शी!!!! तुम्ही नियम पाळता?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture
कॅप्टन जॅक स्पॅरो in जनातलं, मनातलं
17 May 2015 - 11:31 pm

रविवार सकाळची गोष्ट आहे. पहाटे पहाटे १०.३० वाजता माझे एक जवळचे मित्रवर्य घरी आले. उजवा हाताचा पंजा आणि कोपराची मागची बाजु बँडेजमधे गुंडाळलेली, चेहेर्याची उजवी बाजु थोडीशी घसपटलेली आणि जराश्या "तैमुरलंग" अवस्थेमधे त्याला पाहुन मी खरं तर दचकायला हवं होतं. त्याऐवजी मला भयानक हसायला आलं. नाही नाही तुम्हाला वाटतयं तश्या माझ्या संवेदना वगैरे मेलेल्या नाहीत पण त्याची ही अवस्था व्हायला तो स्वतःचं जबाबदार आहे. त्याचं म्हणजे "आधीचं उल्हास, त्यातुन फाल्गुनमास" असा प्रकार आहे. गाडी गर्दीच्या रस्त्यांवरुन कट मारत चालवणं, दारु वगैरे प्यायल्यावरचं आपल्याला गाडी कशी जास्तं चांगली चालवता येते ह्याच्या फुशारक्या मारणं, रस्त्याकडे लक्ष नं देता रस्त्याकडेनी चाललेल्या प्रेक्षणिय स्थळांकडे बघणं आणि हेल्मेट घालणं म्हणजे नामर्दपणाचं लक्षणं वाटणं इत्यादी अनेक सद्गुणांनी महाशय नटलेले असल्यानी हे सौख्यं त्याला कधी सामावुन घेतयं ह्याचीचं मी वाट पहात होतो. आत्ता अगदी सहा महिन्यांमधली गोष्ट आहे, मी शक्यतो हेल्मेटशिवाय गाडी चालवतं नाही ह्यावरुन चार मित्रांमधे माझी अक्कल काढत होता. आणि तेही भो...असो..तेही त्याच्याएवढेचं सद्गुणी असल्याने त्याची अगदी बाजु घेउन घेउन मला खोटा पाडतं होते. काय करणार? सुरक्षित गाडी चालवणं हा म्हणे मिडलाईफ क्रायसिस आहे असं वरुन ऐकुन झालं. बहुमत हेचं अंतिम सत्य असं दुर्दैवानी आपल्या समाजात मानलं जात असल्यानी नियम पाळणं हा दुर्गुण आहे हे त्यांनी अगदी सहज सिद्ध करुन दाखवलं. असेचं नियमपळवादी सदगुणी लोकं जगात वाढत राहिले तर माझ्यासारख्या दुर्गुणी नियमपाळवादी लोकांना रोजचं ह्या एका लाजिरवाण्या प्रश्णाला सामोरं जायला लागणार. एखाद्या त्रैलोक्यसुंदरीनी के.आर.के. कडे तुच्छपणे बघावं किंवा एखाद्या मर्सिडिझ वाल्यानी स्कुटरवाल्याकडे ज्या तुच्छतेने बघावं अश्या नजरेनी पाहता पाहता "श्शी. तु रहदारीचे नियम पाळतोस? तुझ्यात कै दमचं नै बाबा!!!" वगैरे ऐकायची वेळ लवकरचं येणार असं दिसतय.

