तोंडात माणिकचंद रिकामा करुन बब्यानं गस्टेल नेम धरुन रिंगणात फेकला. तशी आदीली रिंगणाभाईर आली. पण गस्टेलबी थोडा रिंगणाला लायनीला शिवत पडला.
"बल्ल्या " उड्या हाणत संत्या, राम्या, आन राजा किंचाळली.
बब्यानं पळतच जाऊन गस्टेल नीट बघितला.
" ये आरं आतच हाय की " चवड्यांवर बसुन बब्या पोरांकडं बघत म्हणाला.
मग संत्यानं एक बारकिशी काटकी घीऊन रिंगणाच्या लायनीवर हळुहळु फिरवली. बाकीची पोरं नीट नजर लावुन बघाय लागली. गस्टेल थोडासा हलला.
"बल्ल्या " पुन्हा एकदा पोरं ऊसळली.
"ये बल्ल्याच झालाय, टाक आजुन येक आदीली" संत्या सुड ऊगवत म्हणाला.
माणिकचंदची पिचकारी मारत बब्यानं खिशात हात घातला. त्याच्या खिशात शंभर गोष्टी. माणिकचंदची आख्खी माळ त्याच्या दोन्ही खिशात भरुन मावायची. बराच वेळ खुसपुस करुन घोळुन घोळुन त्यानं एक आदीली भाईर काढली. ऊभ्या ऊभ्याच त्यानं ती रिंगणात फेकली. सगळं पैसं पुन्हा रिंगणात ठिवुन नवा डाव सुरु झाला.
आता संत्यानं गस्टेल हातात धरला. पोरांनी श्वास रोखुन धरला. संत्याचा गस्टेल एकदम कारी. सप्पय. नेम धरुन त्यानं आज्जाद गस्टेल रिंगणात सोडला. बरोब्बर रुपायावर पडला. त्ये पण रिंगणाच्या आत.
"ठोचळाच मारला की लगा त्वा" राजा हाताची घडी घालत कपाळावर आठ्या पाडत हासतच म्हणाला.
बब्यानं तोंडावर बोटं ठिवुन आजुन एक पिचकारी मारली.
" आपला गस्टेल हाय भाव्वं त्वो" मांडीवर थाप टाकत संत्यानं रुपाया ऊचलला.
"पाच कमी चाळीस, आज वीस रुपय गेलं" विचार करत बब्या मनाशीच म्हणाला. काल तिरट खेळताना तो सत्तर रुपय हारला होता. आन आजच्या रिंगाटात बी त्याला नशीब साथ देत नव्हतं.
डाव संपत आला तरी बब्याला टाकलेली मोज बी परत मिळाली न्हाय.
"चलै आजुन एक डाव खीळु" बब्यानं आजुन एक माणिकचंदची पुडी फोडली.
"बास करय आता, संध्याकाळी यं, घरामागं खीळु" संत्या खिशातला खुर्दा वाजवत म्हणाला.
" आसं कसं?, माझं पैशं गेल्यात, आजुन एक डाव तुला खेळायच लागल " बब्या भाया वर सारत म्हणाला.
"निघ आता" राजानं त्येला बाजुला सारलं. पोरं समदी घराकडं निघुन गेली.
बब्या हिरमुसला. जरा वेळ बसुन गावात गेला. आजपण त्यानं शाळेला दांडी मारली हुती. चौथीच्या वर्गात नापास होत होत त्याला मिसरुडं फुटली हुती.
चौकात त्याला मन्या दिसला. दोघं जिगरी दोस्त. हाणमाच्या हाटीलात भजीपाव हाणुन रॉयल थेटरात दोघबी पिक्चर बघाय गेली. थेटर कसलं पत्र्याची खोलीच ती. मधोमध टिवी ठेऊन व्हि सी आर वर पिक्चर दाखवायचे. सगळेच मिथुनचे. पाच रुपायामध्ये. माणिकचंदच्या पुड्याच्या पुड्या फोडुन दोघबी पिचकाऱ्या मारत सिनेमा बघत बसले. कटाळा आल्यावर मधनचं ऊठुन दोघबी चौकात आली.
" घारापुरीला जायचं कारं जत्रला? यीव तमाशा बघुन" मन्या कॉलर मोकळी सोडत अॅक्शन घेत म्हणाला.
