===================================================================
ऊड ऊड रे प्लोव्हू... ३०,००० किमीची फेरी मारून येऊ ! :
०१ : प्लोव्हरची महाभरारी... ०२ : महाभरार्यांबद्दल थोडेसे...
०३ : प्रवासी पक्षांची दिशादर्शक प्रणाली... ०४ : डोळे हे चुंबकीय गडे !...
०५ : बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात... ०६ : चिमुकल्या साँगबर्डचे नाव छोटे, लक्षण मोठे...
===================================================================
मर्यादीत नैसर्गिक शरीरसाधने वापरून छोटे छोटे प्रवासी पक्षी मोठमोठी अंतरे काटतात. यामागची शास्त्रिय कारणे शोधून काढण्यावर शास्त्रज्ञांनी लक्ष केंद्रीत केले आहे... आणि मानवाच्या मर्यादांची क्षितीजे विस्तारायला त्या ज्ञानाचा कसा उपयोग होईल, यावरही !
त्यावर आपण पुढच्या भागांत विचार करु.
सद्या ८० वय असलेल्या वॉली जॉन्सनने मिनेसोटा (युएसए) येथिल मूरहेड स्टेट युनिव्हर्सिटीत प्रोफेसर असताना प्लोव्हर्सचा अभ्यास करायला सुरुवात केली. मायक्रोनेशियातील मार्शल बेटावर काम करत असताना त्याने पहिला प्लोव्हर पाहिला आणि तो त्याच्या प्रेमात पडला. जॉन्सनच्या अगोदर या पक्षाबद्दल कोणी फारसे संशोधन केले नव्हते. पेशाने physiologist व histologist असल्याने शरिरसंस्थांच्या आणि त्यातल्या पेशींच्या कार्यप्रणाली हा त्याचा अभ्यासाचा भाग आहे. अर्थातच प्लोव्हरसारख्या सतत प्रवास करणार्या पक्षांमधे हे काम कसे होते याबाबत कुतुहल असणे हे नैसर्गिक होते. मात्र प्लोव्हरमधला त्याचा रस जसजसा वाढू लागला तसतसा त्याचे लक्ष प्लोवरच्या प्रवासांवर व प्रवासी जीवनपद्धतीवर केंद्रित होत गेले. जॉन्सन २० वर्षांपूर्वी विद्यापिठातून निवृत्त झाल्यावरही त्याने प्लोव्हरवरचे संशोधन थांबवले नाही. ते का ? याचे जॉन्सनच्या शब्दांतले कारण आहे, "ते मला शक्य नाही (I can’t) !" असे हे दुर्मिळ वेड !!
प्लोव्हर प्रवासी आहे हे नक्की पण त्याची जीवनपद्धती व त्याचा प्रवासमार्ग याबाबत तशी फारशी माहिती नव्हती. अतीउत्तरेला प्रजनन करणारे हे पक्षी काही काळ दृष्टीआड होऊन हजारो किमी दूरवर परत दिसायला लागतात, इतकीच त्रोटक माहिती होती. इतक्या दूर ते कसे आणि कोणत्या मार्गाने जातात हा प्रश्न जॉन्सनला सतावत होता. म्हणूनच, जॉन्सनचा क्रमांक ९७ च्या सहाय्याने केलेला प्रकल्प याबाबतीत एक मोठे पाऊल समजले जाते.
अनेक मोठे प्राणी, मासे, फुलपाखरे आणि पक्षी अन्नासाठी व प्रजननासाठी ऋतुमानाप्रमाणे करत असलेले अनेक हजार किमीचे वार्षिक प्रवास ही काही फार नवीन गोष्ट नाही. तसे असले तरीही समुद्रकिनारी पक्ष्यांचा आकार पाहता, ते करत असलेले प्रवास त्यांच्या शारिरीक ताकदीच्या सीमा कल्पनातीतपणे ताणणारे असतात.
या पक्षांबद्दल अनेक प्रश्न शात्रज्ञांच्या मनात आहेत, त्यापैकी काही असे :
१. असा शरीराला प्रचंड ताण देणारे प्रवास दरवर्षी का केले जातात ?
