मिपावरील मित्र आणि मैत्रिणींनो,
इंटरनेटमुळे आजकाल कुठल्याही गोष्टीबद्दलची माहिती अगदी सहजपणे उपलब्ध झाली आहे. पण ही माहिती विखुरलेली असते आणि मुख्य म्हणजे ही माहिती इंग्रजीमध्ये असते. अशी माहिती संकलित करून ती मराठीमध्ये मिळाली तर वाचायचा आनंद काही औरच.
भारताबाहेरील काही ऐतिहासिक हिंदू मंदिरांविषयी माहिती संकलित करून (अर्थातच इंटरनेटवर) एक लेखांची मालिका लिहावी असा विचार मनात आला आणि मिपावरील एका मित्राच्या प्रोत्साहनाने थोडे फार लिखाण पूर्ण केले आहे.
याच मालिकेतील पहिला लेख आपल्यापुढे मांडत आहे.
लेखांतील माहिती आणि फोटो विकीपेडिया आणि इतर माहितीपर लेखांमधून संकलित केली आहे.
प्रंबानन मंदिर संयुगे (Prambanan Temple Compounds) – जावा, इंडोनेशिया
९ व्या शतकात बांधलेली ब्रह्मा, विष्णू आणि महेशांची "चांडी प्रंबानन किंवा चांडी रारा जोंग्ग्रंग" ही हिंदू मंदिरे इंडोनाशियाच्या जावामधील योग्यकर्ता शहराजवळ आहेत. १९९१ मध्ये युनेस्कोने या मंदिरांना जागतिक वारश्याचा (World Heritage Site) दर्जा प्रदान केला.
मंदिरांचा इतिहास
९ व्या शतकात आशिया खंडात बौद्ध धर्माचा प्रभाव झपाट्याने वाढत होता. याच काळात प्राचीन जावामध्ये शैलेंद्र हे बौद्ध साम्राज्य होते. त्यांनी आपल्या राज्यामध्ये बौद्ध धर्माची अनेक मंदिरे उभारली. जावामधील बोरोबुदूर आणि सेवू ही सुप्रसिद्ध बौद्ध मंदिरे याच काळात बांधली गेली.
सुमारे १०० वर्षांच्या बौद्ध साम्राज्याच्या प्रभावानंतर संजय राजवंशाने पुन्हा एकदा मेदंग हे हिंदू साम्राज्य निर्माण केले. बोरोबुदूर आणि सेवू या बौद्ध मंदिरांना प्रत्युत्तर म्हणून प्रंबानन मंदिर बांधण्यास सुरुवात केली.
यावेळी संजय वंशांच्या राजांनी बौद्ध मंदिरांना कुठलीही इजा न पोहचावता हिंदू मंदिरे बांधली ही गोष्ट फारच उल्लेखनीय आहे. प्रंबानन मंदिरांची भव्यता ही त्याकाळातील मेदंग साम्राज्यातील लोकांवर हिंदू धर्माच्या असणाऱ्या मोठ्या प्रभावाची प्रतीके आहेत.
प्रंबानन मंदिराचे बांधकाम बहुदा संजय वंशातील रकई पिकातन या राजाने सुरु केले आणि ९ व्या शतकाच्या मध्यावर पहिल्या मंदिराचे काम पूर्ण झाले. तीन मुख्य मंदिरांपैकी हे सर्वात उंच मंदिर भगवान शंकराचे आहे. मंदिराजवळ सापडलेल्या एका शिलालेखावरील माहितीनुसार ह्या मंदिराच्या जवळूनच ओपक नदी वाहत असे. नदीचे पात्र मुख्य मंदिराच्या फारच जवळ होते. त्यामुळे ह्या नदीचे पात्र वळवण्याचा मोठा प्रकल्प त्यावेळी पूर्ण केला गेल्याचा उल्लेखसुद्धा या शिलालेखावर आहे.
