शरदातला स्वित्झर्लंड : ११ : र्‍हाईन धबधबा (र्‍हाईनफाल्)

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
31 Jul 2015 - 12:38 am

===================================================================

शरदातला स्वित्झर्लंड : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२...(समाप्त)

माझे मिपावरचे इतर लेखन...

===================================================================

प्रेमात पडावे असे शहर ! नाईलाजाने पदयात्रा संपवून बस थांब्यावर परतलो आणि लुत्सर्नकडे जाणारी बस पकडली. सहलीच्या पुढच्या गंतव्याकडे जाणारी रेल्वे लुत्सर्न बानहोफवरून सुटली आणि र्‍हाईनच्या धबधब्याबाबतच्या विचारांची गर्दी मनात सुरू झाली.

.

मध्य स्वित्झर्लंडमधल्या लुत्सर्नवरून निघालेली रेल्वे झ्युरिक् मार्गे स्वित्झर्लंडच्या जर्मनीबरोबरच्या उत्तर सीमेला लागून असलेल्या श्लोसलाउफन (schlosslaufen) कडे निघाली. या दोन तासांच्या प्रवासात झ्युरिक् आणि विंटरथुर या दोन थांब्यांवर गाडी बदलून पुढे जायचे होते. या दोन्ही स्टेशनवर १४ मिनिटे आणि ७ मिनिटे अश्या फरकाने एकमेकांपासून दूर असलेल्या प्लॅटफॉर्म्सवरून पुढची गाडी पकडायची होती. आतापर्यंत स्विस रेल्वे आणि खुद्द माझ्यावरचा माझा विश्वास इतका वाढलेला होता की हे काम मी रोज लोकल/बस बदलत कामाला जाणार्‍या मुंबईकराच्या सफाईने केले !

गाडी आल्प्सचा निरोप घेऊन सुरुवातीला लहानमोठ्या टेकड्यांचा मधून आणि त्सुग व झ्युरिक् अशी (त्यांच्या काठावरच्या शहरांची) नावे दिलेल्या मनोहर सरोवरांच्या काठाने झ्युरिक् पर्यंत जाते. त्यामुळे हा प्रवास जरा भरकन संपतो. इतक्या दिवसांनंतर या प्रवासात प्रथमच मोठी सपाट शेते दिसायला सुरुवात झाली होती...


र्‍हाईन धबधब्याच्या दिशेने

.

र्‍हाईनफाल् (Rheinfall) उर्फ र्‍हाईन धबधबा हा एक "सपाटीवरचा" धबधबा आहे. त्याच्या वर्णनातल्या "सपाटीवरचा" हा शब्द वाचूनही त्याची दखल न घेतल्यामुळे जराशी गडबड झाली. उंचच उंच कड्यांवरून पडणार्‍या पाण्याचे धबधबे पाहण्याची सवय असलेले मन त्याच्या प्रथम दर्शनाने नाही म्हटले तरी जरासे खट्टू झालेच ! कारण, येथे आपल्याला प्रचंड उंचीवरून पडणार्‍या पाण्याचा प्रपात दिसत नाही. हा १५० मीटर रुंदीचा आणि लहान मोठ्या अनेक पायर्‍या-कपार्‍यांनी बनवलेल्या २३ मीटर उंचीच्या उतारावरून खळखळत वाहत जाणार्‍या पाण्याचा वेगवान प्रवाह आहे. १५,००० वर्षांपूर्वी सद्याच्या हिमयुगातील एका अतिशीत कालखंडामध्ये पृथ्वीच्या कवचाचे थर वरखाली झाल्याने हा धबधबा निर्माण झाला. या धबधब्यातून ऋतुमानाप्रमाणे दर सेकंदाला ७०० ते १,२५० घनमीटर पाणी वाहते. या परिमाणाने हा युरोपमधील सर्वात मोठा सपाटीवरचा धबधबा आहे.

धबधबा बघण्याची सुरुवात आपण त्याच्या उंचीपेक्षा जास्त उंचीवर असलेल्या जागेवरून करत असल्याने हा अनुभव जरासा वेगळाच असतो. आपल्या मनातल्या सर्वसामान्य धबधब्याचे अक्राळविक्राळ चित्र येथे दिसत नसले तरी दर सेकंदाला २३ मीटर या वेगाने वाहणार्‍या पाण्याच्या प्रवाहाची गर्जना छातीत कंप निर्माण करण्या इतकी नक्कीच ताकदवान असते.

