==========================================
भाग १ - प्रंबानन मंदिर संयुगे - जावा (इंडोनेशिया)
भाग २ - हिंगलाज माता शक्तीपीठ, बलूचिस्तान (पाकिस्तान)
==========================================
भाग ३ - श्री श्री ढाकेश्वरी मंदिर, ढाका (बांग्लादेश)
ढाकेश्वरी मंदिर हे सध्याच्या बांग्लादेशमधील सर्वात महत्वाचे हिंदू मंदिर आहे. राजधानी ढाका येथील ढाका विद्यापीठाच्या मागील बाजूस हे मंदिर आहे. या मंदिराचे खास वैशिष्ठ्य म्हणजे मंदिराची मालकी बांग्लादेश सरकारकडे असून या मंदिराला बांग्लादेशच्या राष्ट्रीय मंदिराचा दर्जा देण्यात आला आहे. १९७१ च्या बांग्लादेश स्वातंत्र्य लढयादरम्यान पाकिस्तानी सैन्याने बांग्लादेशातील श्री रमणा काली मंदिर पूर्णपणे नष्ट केल्यापासून ढाकेश्वरी मंदिर हे बांग्लादेशमधील सर्वात महत्वाचे हिंदू मंदिर म्हणून ओळखले जाऊ लागले.
मंदिराचे धार्मिक महत्व आणि इतिहास
१२ व्या शतकात राजा बल्लाल (बल्लाळ) सेन याला एकदा स्वप्नामध्ये जंगलात देवी दुर्गेची मूर्ती सापडल्याचे पहिले. स्वप्नात पाहिल्याप्रमाणे त्याने मूर्तीचा शोध घेतल्यावर त्याला जंगलात खरंचच देवीची मूर्ती सापडली. त्याने या मूर्तीसाठी मंदिर बांधून त्याचे ढाकेश्वरी मंदिर असे नामकरण केले. सध्याच्या ढाका शहराचे नाव याच देवीच्या नावावरूनच घेतल्याचे बोलले जाते
गेल्या काही शतकांमध्ये या मंदिराची बऱ्याचवेळा दुरुस्ती, डागडुजी व नुतनीकरण करावे लागले. त्यामुळे मंदिराचा मूळ इतिहास आणि त्याचे सध्याचे स्थापत्य मेळ खात नाहीत.
ढाकेश्वरी मंदिर १९०४
मंदिर परिसर आणि मंदिराची रचना
ढाकेश्वरी मंदिर परिसरात ५ वेगवेगळी मंदिरे आहेत. दुर्गा मंदिर हे मुख्य मंदिर असून सध्याचे मंदिर साधारणपणे २०० वर्षे जुने आहे. याशिवाय येथे १६ व्या शतकात राजा मानसिंग याने बांधलेली एकाशेजारी एक अशी ही ४ भगवान शंकराची मंदिरेसुद्धा आहेत. परिसरातील मंदिरे निरनिराळ्या कालखंडांमध्ये बांधली असल्यामुळे आपल्याला येथे निरनिराळी स्थापत्यकला पहावयास मिळते. बंगाली चौचाला, शिखोर (शिखर) मंदिर आणि बौद्ध पॅगोडा या स्थापत्यकलांचे मिश्रण येथे आहे.
दुर्गा मंदिर (मुख्य ढाकेश्वरी मंदिर)
ढाकेश्वरी दुर्गा मूर्ती
मंदिरावरील हल्ल्यांचा इतिहास
१९७१ च्या बांग्लादेश स्वातंत्र्यलढयादरम्यान मंदिराचे फार मोठे नुकसान झाले. पाकिस्तानी सैन्याने मंदिराच्या मुख्य भागाचा वापर शस्त्रास्त्रे व दारुगोळा ठेवण्यासाठी केला. बंगालच्या सांस्कृतिक चिन्हांचा नायनाट करण्याचा चंग बांधलेल्या पाकिस्तानी लष्कराने मंदिराची मोठ्याप्रमाणावर नासधूस केली.
१९९० च्या दशकात भारतात बाबरी मशीद पाडल्याच्या निषेधार्थ मोठ्या मुस्लिम जमावाने ढाकेश्वरी मंदिरावर हल्ला करून मंदिराची तोडफोड केली.