राजा लोकपाल आणि राजा बालीतुंग महा शंभू यांनी पुढे या भागामध्ये अनेक मंदिरे बांधली. इथे असणारी ब्रह्मा आणि विष्णूची मंदिरे बहुदा त्यांनीच बांधली असावीत. पुढील काळातही दक्ष आणि तुलोडोंग या राजांनी प्रंबानन मंदिर परिसरात अनेक मंदिरे बांधली.
मंदिरांपासून लोकांचे स्थलांतर
१० व्या शतकामध्ये बौध्द शैलेंद्र आणि हिंदू संजय साम्राज्यांमध्ये मोठा सत्तासंघर्ष सुरु झाला. याच काळामध्ये प्रंबाननच्या उत्तरेस असणाऱ्या मेरापी ज्वालामुखीचाही वारंवार उद्रेक होऊ लागला. आपल्या राज्यावर वारंवार होणारे हल्ले आणि नैसर्गिक आपत्तींना कंटाळून राजा म्पू सिंदोक याने आपल्या जनतेसह जावाच्या पूर्व भागात स्थलांतर करून इस्याना राजवंशाची स्थापना केली. या स्थलांतरामुळे प्रंबानन मंदिर परिसर पूर्णपणे निर्मनुष्य झाला.
१६ व्या शतकातील एका शक्तिशाली भूकंपात प्रंबानन मंदिरे उध्वस्थ झाली. एकेकाळी जावामधील शक्तिशाली हिंदू साम्राज्याची प्रतिक असणाऱ्या या मंदिरांचे फक्त केविलवाणे भग्नावशेषच जावामध्ये शिल्लक राहिले आणि लोक हळू हळू या मंदिरांना विसरून गेले.
मंदिरांचा शोध आणि पुनर्बांधणी (जीर्णोद्धार)
१९ व्या शतकापर्यंत जावावर डच साम्राज्य होते. डच लोकांनी मंदिरातील अनेक मूर्ती युरोपला चोरून नेल्या तर स्थानिक लोकांनी मंदिराचे अवशेष घरे बांधण्यासाठी वापरले.
१९ व्या शतकात मर्यादित काळासाठी या भागावर इंग्रजांनी आपले राज्य प्रस्थापित केले. कॉलीन मेकेन्झी आणि सर थॉमस स्टॅमफोर्ड रफ्फेल यांना फिरायला गेले असताना या मंदिरांचे अवशेष सापडले. सर थॉमस स्टॅमफोर्ड रफ्फेल यांनी लगेच या परिसराचे पूर्ण सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. पण हे काम पूर्ण होण्याआधीच डच लोकांनी इंग्रजांना हाकलून परत आपली सत्ता स्थापन केली.
१९१८ मध्ये डच सरकारने मंदिरांच्या पुनर्बांधणीचे काम सुरु केले आणि ते काम आजही सुरु आहे. मुख्य शिव मंदिराचे काम १९५३ मध्ये पूर्ण झाले. बाकी मंदिरांचे काही अवशेष नष्ट झाले तर काही चोरीला गेले. ज्या मंदिरांचे ७५% भाग उपलब्ध होतील अशाच मंदिराचे बांधकाम करण्याचा निर्णय इंडोनाशिया सरकारने घेतला. त्यामुळे अनेक मंदिरे आपल्यला आता कधीही पाहायला मिळणार नाहीत.
१९ व्या शतकात सापडलेले मंदिरांचे भग्नावशेष
मंदिरांचे स्थापत्य
प्रंबानन शिव मंदिराचे बांधकाम हे हिंदू वास्तूशास्त्रानुसार केले गेले असून त्यात भगवान शंकराचा निवास असणाऱ्या मेरु पर्वताची रचना करण्यात आली आहे. हिंदू विश्वउत्पत्तिशास्त्र आणि त्यात असलेले तीन लोक (भूरलोक, भूवरलोक आणि स्वरलोक) यांचाही मंदिराच्या रचनेत अंतर्भाव करण्यात आला आहे.
भूरलोक: मर्त्य असणाऱ्या, विकार आणि वासनांनी बांधल्या गेलेल्या मानव, पशु आणि दानवांचे लोक म्हणजे भूरलोक. मंदिराच्या स्थापत्यामध्ये मंदिराचा बाहेरील भाग आणि पायऱ्या भूरलोकाचे प्रतिक मानल्या जातात.
