मग मी सचिन ला सांगितले कि आपण कैरियर काढून तार सरळ करू. परत कैरियर बसू मग ब्रेक चालू होईल. तुला पुढच्या ब्रेक वर अवलंबून रहायची आवश्यकता भासणार नाही. मग काय पंधरा मिनिटात त्याला ब्रेक ठीक करून दिला. सचिन म्हणाला तू नक्कीच इंजिनीअर आहेस. पण कोणता?
मी म्हणालो एवढा ब्रेक ठीक करून दिला. आता मला नाही वाटत कि मला काय सांगायची गरज आहे ते. तरी सांगतो रेल्वे मध्ये मैक्यनिकल इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे
पाच वाजता डोळे उघडले. काल दिवसभरात फक्त चौदाच किलोमीटर सायकल चालवली. आज कोणत्याही परिस्थितीमध्ये लवकर निघायचं होतं. कारण नंतर रोहतांगला जाणाऱ्या गाड्यांचा तांडा अडचणी आणू शकतो. तरी पण निघता निघता सहा वाजले. रात्री सचिन माझ्या सोबतच होता. त्यामुळे रात्री गप्पा चांगल्या रंगल्या होत्या. झोप किती वाजता लागली ते कळलेच नाही. असो.. तर सहा वाजता आम्ही दोघे बाहेर पडलो. सचिन ला सायकलचा चांगला अभ्यास होता. तो भुर्रकन पुढे निघून गेला.
थोडे पुढे गेल्यावर खराब रस्ता सुरु झाला. रस्त्यावर चिखलच चिखल होता. जेवढं मला जमलं तोपर्यंत मी सायकलवर बसून गेलो नंतर तर पायांनीच जावं लागलं. मागून तर गाड्यांचा तांडा जोरानीच जात होता. जसं काय रोहतांग पळून जाणार आहे. चिखलात तर माझे पाय आणि माझी सायकल पुरती खराब झाली.
मढी समुद्र सपाटी पासून ३३०० मीटर उंचीवर आहे आणि रोहतांग ३९०० मीटर वरती. आणि दोघा मधले अंतर आहे १६ किलोमीटर. सुरुवाती पासूनच हा रस्ता नागमोडी वळणे घेत जातो. पुढे सरचू पाशी जसं "गाटा लूप" लूप आहे. तसच याचं काहीतरी नाव असायला पाहिजे होतं. चला तर ..मीच याला नाव देऊन टाकतो. "मढी लूप".
साडे आठला चाहाची टपरी दिसली. तिथे चहा घेतला. रस्ता अरुंद असल्यानं खूपच वाहनांची गर्दी झाली होती. पंधरा मिनिट थांबल्यानंतर तिथून निघालो. कैरियर वरची बैग एका बाजूला झाली होती. तिला सरळ करण्यासाठी वळणावर सायकल थांबवली. मोठ्या दगडाचा आधार घेऊन सायकल उभी केली. दोरी काढून बैग सरळ करत होतो. तितक्यात एक स्कॉर्पियो वाला जवळ येउन थांबला. सगळयांना एक नंबरला लागली होती. एक माणूस गाडीतून उतरून माझ्याजवळ आला. मला बोलला हो बाजूला. स्रियांना बाथरूमला जायचं आहे. तो अश्या भाषेत बोलला कि आम्ही गाडीवाले आहोत आणि तू सायकलवाला...! त्याचं हे बोलणं मला आवडलं नाही. मी म्हटलं,नाही होणार बाजूला. इथं पहिले मी आलोय. गाडी चालवताना जर मी दिसलो असेल, तर गाडी येथे थांबवायलाच नको पाहिजे होती.
"बऱ ठीक आहे. तू तुझे तोंड तिकडे वळव."
"मी म्हटले, नाही वळवणार. तुम्ही मला त्रास देऊ नका. तुम्हाला कुठे करायची तिथे करा. माझे काम मला करू द्या. तुमच्या म्हणण्यानुसार मी इथून हटणार नाही आणि तोंड हि वळवणार नाही. तुम्ही दुसर्या ठिकाणी गाडी थांबवायला पाहिजे होती."
मग काय , ज्या कामासाठी गाडी थांबवली होती ते उरकून घेतले. महिलांनी मी ज्या दगडाला सायकल टेकून उभा होतो त्याच्या मागे गेल्या. आणि पुरुष मंडळी... त्यांच्या साठी तर सगळ्या दिशा आपल्याच आहेत.
