर सोडून दिले दिले... जिओलोकेटरच्या तरंगलांबीवरून या नवीन उड्डाणपटूचे नामकरण झाले आहे "क्रमांक ३६".
(क्रमश : )
===================================================================
मुख्य संदर्भ :
१. https://en.wikipedia.org/wiki/Plover
२. https://www.allaboutbirds.org/guide/Wilsons_Plover/id
३. https://cosmosmagazine.com/life-sciences/epic-journeys-plover
===================================================================
उड उड रे प्लोव्हू... ३०,००० किमीची फेरी मारून येऊ ! :
०१ : प्लोव्हरची महाभरारी... ०२ : महाभरार्यांबद्दल थोडेसे...
०३ : प्रवासी पक्षांची दिशादर्शक प्रणाली... ०४ : डोळे हे चुंबकीय गडे !...
०५ : बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात... ०६ : चिमुकल्या साँगबर्डचे नाव छोटे, लक्षण मोठे...
===================================================================
लेखमालेतील सर्व फोटो लेखाखाली दिलेल्या यादीत उर्धृत केलेल्या जालावरील संदर्भलेखांतून
किंवा इतर जालस्त्रोतांवरून घेतलेले आहेत.
===================================================================
प्रतिक्रिया
26 Apr 2016 - 8:16 am | श्रीरंग_जोशी
नेहमीप्रमाणेच हा भाग देखील उत्तम माहितीने भरलेला आहे.
मानवाखेरीज इतर प्राण्यांकडे असणार्या उत्कृष्ट नैसर्गिक कौशल्यांचे उत्तम उदाहरण या लेखात वाचायला मिळाले.
26 Apr 2016 - 8:42 am | मार्मिक गोडसे
जनजागृतीचे हेच सर्वात कठीण काम वाटते.
26 Apr 2016 - 2:44 pm | एस
+१.
26 Apr 2016 - 9:08 am | चौकटराजा
मानवी डोळा कान नाक इ. इन्द्रियांच्या संवेदनेचा आवाका किती मर्यादित आहे हे वरील लेखावरून दिससून येईल. आपले नाक हे सर्वात लवकर शरण जाणारे इन्द्रिय आहे असे वाचले आहे.कुत्र्याना अनेक प्रकारचे वासांचे संवेदन प्राप्त झालेले असते हे आपल्याला पोलीसी शोधामुळे माहीत आहे पण जे पशु पक्षी मासे आपल्यासारखी संपन्न भाषा अवगत नसतानाही एकमेकांशी कसे संवाद साधतात व परिसराला कसे वाचतात हे सारे विस्मयकारक आहे.
26 Apr 2016 - 1:34 pm | जगप्रवासी
उत्तम लेख
26 Apr 2016 - 1:58 pm | पैसा
खूप माहितीपूर्ण लेख. इवल्याशा पक्षांना असलेले धोके आणि तरी केवळ नैसर्गिक प्रेरणेने त्यानी वर्षानुवर्षे उडत रहाणे हे वाचून गलबलून आले. मानवी अतिक्रमणांमुळे आणि हस्तक्षेपामुळे किती पक्षी मेले असतील आणि किती जाती प्रजाती नाहिशा झाल्या असतील याचा हिशेब नाही. समुद्रपक्ष्यांच्या भरार्यांबद्दल एका ठिकाणी वाचले होते. तेव्हा म्हातारे झालेले कित्येक पक्षी दूरवर स्थलांतर करताना उडताना ताकद संपून समुद्रात पडून मरतात हे वाचून असेच वाईट वाटले होते.
27 Apr 2016 - 12:33 pm | डॉ सुहास म्हात्रे
सर्व प्रतिसादकांना व वाचकांना धन्यवाद !
27 Apr 2016 - 12:59 pm | राजेंद्र मेहेंदळे
अधाशासारखे एका दमात तिन्ही लेख वाचुन काढले. या ईवल्याश्या पक्ष्यांच्या ताकदीने थक्क झालो. अशी माहिती सोप्या शब्दात आम्हा वाचकांपर्यंत पोचवण्याबद्दल डॉ.साहेबांचे आभार!!
27 Apr 2016 - 4:48 pm | प्रमोद देर्देकर
हेच म्हणतो. काका तुम्च्या व्यासंगाला सलाम. एका नविन माहितीचा खजिना दिलात. माझ्या मुलाला दोन भागात काय झाले ते सांगितले आहे आता हा भाग पण सांगतो. त्याला आवड आहे.
27 Apr 2016 - 5:43 pm | आदिजोशी
सगळे लेख एका मागोमाग वाचून काढले. भन्नाट लेखमाला.
27 Apr 2016 - 2:39 pm | पद्मावति
उत्तम लेख!
27 Apr 2016 - 5:15 pm | नाखु
माहीती आणि निसर्गदत्त शक्तींचा मानवापेक्षा इतर प्राणीच जास्त विधायक आणि (किमान्)उपद्रवी करतात हेच वारंवार दिसून आले आहे..
सर्प स्वतःहोऊन तुमच्या वाटेला जात नाही पण माणुस त्याला शोधून मारल्या/त्रास दिल्याखेरीज गप्प बसत नाही
27 Apr 2016 - 6:25 pm | jo_s
खूप छान माहिती पुर्ण लेख
धन्यवाद
13 May 2016 - 12:57 pm | चिगो
जबराट लेखमाला, डॉक्टरसाहेब..
ह्या मथळ्याखाली दिलेल्या माहितीवरून ह्या पक्ष्यांच्या भवितव्याची प्रचंड चिंता वाटते आहे, कारण की माणसाची हाव असीमित आहे..