शरदातला स्वित्झर्लंड : १० : पिलाटस कुल्म

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
25 Jul 2015 - 6:36 pm

===================================================================

शरदातला स्वित्झर्लंड : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२...(समाप्त)

माझे मिपावरचे इतर लेखन...

===================================================================

भल्या पहाटे निघून, प्रथम पिलाटस बघून, नंतर र्‍हाईन धबधब्याला भेट देऊन, संध्याकाळी सात पर्यंत झ्युरीकमधले हॉटेल कसे गाठता येईल हे हातातल्या माहितीपत्रकांवरून खात्रीने ठरवता आले. स्विस पास खिशात असल्याने रेल्वे बुकिंग करणे अथवा केलेले बुकिंग बदलणे असले काहीच सोपस्कार करण्याची जरूरी नव्हती. परत एकदा स्विस पर्यटनचा जयजयकार केला ! हॉटेलच्या स्वागतकक्षात फोन करून पाच वाजता उठवायला सांगून अंथरुणात गडप झालो.

.

ठरल्याप्रमाणे लवकर उठून घाईने सर्व आटपून हॉटेलच्या स्वागतकक्षात आलो. इतक्या लवकर न्याहारीचे रेस्तराँ सुरू होत नाही हे माहीत होतेच, तेव्हा तिला फाटा देऊन पिलाटसवर पोटोबा करायचे ठरवले होते. पण स्वागतकक्षातही कोणीच नव्हते. काउंटरवर एक खोका ठेवला होता आणि त्यावर "सातच्या अगोदर हॉटेल सोडण्यार्‍या पाहुण्यांनी आपल्या खोलीची चावी त्यात टाकून जावे" अशी सूचना चिकटविलेली होती. पर्यटकांवर इतका विश्वास ठेवणार्‍या हॉटेलबद्दल जितके आश्चर्य वाटले तेवढेच "ही व्यवस्था हॉटेलला महागात पडेल" असा व्यवहार न करणार्‍या पर्यटकांबद्दल आदर वाटला ! हॉटेलचे भाडे अगोदरच दिलेले असल्याने व केवळ रात्रीचे आठ तास झोपण्यासाठी हॉटेलमध्ये थांबल्यामुळे माझे काही इतर देणे बाकी नव्हते. किल्ली खोक्यात टाकून स्टेशनचा रस्ता पकडला.

पिलाटस हा लुत्सर्नच्या नजीक असलेल्या आप्ल्सच्या पर्वतराजीतील एक पर्वत आहे. त्याच्यातली टोम्लिसहोर्न (२,१२८ मी) आणि एसेल (२,११९ मी) ही महत्त्वाची शिखरे आहेत. या दोन शिखरांच्या मध्ये असलेल्या सपाट टेकडीला पिलाटस कुल्म असे म्हणतात. तेथे जाण्यासाठी पर्वताच्या एका बाजूने आल्पनाखस्टाट् (Alpnachstad) येथून अतिरिक्त दातेरी रुळाच्या (कॉगव्हिल) रेल्वेचा मार्ग आहे तर विरुद्ध बाजूला क्रीन्स (Kriens) येथून रज्जूमार्ग आहे.

उन्हाळ्यात पिलाटसची Golden Round Trip नावाची सफर करता येते. यात "लुत्सर्न ---> लुत्सर्न सरोवरातून बोटीने आल्पनाखस्टाट् ---> कॉगव्हिल रेल्वेने पिलाटस कुल्म ---> परतताना रज्जूमार्गाने क्रीन्स ---> बसने लुत्सर्न" अशी सफर एकत्र मिळते. इतक्या सकाळी बोट नसल्याने तसेच बोटीच्या सफरीला लागणारा अतिरिक्त वेळ माझ्याकडे नसल्याने मी जलसफरीला काट मारली होती आणि इतर सर्व मार्ग त्याच क्रमाने स्वतःच एकट्याने कारण्याचे ठरवले होते.