"बापाला कळलं तर गुरावाणी बदडलं, जाऊ आता घरीच" बब्याला त्याचा खवीस बाप आठवला.
" कुंचा पीच्चर बघितला रं फोपलीच्या ?" बाप त्येच्या मागचं ऊभा होता.
बापाला बघुन बब्या घाबरला. मन्या धुम ठोकून कुठं गायब झाला त्याला कळलं पण न्हाय.
पळतच बब्या घरी सुटला.
बापानं बी एम ऐटी काढुन त्याचा पाठलाग सुरु केला. बाप जवळ आला तसा माळ्याच्या शेतात ऊडी घेऊन तो ऊसात पसार झाला.
गाडी वाटला लावुन त्याच्या बापाने दोनचार दगड ऊसात भिरकावले.
" रातच्याला यी घरी, कापुनच टाकतू तुला" रागारागानं दम देऊन बब्याचा बाप पुन्हा गावात गेला.
ढेकळं आणि चिखलात बब्याला काय चालनं हुईना. रडतच तो कसाबसा चालत राहिला. फडातनं भाईर यीवुन पांदीचा रस्ता पकडला. मग पुन्हा वगळीतनं चालत तुकाच्या शेतात शिरला.
मागल्या वेळी जवा बापानं बब्याला तंबाखू खाताना पकडलं तवा त्याला दिवसभर झाडाला बांधुन ठिवलं हुतं. तिरट न रिंगाट खेळताना दिसला तर हाताला घावल ती वस्तु बब्याचा बाप त्याला फेकुन मारायचा. आजतर बापानं थेटरातनं भाईर येताना बघितलं हुतं. बब्या थराथरा कापत चालत राहिला.
हिकडं घरामागं रिंगाट आखुन पोरांचा नवा डाव सुरु झाला.
गस्टेल हातात घीऊन राजानं नेम धरला. सगळ्या पोरांनी श्वास रोखुन धरले. राजानं जसा गस्टेल फेकला तसा भेलकांडत तो पार रिंगणाच्या भाईर जाऊन पडला.
"बल्ल्या" चप्पल हातात घीऊन आन खालुन पॅन्ट दुमडलेला बब्या ऊसाच्या बांधावरनं वरडतचं खाली आला.
प्रतिक्रिया
22 Oct 2015 - 7:57 pm | पीशिम्पी
झक्क्कास :)
22 Oct 2015 - 8:00 pm | अभ्या..
हाम्गाश्शी.
बल्ल्या गस्टेल. राव तुम्ही गाववालेच.
कॅरेक्टर, भाषा आन डिटेलिंग परफेक्ट. ऑब्झरवेशन तर नंबरी.
फक्त मूळ आत्मा मिसिंग हाय दादा कथेचा. :(
22 Oct 2015 - 9:16 pm | प्यारे१
+११११.
पण सगळ्याच गोशटीत अर्थ शोधायलाच हवा का रे श्याम?
22 Oct 2015 - 8:10 pm | कंजूस
गस्टेल = ढप?
जरा शब्दकोश बी टाकात जावा.
कुठनं आणतायसा गोष्टी?
23 Oct 2015 - 7:50 pm | जव्हेरगंज
'ढप' हा शब्द बऱ्याच दिवसानी ऐकला. वा!
आणखी काही खेळातले शब्द.
टप्पर
गत
"ढोपर"
आटी
रन्टन
वगैरे वगैरे :)
22 Oct 2015 - 8:56 pm | तर्राट जोकर
शब्दार्थ सांगाओ. नायतर सगळ्या कथा तुमच्या स्वगत वाटत राहतील. भाषेवर पकड मजबूत आहे. पण क्लिष्टता होते आहे. तुमची शैली सांभाळा असे मी नेहमीच म्हणत आलोय. पण थोडंसं सिन-टू-सिन विचार करा. सगळे शॉट एकत्र झाल्याने काही ताळमेळ लागत नाही. परिच्छेद आणी वाक्यरचनेची सलगता यावर थोड्डीशी मेहनत आवश्यक आहे. काय मज पामराला किमान चारपाच वेळा वाचल्याशिवाय कायबी कळत नाय... सर्वात महत्त्वाचे: ल्हान तोंडी मोठा घास आहे. राग मानू नका. हलके घ्या.
