प्रिटी वूमन - भाग १
प्रिटी वूमन - भाग २
प्रिटी वूमन - भाग ३
प्रिटी वूमन - भाग ४
प्रिटी वूमन - भाग ५
प्रिटी वूमन - भाग ६
आमि कलकात्तार रशगुल्ला
ओ आमि कलकत्तार रशगुल्ला
टेपवर हे गाणे लागले तसे स्वयंपाकघरात भाजी चिरणार्या मर्जिनाच्याच काय पण खिडकीतून खाली पाहणार्या नजमाच्याही पायाने ठेका धरला. शरीफाने तर हात फैलावून नाचायलाच सुरुवात केली.
"कारटी जरा उशीरा आली इथे. नाहीतर नाव कमावलं असतं हॉटेलात", नजमा स्वयंपाकघरात येता येता पुटपुटली.
भाजी चिरता चिरता मध्येच थांबून मर्जिना म्हणाली, "काहीतरी बोलू नकोस गं मावशी. चौदा वर्षांची तर आहे अजून ती"
"तर काय झालं? अठरा वर्षांची म्हणून सहज खपून जाईल. नाही का?", नजमा म्हणाली.
"हूं", मान झटकत मर्जिना म्हणाली.
आईच्या वळणावर गेलेली शरीफा उफाड्याची होती खरी, पण तिनेही आपल्यासारखे हॉटेलात नाचावे ह्या निव्वळ कल्पनेनेच मर्जिना शहारली.
डान्सबार बंद होऊन दोन-अडीच महिने उलटले होते. लवकरच सगळे पहिल्यासारखे होईल, ही आशा आता मावळत चालली होती. काळजी आणि चिंतेने मर्जिना पोखरून निघत होती. रमजान महिना सुरू होता. गावाहून आजी आणि बहिण आले होते. ईद झाल्यावरच ते परतणार होते.
मर्जिनाने घड्याळात पाहिले. रोजा सुटायला आता थोडाच वेळ बाकी होता. तिने भाजी परतायला टाकली. तिकडे नजमानेही वाळ्याच्या सरबताचे फुलपात्र टेबलावर ठेवले आणि खजूराची बरणी घेण्यासाठी स्वयंपाकघरात आली.
हाजूरीच्या मशिदीतून अजानचे स्वर ऐकू येताच, सगळ्यांनी डोक्यावरून ओढण्या घेतल्या. दिवसभरचा रोजा सोडायची वेळ झाली होती.
मुंबईला यायचे म्हणून शरीफा मोठ्या अट्टाहासाने हिंदी बोलायला शिकली होती. तशी टीव्हीवरील कार्यक्रम बघून थोडी सवय झाली होतीच पण बोलण्याचा सराव नव्हता. तिचा हट्ट् म्हणून घरातले सगळेच तिच्याशी हिंदीत बोलीत. जेवणे झाल्यावर बाहेर हॉलमध्ये मर्जिना, नजमा आणि कुलसूम आजी असेच गप्पा मारीत बसले होते.
नाचून नाचून शरीफा दमली होती. मध्येच उठून ती म्हणाली , "मुझे घूम आ रही है".
कुणालाच काही कळेना.
शरीफा पुन्हा पुन्हा तेच तेच म्हणत होती, "मुझे घूम आ रही है".
"आरे, तुमि की बोलछो?", नजमा मावशीचा सयंम सुटला.
मावशीचा आवाज चढला तशी एका हातात उशी घेऊन शरीफा पुन्हा म्हणाली, "मुझे घूम आ रही है".
सगळे घर हास्याच्या कल्लोळात बुडून गेले!
*******
एटीएममधून काढलेले पैसे पाकीटात ठेवताना, पाकीटात ठेवलेला तो कागदाचा तुकडा खाली पडला. त्याने उचलून पाहिले. हॉटेलातील पेपर नॅपकीनवर लिहिलेला तो मोबाईल नंबर! पाहून पाहून नंबर आता पाठ झाला होता पण अजूनही त्याची हिंमत काही होत नव्हती त्या नंबरवर फोन करायची!