रोहतांग समुद्र सपाटी पासून ३९०० मीटर उंच आहे. एवढ्या उंचीवर मला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. यालाच उंच पर्वतीय आजार म्हणतात. दम पण खूप लागत होता. त्यात पाणी पण नव्हते. पूर्ण बाटली रिकामी झाली होती. एका कार वाल्याकडून पाणी मागितलं. ते पण संपलं. आता परत कुणाकडे पाणी मागायची हिम्मत होईना. शरीर खूप थकल होतं. आराम कर..आराम कर अशी मागणी करत होतं. भूक पण जोराची लागली होती. सकाळी फक्त ब्रेड आमलेट खाल्ले होते आणि चहाच्या टपरी वर बिस्कीट एवढंच. शरीरातून उर्जा भरपूर जात होती पण भरपाई मात्र शुन्य. अश्या वेळेस सुखा मेवा कामास येतो. पुढे जाऊन एका पुला पाशी थांबलो आणि घरून आणलेला सुखा मेवा खाल्ला. जेणेकरून उर्जा तरी मिळेल. अर्धा तास थांबल्या नंतर पुढे निघालो. तरी पण शरीराला आराम मिळाला नाही. पुढे गेल्यावर पाणी मिळालं. मनसोक्त पाणी पिल्यानंतर म्हटलं, चला आता रोहतांग पार करू या !!
रोहतांग घाट त्यालाच हिंदी मध्ये रोहतांग दर्रा असे म्हणतात. पर्यटकासाठी जणू बर्फाचा ढीग. त्यांच्या साठी मौज मजा शिवाय इथे दुसरे काहीच नाही. पण जो हिंडफिरा आहे, तो इथे आल्यावर भावनिक होतो. त्याच्या साठी हे स्वर्गाचे दार आहे, अलिबाबाची गुहा आहे. इथूनच खरा त्याचा प्रवास सुरु होतो. जे हिंडफिरे असतात ते आतापर्यंत फक्त पर्यटकाच्या जागे मध्ये फिरत होते, आता इथून पुढे ते स्वताच्या जागे मध्ये फिरणार आहेत. मी असं ऐकलं होतं कि रोहतांगच्या पुढे एक वेगळीच दुनिया आहे. आता ती दुनिया माझ्या पासून जास्त दूर राहिली नाहीये.
रोहतांग वरती तर जत्राच भरली होती. इथे मौज मजा करण्यासाठी वेगवेगळी साधने उपलब्ध आहे. अर्धा तास इथे बसून राहिलो. बसल्या बसल्या दोन कप चहा गडप केला. रोहतांग च्या पुढे दोन कुटुंब भेटलं. रस्त्याच्या दोन्ही बाजूला बर्फ पडला होता. तिथे ते सगळे खेळत होते. त्यांनी मला थांबवलं आणि पाणी मागितलं.
ते म्हणायला लागले कि, "इथे बर्फ भरपूर आहे. पण पाणी नाही. गळा एकदम सुकून चाललाय. एकवेळ आपल्याला त्रास झालेला चालेल पण मुलांना झालेला त्रास नाही बघवत."
मी पाण्याची बाटली काढून त्यांना प्यायला दिली. पाण्याची बाटली भरलेली होती तर मुले होती सहा. मोठ्यांनी सांगितले कि एका घोटा शिवाय कुणाला जास्त पाणी द्यायचे नाही. मी म्हटले असे करू नका. पिऊ द्या त्यांना, किती प्यायचे ते. हे सगळ पाणी तुमचं आहे मला फक्त खाली बाटली द्या. तसे पण माझ्या पेक्षा तुम्हाला गरज आहे पाण्याची. आता मला खाली उतरायचे आहे. त्यामुळे खाली गेल्यावर पाणी भेटेल. शेवटी मला खूप सारे धन्यवाद भेटले आणि खाली बाटली पण !!
रोहतांग सोडल्या नंतर उतार लागला. रस्त्यावर खप पाणी होतं. रोहतांग वरून बर्फाचे पाणी वितळून खाली वाहत होतं. आणि खूप थंड हि होतं. बिन पैन्दल मारता सायकल सुसाट चालली होती. तीन दिवसानंतर अशी संधी मला मिळाली होती. बर्फाचे थंड पाणी माझ्या पायावर उडत होते. वारा पण जास्त होता. त्याने पायाला खूप थंडी वाजत होती. तीन चार किलोमीटर मजेत गेल्यानंतर खराब रस्ता सुरु झाला. जो पुढे 17 ते १८ किलोमीटर कोकसर पर्यंत गेल्यानंतर ठीक झाला. या खराब रस्त्यावर चिखल पण पाहायला मिळतो. त्यामुळे सायकल वरून उतरून चालावे लागते. सायकल वरून चढ चढताना पाय दुखतात, पैन्दल मारुन तर उतरताना हाथ दुखतात, ब्रेक मारुन. आणि सगळा भार हा हातावर येत असतो. आता पर्यटकांचा तांडा कमी झाला होता. रस्त्यावर तर शुकशुकाट होता. केव्हातरी एखादी गाडी जायची.