प्रवाहाचा ओघ जवळून पाहता यावा यासाठी नदीच्या दोन्ही बाजूंच्या किनार्‍यांच्या अनेक जागी शिड्या व निरिक्षणमनोरे उभारलेले आहेत. खडबडीत पृष्ठभागावरून वेगाने वाहणार्‍या थंडगार पाण्याचे दूरवर उडणारे तुषार किनार्‍यावरच्या लोकांत हलकीशी शिरशिरी जरूर निर्माण करतात आणि त्याच्या हुडहुडीत आपण पाण्याचा विशाल पसारा बघण्यात गुंतून जातो. कर्मधर्मसंयोगाने मी तेथे शरद ऋतूत तेथे गेलो असल्याने, शरदाने धबधब्याच्या भोवताली बनवलेली रंगीबेरंगी चौकट बघणे ही सुद्धा माझ्यासाठी एक अनपेक्षित सुखद भेट होती...


र्‍हाईन धबधबा : ०१

.


र्‍हाईन धबधबा : ०२

.


र्‍हाईन धबधबा : ०३

.

असंख्य वेड्यावाकड्या कपार्‍यांनी भरलेल्या या धबधब्यात अनेक छोटे मोठे सुळके वर आलेले आहेत. त्यातला एक सुळका अनेक पायांवर पाण्यात उभ्या असलेल्या एका प्रचंड वेड्यावाकड्या स्टूलासारखा दिसतो. त्या सुळक्याकडे जाण्यासाठी किनार्‍यावरून एक पूल आहे आणि त्याच्या टोकावर चढून जायला शिडी आहे. टेकडीच्या टोकावरच्या निरिक्षणमनोर्‍यावरून धबधब्याचे विहंगमावलोकन करता येते...


र्‍हाईन धबधबा : ०४ : निरिक्षणमनोरा असलेला सुळका

.

तेथे सहलीला येणार्‍या पर्यटकांसाठी दिवसभराचा वेळ मजेत घालविण्यासाठी धबधब्याच्या आजूबाजूला अनेक प्रकारची मनोरंजक आकर्षणे आहेत. मुख्य प्रवाहाच्या थोड्या खालच्या बाजूला प्रवासी नौकेने जलविहार करण्याची सोय आहे. अनेक रेस्तराँ आहेत आणि मुलांना खेळण्याची सोय. एक धबधबा व परिसराची माहिती देणारे इंटरअॅक्टीव्ह प्रदर्शन आहे. धबधब्याच्या काठाने Belvedere Trail नावाची एक पायी फिरण्याची सहलही उपलब्ध आहे. येथे बहुतेक लोक दिवसभराची सहल (पिकनिक) करायला येतात. अश्या बर्‍याच तर्‍हेने असामान्य नसलेल्या जागेला जागतिक पर्यटन स्थळ बनविण्याची किमया स्विस पर्यटनच करू जाणे !

अर्थात खात-पीत-फिरत मजेत दिवसभराचा वेळ घालवावा इतका वेळ माझ्याकडे नव्हता. तरीही मिळालेल्या दोन एक तासांत मी जेवढे जमेल तेवढे खाणे-पिणे-फिरणे केलेच ! धबधब्याच्या उंचीने थोडीशी निराशा केली होती. पण ती कसर काही प्रमाणात त्याच्या वेगवान ओघाने, छातीत घुमणार्‍या उच्चारवाने आणि मोठ्या प्रमाणात माझ्या परमप्रिय मित्राच्या, शरदाच्या, कलात्मक रंगकामाने भरून काढली होती.

माझ्या सहाध्यायांबरोबरच्या संध्याकाळच्या सभेची आठवण ठेवून मला वेळेत परतणे भाग होते. रेल्वे थांब्यावर परत आलो. झ्युरिक् कडे परतताना नवीनच सेवेत आलेल्या अत्याधुनिक थुर्बो (टर्बो) रेल्वेगाडीने प्रवास करण्यास मिळाला...


थुर्बो (टर्बो) रेल्वे ०१

.


थुर्बो (टर्बो) रेल्वे ०२

.

