माया - १
माया -२
सगळ्या घरात एक उदासपणा पसरला होता . ते घर आता केविलवाणं दिसू लागलं . त्या घरातले स्मित गेले . काव्य गेले . बडबड थांबली .राजीव अगोदरच घुम्या . ती भयाण शांतता सावित्री बाईंच्या अंगावर येवू लागली . मध्ये मध्ये येणारा पोरीच्या रडण्याचाच काय तो आवाज .त्या लेकराला बराच वेळ आई ने आपल्याला घेतलं नाही हे जाणवत असावं . राजीवला काहीतरी मनात टोचत होतं. ह्या पोरीचा जन्म झाला आणि चंद्रा आपल्याला , ह्या घराला सोडून गेली असं काहीसं त्याला वाटत होतं . आधीही त्याने पोरीला फार प्रेमाने जवळ घेतलं , तिचे पापे घेतले ,लाड केले असं काही नवतं कारण सगळ्यांना होतात तसं आपल्यालाही पोर झालंय त्यात काय असा अतिशय अरसिक विचार करणारा माणूस तो .चंद्रावरही समरसून कधी प्रेम नाही केलं पण तिच्यामुळे आई खुश होती . आपणहि खुश होतो आणि आता हि पोरगी जन्मली म्हणूनच तिला काही आजार झाला असावा . असं त्याचा समज झाला होता . मध्ये मध्ये चंद्राच्या आठवणीनं सावित्री टिपं गाळायच्या.२० -२५ दिवस झाले होते. राजीव कामाला जावू लागला होता .पण केतकी कडे तो दुर्लक्ष करू लागला होता . जास्त वेळ कामातच राहू लागला . जेवण्यापुरतं , झोपण्यापुरतं यायचा आपला घरी . सावित्रीही सावरल्या होत्या . पोरीचं किरकिर करण कमी झालं होतं . बहुदा ती आईला हळूहळू विसरू लागली होती .
एकदा रात्रीची जेवणं उरकून निजानीज चालू होती . सावित्री केतकीला घेवून बिछान्यावर पडून विचार करत होत्या . मधेच शेजारी झोपलेल्या बाळाकडे बघत होत्या . नेहमीच झोपताना काहीतरी विचार येत राहतात . बिछान्यावर पडलंय आणि पटकन झोप लागलीय असं कधी होत नाही . बराच वेळ गेला . गरम होत होतं म्हणून खोलीची खिडकी उघडीच होती . मंद वारा आत येत होता . पिठूर चांदणं पडलं होतं . खिडकीतून दिसणाऱ्या चन्द्रबिम्बाकडे पाहत त्या विचारात हरवल्या असतानाच आपण नेमक्या कोणत्या चंद्राकडे बघत आहोत असा विचार मनात चमकला .काळजात धस्स झालं . कारण खोलीच्या बाहेर उभी राहून खिडकीतून आत बघणारी चंद्रा त्यांना दिसत होती. ज्या दिवशी ती गेली त्याच दिवशीचं पातळ अंगावर होतं . ते लांबसडक मोकळे सोडलेले वार्यावर उडणारे केस , डोळ्यांच्या खाली थोडी काळी वर्तुळं झालेली . आपल्या गूढ , मोठ्या डोळ्यांनी केतकीकडे एकटक बघत होती .सावित्रीबाई एकदा तिच्याकडे, एकदा केतकीकडे बघू लागल्या. अन त्या हिम्मत करून उठल्या . खिडकी जवळ गेल्या . त्या जवळ पोहचेपर्यंत ती कुठे अदृश्य झाली कुणास ठावूक . सारखा चंद्राबद्दल विचार करत असतो म्हणून आपल्याला भास तर झाला नसेल ? का ती खरच अजून इथंच आहे ? काय इच्छा आहे तिची ? कि कसली चिंता सतावतीये तिला ? त्यांना पिंडाचा प्रसंग आठवला .
दुसर्या दिवशी सावित्री ने राजीवकडे हा विषय काढला . तो आपला कामाला जाण्याच्या गडबडीत होता . ऐकलं न ऐकल्यासारखं करून म्हणाला ,संध्याकाळी आल्यावर बोलू . पण संध्याकाळी त्याने तो विषय काढलाच नाही . मग सावित्रीच जेवण झाल्यावर त्याच्याशी बोलू लागली . आई तू सारखा तिचा विचार करणं सोडून दे . तिला जावून २ महिने होत आले आता . सारखा एकाच गोष्टीचा विचार केला कि तीच गोष्ट नजरेसमोर
दिसायला लागते असं म्हणून तो त्याच्या खोलीत निघून गेला .