२. या प्रवासांची सवय का व कशी विकसित झाली ?
३. लांबच्या प्रवासासाठी आवश्यक ते शारिरीक बदल कसे विकसित झाले ?
४. लांबच्या प्रवासासाठी लागणारे तंत्र कसे विकसित झाले ?
३. अन्नासाठी दरवर्षी हजारो किमी दूर जाण्याऐवजी मुबलक अन्न उपलब्ध असलेल्या जागेच्या जवळपासच्या सोईच्या जागा पाहून तेथेच कायमची वस्ती व प्रजनन का केले जात नाही ?
यापैकी एक किंवा अनेक गोष्टींसाठी आवश्यक ते शारिरीक बदल क्रमाने न होता वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांमधे वेगवेगळ्या वेळी आणि/किंवा वेगवेगळ्या क्रमाने झालेले दिसतात. अर्थातच, हे प्रकरण वरवर वाटते तितके सरळ सोपे नाही.
ज्या ज्या जागांवर प्लोव्हर दिसतो त्यांच्या भौगोलिक स्थानांवरून तो खूप मोठे अंतर न थांबता उडत जात असावा असा प्राथमिक अंदाज होता. खुद्द जॉन्सनच्या आकडेमोडीप्रमाणे हे अंतर ९,२०० किमी इतके मोठे असू शकते. असे अनेक परिस्थितीजन्य पुरावे असले तरी त्या अंदाजांना सिद्ध करणारे शास्त्राला मान्य होणारे सबळ पुरावे मिळत नव्हते.
काही काळापूर्वीपर्यंत प्रवासी पक्षांच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी त्यांचे जागोजागी निरिक्षण करणे हेच महत्वाचे तंत्र होते आणि ते बर्यापैकी बेभरवशाचे होते. मात्र, गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञानात झालेल्या विकासामुळे, 'जिओलोकेटर' व 'सॅटेलाईत ट्रान्समिटर' यासारखी "अत्यंत लहान आकाराची आणि अत्यंत कमी वजनाची" साधने निर्माण केली गेली आहेत. ही उपकरणे कोणतीही समस्या न येता छोटे पक्षीही आपल्या अंगावर बाळगू शकतात. उपग्रहांची मदत घेण्याच्या तंत्रामुळे पक्षी दर जागेवर प्रत्यक्ष नजरेस पडण्याची गरज नसते; पक्षांच्या समुद्रावरच्या प्रवासात तर हे शक्यही नसते. पण तरीही, या नवीन तंत्रांमुळे, पक्षाच्या प्रवासातील प्रत्येक स्थल-काल खात्रीलायकरित्या नक्की करणे शक्य होते.
अशी आधुनिक उपकरणे हाती आल्यापासून शास्त्रज्ञांनी काही आश्चर्यकारक निरिक्षणे नोंदवलेली आहेत. त्यातली काही अशी...
* २००७ साली 'बार टेल्ड गॉडविट्' नावाच्या कावळ्यापेक्षा जरा लहान आकाराच्या पक्ष्याच्या शरिरात शल्यक्रिया करून एक सॅटेलाईट ट्रान्समिटर बसवला गेला. या प़क्षाने अलास्का ते न्युझिलँड हे जवळ जवळ १२,००० किमीचे अंतर ९ दिवसांत विनाथांबा पार केले. हा कोणत्याही पक्षाने केलेल्या विनाथांबा प्रवासाचा नोंदला गेलेला विक्रम आहे.
* जॉन्सनच्या निरिक्षणांप्रमाणे अलास्का (युएसए) ते क्विन्सलँड (ऑस्ट्रेलिया) हा ११,००० किमी चा प्रवास अनेक प्लोव्हर पक्षांनी केला आहे.
* प्लोव्हर पक्षांपेक्षा आकाराने खूप लहान असलेला 'शार्प टेल्ड सँडपायपर' पक्षी अल्पवयीन असतानाही अश्याच विनाथांबा महाभरार्या घेताना आढळतो.
