===================================================================
शरदातला स्वित्झर्लंड : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२...(समाप्त)
===================================================================
गाडीने वेग पकडला आणि आठव्या शतकापासूनची ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले एक मोठे स्विस शहर, लुत्सर्न, कसे असेल असा विचार सुरू झाला होता.
.
लुत्सर्न हे जर्मन भाषिक मध्य स्वित्झर्लंडमधील सर्वात मोठे आणि स्विस परिमाणाने मोठे (८०,००० लोकवस्तीचे) शहर आहे. त्याच्या मोक्याच्या ठिकाणामुळे ते शहर व त्याच्या परिसरातील २५०,००० लोकवस्तीसासाठी वाहतूक, टेलेकम्युनिकेशन व शासकीय सेवांचे केंद्र आहे. याशिवाय लुत्सर्न फार पूर्वीपासून पिलाटस कुल्म आणि रिगी या दोन जागतिक स्तराच्या पर्यटक आकर्षणांकडे जाण्यासाठी पहिला थांबा म्हणून प्रसिद्ध आहे.
माझ्या मूळ प्रवासाच्या आराखड्यात लुत्सर्न एका रात्रीच्या वस्तीचे ठिकाण म्हणूनच होते. साडेचारला तेथे पोचल्यावर प्रथम स्टेशनपासून फार दूर नसलेले बर्यापैकी हॉटेल गाठून तेथे सामान टाकले आणि एक मस्त शॉवर घेऊन पुन्हा ताजा तवाना होऊन उरलेल्या दिवसाचा पुरेपूर फायदा घ्यायला बाहेर पडलो. लुत्सर्न हे एकदम टिपटॉप स्विस शहर होते हे काय सांगायला नकोच...
लुत्सर्न ०१
.
लुत्सर्न ०२
.
लुत्सर्न ०३
स्वित्झर्लंमध्ये पाटेक फिलिपच्या इमारतीवर अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनच्या ध्वजांच्या बरोबरीने भारताचा तिरंगा फडकताना पाहून मनात सुखद भावना जागी झाली.
.
लुत्सर्न म्हणजे एक स्वच्छ, नीटनेटके आणि शिस्तबद्ध स्विस शहरासारखे शहर ! थोडक्यात, काहीच नावीन्य न सापडल्याने काही वेळाने पायी फिरण्याचा कंटाळा आला. मग मी मिळेल तेथून या शहरात काय विशेष आहे हे खोदून खोदून शोधून काढायला लागलो. फिरत फिरत लुत्सर्न सरोवराच्या काठी आलो. रेल्वे स्टेशनच्या इमारतीच्या स्थापत्यामध्येही टोकाचा अभिमान वाटेल इतकी भावनिक गुंतवणूक करून तिला आकर्षक बनविणे स्विस लोकच करू जाणे...
लुत्सर्न ०४ : लुत्सर्न रेल्वे स्टेशन (बानहोफ्) चा दर्शनी भाग
.
लुत्सर्नमधली आकर्षणे त्यांना भेट देऊन बघण्याइतका मला रस नव्हता आणि ती आकर्षणे बघता येण्याइतका वेळही उरला नव्हता. फिरताना जवळच लुत्सर्न सरोवराची जलसफर करण्याचा बोटीचा धक्का आहे हे समजले आणि तिकडे मोर्चा वळवला.
जास्तीत जास्त ३० किमी लांबी आणि जास्तीत जास्त २० किमी रुंदी असलेल्या ११४ चौ किमी आकारमानाच्या लुत्सर्न सरोवराचा स्वित्झर्लंडमधे आकाराने चवथा क्रमांक आहे. या सरोवराच्या काठावर अनेक गावे व शहरे आहेत. ती रस्ता, रेल्वे व जलवाहतूकीने जोडलेली आहेत. सरळ रेषेत केल्या जाणार्या जलप्रवासाने वेळ वाचत असल्याने तलावाला फेरी घालून जाणार्या रस्ते आणि रेल्वेऐवजी हा वाहतुकीचा पर्याय बरेच लोक वापरतात.
