ब्रह्मदेश भाग १ : प्रस्तावना भाग ३ बगान भाग ४ : रंगून भाग ५ : ब्रह्मदेश लोकजीवन
थाईलँड भाग ६ : बँकॉक व परिसर भाग ७ : सुखोथाई भाग ८ : उत्तर सीमा
लाओस भाग ९ : सुवर्णत्रिकोण
कंबोडिया भाग १० : नॉम पेन्ह व परिसर भाग ११ : अंगकोर वट
बँकॉकहून सकाळचे थेट विमान घेऊन मंडले येथे उतरलो. ईव्हिसा होताच, इमिग्रेशन, स्थानिक चलन व सिमकार्ड असे प्राथमिक सोपस्कार पार पाडून एअर एशिया च्या शटलने शहराकडे प्रस्थान. विमानतळ नवीन असल्याने बराच लांब आहे, परंतु एअर एशिया त्यांच्या प्रवाशांशाठी मोफत शटल चालवते. एक उत्तम एकल-प्रवासी / बॅकपॅकर होस्टेल आरक्षित केलेलं होतं तिथे समान टाकून जुन्या शहराकडे कूच केली. (उत्तम अशासाठी : शहराच्या मध्यवर्ती भागात, भोवती खायची प्यायची उत्तम सोय, स्वस्त मिक्स डॉर्म, भाड्याने सायकल, कपडे धुवायची फुकट सोय (वॉशिंग मशीन), गरम पाणी, न्याहरी फुकट व उत्तम कर्मचारी. दोस्तही खूप चांगले मिळाले, बहुतांश 'कल्चरल शॉक' पचवत असलेले युरोपीय… (एकल प्रवाशांसाठी; राहण्याची जागा मी अशी निवडतो. डॉर्म स्वस्त व नवे मित्र बनविण्यास उत्तम, TripAdvisor व Agoda ही उत्तम माध्यमे) )
ब्रह्मदेशातील बहुतांश जुनी शहरे चौरसाकृती असून उंच संरक्षक भिंती व खोल खंदकांनी संरक्षित असत. मंडलेही असेच एक. आता शहरीकरण वाढल्याने या चौरसाच्या बाहेरही दहा पट विस्तार झालेला आहे पण जुन्या शहराच्या कवचामुळे त्याचा वेगळेपणा टिकून आहे. तटबंदीच्या आत जुना राजवाडा अलीकडेच पुन्हा बांधून काढण्यात आला. ब्रह्मदेशाची ही शेवटची राजधानी. ब्रिटीशांनी राज्य खालसा केल्यानंतर इथल्या 'थिबा' राजाला नजरकैदेत रत्नागिरीला ठेवण्यात आले, तेव्हापासून इथली राजेशाही खंडित झाली. उत्कृष्ठ प्रकारचे सागवानी बांधकाम इथे पहावयास मिळते. तिथेच एका इतिहासप्रेमी स्थानिक तरुणाशी ओळख झाली, पुढे त्याच्या दुचाकीवर आम्ही गावभर हिंडलो. जुन्या शहरातला मुळ राजवाडा दुसऱ्या महायुद्धात जपानच्या स्फोटकांमुळे उद्ध्वस्त झाला. याच परिसरात मंडलेचा तुरुंगही होता.
पुढे महामुनी बुद्धाच्या दर्शनाला गेलो. मंडले मधील सर्वात प्रसिद्ध धर्मक्षेत्र. इथे बहुतांश मोठ्या बौद्ध मंदिरांत मूर्तीला सोन्याच्या तलम पत्र्यान्द्वारे मुलामा देण्याची प्रथा आहे. हे स्थान विशेष प्रसिद्ध असल्याने अनेक शतकांमध्ये अशा अर्पण केलेल्या सोन्यामुळे मूळ मूर्तीचा आकार सर्व बाजूंनी किमान सहा इंच वाढला आहे. मूळ मूर्ती बुद्ध काळातील असून वजन कैक टनांमध्ये आहे.