स्विस भूमीवर पोहोचेपर्यंत या शरदातल्या स्विस प्रवासाची कोणत्याही प्रकारची तयारी मी केली नव्हती. स्विस पर्यटक केंद्रावर पोहोचेपर्यंत "माझ्या हातात फिरायला साडेचार-पाच मोकळे दिवस आहेत" या माहितीपेक्षा जास्त माझ्याजवळ काहीच नव्हते. इतकेच काय पण झ्युरिक् मधले पर्यटक केंद्र कुठे आहे हे सुद्धा मला माहीत नव्हते. पर्यटन केंद्रावरच्या सहाय्यकाला मी (या लेखमालेच्या दुसर्‍या भागात लिहिलेली) न च्या बरोबर माहिती दिली होती आणि वर "तूच काय ते ठरव माझ्यासाठी" अशी मागणी केली होती. या सर्व पार्श्वभूमीवर केवळ एका तासाभरात पर्यटनस्थळे, वाहनव्यवस्था, माहितीपत्रके, माझ्यासाठीच्या अनेक पर्यायांसह खास माझ्यासाठी प्रिंट केलेले रेल्वेचे वेळापत्रक आणि अनेक अमूल्य तोंडी सूचना इत्यादींसह पाच दिवसांच्या सहलीची रूपरेखा बनवून मिळाली होती. असे असूनही एकही समस्या न येता त्या रूपरेखेचे पहिले तीन दिवस अपेक्षेपेक्षा जास्त विलक्षण मजेत गेले होते.

इतकेच नव्हे तर मूळ रूपरेखेत नसलेली पिलाटस कुल्मची मनोहारी सफर ऐनवेळेला ठरवूनही आरामात पार पाडणेही त्या सफरीत शक्य झाले होते. इतर कोणत्याही सहलीत अतिरिक्त वेळ, खर्च आणि त्रासाशिवाय हे शक्य झाले नसते. आता स्विस पर्यटनाबद्दल माझ्या मनात प्रेमाची आणि आदराची भावना आली नसती तरच आश्चर्य ! आंतरराष्ट्रीय प्रवास ही मला काही नवीन गोष्ट नव्हती. तरीसुद्धा या प्रवासाच्या अनुभवाने मला अनेकदा चकीत केले हे निश्चित.

इतके असले तरी या सहलीच्या मला झालेल्या मुख्य फायद्याचा सौभाग्यपूर्ण कर्मधर्मसंयोग वेगळाच होता ! पदवीच्या अभ्यासक्रमातील ज्या विषयासाठी (क्लास / मोड्युल) मी झ्युरिक् ला गेलो होतो तो होता, "(उद्योगधंद्यांमधल्या) स्पर्धेमधले सूक्ष्म स्तरावरचे अर्थकारण (Microeconomics of Competitiveness)". हे मोड्युल हार्वर्ड विद्यापीठातील प्रोफेसर मायकेल जे पोर्टर यांनी त्यांच्या अनेक वर्षांच्या अनेक देशांना दिलेल्या सल्ल्यांच्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर बनविलेले आहे. या मोड्युलचा एक भाग म्हणून आम्हाला पाच-सहा जणांचे गट बनवून आंतरराष्ट्रीय स्तरावरचा प्रत्येकी एक प्रकल्प करणे जरूर होते. माझ्या मूळ व्यवसायाबाहेरचा अनुभव मिळावा या उद्देशाने मी जाणीवपूर्वक वैद्यकीय व्यवसायाशी संबंधीत प्रकल्प असलेले गट टाळले होते आणि वैद्यकीय व्यवसायाशी संबंधीत (डॉक्टर, औषधे / वैद्यकीय उपकरणे बनवणार्‍या कंपन्यांतील अधिकारी, जागतिक वैद्यकसंस्थेतील [WHO] अधिकारी, इ) नसलेल्या सहाध्यायांच्या गटात सामील झालो होतो. आमच्या गटाचे सहाही सभासदही वेगवेगळ्या देशांचे नागरिक होते... अमेरिका, डेन्मार्क, स्वित्झर्लंड, रोमानिया, अबू धाबी आणि भारत (मी). मुख्य म्हणजे आमच्या गटाचा विषय होता, "दुबईला पर्यटन व्यवसायात जागतिक स्तरावरचा महत्त्वाचा स्पर्धक कसा बनवता येईल ?".

