शरदातला स्वित्झर्लंड : ०३ : झ्युरिक ते क्लायनं शायडेक्

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
5 Jul 2015 - 12:48 am

===================================================================

शरदातला स्वित्झर्लंड : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२...(समाप्त)

माझे मिपावरचे इतर लेखन...

===================================================================

शेवटी, कालच्या प्रवासातल्या झोपेच्या अभावाचा प्रभाव सुरू झाला. एका रेस्तराँमध्ये काही खाऊन घेतलं, टेक्नोपार्ककडे जाणारी रेल्वे पकडली आणि हॉटेलवर परतलो. दुपारी उत्तम मार्गदर्शन केल्याबद्दल हॉटेलच्या स्वागतकाला धन्यवाद देऊन उद्यापासून पुढचे तीन दिवस फिरायला जाणार आहे असे सांगितले. मात्र परतण्याच्या दिवसापासून पुढचे आरक्षण कायम ठेवायला सांगितले. रूमवर गेलो आणि ताणून दिली.

दुसऱ्या दिवशी ६ वाजता युंगफ्राउयोखकडे जाणारी रेल्वेगाडी पकडायला झ्युरिक HB वर पकडायची होती. लवकर उठून सगळे आवरून सामानाची मोठी बॅग ठेवली हॉटेलच्या लगेज रूममध्ये ठेवली. तीन दिवसांना पुरेसे कपडे वगैरे जुजुबी सामान एका छोट्या बॅगेत घेऊन सव्वापाचालाच बाहेर पडलो. प्रवासाचे छापील वेळापत्रक बरोबर होतेच त्यामुळे योग्य त्या प्लॅटफॉर्मवरची योग्य ती गाडी पकडण्यात काही समस्या न येता... उलट, गाडी सुटण्याच्या वेळेच्या चक्क १० मिनिटे अगोदर पोहोचल्याने एक सोईस्कर खिडकीच्या बाजूची खुर्ची पकडून बसलो.

युंगफ्राउयोख (Jungfraujoch)

(Jung = युंग = तरूण, frau = फ्राउ = स्त्री, joch = योख = घाट; Jungfraujoch = तरुणी / कुमारिका घाट. हे नाव या घाटाला का पडले याचा काही शोध लागला नाही.)

युंगफ्राउ, आयगर आणि म्योंख ही स्विस आल्प्सची तीन शिखरे एका सलग महाकाय भिंतीसारखी उभी आहेत. त्यांतील युंगफ्राउ आणि म्योंख या शिखरांमध्ये युंगफ्राउयोख ही घोड्याच्या पाठीवर ठेवायच्या खोगिरासारखी जागा आहे. ही जागा म्हणजे ३,४५४ मीटर उंचीवर बारमाही बर्फाने भरलेली हिमनदी आहे. त्यामुळे काही धाडसी आप्ल्पाईन गिर्यारोहक सोडले तर या घाटातून इतर वाहतूक कधीच झाली नाही. किंबहुना जोआन मेयर, हिरोनिमुस मेयर आणि जोआनच्या दोन मुलांनी १८११ मध्ये ह्या जागेवर पोहोचल्याच्या केलेल्या दाव्यावरही विश्वास ठेवला गेला नाही. पण यामुळे खचून न जाता, जोआनच्या दोन मुलांनी १८१२ मध्ये परत एक मोहीम काढून खराब हवामान आणि अनेक फसलेल्या प्रयत्नांना तोंड देत युंगफ्राउयोख पुराव्यासह परत काबीज करून दाखविले.

१९१२ सालामध्ये रेल्वेने जायची सोय झाल्यापासून मात्र हे दुर्गम ठिकाण आल्प्समधले सर्वात मोठे पर्यटक आकर्षण झाले आहे. हे आल्प्समधले सर्वात उंचीवरचे रेल्वेस्टेशन आणि दळणवळण अभियांत्रिकीचा एक अभिमानास्पद प्रकल्प समजला जातो. तेथे जाणारी रेल्वे आल्प्सच्या नयनमनोहर भागातून आणि बारमाही बर्फाच्छादित असलेल्या युंगफ्राउ आणि म्योंख या शिखरांमधील बोगद्यांतून प्रवास करते. त्यामुळे, युंगफ्राउयोख तर अत्यंत आकर्षक आहेच, परंतू तेथे पोहोचण्यासाठी केल्या जाणार्‍या प्रवासाचा अनुभवही अविस्मरणीय असतो.

