विसंगती - सुसंगती

आतिवास's picture
आतिवास in जनातलं, मनातलं
16 Jul 2014 - 1:51 pm

विवेकानंद साहित्य' वाचणे म्हणजे काहीतरी विशेष गोष्ट करणे असा आपल्याकडे आजही काही लोकांचा समज आहे. विवेकानंद साहित्य वाचणा-या व्यक्तीचे कौतुक तर होतेच पण ही व्यक्ती काहीतरी अवघड बाब करते आहे, असा समज होऊन त्या व्यक्तीकडे आदराने पाहण्याची प्रवृत्ती आजूबाजूच्या लोकांमध्ये निर्माण होताना दिसते. अर्थात काही लोक विवेकानंद 'वाचणे' ही निरर्थक कृतीही समजत असावेत – पण ला तरी असे लोक अपवादानेच भेटले आहेत. आयुष्याबद्दल विचार करणा-यांच्या वाटेवर बहुधा विवेकानंद नावाचा हा टप्पा कधी ना कधी येतोच.

मला स्वत:ला विवेकानंद अवघड कधीच वाटले नव्हते, वाटत नाहीत. आमच्या मित्रमंडळीत अरविंद आणि कृष्णमूर्ती आम्ही 'पुढच्या जन्मासाठी राखून ठेवले आहेत’ असे विनोदाने नेहमीच म्हणत आलो आहोत. विवेकानंदांच्या बाबतीत हा प्रश्न कधी आला नाही. विवेकानंदांचे प्रेरणादायी लेखन वाचताना त्यांच्या ओघवत्या विचारांमध्ये आपण कधी सामील होतो हे आपल्यालाही समजत नाही. विवेकानंद सांगतात त्यानुसार जगणे ‘अवघड’ आहे हे मान्य. पण विवेकानंद आपल्यापर्यंत पोहोचतच नाहीत असे सहसा होत नाही.

पण वरील सर्व आचार्यांच्या आणि सांख्य-योगादि दर्शनकारांच्या तुलनेत विवेकानंदांकडे पाहायला गेले की गोंधळ होतो. त्यांच्या तत्त्वज्ञानाबद्दल नेमके काही सांगणे अवघड होऊन बसते. विवेकानंद प्रेरणादायी असले तरी तत्त्वज्ञ म्हणून भारतीय विचारांच्या क्षेत्रात त्यांचे नेमके काय स्थान आहे याबाबत मनात प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काय असावे यामागचे कारण?

कदाचित ‘विवेकानंदांचे नेमके तत्त्वज्ञान काय हे थोडक्यात सांगणे अवघड वाटते’ या माझ्या मताशी अनेक वाचक सहमत होणार नाहीत. माझ्या अभ्यासाच्या पद्धतीतच काही उणिवा असतील, आहेत हे मान्य केल्यानंतरही विवेकानंदांचे तत्त्वज्ञान थोडक्यात कसे सांगता येईल हा मूळ प्रश्न तसाच राहतो. विवेकानंदांचे तत्त्वज्ञानविषयक विचार सुसंगतपणे सापडत नाहीत यामागे काही विशिष्ट कारणे आहेत. ती आपण नीट समजून घेतली पाहिजेत.

वेदान्त संप्रदायाच्या पाचही आचार्यांचा विचार आपण यापूर्वी समजून घेतला आहे. त्यांच्या मांडणीतील क्रमबद्धता, सूत्रबद्धता, तार्किक संगती या सा-यांचा आपल्यावर कळत नकळत परिणाम होतो. त्यांचे जे काही विचार आपण वाचतो, निदान त्या क्षणापुरते तरी ते आपल्याला प्रभावित करुन जातात, ते पूर्णत: खरे आणि विश्वसनीय वाटतात.