या मंदिराव्यतिरिक्त 'चुकवू नये असे काही' म्हणजे कुथोडाव पॅगोडा, इथे संपूर्ण त्रिपिटक ग्रंथ ४-५ फुटी ७२९ शिलपट्टिकांवर कोरून मुख्य स्तुपाभोवती छोट्या छोट्या घुमट्यांमध्ये स्थापन केला आहे. 'जगातील सर्वात मोठे पुस्तक' म्हणून याची ओळख आहे.
दुसरे स्थान म्हणजे 'श्वेनंदाव विहार', मूळ राजवाड्याचे काही भाग वापरून बांधलेली हि इमारत आज प्राचीन ब्राह्मदेशाच्या स्थापत्य वैभवाचा एकमात्र शिल्लक नमुना आहे. उत्कृष्ठ सागवानी बांधकाम व सुंदर कलाकुसर यासाठी हि इमारत प्रसिद्ध आहे. तासंतास बघत राहावे असे शिल्पवैभव! फोटो फार न्याय देऊ शकणार नाहीत, परंतु झलक सुद्धा मुग्ध करणारी आहे.
तिसरे म्हणजे मंडले हिल, उत्तरेकडे असलेली हि पर्वती सारखी छोटी टेकडी. इथून शहराचे दृश्य फार सुंदर दिसते. शिखरावर काही बौद्ध मंदिरेही आहेत.
चित्र दालन :
मंडले चा नकाशा आवर्जून पाहण्यासारखा, खंदकासहित जपलेले जुने नगर उत्तरेकडे, सुनियोजित विस्तार, समांतर रस्ते, सर्व रस्त्यांना क्रमांक ई. विशेष, आशियायी जुन्या शहरात दुर्मिळ…
शहराचे दैनंदिन जीवनातील सहजदृश्य
जुने मंडले
मंडले तटबंदी
मंडले तटबंदी
मंडले तटबंदी, दक्षिण द्वार
मंडले तटबंदी
मंडले तटबंदी, गडद रात्री
राजप्रासाद (पुनर्रचित)
राणीवसा
सागवानी काम
महामुनी बुद्ध मंदिर
मुख्य मंदिर
कोरीवकाम
कोरीवकाम
सुवर्णलेपित बुद्ध मूर्ती
सुवर्णलेपित बुद्ध मूर्ती
कुथोडाव पॅगोडा
मंडले टेकडी वरून दृश्य
लहान लहान त्रिपिटक मंदिरे
श्वेनंदाव विहार
मूळ इमारत पूर्णपणे सागवानी लाकडात बांधलेली आहे, पायऱ्या नंतरची भर
पूर्व बाजू
प्रवेशद्वार
सागवानी कोरीवकाम
सागवानी कोरीवकाम
सागवानी कोरीवकाम
सागवानी कोरीवकाम
सागवानी कोरीवकाम
सागवानी कोरीवकाम
सागवानी कोरीवकाम व स्थानिक पर्यटक
मंडले हिल
परिसर
टेकडीवरून दिसणारे अजून एक दृश्य, उजवीकडून, जुने शहर, तटबंदी, खंदक, महामार्ग. पार्श्वभूमीवर आधुनिक शहर. सर्वदूर हिरवाई
[अवांतर १ : मंडलेशी मराठी मनाचं नातं आहे ते टिळकांच्या या शहराशी संबंधित कार्यामुळे. अंदमान प्रमाणे 'तीर्थक्षेत्र' ही माझी वैयक्तिक भावना! ६ वर्षे टिळक येथे कारागृहात होते. येथेच त्यांनी 'गीता रहस्य' हा महान मराठी ग्रंथ लिहिला. गेल्या वर्षी या ग्रंथाच्या प्रकाशनाचे शतकी वर्ष होते, त्यामुळे या ठिकाणी जाण्याचे एक वेगळे महत्वही होते. येथील भारतीय दूतावासाकडे टिळकांच्या स्मृती येथे कुठल्याही स्वरुपात जपल्या आहेत का? अशी विचारणा केली असता, पहिले 'कोण तुम्ही?' असा उद्दाम प्रतिसाद, परंतु नंतर सविस्तर ईपत्र देवघेविनंतर सध्यातरी असे कोणतेहि स्मारक अथवा स्मृतीदर्शक नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अर्थात त्यासाठी आपला तेथील प्रमुख दूतावास, आपले परराष्ट्र खाते या सगळ्यांनाही आमच्या ईपत्र संभाषणात बोलवावे लागले... हेतू हाच, की भविष्यात तरी किमान हे प्रत्यक्षात यावे. विशेषतः आपण ज्या प्रकारे थिबा राजाचा निवास जपलेला आहे, ते लक्षात घेता… टिळकांनंतर सुभाषचंद्र बोस देखील मंडलेशी काही काळ निगडीत होते.