करावा काय फोन? त्याने शभराव्यांदा तरी विचार केला असेल. तेही आता दोन-तीन महिने उलटून गेल्यावर? ठीक आहे, करूया पण आपल्या मोबाईलवरून नको. ऑफीसातील फोनवरूनही नको. पब्लिक फोनच बरा!
धडधडत्या छातीने त्याने नंबर फिरवला. एक रिंग वाजताच लगेचच कट केला. असे तीन-चारदा घडले.
का हिंमत होत नाही फोन करायची? छे छे, असे घाबरून चालणार नाही. सारा धीर एकवटून त्याने पुन्हा एकदा नंबर फिरवला.
*******
उद्या ईद. राबोडीतून बड्याचे मटण घेऊन आलेल्या मर्जिनाने रिक्षा थांबवली आणि चारोळी घेण्यासाठी ती किराण्याच्या दुकानाकडे जाऊ लागली.
"काजल, काजल..", हाक ऐकू आली तशी ती थांबली.
मागून दुसरी एक रिक्षा थांबली आणि त्यातून चांदनीने तिला पुन्हा हाक मारली.
चांदनीने खूपच आग्रह केला म्हणून ती तिच्या घरी जायला तयार झाली. खरे म्हणजे बड्याच्या मटणाची पिशवी घेऊन चांदनीच्या घरी जावेसे तिला वाटत नव्हते.
चांदनी हिंदू. आग्र्याची. हॉटेलातल्या वेटरशी पाट लावल्यापासून तिचे घरच्यांशी संबंध थोडे दूरावलेच होते. लालवाणी हा तिचा हॉटेलातील दोस्त. त्याच्याच ओळखीने काही खाजगी मुजरा पार्ट्यांना ती नाचायला जाई. हॉटेलसारखी रोजच्या रोज पैशाची आवक होत नव्हती हे खरे, पण घर-संसार सुरू होता. वेटर नवरा मात्र कामाविना घरीच बसून होता.
चावीने दरवाजा उघडून चांदनी आत आली आणि पाठोपाठ मर्जिनादेखिल. तिचा नवरा तिच्या कपड्यांना इस्त्री करीत होता. धुतलेल्या कपड्यांचा ढीग पडला होता.
"अभी तक इस्त्री नही हुई?", चांदनी कातावली.
"लाईट किधर था? अभी अभी तो लाईट आया", तिच्या नवर्याने चिडचिडत स्पष्टीकरण दिले.
"अच्छा अच्छा, संतोषअण्णासे बात हुई? वह शंकर लगा है कलसे किसी हॉटेल में"
"हॉटेल नही, कॅन्टीन है कंपनी का"
"जो भी है. कमा तो रहा है...."
तो काहीही न बोलता इस्त्री करू लागला. त्याला आता असल्या बोलण्याची सवयच झाली होती, पण हा तमाशा बघायला काजल नसती तर बरं झालं असतं, असे त्याला वाटून गेले.
एखादी नदी जेव्हा दुथडी भरून वहात असते तेव्हा तिच्या पात्रातील दगडधोंड्यांचा अंदाज येत नाही. पण एकदा का पाण्याचा प्रवाह आटला की तेच दगडधोंडे टोचू लागतात. वरलीया रंगांवर भाळून जुळवलेल्या नातेसंबंधांचेही काहीसे असेच असते. जोवर पैशाचा ओघ सुरू असतो तोवर जाणवत नाही पण एकदा पैशाचा ओघ थांबला की एकमेकांची उणीदुणी दिसू लागतात, टोचू लागतात!
"सुनो, जरा चाय बनाना", मर्जिनाशी गप्पा मारता मारता चांदनीने नवर्याला सांगितले.
"दूध लाना पडेगा. खतम हुवा है"
"ठीक है फिर लेके आओ", पर्समधून पैसे काढत चांदनी म्हणाली.
"मोबाईल में बॅलन्स कितना है?"
"चालीस रुपया"
"तो साठ रुपयेका बॅलन्स भी लेके आना", अजून एक नोट काढत चांदनी म्हणाली, "और गोवा के दस पॅकेट"
"और..", पैसे घेत घेत तिचा नवरा थोडासा घुटमळत बोलला.