* 'रुडी टर्नस्टोन' नावाचा पक्षी उत्तर धृवीय प्रदेश ते ऑस्ट्रेलिया अश्या चकरा नियमितपणे मारतो.
एके काळी अविश्वनिय वाटणार्या या विनाथांबा महाभरार्या अनेक पक्षीजमातींची दरवर्षीची नियमित कृती असल्याचे पुढे येत आहे !
या महाभरार्यांची कल्पना करण्यास खालील नकाशा उपयोगी पडू शकेल...
.
प्रवासी पक्षांमधे दिसून आलेली अजून काही महत्वाची निरिक्षणे खालीलप्रमाणे आहेत :
१. प्रवासातल्या थांब्यांच्या ठिकाणी हे पक्षी अक्षरशः बकासुरासारखे खातात. मोठी भरारी घेण्याआधी गोल्डन प्लोव्हरचे वजन मूळ वजनाच्या दुप्प्टीपर्यंत वाढलेले असते ! 'क्रमांक ९७' चे ११६ ग्रॅम मूळ वजन महाभरारीपूर्वी २०० ग्रँमपर्यंत वाढल्याचे जॉन्सनने नोंदवले आहे.
२. उड्डाणाकरिता लागणार्या जास्त उर्जेबरोबरच उड्डाणासाठी आवश्यक इतर तत्वे मिळावी अश्या अन्नाची निवड फार काळजीपूर्वक केली जाते.
३. उड्डाणापूर्वी आणि उड्डाण चालू असताना शरिरातील अनेक आवश्यक बदल होतात. उदा : सतत समुद्रावरून उडत असल्याने अन्न खाणे शक्य नसते. तेव्हा अनावश्यक असलेली पचनसंस्था त्या काळासाठी आकसून छोटी बनते. यामुळे
कमी होणारे काही ग्रॅमचे वजन मोठ्या उड्डाणांत उपयोगी ठरते. लांब पल्याची क्षेपणास्त्रे आपले काम संपलेले भाग (इंधन संपलेल्या टाक्या, काम संपलेल्या स्टेजेस, इ) टाकून देतात (jettison all excess equipment), असेच काहीसे हे पक्षी करतात असे म्हणायला हरकत नाही ! अँडर्स हेडेनस्ट्र्योम (Anders Hedenström) या शास्त्रज्ञाच्या शब्दांत, "प्रवासी पक्षांची शरीरे “quite close to the ‘optimal design’ for long-distance, non-stop flights" असतात.
थोडक्यात, दर वर्षाच्या प्रवासात बदलत जाणार्या गरजांप्रमाणे स्वतःच बदलणारे (auto-modifying to suit the changing needs during the perennial travel) व वर्षानुवर्षे पुनर्वापर शक्य असणारे (reusable over years) असे हे डिझाईन मानवाने बनवलेल्या कोणत्याही डिझाईनपेक्षा फार फार उच्च दर्जाचे आहे. मुख्य म्हणजे हे नैसर्गिक डिझाईन आपले सर्व काम कमीत कमी संसाधनात, निसर्गात उपलब्ध होणारा कच्चा माल वापरून व कोणत्याही यांत्रिक साधनांशिवाय साधले जाते. डिझाइनिंगची ही अत्युच्च्य पातळी गाठण्यासाठी मानवाला अजून खूप वेळ लागेल !
(क्रमश : )
===================================================================
मुख्य संदर्भ :
१. https://en.wikipedia.org/wiki/Plover
२. https://www.allaboutbirds.org/guide/Wilsons_Plover/id
३. https://cosmosmagazine.com/life-sciences/epic-journeys-plover
===================================================================
उड उड रे प्लोव्हू... ३०,००० किमीची फेरी मारून येऊ ! :
०१ : प्लोव्हरची महाभरारी... ०२ : महाभरार्यांबद्दल थोडेसे...
०३ : प्रवासी पक्षांची दिशादर्शक प्रणाली... ०४ : डोळे हे चुंबकीय गडे !...
