जलाविभाग आणि बांधकाम विभाग असे आम्ही राहत असलेल्या बी.एम.सी. वसाहतीचे दोन भाग होते. माझे वडील जल विभागात होते. ह्या विभागात साहेबासाठी (इंजिनियर) एक भव्य ब्रिटिशकालीन बंगला होता व कर्मचार्यांसाठी दोन चाळी होत्या. एकूण १० कुटुंबे ह्या विभागात होती. बांधकाम विभाग मोठा होता व त्यात २५-३० इंजिनीअर व कर्मचारी होते. जल विभागात कार्यालय व कर्मशाळा आमच्या चाळीला लागूनच होत्या. तानसा व वैतरणा जलाशयातून मुबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भल्या मोठ्या जलवाहिन्यांची देखभाल करणारे कामगार वसाहतीच्या २-३ कि मी. परिघातील आदिवासी पाडे व छोट्या गावातील होते.
संपूर्ण वसाहतीत हाताच्या बोटावर मोजता येतील एव्हढ्याच घरांमध्ये अलार्म (त्याकाळी ह्या घड्याळास आलाराम म्हणायचे) चे घड्याळ होते. परीक्षेच्या काळात सकाळी लवकर उठायचे असल्यास ज्यांच्याकडे अलार्मचे घड्याळ होते त्यांना पहाटेच्या वेळेचा अलार्म लावण्याचे व उठवण्याचे काम दिले जायचे व ते खुशीने केले जायचे. परीक्षा कोणाचीही असो चाळीत तो जिव्हाळ्याचा विषय असे. त्यामुळे असे परोपकार केले जायचे. त्याकाळी असे अलार्मचे घड्याळ कामगारांच्या पाड्यात, गावात असणे अशक्य होते. त्यांचे अलार्म घड्याळ आमच्या वसाहतीत होते.
२ फूट व्यासाचा डफलीच्या आकाराचा लोखंडी जाड पत्र्याचा मोठा टोल (घंटा) जल विभागाच्या कार्यालयाच्या समोर आंब्याच्या झाडाला लटकावलेला होता. आम्ही ह्या आंब्याला त्याच्या चवीमुळे 'आंबटी' आंबा किंवा टोल बांधल्यामुळे 'घंटी' आंबा असे म्हणायचो. बरोबर सकाळी ७ वाजता वॉचमन ७ वेळा जोराने टोल वाजवायचा ज्याचा निनाद जंगलातील शांतता चिरत आजूबाजूच्या पाड्यात, गावात पोहचत असे, हा आवाज ऐकून कामगार कामावर निघण्याच्या तयारीला लागत. ७.३० ला पुन्हा एकदा जोरदार ७ वेळा टोल वाजवला जायचा व पुढे १ मिनीट सलगपणे वाजवला जायचा. जे कामगार रेंगाळत घरातून निघत त्यांच्यासाठी हा अलार्म असायचा, ८ वाजण्यापूर्वी सगळे कामगार वसाहतीच्या गेटवर हजर असायचे.
बरोबर ८ वाजता कार्यालयासमोर ह्या कामगारांची शाळेतल्या मुलांसारखी हजेरी घेतली जायची.ही मोठाली माणसे जेव्हा हजर म्हणायची तेव्हा गंमत वाटायची. हजेरी संपली की हे कामगार बाजूला आडोश्याला बसून बरोबर आणलेली न्याहारी करायला बसत. त्यांच्या हातातील पांढरी शुभ्र तांदळाची किंवा पटणीची भाकरी व त्यावर लालभडक सुकटीची चटणी किंवा तळलेले बोंबील खाताना बघून आमच्या तोंडाला पाणी सुटायचे.