"चारमिनार? ठीक है, एक पॅकेट लाना. बादमे हप्ता भर नही. समझा? दिन कैसे आये है, पता है ना?"
आवक कमी झाली तरी चांदनीचा गुटखा काही कमी झाला नाही, मग आपल्याच सिगरेटीला कात्री का? त्याच्या मनात विचार आला खरा, पण कमावत्या बायकोपुढे तो काय बोलणार?
तो बाहेर जायला निघणार तेवढ्यात तिचा फोन वाजला.
"अरे, जरा देखना कौन है", चांदनीने त्याला थांबवित सांगितले.
डान्सबारमध्ये मुली नाचत तेव्हा मोबाईल हातात घेऊन नाचू शकत नाहीत. घागर्याला खिसाही नसतो! तेव्हा त्यांचा मोबाईल सांभाळतात ते वेटर नाहीतर छोटू लोक. प्रत्येकीचा वेटर वा छोटूही ठरलेला. साहजिकच त्याला त्या मुलीला कोणाकोणाचे फोन येतात, त्यापैकी कोणाचे फोन ती खुषीने घेते, कोणाचे फोन बळजबरीने घेते आणि कोणाचे फोन टाळते, हे त्यांना बरोबर ठाऊक असते.
"लालवाणी का फोन है", फोन तिच्या हातात देत तो म्हणाला आणि गुपचूप घराबाहेर गेला. नाहीतरी त्या लालवाणीचा फोन आल्यावर त्याला तिथे थांबावेसेदेखिल वाटत नसे, ते वेगळे!
पुढील आठवड्यात खंडाळ्याला कुणा सरकारी अधिकार्यांची पार्टी होती आणि तिला तिथे जाण्यासंबंधी त्याचा फोन होता.
"चांगलं चाललयं म्हणायचं तुझं", मर्जिना म्हणाली.
"चांगलं कसलं? चाललय आपलं कसंबसं", चांदनी उत्तरली, "आणि तू काय ठरवलयस?"
"मी? अल्ला जाने"
"तू आमच्यासारखं काही करणार नाहीस ते माहिती आहे. पण हे बघ, माझ्या नवर्याचा मालक लेडीज सर्व्हीस चालू करतोय. पुरुष वेटरांना काढून मुलींना ठेवणार आहे. तुझ्यासंबंधी बोलायला सांगू?"
"नंतर सागते."
"बघ विचार कर आणि सांग."
"रानी दुबईला चाललीय ठाऊक आहे ना? तीन महिन्यांसाठी"
"हो, ऐकलयं खरं"
मग कोण काय करतयं. कुणाचं कसं चाललयं या वरच्या त्यांच्या गप्पा पुन्हा सुरू झाल्या. कोण उघड उघड पिकअप जॉईंटमध्ये लागलं होतं तर कोणी तेच काम दुसर्या कामाच्या बुरख्याआड करीत होते.
"आणि आपली बाकी वेटर आणि छोटू मंडळी काय करताहेत", मर्जिनाने विचारले
"लागले आहेत कुठे कुठे साध्या हॉटेलात. हे आमचं सोडून..", चांदनी त्राग्याने म्हणाली.
"असं कसं काहीच करीत नाही तुझा नवरा?", मर्जिनाने विचारले.
"अगदीच काही करतं नाही असं काही नाही हं"
"काय करतो काय? इस्त्री, झाडलोट आणि जेवण? आणि काय करतो?", मर्जिनाने विचारले.
"अगं, पाठीला साबण चोळतो की माझ्या", चांदनी हसत हसत म्हणाली.
"चल, चावट कुठली", मर्जिना म्हणाली आणि दोघी खळाळून हसू लागल्या.
*******
चौथ्यांदा एक रिंग वाजून फोन बंद झाला तेव्हा मर्जिनाच काय पण नजमाही वैतागली.
"आहे तरी कोण?", नजमाने विचारले.
"काही समजत नाही. कॉईन बॉक्सचा नंबर दिसतोय", मर्जिनाने फोनकडे पाहात उत्तर दिले.
पुन्हा फोन वाजला. आता मात्र एका रिंग मध्ये थांबला नाही. मर्जिनाने फोन उचलला. तोच कॉईन बॉक्सचाच नंबर.