चुक ह्या नियमपळवादी लोकांची नाहिये. सरकारची आहे. त्या आर.टी.ओ. मधे आणि ड्रायव्हिंग स्कुलमधे सपशेल खोटं शिकवतात त्याला सामान्य जनता काय करणार? एखादं दुसरी चुक असती तर मानलं असतं बॉ, पण सगळेचं नियम चुकीचे बनवलेत म्हणजे हैट झाली. म्हणे लाल सिग्नलला गाडी थांबवा, अंबर दिव्याला सावधपणे जा आणि हिरवा सिग्नल लागला की काळजीपुर्वक जा. लाल सिग्नल लागला की हिरव्या झालेल्या बाजुच्या लोकांना शिव्या हासडत जायची मजा त्या सरकारी बाबाजींना काय कळायची? सिग्नल हे रहदारीचे नियंत्रण करायला लावलेत अशी लोकांची गैरसमजुन करुन देण्यातही ह्याचं नीचं सरकारचा वाटा आहे. ते टपरीआड उभे राहिलेले पोलिस, त्यांना दिवसभर काय विरंगुळा? बघSssSSत बसतात रंग बदलणार्‍या सिग्नलकडे. त्यातुन अधुन मधुन विरंगुळा म्हणुन एखाद्या गाडीवाल्याला पकडायचा, त्याच्या कागदपत्रांचं वाचन करायचं आणि करमणुक साधायची असला निरुपद्रवी विरंगुळा दुसर्‍या कुठल्या क्षेत्रात सापडायचा हो? त्यातुन परत काही मामांना आकड्यांची कोडी घालायची भारी हौस. "पावतीपुस्तकामधे २०० रुपये घालता का १०० रुपयात बिनपावतीचं सोडु" वगैरे सुप्रसिद्ध कोड्यांचे जनक हेच्चं हो. त्यांची काय चुक? शिवाय गाडीची किल्ली लपवुन ठेवणं आणि मग समोरच्याला ठेंगा दाखवणं वगैरे मैदानी खेळ तर अगदी आवडीचे त्यांच्या. टार्गेट पुर्ण करायचा टारगटपणाही अधुनमधुन करावा लागत असल्यानी नियम पाळणार्‍यांनाही अर्थदानाचं पुण्य मिळवुन देण्यामधे ह्यांचा महत्त्वाचा "वाटा" असतो.

त्यातुन हल्ली मायबाप सरकारच्या हेल्मेटमधे नवी आयडियेची कल्पना आलीये म्हणे. डो़कं वापरायचं म्हणे हेल्मेट सुरक्षित रहावं म्हणुन. आयला, टिळक पाहिजे होते राव. नक्की सरकारचं हेल्मेट ठाण्यावर आहे का असा अग्रलेख पाडला असता त्यांनी. हेल्मेट ही काय वापरायची गोष्ट आहे का? मस्तं डो़कं उघडं ठेवायचं, दोन-चार पेग कड्डक दारु लावायची आणि विमानाच्या सफाईनी दुसर्‍या गाड्यांना आडवे-उभे कट मारत चालवायची गाडी. एखाद्याला ढगात पाठवायचा. एखाद्या वेळेला आपण पडायचं. म्हणजे हॉस्पिटलमधल्या सुंदर नर्सेस पहाता वगैरे येतात. पण नाSssSSही बंदी म्हणजे बंदी. आपलं सरकार थेट अश्या गंमतीवरचं बंदी आणायला बघतं. सामान्य लोकांना सुखानी जगुन देण्यात सरकारला आनंद वाटत नाही हेचं खरं. सरकारनी खरं तर साहसी क्रिडाप्रकारांना चालना दिली पाहिजे. फुटपाथवरुन गाडी चालवणं, विरुद्ध बाजुनी येणार्‍या गाडीच्या उजवीकडुन गाडी काढणं, एका चाकावर गाडी चालवणं वगैरे प्रकारांना राष्ट्रीय खेळ म्हणुन मान्यता मिळाली पाहिजे. पुण्यातले ऑलिंपिक साहेब ह्यात लक्ष घालतील तर बरं होईल.

हॉर्न वाजवण्यावर बरेचं लोकं उगीचं आक्षेप घेतं असतात. रस्त्यावर उतरलेल्या सुस्त जनतेमधे जागृती निर्माण करणार्‍या ह्या अस्त्राला सरकार दाबुन टाकायचा प्रयत्न करतयं. काय फालतुपणा आहे हा? म्हणे शाळांजवळ- हॉस्पिटलजवळ हॉर्न वाजवायचा नाही. अरे आतमधल्या पेशंटचा काही विचार? बिचारे कंटाळतात हॉस्पिटलातल्या चार भिंतीमधे राहुन राहुन. हॉर्नमधुन गाणी वाजवायची, वेगवेगळ्या प्राण्यांचे, रडणार्‍या बाळाचे आवाज काढायचे ही ६५ वी विद्या (का कला रे?? आँ). आयसीयु मधल्या पेशंटला धक्का देउन त्याचं बंद पडायला आलेलं हृदय चालु करायचं परत. ते नाही. डॉक्टरांचा धंदा बुडेल ना अश्यानी. रस्त्यावर नुकतीचं गाडी शिकलेल्या नव्या घाबरट भिडुला तयार करायची जबाबदारीही हे समाजसेवक अगदी निरिच्छ वृत्तीनी स्वीकारतात. त्यांच्या गाड्यांना कट मारुन त्यांच्या अंगात धैर्य निर्माण करणं ही जबाबदारी अजुन कोण समर्थपणे पेलु शकेल?