चला तर मग युंगफ्राऊयोखवर स्वारी करायला...

झ्युरिकच्या बाहेर पडल्या पडल्या आपला प्रवास स्विस निसर्गसौंदर्याने नटलेल्या परिसरातून होतो. त्या निसर्गात मधे मधे जणू सणसमारंभासाठी नीटनेटक्या केलेल्या व घासूनपुसून ठेवल्यासारख्या दिसणार्‍या घरांचे वसलेले गामीण आणि शहरी परिसर पाहत असताना इंटरलाकनला केव्हा पोहोचलो हे ध्यानातच येत नाही. आतापर्यंत जर एखादा अस्वच्छ अथवा गबाळा परिसर दिसला तर त्याच्या खरेपणाची खात्री करण्यासाठी स्वतःलाच चिमटा काढावा इतपत आपली मन:स्थिती बदललेली असते.

रेल्वे इंटरलाकन ते क्लायनं शायडेक् (Kleine Scheidegg उर्फ छोटा पाणलोट) या वाटेवर गाडी धावू लागल्यावर स्विस निसर्ग आपल्या सौंदर्याचे खास पदर उलगडून दाखवू लागतो. रेल्वेच्या डब्यात खेचाखेच होईल इतकी गर्दी नव्हती, बहुदा तशी ती कधीच नसते. त्यामुळे सर्व प्रवासभर मी आलटून पालटून दोन्ही बाजूच्या खिडक्यांजवळ बसत निसर्ग जमेल तितका डोळ्यास साठवत होतो आणि कॅमेर्‍याचा सढळ वापर करत होतो. प्रवासात असे केले की काही सहप्रवाशांच्या नजरा विचित्र होतात. अश्या 'वाईट' नजरांचा आपल्यावर प्रभाव पडू नये यासाठी त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करण्याचा उतारा काढण्यात मी फार पूर्वीच पीएचडी केलेली आहे :) हा निसर्ग इतका मनमोहक आहे की इतर काही जणांनी माझे अनुकरण सुरू केले आणि त्या विचित्र नजरा लवकरच बर्‍यापैकी मावळल्या. इतकेच नव्हे तर त्यातल्या काही नजराही आमच्या कंपूत सामील झाल्या !

या प्रवासाच्या सुरुवातीला डोंगरांच्या रांगांतून जाताना मधूनच दूरवरची हिमशिखरे डोकावत असतात. स्विस निसर्गाच्या चित्रातली हिरवाई कायमच असते. त्यात मधून मधून शरदाने उधळलेले लाल-नारिंगी-पिवळा-तपकिरी रंग जगावेगळी अनुभूती देत असतात...


इंटरलाकन ते क्लायनं शायडेक् ०१

.


इंटरलाकन ते क्लायनं शायडेक् ०२

.

क्लायनं शायडेक् : आल्प्सचा मध्यबिंदू

(क्लायनं = छोटा / धाकला ; शायडेक् = पाणलोट. जवळच दुसरा मोठा पाणलोट आहे. पण तो याच्या खालच्या अंगाला आहे. कमी मोक्याच्या जागेवर असल्याने आणि तेथे रेल्वे जात नसल्याने तो याच्याइतका प्रसिद्ध नाही.)

पुढचा थांबा होता क्लायनं शायडेक् घाट. ही जागा ल्युटशिनं (Lütschine) नदीच्या दोन उपनद्यांच्या मध्यभागी असलेला उंच चिंचोळ्या पठाराचा भूभाग आहे. मोजकीच वस्ती असलेल्या या ठिकाणावरून या परिसरातल्या आल्प्सचे हायकिंग ट्रेक्स, हिमसफरी आणि गिर्यारोहण मोहिमा सुरू होतात.

क्लायनं शायडेक् ची हद्द सुरु झाली की एका अत्यंत मोक्याच्या ठिकाणावर बांधलेले, बघताच प्रेमात पडावे असे 'हॉटेल आयगर टेर्रासं' दिसते. या हॉटेलमध्ये आयगर सँक्शन या क्लिंट इस्ट्वूडची प्रमुख भूमिका असलेल्या प्रसिद्ध इंग्लिश चलतचित्राचे चित्रीकरण झाले आहे. हॉटेलचे ठिकाण, त्याचे रंगरूप आणि आजूबाजूचा नयनरम्य परिसर पाहून "तिथे दोन दिवस रहायला मिळाले तर स्वर्ग स्वर्ग म्हणजे काय याची झलक नक्की अनुभवता येईल" असा विचार मनात चमकून गेला...