या ठिकाणी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की, या आचार्यांना काय किंवा इतर कोणत्याही सांप्रदायिक तत्त्वप्रणालीला काय, स्वत:च्या विचारांचा प्रसार करायचा असतो. त्यामुळे काही विशिष्ट हेतू नजरेसमोर ठेवून; प्रतिपक्षाचा अंदाज घेऊन; वेळप्रसंगी प्रतिपक्षावर प्रखर टीका करुन; जुन्या ग्रंथांचा आधार घेऊन त्यांनी आपल्या विषयांची मांडणी केली आहे. यात वावगे असे काहीच नाही कारण तीच त्यावेळची सर्वमान्य पद्धत होती. पण विवेकानंदांच्या विचारांच्या बाबतीत यातली एकही गोष्ट सातत्याने घडताना दिसत नाही. मला इतर कोणावर आणि सन्मान्य आचार्यांवर टीका करायची नाही; आणि त्यांच्यापेक्षा विवेकानंद श्रेष्ठ आहेत असा दावाही करायचा नाही. पण पारंपरिक तत्त्ववेत्ते- आचार्य- गुरु यापेक्षा विवेकानंद काहीसे वेगळे आहेत असे माझे मत झाले आहे.

विवेकानंदांच्या तत्त्वज्ञानाची पार्श्वभूमी आपण नीट समजावून घेतली पाहिजे. औपचारिकदृष्टया पाहायचे झाल्यास ते तत्त्वज्ञानाचे ना विद्यार्थी होते ना अध्यापक! कोणत्याही पारंपरिक संप्रदायात त्यांनी शिक्षण घेतले नव्हते. त्यामुळे अनेक वेळा विवेकानंद वाड्मयात आपल्याला पारिभाषिक शब्द आढळत नाहीत. विवेकानंदांचे आयुष्य आणि त्यांचा स्वभाव पाहिला तर जेथे कोठे जे काही नवे, चांगले शिकायला मिळेल, ते शिकण्याची, त्याचा इतर विचारांशी योग्य तो समन्वय साधण्याची त्यांची नेहमीच तयारी होती असे दिसते. ते शिकागोला गेले, सर्वधर्मपरिषदेतील त्यांचे भाषण गाजले म्हणून मार्गदर्शकाची, उपदेशकाची भूमिका त्यांच्या वाटयाला आली. पण तो त्यांचा खरा स्वभाव नव्हता.

सामान्यत: लोक विवेकानंदांना ज्ञानयोगी समजतात. पण विवेकानंद अत्यंत भावनाशील होते. त्यांची असंख्य पत्रे त्यांच्या या भावनाशील स्वभावाची साक्ष देतात. त्या त्या परिस्थितीत जे उत्तर योग्य वाटले ते ते विवेकानंद देत गेले. आपल्या मागच्या पुढच्या विधानाशी त्याची काही सुसंगती आहे की नाही, हेही त्यांनी कधी तपासून पाहिले नाही. त्यामुळे त्यांच्या विधानांमध्ये खूप वेळा विस्कळीतपणाच नव्हे तर विसंगतीही आढळते.

विवेकानंदांमध्ये पंथीय अभिनिवेश अजिबात नव्हता. 'ज्याला त्याला आपापल्या मार्गाने जाऊ देण्यातच त्या व्यक्तीचे भले आहे’ अशी त्यांची भूमिका होती. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला कोंडीत पकडून तिचा पराभव करण्याची त्यांना फारशी कधी गरज भासली नाही. समोरच्या माणसाची जी क्षमता असेल; जडणघडण असेल; त्या अनुषंगाने त्या व्यक्तीला अधिक वरच्या पातळीवर नेण्याचे काम केले पाहिजे अशी विवेकानंदांची धारणा होती. त्यामुळे विवेकानंदांनी काय सांगितले आहे हे पाहताना ते कोठे आणि कोणाला सांगितले आहे हा संदर्भ लक्षात घेणे गरजेचे आहे.