सव्वा दोन वाजता ग्रामफू ला पोहोचलो. इथून एक रस्ता स्पीति नदी कडे गेला आहे. हा रस्ता प्रथम चन्द्रा नदीच्या बरोबरीने जातो. नंतर कुंजम घाट पार केल्यानंतर स्पीति नदीच्याच बरोबरीने जातो. नंतर माहिती पडले कि तो रस्ता खूपच खराब झाला आहे. कुंजम घाट पण वाहतुकीसाठी उघडला नाही.
तीन वाजता कोकसर ला पोहोचलो. तिथे सचिन भेटला. त्यांनी सांगितले कि, मी तुझ्या साठी दीड तास थांबलोय. त्याला समजून सांगितले कि, आपण एकटे हिंडफिरे आहोत. वाट बघायची नसते.
भुकेला होतो. राजमा आणि भातावरती ताव मारला. तिथून तीन वाजता निघालो. पुढे गेल्यावर चांगला रस्ता मिळाला. मग काय चंद्रा नदी पार केली आता लक्ष्य होते टाण्डी!! चंद्रा नदीच्या बरोबरीने जाताना सगळे भान मी विसरून गेलो. अहाहा..एका पेक्षा एक नजारे दिसत होते. रस्त्यामधेच एक ओढा आला. उतरून पार करावा लागला. इथेच एक झलक बघायला मिळाली कि पुढे पण एका पेक्षा एक ओढे बघायला भेटतील.
पाच वाजता सिस्सू ला पोहोचलो. इथे एक छोटासा तलाव पण आहे. ज्याच्या मध्ये चंद्रा चे पाणी येते. याच पाण्याचा उपयोग करून इथल्या लोकांनी झाडे लावली आहेत आणि हिरवीगार शेती पण केली आहे. पुढे गेल्यावर उतार संपला. आता समान सरळ रस्ता सुरु झाला. साडे सहा वाजता गोंदला पासून सहा किलोमीटर मागे होतो. तेव्हाच विचार येऊ लागले कि आता तथेच थांबले पाहिजे. तरुण गोयल नि त्यांचा मित्र डॉ. विशाल याचा नंबर दिला होता. विशाल इथेच गोंदला ला राहतो.
सात वाजता गोंदला ला पोहोचलो. ओढा पार करून एका मंदिरापाशी विशाल आणि माझे बोलणे झाले. तर विशाल नि मला खालच्या रेस्त हाउस पाशी यायला सांगितले. विशाल येथे डॉक्टर म्हणून कार्यरत आहे. इथेच जवळ हॉस्पिटल आहे तेथे ते काम करतात. मग आमची रवानगी रेस्ट हाउस मध्ये केली. तिथे गिजर पण होता. बरेच दिवस अंघोळ झाली नाही तर चला अंघोळ करून घेऊया.
सचिन नि उद्याचा कार्यक्रम विचारला. मी म्हटले मागच्या पाच रात्री पासून झोपलो नाही व्यवस्थित त्यामुळे आज मस्त पैकी ताणून देणार आहे. उद्याचे उद्या बघू. आणि आज झोपेला चांगली संधी मिळाली आहे. त्यामुळे आज झोपेवर मी अत्याचार करणार नाही. उद्या जेव्हा डोळे उघडतील तेव्हाच उठणार मग दुपारचे बारा वाजले तरी चालतील. सचिन म्हणाला नाही सकाळी लवकर उठून लवकर निघू. कारण उद्या कमीत कमी दारचा पर्यंत पोहोचले पाहिजे. मी त्याला सरळ नाही सांगितले. मी म्हटलं, आपण दोघे एक एकटे हिंडफिरे आहोत. तू तुझे बघ मी माझे बघतो. तू तुझा उद्याचा कार्यक्रम तयार कर, मी माझा बनवतो. जर दोघांचे कर्यक्रम एक सारखे निघाले तर मग आपण एकत्र राहू. नाहीतर मग तू तुझ्या रस्त्याला मी माझ्या. या गोष्टीवर दोघांची संमती झाली.
तीन दिवस हाफ पैन्त घातल्या मुले गुड्घ्यापाशी पाय जळाले. खूप आग होत होती. आता उद्या पासून फुल पैन्त घालावी लागणार.
आज दिवसभरात ६४ किलोमीटर सायकल चालवली.
मढी वरुन दिसनारा रोहतांग घाट
हिच ती चिखलाची जागा
बीआरओ जिन्दाबाद
गाड्यांची लाइन
हिमालयातील रस्त्यांचे डॉक्टर
बर्फ कापून बनवलेला रस्ता
मुख्य रस्ता सोडून शॉर्ट कट मारायचा प्रयत्न केला म्हणून त्याचे परिणाम!!