"हॅलो", मर्जिना म्हणाली.
"हॅलो, कौन काजल?", पलीकडून आवाज आला.
"हां काजल. आप कौन?", नंबर आणि आवाज दोन्ही अनोळखी असल्याने थोडे बुचकळ्यात पडून मर्जिनाने विचारले.
"मैं वो .. वो तुमने नंबर दिया था ना .. आखरी दिन? .."
"अच्छा", आता तिला ओळख पटली. थोडेसे आश्चर्य, थोडा आनंद!
"इतने दिनों के बाद याद आयी आपको?"
"ऐसेही. थोडा बिझी था", तो खोटेच बोलला, "बहोत दिनोंसे देखा नही आपको. मिलोगी?", आवंढा गिळत तो बोलला.
आपण एवढे बोलायचे धैर्य कसे काय केले याचे आश्चर्य करीत तिच्या उत्तराची वाट पाहू लागला.
"आज रमझान का आखरी दिन है ना. कल ईद. परसो मिलेंगे"
अरेच्चा! रमझान आणि ईद? म्हणजे ही मुस्लिम आहे? मग हिचे नाव काजल कसे? तो चक्रावला.
"रमजान, मतलब एक महिना तुम लोग दिन में कुछ खाते नही. सिर्फ रातको खाना खाते हो ना?", त्याने ऐकीव ज्ञान पाजळले.
"हां. वैसे सिर्फ आदमी लोग ही पुरा एक महिना रोजा रख पाते है, औरते नही"
"ऐसे क्यूं?"
"ऐसे ही होता है. औरते ज्यादा से ज्यादा अठ्ठाईस दिन रोजा रख पाती है. उसके बाद तो उन का रोजा टूट ही जाता है"
"ऑ?", तो विचारात पडला.
"ठीक है तो कल फिर फोन करना. परसो मिलने के बारे मे बात करेंगे. ठीक है?"
त्याला बुचकळ्यात टाकून तिने फोन ठेऊन दिला.
"कोण होता तो? आणि हे काय सगळं सांगत बसली होतीस त्याला?", तिचे बोलणे ऐकून विस्मयचकित झालेल्या नजमाने विचारले.
"कुछ नही. देख रही थी कितने पानी में है", हसत हसत मर्जिना म्हणाली.
*******
कपडे ठीकठाक करून प्रवीणशेठ बाथरूममधून बाहेर आला. तेव्हा, तोपर्यंत पलंगावरच पहुडलेली स्वीटी उठली आणि कपडे करायला आत गेली. पलंगावरील विस्कटलेल्या चादरीवर बसून त्याने पाकिटातून पाचशेची एक नोट आणि दहा दहाच्या काही नोटा काढून शर्टाच्या वरच्या खिशात ठेवल्या आणि एक सिगरेट काढून शिलगावली.
थोड्याच वेळात ती बाहेर आली. घट्ट टॉप आणि चुडीदारमधून दिसणार्या तिच्या शरीरसौष्ठवाकडे पाहात त्याने हळूच ओठांवरून जीभ फिरवली.
अजून एकदा? नाही नको. उशीर होतोय, घड्याळाकडे पहात त्याने विचार केला.
नितिन कंपनीसमोर गाडी थांबली तशी स्वीटी उतरायला निघाली. त्याने खिशातून नोट काढून तिच्या मुठीत ठेवली. गाडी निघून गेल्यावर तिने मूठ उघडून बघितले. नेहेमी किमान हजार तरी देणार्या प्रवीणशेठने फक्त पाचशे रुपये टेकवले होते!
पुरवठा वाढला की किंमत कमी होते, हे अर्थशात्रीय सत्य फारच कठोरपणे तिच्या प्रत्ययाला येत होते.
*******
आजीच्या हातची चवदार् बिर्याणी आणि शीर कोर्मा खाऊन सगळे तृप्त झाले. मर्जिनाने तर कितीतरी वर्षात आजीच्या हातचे खाल्ले नव्हते. मर्जिनाने स्वतःसाठी एक छानसा ड्रेसतर घेतला होताच पण आजी आणि मावशीसाठीही साड्या घेतल्या होत्या. आणि शरीफा? तिच्यासाठी नवे कपडे काय पण शंभर रुपयांची ईदीदेखिल होती. छान पैकी ईद साजरी झाल्याचा एक समाधानाचा, आनंदाचा भाव सगळ्यांच्या चेहेर्यावरून ओसंडून वाहात होता.