मध्ये काही दिवस गेले .एकदा असंच निवांत चहा घेत राजीव काहीतरी वाचत बसला होता . सावित्रीबाईंनी केतकीला खाटेवर झोपवलं . त्यांना काही कामासाठी शेजारच्या घरी जायचं होतं . केतकीवर नीट लक्ष ठेव . असं सांगून त्या गेल्या .राजीव ला कविता म्हणण्याचा आवाज आला .तो चपापला . चंद्रा . त्याला कधी कधी वाचून दाखवायची त्यातलीच हि कविता होती ."मलाही आईसारखे भास व्हायला लागले कि काय " तो मनाशी पुटपुटला . अन पुन्हा वाचण्यात गढला . इकडे थोड्या वेळात केतकी उठली . पालथी पडत पुढे सरकू लागली . तिच्याच लाथांनी शेजारी लावलेली उशी बाजूला सरली गेली होती . राजीव त्याच्यातच मग्न होता . तसही तो तिच्याकडे फार लक्ष देत नसे . इकडे हि पोरगी खाटेच्या टोकाला आली .तिच्या मम म्मम सारख्या उच्चारांनी राजीवचं तिच्याकडे लक्ष गेलं . ती खाटेवरून पडणार तोच दोन हातांनी तिला सावरलं . राजीव डोळे फाडून बघत होता . मोकळे केस सोडलेली , केतकीला दोन हातांवर घेवून उभी असलेली चंद्रा त्याच्याकडे रागाने बघत होती . त्या तपकिरी गूढ डोळ्यांत अंगार फुलला होता .तिच्या श्वासांत सापासारखा फुत्कार होता. राजीव चपापला . आई म्हणतेय ते खरं आहे . आपणच तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं .हि खरंच इथं आहे . विचारातून भानावर आल्यावर त्याला जाणवलं केतकी त्याच्या पायाशी जमिनीवर आहे . आणि चंद्रा ?ती कुठं आहे ? सावित्री आल्यावर राजीव ने तो विषय काढला .
"बघ मी म्हणत होते ना तुला . ती इथंच आहे . काहीतरी करायला पाहिजे ".- सावित्री
"काय करणार ? "
"कोणा मांत्रिकाला बोलवायला पाहिजे . पलीकडच्या शांताबाई ओळखतात म्हणे अश्या एकाला . तेच बोलण्यासाठी त्यांच्याकडे गेले होते "
"काय म्हणाल्या ?"
"काल्या बाबा आहे कोणीतरी .ह्या अमावस्येला पाठवणारेत त्याला आपल्याकडं . त्याचा काय खर्च असेल तो आपल्याला करावा लागेल . "
"ह्म्म्म ".
एवढं बोलून राजीव त्याच्या खोलीत गेला . आणि मग तो सगळा तमाशा झाला होता .
दोघंही भेदरून गेले होते . काय करावं ? काय हवय हिला ? राजीव चा दिनक्रम चालू होता . पण त्याचं कशात लक्ष लागत नवतं . ना कामात . ना खाण्यापिण्यात .चंद्रा सारखी केतकीवर लक्ष ठेवून असते . ती तिच्या आजूबाजूलाच असते . राजीव आता घाबरून का होईना पण केतकीकडे दुर्लक्ष करू शकत नवता . कामावरून घरी आला कि पोरीला बघायचा . तिच्याशी खेळायचा . जवळ घेवून झोपायचा.आपण काय गमवत होतो हे हळू हळू त्याच्या लक्षात यायला लागलं होतं . त्याच्यातला हा बदल सावित्रीला सुखावत होता . पण चंद्राचं काय ? आधी ती केतकीकडे नुसती
बघायची . आता तिला हातात पण घेवू लागलीय . पोरीच्या मायेने तिला बांधून ठेवलंय . तिला मुक्ती मिळाली नाही. नाही नाही . काहीतरी केलंच पाहिजे . ती इथं अशी अडकून राहता कामा नये .