धक्क्यावर चौकशी केली असता एक बोट सरोवराच्या काठावर असलेल्या काही गावांना भेट देत देत दीड तासांत मूळ जागी परत येते असे कळले. मी तिला पसंती देऊन जलसफर सुरू केली. ही सफर मी केवळ संध्याकाळचा मोकळा वेळ खर्च करण्यासाठी केली होती. पण, हा निर्णय कल्पनेपेक्षा जास्त यशस्वी झाला. या सफरीत, उपलब्ध असलेल्या दीड एक तासात, लुत्सर्नच्या अनेक आकर्षणांचे बाहेरून का होईना पण दर्शन झाले.
बोटीने किनारा सोडल्यावर सरोवराच्या काठावर आणि त्याच्या आजूबाजूच्या टेकड्यांच्या उतारावर वसलेल्या लुत्सर्नचे मनोहारी दर्शन झाले...
लुत्सर्न ०५ : सरोवराचा मनोहर काठ
.
थोड्या वेळाने एका अनवट इमारतीने लक्ष वेधले. १९ व्या शतकात बांधलेल्या या किल्ल्यात गेली १२० वर्षे शॅतॉ ग्युत्श नावाचे जगप्रसिद्ध हॉटेल आहे. ऐतिहासिक स्थाळ, मोक्याचे ठिकाण आणि उच्च प्रतिची सेवा यामुळे हे हॉटेल जगप्रसिद्ध आहे. डॅनियल क्रेगने काम केलेल्या एका बाँडपटाचे या हॉटेलमध्ये चित्रिकरण झाले आहे. मजेत खानपान करताना येथून दिसणारा सरोवर आणि शहराचा नजारा किती अप्रतिम असेल याची कल्पना करायला मनाला फार ताण द्यावा लागत नाही...
लुत्सर्न ०६ : हॉटेल शॅतॉ ग्युत्श
.
सरोवराच्या दुसर्या टोकाला विद्यापिठाच्या विज्ञान भवनाची (युनिव्हर्सिटी सायन्स सेंटर) प्रशस्त इमारत आणि त्याच्या प्रांगणाला लागून असलेले भले मोठे आकाशचक्र असलेले करमणूक केंद्र (एंटरटेनमेंट सेंटर) दिसले...
लुत्सर्न ०७
.
शहरापासून जरासे दूर गेल्याबरोबर शरदाने आपली रंगपंचमी दाखवलीच...
लुत्सर्न ०८
.
जलसफरीवरून परतताना लुत्सर्नचे सर्वात प्रसिद्ध पर्यटक आकर्षण समजला जाणारा कापेलब्र्युकं (Kapellbrücke) उर्फ चॅपल पूल उर्फ चर्च पूल दिसला. हा पूल लुत्सर्न सरोवराला मिळणार्या र्युस (Reuss) नदीवर आहे. छप्पर असलेला हा २०४ मीटर लांबीचा पूल १३३३ साली बांधला गेला. निष्काळजीपणे टाकून दिलेल्या सिगरेटच्या थोटकामुळे तो १८ ऑगस्ट १९९३ ला आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. पण, त्याला पूर्वीप्रमाणेच परत बांधून त्याचा इतिहास जिवंत ठेवला गेला आहे. या पुलाचा आजही पायी नदी ओलांडण्यासाठी वापर केला जातो...
लुत्सर्न ०९ : चॅपल पूल
त्या पुलावरून नदी ओलांडण्याचा मोह झालाच ! बर्यापैकी अंधार झाला असला तरी पुलाची फुलझाडांनी केलेली सजावट लपलेली नव्हती...
लुत्सर्न १० : चॅपल पूल
.
लुत्सर्न ११ : चॅपल पूल
.
वाटेत परत रेल्वेस्टेशन लागले. त्याने आता दिवाळी असल्यासारखी आकर्षक रोषणाई केली होती...
लुत्सर्न १२
.
