एकटा यात्री असलं कि, खूप मज्जा असते. आपण फक्त आदेश सोडायचे, बाकीच्यांनी त्याचे पालन करायचे. तुम्ही किचन ओट्यावरती पण मांडी खालून बसू शकता. स्वतः तव्यावर्ती रोट्या भाजू शकता. आपल्या हातानी कुकर मधला डाळ भात घेऊ शकता. मुख्य म्हणजे आपल्या शेजारी लद्दाखी बसला आहे, त्याच्याशी घर कुटुंबाची , लाख-दुनियाची गोष्टी करू शकता आणि शेवटी शुभरात्रि म्हणून गाड्यांच्या ढिगा वरती चादर घेऊन झोपू शकता.
काल ३७ आणि आज फक्त ११ च किमी सायकल चालवली.
दिवस दहावा
व्हिस्की ओढा आणि ब्राण्डी ओढा. यांची नावे ऐकून मला उत्सुकता लागली कि, ह्यांची नावे अशी का बर पडली असावीत. चौकशी केल्यावर कळले कि, या ठिकाणी व्हिस्की व ब्राण्डी चे ट्रक पलटी झाले होते. म्हणून यांना हि नावे पडली. हा रस्ता २० ते २५ वर्ष्यापासून अस्तित्वात आहे. त्या आधी पायवाट होती. म्हणजे ट्रक २० ते २५ वर्ष्या पासून जात असतील. आता हा शोध लावायला पाहिजे कि . पायवाटेच्या जमान्यात पण व्हिस्की ओढ्याला काय व्हिस्की ओढाच म्हणत होते.
झोपायची कोणतीच पर्वा केली नाही. जेव्हा शरीर म्हणायचं , ये उठ हिंडफिऱ्या. तेव्हा लगेच उठायचो.
कोणतीच जबरदस्ति नाही. साडे आठ वाजता डोळे उघडले. बाहेर येउन पाहिले तर ढग होते आणि हवा पण. कसला पावसाला आलाय? जेव्हा मी ४ जून ला दिल्लीवरून निघालो तेव्हा पाउस केरल ला येउन धडकला होता. एवढ्या आठ ते नऊ दिवसात त्यांनी हिमालय पार केला? कठीण आहे बाबा. पाच दिवसापूर्वी जेव्हा मी केलांग मध्ये होतो तेव्हा घरच्या बरोबर बोललो होतो. तेव्हा पावसाला उत्तर भारतात अजून आला नव्हता. पाच दिवसात मान्सून उत्तर भारत व्यापून टाकण, त्याच हिमालयात येणं आणि हिमालय पार करण. अशक्य !! हे दुसरंच काहीतरी आहे.
जेव्हा 10 वाजता इथून निघालो होतो तेव्हा सेरिंग साहेबांनी चोगलमसर इथे असणाऱ्या घराचा पत्ता आणि फोन नंबर दिला होता. मी दिल्लीत अधिकारी. त्यांना पण, त्यांच्या आठवीत शिकणाऱ्या मुलाला माझ्यासारखे बनवायचे होते. त्यामुळे ते त्यांच्या घरी मला बोलावत होते. त्यावेळी ते त्यांचा घरी नसतील पण घरातील सदस्य असतील. अश्या वेळेस त्यांच्या घरी जाणे बरोबर वाटत नाहीय. मी तर जाणारच नाही.
व्हिस्की ओढा पार करण्या साठी एक छोटासा पूल बनवलेला आहे. पुलावरून पाणी वाहत होतं. पण काही वाटले नाही. आरामशीर ओढा पार केला. आता पर्यंत किती तरी ओढे पार केले पण काही जाणवले नाही. व्हिस्की ओढयापाशी होतो तेव्हा असा ऐकलं होतं कि, पांग च्या आधी एक जोरात वाहणारा ओढा लागतो. जेव्हा मी सारचू मध्ये होतो तेव्हा एक गाडी रात्री उशिरा आली, ते पण याच ओढ्या मध्ये फसल्याने त्यांना उशीर झाला होता. हे ऐकून तर मला घामच फुटला. आता त्या ओढ्याची भेट लवकरच होणार आहे.
व्हिस्की ओढ्याचा पूल ४७३७ मीटर उंचीवर आहे. इथून ६ किमी वरती लाचुलुंग-ला आहे. ५०६० मीटर वरती. ४७३७ मीटर वरती झोपल्या मुळे हा फायदा झाला कि, न थकता, न पायाने चालता लाचुलुंग-ला पोहोचलो. रस्त्यात प्रत्येक ठिकाणी झारखण्डी लोक भेटली. झारखण्डी असून सुद्धा जुले म्हणून अभिनंदन करत होती. लाचुलुंग-ला हा मनाली लेह रस्त्यावरच्या पाच घाटा पैकी २ नंबरचा उंच घाट आहे. माझ्या मोबाईल मध्ये याची उंची ५०४७ मीटर उंच. आयुष्यात दुसर्यांदा ५००० मीटर वरच्या उंची वर चढलो. ह्या आधी श्रीखण्ड महादेव ला गेलो होतो तेव्हा ५२०० मीटर वर चढलो होतो. आता हे रेकॉर्ड पण तुटणार आहे कारण ह्याच रस्त्यावरती तंगलंग-ला ५३०० मीटर उंच आहे.
घाट हे नेहमीच देवाचे स्थान राहिले आहे. इथले स्थानिक लोक तसेच व्यापारी कित्तेक वर्ष्या पासून पार करत आलेत. त्यांचा असा विश्वास आहे कि, इथे एक देव बसलेला असतो. तो यात्रेकरूना सुरक्षित स्थळी पोहचवतो. त्यामुळे घाटावरती छोटे छोटे मंदिर,झेंडे आणि पताका असतात. इथे पण एक छोटे देवाचे मंदिर होते. चारी बाजूनी प्रार्थना लिहिलेले झेंडेच झेंडे होते. आत जाऊन पाया पडायला गेलो तर कळले कि, ते महादेवाचे मंदिर होते.
