शरदातला स्वित्झर्लंड : १२ : जिनिव (जिनिवा)

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
6 Aug 2015 - 1:34 am

===================================================================

शरदातला स्वित्झर्लंड : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२...(समाप्त)

माझे मिपावरचे इतर लेखन...

===================================================================

मी स्वित्झर्लंडच्या प्रेमात पडण्यामागे या तीन दिवसांचा खूप मोठा हात आहे... आणि पुढच्या दर भेटीत हे प्रेम वाढत जावे असेच अनुभव आले. अर्थातच, जेवढ्या ओढीने मी दुसर्‍या दिवशी सुरू होणार्‍या अभ्यासक्रमाची वाढ पाहत होतो, तितक्याच ओढीने अभ्यास संपल्यावर प्रवासाच्या उरलेल्या दोन दिवसांत मी करणार असलेल्या जिनिवाच्या भेटीची वाट पाहत होतो.

.

अभ्यासक्रमाचा कालखंड संपला. आता वेळ होती शरदातल्या स्विस सफरीच्या दुसऱ्या भागाची. झुरिक ते जिनिवा या साधारण तीनशे किलोमीटर अंतराला रेल्वेने तीन तास लागतात हे आधीच मिळालेल्या वेळापत्रकावरून माहीत झाले होतेच. शेवटच्या दिवशी किती वाजता सुटका होईल हे माहीत नव्हते. पण स्विस पर्यटनाच्या कृपेने १६:०४, १६:३२ आणि १७:३२ अश्या तीन गाड्यांचे वेळापत्रक मिळाले होते. त्यामुळे निर्धास्त होतो. शेवटचा दिवस असल्याने प्रोफेसरांच्या कृपेने दुपारी दोनलाच कोर्स संपल्याचे जाहीर झाले. त्यामुळे घाई-गडबड न करता १६:०४ ची पहिली गाडी गाठता आली आणि मोक्याची खिडकी गाठून आरामात बसलो. गाडी सुरू झाली तसा मागे धावणारा स्विस निसर्ग पाहता पाहता वेळ भराभर जाऊ लागला.

स्वित्झर्लंडमध्ये असंख्य सरोवरे आहेत. बहुतेक सर्व मोठ्या नद्या त्यांच्या मार्गांत अनेक सरोवरांच्या एका टोकातून आत शिरतात आणि दुसरीकडून बाहेर पडून पुन्हा पुढचा प्रवास सुरू करतात. या नद्या व सरोवरे त्यांच्या मार्गांच्या आजूबाजूच्या प्रदेशाला सुपीक हिरव्या पैठणीने नटवत पुढे जातात. निसर्गाच्या या दानाची स्विस लोक मोठ्या जबाबदारीने जपणूक करून त्याला स्वच्छ आणि नीटनेटके तर ठेवतातच, पण त्यात मानवी कल्पकतेची भर टाकून ते सौंदर्य अधिकाधिक कसे खुलून दिसेल यासाठीही कष्ट घेतात हे सतत जाणवत राहते.

या प्रवासाचा एक तृतियांशापेक्षा जास्त मार्ग झ्युरिक् (७३ X १४ किमी), लाक द नॉयशातेल (३८ X ८ किमी) आणि बिलेरसे (१५ X ४ किमी) या तीन मोठ्या सरोवरांच्या काठाने जातो. स्वच्छ सुंदर सरोवरे; त्यांच्या काठांवरचे सुंदर बगीचे, हिरवळी व जलक्रीडेच्या व्यवस्था; सरोवरांत दिमाखाने जलक्रिडा करणार्‍या पांढर्‍या शिडांच्या बोटी; सरोवरांच्या काठावर वसलेली टूमदार गावे व शहरे; असे नजारे सतत दिसत राहतात. हे सगळे पाहताना वेळ मजेत जातो आणि तिथे राहत असलेल्या लोकांबद्दल थोडीशी असूयाही मनात डोकावून जाते…


झ्युरिक् ते जिनिवा : ०१

.


झ्युरिक् ते जिनिवा : ०२

.


झ्युरिक् ते जिनिवा : ०३

.


झ्युरिक् ते जिनिवा : ०४

.