क्लायनं शायडेक् ०१ : हॉटेल आयगर टेर्रासं

.


क्लायनं शायडेक् ०२ : हॉटेल आयगर टेर्रासं

.

इथून पुढे एका बाजूला निष्पर्ण पर्वत आणि हिमशिखरांच्या रांगा सुरू होतात...


क्लायनं शायडेक् ०३

.


क्लायनं शायडेक् ०४

.

त्यांच्यातून मधूनच युंगफ्राऊयोख आपले डोके वर काढून "या, या. तुमचीच वाट पाहतोय केव्हापासून !" असे सांगत राहतो...


क्लायनं शायडेक् ०५ : युंगफ्राऊयोखचे प्रथमदर्शन

.

क्लायनं शायडेक् स्टेशनवर गाडी १५ मिनिटे थांबते हे झ्युरिकमध्ये मिळालेल्या रेल्वे वेळापत्रकामुळे खात्रीने कळले होते (धन्यवाद स्विस पर्यटन !). त्यामुळे गाडीतून खाली उतरून आजूबाजूचा रम्य परिसर निगुतीने डोळ्यात साठवता आला...


क्लायनं शायडेक् ०६

.


क्लायनं शायडेक् ०७ : विहंगम दर्शन (जालावरून साभार)

.

एका बाजूला हिमशिखरांनी भरलेल्या पर्वतराजी तर दुसर्‍या बाजूला काही बोडके तर काही हिरवाईने नटलेले डोंगर. हिरवाईतून मधूनच पांढर्‍या-तांबड्या ठिपक्यांसारख्या दिसणार्‍या घरांची छोटी छोटी गावे. मधूनच एकांड्या शिलेदारासारखे भर जंगलात असलेले घर. असल्या अनवट ठिकाणी भान विसरून गेले नाही तरच नवल ! गाडीने शिट्टी वाजवली आणि नाईलाजाने सर्वजण पाय ओढत आपापल्या डब्यांमधे शिरले.

(क्रमशः )

===================================================================

शरदातला स्वित्झर्लंड : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२...(समाप्त)

माझे मिपावरचे इतर लेखन...

===================================================================

प्रतिक्रिया

पर्वतशिखरं पाहून हिमालय आठवला! सुरेख!

जुइ's picture

5 Jul 2015 - 5:29 am | जुइ

अतिशय सुंदर फोटो आणि माहिती. मागील २ भागांपेक्षा हा भाग अगदीच लहान झाला आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Jul 2015 - 1:47 pm | डॉ सुहास म्हात्रे

पुढच्या युंगफाउयोखवरच्या भागाबरोबर एकत्र केला असता तर लेख खूप मोठा झाला असता म्हणुन हा भाग जरा लहान ठेवावा लागला आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Jul 2015 - 1:58 pm | डॉ सुहास म्हात्रे

आप्ल्स पाहून हिमालय केवळ आठवतो असेच नाही तर हिमालयासमोर आप्ल्स किती खुजा आहे हेही जाणवते. माँट ल्बांक हे आल्प्सचे सर्वात उंच शिखर ४८०८ मीटर उंच आहे तर हिमालयात ८००० मीटरपेक्षा जास्त उंचीची ९ शिखरे आहेत... ४००० मीटरपेक्षा उंच तर अगणित आहेत.

मात्र, दुर्दैवाने, स्वित्झर्लंडमधिल पर्यटनव्यवस्थापन भारताच्या काहीशे किलोमीटरने पुढे आहे... आणि पर्यटकाची सहल सुगम, मजेशीर व अविस्मरणीय ठरण्यात हा मुद्दा कळीचा असतो.

हिमालयामध्ये सहज सुलभ पर्यटन सुरु झाले नाहीये, हेच बरे आहे अन्यथा, त्याची पर्वती आणि गड किल्ल्यांसारखे अवस्था व्हायला वेळ लागणर नाही!

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Jul 2015 - 3:27 pm | डॉ सुहास म्हात्रे

कमी भव्य आणि शरदाचे रंग सोडले तर कमी सुंदर आप्ल्समध्ये आपल्यापेक्षा सहस्रपटीने जास्त सोई, पर्यटक आणि व्यावसायीक उत्पन्न आहेत. शिवाय, तेथिल परिसर आणि निसर्ग उत्तम अवस्थेत राखलेला आहे.