माझा हा तीन दिवसांचा प्रवास केवळ सुखकारक (प्लेझर) पर्यटन याच हेतूने केला असला तरी तो करताना मला माझ्या मोड्युलसाठी आणि विशेषतः आमच्या प्रकल्पासाठी (बिझनेस) जितकी साधनसामुग्री, अनुभव आणि अंतर्दृष्टी (इनसाईट) मिळाली ती कदाचित सहा महिन्यांच्या वाचनाने मिळू शकली नसती. हा कालखंड माझ्यासाठी बिझनेस आणि प्लेझर यांचा अतुलनिय संगम आणि अर्थातच अनेक प्रकारे अविस्मरणीय ठरला !

मी स्वित्झर्लंडच्या प्रेमात पडण्यामागे या तीन दिवसांचा खूप मोठा हात आहे... आणि पुढच्या दर भेटीत हे प्रेम वाढत जावे असेच अनुभव आले. अर्थातच, जेवढ्या ओढीने मी दुसर्‍या दिवशी सुरू होणार्‍या अभ्यासक्रमाची वाढ पाहत होतो, तितक्याच ओढीने अभ्यास संपल्यावर प्रवासाच्या उरलेल्या दोन दिवसांत मी करणार असलेल्या जिनिवाच्या भेटीची वाट पाहत होतो.

.

(क्रमशः )

===================================================================

शरदातला स्वित्झर्लंड : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२...(समाप्त)

माझे मिपावरचे इतर लेखन...

===================================================================

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

31 Jul 2015 - 1:04 am | पद्मावति

काय मस्तं दिसतोय फॉल. तुम्ही केलेले वर्णन आणि फोटो पाहून प्रत्यक्ष तो धबधबा डोळ्यासमोर उभा राहिला.
लव इन पॅरिस मधे जो क्लाइमॅक्स चा सीन आहे तो याच फॉल्स वर शूट केलाय का? मूवी मधे तो नायगारा म्हणून दाखवला आहे पण हे फोटो बघून समहाउ ते दृष्य इथलच वाटतय.

मधुरा देशपांडे's picture

31 Jul 2015 - 1:40 am | मधुरा देशपांडे

र्‍हाईनफॉल्स हे माझे पहिले स्विस दर्शन होते. नावाला फक्त जर्मनीतुन स्विसमध्ये शिरलो, त्यामुळे फारसा फरक जाणवला नव्हता आणि स्विस इफेक्ट असा काही खूप दिसला नव्हता. त्यात आम्ही गेलो तेव्हा तापमान ३५ हुन जास्त असल्याने वैताग आला होता. व्यक्तीशः मला थोडी अतिरंजित जागा वाटली. म्हणजे छान आहे, पण जर कुणी स्विस फिरायला येणार असतील, तर त्यात र्‍हाईनफॉल्स मस्ट नाही, सहज जमले तर जावे असे.
फोटो मस्तच.

अर्धवटराव's picture

31 Jul 2015 - 2:16 am | अर्धवटराव

तुस्सी सिंपली ग्रेट हो !!

-हाईन फाॅलला भेट म्हणून पर्यटन संस्था खूप जाहिरात करतात.माझ्याही डोळ्यासमोर तेच 'धबाबा आदळे तोय' असे दृश्य होते.बरे झाले कळले.म्हणजे अपेक्षाभंग न होता एंजाॅय करता येइल!

र्‍हाईन धबधबा पाहून निराशाच झाली. इतके वेळा त्याचे नाव ऐकलेय की प्रचंड मोठा धबधबा असेल असे वाटले होते. स्विस लोकांनी एका साध्याश्या सपाट धबधब्याचे रुपांतरही मोठ्या पर्यटनस्थळात केल्याचे पाहून त्यांच्या कल्पनाशक्तीचे कौतुक करावेसे वाटले.
बाकी लेख आणि वर्णन नेहमीप्रमाणेच अप्रतिम.

वेल्लाभट's picture

31 Jul 2015 - 10:57 am | वेल्लाभट

सुरेख वर्णन. स्विस पर्यटन, तिथेले सुखद अनुभव हे म्हणजे क्लास.