हे झालं दुचाकीवाल्या समाजसेवकांचं. तीनचाकीवाले समाजसेवक तर अगदी देवाघरचे सेवक हो. नो एंट्रिमधुन गाड्या घालणं, रस्त्यावर गाड्यांशी खो-खो खेळणं आणि प्रवाशांना भांडणकला शिकवणं हे ह्यांचे आवडते छंद असतात. त्यातल्या त्यात जर का रसिक रि़क्षावाला असेल तर कलकत्ता ५०५ वगैरे खाउन रस्त्यावर आणि लोकांच्या कपड्यांवर रंगकला करणं असाही छंद ह्या धंद्यामधल्या बर्‍याचं जणांमधे असतो असं निरि़क्षण आहे. पण आमच्या नष्टोळ्या लोकांना कलेला दाद देता येणं हा प्रकार माहिती नाही. केलेल्या कामाला मोजपट्टी लावु नये, त्यानी कामाचं महत्त्वं आणि दर्जा कमी होतो अशी एक समजुन आपल्या समाजात आहे. (म्हणजे एवढं काम केलं तेवढं काम केलं असं म्हणण्यापेक्षा जेवढं जास्तं जमेल तेवढं जास्त काम दर्जेदारपणे करावं अश्या अर्थानी). आमचे प्राधिकरण, पिंपरी-चिंचवडवाले रिक्षावाले ह्या नियमाला अगदी झोपेतही पाळतात. जSSsssSSर्रा काय मीटर टाकतील. असो. सद्गुणी रि़क्षावाले हा एका स्वतंत्र ब्लॉगचा विषय होउ शकेल, त्याविषयी परत कधीतरी सवडीने लिहिनचं.

बहुतांश चारचाकीवाले नमोंनी रस्ता आपल्या नावावर करुन दिल्यासारखं वागतात. ओव्हरटेक करणार्‍या गाडीला ओव्हरटेक करुन पुढे जाणं हा ह्यांचा आवडता छंद. ह्या जोडीलाचं हॉर्नवर एक हात आणि अ‍ॅक्सलरेटरवर एक पाय दाबलेला असेल तर दुधात साखरचं ह्यांच्यासाठी. समोरच्या दुचाकीवाल्यानी दचकुन हडबडुन गाडी साईड पट्टीवर उतरवलीचं पाहिजे. बाकी ह्या चारचाकीवाल्यांमधे पण बर्‍याचं पोटजाती आहेत. त्यातली सगळ्यात भारी जमात म्हणजे गुंठामंत्री. बापोपार्जित (होय. कारण वडिलोपार्जित म्हणण्याएवढं सौजन्य ह्यांच्याकडे नसतं) जमिनीला चुना लाउन कॉर्पियो, येंडेवर, फार्चुनर वगैरे गाड्या उडवत फिरणं हा ह्यांचा दिवसभराचा खेळं. ह्या खेळात ते बर्‍याचं रस्त्यावरच्या दुसर्‍या गाड्यांनाही "उधार" मनानी सामील करुन घेतात. ह्यांच्या गाड्यांवर जनरली कुठल्यातरी पक्षाचा वरद हस्त असतो त्यामुळे ह्यांच्या नशिबाच्या घड्याळात शक्यतो बारा वाजत नाहित असं ऐकिवात आहे. असो. मुद्दा हा आहे की नियम पाळण्यासारखा भेकडपणा, मुर्खपणा माझ्यासारखे लोकं कसा करु शकतात?