आणि मर्जिना॑च्या हातातील ब्रेसलेट दिसेनासे झाले आहे, हे मात्र कुणाच्या ध्यानातही आले नव्हते!
******* ******* *******
(क्रमशः)
प्रतिक्रिया
11 Dec 2008 - 2:34 pm | केवळ_विशेष
टायम नका लावू सुनिलभौ...
धपाधप येउंद्यात उरलेले भागही!!!
11 Dec 2008 - 2:47 pm | अभिरत भिरभि-या
भाग नेहमीप्रमाणे चांगला आहे पण खरेच इतका वेळ नका लावु.
संदर्भ लागायला यंदा २ भाग मागे जावे लागले.
>>मुझे घूम आ रही है".
हे भारी आहे.
माझासुद्धा 'घुमणे' मधे हिंदी / मराठीत असाच घोळ होतो.
"घुमट मे आवाझ घुमता हे" हे वाक्य हिंदी पब्लिकला समजायचे नाही. :D
11 Dec 2008 - 2:54 pm | ऋषिकेश
हा भागहि खूप खूप आवडला
ओघवते आणि मुळ कथेला घट्ट धरून असलेले लिखाण
मस्त!
-(गोंधळलेला) ऋषिकेश
11 Dec 2008 - 2:54 pm | आनंदयात्री
मस्त !!!
मार्जिनाला तिचा तो मित्र तारतो का ते बघायची उत्कंठा आता !!
11 Dec 2008 - 3:01 pm | स्वाती दिनेश
खूप वेळ लावलात हो ह्या भागाला, उत्सुकता फार ताणू नका बुआ..
हा भागही छान जमला आहे हे वे सां न ल.
स्वाती
11 Dec 2008 - 3:30 pm | नंदन
हा भागही उत्तम जमला आहे. लेखाच्या ओघात आलेली ही वाक्येही विशेष आवडली -
एखादी नदी जेव्हा दुथडी भरून वहात असते तेव्हा तिच्या पात्रातील दगडधोंड्यांचा अंदाज येत नाही. पण एकदा का पाण्याचा प्रवाह आटला की तेच दगडधोंडे टोचू लागतात.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
11 Dec 2008 - 3:33 pm | बिपिन कार्यकर्ते
हा भागही आवडला. गोष्ट बर्यापैकी पुढे गेली आहे त्याबद्दल धन्यवाद पण इतक्या छान गोष्टीचे भाग असे खूप खूप अंतराने भाग टाकल्याबद्दल तुम्हाला पाप लागणार. :)
बिपिन कार्यकर्ते
11 Dec 2008 - 7:26 pm | अनिल हटेला
येउ द्यात पूढील भाग बीगी -बीगी !!
(घाइत )
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
12 Dec 2008 - 2:04 am | प्राजु
पण खूपच वेळ लावलात याभागाला.
आत किमान वर्षाअखेरी पर्यंततरी पुढचा भाग लिहा.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
12 Dec 2008 - 7:01 am | कोलबेर
हाही भाग नेहमी सारखाच आवडला. कथा मस्त रंगली आहे.
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत..
12 Dec 2008 - 2:22 pm | सुनील
सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
12 Dec 2008 - 8:07 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
गोष्ट मस्त, चांगली रंगली आहे, पुढे सरकली आहेच. पण पुढचा भाग लवकर टाका ब्वॉ!
30 Dec 2008 - 3:02 pm | विनायक प्रभू
असेच म्हणतो
13 Dec 2008 - 5:07 am | स्वप्निल..
चांगला आहे...
सुनील भाउ जरा लवकर लवकर टाका पुढचे भाग...अंमळ आठवावे लागते संदर्भ लागण्यासाठी..
स्वप्निल
30 Dec 2008 - 10:37 am | daredevils99
सगले भाग वाच्ले. कथा मस्त आहे.