मला अश्या ठिकाणी भूतांची भीती वाटते. काळोखात बाहेर येउन बघितलं तर लांब लांब पर्यंत कोणीच नव्हते. अश्या वेळेस तर मला चारी बाजूनी भूतेच दिसू लागतात. मनाला माहिती आहे कि, भूत भीत काही नसतं. पण अशी वेळ आली कि चांगलीच फाटते. दिवसा मी सिद्ध करू शकतो कि, भूत भीत काही नसते. पण अश्या शांत रात्री एकटे असताना.... सिद्ध करायचे तर बाजूलाच राहिले. विचार करूनच भीती वाटते. तंबू लावल्या नंतर जे मी स्लीपिंग बैग मध्ये घुसलो. सकाळ होई पर्यंत डोळे उघडलेच नाही.
आज 70 किलोमीटर सायकल चालवली.
दिवस सतरावा
इथे कोणतेच झाड नव्हते. सुर्य आग ओतत होता. या आगीच्या झळा तंबूच्या आत पर्यंत लागत होत्या. तंबूच्या बाहेर पडलो तर थंड हवेने माझे स्वागत केले. पटापट तंबू काढला. साडे आठ वाजले होते. बाहेर खूप सारे कामगार आले होते. पण तो लद्दाखी चौकीदार दिसत नव्हता. मी कामगारांना त्याच्या बद्दल विचारले तर, म्हणाले ,"यहां चौकीदारी की रात की ही ड्यूटी होती है, दिन में वो अपने घर चला जाता है." पण खरी परिस्थिती त्यांना माहित नव्हती. मला माहित होते कि, हा संपूर्ण रात्र आपल्या घरीच होता.
सव्वा नऊ वाजता तेथून निघालो. फोतूला अजून पण आठ किलोमीटर आहे. चढाई तर आहेच आणि त्यात वळणे पण आहेत. फोतूलाच्या चार किलोमीटर आधी पासूनच खराब रस्ता सुरु होतो. रस्त्याचे डागदुजीचे काम चालू असल्याने धूळ पण उडत होती. त्याने सायकल चालवायला अजूनच त्रास पडत होता. तहान लागली होती. जवळ पाणी पण नव्हते. एका ठिकाणी कार उभी दिसली. मी त्यांच्या पाशी जाउन उभा राहिलो. त्यांनी मग विचारपूस केली. तिथेच पाण्याची बाटली पण भरून मिळाली.
अकरा वाजता ४०८८ मीटर ऊंच फोतूला वर पोहोचलो. हा लेह-श्रीनगर रोड वरील सगळ्या घाटा पेक्षा सर्वात उंच घाट आहे. हा घाट पार करून आनंद झाला कारण इथून पुढे जे घाट मिळतील ते ह्याच्या पेक्षा लहानच असणार. इथे दूरदर्शनच प्रसारण केन्द्र पण आहे.
फोतूला पासून १२ किलोमीटर पुढे हानिसकोट गांव आहे. रस्ता उताराचा आहे. खाली उतरत होतो तर रस्त्यात काही मोटारसायकल वाले भेटले. लेह आणि पुढे मनालीला जाणारे होते. माझा चेहरा पूर्ण झाकलेला असल्याने, त्यांनी ओळखलं नाही कि मी भारतीय आहे कि विदेशी. मी जेव्हा जोरात खाली उतरत होतो तर त्यातील एकाने दुसऱ्याला आवाज दिला कि,"ओये, इसे रोक, साइकिल वाले को. विदेशी है. बातचीत करेंगे." आपल्या भारतीय लोकांची सवय आहे कि, त्यांना विदेशी लोकां बरोबर बोलायची, त्यांच्या विषयी जाणून घ्यायची इच्छा असते. इथे त्यांच्या साठी मी विदेशी होतो. त्यांचे बोलणे ऐकून मीच थांबलो. मी थांबताच सगळे माझ्या जवळ आले आणि विचारायला लागले, "सर, यू आर फ्रोम?
मी म्हंटले, "भाई, दिल्ली."
सगळी कडे हशाच पिकला आणि म्हणायला लागले,"भाई ,धीरे का झटका जोर से लगा."
ते दिल्ली चे होते. त्यांच्या कडे भारीतल्या मोटार सायकली होत्या. तरी पण म्हणायला लागले कि, "हमारी हालत खराब हुई जा रही है. चढाई पर मोटरसाइकिलें बहुत तंग करती हैं. चढती ही नहीं हैं, पता नहीं तुम कैसे साइकिल चढा लेते हो?
सगळ्यांनी माझे आणि सायकलीचे फोटो काढले.