जलद गाडी असल्याने ती एक दोन मोठ्या शहरांतच थांबली. पण, मधूनच येणारी आणि झपकन् निघून जाणारी छोटी स्थानकेही आम्हीही काही कमी नाही हे दाखवून देत होती…


झ्युरिक् ते जिनिवा : ०५

.

मधूनच एखादे छोटे पण टूमदार गाव त्याच्या आजूबाजूच्या शेतीवाडीसकट समोर येऊन पटकन डोळ्याआड होत होते…


झ्युरिक् ते जिनिवा : ०६

.


झ्युरिक् ते जिनिवा : ०७

.


झ्युरिक् ते जिनिवा : ०८

.

रेल्वेमार्गाच्या जवळ असलेली गावे पाहून, गाव मोठे असो की लहान, त्यातली घरे लहान असो की मोठी, स्विस समृद्धीबरोबरच काटेकोर नीटनेटकेपणा देशभर सगळीकडे झिरपलेला आहे हे दिसून येत होते…


झ्युरिक् ते जिनिवा : ०९

.

शरदाने दिलेल्या नवीन पोशाख घालून मिरवणारा स्विस निसर्ग तर प्रवासात संपूर्ण वेळ साथ करत होताच…


झ्युरिक् ते जिनिवा : १०

.

जिनिवा

जिनिवा हे शहर स्वित्झर्लंडच्या दक्षिण-पश्चिम टोकाला फ्रँको-स्विस सीमेवर आहे.

स्वित्झर्लंडमध्ये चार अधिकृत भाषा आहेत. सर्वात मोठ्या प्रमाणात जर्मन भाषा बोलली जाते (६३.५%); त्याखालोखाल फ्रेंच (२२.५%), इटॅलियन (८.१%) आणि रोमांश (०.५%) भाषा बोलल्या जातात. रोमांश ही काही विभागांत बोलली जाणारी मूल स्विस भाषा आहे. या देशात अनेक जागतिक संस्थांची मुख्यालये असल्याने, हा देश एक महत्वाचे जागतिक आर्थिक केंद्र आहे आणि पर्यटन हा या देशाचा महत्त्वाचा व्यवसाय आहे; त्यामुळे इंग्लिश भाषा या सर्व देशभर सामान्यपणे वापरली जाते. त्यामुळे एका भाषिक प्रदेशातून दुसर्‍यात जाताना इंग्लिश बोलू शकणार्‍या पर्यटकांना भाषेची अडचण येत नाही.

झ्युरिक् हे शहर जर्मन भाषिक विभागात येते तर जिनिवा फ्रेंच भाषिक विभागात आहे. ज्याला आपण मराठीत जिनिवा अथवा जिनिव्हा असे म्हणतो त्या नावाचे अनेक उच्चार स्वित्झर्लंडमध्ये मान्यताप्राप्त आहेत... सर्वसामान्यपणे इंग्लिशमध्ये जिनिव (Geneva [dʒɨˈniːvə]; यातला ज 'जिर्‍यातला' आहे 'जरतारी' मधला नाही); जर्मनमध्ये गेन्फ् (Genf [ɡɛnf]); फ्रेंचमध्ये जनेव (Genève [ʒə.nɛv]); इटॅलियनमध्ये जिनेव्ह्रा (Ginevra [dʒiˈneːvra]) आणि रोमांशमध्ये जिनेव्ह्रा (Ginevra [dʒiˈneːvra])... हुश्श ! पण या लेखामध्ये नावाचा गोंधळ टाळण्यासाठी आपण या शहराला जिनिवा असेच संबोधूया. ;)

र्‍होन (Rhône, र्‍हाईन नाही) नदी जिनिवा सरोवराच्या एका टोकातून आत शिरून दुसर्‍या टोकातून बाहेर पडते आणि पुढे जात फ्रान्समध्ये शिरते. सरोवराच्या त्या दुसर्‍या निमुळत्या टोकदार भागाच्या किनार्‍यांवर जणू एखाद्या काठीवर भाल्याचे टोक असावे तसे जिनिवा शहर वसले आहे. जिनिवा शहरात र्‍होनला तिची आर्वं (Arve) नावाची उपनदी येऊन मिळते. म्हणजे या शहरात सरोवरकाठ, नदीकाठ आणि नदीसंगम असा त्रिवेणी जलयोग आहे आणि त्याचा तेथील लोकांनी शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी पुरेपूर उपयोग करून घेतला आहे.