विवेकानंद साहित्याच्या माध्यमातून जे काही आपल्या हाती लागले आहे, त्याचा विचार केला असता एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते; ती अशी की, त्यातील बहुतेक सारी व्याख्याने, भाषणे आहेत. 'राजयोग’ आणि ‘उदबोधन’ साठी लिहिलेले काही लेख वगळता सारी व्याख्यानेच आहेत. ही व्याख्याने टिपणांवरुन, इतरांनी घेतलेल्या नोंदींवरुन, पुन्हा तिस-या व्यक्तीने लिहिली आहेत – स्वत: विवेकानंदांनी नाही. तत्त्वज्ञानासारख्या विषयावर व्याख्यान देणे आणि एका जागी बैठक मारुन आपण स्वत: ते लिहिणे या दोन प्रक्रियांमध्ये फार मोठा फरक आहे.

विशिष्ट तत्त्वज्ञानाचा प्रसार करणे हाही विवेकानंदांचा हेतू नव्हता. अमेरिकेतील त्यांच्या अनेक व्याख्यानांमध्ये त्यांनी स्वत:च्या विधानांच्या पुष्टयर्थ बायबलमधील दाखले दिले आहेत. कारण श्रोत्यांना आपण काय म्हणतो आहोत ते समजावे अशीच त्यामागची भूमिका होती. ‘हिंदू’ दाखले ख्रिश्चन धर्माच्या व्यक्तींना समजणे अवघड गेले असते. ज्याला जे माहिती आहे, त्या संदर्भ चौकटीत बोलावे – असा संवादाचा संकेत विवेकानंद पाळतात. लोकांनी फक्त आपले म्हणणे ऐकावे आणि आपली वाहवा करावी - याऐवजी लोकांच्या जीवनात आंतरिक इच्छेतून; आंधळेपणाने नाही तर जागरुक विचारांतून, आतून परिवर्तन यावे ही विवेकानंदांची भूमिका होती.

पारिभाषिक शब्दांचे मायाजाळ विवेकानंदांनी जाणीवपूर्वक टाळलेले दिसते. तत्त्वज्ञानात त्यांना शास्त्रीय अथवा शैक्षणिकदृष्टया रस नव्हता, तर जीवनदृष्टया रस होता. विवेकानंदांची भूमिका सदैव लोकशिक्षकाची होती. त्यामुळे त्यांनी नेहमीच शक्यतो साधी, सोपी, सरळ भाषा वापरली आहे. त्यांच्या भाषेत पांडित्याचा आवेश क्वचितच आढळतो. ज्या व्यक्तीला लोकांसाठी व लोकांबरोबर काम करायचे आहे त्या व्यक्तीला लोकभाषेतच बोलावे लागते - तरच त्याचे/तिचे काम यशस्वी होण्याची शक्यता वाढते – हे जणू विवेकानंद स्वत:च्या कृतीतून आपल्याला सांगत आहेत.

विवेकानंदांनी जी काही भाषणे दिली, त्यातील बहुतेक भाषणे उत्स्फूर्त होती. अगदी सर्वधर्मपरिषदेतील उदघाटनप्रसंगीचे त्यांचे भाषणही विचारपूर्वक, मुददे काढून, आधी तयारी करुन, ठरवून केलेले नव्हते, तर ते प्रसंगी स्फुरलेले होते. उत्स्फूर्तता हा त्यांचा स्वभावच होता. त्यामुळेही त्यांच्या विचारांतील तार्किक संगती शोधणे आपल्याला अवघड जाते.

विवेकानंदांनी पाश्चिमात्य देशांमध्ये केलेली भाषणे आणि भारतातील लोकांना केलेले मार्गदर्शन यामध्ये बराच विरोधाभास दिसतो. हे असे का - याचेही उत्तर पूर्वी येऊन गेले आहे. विवेकानंदांच्या मते ‘तमसात गाढ निद्रिस्त असणा-या भारताला मोठा आरडाओरडा करुन, गोंधळ उडवून देऊन झोपेतून जागे केले पाहिजे’. त्याउलट अमेरिका, इंग्लंड येथे अति राजसिक वृत्तीचे लोक! त्यांना वेगळयाच प्रकारचे मार्गदर्शन करायला हवे. मतभिन्नतेबददल आदर राखून, मनात सर्व मार्गांबददल उदारता ठेवून जिची/ज्याची जी गरज तिला/त्याला ते सांगायचे हेच विवेकानंदांचे ब्रीद होते. शिवाय या सर्व उपदेशाचा नीट बसून विचार करायलाही त्यांना आयुष्यभरात कधीही उसंत मिळाली नाही की कधी निवांतपणा लाभला नाही.