पाण्यावरून मामल्या नावाच्या वॉचमनची गंमत आठवली. हा मामल्या वॉचमन स्वभावाने भोळा ,गरीब व वेंधळा होता. दिसायला अगदी मराठी सिनेमातल्या वसंत शिंदे सारखा. त्याला त्याच्या मापाचा गणवेश व बूट कधीच मिळाले नव्हते, त्यामुळे तो अजुनच विनोदी दिसायचा. त्याला विशेष काम नसायचे. वसाहतीत सतत फेरी मारायची व दर एका तासाने टोल वाजवायचा. असेच एके दिवशी दुपारी.आम्ही मैत्रिणी बागेततील मोगऱ्याची फुले काढून आंब्याच्या पारावर गजरे करायला बसलो होतो. आमच्या चाळीतील लहान मुलांचा बागेत धुडगूस चालू होता. चार वाजता मामल्याने चारचा टोल वाजवला व तेव्हढ्यात ही मुले धावत मामल्याकडे आली. अहो वॉचमन काका तुम्ही चारऐवजी पाच वेळा टोल दिला. साहेबाना कळले तर ओरडतील तुम्हाला. मामल्या घाबरला व म्हणाला, आता मी काय करू? अहो घाबरता कशाला पाणी घ्या आणि पुसून टाका जास्त दिलेला टोल, साहेबांना तुमच्याकडून चूक झाली हे कळणारच नाही, मुलांनी सुचवले व मामल्याने ती सुचना लगेच अमलात आणली. नळावरून ओंजळीत पाणी घेवून आला आणि लागला टोल पुसायला. साहेब ऑफ़िस मधून बाहेर आले, टोल कशाला धुतोयस अशी त्यांनी मामल्याकडे विचारणा केली. मामल्याने खरे कारण सांगितले.हे ऐकून साहेब पोट धरून जोरजोरात हसू लागले. मुलांनाही गंमत वाटली. साहेब त्यांच्या बंगल्याकडे निघाले व मुलाना बोलावून घेतले. साहेब बंगल्यात गेले व थोड्याच वेळात बाहेर आले ते एक रावळगाव चॉकलेटचा डबा घेवून. कोणीही पैसे किंवा खाऊ दिला तर प्रथम आई वडिलांकडे बघायचे, त्यांची संमती मिळाली तरच ते स्वीकारायचे असे संस्कार असल्यामुळे मुले चॉकलेट घ्यायला तयार नव्हती. साहेब हसून म्हणाले, अरे ' मी तुमच्या वडिलाना सांगीन मी दिले म्हणून घ्या, घाबरू नका'. मुलांनी लगेच चॉकलेट घेतले व उड्या मारत आमच्याकडे आले, त्यात माझा धाकटा भाऊही होता. कोणताही खाऊ भावंडांत वाटून खायची सवय असल्याने आम्ही सगळे आपापल्या घरी गेलो व आईला फक्त साहेबांनी चॉकलेट दिले इतकेच सांगितले. भावाच्या मित्रांचा पराक्रम नाही सांगितला .आई म्हणाली, "बाबा ऑफिसातून आल्यावर चॉकालेट खा". ठीक आहे असे म्हणून मी मागच्या दारात गजरे करायला बसले. माझ्या मैत्रिणी 'चिमणीच्या' दातांनी त्यांच्या भावांनी आणलेल्या चॉकलेटचे तुकडे करण्यात मग्न होत्या.
बाबा ५ वाजता घरी आले. आईकडून चॉकलेटबद्दल कळल्यावर बाबांनी भावाला जवळ घेवून विचारले. कशाबद्दल साहेबांनी चॉकलेट वाटले? साहेबाकडे कोणाचा वाढदिवस होता का? भावाने नकारार्थी मान डोलावली. बाबांना वेगळाच संशय आला. बहुतेक आपली मुले तेथे साहेबांच्या मुलाच्या हातातील चॉकलेटकडे आशाळभूतपणे बघत फिरत असतील व साहेबानी कीव येऊन मुलाना चॉकलेट दिले असेल. बाबांनी तसे बोलूनही दाखवले. बाबा शहानिशा करायला थेट साहेबाच्या बंगल्यावर गेले.
साहेबांची होरा खरा ठरला' ते बंगल्याच्या व्हरांड्यात माझ्या बाबांची वाटच बघत होते.त्यांच्याशी बोलून बाबा घरी आले, चेहेरा लालबुंद झाला होता. बाबांनी दरवाजाच्या मागील वेताची छडी काढली. पुढे काय होणार हे माझ्या भावाला माहित होते. चुपचाप त्याने आपल्या विजारीची गुंडी काढली, व बाबांसमोर ओणवा उभा राहिला. दोन सपा सप वेताचे फटके भावाच्या पार्श्वभागावर बसले. रावळगाव न खाताच 'वळ' उमटले ना राव ! एवढ्यावरच वडिलांचे समाधान झाले नाही. ते भावाच्या मित्रांच्या घरी गेले व त्यांच्या वडिलांना सर्व प्रकार सांगितला. आज आमच्या चाळीतील बहुतांश घरातील वेताच्या छड्यांनी मुलांना 'वळ'ण लावायचे काम चोख बजावले होते. साहेब हे सर्व बंगल्यातील व्हरांड्यात बसून गालातल्या गालात हसत बघत होते.