जिनिवा : ०१ (जालावरून साभार)

.


जिनिवा : ०२ (जालावरून साभार)

.


जिनिवा : ०३ (जालावरून साभार)

.

लोकसंखेच्या दृष्टीने झ्युरिक्-खालोखाल दोन क्रमांकावर असलेल्या या शहराची लोकसंख्या दोन लाखाच्या आसपास आहे पण कामानिमित्त येथे स्वित्झर्लंड आणि फ्रान्समधून रोज ये जा करणार्‍यांची संख्या त्याच्या पाच ते सहा पट असते. याचे मुख्य कारण या शहरात जगात सर्वात जास्त संखेने असलेली आंतरराष्ट्रीय संघटनांची आणि व्यापारी कंपन्यांची मुख्यालये हे आहे. त्यातील काही महत्त्वाच्या संघटना खालीलप्रमाणे आहेत...

European headquarters of the United Nations (UN),
World Health Organization (WHO),
United Nations High Commissioner for Refugees (UNHCR),
UN Office of the High Commissioner for Human Rights (OHCHR),
International Labour Organization (ILO),
International Telecommunication Union (ITU),
International Baccalaureate Organization (IBO),
World Intellectual Property Organization (WIPO),
World Trade Organization (WTO),
World Meteorological Organization (WMO),
World Economic Forum (WEF),
International Organization for Migration (IOM),
International Committee of the Red Cross (ICRC),
International Federation of Red Cross and Red Crescent Societies (IFRC),
European Broadcasting Union (EBU),
World Organization of the Scout Movement (WOSM) and World Scout Bureau Central Office,
CERN (European Organization for Nuclear Research) (हो, तीच संशोधन संस्था, जिने गेल्याच वर्षी 'हिग्ज बोसान' किंवा देवकणाच्या अस्तित्वाचा पुरावा मिळवला),
इत्यादी, इत्यादी, इत्यादी.

याशिवाय जिनिवा हे कला, संस्कृती आणि व्यापाराचे एक जागतिक स्तरावरचे मुख्य केंद्र आहे. अश्या प्रसिद्ध शहराची माझी भेट वेळेअभावी जराशी धावतीच झाली. जिनिवास्थित एका भारतीय सहाध्यायाशी महाविद्यालयाच्या संस्थळावरील अभ्यासगटात माझी ओळख झाली. हे भारतीय गृहस्थ त्या वेळेस जागतिक आरोग्य संघटनेत (World Health Organization) महत्त्वाच्या पदावर कार्यरत होते. मी जिनिवाला भेट देणार असे कळल्यावर त्यांनी मोठ्या आग्रहाने माझा हॉटेलमध्ये राहण्याचा विचार खोडून स्वतःच्या घरी येण्याचे आमंत्रण दिले. शिवाय त्यांच्या खाजगी गाडीतून जिनिवादर्शन करवायची लालूच दाखवली. आता इतके झाल्यावर त्यांना नाही म्हणणे म्हणजे वेडेपणाच झाला असता नाही का ?

मित्रवर्य मला घ्यायला रेल्वे स्थानकावर आले होते. दिवसाच्या उरलेल्या सूर्यप्रकाशाचा सदुपयोग करण्यासाठी गाडीत सामान टाकून रेल्वेस्थानकापासूनच जिनिवादर्शन सुरू केले ! काही महत्त्वाच्या इमारतींचे फोटो जालावरून साभार...


जागतिक बौद्धिक संपदा संस्था (World Intellectual Property Organization)

.

 ...
जागतिक आरोग्य संघटना(WHO).......जागतिक रेड क्रॉस संघटना (International Committee of the Red Cross)

.