पौर्वात्य आणि पाशिचमात्य अशा दोन वेगवेगळया संस्कृतीतील लोकांच्या संपर्कात येताना विवेकानंदांना एक गोष्ट स्पष्टपणे जाणवली अन ती म्हणजे तत्त्वज्ञान हा निव्वळ पोकळ बडबडीचा विषय झाला आहे. 'सर्वं खल्विदं ब्रह्म’चा जप करणारे सावलीचा विटाळ मानण्यात गर्क होते तर ख्रिस्ताच्या अनुयायांनीच येशूसाठी हजारो नवे क्रूस उभारले होते. अनेक सामाजिक प्रश्नांचा ऊहापोह तत्त्ववेत्त्यांनी करणे ही त्या काळाची गरज होती. विधवाविवाह, जातिव्यवस्था, बालविवाह अशा अनेक समस्यांवर विवेकानंदांना बोलावे लागले आहे. प्लेग आणि दुष्काळात नि:स्वार्थी वृत्तीने झटणारे कार्यकर्ते त्यांना करावे लागले आहेत. या कार्यकर्त्यांनी पैशांचे हिशोब कसे राखावेत, अहवाल कसे लिहावेत यासंबंधी विवेकानंदांना बोलावे लागले आहे. हे विषय तसे पाहता तत्त्वज्ञानाच्या कक्षेत येत नाहीत. पण विवेकानंदांची या सेवाकार्यांमागची भूमिका वेदान्त्याची होती. विवेकानंदांचे तत्त्वज्ञान परंपरागत विचारांच्या पठडीत बसत नसल्याने आपल्याला ते वेगळे वाटते इतकेच खरे आहे!

विसाव्या शतकातील जगाचे, भारताचे आणि त्यामुळे विवेकानंदांचे प्रश्नही वेगळेच होते. ही जाणीव आपण जर सतत मनात ठेवली तर विवेकानंदांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास, त्याचे रहस्य आपल्यासाठी पुन्हा एकदा खुले होऊ शकते. विवेकानंदांच्या या परिस्थितीची जाणीव श्री. वसंतकुमार लाल यांच्या विवेचनात आढळते. ते म्हणतात, “It is difficult to reduce the teachings of a social reformer and a religious teacher, into the technical mould of academic philosophy. The reasons are simple: a preacher or a religious teacher does not merely seek to satisfy the intellectual curiousity of man; he appeals to feelings and fancy as well; as such he does not feel the need of observing the rules of logic. Moreover, one who is basically interested in the practical affairs of life, does not have the time to care for any discrepancies and contradictions involved in the theory side of the problem. In the comprehensive sweep and the feeling approach of the religious teacher, contradictions just melt away!”

विवेकानंद वाचताना श्री. लाल यांचे मत अगदी तंतोतंत पटून जाते आणि केवळ विसंगतीवरच लक्ष केंद्रित न करता विवेकानंद विचार व्यवस्थित समजून घेण्याची आपली प्रक्रिया सुरु होते. वरवर दिसणा-या विसंगतीच्या आड लपलेली सुसंगती मग दिसू लागते.

***
'विवेकानंदांचा वेदान्त विचार' या प्रसिद्ध झालेल्या पुस्तकातील एक प्रकरण.

मांडणीधर्मविचार

प्रतिक्रिया

आतिवास's picture

16 Jul 2014 - 2:03 pm | आतिवास

'पाशिचमात्य' ऐवजी 'पाश्चिमात्य' असे वाचावे.
क्षमस्व.
कितीही तपासून पाहिले लेखन, तरी काही चुका नंतरच दिसतात!!