राजीवचं असं कामातून लक्ष उडणं , कुठल्यातरी विचारात असणं त्याच्या ऑफिस मधल्या सहकाऱ्याच्या लक्षात आलं होतं . त्याने चौकशी करायचा प्रयत्न केला . पण राजीव ने आधी सांगितलं नाही .ह्याचा विश्वास बसला नाही आणि खोटं आहे म्हणून आपल्यालाच वेड्यात काढलं तर ? पण अजून खोदून विचारल्यावर त्याने सर्व सांगितलं . सहकारी थोडा वेळ विचार करून म्हणाला ,
"तू सांगतोय त्याच्यावर माझा विश्वास आहे . हे बघ . माझे काका प्रतापराव ह्या असल्या गोष्टींत अनुभवी आहेत अनेक आत्म्यांना त्यांनी मुक्ती दिलीये . तू म्हणशील तर विचारून बघतो त्यांना "
"अरे पण तो प्रयत्न करून झालाय ना "
"हो . पण हे तांत्रिक मांत्रिक नाहीयेत .बरीच वर्षे साधना आहे त्यांची .काही सिद्धी आहेत त्यांच्याकडे. आणि दैवी शक्तीच्या आधारावर ते हे करतात . "
"बरं बघ . लवकर विचार त्यांना . "
प्रतापराव राजीवच्या घरी आले .उंचापुरा देह . पांढरा कुर्ता , धोतर . कपाळाला केशरी टिळा लावलेला . गळ्यात रुद्राक्षांची माळ . प्रसन्न व्यक्तिमत्व .त्यांनी आधी सगळं घर फिरून बघितलं . राजीव आणि सावित्री एकमेकांकडे बघत होते .कदाचित त्यांना प्रश्न पडला असावा , हे भुताखेतांना घालवत असतील का ?
"हम्म . इथं फिरताना मला जाणवलय , ती इथं आहे . कदाचित आत्ता सुधा ती आपल्याकडे बघत असेल." -प्रतापराव
राजीव ने काल्या बाबाच्या वेळेस घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगितला . तसे ते म्हणाले
"काही तांत्रिक आपल्या विद्येचा दुरुपयोग करतात .पण कधी न कधी त्यांना त्याची किंमत चुकवावी लागते .तिला मुक्ती द्यायची सोडून तो काल्या तिला बंदिस्त करून त्याच्या दुष्ट हेतूंसाठी वापरणार होता .पण तो त्यात अपयशी झाला . मी जबरदस्तीने आत्म्यांना जायला सांगत नाही . काहीतरी कारण असतं ज्यामुळे हे लोक पुढे न जाता इथेच घुटमळत राहतात .ते कारण शोधून काढून मुळावरच उपचार करायला हवेत . ना रहेगा बास . ना बजेगी बासुरी . काय ? " असं म्हणत ते हसू लागले
त्यांनी पौर्णिमेचा दिवस ठरवला .काही थोडंफार समान लागत होतं ते राजीवला आणायला सांगितलं . रात्री ११ वाजता प्रतापराव अजून कोणाला तरी सोबत घेवून आले . दोघांनी ग्लासभर पाणी घेतलं अन ते तयारीला लागले . सामानाची मांडामांड केली . सावित्री आणि राजीव तिथेच थोड्या अंतरावर बसले होते . राजीव ने केतकीला मांडीवर घेतलं होतं . त्यांनी सावित्री आणि राजीवला आपल्यासोबत आलेल्या माणसाची ओळख करून दिली . हा माझा शिष्य . ह्याला लहानपणापासून एक अद्भुत वैशिष्ट्य लाभलंय . ज्या आत्म्याला बोलवायचय त्यालामी ह्याच्या शरीरात बोलावतो . आणि मग तो आत्मा ह्याच्याद्वारे माझ्याशी बोलू शकतो . प्रतापरावांनी आणि त्या शिष्याने आपापले कुर्ते काढले . आतलं शरीर भस्माच्या पट्ट्यांनी सजलं होतं . त्यांनी काचेच्या कुपीत आणलेलं मंतरलेलं पाणी घोटभर पिलं . बाकीच्यांनाही दिलं . मग दोघांनी संरक्षण मंत्र म्हणले . त्यांचा शिष्य ध्यानाला बसतात तसा शांत , ताठ बसला होता . प्रतापराव रुद्राक्षांची माळ हातात धरून मंत्र म्हणत होते . १० - १५ मिनटांनी खोलीतलं वातावरण थोडं तापू लागलं . केतकी रडायला लागली . राजीव तिला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला .
प्रतापराव म्हणाले , "चंद्रा , तुला काय हवंय हे आम्हाला जाणून घ्यायचय .तू माझ्या ह्या शिष्याच्या शरीराद्वारे आमच्याशी बोल . "
काही वेळ गेला . प्रतापराव पुन्हा गरजले , "चंद्रा , मला माहित आहे तू आलीयेस . पण असं झुरत राहून काय उपयोग ? आपल्याला तुझी समस्या
सोडवायला हवी . ये . ह्याच्या शरीरात प्रवेश करून मला सांग . "
अन अचानक त्या शिष्याने डोळे उघडले . राजीवकडे बघत तो जरब आवाजात म्हणाला ,
"काय चाललंय हे ? तुम्हाला सांगितलं होतं ना पुन्हा असं होता कामा नये " .