22 Oct 2015 - 9:15 pm | अभ्या..
गस्टल = मोठी गोटी, कंचा
बल्ल्या = थोडक्यात हुकला
कारी = नंबरी
आदली =आठ आणे पन्नास पैसे
तिराट = तीन पानी, जुगार
सप्पय = सपाट, क्लीन शॉट
आज्जाद = अलगद, सहज
22 Oct 2015 - 9:28 pm | जव्हेरगंज
अभ्याराजे अत्यंत धन्यवाद, तुमचे सगळे अर्थ बरोबर आहेत. पण मला अपेक्षित अर्थ खाली कंसात देतोय.
गस्टल = मोठी गोटी, कंचा ( सपाट छोटा दगड, कथेतला खेळ गोट्यांचा नाही)
बल्ल्या = थोडक्यात हुकला ( खेळात चुक झाल्यावर वापरण्यात येणारा शब्द, शिक्षा, दंड या अर्थाने)
कारी = नंबरी (जशी विळी/ चाकु कारी असतो त्या अर्थाने, टोकदार)
आदली =आठ आणे पन्नास पैसे
तिराट = तीन पानी, जुगार
सप्पय = सपाट, क्लीन शॉट
आज्जाद = अलगद, सहज
22 Oct 2015 - 9:46 pm | स्वधर्म
जव्हेरगंजजी, भाषेच्या नेमकेपणाबद्दल प्रणाम! २०-२५ वर्षांपूर्वीच्या सांगली मिरजेच्या गल्ली बोळातून फिरवून अाणलंत राव तुम्ही! ही तिकडचीच भाषा ना?
22 Oct 2015 - 9:47 pm | रेवती
तुमच्या कथा आवडतात. हीसुद्धा आवडली.
23 Oct 2015 - 12:54 am | उगा काहितरीच
+१
22 Oct 2015 - 9:51 pm | एक एकटा एकटाच
आवडली
23 Oct 2015 - 8:25 am | कोमल
लैच भारी.
आवडेश
23 Oct 2015 - 8:59 am | शित्रेउमेश
तुमच्या कथा मस्त असतात... खूप आवडतात. ही सुद्धा आवडली.
23 Oct 2015 - 9:59 am | जव्हेरगंज
सगळ्यांचे आभार्स !!!
23 Oct 2015 - 10:53 am | टवाळ कार्टा
मस्त
23 Oct 2015 - 11:26 am | नाखु
रे भावड्या !!!!
23 Oct 2015 - 11:50 am | मुक्त विहारि
काही शब्दांचे अर्थ समजत न्हवते.
पण मग अभ्या आणि तुम्ही दिलेले अर्थ बघीतले आणि मग कथा समजली.
पु.क.प्र.
23 Oct 2015 - 12:27 pm | गामा पैलवान
जव्हेरगंज,
तुमच्या कथा वाचणे हा वेधक अनुभव असतो. प्रस्तुत कथाही त्यास अपवाद नाही. :-) शीर्षकामुळे बोध काय घ्यायचा तेही लागलीच कळून येतं. मात्र भाषा जराशी वेगळी वाटते. पण कथेला ओघ असल्याने खपून जाते. धन्यवाद.
आ.न.,
-गा.पै.
23 Oct 2015 - 12:47 pm | द-बाहुबली
जव्हेरभाउ काहीही लिहा..
ओघवतंच लिखाण असतं.
23 Oct 2015 - 1:04 pm | आनंद कांबीकर
... झक्कस लिवलय. केरक्ट्अर डोळ्या म्ह्वर उभा रहिल्.
23 Oct 2015 - 1:16 pm | बाबा योगिराज
मायला तुमाला बाटल्या देता देता एखाद दिशी अमालाच बाटल्या कमी पडाच्या.
भेष्ट. आवड्यास ना भौ.
23 Oct 2015 - 8:08 pm | तर्राट जोकर
तरी म्हणो मावाल्या सबन बाटल्या कुटीसा जातेत म्हणून.... मानुस धुंदीत रायते त्याचा असा फायदा नै घ्याव बाबाराव...!
