'राहून गेलेलं काही...'
'वेडीच्च आहेस तू
कशाला केलंस बरं
माझ्यासारख्या सडाफटिंगाशी लग्न?
आणि तू हसून म्हणावं
तुम्ही हुशार आहात ना, म्हणून.
हे तुझं वेडेपण समजून घेणं राहूनच गेलं
किनार्यावरल्या रेतीत
तुझा हात हातात घेऊन
पहिल्यांदाच चाललो होतो
असे हरवलो होतो की
कळलंच नव्हतं कधी
तुझ्या पायातलं जोडवं पळवलं होतं लाटांनी
ते परत आणण्याच्या बहाण्यानं
पुन्हा फिरलो होतो दोघं
तसं परत एकदातरी फिरायचं राहूनच गेलं
तसंही गजराबिजरा आणायची
मला कुठली असायला आठवण
आणि राहू द्या, फुलं झाडावरच चांगली दिसतात
हे तुझं नेहमीचं समजूतदार वागणं
पण तुझ्या लांबसडक वेणीतही ती तितकीच छान दिसतात
हे तुला म्हणायचं राहूनच गेलं
आणि तो बघ,
तो सोनचाफा कसा तरारलाय
तुझ्याच हातचा आहे
त्याची अद्याप न आलेली फुलं
तुझ्या ओंजळीत ओतायचं
अन् त्यांचा वास तू छातीत भरून घेणं
पहायचं राहूनच गेलं
आणि मला खात्री आहे,
तू विसरली असशील
एकदा चिडून हात उगारलेला तुझ्यावर
माझ्या अवाढव्य पुरुषी अहंकारातून.
आता वाटतं, एवढाही काही जोरात नव्हता तो
तू मला काढलेला चिमटा
नंतर पाठ वळवून गप्प झालेल्या तुझ्या
गालांवरचे दोन थेंब
प्रेमानं पुसायचं राहूनच गेलं
कधीच बोललो नाही तुला मी
की तुझी काळजी वाटते मला म्हणून
पण तू तरी कधी तसं म्हणालीस
शब्दांनी नाही
पण मौनांनी आणि दुर्लक्षानेच बोलायचो एकमेकांशी
त्या मौनांची भाषांतरे
डोळ्यांनीच व्हायची आपोआप
तुझ्या डोळ्यांत पाहून
ते मौन एकदातरी सोडायचं
राहूनच गेलं नाही?
फार दर्दबिर्दभरं नाहीये आपलं
'मॅरिड लाईफ' का काय म्हणतात ते
तसं रोमँटिकतरी कुठेय म्हणा
अॅरेंज मॅरेज असल्यावर
कुठले आलेत त्यात तसे रोमहर्षित क्षण
पण पहायला आलेलो तेव्हाच तुझ्या प्रेमात पडलो होतो
मग आपलं 'लव्ह मॅरेज' कसं नाही बरं?
हा प्रश्न विचारायचं राहूनच गेलं
अजून एक विचारायचं राहून गेलं
तू पण पडली होतीस ना माझ्या प्रेमात?
तेव्हा?
अन् पाऊस आला की
- ह्याही कवितेत हा आलाच बघ.
- असा कसा आला, तुम्हांला तर अजिब्बात नाही ना आवडत तो?
असा तुझा ठेवणीतला टोमणा मला न चुकता मारणं
मला आवडत नाही भिजायला म्हणून
तूही कोरडं राहणं
पागोळ्यांच्या धारांकडे मुग्धपणे तुझं ते बघत बसणं
मला कागदाची नाव बनवायला तू दरवर्षी शिकवतेस
तेही विसरून जातो मी नित्यनियमाने.
पण त्या होडीत बसून
तुझं मन कुठल्या प्रवासाला जातं निघून
ते शोधायचं राहूनच गेलं
देत आलेत लोक त्याच त्या उपमा
स्त्री-पुरुषाच्या नात्याला
पुरुष म्हणे वटवृक्ष
अन् स्त्री म्हणजे वेल.
