मेथी मलई मटर
साहित्यः
१ जूडी मेथी (२ वाटी पाने)
१ वाटी हिरवे मटार (वाफवुन घेणे)
मसाला:
४ कांदे मध्यम (मिक्सर मधून बारीक करणे/ किसणे)
१ च.लसूण पेस्ट
१ च. मिरची पेस्ट
१ मसाला वेलदोडा,२ साधे वेलदोडे,४ लवंगा,१ दलचिनी तुकडा हे थोडे गरम करून बारीक पूड करणे.
३ टे.स्पून तेल
१टे.स्पून बटर
१टे.स्पून क्रीम (दुधाची साय फेटुन घेणे)
१ कप कोमट दूध
मीठ आणि साखर चवीनुसार
१.प्रथम तेल आणि बटर घेऊन त्यात कांदा(सुटलेल्या पाण्यासकट) मंद आचेवर परतणे.
त्याचा कच्चा वास गेला की त्यात लसूण आणि मिरची पेस्ट घालून परतणे.
नंतर मसाला पूड (वेलदोडे,.....) घालणे.
२.त्यानंतर न चिरता मेथीची पाने टाकून परतणे. मेथी शिजल्यावर,वाफवलेले मटार घालणे.
३.नंतर दुध घालून मंद आचेवर शिजू द्यावे. नंतर क्रीम घालणे.
४.चवीनुसार मीठ, साखर घालून गरमच सर्व्ह करावे.
सर्व्ह करताना वरून थोडे क्रीम, चेरी, डाळींबाचे दाणे घालून सजवणे.
टीपः
१.पहिल्यांदा तेलात मेथीची पाने न टाकता, प्रथम सांगितल्याप्रमाणे सर्व भाजी करून सर्वात शेवटी म्हणजे सर्व्हीग करताना
थोड्या बटर मध्ये फक्त मेथीची पाने परतवुन नंतर भाजीत टाकावीत. मेथीचा रंग छान राहतो.
२.ताजी मेथी मिळाली नाही तर कसूरी मेथी वापरली तरी चालते.
३.१टे.स्पून खवा + १ कप कच्चे दुध घोटवून घातले तरी चालते.
४.खव्याऐवजी काजुची पेस्ट घातली तरी चालते.
५. मिरची व लसूण पेस्ट नको असल्यास, ते न घालता प्रथम तेलात २ लाल वाळलेल्या मिरच्या टाकाव्यात.
प्रतिक्रिया
20 Jan 2008 - 12:02 am | विसोबा खेचर
स्वातीजी, उत्तम पाककृती!
मेथी मलई मटर हा माझा अत्यंत आवडता पदार्थ आहे. एकंदरीतच मेथीची भाजी, वांग्याची भाजी हे माझे अत्यंत लाडके खाद्यपदार्थ आहेत...
स्वातीजी, मिसळपाववर आपल्याकडून आणीही अश्याच उत्तमोत्तम पाककृतींची अपेक्षा आहे. आपल्या पाककृतींमुळे मिसळपाव उत्तरोत्तर अधिक चविष्ट बनत राहो हीच शुभकामना..!
आपला,
(खादाड) तात्या.
20 Jan 2008 - 12:11 am | स्वाती राजेश
आभारी आहे.
तुमच्या सारखे खवय्ये असतील तर का नाही?
मी माझ्याकडून प्रयत्न करेनच उत्तम पाकक्रुती मिसळपाव वर देण्याचा.
20 Jan 2008 - 12:46 am | सुनील
दर आठवड्याला एक पाककृती देण्याचा उपक्रम चांगला आहे. मेथी मलई मटर तर उत्तमच जमलयं!
मेथीचा रंग जर तसाच ठेवायचा असेल तर अजून एक प्रकार करून बघता येईल. मेथीची पाने उकळत्या पाण्यात १-२ मिनिटे ठेवून लगेचच थडगार पाण्यात टाकायची. या पद्धतीला ब्लान्च म्हणतात. हेच पालकाबाबतही करता येईल.
आवडत असेल तर पनीरचे तुकडे किंचित तळून या भाजीत टाकता येतील. किंवा अगदी लहान बटाटे आधी उकडून मग थोडे तळून, अख्खेच टाकता येतील.
(खवैय्या) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
20 Jan 2008 - 1:47 am | स्वाती राजेश
मस्तच...सुनिल
असेच एक एक चेंजेस केले तर नविन नविन पदार्थ बनतील.
वरील प्रयोग लवकरच करेन.
अशाच प्रतिक्रिये मधून नविन शिकायला मिळते.
आभारी आहे.
22 Jan 2008 - 11:12 pm | संजय अभ्यंकर
परवा गावी (इंदूरला) लग्न कार्यासाठि जाउन आलो.
लग्नात खास माळवी बेत होता, दाल बाफल्यांचा.
दाल बाटी आणि दाल बाफल्यांमध्ये, दाल ही सामायीक आहे.
ही दाल पातळ अथवा फार घट्ट नसते, ती मध्यम असते. दाल ही तुर अथवा चण्याची असते. दालच्या जागी रतलामी शेवेची कांदा -टोमॅटो घातलेलि भाजी सुध्धा अप्रतीम लागते.