24 Oct 2015 - 10:00 am | बाबा योगिराज
ख्या ख्या ख्या...
23 Oct 2015 - 8:16 pm | सूड
मस्त!
23 Oct 2015 - 9:25 pm | अस्वस्थामा
जव्हेरगंज भौ.. एक नंबरा लेखन आहे. आधी व्यनि करणार होतो पण विचार केला बोर्डावर चार चौघात कौतुक केलेलं जास्त चांगलं..
तर, पहिले तुम्हाला भाषेबद्दल पैकीच्या पैकी गुण. अगदी अस्सल सहज आलेली भाषा. ग्रामीण बाज म्हणून किंवा गावठी लोकांची भाषा म्हणून बरेच जण काही लिहितात तेव्हा एक तर सहजपणा येत नाही (त्यांची भाषा नसेल तर) आणि त्याला ते गावठी (कमी) समजतायत असं जाणवतं (कदाचित इतरांना समजावे म्हणून टोन डाऊन करत असतील अथवा आता आम्ही "ती" भाषा बोलत नाही हे असेल). अर्थात अपवाद असतातच (लगेच आठवलेली उदा. म्हंजे इथे आतिवास किंवा अभ्या.. ने लिहिलेलं).
त्याने होतं काय की प्रमाणित मराठी बोलणारे एका बाजूस आणि एकाच टोन मध्ये बोलणारं इतर तमाम महाराष्ट्री ग्रामीण पब्लिक दुसर्या बाजूस असं काहीसं लिहिलं/दाखवलं जातं असं वाटतं. बारा मैलावर बदलणार्या भाषेचे (इथे भाषा=लहेजा अपेक्षित आहे) सगळेच जाणकार असं नै पण पूर्णतः कळली नाही तरी जशी अहिराणी/कोकणी मस्तच वाटते तसंच इतरांबद्दलही म्हणता येईल.
विशेष म्हणजे तुमच्या लिखाणात ती भाषा तुमची असते आणि आपुलकीने मायेने तुम्ही लिहिलंय असं जाणवतं.
कोणी समजले नै म्हणाले तरी त्यासाठी तुम्ही सूची देऊ शकताच पण म्हणून शैली बदलू नका हे आवर्जून सांगेन.
कथा सक्षम आहेतच पण थोड्या अजून विस्तारीत होऊ शकतील असं वाटतं कधी कधी (कधी कधी हा). अर्थात बहुतेक कथांचे शेवट पर्फेक्ट आहेत असंच वाटतं त्यामुळे बिल्ट-अप जरी थोडं रेंगाळलं तरी हरकत नसावी परंतु शेवट तुमची खासियत आहे असंच म्हणेन.
परत एकदा लिहित रहा. तुम्हाला पटतील त्याच सुचना प्रतिसाद विचारात घ्या.. बाकी तुम्हाला जे सहज होईल तेच मस्त आहे त्यामुळे लिहित रहा.. :)
23 Oct 2015 - 9:28 pm | चांदणे संदीप
+ पाहिजे तितके घ्या!
23 Oct 2015 - 10:01 pm | जव्हेरगंज
_/\_ भरुन पावलो अस्वस्थामा,
यापुढे काय लिहावे सुचेना ...
(कितीही कृत्रिम वाटलं तरी) मन:पुर्वक धन्यवाद :)
23 Oct 2015 - 10:32 pm | अभ्या..
छान प्रतिसाद अस्वस्थामाभाऊ.
काय करणार हो. आमची कॅरेक्टर्स कधी प्रमाणभाषेत बोलतच नाहीत आमच्याशी. मग लिहितो ज्या भाषेत ऐकले त्याच. :)
धन्यवाद. वापरातल्या भाषेला सुध्दा आपले म्हणण्यासाठी.
23 Oct 2015 - 11:31 pm | प्यारे१
अस्वस्थामा यांनी समस्त वाचकांच्या मनातले ओळखले आहे.
24 Oct 2015 - 11:13 am | दमामि
जबरी!
24 Oct 2015 - 6:10 pm | चौथा कोनाडा
आहे ++ १
26 Oct 2015 - 6:32 pm | नगरीनिरंजन
मस्त! अजून येऊ द्या.
26 Oct 2015 - 8:14 pm | किसन शिंदे
मस्तच!