अजून एका देखण्या स्विस शहराची धावती सफर करून मित्राच्या घरी पाहुणचार घ्यायला पोहोचलो. रात्रीचे जेवण झाल्यावर मित्र म्हणाला की तो आठवड्यातून दोनदा "योग आणि ध्यान" करायला एका केंद्रात जातो. जिनिवात असे केंद्र आहे याचे जरा नवलच वाटले. उत्सुकतेने मीही त्याच्याबरोबर निघालो. जिनिवाच्या एका उच्चभ्रू वसाहतीत असलेल्या बहुमजली इमारतीतल्या एका प्रशस्त सदनिकेत हे केंद्र होते. तेथील सजावट, व्यवस्था आणि वातावरण अर्थातच स्विस परंपरेला साजेसे चकचकीत होते. जिनिवा सारख्या युरोपियन शहरात युरोपियन लोकांनी योग आणि ध्यान केंद्र काढावे आणि त्यात (युरोपियनांबरोबर) भारतीय साधकांनी जावे ही कल्पना जरा गमतीची आणि निश्चितच अभिमानाचीही वाटली. मित्र योगसाधना करायला तेथील खास दालनात निघून गेला. तिथल्या स्वागतिकेने त्यांना बाहेर येईपर्यंत दीड एक तास सहज लागेल असे सांगून मला वाचनालयाच्या दालनात बसवले. त्या सदनिकेत फक्त स्वागतकक्ष सोडून इतर सर्व खोल्यांत भारतीय बैठका होत्या. जरा विनोदी वाटेल पण अनेक वर्षे जमिनीवर बसण्याची सवय मोडल्याने दहा-पंधरा मिनिटांनी मला अवघडल्यासारखे झाले. कंबर आणि पाय दुखायला लागले. मग जवळच्या रस्त्यांवरून फेरी मारून तासाभरात परत येतो असा स्वागतिकेजवळ निरोप ठेवून बाहेर पडलो.

बाहेर बर्‍यापैकी वादळी वातावरण झाले होते. आकाश ढगाळ होते आणि जोरदार वारा सुरू झाला होता. एक दोन इमारती सोडून पलीकडे एक मोठा रस्ता दिसला, तिकडे मोहरा वळवला. तो रस्ता जिनिवा सरोवराच्या काठाकाठाने जात होता. वादळी वार्‍यामुळे सरोवरात समुद्रासारख्या लाटा उसळताना पाहून आश्चर्य वाटले. सरोवराकाठचा रुंद पादचारी मार्ग, रस्त्याच्या पलीकडच्या व आलिकडच्या अश्या एकूण चार लेन्स आणि त्यांच्यामधे असलेला एका लेनइतका रुंद दुभाजक इतके सगळे वीस-पंचवीस मीटरचे अंतर ओलांडून लाटांचे पाणी आलिकडच्या पादचारी मार्गावर येऊन पडत होते. इतक्या मोठ्या लाटा पाहून स्विस लोकांनी सरोवरांना से (see) असे इंग्लिश सी (sea) च्या जवळपास असणारे नाव का दिले असावे याची कल्पना आली ! एखादी चुकार चारचाकीची सोडून त्या रस्त्यावर इतर वाहतूक नव्हती. त्या रस्त्यावर फेरफटका मारणे शक्यच नव्हते. तेव्हा मागे फिरून इतर रस्ते-गल्ल्यांत तासभर भटकण्यात घालवला आणि केंद्रावर परतलो.

===================================================================

दुसर्‍या दिवशी सकाळी न्याहरी करून एकटाच जिनिवाची सफर करायला बाहेर पडलो. आकाश निरभ्र असले आणि दिवसाचा लख्ख उजेड पडला असला तरीही थंड बोचर्‍या वार्‍याचा वेग कायमच होता, किंबहुना रात्रीपेक्षा जरासा वाढल्यासारखाच वाटत होता. स्विस पास जवळ असल्याने सरळ ट्रॅम पकडून जिनिवा सरोवराच्या दिशेने निघालो. वाटेत जिनिवाकरांच्या सौंदर्योपासक स्वभावाचे नमुने दिसत होतेच...


जिनिवा : बस आणि बस थांबा (जालावरून साभार)

.


जिनिवा : ट्रॅम (जालावरून साभार)

.

आज जिनिवा सरोवरात पर्यटक बोटीने सफर करायचे ठरवले होते. ही बोट सरोवराच्या काठावरच्या जिनिवाच्या सुंदर वस्त्यांचे आणि डोंगरउतारांचे मनोहारी दर्शन करवते असे ऐकून होतो. पण बोटींच्या थांब्यावर पोहोचलो तेव्हा सगळ्या बोटी लाटांवर हिंदकळत नांगरून ठेवलेल्या दिसत होत्या...