०५ : बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात... ०६ : चिमुकल्या साँगबर्डचे नाव छोटे, लक्षण मोठे...
===================================================================
लेखमालेतील सर्व फोटो लेखाखाली दिलेल्या यादीत उर्धृत केलेल्या जालावरील संदर्भलेखांतून
किंवा इतर जालस्त्रोतांवरून घेतलेले आहेत.
===================================================================
प्रतिक्रिया
23 Apr 2016 - 1:24 am | श्रीरंग_जोशी
पहिला भाग वाचून जे प्रश्न मनात येत होते त्यांपैकी बहुतेकांची उत्तरे या भागात मिळाली.
डॉ.वॉली जॉन्सन एकेकाळी आमच्या राज्यात (मिनेसोटा) काम करत होते हे जाणून आनंद झाला. आता ते मोन्टॅना स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये काम करतात असे दिसते.
पुभाप्र.
23 Apr 2016 - 1:33 am | एस
पुभाप्र.
23 Apr 2016 - 9:01 am | कैलासवासी सोन्याबापु
प्रत्येक भाग पहिल्या पेक्षा अद्भुत!!
23 Apr 2016 - 12:32 pm | मार्मिक गोडसे
रोचक विषय व माहीती.
पचनसंस्था आकसल्यामुळे उत्सर्जनही (विष्ठा) थांबत असावे, खाल्लेल्या अन्नातील बिया दूरवर रुजवण्यासाठी ही सुविधा असावी. कारण ह्या पक्षाचा बराचसा प्रवास हा अथांग समुद्रावरून होत असल्यामुळे तेथे बी रुजण्याचा सबंध येत नाही. अर्थात हा पक्षी शाकाहार करत असेल तरच ही शक्यता आहे.
23 Apr 2016 - 1:07 pm | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
१००-२०० ग्रॅम वजनाच्या पक्षाला बिया/विष्ठेचा काही ग्रॅमचा अधिक भार घेऊन जाणे, त्याच्या भरारीला मारक ठरेल.
याउलट, "पचनसंस्था आकसल्यामुळे कमी झालेले काही ग्रॅम वजन" हाच एक महत्वाचा मुद्दा पक्षाला मोठ्या उड्डाणासाठी महत्वाची मदत करतो (reduced un-necessary baggage !). पक्षाचे मुख्य खाणे कीटक हेच असते, ज्यामुळेच कमीतकमी वेळात जास्तीत जास्त आवश्यक इंधन (चरबी) गोळा होणे शक्य होते. अर्थात हे सगळे उत्क्रांतीच्या नियमांप्रमाणे व पक्षांनी त्या दिशेने स्वतः विचारपूर्वक प्रयत्न न करता आपोआप घडलेले आहे... किंवा दुसर्या शब्दांत, बदलत्या पर्यावरणाला उपयोगी सवयी असलेल्या पक्षांच्या जाती-प्रजाती तगून राहिल्या व त्यांची वंशावळ पुढे चालू राहिली; आणि ज्या जाती-प्रजातींमधे तश्या सवयी निर्माण झाल्या नाहीत त्या एकतर नामशेष झाल्या किंवा त्यांनी इतर उपयोगी सवयी (उदा, प्रवास करण्याचे सोडून एकाच जागी राहण्याची सवय, इ) अंगिकारल्यामुळे त्यांचा वंश पुढे चालू राहिला असेल.
वनस्पतींच्या बियांच्या बाबतीत काही विचारपूर्वक करणे हे पक्षांच्या वैचारीक कुवती बाहेरचे आहे. निसर्गातले बदल भौतीक नियमांप्रमाणे घटणार्या घटनांमुळे होतात, निसर्गाकडून केले जात नाहीत. त्यामुळे, बियांच्या संदर्भात पाहिले तर, आकसलेल्या व अकार्यक्षम असलेल्या पचनसंस्थेमुळे तुम्ही वर्तवलेली शक्यता दिसत नाही, पण तरीही तसे काही झाले असल्यास, ते अनवधानाने झालेले उत्क्रांतीचे एक उप-उत्पादन (बायप्रोडक्ट) असेल... पक्षांनी किंवा निसर्गाने तशी काही 'सुविधा केली' असे होणार नाही.
