अवधूत (भाग-५)
थरथरत्या हाताने त्याने तो पेला घेतला. तापाने जिभेला चव काही कळतच नव्हती, पण तो उष्ण कढत द्रव पिल्यावर त्याला खरंच खूप बरं वाटलं. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काहीतरी बोलावं, म्हणून त्याने तिच्याकडे पाहिलं. अचानक तेव्हाच कडाड् करुन एक वीज चमकली. खिडकीच्या गजातून तिचा प्रकाश आत आला असेल-नसेल त्या क्षणार्धात तिचा चेहेरा उजळून निघाला. क्षणभर त्याला असा भास झाला की त्या चेहे-याच्या जागी काहीच नव्हतं. पण क्षणभरच! पुन्हा तिचा खानदानी, आदबशीर तरीही अनामिक दुःखांनी भरलेला चेहरा त्या जागी दृग्गोचर झाला.
*****
आपण पाहिलं तो केवळ भास असावा, विजेच्या प्रकाशाने केलेला एक खेळ! अजून काही नसावं, अशी त्यानं स्वतःची समजूत घातली. खोल गेलेल्या सुरात त्याने तिचे आभार मानले आणि बाहेर जायची परवानगी मागितली.
“तुला वेड लागलंय का? एवढ्या आजारपणात आणि पडत्या पावसात बाहेर कुठं जाणार आहेस?”
“तुम्ही बहुतेक इथं एकट्याच राहताय. मी जास्त वेळ थांबणं योग्य नाही.”
“लोक काय म्हणतील याची काळजी तू करु नकोस. मी पाहीन ते. आणि तसंही तू माझ्या मुलाच्या वयाचा आहेस.”
“हो, तरी पण काही गोष्टींचं तारतम्य पाळणं आवश्यकच असतं.”
“हं! खरंय, तू म्हणतोयस ते.”
त्याने उठण्याचा प्रयत्न केला. पण शक्य झालं नाही. त्याची धडपड बघून त्या स्त्रीचे डोळे करुणेने भरून आले.
“अरे बाबा! थोडा विचार कर! इतक्या थंडीतापात बाहेर जाऊन काय होईल? मरशील कुठे तरी रस्त्यातच!”
“ठीक आहे. पाऊस थांबल्यावर निघेन.”
“चालेल. तसंही कर.”
बाहेर अजून पावसाचा आवाज येत होता. पागोळ्यांवरून पाणी टपाटपा पडत होतं. क्वचित वा-याचा झोत आला तर झाडंझुडुपं तेवढ्यापुरती गदागदा हलत होती. एक प्रसन्न शांतता त्याला आता जाणवू लागली. बाहेरच्या थंड हवेपेक्षा आतलं उबदार वातावरण बरं वाटत होतं. कुठेतरी रातराणी फुललेली असावी. तिचा तिखट गोडसर वास येत होता. घरातील दिव्यांभोवती पतंग फडफडत होते. त्या दिव्यांच्याभोवती पेंग आलेल्या डोळ्यांना मजेशीर वलये दिसत होती. आता मात्र झोपेचा अंमल त्याला जाणवू लागला. काय होईल थोडी झोप काढली तर? थोड्या वेळाने आपण नक्कीच जागे होऊ. आता ताप पण जाणवत नाहीये फारसा. पुढच्या मार्गाला निघूया लगेच.
त्याची विचारशृंखला तिच्या आवाजाने तोडली.
“तुझं गाव कुठचं? आईवडील कोण?”
“या गोष्टींची आता चर्चा करणं योग्य नाहीत समजत.”
“बरं ठीक आहे, पण तू संन्यास का घेतलास?”
“प्रत्येकाने ठराविक चाकोरीतून गेलंच पाहिजे का?”
“एखाद्यानं सुंदर खेळ मांडलेला असेल आणि तू त्यात सहभागी न होता लांबूनच निघून गेलास, तर खेळ मांडणा-याला आनंद होईल का? त्यापेक्षा तू त्या खेळात सहभागी झालास, भले वरवर का होईना, तर त्यात त्याला जास्त आनंद होणार नाही का?”
“असे खेळ किती जन्म खेळत बसणार? त्यालाही कुठेतरी शेवट असावाच ना?”