जिनिवा सरोवराचा किनारा : ०१ : पर्यटकांची अनुपस्थिती, नांगरलेल्या पर्यटक बोटी आणि बंद तिकीट खिडक्या

.


जिनिवा सरोवराचा किनारा : ०२ : वादळी वारा आणि उसळत्या लाटांच्या पार्श्वभूमीवर अस्मादिक

वादळी वार्‍यामुळे सरोवरातील सर्व वाहतूक बंद झाल्याच्या पाट्या सर्व बंदरभर लागलेल्या होत्या. चौकशी केल्यावर, हवामान सुधारल्यास तासाभराने बोटी सुरू होतील असे कळले. सरोवराचा काठ इतक्या सुंदर प्रकारे विकसित केलेला आहे की तो एक लांबच लांब सुंदर उद्यान आहे. तेथे तासभरच काय तीन-चार तास भटकत सहज घालवता येतील. तेथे फिरताना काढलेले हे काही फोटो...


जिनिवा सरोवराचा किनारा : ०३

.


जिनिवा सरोवराचा किनारा : ०४

.


जिनिवा सरोवराचा किनारा : ०५ : काष्ठशिल्प

.


जिनिवा सरोवराचा किनारा : ०६

.


जिनिवा सरोवराचा किनारा : ०७ : पुष्पवाटीकेतले घड्याळ

.

दीड तास झाला तरी हवामान ठीक होण्याची लक्षणे दिसली नाही. बोट कंपनीने आजचा दिवस जलसफारी बंद असल्याचे जाहीर केले. आता तेथे वादळी वार्‍यात कुडकुडत फिरण्यात अर्थ नव्हता. सरोवराचा वादळी किनारा सोडून मी वार्‍याचा जोर कमी असलेल्या जिनिवाच्या अंतर्भागातल्या रस्ते आणि गल्ल्यांकडे मोर्चा वळवला.

वार्‍यांवर उडणार्‍या झाडाच्या पानांनी भरलेल्या रस्त्यांवर नगण्य रहदारी होती. पुष्पवाटीकेतल्या घड्याळाजवळ असलेल्या एका गल्लीतल्या मेरी-गो-राउंड कडे माझे लक्ष गेले. ते चक्र चालू असले तरी खराब हवामानामुळे पर्यटकांची वानवा होती...


जिनिवाचा अंतर्भाग : ०१ : मेरी-गो-राउंड

जवळच्या एका छोट्या टपरीसारख्या दुकानातून गरम कॉफीचा कप घेतला. पंजाबी छटेचे इंग्लिश बोलणारी पन्नाशीची एक स्त्री ते दुकान चालवत होती. वादळी हवामानात, मोकळ्या रस्त्यांवरून, कुडकुडत फिरणारा भारतीय माणूस पाहून तिला आश्चर्य वाटले असावे. बहुतेक "भारतीय दिसणारा कोण हा विचित्र प्राणी ?" याच कुतुहलाने तिने संभाषण छेडले असावे. जुजुबी शिक्षण झालेली ती स्त्री स्वित्झर्लंडमध्ये वीसबावीस वर्षांपासून आहे असे कळले. छोटी मोठी कामे करत करत आता मोक्याच्या ठिकाणी असलेले ते उत्तम चालणारे दुकान ती चालवत आहे, असे सांगताना तिच्या चेहर्‍यावर आणि आवाजात सार्थ अभिमान झळकत होता.

एका ठिकाणी ही बी एम डब्ल्यू ची अनवट दुचाकी दिसली...


जिनिवाचा अंतर्भाग : ०२ : बी एम डब्ल्यू ची अनवट दुचाकी

खिशात स्विस पास होता. एका मुख्य मार्गावरची ट्रॅम पकडली, कारण, उबदार वातानुकूलित वातावरणात बसून शहर बघत फिरणे जास्त सोईस्कर होते...


जिनिवाचा अंतर्भाग : ०३

.


जिनिवाचा अंतर्भाग : ०४

एका मोठ्या मैदानात माणसांची गर्दी दिसली म्हणून त्याच्या जवळच्या थांब्यावर उतरलो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो चक्क जिनिवाचा आठवडी बाजार निघाला ! जिनिवात असे काही बघायला मिळेल असे स्वप्नातही वाटले नव्हते...