हानिसकोट पासून ९ किलोमीटर पुढे बौद्ध खारबू आहे. हि जागा कारगिल जिल्ह्या मध्ये येते. लद्दाख मध्ये दोन जिल्हे आहेत. लेह आणि कारगिल. लेह जिथे बौद्ध लोक वस्तीचे आहे तर कारगिल हे मुस्लिम लोक वस्ती चे आहे. आता डोके झाकलेल्या मुसलमान मुली पण दिसू लागल्या होत्या. लहान लहान मुली पण डोके झाकून होत्या. कारगिल जिल्ह्यात खारबू नावाचे दोन गांव आहेत. हे बौद्ध खारबू आहे. दुसरे खारबू हे मुस्लिम लोक वस्ती चे आहे आणि कारगिल-द्रासच्य मधी आहे. मी उद्या तिथूनच जाणार आहे.
बौद्ध खारबू हे ३५०० मीटर उंचा वरती आहे. गावा मध्ये हिरवळ आहे. पण आजू बाजूचे डोंगर लद्दाखी आहेत म्हणजेच सूखे आहेत. खूप उन होतं. आकाशात ढंगाचे नामोनिशान नव्हते. पावणे एक वाजता तिथे पोहोचलो तर गरम होत होते. सव्वा तास ढाब्या मध्ये थांबलो. जेवण आणि थोडी झोप घेतली.
बौद्ध खारबूच्या मधून एक नदी वाहते जी पुढे जाउन सिन्धुला मिळते. एक रस्ता पण सिन्धु च्या बाजूला गेला आहे. आणि त्याच खालसी-बटालिक रस्त्याला जाउन मिळतो. जे मी काल बघितले होते. आपण जर ह्याच नदीच्या कडे कडेने गेलो तर त्या बटालिक च्या रस्त्यावर पोहोचतो. पण तिथे जायला परमिट घ्यावे लागते. त्यामुळे कारगिल ला जाण्यासाठी अजून एक घाट पार करावा लागणार आहे. त्याचा नाव आहे - नामिकला.
बौद्ध खारबू पासून ७ किलोमीटर पुढे खंगराल आहे. रस्ता हा इथून उताराचा आहे. तसेच नदी बरोबरीने जात आहे. खंगराल पासुन ११ किलोमीटर पुढे नामिकला आहे. आणि तिथून रस्ता चढाई चा आहे. रस्ता चांगला बनवला आहे. मी याच रस्त्या वरून हळू हळू चाललो होतो. तितक्यात एक मारुति आली. मी चार च्या वेगाने चाललो असेल तर मारुती ५ च्या वेगाने चालली होती. त्यामुळे पुढे गेली. काही तरी गडबड होती त्यामध्ये. पूर्ण कुटुंब बसलेलं होतं त्यामध्ये. पुढे ती मारुती पुढच्या वळणावर माझ्या नजरेतून गायब झाली. मी त्याच वळणावर जेव्हा आलो तेव्हा ती बिचारी तिथे उभी होती. त्यातली लोक बाहेर येउन फिरत होते. मी पुढे निघून गेलो. परत एक किलोमीटर नंतर तसे झाले. त्या मारुति ने मला परत मागे टाकले. आणि पुढे जाउन थांबली. मी तसाच पुढे निघून गेलो. असे दोन तीन वेळा झाले. चौथ्या वेळेस तर ते माझ्या कडे बघत हसत गेले. मी पण त्यांना हसत मागे टाकले. जशी काय आमची स्पर्धा लागली होती. शेवटी कायमचीच ती मारुती माझ्या नजरे आड झाली.
चार वाजता ३६०० मीटर ची उंची पार केली तेव्हा तेथून नामिकला सहा किलोमीटर राहिले होते. सायकल चालवणे अवघड वाटू लागले होते. हा उंच पर्वतीय आजार नव्हता. मी सारखं ४००० मीटर च्या वरती सायकल चालवत होतो. त्यात आज फोतूला पण पार केले होते. आज सकाळ पासून जसी सायकल मारायला सुरुवात केलीय तसे चढाई च होती. फक्त फोतूला पासून बौद्ध खारबू पर्यंतच उतार होता. जस जस नामिकला जवळ येऊ लागलं. तस तस शरीर पण मनाई करू लागलं. शेवटी हालत इतकी खराब झाली कि, २ किमी पायाने चालावे लागले.