पिलाटस कुल्मच्या भेटीचा नकाशा (स्विस पर्यटन पत्रकांवरून साभार)

पहाटेच्या अंधुक प्रकाशात लुत्सर्नवरून रेल्वे पकडून निघालो. मात्र ती रेल्वे जलद निघाली. ती आल्पनाखस्टाट् ला न थांबता पुढे तीन चार स्टेशने जाऊन थांबली. "विनातिकिट प्रवास" या गुन्ह्याला किती स्विस फ्रँक्सचा दंड असतो या विचाराने सकाळच्या स्विस थंडीतही थोडेसे गरमागरम वाटले ! पण दुसर्‍याच क्षणाला, खिशातल्या स्विस पासमुळे ही समस्या टळलेली आहे, म्हणून त्याला प्रेमाने कुरवाळले आणि खुशीत स्वतःशीच हसलो ! स्थानकाचे नाव न बघता तेथे उतरलो आणि विरुद्ध बाजूच्या प्लॅटफॉर्मवर उभा राहिलो. दहा एक मिनिटांत जी गाडी आली ती पकडली आणि आता मात्र बरोबर आल्पनाखस्टाट् ला उतरलो. कॉगव्हिल रेल्वेचे स्टेशन जवळच होते. तेथे जाईपर्यंत फक्त वाया गेलेल्या वेळेचाच काय तो खेद वाटत होता. तेथे पोचलो तर स्टेशन उघडले नव्हते ! पिलाटस कुल्मकडे जाणारी पहिली गाडी आठला असते असे वेळापत्रकावरून कळले. इतका घोळ होऊनही मी तेथे चक्क सव्वासातला पोहोचलो होतो ! तिथले कॉफीशॉपही बंद होते. पंधरा मिनिटे कुडकुडत घालवल्यावर एक एक करत प्रवासी जमा होऊ लागले. पावणेआठला कॉफीशॉप उघडले तेव्हा पहिला नंबर लावून गरम गरम कॉफी घेतली आणि जरा तरतरी आली. पुढच्या पंधरा मिनिटांत डोंगरी खेळ आणि ट्रेकचे खास रंगीबेरंगी पेहराव, बूट आणि उपकरणे असलेल्या लोकांची गर्दी वाढू लागली. नेहमीचे कपडे घातलेला आणि खांद्यावर प्रवासी बॅग असलेला त्या गर्दीतला एकुलता एक मी नक्कीच परग्रहावरला माणूस दिसत असणार. तसा संशय येणार्‍या अनेक नजरा माझ्याकडे रोखल्याही जात होता. काही वेळाने एका सहप्रवाशाशी संवाद सुरू झाला. मग मात्र बर्‍याच जणांबरोबर मैत्रिपूर्ण गप्पा झाल्या आणि नजरांमध्ये आपल्या देशात भटकणार्‍या एका प्रवाशाबद्दलची आपुलकीची भावना आली !

तिकिटाच्या खिडकीजवळ स्विस पास आहे असे सांगितले आणि तो दाखवू लागलो. खिडकीतल्या तरुणीने पासकडे नजरही न टाकता तिकिटात ५०% सवलत देऊन वर एक मैत्रिपूर्ण स्मितहास्य दिले ! थोडीबहुत गडबडीने सुरुवात झाली असली तरी आजची पिलाटसची सहल नीट मार्गाला लागल्याची लक्षणे पाहून खुशीत गाडीत जाऊन बसलो.

ह्या गाडीचा मार्ग जगातला सर्वात जास्त उतरणीचा आहे. प्रवासात अनेकदा तोल सावरत बसताना आपल्याला ते नक्कीच जाणवते. तीव्र उतारामुळे प्रवाश्यांना खूपच तिरके बसायला लागून त्रास होऊ नये यासाठी या गाडीचा डबा कल्पकतेने समान पातळी न ठेवता जिन्यासारखा आहे व जिन्याच्या प्रत्येक पायरीवर प्रवाश्यांना बसायला खुर्च्या असतात. तसेच असे तिरके डबे सामावून घेण्यासाठी रेल्वे थांबेसुद्धा तिरके बांधलेले आहेत (याची कल्पना पुढे येणार्‍या "पिलाटस कुल्मचे विहंगम दर्शन" या चित्रामध्ये दिसणार्‍या पिलाटस कुल्म रेल्वे स्टेशनवरून येईल). या रेल्वेमार्गाच्या तीव्र उताराची आणि डब्याच्या कल्पक बांधणीची कल्पना खालील चित्रावरून येईल...