जिनिवाचा अंतर्भाग : ०५ : आठवड्याचा बाजार ०१

.


जिनिवाचा अंतर्भाग : ०६ : आठवड्याचा बाजार ०२

.

एक वाजता मित्राबरोबर सरोवराकाठच्या पुष्पवाटीकेतल्या घड्याळाजवळ भेटायचे ठरवले होते. परतताना पकडलेली ट्रॅम चुकीची निघाली. काही वेळाने ध्यानात आले की हा रस्ता भलतीकडेच चालला आहे. खाली उतरून चौकशी करून योग्य मार्गावरची ट्रॅम पकडली. जर स्विस पास नसता तर अश्या प्रत्येक तुटक प्रवासासाठी साधारण १ ते २ स्विस फ्रँक पडले असते, किंबहुना त्या पासाविना जिनिवाच्या अंतर्भागाचा निश्चिंतपणे हवा तसा उलट सुलट प्रवासही करता आला नसता.

घड्याळाजवळ पोचायला थोडासा उशीरच झाला. मित्राची माफी मागून त्याच्या खास पसंतीच्या भारतीय रेस्तराँमध्ये पोटोबा करायला गेलो. हे रेस्तराँ राष्ट्रसंघात (UN) अनेक दशके काम करून निवृत्त झालेल्या भारतीय वंशाच्या अधिकार्‍याचे आहे. खुद्द मालकाच्या आग्रहात जिनिवातील उच्चभ्रू वस्तीतल्या या शोभिवंत रेस्तराँमध्ये गप्पा मारत चवदार पदार्थांचा आस्वाद घेण्यात एक वेगळीच मजा आली. मित्राच्या घरून बॅगा घेऊन १५:४५ ची मला तडक झ्युरिक् आंतरराष्ट्रीय विमानतळावर नेणारी रेल्वे पकडायची होती. नाईलाजाने आमच्या गप्पा आवरत्या घेऊन बाहेर पडावे लागले.

जिनिवाच्या या धावत्या भेटीतही बरेच काही पहायला, ऐकायला आणि अनुभवायला मिळाले ही सुखद जाणीव बरोबर घेऊन जिनिवाचा निरोप घेतला. स्थानकावरून रेल्वे सुटली आणि स्वित्झर्लंडमधल्या वास्तव्याचे शेवटचे केवळ काही तास उरले आहेत हे ध्यानात येऊन मन खट्टू झाले. इतके दिवस नजरेसमोर असलेले हे अनवट निसर्गसौंदर्य आता परत केव्हा बघायला मिळेल हाच विचार सतत मनात येत होता. स्विसमधल्या या शेवटच्या तीन-साडेतीन तासांत ते शक्य तेवढे डोळ्यांत आणि कॅमेर्‍यात साठवून घेत होतो...


झ्युरिक् कडे परतताना : ०१

.


झ्युरिक् कडे परतताना : ०२

.


झ्युरिक् कडे परतताना : ०३

.


झ्युरिक् कडे परतताना : ०४

.


झ्युरिक् कडे परतताना : ०५

.

झ्युरिक् रेल्वे स्थानक आणि विमानतळ कल्पकता वापरून अंतर्गत बोगदे, सरकते जिने आणि शटल ट्रेनने जोडलेले आहेत. त्यामुळे, कोणत्याही समस्येशिवाय विमानातली जागा पकडून सुखद स्विस आठवणी मनात घोळवत असताना विमानाने आकाशात भरारी घेतली.

.

(समाप्त)

===================================================================

शरदातला स्वित्झर्लंड : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२...(समाप्त)

माझे मिपावरचे इतर लेखन...

===================================================================

प्रतिक्रिया

प्रफुल्ल पा's picture

6 Aug 2015 - 1:47 am | प्रफुल्ल पा

जबरदस्त

अजया's picture

6 Aug 2015 - 7:15 am | अजया

नयनरम्य सफर संपल्यामुळे वाईट वाटल्या गेले आहे!