अवांतर २ : नगराचे नाव संस्कृतोद्भव, 'मंडल' वरून स्थानिक भाषेत मंडले/मंदले/मंटले असेच आहे (बोली प्रमाणे उच्चार भिन्नता). ‘मंडाले’ हा सांप्रत भारतीय रूढ उच्चार अयोग्य आहे. गीता रहस्याच्या प्रस्तावनेतही टिळक ' मन्दले' असेच लिहितात. पुढे कधीतरी याचे अपभ्रष्ट रूप रूढ झाले ते कायमचेच.]
अन्य भटकंती : दक्षिण अमेरिका - पेरू, दक्षिण अमेरिका - अमेझॉन ब्राझील, मध्य अमेरिका - ग्वाटेमाला होंडुरास एल साल्वाडोर बेलीझ, ईशान्य भारत - मणिपूर, ईशान्य भारत -त्रिपुरा, आग्नेय आशिया - ब्रह्मदेश थाईलँड लाओस कंबोडिया मध्य व पश्चिम आशिया - उझबेकिस्तान ताजिकिस्तान अफगाणिस्तान अझरबैजान तुर्कस्तान
प्रतिक्रिया
13 Mar 2016 - 11:21 am | अजया
अप्रतिम लेख अाणि लाजवाब फोटो.सागवानावरची कलाकूसर अफाट देखणी.
पुभाप्र
13 Mar 2016 - 11:28 am | सतिश गावडे
सुंदर ओळख करून दिली आहे आग्नेय आशियाची.
प्रवासवर्णनांमधील फोटोंमधून परदेशातील स्वच्छता पटकन नजरेत भरते. ही ठिकाणे पर्यटन स्थळे असल्याने स्वच्छ असतात की सर्वत्रच अशी स्वच्छता दिसते? जगाच्या पाठीवर आपल्यासारखे अस्वच्छ देश कुठे आहेत का?
13 Mar 2016 - 12:00 pm | स्पा
अहाहा डोळ्याचे पारणे फिटले, एक से एक सुंदर फोटो
13 Mar 2016 - 4:08 pm | माहितगार
लेख आणि छायाचित्रे आवडली
माझ्या आंजा वरील माहितीनुसार जपानी आक्रमण मयन्मारच्या लोकांना आवडलेले नव्हते, सुभाषचंद्र बोसयांचा उल्लेख त्यांना कितपत खटकू शकतो याची कल्पना नाही. शिवाय बर्मात राहणारे भारतीय वंशाच्या स्थानिक हिंदू व्यापार्यांनी स्वातंत्र्यपुर्व काळा पर्यंत केलेले व्याज व्यवहारामुळे स्थानिक जनतेत भारतीय वंशाच्या स्थानिक हिंदू बद्दल नाराजी असावी. शिवाय आपले रास्वसंघाच्या काही अंखडभारत नकाशात बर्मा सहीत पुर्व आशीयाचा भाग दाखवला जात असावा आणि त्यावरुन चीन आणि पाकिस्तानी डिप्लोमॅट्स भारताविरुद्ध वातावरण निर्मिती करत असावेत. (चुभूदेघे)
बाकी इमेल चर्चेतून टिळकांच्या मन्डले निवासाचा काही पत्ता लागला का ? मला वाटते बहादूर शहा जफर थिबा प्रमाणे मंडलेत राहीला होता.