पिलाटस कॉगव्हिल रेल्वेमार्गाचा तीव्र उतार आणि त्यासाठी कल्पकतेने बनवलेला रेल्वेचा डबा (जालावरून साभार)

.

हा प्रवास आजूबाजूच्या सुंदर हिरवाईमुळे जितका चित्ताकर्षक होतो तेवढाच तो शरदातही बर्फाचा आभास निर्माण करणार्‍या पांढर्‍याशुभ्र चुनखडीच्या खडकांनी बनलेल्या पर्वतराजीमुळे होतो...


कॉगव्हिल रेल्वेने पिलाटस कुल्मकडे ०१

.


कॉगव्हिल रेल्वेने पिलाटस कुल्मकडे ०२

.


कॉगव्हिल रेल्वेने पिलाटस कुल्मकडे ०३

.

रेल्वे आपल्याला एसेल शिखराजवळ असलेल्या पिलाटस कुल्म स्टेशनपर्यंत घेवून जाते. या सपाट टेकडीवर हॉटेल पिलाटस कुल्म आणि हॉटेल बेलव्ह्यु ही दोन हॉटेल्स आहेत. त्यातील १८९० मध्ये बांधलेले पिलाटस कुल्म हे हॉटेल "परंपरागत स्विस वारसास्थळ" म्हणून जाहीर केले गेले आहे. मोक्याच्या जागी असल्यामुळे दोन्ही हॉटेल्सच्या प्रत्येक खोलीतून या मनोहर परिसराचा काही ना काही अनवट नजारा दिसतो. शक्य झाल्यास इथे एक दिवस तरी राहणे कायम आठवणीत राहणारा अनुभव असेल हे नक्की.


पिलाटस कुल्मचे विहंगम दर्शन : तिरक्या रेल्वे डब्याला सामावून घेण्यासाठी रेल्वे थांबाही तिरका बांधलेला दिसत आहे
(जालावरून साभार)

.

गाडीतून उतरल्यावर सर्वप्रथम हॉटेलच्या रेस्तराँमध्ये पोटपूजा आटपली आणि पिलाटस काबीज करायला तयार झालो. पर्यटकांसाठी येथे अनेक चित्ताकर्षक पर्याय आहेत. दोन हॉटेल्सच्या मधल्या प्रशस्त सापटीवरून सर्व परिसराचे विहंगम दर्शन घेता येते. उत्साही पर्यटकांना अजून बर्‍याच ठिकाणांना भेट देण्यासाठी इथे अनेक ट्रेकमार्ग आहेत. काही टोम्लिसहोर्न, एसेल, इत्यादी पर्वतशिखरांवर नेतात, तर काही अनवट नजारे दाखवणार्‍या इतर मोक्याच्या ठिकाणांवर घेऊन जातात. काही मार्ग डोंगरउताराला किंचित आत खोदलेल्या बोगद्यांतून जातात. त्या बोगद्यांना मध्ये मध्ये असलेल्या अनेक खिडक्यांतून आजूबाजूचे दर्शन तर होते आणि त्यांचा शेवट कड्यांच्या अश्या टोकांवर होतो की तेथे पोहोचल्यावर पर्यटकांच्या तोंडून भितीपूर्ण आश्चर्याचा चित्कार बाहेर येतो !

या सर्व मार्गांवर फिरताना दमछाक होत असली तरी आप्ल्सच्या पर्वतराजीच्या आणि दर्‍याखोर्‍यांच्या आश्चर्यकारक आणि मनोहर दर्शनाने तो थकवा दूर होतो...


पिलाटस कुल्मवरून करायच्या ट्रेक्सच्या मार्गांचे रेखाचित्र (स्विस पर्यटन पत्रकांवरून साभार)

कधी आप्ल्सच्या पर्वतराजीतल्या अनेक रांगा आणि त्यांच्यातली हिमशिखरे दिसतात...