ह्या आमच्या सारख्या नियमपाळ जमातीमुळे देशाच्या प्रगतीला खिळं बसतो म्हणे. ह्याबद्दल आम्हाला मनापासुन खेद वाटतो. ह्या देशविघातक कृत्याबद्दल सा़क्षात ब्रम्हदेवही मला माफ करु शकणार नाही ह्याची मला खात्री आहे. माझ्या अनुभवातुन तुम्ही शिका काहितरी. उद्या लाल सिग्नलला हेल्मेट घालुन थांबलात तर तुम्ही माझ्या भेकड जमातीत सामील व्हालं. तुमचं स्वागतं करायला मी तरी तयार आहे. जान है तो जहान है बॉस. Be safe, Drive safe it's hell set free on roads. We don't need casualties. Thank you.

जीवनमानराहणीप्रकटन

प्रतिक्रिया

काळा पहाड's picture

12 Jan 2016 - 1:19 am | काळा पहाड

हिंदी बोलणार्‍यांना मारलं तर तो गुन्हा होत नाही

आणि त्याने जर मला गाडी ठोकली असती आणि मी मेलो असतो तर?

"अपघात" समजून सोडून देतात का अश्या वेळी ?

होबासराव's picture

11 Jan 2016 - 4:19 pm | होबासराव

हातातलं हेल्मेट असेल नसेल तेवढी सगळी ताकत लाऊन फिरवलं. बहुदा त्याचा डावा कान फुटला होता .
हाण तेज्यायला...एकदम बरोबर केलेस.

तुषार काळभोर's picture

11 Jan 2016 - 4:46 pm | तुषार काळभोर

जे देतात, ते मूर्ख असतात.
वडीलांनी १८व्या वाढदिवसाला १००० रुपये हातात ठेवले व म्हणाले एक हेल्मेट घ्यायचं, लायसन्स काढायचं आणि गाडी फिरवायची. (ज्यांना आपल्या १६ वर्षांचा कुलदीपकाच्या हातात पल्सर/करीझ्मा द्यावीशी वाटते, त्यांना आकाशातला बाप आमच्या बापासारखी बुद्धी देवो). त्यामुळे वैयक्तिक अनुभव आहे. हेल्मेट घातल्यावर डोकं दुखणं, मान दुखणं, आजूबाजूचं न दिसणं, कमी ऐकू येणं, हे गैरसमज आहेत. मी बर्‍याच मित्रांबरोबर डब्बलशीट फिरतो, दोघांनी हेल्मेट घालून... बायकोसुद्धा हेल्मेट घालून मागे बसते. निवांत गप्पा मारता येतात.

* "मी चांगली गाडी चालवतो, मला काही होणार नाही. मग हेल्मेट का घालू?" :- अरे, पण मागून येणार्या रिक्षा/ टवेरा/१६१२/इनोवावाल्याला नाय ना येत नीट चालवता! तो धडकल्यावर डोकं तुझं फुटणार आहे!!

* " पोलीस व हेल्मेट कंपन्यांचं कारस्थान आहे" :- असू दे की!! त्यानिमित्ताने तुझं डो़कं जर वाचलं, तर काय त्रास आहे?

* "हेल्मेटसक्ती नसावी, ऐच्छिक असावे" :- एव्ह्ढे आपले सामान्यनागरिक अक्कलवंत असते, तर सक्तीची गरजच नाही पडणार. (मैदानात प्रेक्षकांनी काही फेकू नये, म्हणून प्रेक्षक व मैदानामध्ये जाळी बसवण्याची गरज वानखेडेवर असते, लॉर्ड्स वर नाही)

* "हेल्मेट परवडत नाही" :- अरे कर्मदरिद्र्या, साडेतीन हजाराच्या स्मार्टफोनला महिन्याला १००-२०० चा नेटपॅक टाकता येतो ना? त्याच मोबाईलच्या स्क्रीनसाठी ५०-१०० चं स्क्रॅचगार्ड लावतोस ना? मग लाखमोलाचा जीव, तुझ्या आई-बापाचा आधार, बायकापोरांचा आधार, वाचवण्यासाठी घे की ८००-९०० चं हेल्मेट. नको टाकू ४ महिने नेटपॅक.

