प्रिटी वूमन - भाग १
प्रिटी वूमन - भाग २
प्रिटी वूमन - भाग ३
मध्यरात्र उलटून गेली होती. आईचे औषधपाणी करून मर्जिना आताच पडली होती. इतक्यात तिला कण्ह्ण्याचा आवाज आला. चटकन उठून ती आईजवळ गेली आणि तिच्या कडे बघितले. आईचे डोळे खोल गेले होते आणि श्वास घेताना तिला त्रासदेखील होत होता. तिने आईचा हात हातात घेतला. थंडगार हात बघून ती चरकली. तिने आईकडे पाहिले. आईने काहीतरी पुटपुटल्यासारखे ओठांची हालचाल केली. गरकन डोळे फिरवले आणि मान टाकली.
मर्जिनाला दरदरून घाम फुटला. आईला काय झाले? जेमतेम बारा वर्षाच्या तिला नक्की काय करावे ते सुचेना. पाच्-सहा वर्षांची शरीफा आणि तिच्याहूनही धाकटा बबलू गाढ झोपेत होते. गावाच्या दुसर्या टोकाला तिची मोठी बहिण फातिमा राहत होती. मधे तीन्-चार मैलाचे अंतर होते.
दरवाजा धाडकन उघडून ती सुसाट पळत सुटली. धापा टाकत बहिणीच्या घराचा दरवाजा ठोठावीत ओरडू लागली, "ए बू ए बू. अम्मी अम्मी..".
बहिणीच्या दमेकरी नवर्याने दार उघडले. मर्जिना सरळ आत घुसली आणि बहिणीला बिलगून हमसाहमसी रडू लागली. "बू. अम्मी.."
*******
कुलसूमच्या डोळ्यातून पाणी खळत नव्ह्ते. कच्च्या-बच्च्यांना टाकून लेक निघून गेली. तिच्या डोळ्यापुढून गेल्या काही वर्षांचा सगळा घटनाक्रम सरकू लागला.
घरची परिस्थिती गरिबीची. गावात एक चहाची टपरी. थोरला मुलगा मतिमंद. त्यानंतरची अनुरा. दिसायला बरीच सुस्वरूप. तिला सुलेमानचं स्थळ सांगून आलं. त्यांचे घराणे बर्यापैकी सुस्थितीत. लेकीने नशीब काढले म्हणायचे!
थाटात लग्न झालं. पण लग्न होऊन वर्ष उलटून गेले तरी अनुराची कूस उजेना. सासरची मंडळी टोचून बोलू लागली. पुढच्याच वर्षी सुलेमनने दुसरे लग्न केले!
सवतीला दिवस गेले तसे थोड्याच दिवसात अनुरालादेखील! दोघींचीही बाळंतपणे जवळपास एकाच वेळेस झाली. सवतीला मुलगा आणि अनुराला मुलगी!
लेकीच्या नशिबीचे भोग काही सरत नव्ह्ते. थोरला मुलगा अर्धवट आणि थोरलीचे हे असे!
धाकटी नजमा एकेदिवशी कुणालाही न सांगता घरातून निघून गेली. बरेच महिने तिचा पत्ता नव्हता. अचानक एके दिवशी ती उगवली. कुलसूमच्या हातात बरेचशे पैसे ठेऊन म्हणाली, "हे ठेव. मी उद्या परत मुंबईला जाते आहे. दर महिन्याला मनी ऑर्डर करत जाईन."
ती मुंबईला काय करत होती, कुठे राहत होती. कुणाला काही पत्ता नव्हता.
*******
सगळं कुटुंब जमलं होतं. पण कोणीच कुणाशी बोलत नव्हतं. काय बोलायचे हेच कुणाला कळत नव्हतं. अनुरा जाउन आता आठवडा झाला होता. तीची थोरली मुलगी फातिमा आणि तिचा दमेकरी नवरा चुपचाप बसले होते. मुंबईहून नजमाही आली होती.
शेवटी नजमा कुलसूमला म्हणाली, "अम्मी, मर्जिनाला मी घेऊन जाते मुंबईला. शरीफा आणि बबलूला तु बघ. मी पैसे पाठवत राहीन. उद्याच निघते".
सगळेच चमकले. पण कुणीच काही बोलले नाही.
*******
मुंबईला जायचे म्हणून मर्जिना खूश होती. तशी ती एकदा गेले होती पण ते चार्-पाच वर्षांपूर्वी. त्यानंतर आता!
रिक्षाने ते बस स्टॅन्डपाशी आले. आता दोन तासांचा बसचा प्रवास की हावडा स्टेशन. नंतर आगगाडीने मुंबई!
*******
चहावाला आलेला दिसला म्हणून नजमाने त्याला बोलावले. बॅगेला उशाशी घेऊन मर्जिना झोपली होती. मावशीच्या "चा खाबे?" या प्रश्नाला तिने केवळ कूस बदलून उत्तर दिले.
सांधे बदलताना गाडीच्या चाकांचा खड-खड आवाज होत होता. मर्जिनाच्या आयुष्याचेदेखील असेच सांधे बदलत होते. पण तिला त्याची जाणिवदेखील नव्ह्ती. ती आपल्याच विश्वात शांत झोपली होती.
गाडीने आता चांगलाच वेग घेतला होता आणि ती मुंबईच्या दिशेने धावत होती.
******* ******* *******
(क्रमशः)
प्रतिक्रिया
10 Jan 2008 - 12:26 am | प्राजु
सुरूवात चांगली आहे..
पुढील भागाच्या प्रतिक्षेत..
- प्राजु.
10 Jan 2008 - 1:59 am | स्वाती राजेश
पुढच्या भागाची वाट पहात आहोत.
पहीला भाग खुपच मस्त..
10 Jan 2008 - 10:48 am | विसोबा खेचर
म्हणतो!
तात्या.
10 Jan 2008 - 3:11 pm | मनिष
दोघी - लागा चुनरी मे दाग ह्यावर आधारलेली आहे का?
10 Jan 2008 - 7:09 pm | सुनील
दोघी - लागा चुनरी मे दाग ह्यावर आधारलेली आहे का?
नाही.
मूळच्या (सत्य) चटकदार मटकीच्या उसळीत स्वतःचे (चवीपुरते) फरसाण घालून बनविलेली मिसळ समजा!!
तूर्तास इतकेच पुरे.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
10 Jan 2008 - 7:12 pm | सुनील
कथालेखनाच्या पहिल्याच प्रयत्नास प्रोत्साहनपर प्रतिसाद आल्याचे पाहून हुरूप वाढला. उर्वरीत भाग लवकरच हातावेगळे करीन म्हणतो.
(आभारी) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
10 Jan 2008 - 7:33 pm | इनोबा म्हणे
च्यामारी सुन्या,
तु एवढं छान लिहितोस हे आधी माहित नव्हतं...पुढचा भाग वाचायची उत्सुकता लागून राह्यली...कधी देतो?
(तुझा भावी 'पंखा'...) -इनोबा
10 Jan 2008 - 7:40 pm | सुधीर कांदळकर
सुरूवात छान आहे.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.