वर मधुराताई आणि प्रचेतस वगैरे म्हणाल्याप्रमाणे खूप हाइप्ड ठिकाण म्हटलं जाऊ शकतं. तरीही एकदा बघायला हवा. डेफनिंग साउंड ऑफ वॉटर...

ऑन अ लाईटर नोट.... काय नाय हो -हाईन बिईन.... आडवा केलेला दूधसागर आहे जल्ला !

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Jul 2015 - 4:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

पद्मावति, मधुरा देशपांडे, अर्धवटराव, अजया, प्रचेतस आणि वेल्लाभट : अनेक धन्यवाद !

र्‍हाईनफाल् या ठिकाणाला मोठे पर्यटनस्थल म्हणून भेट न देता "एक दिवसाचा मोकळा वेळ आरामात घालवून श्रमपरिहार करण्याचे स्थान" या कारणाने भेट दिल्यास ती सार्थकी लागेल. तसा मोकळा वेळ नसल्यास, तेथे न गेल्याने फार काही मुकले, असे निश्चित होणार नाही.

मधुरा देशपांडे's picture

31 Jul 2015 - 4:31 pm | मधुरा देशपांडे

"एक दिवसाचा मोकळा वेळ आरामात घालवून श्रमपरिहार करण्याचे स्थान" या कारणाने भेट दिल्यास ती सार्थकी लागेल.

हाहा. तिथे वडा पाव मिळतो हे आमचे जाण्यामागचे मुख्य कारण होते, ते सफल झाले. त्याला भारतातल्या वडापावची चव नसली तरीही नेहमी घरी करण्यापेक्षा तिथे गरम वडापाव आणि चहा खाण्यातच समाधान वाटले होते. ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Jul 2015 - 11:48 pm | डॉ सुहास म्हात्रे

काय हे !? मी तेथे गेलो असताना एंन्गेलबर्ग आणि र्‍हाईनफाल् या दोन्ही ठिकाणचे वडापाववाले संपावर का गेले होते ? णीषेढ ! ;)

अत्रुप्त आत्मा's picture

1 Aug 2015 - 12:35 am | अत्रुप्त आत्मा

मस्स्स्स्स्स्स्त!

जुइ's picture

1 Aug 2015 - 2:49 am | जुइ

हा भाघही चांगला झाला आहे. धबधब्याचा फोटो आवडला!

सुधीर कांदळकर's picture

3 Aug 2015 - 5:02 pm | सुधीर कांदळकर

धबधबा चारही चित्रे आवडली. पिलाट्स कुल्म खरेच कल्मिनेशन होते.

स्विस पर्यटन झिंदाबाद.

धन्यवाद, पुभाप्र.

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Aug 2015 - 1:48 am | डॉ सुहास म्हात्रे

अत्रुप्त, जुइ आणि सुधीर कांदळकर : धन्यवाद !

पैसा's picture

5 Aug 2015 - 12:27 pm | पैसा

खूप छान लिहिलंय! फोटो तर नेहमीप्रमाणे अप्रतिम आहेतच!

श्रीरंग_जोशी's picture

6 Aug 2015 - 2:14 am | श्रीरंग_जोशी

हा भागही खूप आवडला.

लहानपणी शाळेत 'मी पाहिलेले अमुक अमुक' असे निबंध लिहिताना 'केल्याने देशाटन मनुजा चातुर्य येतसे फार' ही ओळ लिहिली जायची. ही लेखमालिका त्या ओळीचे माहात्म्य पुन्हा एकदा पटवून देत आहे.

या लेखातला शेवटचा भाग विशेष भावला.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Aug 2015 - 2:19 am | डॉ सुहास म्हात्रे

पैसा आणि श्रीरंग_जोशी : अनेक धन्यवाद !

अरुण मनोहर's picture

8 Aug 2015 - 11:08 am | अरुण मनोहर

वाह! मजा आली वाचायला! फ़ोटो पण उत्तम !

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Aug 2015 - 4:05 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

भटक्या फोटोग्राफर's picture

9 Dec 2017 - 2:37 am | भटक्या फोटोग्राफर

२०१३ ला धबधब्यास दिलेली भेट आठवली त्या आठवणी ताज्या झाल्या . गेलो तेव्हा काही जण मासे पकडायला गळ टाकून निवांत बसले होते बरोबर कॉफीचा मग घेऊन.