हॉटेलच्या वाटेवर पोटोबा करून घेतला. सकाळच्या एन्गेलबर्ग-टिटलिस सफरीत दुबईत काम करणार्या एका गुजराती लोकांच्या जथ्थ्याशी ओळख झाली होती. त्यांनी आदल्या दिवशी पाहिलेल्या पिलाटस नावाच्या पर्यटन स्थळाची खूप स्तुती केली होती आणि त्याला जरूर भेट द्या असा प्रेमळ आग्रह केला होता. परतताना याच गोष्टीवर विचार चालू होता. हॉटेलवर पोहोचल्यावर नकाशे आणि वेळापत्रके बाहेर काढली. प्रवासाच्या मूळ आराखड्याप्रमाणे पुढच्या दिवशी सकाळी र्हाईन धबधबा पाहून दुपारी अडीचला झ्युरिकच्या हॉटेलवर पोहोचणार होतो. यामुळे त्या दिवशीच्या संध्याकाळी ८ वाजता असलेल्या आमच्या सहा जणांच्या प्रकल्पगटाच्या अनौपचारिक भोजनबैठकीच्या अगोदर मला चार-पाच तास आराम करायला मिळणार होते. सकाळच्या सहप्रवाशांनी केलेल्या प्रभावी वर्णनामुळे सरतेशेवटी आरामाच्या वेळेवर पिलाटसने विजय नोंदवला.
भल्या पहाटे निघून, प्रथम पिलाटस बघून, नंतर र्हाईन धबधब्याला भेट देऊन, संध्याकाळी सात पर्यंत झ्युरीकमधले हॉटेल कसे गाठता येईल हे हातातल्या माहितीपत्रकांवरून खात्रीने ठरवता आले. स्विस पास खिशात असल्याने रेल्वे बुकिंग करणे अथवा केलेले बुकिंग बदलणे असले काहीच सोपस्कार करण्याची जरूरी नव्हती. परत एकदा स्विस पर्यटनचा जयजयकार केला ! हॉटेलच्या स्वागतकक्षात फोन करून पाच वाजता उठवायला सांगून अंथरुणात गडप झालो.
.
(क्रमशः :)
===================================================================
शरदातला स्वित्झर्लंड : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२...(समाप्त)
===================================================================
प्रतिक्रिया
24 Jul 2015 - 7:00 am | चौकटराजा
हे सर्व फोटो मोबाईल वर अति सुन्दर दिसताहेत ! वा वा !
24 Jul 2015 - 7:55 am | अजया
शारदीय रंगपंचमीचा फोटो भन्नाट आलाय.सगळं काय सुंदर :(
24 Jul 2015 - 12:45 pm | डॉ सुहास म्हात्रे
स्वित्झर्लंडमध्ये वृक्षवैविध्य खूप आहे त्यामुळे शरदात सर्व किंवा बहुतेक वृक्षांचा एकच एक रंग न राहता असंख्य रंगछटांची पखरण दिसते... हे वैशिष्ट्य माझ्या खास आवडीचे आहे.
24 Jul 2015 - 9:20 am | मनीषा
अप्रतीम फोटो .. आणि सुरेख वर्णन
साउंड ऑफ म्युझिक या गीताचे चित्रीकरण झाले ते स्थळ लुत्सर्नजवळच आहे ना?
स्वित्झर्लंड ला निसर्गाचं वरदान लाभलं आहे. आम्ही मे मधे तिथे गेलो होतो. पॅरीस पासून बस ने लुत्सर्न .
प्रवास खूप असूनही अजीबात त्रासदायक वाटत नाही. लांबच्या लांब पसरलेली हिरवीगार कुरणे त्यावर पांढर्याशुभ्रं गाई , आणि अधुनमधुन दिसणारी नेटकी एकमजली किंवा दुमजली घरे .... अगदी डोंगर माथ्यावर उन्हामधे चमचमणारे बर्फं दिसत होते.
आणि तिथली जगप्रसिध्दं चॉकलेट्स खरेदी करणे 'मस्ट' आहे.
24 Jul 2015 - 12:50 pm | डॉ सुहास म्हात्रे
त्याच्या निसर्गाच्या सौंदर्याने, लोकांच्या तो निसर्ग नेटका ठेवण्याच्या कळकळीमुळे आणि आरामदायक प्रवासी व्यवस्थेमुळे स्वित्झर्लंडमध्ये तासनतास केलेला प्रवासही सुखद असतो यात शंकाच नाही !