*

चैतन्य ईन्या's picture

11 Jan 2016 - 5:12 pm | चैतन्य ईन्या

हेल्मेट घातल्यावर डोकं दुखणं, मान दुखणं, आजूबाजूचं न दिसणं, कमी ऐकू येणं, हे गैरसमज आहेत.>> हे वाक्य म्हणजे एकदम बरोबर. ज्यांना हेल्मेट घालायचेच नाही त्यांची हि लटकी आणि अत्यंत खोटी करणे आहे. मुळात त्रास होईल असा एकदा ग्रह झाला कि मग नुसते हेल्मेट पाहूनच ह्यातले बरेच त्रास होतात. पण सगळ्यात म्हणजे ह्यापेक्षा जास्त गरज आहे सडकून शिक्षा करण्याची. वाटेल तसे लोक चालवतात आणि निर्लज्जपणे आह्मी नियम पळत नाही असे आईकावातात. सगळ्यात आधी सगळ्या गाड्यांचे होर्न काढून टाकले पाहिजेल. मुर्खासारखे होर्न वाजवत राहायचे. त्याला काहीही अर्थ नाही. कोणी लक्ष पण देत नाही पण उगाचच जोरजोरात होर्न वाजवून काय मिळते काय माहिती. पोलीस काहीच करत नाही. सरळ सरळ १०००० चा दंड करून लायसन्स बंद केले पाहिजेल. असे झाले तर चट सरळ येतील पण मुळातच आपल्याला नियम पालायाचेच नसल्याने असे काही होणार नाही.

असंका's picture

11 Jan 2016 - 5:34 pm | असंका

कोणी लक्ष पण देत नाही पण उगाचच जोरजोरात होर्न वाजवून काय मिळते काय माहिती.

अगदी माझ्या मनातला प्रश्न!! कोणीच तुमच्या हॉर्नकडे तसं लक्ष देत नसताना कशाला हॉर्न वाजवत रहातात?

एक रीक्षात एवढा भयानक मोठा हॉर्न होता की मी रीक्षात बसलेलो दचकलो! त्याला विचारलं की एवढा मोठा हॉर्न कशासाठी? तर म्हणला की "तरीही लोक साइड देत नाहीत!" माझ्या मनात आलं, हॉर्नपेक्षा ते एक्स्कॅवेटर सारखे यंत्र जास्ती फायदेशीर ठरेल या उद्देशासाठी... व्हा साइडला..किंवा मीच करतो तुम्हाला साइडला!!

चैतन्य ईन्या's picture

11 Jan 2016 - 6:04 pm | चैतन्य ईन्या

दुर्दैवाने ह्याचा कोणालाच विचार करावासा वाटत नाही. सिग्नलला थांबणे म्हणजे पाप केल्यासारखे आहे. उगाचच आपले होर्न बडवत राहायचे. ह्यातून नक्की काय साधतोये ह्याचा पण विचार नाही. फार फार तर १ मिनिट वाचवणार त्यापेक्षण शांत राहिलो तर लवकर पोचू हेच कळत नाही. पण विचारच करायचा नाहीये.

हेल्मेट न वापरण्याची कारणे जे देतात, ते मूर्ख असतात. >>

हाहा . . परफेक्ट

श्रीरंग_जोशी's picture

12 Jan 2016 - 10:38 am | श्रीरंग_जोशी

माझी पहिली दुचाकी हाती येण्याच्या अगोदर मी हेल्मेट खरेदी करून ठेवले होते अन जवळच्याही ठिकाणी जायचे असले तरी कुठलाही अपवाद न करता हेल्मेट वापरलेच.

चेपूवर हा एक हेल्मेटच्या आगामी मॉडेलचा व्हिडिओ मिळाला आहे.