कवितानागेश's picture

16 Jul 2014 - 2:13 pm | कवितानागेश

... वाचतेय. :)

मुक्त विहारि's picture

16 Jul 2014 - 3:05 pm | मुक्त विहारि

स्वामी विवेकानंदांचे एक पण पुस्तक वाचले नाही.

आता ह्या वर्षी खरेदी करावी म्हणतो.

ज्ञानोबाचे पैजार's picture

16 Jul 2014 - 3:40 pm | ज्ञानोबाचे पैजार

विवेकानंद आचार्य किंवा आध्यात्मीक गुरु न वाटता, खांद्यावर हात ठेवत बोलणार्‍या जिवाभावाच्या मित्रा सारखे वाटतात.

प्रत्येक गोष्ट ते तर्काने पटवुन देतात.

याच मुळे तरुणवयातच त्यांच्या कडे आकर्षीत झालेले बरेच जण भेटतात.

पैजारबुवा,

प्रत्येक गोष्ट ते तर्काने पटवुन देतात.
याविषयी किंचित असहमती. माझ्या मते विवेकानंद अनेकदा भावनेला आवाहन करतात.
पण अर्थात वाचकांना विवेकानंदांच्या शब्दांकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याचा हक्क आहे - अशा विविधतेमुळे बिघडत काहीच नाही; उलट वेगळा दृष्टिकोन मिळतो.

ज्ञानोबाचे पैजार's picture

20 Jul 2014 - 1:10 pm | ज्ञानोबाचे पैजार

प्रत्येक गोष्ट ते तर्काने पटवुन देतात.

याचे सगळ्यात सुंदर उदाहरण म्हणजे "ज्ञानयोग".

हं.. काही वेळा त्यांचे व्याख्यान भावनीक वाटते खरे, पण ते बहुदा काळाची गरज म्हणुन असावे.

पैजारबुवा,

'ज्ञानयोग' तर्काधारित आहे - सहमत.

सुहास..'s picture

21 Aug 2014 - 1:31 pm | सुहास..

+१

वाद असु शकतो , पण ईग्नोर करु शकत नाही :)

प्रभाकर पेठकर's picture

16 Jul 2014 - 4:39 pm | प्रभाकर पेठकर

विवेकानंदांचे, 'ब्रह्मचर्य हेच जिवन' नांवाचे पुस्तक चाळले होते. ते वाचायची खुप इच्छा होती पण नंतर लग्न झाले.

माझ्या स्मरणानुसार तुम्ही उल्लेख केलेले पुस्तक स्वामी शिवानंद यांचे असावे. विवेकानंद यांचे या शीर्षकाचे पुस्तक माझ्या पाहण्यात नाही - असल्यास मला कल्पना नाही.

सविता००१'s picture

16 Jul 2014 - 4:59 pm | सविता००१

सुरेख लिखाण

भृशुंडी's picture

16 Jul 2014 - 11:26 pm | भृशुंडी

छान आहे लेख.

आयुष्याबद्दल विचार करणा-यांच्या वाटेवर बहुधा विवेकानंद नावाचा हा टप्पा कधी ना कधी येतोच.

अगदी! काही कालखंड असा असतो जेव्हा विवेकानंद तुम्हाला भारून टाकतात. विद्यार्थी असताना जर विवेकानंदांनी झपाटलं, तर परिणाम काहीसे अनपेक्षित असू शकतात.
वैयक्तिक अनुभवावरून तरी असं जाणवलंय की त्यांची भाषा ही कमालीची सरळ आणि अभिनिवेशरहित आहे.
तत्वज्ञान वगैरे काहीतरी अगम्य वाचतो आहोत, असं अजीबात वाटत नाही. एखादा शिक्षक समोरच्या विद्यार्थ्याला जसा समजावून (उदाहरणांसहित) सांगतो, तसं काहीसं वाटतं. आणि सर्वात भावते ती गोष्ट म्हणजे तुम्ही लेखात लिहिल्याप्रमाणे "विवेकानंदांचा व्यावहारीक दृष्टीकोन"!