भूवरलोक: ऋषी-मुनी, संत आणि सत्याच्या मार्गावरील मार्गक्रमण करणाऱ्यांचे लोक म्हणजे भूवरलोक. मंदिराचा मध्य भाग भूवरलोकाचे प्रतिक मानले जाते.
स्वरलोक: देवादिकांचे लोक हे सर्वात पवित्र स्वरलोक किंवा स्वर्गलोक. मंदिराचे गर्भगृह आणि कळसाचा भाग (गोपूर) हे स्वरलोकाचे प्रतिक मानले जातात.
मंदिराच्या पुनर्बांधणीच्यावेळी भगवान शंकराच्या मूर्तीखाली सुमारे ६ मीटर खोल विहिरीसारखा खड्डा सापडला. या खड्ड्यामध्ये एक दगडी पेटी कोळसा, जाळलेल्या प्राण्याची हाडे, आणि भस्म (राख) यांच्या ढिगाऱ्यावर ठेवलेली आढळली. (भारतातील काही शिव मंदिरांमधील प्रथा पाहता ही हाडे आणि भस्म मानवी चितेतून आणलेले असू शकते) याशिवाय या ढिगाऱ्यामध्ये वरुणदेव आणि पर्वतदेव यांचा उल्लेख असणारी काही सोन्याची पानेसुद्धा सापडली.
दगडी पेटीमध्ये कासव, नाग आणि पद्माच्या मुद्रा असणारी १२ सोन्याची पाने, काही चांदीची पाने, काही रत्ने, २० नाणी, भस्म, शंख, आणि काही ताम्रपत्रे सापडली. या ताम्रपत्रावरील लिखाणाबद्दल फार माहिती उपलब्ध नसली तरी अशा प्रकारे सापडलेल्या इतर ताम्रपत्रांवर शिवभक्ती आणि भक्तीचे महात्म्य याबद्दल लिखाण सापडले आहे.
मंदिर संयुगे (Compounds)
मुलतः प्रंबानन मंदिर परिसरात एकूण २४० मंदिरे बांधण्यात आली होती. त्यामध्ये खालील मंदिरांचा समावेश होता,
३ त्रिमूर्ती मंदिरे - ब्रह्मा, विष्णू आणि महेशाची तीन मुख्य मंदिरे
३ वाहन मंदिरे - ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या मंदिरांसमोरच त्याची वाहने असणाऱ्या हंस, गरुड आणि नंदीची मंदिरे आहेत.
२ अपीत मंदिरे - त्रिमूर्ती आणि वाहन मंदिरांच्या दोन्ही बाजून ही दोन मंदिरे आहेत.
४ केलीर मंदिरे - मंदिर परिसराच्या ४ दिशांना असणाऱ्या ४ मुख्य प्रवेशद्वारांपाशी ही ४ मंदिरे आहेत.
४ पताका मंदिरे - मंदिर परिसराच्या ४ कोपऱ्यांमध्ये आतील बाजून ही ४ मंदिरे आहेत.
२२४ पेर्वारा मंदिरे - मुख्य मंदिरांभोवती ४ समकेंद्री चौरस ओळींमध्ये ही २२४ मंदिरे आहेत. सर्वात आतील ओळीत ४४, त्याबाहेरील ओळीत ५२, त्या बाहेरील ओळीत ६० आणि सर्वात बाहेरील ओळीत ६८ मंदिरे अशी ही रचना आहेत.
खालील प्रतिकृतीमध्ये या मंदिर संयुगांची रचना दाखवण्यात आली आहे.