(function(d, s, id) { var js, fjs = d.getElementsByTagName(s)[0]; if (d.getElementById(id)) return; js = d.createElement(s); js.id = id; js.src = "//connect.facebook.net/en_US/sdk.js#xfbml=1&version=v2.3"; fjs.parentNode.insertBefore(js, fjs);}(document, 'script', 'facebook-jssdk'));

Meet The World's Smartest Motorcycle HelmetPosted by Discovery News on Wednesday, December 23, 2015
होबासराव's picture

12 Jan 2016 - 12:53 pm | होबासराव

२० मिनिटां पहिले वाईट अपघात बघितला, KPIT च्या गेट समोर रस्त्यावर एक मुलगी पल्सर वरुन मागच्या मागे डोक्यावर पडलि आणि बेशुध्द झाली. हाकेच्या अंतरावर Mindtree च्या गेट जवळ वाहतुक पोलिस पावती फाडण्यात मश्गुल होते, शेवटी तिला एका आय टि वाल्याच्याच गाडीत रुग्णालयात नेण्यात आले. हेल्मेट घालारे, पिलियन रायडर ने सुद्धा.

हेल्मेट घालारे, पिलियन रायडर ने सुद्धा.

का म्हणून?? सरकारने रस्ते सुधारावेत.. वाहनचालकांना शिस्त लावावी.. खड्डे नीट करावेत..

हे वाचा http://www.misalpav.com/node/29420

होबासराव's picture

12 Jan 2016 - 1:50 pm | होबासराव

का म्हणून?? सरकारने रस्ते सुधारावेत.. वाहनचालकांना शिस्त लावावी.. खड्डे नीट करावेत..

ठिक आहे मोदक साहेब, मला आज त्या मुलिचि परिस्थीति पाहुन जे वाटले ते मि लिहिले.
आपण जे मुद्दे उपस्थित केलेत ते योग्य आहेत पण परिस्थिति तशी आदर्श होइ पर्यंत तरि निदान आपली सुरक्षा आपल्याच हातात आहे.
अवांतरः- काल एक बातमि बघितलि कि केंद्र सरकार ने काहि अपघात प्रवण रस्ते, जागा ह्यांना सुरक्षीत करण्या करता ११ हजार कोटि चा निधि संबधित मंत्रालय (फ्लाओव्हर फेम गडकरी जी) दिला आहे. आशावादी राहुया, पण मला लहानपणी पाहिलेलि एक दुरदर्शन वरची जाहिरात आठवते "तो हातोडा ते नारळ आणि मग वाक्य ' मर्जि है आपकि आखिर सर है आपका ".
मि स्वतः सुद्धा गेलि कित्येक काळ माझी पल्सर नाही चालवलीय आणि मि हेल्मेट सुद्धा नाहि वापरायचो, पण माफ करा मि हेल्मेट सक्ति च्या बाजु ने आहे.

मि हेल्मेट सक्ति च्या बाजु ने आहे.

माझ्या प्रतिसादात उपरोध आहे हो साहेब, मी पण हेल्मेटसक्तीच्याच बाजुने आहे.

वरील धागा आणि त्यावरचे अचाट युक्तीवाद वाचा - भरपूर करमणूक होईल. :)

म्या तेच तर विचार करुन रायल्तो का मोदक तर राजा बुलेट गिलेट घेउन पार इंदौर, रावेरखेडी लोक जाते, सायकल वर तर पुर्रा महाबळेश्वर पालथा घालते अन कसा काउन बोलुत रायला लेक :))

मोदक's picture

12 Jan 2016 - 2:19 pm | मोदक

:))

कोणत्या गाडीला किती शक्तीचा हॉर्न असावा याचे काही नियम आहेत का?

बुलेटचा हॉर्न खूप मोठा वाजतो आणि अनेकदा समोरचा दुचाकी वाहनचालक दचकतो असा अनुभव आहे.

अद्द्या's picture

12 Jan 2016 - 2:07 pm | अद्द्या

http://www.moef.gov.in/citizen/specinfo/noise.हटमल

या लिंक वर आहेत सगळी माहिती

अद्द्या's picture

12 Jan 2016 - 2:08 pm | अद्द्या

नियम आहेत का??? नियम असून ते पळणार कोण आणि त्याची अंमलबजावणी कोण करणार हो. सगळा घोळ तिथेच आहे अंमलबजावणी मध्ये