इथून रोहतांग जास्त लांब नाही.
रोहतांग वरती थांबलेल्या गाड्या
बर्फा वरती चालणारी गाडी
रोहतांग वरती मौज मस्ती
रोहतांग वरती अंधार व्हायची वाट बघताना ट्रक. पर्यटक गेल्यावर मग हे जाणार.
हेच कुटुंब होते ज्यांनी मला एक घोट पाणी मागितले होते.
रोहतांग घाट: आता चढ संपला आणि उतार सुरु
रस्त्यावर सांडलेले बर्फाचे पाणी
खराब रस्ता आणि बर्फाचे पाणी
हे लाहौल आहे . इथे डोंगरावरती झाडे नसतात. रोहतांग सोडल्यानंतर पहिला वेगळेपणा.
कोकसर मध्ये जेवण
कोकसर
चन्द्रा नदी
हा पहिला ओढा
सिस्सू
गोंदला जवळ ओढा
(क्रमश:)
प्रतिक्रिया
2 Feb 2016 - 11:37 am | डॉ सुहास म्हात्रे
मस्त चालली आहे सायकलसफर ! हा भाग खूपच सुंदर आहे.
2 Feb 2016 - 11:39 am | sagarpdy
वाचतोय. पुभाप्र
2 Feb 2016 - 11:46 am | मयुरMK
छान वाचत आहे..................
पुढचे भाग येऊ द्या
2 Feb 2016 - 11:46 am | यशोधरा
अफाट!
2 Feb 2016 - 12:31 pm | मोदक
सुंदर सफर सुरू आहे.
सचिनचा उल्लेख आला आहे तो "सचिन गांवकर" आहे का? त्याचा एखादा फोटो आहे का?
2 Feb 2016 - 12:41 pm | पद्मावति
वाह, मस्तं चाललीय सफर. वाचतेय.
2 Feb 2016 - 12:44 pm | राजकुमार१२३४५६
2 Feb 2016 - 1:10 pm | मोदक
त्यांच्या भारत परिक्रमेआधी एका मायबोलीकरांच्या घरी आम्ही भेटलो होतो. "आता १० वाजले त्यामुळे निघूया" असे म्हणून नाईलाजाने मैफील आटोपती घेतली होती.
नंतरही भारतपरिक्रमेच्या वेळी फॉलो करत होतो.
भन्नाट माणूस आहे हा. __/\__
2 Feb 2016 - 1:23 pm | राजकुमार१२३४५६
अस्थमा सारखा आजार असतानी सुद्धा सायकल वरती भारत परिक्रमा करणारा हा जगातला पहिला माणूस असेल
2 Feb 2016 - 8:13 pm | शैलेन्द्र
सचिन आमच्या डोंबिवली सायकल ग्रुपचा मेंबर,
2 Feb 2016 - 1:17 pm | सामान्य वाचक
डोळ्याचे पारणे फिटले
अशा लोकांचा हेवा वाटतो जे मनाची हाक ऐकून धाडस करतात
नाहीतर आमच्या सारखे लोक सगळ्या अडचणीचे पाढे वाचून काहीच करत नाहीत
2 Feb 2016 - 1:56 pm | टवाळ कार्टा
अफाट
2 Feb 2016 - 6:57 pm | जगप्रवासी
एकदम भारी सफर चालू आहे
3 Feb 2016 - 7:54 am | स्पा
जिद्दीला सलाम, फोटो पण लय भारीच
3 Feb 2016 - 8:04 am | बोका-ए-आझम
पुभाप्र!
3 Feb 2016 - 10:20 am | नीलमोहर
एकाहून एक अफाट सुंदर फोटो !!
3 Feb 2016 - 1:16 pm | कंजूस
इतके छान फोटो आहेत तर प्रत्यक्ष किती छान असेल.
पैसे कसे बाळगता /नेता ?
3 Feb 2016 - 1:30 pm | राजकुमार१२३४५६
पेट्रोल चा खर्च नाही. राहण्यासाठी तंबू आहेच. राहिले फक्त जेवण.
तरी या प्रवासाला किती खर्च आला हे शेवटच्या भागात कळेल.
3 Feb 2016 - 2:11 pm | पैसा
मस्त जमला आहे हा भाग! वेगळ्याच जगात गेल्यासारखे वाटले!
3 Feb 2016 - 3:03 pm | Jitendra Gharat
लदाख
3 Feb 2016 - 3:04 pm | प्रमोद देर्देकर
मस्त फटू आणि तुमची सफर सुद्धा.