“का खेळ खेळताना अलिप्तपणे खेळणं शक्य नाही?”
“ते इतकं सोपं नाही. जोपर्यंत मायेचा पाश गळ्याभोवती आवळलेला आहे तोपर्यंत कितीही अहं ब्रह्मास्मिची बडबड करा, संकटाच्या एका घावानेदेखील माणूस कोलमडून पडू शकतो. ढीगभर नातेवाईक असतील पण एका प्रिय व्यक्तिच्या वियोगाने देखील आयुष्य वैराण वाळवंट होऊ शकतं. आपल्याला जाणीव नाही पण आपण या अवस्थेत केवळ गळ्यात एक धोंडा बांधून नदी पार होऊन जाऊ अशा समजुतीत मग्न आहोत. जोपर्यंत स्वतःच्या ख-या स्वरुपाची ओळख होत नाही तोपर्यंत काहीही करा, तुम्ही गुलामच आहात. नियती तुम्हांला फरफटत घेऊन चाललेली आहे आणि या खेळावर तुमचं काहीच नियंत्रण नाही.”
“ठीक आहे. जाऊ दे! मला आपलं तुझ्याशी काही बोलू वाटलं. तुला काही खायला देऊ का? जरा चार घास पोटात गेल्यावर बरे वाटेल.”
“हं. ठीक आहे.”
ती आत स्वयंपाकघरात गेली. थोड्या वेळाने डबे शोधण्याचा आणि मग चूल फुंकण्याचा आवाज येऊ लागला. लगोलग ओलसर लाकडाचा डोळ्यातून पाणी काढणारा धूर देखील येऊ आला. बाहेर पावसाची रिपरिप आणि आत हा धुराचा तिखट वास, अगदी छान वाटत होतं. थोड्याच वेळात भात शिजल्याचा वास येऊ लागला. बराच वेळ गेला असेल. निद्रा व जागृतीच्या अर्धवट सीमारेषेवर त्याला कळलं नाही. थोड्याच वेळात ती स्त्री एका पत्रावळीवर थोडासा तूप घातलेला गरम भात व लिंबाचं गोड लोणचं घेऊन आली.
“हे खा. तुला बरं वाटेल. त्रास तर नक्कीच काही होणार नाही.”
“हं.”
दोन तीन घास खाऊन तो झोपेच्या अधीन झाला. पोटाशी दुमडून घेतलेल्या पायावर मान हळूच कलंडली. बाहेर पाऊस हळूहळू पडत राहिला.
***
पहाटे कधीतरी त्याला जाग आली. अद्याप सूर्यदर्शन नव्हतं. बाहेर काळोखच होता अजून. तारका देखील असाव्यात आकाशात. पण ढगाळ हवेमुळे काही दिसत नव्हतं. त्याला थोडंसं खजील वाटलं. आपण इतका वेळ इथं थांबायला नाही पाहिजे होतं. आत चुलीपाशी फुंकल्याचा आवाज येत होता. ओल्या लाकडाचा धूर सगळीकडे पसरलेला होता. डोळ्यातून येणारं पाणी पुसत तो आत गेला. ती चुलीपाशीच होती. चुलीवर दुधाचं पातेलं होतं.
‘बाळा, जा चूळ भरुन ये. मी तुला गरम दूध देते हळद घालून. तेवढे पी आणि मग जा. माझं काही म्हणणं नाही.’
‘ठीक आहे.’
घराबाहेर पाण्याने चूळ भरुन तो परत आत आला. बाहेर बरीच थंडी होती. पण आत अद्याप उबदार आणि छान वाटत होतं. ती लगेच बाहेर आली. एका फुलपात्र भरुन हळद आणि आलं घातलेलं दूध होतं तिच्या हातात.
‘हे घे.’
दुधावर आलेलं पातळसं सायटं चिमटीने बाहेर काढत तो हळूहळू फुंकून दूध पिऊ लागला.
‘एक ऐकशील माझं?’
‘हं सांगा?’
‘माझा एकुलता एक तरुण मुलगा, अगदी तुझ्याच सारखा दिसणारा, युद्धात मारला गेला काही वर्षांपूर्वी. त्याचं लग्न देखील झालेलं नव्हतं. त्या धक्क्याने हाय खाऊन माझ्या पतीने देखील तळमळत प्राण सोडला. तू इथेच थांबशील का माझा मुलगा म्हणून? जी काही आमची शेतीवाडी आहे, ती तुझीच होईल. तुझं लग्न देखील करुन देईन मी. नाही म्हणू नकोस.’