खरं तर अशा शिक्षेने मुलांना वळण लागत असते तर ह्या वेताच्या छड्यांचा वारंवार वापर का करावा लागत होता. मुलांच्या खोड्या कमी का होत नव्हत्या?
क्रमशः
प्रतिक्रिया
16 Jul 2015 - 5:50 pm | जडभरत
मस्तच वर्णन. छान जमलाय!
16 Jul 2015 - 5:50 pm | जडभरत
मस्तच वर्णन. छान जमलाय!
16 Jul 2015 - 5:54 pm | जडभरत
असा का वागला हा बाबा?
16 Jul 2015 - 6:44 pm | उगा काहितरीच
मस्त निवांत वाचावी अशी होतेय मालिका. येऊ द्या पुढचे भाग लवकर !
16 Jul 2015 - 7:44 pm | एस
+१
16 Jul 2015 - 8:04 pm | स्वाती दिनेश
वाचतेय, पुभाप्र..
स्वाती
16 Jul 2015 - 8:53 pm | पद्मावति
खूप छान लिहिलय. ही लेखमालीका फार आवडतेय. लिहीत राहा. पुढल्या भागाची वाट बघतेय.
16 Jul 2015 - 9:28 pm | विवेकपटाईत
छान आवडली
17 Jul 2015 - 2:33 pm | नाखु
"चिमण दात" आताश्या नस्तातच "एक्च पुरेच्या " जमान्यात!!!
19 Jul 2015 - 9:09 am | भिंगरी
आता एकच अपत्य असल्यामुळे शेयर करणे हा प्रकार शहरात नाही राहीला,पण अजूनही खेडोपाडी कुठे मुठे दिसतात 'चिमण दात'
17 Jul 2015 - 2:40 pm | विशाखा पाटील
मस्त!
पटणीची भाकरी म्हणजे कसली?
17 Jul 2015 - 8:38 pm | दिलीप खोत
मस्त
18 Jul 2015 - 4:48 am | जुइ
एका वेगळ्याच जमान्यात घेऊन गेला आहात. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
18 Jul 2015 - 9:29 am | सुबक ठेंगणी
मस्त लेखमाला....चाळी आता हद्दपार झाल्यात त्यामुळे अजूनच जवळचा वाटला लेख.
पटणीची भाकरी म्हंजे गं काय तै?
18 Jul 2015 - 9:42 am | पैसा
अगदी मनाच्या आतल्या कप्प्यातल्या आंबटगोड आठवणी!
18 Jul 2015 - 10:35 am | ऋतुराज चित्रे
पटणी ही तांदळाच्या अनेक जातिंपैकी एक जात आहे. पटणीचा भात हलका असतो. हा तांदूळ भाकरीलाही वापरतात. हा तांदूळ हलक्याप्रतिचा समजला जातो. ह्यावर एक म्हणही आहे.
भात पटणीचे आणि राज्य भटणीचे
अर्थ- पटणीच्या भाताप्रमाणे दळिद्री कारभार.
अर्थ म्हणीपुरता मर्यादीत.
18 Jul 2015 - 10:54 am | भिंगरी
आणि लाल पटणीही असायची तेंव्हा रेशनवर.
ती भाकरीसाठी वापरायचे.(ते तांदूळ लालसर असायचे.
18 Jul 2015 - 10:51 am | खटपट्या
खूप छान.
शिक्षा मात्र जरा जास्तच वाटली..
25 Jul 2015 - 3:37 pm | भिंगरी
त्या काळी अशाच शिक्षा होत असत.
18 Jul 2015 - 3:08 pm | बोका-ए-आझम
लेख छान. पुभाप्र. तो साहेब मात्र जरा सॅडिस्ट वाटला.
18 Jul 2015 - 6:30 pm | कविता१९७८
मस्त , पु. ले. शु.
18 Jul 2015 - 6:55 pm | सानिकास्वप्निल
मस्तं लेख, वाचतेय.
पुभाप्र.
19 Jul 2015 - 7:17 pm | चौथा कोनाडा
मामल्या वॉचमनचा किस्सा भन्नाटच !
त्या वेळचे लोक आता "वळण"वाले संस्कार कसे मिरवत असतील या विचाराने हसु येतेय.
लिहित रहा. pपुढच्या भागाची उत्सुकता वाढलीय.
21 Jul 2015 - 11:39 am | सुधीर कांदळकर
आठवणी.
नाच ग घुमामधील काही भाग आठवला.
धन्यवाद. पुभाप्र