पिलाटस कुल्मवरून दिसणारे दृश्य ०१

कधी डोंगरउतारावरची मनोहारी हिरवळ आणि सूचिपर्णी झाडी आपले मन मोहून घेते...


पिलाटस कुल्मवरून दिसणारे दृश्य ०२

कधी नजरेच्या टप्प्यापलीकडे पसरलेल्या पांढर्‍याशुभ्र ढगांनी भरलेल्या दर्‍या दिसतात...


पिलाटस कुल्मवरून दिसणारे दृश्य ०३

कधी आप्ल्स त्याच्या कडेकपार्‍यांचे रौद्र रूप उघड करून दाखवतो...


पिलाटस कुल्मवरून दिसणारे दृश्य ०४

तर कधी हे सगळे नजरेच्या एकाच टप्प्यात एकत्रितपणे दिसते...


पिलाटस कुल्मवरून दिसणारे दृश्य ०५

.

येथे अजून एक खास आकर्षण आहे... टबागन (toboggan). हा मोठ्या आकाराच्या पाण्याच्या पन्हळीसारख्या मार्गाच्या उतारावरून चाके लावलेल्या एका छोट्याश्या पाटावर बसून वेगाने घसरत जाण्याचा धाडसी खेळ आहे. इथला १,३५० मीटर लांब टबागन मार्ग जगातील सर्वात लांब मार्ग समजला जातो...

टबागन (जालावरून साभार)

.

इथल्या Pilatus Suspension Rope Park मध्ये पर्यटक दोरीच्या साहाय्याने खेळल्या जाणार्‍या अनेक धाडसी खेळांचा आनंद घेऊ शकतात...


पिलाटस रोप पार्क (जालावरून साभार)

.

अपुर्‍या वेळामुळे या शेवटच्या दोन पर्यायांचा मला आनंद घेता आला नाही याची रुखरुख मनात ठेवून परतावे लागले. तरीही मूळ प्रवासाच्या आराखड्यात सामील नसलेले एक अनवट ठिकाण पाहिल्याचा आनंदही होत होताच. त्याबद्दल कालच्या सहप्रवाशांना मनातल्या मनात अनेकदा धन्यवाद देऊन झाले होते !

पिलाटस कुल्मवर पोहोण्यासाठी केलेला प्रवास आणि तिथली भटकंती खूप आनंददायक होतीच, पण परतीचा प्रवासही "मी पण काही कमी नाही" असेच सिद्ध करून गेला !

परतीसाठी मी रेल्वेच्या विरुद्ध उतारावर असलेला रज्जूमार्ग निवडला होता हे आधी सांगितले आहेच. पिलाटस कुल्म ते क्रीन्स हा ३० मिनिटांचा रज्जूमार्ग प्रवास झाडीने भरलेल्या डोंगरउतारावरून होतो...


परतीच्या रज्जूमार्गावर ०१

दोन-तीन मिनिटांतच रज्जूमार्ग पिलाटसच्या कडेकपार्‍या मागे सोडून हिरव्या उतारावर येतो आणि भातुकलीच्या खेळातली असल्यासारखी चिमुकली दिसणारी झाडी, हिरवळ, घरे आणि रस्त्यांची नक्षी आपले मन मोहून टाकते...


परतीच्या रज्जूमार्गावर ०२

.

या मार्गावर दोन थांबे आहेत. तिथून पुढचा उरलेला उतार उन्हाळ्यात ट्रेकर्स आणि हिवाळ्यात बर्फाच्या खेळाचे रसिक आपापल्या आवडीचा खेळ खेळत उतरतात. सर्वसामान्य प्रवाशांनाही या थांब्यांवर उतरून काही वेळ आजूबाजूचे सृष्टीसौंदर्य पाहून नंतर पुढचा गोंडोला पकडून परत प्रवास सुरू करता येतो. या दोन्ही थांब्यांवर प्रवाशांच्या सोयीसाठी रेस्तराँ, सुविधागृहे, इ आहेत. त्यामुळे सलग ३० मिनिटांचा असला तरी या प्रवासात बर्‍याचदा तास-दोन तास सहज जाऊ शकतात !