‘नाही ते शक्य नाही अजिबात. हेच जर शेवटी मला करायचं होतं, तर गडगंज होतं की माझ्या घरात. कशाला ते सर्व सोडून आलो मी? माफ करा! तुम्ही आईप्रमाणे काळजी घेतलीत माझी कालपासून. पण आता येथे अजिबात थांबणे शक्य नाही मला. मी निघतो.’
तिच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू येऊ लागले.
पण आता निर्धाराने उठला तो. फुलपात्र बाजूला जमिनीवर ठेवलं आणि किंचित झुकून तिला नमस्कार केला. ती त्याला अडवायला हात धरु पाहत होती. पण जोर लावून तो झटक्याने दरवाजातून बाहेर पडला. पुन्हा मागे वळूनही न पाहता तो भराभर आपल्या रस्त्यास लागला.
(क्रमशः)
.
.
अवधूत (भाग-४) http://www.misalpav.com/node/32900
अवधूत (भाग-३) http://www.misalpav.com/node/32639
अवधूत (भाग-२) http://www.misalpav.com/node/32591
अवधूत (भाग-१) http://www.misalpav.com/node/32509
.
.
प्रतिक्रिया
23 Nov 2015 - 12:06 pm | पद्मावति
आहा!.. 'अवधूत' इस बॅक!!!
हाही भाग अतिशय सुंदर झाला आहे. अप्रतिम चित्रदर्शी लेखनशैली.
23 Nov 2015 - 12:07 pm | बोका-ए-आझम
हा भाग टाकल्याबद्दल धन्यवाद. लेखन छानच!
23 Nov 2015 - 12:13 pm | रातराणी
+१
23 Nov 2015 - 12:07 pm | पद्मावति
आहा!.. 'अवधूत' इज बॅक!!!
हाही भाग अतिशय सुंदर झाला आहे. अप्रतिम चित्रदर्शी लेखनशैली.
23 Nov 2015 - 12:20 pm | प्रीत-मोहर
हाही भाग मस्तच झाला आहे.
23 Nov 2015 - 12:21 pm | असंका
वावा! सुरेख!!!
आता थांबू नका दादा....
धन्यवाद!
23 Nov 2015 - 12:32 pm | ज्ञानोबाचे पैजार
मस्त वाचताना गोनिदांच्या भ्रमण गाथेची आठवण झाली.
पुढचे भाग लवकर लवकर येउद्या.
पैजारबुवा,
23 Nov 2015 - 12:48 pm | नीलमोहर
मात्र आता जास्त ताटकळत ठेऊ नका,
पुढील लेखही लौकर येऊ द्या ..
23 Nov 2015 - 8:48 pm | मांत्रिक
धन्यवाद! येतोय लवकरच!!!
23 Nov 2015 - 2:29 pm | मांत्रिक
सं.मं.- पॅरा टाकायलाच विसरलो. ते खूप खराब दिसतंय. जरा टाकाल पॅराज?
आणि हो त्या पूर्वीच्या भागांच्या लिंक्स मला नीट देता आलेल्या नाहीयेत. अशा लिंक दिलेल्या खराब दिसताहेत. जुने लोक कशा छान लिंक्स देतात? कृपया मदत करा.
25 Nov 2015 - 3:00 am | स्रुजा
वाह !! छान झालाय हा ही भाग. करते मी दुरुस्त्या.
23 Nov 2015 - 3:58 pm | जेपी
आवडल.
पुभाप्र..
23 Nov 2015 - 4:22 pm | पैसा
खूप छान लिहिताय!
23 Nov 2015 - 5:51 pm | कवितानागेश
छान झालाय हा भाग.
23 Nov 2015 - 5:53 pm | प्रचेतस
लेखनशैली अतिशय सुंदर.
23 Nov 2015 - 6:04 pm | अमृत
वाचत रहावसं वाटतय.. पुढिल भाग लवकर टाका.
23 Nov 2015 - 6:22 pm | बाबा योगिराज
वल्लाह है यह.