शिव मंदिर
प्रंबानन मंदिर परिसरात असणारे हे सर्वात महत्वाचे आणि सर्वात मोठे मंदिर आहे. ४७ मीटर उंच आणि ३४ मीटर रुंद असणारे हे मंदिर संयुगांच्या बरोबर मध्यभागी आहे. मंदिराभोवती दगडी भिंत असून मंदिराला चारही दिशांना चार प्रवेशद्वारे आहेत. मंदिराच्या बाहेरील बाजूस सुंदर कोरीव काम असून त्यामध्ये रामायणातील कथा मूर्तींच्या रुपात कोरण्यात आल्या आहेत. मंदिराच्या पूर्व भागाकडून आत शिरून जर मंदिरास प्रदक्षिणा घातल्यास या रामायणातील गोष्टी सलगपणे समजून घेता येतात.
मंदिरावर कोरलेली रामायणातील काही कथादृश्ये
शिव मंदिरामध्ये ५ खोल्या आहेत. मुख्य खोली (गर्भगृह) आणि मंदिराच्या चारही बाजूस चार तुलनेने लहान खोल्या आहेत. मंदिराच्या पूर्व प्रवेशद्वारातून आत आल्यास मंदिराच्या थेट गर्भगृहामध्ये प्रवेश मिळतो. या खोलीमध्ये भगवान शंकराची ३ मीटर उंचीची मूर्ती एका कमळाच्या फुलावर उभी आहे. कमळाचे फुल हे बौध्द धर्माचे प्रतिक मानले जाते. दक्षिण जावावर राज्य करणाऱ्या शैलेंद्र या बौध्द राजवंशाच्या राजकुमारीचा विवाह उत्तर जावावर राज्य करणाऱ्या संजय राजवंशाच्या राजकुमाराशी झाल्याची आख्यायिका आहे. या करणामुळेच ह्या मंदिराच्या बांधकामात हिंदू आणि बौध्द स्थापत्यकलांचे मिश्रण पहायला मिळत असावे.
मुख्य मंदिरातील भगवान शंकराची मूर्ती
मंदिरातील इतर खोल्यांपैकी दक्षिणेकडील खोलीमध्ये शंकराचा गुरु अवतार मानल्या गेलेल्या अगस्ती ऋषींची मूर्ती आहे. पश्चिमेकडील खोलीमध्ये शंकराचा पुत्र गणपती आणि उत्तरेकडील खोलीमध्ये महिषासुरमर्दिनी दुर्गेची मूर्ती आहे.
गणपतीची मूर्ती
महिषासुरमर्दिनी दुर्गेची मूर्ती
ब्रह्मा आणि विष्णू मंदिरे
ब्रह्मा आणि विष्णू मंदिरे शिव मंदिराच्या अनुक्रमे दक्षिण व उत्तर दिशेला आहेत. ही दोन्ही मंदिरे एकसारखी असून त्यांची उंची ३३ मीटर आणि रुंदी २० मीटर असून या दोन्ही मंदिरांमध्ये देवतेच्या मूर्तींसह एकच खोली आहे.
ब्रह्मा मूर्ती
विष्णू मूर्ती
रामायण नृत्यनाट्य
इंडोनेशियामध्ये नृत्यनाट्याची मोठी परंपरा आहे. या नृत्यनाट्यामधून जावामधील काकावीन पद्धतीने लिहिलेल्या रामायणातील कथा प्रेक्षकांसमोर सादर केल्या जातात.
रामायणाचे असे सादरीकरण प्रंबानन मंदिरांसमोरील मोठ्या व्यासपीठावरही केले जाते. आणि त्यासाठी भव्य प्रंबानन मंदिरांनाच पडदा म्हणून वापले जाते. या राम कथेचे ४ भाग करून रोज एक याप्रमाणे ४ दिवसात रामायणाच्या संपूर्ण कथेचे सादरीकरण होते. मे ते ऑक्टोबर महिन्यांच्या प्रत्येक पौर्णिमेच्या आधीच्या द्वादशीपासून रामायण कथांच्या सादरीकरणाला सुरुवात होते आणि पौर्णिमेला शेवटचा भाग सादर केला जातो. हे रामायण नृत्यनाट्य स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांमध्ये फारच लोकप्रिय आहे.