बांग्लादेशाच्या नव्या स्थावर मालमत्ता कायद्याच्या अंमलबजावणीदरम्यान मंदिराची बरीच जमीन सरकारने काढून घेतली. त्यामुळे सध्याचा मंदिर परिसर हा मूळ मंदिरापेक्षा फारच छोटा आहे.
ढाकेश्वरी मंदिराचे राष्ट्रीयीकरण
१९७१ पूर्वी रमणा काली मंदिर हे पूर्व पाकिस्तानातील (सध्याचा बांग्लादेश) हिंदूंचे मुख्य मंदिर होते. बांग्लादेशाच्या स्वातंत्र्यलढयादरम्यान पाकिस्तानी सैन्याने रमणा काली मंदिर पूर्णपणे नष्ट केले. बांग्लादेशाच्या निर्मितीनंतर देशातील हिंदूनी मंदिरासाठी मोठी चळवळ उभारली. बांग्लादेशाच्या संस्कृतीतील हिंदूंचे आणि त्यांच्या मंदिरांचे स्थान ओळखून बांग्लादेश सरकारने १९९६ मध्ये ढाकेश्वरी मंदिराचे राष्ट्रीयीकरण केले. मंदिराचे नाव बदलून श्री श्री ढाकेश्वरी जोतीय (राष्ट्रीय) मंदिर असे करण्यात आले.
वार्षिक दुर्गा पूजा उत्सव (नवरात्र)
बांग्लादेशातील हिंदूंसाठी वार्षिक दुर्गा पूजा उत्सव (नवरात्र) हा वर्षातील सर्वात मोठा उत्सव आहे. ढाकेश्वरी मंदिरातसुद्धा हा खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बांग्लादेशचे राष्ट्रपती, पंतप्रधान, विरोधी पक्ष नेते, खासदार आणि इतर सर्व क्षेत्रांतील लोक या उत्सवात आवर्जून सहभागी होतात. हजारो हिंदू आणि मुस्लिम लोक यावेळी मंदिरात येवून ढाकेश्वरी देवीचे दर्शन घेतात.
भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ढाकेश्वरी मंदीर भेट
जून २०१५ मध्ये बांग्लादेश दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ढाकेश्वरी मंदीराला आवर्जून भेट दिली. मंदिर भेटींचे कार्यक्रम पंतप्रधानांच्या राजकीय दौऱ्याचे भाग सहसा नसतात त्यामुळे भारतीय हिंदू संस्कृतीचे प्रतिक असणाऱ्या या मंदिराला पंतप्रधानांनी दिलेली भेट उल्लेखनीय म्हणावी लागेल.
ढाकेश्वरी मंदिराचे विशेष पौराणिक महत्व नसले तरी भारताची झालेली फाळणी, पाकिस्तानी सैन्याचे पूर्व पाकिस्तानातील अत्याचार, बांग्लादेशची निर्मिती, बांग्लादेशातील हिंदूवरील अत्याचार हे सर्व या मंदिराने पाहिले आहे. एका मुस्लिम बहुल देशाचे राष्ट्रीय मंदिर होऊन हिंदू संस्कृतीचे प्रतिक म्हणून हे मंदिर आजही उभे आहे.
प्रतिक्रिया
1 Apr 2016 - 8:39 am | अत्रुप्त आत्मा
छान माहिती.
1 Apr 2016 - 12:22 pm | यशोधरा
माहिती आवडली.
1 Apr 2016 - 12:41 pm | चांदणे संदीप
छान माहिती!
नोटेड!
Sandy
1 Apr 2016 - 12:42 pm | अजया
लेख आवडला.
1 Apr 2016 - 12:51 pm | एस
उत्तम सुरू आहे लेखमाला.
1 Apr 2016 - 1:30 pm | प्रसाद_१९८२
छान लेख आणि माहिती.
1 Apr 2016 - 4:21 pm | वेल्लाभट
कूल !
1 Apr 2016 - 6:57 pm | माहितगार
रोचक
1 Apr 2016 - 7:10 pm | विजय पुरोहित
मस्त लेखमाला व माहिती.
2 Apr 2016 - 12:15 am | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर लेखमालिका. रोचक व उपयुक्त माहिती मिळते आहे.
2 Apr 2016 - 12:15 am | बोका-ए-आझम
आणि माहिती!
2 Apr 2016 - 7:04 am | अत्रुप्त आत्मा
आगोबा कुठठाय!?