* शेवटी आपल्या लेखात जे दोन उल्लेख आले आहेत त्या अनुषंगाने आमची धागा जाहीरात
**"थिबॉ मीन" मयन्मारचा (ब्रह्मदेश) शेवटच्या सम्राट आणि राजघराण्याचा शेवट का अभ्यासावा ?
** लोकमान्य टिळकांचे साहित्य विकीमध्ये टंकण्यात साहाय्य हवे
14 Mar 2016 - 7:54 am | समर्पक
१. जपानचे पूर्व भारतावरील आक्रमण : महायुद्ध काळात कोण कोणाविरुद्ध आणि कोणासाठी लढले यात आपल्याकडे देखील कुठे स्पष्टता आहे… ईशान्य भारतात सुभाष बाबू व जपान्यांविरुद्ध लढणाऱ्या ब्रिटिश सैनिकांच्या स्मृती अगदी उत्तम मोठमोठ्या कबरस्तानात जपल्या आहेत आणि खुद्द नेतजींसह अनेक सैनिकांचे काय झाले कोणाला माहितीही नाही… कोहिमा व इम्फाळ (कोमिल्ला सुद्धा) येथील वर्ल्ड वॉर सिमेटरि बघताना फार दु:ख वाटले. काही मराठी नावेही दिसली याद्यांमध्ये, अर्थात ब्रिटीशांकडून लढ्लेल्यांची… असो, ब्रह्मदेशाचा पारंपारिक शत्रू थायलंड जपान्यांबरोबर असल्याने व इतरही कारणांनी ते त्यांना म्हणता तसे आवडले नाही हे सत्य
२. म्यानमार जनतेची पश्चिम-भारतीयांविषयी भावना : एके काळी रंगूनची अर्धी अधिक लोकसंख्या पश्चिम-दक्षिण भारतीय होती, महायुद्ध काळात बरेच परत आले. पुढे साठच्या दशकात सैन्यसत्ता आल्यानंतर वंशवाद पुन्हा उफाळून आला व मोठ्या संख्येने लोकांनी स्थानांतर केले. आजही मणिपुरच्या सीमेवर कैक हजार तमिळ भाषिक स्थायिक आहेत, ब्रह्मदेशातून पायी पश्चिमेकडे यायला निघालेले… (असा प्रांतवाद आजच्या महाराष्ट्रालाही नवीन नाही, त्यामुळे त्यांनाही नावे का ठेवा… आपलेच बंधू ते…(वैषम्य)) सध्या २ टक्के लोक पश्चिम भारतीय वंशाचे आहेत.
३. रास्वसंघ, अंखडभारत इ. : संघाचे विस्तृत कार्य या देशात आहे. आपल्याकडेच संघाच्या नावाने बोटे मोडणाऱ्या लोकांची कमी नाही त्यामुळे तिथेही काही लोक असतील तर त्यात नवल नाही, त्यासाठी चीन/पाकिस्तान यांना काही वेगळे कष्ट घ्यावे लागत असतील असे वाटत नाही (स्वल्प उपहास, क्षमस्व).
४. टिळकांचा मन्डले निवास : जुन्या शहरातील कारागृह तर संपूर्ण नष्ट झालेला आहे, तसेच त्यांना ज्या स्वतंत्र निवास स्थानात ठेवले होते तोही कालौघात नाश पावला. पूर्वी तेथे एक फलक असे पण आता तोही नाही.
५. बहादुरशाह : बहादुरशाह झफ़र हा रंगून मध्ये नजरकैदेत होता व तिथेच त्याचे निधन झाले. अलीकडे त्याची कबर 'मिळाल्यानंतर' त्यावर दर्गा वगैरे बांधण्यात आला पण त्याचीच ही कबर याबद्दलची सत्यासत्यता वादग्रस्त आहे.
14 Mar 2016 - 8:24 am | माहितगार
क्षमा असावी पाकीस्तान-चीन संघाच्या नावाने सरळ बोटे मोडत बसत नाहीत ते बोलताना भारतीयांचा छुपा हेतु साम्राज्यवादी आहे हे डिप्लोमॅतीकली ठसवण्यासाठी करतात. एनीवे सरकारमध्ये बसल्यावर आंतरराष्ट्रीय संबंध घडवण्यासाठीच्या खाचा खोचा किमान भाजपाच्या नेतृत्वाला काळाच्या ओघात लक्षात येऊ लागतील. असो.