आपल्याकडे पर्यटनव्यवस्थापनाच्या नावाखाली जे काही चालते त्याला पर्यटनव्यवस्थापन म्हणणे सह्याद्रीतल्या दरीच्या तळाला एव्हरेस्ट म्हणण्यासारखे आहे, दुर्दैवाने !

मधुरा देशपांडे's picture

5 Jul 2015 - 1:09 am | मधुरा देशपांडे

क्लास!!
युंगफ्राऊयोख राहिले आहे अजुन, पण एक संपुर्ण दिवस क्लाईनं शाईडेग च्या जवळ्पास घालवला असल्याने पुन्हा सगळ्या आठवणी ताज्या झाल्या.

त्या शिखराच्या नावामागची एक दंतकथा अशी की युंगफ्राउ, म्योंश आणि आयगर, ही ती तीन शिखरे. आयगरचा शब्दशः अर्थ Ogre (मराठी?), म्योंश म्हणजे monk अथवा साधू/भिक्खू आणि युंगफ्राउ म्हणजे लेखात म्हटल्याप्रमाणे तरुणी. Ogre पासून तरुणीला वाचविणारा असा भिक्खू या दोन्हीमध्ये उभा आहे. आणि त्या मुख्य शिखराकडे नेणारा घाट म्हणुन तो युंगफ्राऊयोख.

आम्ही गेलो तेव्हा हे हॉटेल आयगर टेरास बंद होतं. ते फोटो तुमच्या लेखातुन बघता आले. एका माहितीपटात त्याबद्दल ऐकले होते की जेव्हा अगदी सुरुवातीच्या काळात लोक आयगर नॉर्डवांड वर चढाई करायचे, तेव्हा बरेचसे प्रेक्षक दुर्बिणी घेऊन या हॉटेल मधुन ते बघायचे. आणि चढाई करणारे लोक पण तिथेच राहायचे.

पुभाप्र.

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Jul 2015 - 2:07 pm | डॉ सुहास म्हात्रे

दंतकथेसाठी धन्यवाद ! पण युंगफ्राऊ या नावाची उत्पत्ती कळली नाही.

नावाप्रमाणेच, त्याच्या खोल्यांच्या बाल्कन्यांत बसून वाईन चाखत चाखत आजूबाजूच्या पर्वतशिखरांची, त्यांच्यावरच्या गिर्यारोहकांची आणि आजूबाजूच्या परिसराची टेहेळणी करता यावी अशीच आयगर टेर्रासंची रचना केली आहे. त्याच्या सभोवतालचा परिसर अवर्णनिय आहे.

प्रचंड सुंदर आहे स्विस आल्प्स.

श्रीरंग_जोशी's picture

5 Jul 2015 - 8:50 am | श्रीरंग_जोशी

अहाहा, नेमके वर्णन अन सुंदर फोटोज. शेवटचा (जालावरून साभार असला तरी निवड म्हणून) फोटो तर डोळ्यांचे पारणे फेडणारा आहे.

काय सुंदर आहे सगळं.परत यायचं म्हणजे कठीण अशा ठिकाणाहुन !
रच्याकने:कंपू वाचून अत्यानंद का काय तो जाहला ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Jul 2015 - 2:12 pm | डॉ सुहास म्हात्रे

हिरवळ, बर्फाच्छादित शिखरे, शरदाची चाहूल सांगणारी रंगीत झाडे आणि काटेकोर स्विस पर्यटनव्यवस्था यामुळे तेथून पाय निघणे जरा जडच जाते !

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Jul 2015 - 2:09 pm | डॉ सुहास म्हात्रे

प्रचेतस आणि श्रीरंग_जोशी : धन्यवाद !

पद्मावति's picture

5 Jul 2015 - 2:48 pm | पद्मावति

अतिशय सहज सुंदर वर्णन, नेहमीप्रमाणेच..
फोटोही ही अतिशय सुरेख. पु. भ.प्र. हे वेगळे सांगायला नकोच.

सुखी जीव's picture

6 Jul 2015 - 1:23 pm | सुखी जीव

सुंदर वर्णन .
आठवणी जाग्या झाल्या.
आम्ही Wengen ला ४ दिवस मुक्काम केला होता
म्योंख खिडकीतूनच दिसत असे

मदनबाण's picture

6 Jul 2015 - 3:34 pm | मदनबाण

वाचतोय... :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- रिम झीम रिम झीम... :- 1942 A Love Story

सूड's picture

8 Jul 2015 - 3:43 pm | सूड

सुंदर!!