आज सकाळीच् 'अवधूत'ची आठवण झाली होती.
पुढील भाग जरा लवकर येऊ द्या..
23 Nov 2015 - 6:57 pm | इशा१२३
छान झालाय हा भागहि! पुभाप्र.
23 Nov 2015 - 8:53 pm | मयुरMK
खुप दिवासनंतर काहीतरी वाचण्यासारख :p . अप्रतिम लेख
24 Nov 2015 - 2:59 am | रेवती
उत्सुकता जास्त ताणू नका. मस्त लिहिताय.
24 Nov 2015 - 7:15 am | इडली डोसा
हे बघुन आनंद झाला. आता पुढील भागांसाठी जास्त वाट बघायला लावू नका.
24 Nov 2015 - 8:24 am | अरुण मनोहर
उत्सुकता ताणली गेली आहे. खूप छान लेखन .
24 Nov 2015 - 8:41 am | विशाल कुलकर्णी
मस्तच...
वाइच मोठाले भाग लिवा की देवानु, सुरु झाला म्हनंस्तोवर सप्ला बी
24 Nov 2015 - 10:20 am | शित्रेउमेश
जमलाय... हाही भाग अगदी अप्रतिम....
पु.भा.प्र.
लवकर येवु देत पुढचा भाग...
24 Nov 2015 - 7:25 pm | लालगरूड
अवधूत (भाग-४)
अवधूत (भाग-३)
अवधूत (भाग-२)
अवधूत (भाग-१)
24 Nov 2015 - 7:27 pm | लालगरूड
अवधूत (भाग-४)
अवधूत (भाग-३)
अवधूत (भाग-२)
अवधूत (भाग-१)
24 Nov 2015 - 7:31 pm | लालगरूड
अवधूत (भाग-४)
अवधूत (भाग-३)
अवधूत (भाग-२)
अवधूत (भाग-१)
24 Nov 2015 - 7:32 pm | लालगरूड
प्रकाटाया
24 Nov 2015 - 7:33 pm | मांत्रिक
पण असा दुवा द्यायचा कसा ते तरी सांगा कृपया?
24 Nov 2015 - 10:07 pm | लालगरूड
αnchσr tαg wαprαwα.
єg
<α hrєf="www.gσσglє.cσm">gσσglє
чα mαdhє gσσglє ѕhαвd hчpєrlínk mαdhє díѕєl αní nαwαwαr clíck kєlє tαr gσσglє σpєn hσíl.
GOOGLE
24 Nov 2015 - 10:11 pm | लालगरूड
भाग 4
24 Nov 2015 - 10:15 pm | लालगरूड
<ए एचआरईफ="धाग्याचा क्रमांक"> धाग्याचे नाव
<ⓐ ⓗⓡⓔⓕ ="ⓝⓞⓓⓔ ⓝⓤⓜⓑⓔⓡ">ⓝⓞⓓⓔ ⓝⓐⓜⓔ
24 Nov 2015 - 10:22 pm | लालगरूड
सर्वात आधी < हे चिन्ह टाकावे. त्यानंतर a लिहावे मध्ये स्पेस देऊन href लिहावे त्यानंतर =" ही चिन्हे . आता धागा क्र. लिहावा आणि "> ही चिन्हे . लगेच धाग्याचे नाव व शेवटी <./.a.>. anchor tag close karawa.
24 Nov 2015 - 7:42 pm | सस्नेह
शब्दवेल्हाळ लेखन. वाचताना गुंगून गेले.
24 Nov 2015 - 7:48 pm | विवेकपटाईत
मस्त आवडला.
25 Nov 2015 - 2:44 am | निनाद मुक्काम प...
आता थांबू नका
माझ्यामते देवीने खरच त्याची परीक्षा पाहिली की हा अजूनही कोणत्या मोहपाशात अडकून आहे का नाही.
अवधूत त्याच्या परीक्षेत उतीर्ण झाला.
25 Nov 2015 - 3:18 pm | चाणक्य
लिखाण. पुभाप्र.
7 Feb 2016 - 5:30 pm | Rahul D
बूवा पुढचे भाग लवकर टाका.
7 Feb 2016 - 10:18 pm | विजय पुरोहित
हो टाकतो लवकरच...
15 Feb 2016 - 7:30 pm | आवडि
पुढे ??