पहिला थांबा फ्र्येकम्युंटेक् इथे आहे. हा थांबा जवळ येत असतानाच त्याच्यापुढच्या दरीत जमलेल्या ढगांच्या सागराचे दर्शन झाले...


परतीच्या रज्जूमार्गावर ०३

या थांब्यावर उतरून आजूबाजूचा परिसर न्याहाळताना तो ढगांचा समुद्र अजून स्पष्ट दिसू लागला होता...


परतीच्या रज्जूमार्गावर ०४

.

यापुढचा, क्रीनसरेक् या दुसर्‍या थांब्यापर्यंतचा, प्रवास उंच सूचिपर्णी वृक्षांच्या टोकदार शेंड्यांच्या गर्दीतून झाला. त्या वृ़क्षराजांच्या डोक्याच्या उंचीवरून, तर कधी त्यांच्यापेक्षा जास्त वर आपले डोके ठेवून तरंगत जाताना एक वेगळीच मजा वाटत होती...


परतीच्या रज्जूमार्गावर ०५

.

क्रीनसरेक् थांबा सोडल्यानंतर मिनीटा-दोन मिनिटांत काही कळण्याच्या आत एका जादुई दुनियेत गेलो... गोंडोलाने एकदम घनदाट ढगात प्रवेश केला आणि दोन मीटर पलिकडचे काहीही दिसेनासे झाले...


परतीच्या रज्जूमार्गावर ०६

मध्ये मध्ये विरुद्ध दिशेने जाणारा गोंडोला बाजूने झपकन वर जाताना पाचएक सेकंदासाठी दिसत होता. ते सोडले तर दहा मिनिटे कोठे चाललो आहे याचा काहीच अंदाज येत नव्हता ! अगम्य अवकाशातून प्रवास करणार्‍या अंतराळविरांना काय वाटत असेल याची सूक्ष्म झलक अनुभवली !...


परतीच्या रज्जूमार्गावर ०७

.

शेवटच्या पाच मिनिटात बर्‍याच खाली उतरल्यावर रज्जूमार्ग एखाद्या चुकार इमारतीवरून जाऊ लागला. धुक्यातही त्या इमारतींची नीटनेटकी आवारे, राखलेली हिरवळ आणि त्यांच्यामधले आखीवरेखीव रस्ते लक्ष वेधून घेत होते...


परतीच्या रज्जूमार्गावर ०८

.


परतीच्या रज्जूमार्गावर ०९

.

मधूनच एका छोट्या वस्तीवरून रज्जूमार्ग गेला आणि धुक्यात गुरफटलेल्या शरदाच्या नक्षीच्या पार्श्वभूमीवर परंपरागत जुन्या शैलीतली घरांचे मनोहर चित्र दिसले...


परतीच्या रज्जूमार्गावर १०

.

शेवटची दोन-तीन मिनिटे रज्जूमार्ग क्रीन्स गावाच्या एका भागावरून जातो. त्या दोन-तीन मिनिटांतही सौंदर्योपासक स्विस स्वभाव अधोरेखीत करणार्‍या घरांची ठळक उदाहरणे दिसलीच ! ही घरे पाहताना शरदाच्या रंगपंचमीचे जास्त कौतुक करावे की त्या रंगकामाला घराच्या आवारातच नाही तर खुद्द घरात आमंत्रण देणार्‍या स्विस लोकांचे जास्त कौतुक करावे असा प्रश्न पडला होता...


परतीच्या रज्जूमार्गावर ११

.