हिंदू संस्कृती हजारो वर्षांपूर्वी भारतापासून खूप लांब असणाऱ्या इंडोनेशियाला पोहोचली आणि तिने त्या भूभागावर शेकडो वर्षे अधिराज्य गाजवले. याचकाळात तेथे या संस्कृतीचे दर्शन घडवणारी प्रंबानन मंदिरांसारखी भव्य प्रतीकेही उभारली गेली.
काळाबरोबर देश, तेथील लोक आणि त्यांचे धर्म देखील बदलले. आजच्या मितीला इंडोनेशिया हा जगातील सर्वात मोठा इस्लामिक देश आहे. पण आजही इंडोनेशियन लोक आपली संस्कृती विसलेले नाहीत. अब्जावधी डॉलर्स खर्च करून हा देश प्रंबानन मंदिरांचा जीर्णोद्धार अविरतपणे करत आहे. धर्माने मुस्लिम असूनसुद्धा तेथील कलाकार रामायणाच्या कथा सादर करत आहेत. संस्कृतीला धर्माच्या मर्यादा नसतात याचे हे उत्तम उदाहरणच नाही का?
प्रतिक्रिया
19 Mar 2016 - 11:43 am | अबोली२१५
खूप छान माहिती दिलीत....
19 Mar 2016 - 12:02 pm | अत्रुप्त आत्मा
क्लासिक वन!
गणपति जितके जुने पहावे तितके ते मोदकवाले मुळीच दिसत नाहीत!
हाती मोदकपात्र,
दिसे त्यात लाडू
लागला मोदक वाढू,
फार नंतर तिथे..
अशीच अवस्था दिसून येते,हे रोचक आहे.
19 Mar 2016 - 1:14 pm | कंजूस
फार छान.ते रामायण नाट्य दाखवतात कधी टिव्हिवर .आपल्याकडच्यापेक्षा भारी सादर करतात.
19 Mar 2016 - 3:38 pm | चांदणे संदीप
लेखमालिकेसाठी शुभेच्छा!!
Sandy
19 Mar 2016 - 3:40 pm | प्रदीप साळुंखे
मस्त
19 Mar 2016 - 5:46 pm | उल्का
खूप छान लेख व मालिका सुद्धा :)
20 Mar 2016 - 8:12 am | खटपट्या
खूप छान लेख माला वाचायला मिळणार...
20 Mar 2016 - 6:30 pm | अजया
मस्त लेखमालिका होणार आहे.पुभाप्र
20 Mar 2016 - 7:14 pm | अभिजित - १
सुंदर माहिती
20 Mar 2016 - 8:43 pm | दिवाना हु
नविन लेख मालेचि आतुरता
20 Mar 2016 - 9:27 pm | एस
फारच छान लेखमालिका होणार. पुभाप्र.
लेखमालिकेच्या शेवटच्या भागात सर्व संदर्भ नमूद करावेत ही विनंती.
22 Mar 2016 - 11:40 pm | Jack_Bauer
खूप सुंदर लिखाण आणि फोटो आहेत. एका नवीन विषयावर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
26 Mar 2016 - 9:27 am | यशोधरा
सुरेख.
28 Mar 2016 - 2:29 pm | पद्मावति
सुरेख लेख.
29 Mar 2016 - 3:36 pm | विटेकर
स्तुत्य उपक्रम !
29 Mar 2016 - 3:39 pm | सस्नेह
रोचक माहिती आणि सुरेख फोटो.
29 Mar 2016 - 6:35 pm | सुमीत भातखंडे
आहे हे सगळं.
30 Mar 2016 - 2:24 pm | श्रीगुरुजी
मस्त माहिती!
30 Mar 2016 - 4:26 pm | jo_s
मस्त माहिती आणि फोटो
31 Mar 2016 - 5:35 pm | कौशिकी०२५
वाह..रोचक माहिती...पुभाप्र
2 Apr 2016 - 12:18 am | बोका-ए-आझम
हा आत्ता वाचला! इथे शूटिंगसाठी यायचा योग आला होता. फार छान जतन केलेलं आहे. पूजा-अर्चा देखील व्यवस्थित होते. गणपती आणि इतर देवांना केली जाणारी फुलांची आरास तर अप्रतिम!