प्यारे१'s picture

18 Jul 2014 - 3:12 am | प्यारे१

खूपच छान आढावा.

स्वामी विवेकानंदांच्या विचारांची खोली नि उंची दोन्ही अफाट होतं एवढंच म्हणू शकतो. नतमस्तक!

नितिन थत्ते's picture

20 Jul 2014 - 4:44 pm | नितिन थत्ते

लेख आणि मांडणी आवडली.

आतिवास's picture

21 Jul 2014 - 10:50 am | आतिवास

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार.
आपण पुस्तक वाचल्यास त्यावरचा अभिप्राय (बरा अथवा वाईट कसाही) मला अवश्य कळवावा म्हणजे माझ्या यापुढील लेखनात सुधारणा होण्याची शक्यता वाढेल.

मदनबाण's picture

21 Jul 2014 - 11:36 am | मदनबाण

स्वांमींच्या बद्धल काही बोलण्याची पात्रता नाही,त्यांच्या विषयी वाचण्यास त्यांचे Quotes कारणीभूत ठरले.
अनेक वर्षांपूर्वी मी रिलायन्स इन्फोकॉम मधे कंत्राटी पद्धतीने कामावर होतो, तेव्हा तिथल्या एका व्यक्तीच्या डेस्कवर त्यांचे काही Quotes असलेली एक प्रिंट आउट होती, त्यांना मी विचारले जर तुमची परवानगी असेल तर याची एक कॉपी मी काढुन घेउ का ? त्यांनी आनंदाने ती प्रिंट आउट दिली, ही कॉपी अनेक वर्ष माझ्या जवळ होती आणि तिथुनच त्यांच्या विषयी वाचण्याची प्रेरणा मला मिळाली. :)

आताही त्यांचा एक Quote देतो...
You have to grow from the inside out. None can teach you, none can make you spiritual. There is no other teacher but your own soul.
Swami Vivekananda

आजची स्वाक्षरी :- महाराष्ट्रावर वरूणराजाची अवकृपा

आतिवास's picture

22 Jul 2014 - 9:51 am | आतिवास

अशा ब-याच ठिकाणी स्वामी विवेकानंदांचे quotes वाचायला मिळतात. रामकृष्ण मठाने १९८७ मध्ये 'संचयनी' नामक विवेकानंद साहित्याचे संकलन (स्वामीजींच्या १२५ व्या जयंतीनिमित्त) प्रसिद्ध केले आहे. ते मिळाले तर अवश्य वाचा. मग तुमच्या आवडीनुसार (आणि सवडीनुसार) इतरही साहित्य वाचता येईल.

पैसा's picture

21 Aug 2014 - 2:13 pm | पैसा

थोडक्यात पण अगदी नेमकी ओळख करून देणारा.

प्राची अश्विनी's picture

3 Mar 2016 - 8:49 pm | प्राची अश्विनी

किती नेमकं लिहिलय!

स्वामी संकेतानंद's picture

3 Mar 2016 - 9:12 pm | स्वामी संकेतानंद

अगदी नेमके.

बोका-ए-आझम's picture

4 Mar 2016 - 12:15 am | बोका-ए-आझम

हे पुस्तक प्रदर्शित झालंय का?

बोका-ए-आझम's picture

4 Mar 2016 - 12:15 am | बोका-ए-आझम

कुठे मिळू शकेल हे विचारायचं होतं.

श्रीरंग_जोशी's picture

4 Mar 2016 - 12:22 am | श्रीरंग_जोशी
बोका-ए-आझम's picture

4 Mar 2016 - 12:55 am | बोका-ए-आझम

जरुर वाचेन!