25 Apr 2016 - 11:58 am | मार्मिक गोडसे
धन्यवाद डॉ.
म्हणूनच मी वरील प्रतिसादात म्हटले होते की,अर्थात हा पक्षी शाकाहार करत असेल तरच ही शक्यता आहे. . ज्यायोगे ह्या पक्षाला त्याच्या प्रवासातील थाब्यांच्या ठिकाणी त्याचे 'एनर्जी फूड' मिळू शकेल. परंतू तसला प्रकार नाही हे आपण छानपणे समजावून सांगितले.
वाढलेले वजन व विनाथांबा पार केलेले अंतर ह्याचा हिशोब केल्यास ८० कि.मी. अंतर कापायला अंदाजे १ ग्रॅ. चरबी खर्ची पडते. अर्थात सुरूवातीला पक्षाचे वजन जास्त असताना अधिक चरबी खर्ची पडत असावी. वजन वाढलेले असतानाचा प्लोव्हरचा वेग व प्रवासात वजन कमी झाल्यानंतरचा वेग ह्या वर काही संशोधन झाले आहे का?
25 Apr 2016 - 6:41 pm | डॉ सुहास म्हात्रे
वाढलेले वजन व विनाथांबा पार केलेले अंतर ह्याचा हिशोब केल्यास ८० कि.मी. अंतर कापायला अंदाजे १ ग्रॅ. चरबी खर्ची पडते.
सहमत ! यावरून स्वतःला फायदा न देणारे ३-४ ग्रॅम जास्त वजनही अंगावर बाळगणे मूळ १००-११० ग्रॅम वजन असलेल्या प्लोव्हरला किती धोकादायक असावे याची कल्पना यावी. मुळात प्लोव्हरच्या मूळ वजनावरून अंदाज केला तर पचनसंस्था आकसल्याने साधारण ५-१० ग्रॅमपेक्षा जास्त वजन कमी होत नसावे. पण या छोट्या बदलाने त्याच्या जीवनात इतका फरक पडतो की तो बदल हजारो वर्षांच्या उत्क्रांतीत टिकला आहे आणि मुख्य म्हणजे त्याने प्लोव्हरला टिकून राहण्यास मदत केली आहे !
वजन वाढलेले असतानाचा प्लोव्हरचा वेग व प्रवासात वजन कमी झाल्यानंतरचा वेग ह्या वर काही संशोधन झाले आहे का?
असे काही निरिक्षण प्लोव्हरच्या बाबतीत झाल्याचे माझ्या वाचनात आलेले नाही. पण "अनावश्यक वजन" कमी केल्यास तीच प्रणाली जास्त वेगाने जाऊ शकते आणि / अथवा जास्त अंतर पार करू शकते, हे तर भौतीक शास्त्रातील सत्य आहे. याकरिताच, लांब पल्ल्याची रॉकेट्स आपल्या इंधनाच्या टाक्या व आंतरिक स्टेजेस त्यांचे काम संपले की इजेक्ट करतात.
प्रवासाच्या दर थांब्यावर विशिष्ट पक्षी (उदा : क्रमांक ९७) पकडून त्याचे नोंद व निरिक्षण (वजन, इ) करणे हे अत्यंत कठीण व बेभरवशाचे काम आहे. याच कारणाने, जिओलोकेटर सारख्या उपकरणाने पक्षांच्या उड्डाणांचे मार्ग निश्चित करण्याच्या अभ्यासात क्रांती घडवून आणली आहे... वजनाची माहिती जिओलोकेटर नोंदवू शकत नाही.
पक्षांच्या दर महाभरारीत त्यांचे मार्ग व वेग बदलणारे अनेक बदल (उदा : वादळे, वातावरणातील स्थानिक बदलाने बदललेला वार्याचा वेग आणि जोर, इ) अचानकपणे येऊ शकतात आणि येतातही. त्यामुळे, "एका विभागातला नक्की वेग किती" यापेक्षा "पक्षी त्याच्या गंतव्यावर योग्य वेळी आणि सुरक्षीतपणे पोचू शकतो की नाही" इकडे शास्त्रज्ञांचे जास्त लक्ष असते... कारण ते मुद्दे पक्षासाठी जीवन-मरणाचे असतात.