पाच वाजता नामिकला पोहोचलो. याची उंची ३८२० मीटर आहे. इथल्या सूचना पट्टी वर उंची १२१९८ फुट लिहिलेली आहे. म्हणजेच ३७१८ मीटर. माझं जीपीएस ३८२० मीटर सांगत होतं. मी माझ्याच मशीन वरती विश्वास ठेवणार!! इथे सुंदर नजारा पाहायला मिळतो. एका दिशेला मोठ मोठे लांब वाळूचे डोंगर,त्या नंतर दगडी पर्वत.
घाट पार केल्यानंतर उतार पाहायला मिळतो. पण नामिकला ह्याला अपवाद आहे. जवळ जवळ दोन किलोमीटर नंतर उतार अजिबात नाही तर चढाई आहे. माझ्या मशीन ने तर दोन किलोमीटर पुढे गेल्यावर ३८२३ मीटर उंची दाखवली. म्हणजे नामिकला पेक्षा उंच. त्यानंतर जोराचा उतार लागतो. रस्ता चांगला आहे. सायकल चालवायला मजा येत होती.
मुलबेक च्य तीन किलोमीटर अलीकडे वाखा आहे. मला इथे मुसलमान बघायला मिळाले. अजून पर्यंत लेह मध्ये थोडे फार मुसलमान पाहायला मिळाले होते. म्हणजे आता मुसलमानाची सुरुवात झाली आहे. तिकडे तीन किलोमीटर पुढे मुलबेक आहे. जे बौद्धोंचे शेवटचे गांव आहे. वाखा-मुलबेक मुस्लिम-बौद्ध सीमारेषा आहे. इथून कारगिल च्या तिकडे गेलो तर मुसलमान आणि लेह च्या बाजूला गेलो तर बौद्ध.
३२५० मीटरच्या ऊंचाई वरती वसलेल्या मुलबेक मध्ये पावणे सात वाजता एक गेस्ट हाउस मध्ये खोली घेतली. चारशे वरून कमी करून तीनशे ला खोली मिळाली. इथे खूप सारे गेस्ट हाउस आहे. तिथे चारशे ते पाचशे पर्यंत रेट आहेत. या आधी एका गेस्ट हाउस मध्ये गेलो होतो. त्याने पाचशे सांगितले. तो चारशे पर्यंत आला होता. मी म्हटले तीनशे. तर तो म्हणाला कि, "मुलबेक से एक किलोमीटर नीचे कई गेस्ट हाउस हैं. वहां अगर इससे कम में मिल जाये तो कहना. आखिरकार आपको लौटकर मेरे पास ही आना पडेगा."
पण अशी वेळ नाही आली. इथेच तीनशे ला मिळाली.
मुलबेक मध्ये बुद्ध ची एक विशालकाय मूर्ति आहे जी मोठ्या दगडावर बनवली आहे. नसीब धर्मांतराच्या वेळेस लद्दाखी मुसलमानांनी याला सोडून दिलं. मुलबेक याच्यासाठीच प्रसिद्ध आहे. गेस्ट हाउसला जाताना माझ्याच रस्त्यावर दिसली होती. विचार केला कि सकाळी निघताना बघू.
आज ५९ किलोमीटर सायकल चालवली ज्या मध्ये दोन घाट फोतूला आणि नामिकला पण पार केले. दोघान मध्ये अंतर जास्त नव्हते. पण सायकल वरून ४१०० मीटर आणि ३८०० चे दोन घाट पार करणे म्हणजे चेष्टा नाही.
फोतूला च्या तिथे लावलेला तम्बु
फोतूला कडे
फोतुला जास्त लाम्ब नाहि
रस्त्यामधे भेटलेले मोटारसायकल वाले
बौद्ध खारबू गांव
नामिकला जानारा रस्ता
समोर नामिकला आहे.
आजच नामिकलापण पार केला. एका दिवसात दोन घाट
मुलबेक मधे ह्याच गेस्ट हाउस मधे थाबलो होतो.
माझी खोली
लाइट गेली म्हणुन मेनबत्ती लावुन जेवन केले. कैण्डल लाइट डिनर!!
(क्रमशः)
प्रतिक्रिया
14 Feb 2016 - 8:08 pm | एस
दरवेळेस काय प्रतिक्रिया द्यावी असा प्रश्न पडतो!
पुभाप्र!
15 Feb 2016 - 11:40 am | वेल्लाभट
+१११११११११११
14 Feb 2016 - 9:04 pm | प्रचेतस
मस्त. हा भागही आवडला.
रखरखीत सौंदर्य.
14 Feb 2016 - 9:06 pm | यशोधरा
आवडला हा भाग.
15 Feb 2016 - 3:18 pm | हरिहर
निव्वळ अप्रतीम. सगळे लेख वाचले. अवाक!