या परतीच्या प्रवासाने मनोहारी पिलाटस अनुभवावर कळस चढवला होता हे नक्की ! अजून वेळ असता तर रज्जूमार्गाने परत वर जायची माझी तयारी होती ! पण, नाईलाजाने लुत्सर्नकडे जाण्यासाठी बस थांब्याकडे निघालो. तेथे पोहोचल्यावर बस सुटायला अजून पाऊण तास आहे असे कळले. मग काय, थांब्याशेजारी एक चारचाकी ढकलगाडीवर चेस्टनट भाजत असलेल्या फेरीवाल्याकडून घेतलेले गरमागरम चेस्टनट चघळत, क्रीन्सच्या गल्ल्यांची छोटी सफर करायला निघालो. चार पावले गेल्यावर, तो फेरीवाला, "एsss चेस्ट्नट एsss... " अशी आरोळी मारेल की काय असे वाटून मागे वळून पाहिले. पण, निराशा झाली, तो फक्त शांतपणे हातातल्या पंख्याने वारा घालत निखारे फुलवत होता !

जेमतेम २५,००० वस्तीच्या या गावाने अजिबात निराशा केली नाही. एखादे स्विस शहर म्हटले म्हणजे त्याचे मुख्य भाग आखिवरेखीव व स्वच्छ असणार हे तर नक्की होतेच...


क्रीन्सचा फेरफटका ०१

.


क्रीन्सचा फेरफटका ०२

पण इथले छोटे गल्लीबोळही एखाद्या समारंभासाठी सजविल्यासारखे स्वच्छ आणि नीटनेटके होते. याच सहलीत युंगफ्राऊयोखला भेटलेल्या स्विस सहप्रवाश्याने म्हटल्याप्रमाणे "शरद ऋतूतही गल्लीतल्या रस्त्यांवर झाडांची पाने पडलेली दिसत नव्हती !"...


क्रीन्सचा फेरफटका ०३

.

प्रेमात पडावे असे शहर ! नाईलाजाने पदयात्रा संपवून बस थांब्यावर परतलो आणि लुत्सर्नकडे जाणारी बस पकडली. सहलीच्या पुढच्या गंतव्याकडे जाणारी रेल्वे लुत्सर्न बानहोफवरून सुटली आणि र्‍हाईनच्या धबधब्याबाबतच्या विचारांची गर्दी मनात सुरू झाली.

.

(क्रमशः :)

===================================================================

शरदातला स्वित्झर्लंड : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२...(समाप्त)

माझे मिपावरचे इतर लेखन...

===================================================================

प्रतिक्रिया

नेहमीसारखीच एक अनोखी प्रवास माला.. सगळे भाग झाले की शेवटचा भाग वा.खु. म्हणुन साठवणार आहे. पहिल्या सगळ्या भागांचा दुवा ही मिळेल आणि जेंव्हा केंव्हा हा प्रवास करु तेंव्हा याचा नक्की खुप उपयोग होणार आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Jul 2015 - 12:02 am | डॉ सुहास म्हात्रे

कोणताही एक भाग मिळाला तरी सर्व मालिका बघता येईल, कारण प्रत्येक लेखाच्या सुरुवातीला आणि शेवटी, मालिकेतल्या इतर सर्व लेखांचे दुवे मी देत असतो.

कसं काय परत येऊ शकलात तुम्ही!वेड लावणारी ठिकाणं एक एक!
धुक्याचा समुद्र खासच आहे!

यशोधरा's picture

26 Jul 2015 - 9:19 am | यशोधरा

सुंदर!

प्रचेतस's picture

26 Jul 2015 - 9:45 am | प्रचेतस

पिलाटस कुल्मबाबत ह्याआधी कधीही ऐकले नव्हते.
अपरिचित असा स्विसही तुमच्या लेखामालेतून नजरेस पडतो आहे त्याबद्दल धन्यवाद.

सुधीर कांदळकर's picture

26 Jul 2015 - 11:52 am | सुधीर कांदळकर

विस्मयकारक सौंदर्य, निसर्गातले आणि लेखनातलेही. प्रत्येक लेखांकात वाटते की यापेक्षा जास्त सुंदर काय असेल? त्याचे उत्तर पुढच्या लेखांकात मिळते.

धन्यवाद.

पद्मावति's picture

26 Jul 2015 - 11:56 pm | पद्मावति

खरंय. प्रत्येक भाग आधीच्या भागाहून अधिकच सुंदर असतो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Jul 2015 - 12:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

अजया, यशोधरा, प्रचेतस आणि सुधीर कांदळकर : अनेक धन्यवाद !