23 Apr 2016 - 4:02 pm | पैसा
अद्भुत!
24 Apr 2016 - 10:12 am | ज्ञानोबाचे पैजार
कारण दुसरा भाग पहिल्या भागा पेक्षा जास्त रोचक झाला आहे.
पण तरी सुध्दा हा सगळा खाटाटोप कशासाठी हा प्रश्र्ण उरतोच
पैजारबुवा
25 Apr 2016 - 10:58 pm | डॉ सुहास म्हात्रे
सगळा खाटाटोप कशासाठी हा प्रश्र्ण उरतोच
हा प्रश्न मानवी मनाला पडतो... निसर्गाला नाही !
घटनांशी आणि त्या घटनांमुळे होणार्या बदलांशी निसर्गाला काही देणेघेणे नसते. भौतिकशास्त्रांच्या नियमांप्रमाणे ज्या क्रिया घडतात, त्यातून जे बदल घडत असतात आणि त्यातून जे काही निर्माण होते, ते होते. बस, इतकेच. त्याला "भौतिकशास्त्रांच्या नियमांप्रमाणे घडणार्या क्रिया" यापलिकडे काही कारणपरंपरा नसते... असण्याची गरजही नसते !
24 Apr 2016 - 10:52 am | प्रचेतस
पक्षी जाय दिगंतरा..!!!
हा भागही आवडला.
25 Apr 2016 - 12:44 am | डॉ सुहास म्हात्रे
सर्व वाचाकांसाठी व प्रतिसादकांसाठी अनेक धन्यवाद !
25 Apr 2016 - 10:37 am | सोनुली
खूप छान.आवडत आहे वाचायला.
25 Apr 2016 - 10:47 am | सोनुली
ह्यांच्या मार्गात अडथळे , उदा. मोठ्या पक्ष्यांकडून त्रास , मारले जाणे , असे होते का? असल्यास हे प्लोव्हर्स त्यांचा प्रतिकार कसा करतात?
26 Apr 2016 - 3:30 pm | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
हे नक्कीच सर्वच पक्षांच्या बाबतीत होते. इतरांचे खाद्य होणे, जखमी होऊन अथवा दमून समुद्रात पडून मरणे, वृद्धापकाळाने किंवा आजाराने मरण, इत्यादी इतर प्राण्यांच्या संबंधात होणार्या सर्व घटना प्लोव्हरसकट सर्वच प्रवासी पक्षांमधे घटतात... किंबहुना त्यांच्या जीवनशैलीमुळे (लांबचा प्रवास, सतत जागा बदलत राहणे, इ) असे प्रकार या पक्षांमधे जास्त प्रमाणात होत असणार.
25 Apr 2016 - 12:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माहितीपूर्ण लेखन.
-दिलीप बिरुटे
25 Apr 2016 - 10:02 pm | मार्गी
निव्वळ भन्नाट!!
25 Apr 2016 - 11:14 pm | चंद्रनील मुल्हेरकर
कोणत्याही गोष्टीचा मागोवा घेण्याची युरोपिअन लोकांची वृत्ती, नैसर्गिक गोष्टीबद्दल असलेले कुतुहल,ते कुतुहल शमवणारी अत्युच्च बुद्धीमत्ता व चिकाटी आणि हे सगळं करण्यासाठी लागणारे धाडस याचे मला नेहमीच कौतुक वाटत आलेले आहे.लेख छान आणि अभ्यासपुर्ण आहे यात वादच नाही.पुभाप्र.
26 Apr 2016 - 3:17 pm | पद्मावति
अतिशय माहितीपूर्ण.
13 May 2016 - 12:42 pm | चिगो
लेख आवडला.. अख्खी लेखमाला वाचून काढतोय..