साउंड ऑफ मुझिकचे युरोपमधिल चित्रिकरण साल्झबुर्ग (ऑस्ट्रिया) येथे केलेले आहे.
24 Jul 2015 - 1:50 pm | मनीषा
माउंट स्टॅनसेरहॉर्न असे नाव आहे ..
केबलकार ने वर जावे लागते.
25 Jul 2015 - 12:13 pm | डॉ सुहास म्हात्रे
साऊंड ऑफ म्युझिकच्या चित्रिकरणाबद्दलची माहिती इथे दिलेली आहे.
24 Jul 2015 - 9:54 am | सुबोध खरे
अप्रतीम फोटो .. आणि सुरेख वर्णन
आता वेळ काढून सफरीला जायला पाहिजे. जायच्या अगोदर तुमचा सल्ला जरूर घेईन.
24 Jul 2015 - 12:53 pm | डॉ सुहास म्हात्रे
स्विस सफर जरूर करा. आयुष्यात एकदा तरी बघावा असा देश आहे. कधिही विचारा, मला शक्य ती सर्व माहिती तुम्हाला द्यायला आनंदच होईल.
... आणि माझ्यासारखा तेथे असलेल्या सर्वंकष व्यवस्थापनाच्याही प्रेमात पडतो.
24 Jul 2015 - 10:03 am | प्रचेतस
स्विस शहरंसुद्धा फारच सुंदर आहेत.
वर्णन नेहमीप्रमाणेच झकास.
24 Jul 2015 - 12:33 pm | वेल्लाभट
नॉस्टॅल्जिया.... नॉस्टॅल्जिया....
लुसर्न फिरण्यात रस नव्हता म्हणालात.... लई वाईट वाटलं.
24 Jul 2015 - 12:59 pm | डॉ सुहास म्हात्रे
लुत्सर्न उत्तम शहर आहे यात शंका नाही. तसे लेखात लिहीलेही आहे. पण, टिपीकल युरोपियन शहरे पाहून पाहून जरासा कंटाळाच आला आहे. त्यामुळे काहीतरी नाविन्याच्या अथवा विषेश गोष्टीच्या शोधात होतो / असतो.
24 Jul 2015 - 2:00 pm | वेल्लाभट
एनीवेज...
इट्स अ लव्हली प्लेस.
24 Jul 2015 - 12:59 pm | डॉ सुहास म्हात्रे
चौकटराजा आणि प्रचेतस : अनेक धन्यवाद !
24 Jul 2015 - 1:12 pm | मृत्युन्जय
अप्रतिम चालू आहे सफर आमची. पुभाप्र.
24 Jul 2015 - 1:50 pm | मोहनराव
छान सफर चालू आहे सफर. वाचतोय.
24 Jul 2015 - 3:11 pm | पद्मावति
चॅपेल पूल आणि फॉल कलर्स चे फोटो मस्तं आलेत.
24 Jul 2015 - 6:10 pm | पैसा
कसलं सुंदर आहे सगळं!
25 Jul 2015 - 3:42 am | जुइ
खास करून चॅपेल पुलाचे फोटो आवडले.
25 Jul 2015 - 12:15 pm | डॉ सुहास म्हात्रे
मृत्युन्जय, मोहनराव, पद्मावति, पैसा आणि जुई : अनेक धन्यवाद !
26 Jul 2015 - 4:57 pm | इशा१२३
ल्युसर्न सुंदर आहे.५,७,१० फोटो जसाचा तसा आहे माझ्याकडेहि.
बाकि प्रसिद्ध लायन मोन्युमेन्ट पाहिले असेलच ना?त्याचा फोटो कसा नाहि?त्या सिहाच्या चेहर्यावरचे करूण भाव सुरेख कोरलेत.
26 Jul 2015 - 6:39 pm | डॉ सुहास म्हात्रे
लायन मॉन्युमेन्ट नाही पाहीले. संध्याकाळचे ४ ते ८ असे केवळ चार तास फिरायला होते... रात्र थोडी सोंगे फार, दुसरे काय ! तरी काहीही न ठरविता फेरी मारलेला तो वेळ बर्यापैकी उपयोगी आला.