16 Mar 2016 - 10:39 pm | समर्पक
माझा काही फार अभ्यास वगैरे नाही परंतु गेल्या काही महिन्यातील वाचनात असा काही संदर्भ आला नाही. संघाला अतिरिक्त महत्व परराष्ट्र संबंधात असेल असे वाटत नाही. आणि स्वतः लोकाचे प्रदेश गिळून बसलेल्या या दोन्ही राष्ट्रांनी असा काही कांगावा करावा हे विशेष! असे काही वाचण्यासारखे असल्यास जरूर कळवा. या देशाविषयीच्या अभ्यासात भर पडेल...
13 Mar 2016 - 7:32 pm | प्रचेतस
अतीव सुंदर छायाचित्रे आणि सुरेख वर्णन.
13 Mar 2016 - 7:40 pm | अभ्या..
अल्टीमेट प्रवासवर्णन. खरे तर प्रवास्वरणने वाचायला अन विशेषतः बघायला मला आवडत नाहीत.
पण स्वतःचा एक कलासंपन्न अन अभ्यासू दृष्टीकोन ठेवून लिहिलेली अन अप्रतिम फोटोग्राफ्सनी सजलेली तुमची प्रवासवर्णने खरेच आवडतात.
धन्यवाद
13 Mar 2016 - 7:43 pm | नाव आडनाव
सगळेच फोटो मस्त. पण "लहान लहान त्रिपिटक मंदिरे" फोटो लैच आवडला.
13 Mar 2016 - 11:03 pm | डॉ सुहास म्हात्रे
अतीव सुंदर फोटो आणि सुयोग्य माहिती !
मंडले टेकडीवरून दिसणारे शहराचे विहंगम दृष्य विषेश आवडाले. त्यात उठून दिसणारी लहान त्रिपिटक मंदिरांचा शुभ्र परिसर चित्राला वेगळाच उठाव देतो आहे !
14 Mar 2016 - 1:18 am | बोका-ए-आझम
सागवानी कोरीवकामाचे फोटो तर सुंदरच आलेत! पुभाप्र!
14 Mar 2016 - 8:40 am | बेकार तरुण
सुंदर वर्णन आणी अति अप्रतिम छायाचित्रे !!
14 Mar 2016 - 12:33 pm | एस
प्रचंड सुंदर!
14 Mar 2016 - 1:46 pm | सौंदाळा
सुंदर ओळख आणि फोटो.
समर्पक हा डॉ. सुहास म्हात्रेंचा डुआयडी आहे की काय? लिहिण्याची शैली, फोटो. भटकंतीची आवड खुपच सारखेपणा दिसतो. (ह. घ्या)
14 Mar 2016 - 4:35 pm | मधुरा देशपांडे
अफाट सुंदर वर्णन आणि फोटो.
17 Mar 2016 - 12:52 am | पद्मावति
अप्रतिम लेख आणि फोटो.
18 Mar 2016 - 7:06 pm | नया है वह
अप्रतिम लेख आणि फोटो.
27 Mar 2016 - 7:33 pm | पैसा
अप्रतिम सुंदर लिखाण अन फोटो. लो. टिळकांची आठवण मंडालेमधे जपण्यासाठी काही प्रयत्न जरूर व्हावेत. त्या बिचार्या थिबा राजाला आणि त्याच्या राण्याना इतक्या सुंदर राजवाड्यातून रत्नागिरीसारख्या एका टोकाच्या लहान शहरात रहाताना काय ब्रह्मांड आठवले असेल!
9 Jun 2016 - 4:53 pm | उल्का
सुन्दर फोटो. मन्दलेच्या प्रमुख महितीबरोबरच अवान्तर महिती पण चान्गली दिली आहे.
10 Jun 2016 - 1:27 am | अंतु बर्वा
सुंदर फोटो आणि तितकीच छान माहिती...!
24 Dec 2017 - 2:35 pm | दीपक११७७
छान लेख माला,
सर्व फोटो अप्रतिम,
एक कळले नाही, बुध्दाला सोन्याने का सजवतात?