अमृत's picture

6 Aug 2015 - 8:51 am | अमृत

एक सुचवू इछितो, तुम्ही प्रवासवर्णनांच एक पुस्तक लिहाच. तुमची भाषाशैली, माहीत्ती देण्याची पद्धत जोडीला योग्य छायाचित्रे सगळच कसं मस्तं. तुमच्या ले़खणीतून मिडल ईस्ट, साउथ ईस्ट आशिया आता युरोप अनुभवायला मिळाला. अजुनही प्रवासवर्णनं असतील तर येऊ द्या.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Aug 2015 - 2:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

थोड्या विश्रांतीनंतर अजून एका ऐतिहासिक स्थळांनी समृद्ध व सृष्टीसौंदर्याने नटलेल्या देशाची सफर करायची आहे, तयारीत रहा ! :)

अत्रुप्त आत्मा's picture

14 Aug 2015 - 12:40 am | अत्रुप्त आत्मा

@एक सुचवू इछितो, तुम्ही प्रवासवर्णनांच एक पुस्तक लिहाच. तुमची भाषाशैली, माहीत्ती देण्याची पद्धत जोडीला योग्य छायाचित्रे सगळच कसं मस्तं. तुमच्या ले़खणीतून मिडल ईस्ट, साउथ ईस्ट आशिया आता युरोप अनुभवायला मिळाला. >>> +++१११

प्रचंड सुंदर झालीय स्विस सफर.
एका अप्रतिम लेखमालिकेबद्दल तुमचे धन्यवाद.

राजकुमार१२३४५६'s picture

6 Aug 2015 - 11:49 am | राजकुमार१२३४५६

हि लेख मालिका संपूच नये असे वाटत होते. संपूर्ण प्रवास वर्णन वाचताना म्हात्रे सरां बरोबर आम्ही हि प्रवास करत होतो असेच वाटत होते. थोडे मन खट्टू होईल पण नवीन भागा ची प्रतीक्षा असेलच !!

वेल्लाभट's picture

6 Aug 2015 - 12:29 pm | वेल्लाभट

अप्रतिम सफर !

अनेक धन्यवाद तुमचे !
वाह. मजा आली वाचून !

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Aug 2015 - 1:51 pm | डॉ सुहास म्हात्रे

प्रफुल्ल पा, अजया, अमृत, प्रचेतस, राजकुमार१२३४५६ आणि वेल्लाभट : सर्वांना अनेक धन्यवाद ! तुमच्या सहभागाने या सहलिचा आनं व्दिगुणीत झाला !

मधुरा देशपांडे's picture

6 Aug 2015 - 1:57 pm | मधुरा देशपांडे

यापुर्वीच्या तुमच्या सफरींप्रमाणेच ही लेखमालाही खूप आवडली. स्विसबद्दल असल्याने जास्तच आवडली. फोटो, लेखन, माहिती सगळेच छान.

जिनिवाची केलेली हि निवांत भटकंती आवडली.

अर्धवटराव's picture

7 Aug 2015 - 10:15 am | अर्धवटराव

ही लेखमालासुद्धा फार सुंदर झाली आहे... त्या देशाल साजेशी :)

झ्युरिक् ते जिनिवा : ०४
कहर आहे हे प्रचि.

पद्मावति's picture

7 Aug 2015 - 12:32 pm | पद्मावति

अप्रतिम सफर. खुपच सुन्दर.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Aug 2015 - 5:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

मधुरा देशपांडे, जुइ, अर्धवटराव आणि पद्मावति : धन्यवाद !

जगप्रवासी's picture

7 Aug 2015 - 6:22 pm | जगप्रवासी

नेहमीप्रमाणे लेखमालिका अप्रतिम झाली आहे, ती संपल्याच दुः ख आहे पण आता दुसरा नवीन देश बघायला भेटेल याची उत्सुकता आतापासूनच लागली आहे. पुढील देशाच्या प्रवास वर्णनाच्या प्रतीक्षेत :)

आणि हो तुम्ही तुमच प्रवास वर्णनाच पुस्तक काढाच, हातोहात खपेल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Aug 2015 - 4:07 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

थोड्या विश्रांतीनंतर निघूच आपण नवीन सफरीला !

सुधीर कांदळकर's picture

9 Aug 2015 - 4:09 pm | सुधीर कांदळकर

कोणता याची आता उत्सुकता लागलेली आहे. आपल्या सौंदर्यासक्त दृष्टीचे आणि रसिकतेचे कौतुक वाटते.

पुढील लेखमालेच्या प्रतीक्षेत.

धन्यवाद.