राजीव , सावित्री प्रतापरावांकडे बघू लागले . त्यांनी डोळ्यांच्या इशाऱ्याने दोघांना आश्वस्त केलं .
"काय हवय तुला ?"
"तुम्हाला काय करायचंय ? माझ्याच घरातून मला बाहेर काढण्याचा प्रयत्न करणारे तुम्ही कोण ? "
"तू अजून इथंच का आहेस ? पुढे का गेली नाहीस ? इथंच घुटमळत राहून काय उपयोग होणार आहे ? "
चंद्रा गप्प .
"सांग मला . अशी का झुरत राहिलीयेस ? " - प्रतापराव
"चंद्रा , बोल बाळ . काय इच्छा आहे तुझी ? कसली चिंता लागून राहिलीये ? "- सावित्रीने हिम्मत करून मृदू स्वरात विचारलं
तशी चंद्राहि मृदू झाली . "मला माझ्या पोरीची काळजी लागलीये .मी बघितलंय राजीव ने माझ्याकडं दुर्लक्ष केलं तसं माझ्या मुलीकडंही करतायेत .
पण मी तसं होऊ देणार नाही. "
"पण तो आता खूप बदललाय . केतकीचा खूप लळा लागलाय त्याला . आता तो तिच्याकडे पूर्ण लक्ष देत असतो "
"पण हे असंच राहील हे कशावरून ? "
राजीवला आता गप्प बसवेना . तो काकुळतीने म्हणाला ,
"चंद्रा , मी तुझं मन कधी समजून घेतलं नाही. माझ्याकडून तुझ्याकडे नेहमी दुर्लक्ष झालं . मला माफ कर . पण मी केतकीच्या बाबतीत असं काही करणार नाही . मी तिला बापाची माया पूर्ण देईल .मी तुला वचन देतो . "
त्या शिष्याच्या डोळ्यांना पाण्याच्या धारा लागल्या .
प्रतापरावांनी संधी साधली . "तुझी जागा आता इथं नाहीये . तुला पुढच्या प्रवासाला जायचंय . प्रत्येकालाच वेळ आल्यावर जावं लागतं .तोच नियम आहे . तुलाही त्या नियमाचं पालन करावं लागेल . मुलीच्या मायेत अडकून स्वतःच नुकसान करून घेवू नकोस. जा बाळ . निश्चिंत होवून जा . मी तुला मार्ग दाखवतो ."
शिष्याने केतकीकडे बघितलं . ती खिदळत होती . त्याने डोळे मिटले . ५ मिनटात त्याचं शरीर सैल पडलं अन तो बेशुद्ध पडला . प्रतापरावांनी कुपीतलं पाणी त्याच्या अंगावर शिंपडलं तसा तो जागा झाला . मग ते म्हणाले ,
"ती गेली कायमची . तिच्या पुढच्या प्रवासाला . "
बाहेर पिठूर चांदणं पडलं होतं . पूर्ण चंद्रबिंब चमकत होतं .
प्रतिक्रिया
13 Aug 2015 - 2:39 pm | एक एकटा एकटाच
छान
13 Aug 2015 - 2:39 pm | एक एकटा एकटाच
छान
13 Aug 2015 - 2:41 pm | किसन शिंदे
प्रतापराव = धारपांचे समर्थ??
बाकी कथेची मांडणी आणि वातावरण निर्मिती आवडली. सगळे भाग आत्ताच वाचले.
13 Aug 2015 - 2:42 pm | जेपी
लेखनप्रकार -विरंगुळा>>>
कुणाचा ???
13 Aug 2015 - 2:42 pm | जेपी
लेखनप्रकार -विरंगुळा>>>
कुणाचा ???
13 Aug 2015 - 3:03 pm | तुडतुडी
प्रतापराव = धारपांचे समर्थ??>>
नाही नाही . असं असेल तर योगायोग समजावा . मी धारपांची पुस्तकं वाचत नाही . मला आवडत नाहीत
13 Aug 2015 - 4:07 pm | जडभरत
कथेची मांडणी आणी वातावरण निर्मिती छान जमलीये!
13 Aug 2015 - 8:09 pm | पद्मावति
सुखांत असलेली ही भयगूढ कथा आवडली.
13 Aug 2015 - 8:31 pm | बाबा योगिराज
छान जमलय...
14 Aug 2015 - 8:53 am | अमृत
अजुन कथा वाचयला आवडतील. लिहीत राहा.
14 Aug 2015 - 1:00 pm | तुडतुडी
अजून १ मस्त कथा आहे टाळक्यात . इनोदी ढंगाची भयकथा आहे . पण त्याआधी दुसरी १ कथा लिहाय्चीय . त्याचं इनपुट मिळावं म्हणून वाट बघणं चालू आहे