काय ते फोटो आहेत. कोणत्याहि ऋतुमधील स्वीस पाहणं हा काय स्वर्गिय आनंद देउन जात असेल ह्याची पुरेपुर खात्री पटत चाललीये. अप्रतिम लेखमाला डॉक.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Jul 2015 - 11:02 am | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

चौकटराजा's picture

27 Jul 2015 - 10:41 am | चौकटराजा

आपण नकाशात दाखविल्या प्रमाणे पिलाटसचे रेल्वे स्टेशन हे तिरकेच आहे ना ? मी पाहिलेल्या एका व्हिडीओत तेथील प्लॅटफॉर्म वर रेल्वे डबा एखाद्या एअरपोर्ट वरच्या पोर्टेबल जिन्यासारखा उभा असतो. नेहमीच्या रेल डब्यात सर्व एकाच पातळी वर बसतात इथे पुढच्या रांगेतील माणूस कायम जिन्याच्या वरच्या पायरीवरच बसलेला असतो. जगातील सर्वात जास्त चढाचा मार्ग असल्याने अशी सोय करावी लागलेली दिसतेय. बाकी नेहमीप्रमाणेच सर्व फोटो सुरेख आहेत. इंटर लाकेन,
एन्जल्बर्ग व लूत्सर्न ही एकसो एक रमणीय गावे गिर्यारोहकाच्या कोनातून पहायला मिळाल्याने आपले जाहीर अभिनंदन !

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Jul 2015 - 11:14 am | डॉ सुहास म्हात्रे

तुमचे पिलाटस रेल्वेबद्दलचे म्हणणे बरोबर आहे. लिहीण्याच्या गडबडीत तीव्र उतरणीचा उल्लेख केला पण गाडीच्या डब्यासंबंधीचा हा महत्वाचा मुद्दा राहून गेला होता. आता तो मूळ लेखात टाकत आहे. ही गोष्ट ध्यानात आणून दिल्याबद्दल तुम्हाला खास धन्यवाद !

खास तुमच्यासाठी हा त्या गाडीचा प्रवास पुरेसा स्पष्ट करणारा फोटो इथेही टाकत आहे...


(जालावरून साभार)

जुइ's picture

27 Jul 2015 - 10:30 pm | जुइ

काय ते एक एक फोटो निव्वळ अप्रतिम!

"सातच्या अगोदर हॉटेल सोडण्यार्‍या पाहुण्यांनी आपल्या खोलीची चावी त्यात टाकून जावे" अशी सूचना चिकटविलेली होती.

पुन्हा एकदा स्विस पर्यटनाबद्द्ल आदर आणि कौतुक वाटत आहे!

मधुरा देशपांडे's picture

28 Jul 2015 - 1:48 am | मधुरा देशपांडे

ल्युत्सर्न, टिटलिस आणि पिलाटस कुल्म, सगळेच भाग सुंदर झालेत. स्विसमधील ठिकाणांची यादी वाढतेच आहे. :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Jul 2015 - 12:18 am | डॉ सुहास म्हात्रे

जुइ आणि मधुरा देशपांडे : अनेक धन्यवाद !

श्रीरंग_जोशी's picture

5 Aug 2015 - 4:55 am | श्रीरंग_जोशी

नेहमीप्रमाणेच नयनरम्य व विस्मयकारक. अप्रतिम निसर्गसौंदर्याला कल्पकतेची व कष्टांची जोड मिळाल्यावर काय होऊ शकते हे अनुभवण्यासाठी स्वित्झर्लँडला एकदा जायलाच हवे असे ही लेखमालिका वाचून वाटत आहे.

टबागन या प्रकाराचा अनुभव अमेरिकेत घेतला आहे. इथे त्यास अल्पाइन स्लाइड म्हंटले जाते.
तसेच हॉटेल चेकाआऊट व रेंटल कार रिटर्न करताना कामाचे तास सुरु नसल्यास ड्रॉपबॉक्समध्ये किल्ली टाकून चेकआऊट करण्याची पद्धत अमेरिकेतही प्रचलित आहे.