बारा वाजता इथून निघालो. २२ किमी पांग पर्यंत उताराच आहे. पण रस्ता खूप खराब. लाचुलुंग-ला वरून खाली आलो तर जोराचा पाउस सुरु झाला. मी लगेच रेनकोट काढला आणि सामानाला पण कवर घातला. एक परदेशी पण मोटारसायकल वरून पांग ला चालला होता. मला बघून म्हणाला कि, आर यू ओके? मी म्हटला, या या, ओके। बहुत बढिया। थैंक्यू।
दोन वाजता कंगलाजल ला पोहोचलो. ते ४६९४ मीटर उंच आहे. इथे लाचुलुंग-ला वरून येणार ओढा पार करावा लागतो. एकदम निमुळत्या जागेतून वाहत येतो. ह्याच्या दोन्ही बाजूला मोठ मोठे पर्वत आहेत आणि ओढ्यावरती पूल पण नाही. झारखण्डी कामगार इथे काम करत होते. हाच तो ओढा आहे. त्याच्या बद्दल मी सरचू मध्ये ऐकले होते. पण आज पाणी खूप कमी होतं. मी सायकल वरून न उतरताच ओढा पार केला. जेव्हा दिवसा खूप उन पडतं. तेव्हा बर्फ वितळून ओढ्याला खूप पाणी येत. आज उन नव्हतेच, त्यामुळे बर्फ वितळला नाही. पावसाळ्यात जेव्हा जोराचा पाउस पडतो. तेव्हा हेच ओढे रुद्ररूप धारण करतात. त्यांच्यात ट्रक वाहून नेण्याची पण क्षमता असते.
कंगला जल च्या जवळ सरळ उभे पर्वत आहेत. रस्ता त्यांच्या बरोबरीनच पुढे जातो. सारखे मागे वळून बघतो तेव्हा खूप भयानक दिसतात ते पर्वत.
तीन वाजता पांग मध्ये पोहोचलो. सरचू नंतर हेच मोठे ठिकाण आहे. इथे भरपूर होटल आहेत. जास्त करून महिलाच चालवतात. जसं मी पुढे चाललो तसा एका महिलेन आवाज मारला, "सर, यहां आ जाओ"
शेवटी मला इथे थांबयाचेच होते म्हणून थांबलो. संघ्याकाळ होत नाही तोपर्यंत अजून दोघेजण आले. ते मनाली चे टूर संचालक होते. २५००० रुपये घेऊन मोटारसायकल वरून लेह फिरून आणतात.
नंतर दोन तीर्थ यात्रेकरू आले. ते स्पीति मधले शगनाम गाव चे रहिवाशी होते. लेह ला चालले होते. हॉटेल च्या मालकिणीन मग दारू आणली. बौद्ध भिक्षु लोक दारू ला हाथ सुद्धा लावत नाही. इथे मात्र जोरात चालू होते. पूर्ण हिमालयात दारू म्हणजे साधी गोष्ट आहे. शेती जास्त प्रमाणात होत नाही म्हणून मांस जास्त खातात. लद्दाख सारख्या ठिकाणी तर हे गरजेचं आहे. ते तिघे यात्रेकरू होते. तिसरा शेजारच्या तंबू मध्ये खात पीत होता. त्यानंतर नाच गाणी सुरु झाली. एक गोलाकार चक्कर मारून नाच सुरु झाला. ती बाई इतके हळू हळू पाय उचलीत होती कि जशी काय झोपली नाचता नाचता. मी पण एक तास कार्यक्रम पाहिला आणि झोपायला गेलो.
आज २८ किमी सायकल चालवली.
व्हिस्की नाला
लाचुलुंग-ला ला आता पोहोचणार आहे.
लाचुलुंग-ला
लाचुलुंग-ला च्या पुढे पांग कडे जाताना
कंगला जल
बी,आर,ओ चे कामगार
लाचुलुंग-ला नंतर पांग पर्यंत उतार आहे. पण रस्ता खूप खराब आहे.
जमिनी मधला बदल.
जगा वेगळ्या आकृत्या.
अश्या आकृत्या बनण्यासाठी पाण्या बरोबरच हवेचा खूप मोठा हाथ असतो.
पांग
(क्रमशः)
प्रतिक्रिया
6 Feb 2016 - 11:02 am | सतिश पाटील
मस्तच....
6 Feb 2016 - 5:14 pm | बाबा योगिराज
सतिष कै वाटू द्या जीवाला आता.
6 Feb 2016 - 11:40 am | एस
काय ठिसूळ दिसतोय तो हिमालय! भयानक!
हाही भाग रोमांचक. पुभाप्र!
6 Feb 2016 - 3:19 pm | नितीन पाठक
लय भारी ..................
6 Feb 2016 - 3:26 pm | यशोधरा
सुरेख!
6 Feb 2016 - 5:14 pm | मयुरMK
छान
पु.भा.प्र.
6 Feb 2016 - 7:00 pm | आदूबाळ
बाकी धागे सोडून हेच एक वाचावंसं वाटतंय. रोज भाग टाकत राहा.
6 Feb 2016 - 9:23 pm | प्रचेतस
हाही भाग अप्रतिम. एस यांच्याशी सहमत. अती ठिसूळ हिमालय.
6 Feb 2016 - 10:36 pm | पैसा
काय सुरेख लिहिलंय अन फोटो तर काय बोलावे!