श्रीरंग_जोशी's picture

10 Aug 2015 - 9:37 am | श्रीरंग_जोशी

जिनिवा एकदम देखणे व नेटके शहर वरील वर्णन वाचून वाटत आहे. हा ही भाग खूप आवडला.

पर्वणी वाटणारी आणखी एक सफर संपल्याने वाईट वाटत आहे.

पुढील सफरीसाठी शुभेच्छा!!

सुबोध खरे's picture

10 Aug 2015 - 10:27 am | सुबोध खरे

लेखमालिका आणि फोटो अप्रतिम.
आपले लेखन अतिशय समतोल आणि कोणताही वैयक्तिक आकस किंवा आकर्षण न येता लिहिलेले असते त्यामुळे ते जास्त भावते.
शशक च्या जिल्ब्यात असा सुंदर लेख मागे पडतो हे पाहून वाईट वाटते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Aug 2015 - 12:55 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुधीर कांदळकर, श्रीरंग_जोशी आणि सुबोध खरे : अनेक धन्यवाद ! तुमच्यासारख्या रसिक वाचकांमुळेच लिहायला मजा येत आहे.

वाह्यात कार्ट's picture

10 Aug 2015 - 3:54 pm | वाह्यात कार्ट

अप्रतिम देश आणि तितकंच अप्रतिम वर्णन. तुमच्या उत्साहाला सलाम !!

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Aug 2015 - 2:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

सस्नेह's picture

13 Aug 2015 - 11:51 am | सस्नेह

डोळे निववणारे सुंदर फोटो आणि रंजक लेखन यामुळे मालिका अतिशय विहंगम झाली आहे.
धन्यवाद डॉक !

अभ्या..'s picture

13 Aug 2015 - 11:59 am | अभ्या..

एक्काकाका, मस्त एकदम.
फोटू छान छान.
चाकाला मडगार्ड असलेली बस आवडली.

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Aug 2015 - 12:23 am | डॉ सुहास म्हात्रे

स्नेहांकिता आणि अभ्या.. : धन्यवाद !

@ अभ्या... : गाडीच्या चाकावरचे पाणी (रस्त्यांवर चिखल तर नसतोच) पादचार्‍याच्या अंगावर उडणेही स्विस सभ्यतेला मान्य नाही !

अत्रुप्त आत्मा's picture

14 Aug 2015 - 6:36 am | अत्रुप्त आत्मा

@एक सुचवू इछितो, तुम्ही प्रवासवर्णनांच एक पुस्तक लिहाच. तुमची भाषाशैली, माहीत्ती देण्याची पद्धत जोडीला योग्य छायाचित्रे सगळच कसं मस्तं. तुमच्या ले़खणीतून मिडल ईस्ट, साउथ ईस्ट आशिया आता युरोप अनुभवायला मिळाला. >>> +++१११

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 Aug 2015 - 6:45 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

जबरदस्तं एक्काकाका. पुढच्या देशाच्या प्रतिक्षेमधे.

फोटो खुप छान आहेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Aug 2015 - 12:56 am | डॉ सुहास म्हात्रे

अत्रुप्त आणि कॅप्टन जॅक स्पॅरो : अनेक धन्यवाद !

Ganesh Sonwane's picture

24 Aug 2015 - 9:16 pm | Ganesh Sonwane

विस्तृत आणि नेमका.
मी पुढील आठवड्यात सहपत्नी स्वीत्झेर्लंड (लुझेर्ण ) ला जातोय ४ महिन्यांसाठी (onsite assignment).
मार्गदर्शन हवंय, नेमकं विचारायचं झालंच तर सामानाची यादी बनवतोय त्यासंबंधी.
भारतातून काय घेऊन जाने अत्यावश्यक आहे ?

श्रीरंग_जोशी's picture

24 Aug 2015 - 9:52 pm | श्रीरंग_जोशी

कृपया हा धागा बघा - पहिल्यांदाच स्विझर्लंड ला जायचं आहे. त्या साठी माहित हवी आहे.?

कदाचित काही प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील.

पैसा's picture

24 Aug 2015 - 10:31 pm | पैसा

जबरदस्त वर्णन आणि फटु! एवढ्या प्रसिद्ध शहराची लोकसंख्या फक्त २ लाख?