बाटी आणि बाफल्यातला फरक पुढील प्रमाणे:
बाटी:
माळवी गव्हाचे (अथवा उच्च प्रतीच्या गव्हाचे) पीठ आणि त्यात थोडे मक्याचे पीठ मिसळून घट्ट कणिक मळावी. मळताना साजुक तुपाचे भरपूर मोहन घालावे. ह्या कणकेचे मुठी एवढे गोळे करुन, ते गोवर्यांवर मंद पणे भाजले की बाटी तयार होते.
ही बाटी डाळीत अथवा साजुक तुपात कुस्करुन खातात. साजुक तुपात कुस्करताना काही लोक डाळि ऐवजी पीठी साखर ही मिसळतात.
बाफले:
माळवी गव्हाचे पीठ आणि त्यात थोडे मक्याचे पीठ मिसळून घट्ट कणिक मळावी. मळताना साजुक तुपाचे भरपूर मोहन घालावे. ह्या कणकेचे मुठी एवढे गोळे करुन ते पाण्यात उकळावेत. भरपूर उकळल्यावर ते पाण्यावर तरंगू लागतात.
ते तरंगू लागले की ते काढुन कोरडे करावेत. कोरडे झाल्यावर गोवर्यांवर मंदपणे भाजावेत.
हे बाफले बाटी प्रमाणे डाळीत अथवा साजुक तुपात कुस्करुन खातात. वरिल प्रमाणे साजुक तुप आणि पीठी साखरेत कुस्करुन बाफले खाणारे ही आहेत.
टीपः शहरात गोवरर्यांची भट्टी शक्य नसल्यांमुळे, साध्या ओव्हनचा (माइक्रो वेव नव्हे) उपयोग भाजण्यासाठी केला जातो.
संजय अभ्यंकर
22 Jan 2008 - 11:29 pm | चतुरंग
ये आपने अच्छा नहीं किया, दाल-बाटी की याद जो दिलायी! (ती सुध्दा माझं जेवण सुरु असताना!!)
माझं मूळ गाव अहमदनगर (अवांतर - एकही काना, मात्रा, वेलांटी नसलेलं!). आपल्याला ऐकून माहिती असलं तर इथे मारवाडी समाजाची भरपूर वस्ती.
माझेही खूपसे मित्र मारवाडी. त्यांच्यातल्या लग्नात मी आवर्जून दाल-बाटी, साजूक तूप व पिठीसाखर घातलेली चापायला जायचा!
(बाफले हा प्रकार मात्र पहिल्यांदाच ऐकतोय.)
बर्याच वर्षात तो योग नाही. इकडे अमेरिकेत तर काय विचारायची सोयच नाही.
असो, त्यानिमित्ताने आठवणी तरी जागल्या. धन्यवाद!
चतुरंग
22 Jan 2008 - 11:29 pm | सुनील
दाल बाटी / बाफल्याची पाककृती दिलीत हे चांगलेच! परंतु ती मेथी मलई मटर मध्ये देण्याऐवजी स्वतंत्रपणे दिली असतीत तर उत्तम झाले असते.
बाकी, मीदेखील दाल्-बाटी हा प्रकार इंदूरात खाल्ला होता बर्याच वर्षांपूर्वी. त्याची छान आठवण अजूनही जिभेवर आहे!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
22 Jan 2008 - 11:37 pm | संजय अभ्यंकर
चतुरंगजी, सुनीलजी,
प्रतिक्रियां बद्दल आभार.
दाल बाटी / बाफले हा प्रकार चतुरंगजीनी सांगितल्या प्रमाणे मारवाडी समाजातही लोकप्रिय आहे.
ह्या पाकक्रुती, पश्चिम म.प्र., पूर्व राजस्थान ह्या भागांत प्रचलित आहेत.
संजय अभ्यंकर
23 Jan 2008 - 8:43 am | प्राजु
विकपॉईंट... आहे.
त्यात ही मेथी मलाईमटर...
आजच आणली आहे मेथी.. करतेच थांब.
- प्राजु.
21 Oct 2015 - 4:17 pm | मनीषा
ही पाककॄती शोधत होते ...
सापडली
22 Oct 2015 - 5:16 am | असंका
अगदी सुरुवातीच्या दिवसातला घागा वर काढून आणल्याबद्दल धन्यवाद...
मेथी मटर मलाई आणि दाल बाटी दाल बाफले यात नक्की काय संबंध आहे याचा विचार करतोय....
22 Oct 2015 - 1:17 pm | कविता१९७८
वाह मस्त पाक्रु
22 Oct 2015 - 6:23 pm | प्रश्नलंका
वाह !! मस्तं रेसेपी चव तर मी प्रत्यक्ष घेतली च आहे :) स्वातीताईच्या हातची मेथी मटर मलाई अहाहा!! .. अजुन चव रेंगाळते आहे जीभेवर.. लाजवाब !!
22 Oct 2015 - 6:29 pm | अस्वस्थामा
नक्की कधी खाल्ली होती वो ? नै म्हंजे २००८ सालचा धागा आहे आणि अजून चव जीभेवर रेंगाळतेय म्हणून आपली "शंका" .. ;)
22 Oct 2015 - 6:39 pm | प्रश्नलंका
नुकतीच खाल्ली होती अनाहिता कट्ट्याला.. बाद्वे.. तुम्हाला काय करायच्यात हो नसत्या चौकश्या ;)
22 Oct 2015 - 9:28 pm | हाहा
अनाहिता होतं का तेंव्हा :प
23 Oct 2015 - 2:50 pm | विशाखा राऊत
मस्तच रेसेपी.. मी पण चाखलीय चव. भन्नाट लागते.