कुणीतरी त्यांना सांगायला पाहिजे
वटवृक्ष त्याला लपेटलेल्या त्या वेलीच्याच आधाराने तर आहे उभा
शिकतोय हळूहळू तोही तिच्याकडून लवचिकपणा
नाहीतर केव्हाच कोसळला असता
त्याचा डौलदार भव्यपणा
कालच्याही वादळात
तिचं खंबीर राहणं
तो स्तब्ध होऊन पहातच राहिला होता
याची कबुली देणं राहूनच गेलं
माझं डोकं दुखायला लागलं की
कशी नको म्हणलं तरी हट्टानं देतेस दाबून
दुखतात तुझेही पाय तसे
- तुला काय वाटलं, मला समजणार नाही?
मी देऊ का दाबून म्हटलं तर मात्र नको.
एकदातरी तुला न जुमानता
हळुवारपणे तुझ्या पायांना
मलम लावायचं राहूनच गेलं
आणि अजून काय बरं राहून गेलंय?
हे आठवायलाही
तुझीच मदत लागणार आहे मला
नेहमीप्रमाणेच.
तोपर्यंत एकदा घालतेस का जरा ही कविता तुझ्या नजरेखालून?
पण नको.
मला माहितीये तू काय म्हणशील ते
'हे असं लिहायलाच पाहिजे का?'
अन् शांतपणे मला कागद परत देत,
लागशील आपल्या कामाला.
सये,
लिहायला हवंच होतं ना हे एकदातरी
नाहीतर हेही राहूनच गेलं असतं...'
- एस.
प्रतिक्रिया
29 Jun 2015 - 2:34 pm | विशाल कुलकर्णी
मस्त...
29 Jun 2015 - 2:38 pm | मधुरा देशपांडे
सुंदर!!
29 Jun 2015 - 2:42 pm | पथिक
वा ! अतिशय सुंदर !
कर दिया ना इमोशनल ! :D
29 Jun 2015 - 2:47 pm | पद्मावति
हे फारच मस्तं.....
29 Jun 2015 - 3:02 pm | सावत्या
अप्रतिम!!!
"लिहायला हवंच होतं ना हे एकदातरी
नाहीतर हेही राहूनच गेलं असतं...'"
29 Jun 2015 - 3:09 pm | आतिवास
सुरेख!
29 Jun 2015 - 3:20 pm | ज्ञानोबाचे पैजार
चलो देर आये लेकीन दुरुस्त आये.
खरतर काही काही गोष्टी राहून देण्यातच मोठी गंम्मत असते.
सगळे जर योजनाबध्द आणि परिपूर्ण असेल तर समोरच्या व्यक्तीला ते कंटाळवाणे होउ शकते.
पैजारबुवा,
29 Jun 2015 - 3:30 pm | अत्रुप्त आत्मा
व्वाहव्वा!
29 Jun 2015 - 3:42 pm | नाव आडनाव
मस्त. कविता आवडली :)
29 Jun 2015 - 4:07 pm | पैसा
अतिशय तरल, तलम, सुरेख लिहिलंय!
29 Jun 2015 - 4:14 pm | चुकलामाकला
वाह! अतिशय आवडली !
29 Jun 2015 - 4:31 pm | यशोधरा
_/\_ :)
29 Jun 2015 - 4:51 pm | प्रचेतस
क्या बात है...!
अप्रतिम.
29 Jun 2015 - 4:59 pm | डॉ सुहास म्हात्रे
वाहवा ! सुंदर !!
29 Jun 2015 - 5:07 pm | चाणक्य
मस्त जमलीये कविता.
29 Jun 2015 - 5:18 pm | नाखु
साक्षात दंडवत .......
रा.गे.लेला नाखुस
29 Jun 2015 - 6:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खूपच आवडली कविता.
-दिलीप बिरुटे
29 Jun 2015 - 6:30 pm | सटक
क्या बात है! एकटाकी आहे का?
29 Jun 2015 - 7:27 pm | विवेकपटाईत
अतिशय सुंदर कविता.
29 Jun 2015 - 8:21 pm | एस
धन्यवाद!
पैजारबुवा, ते गाणं आहे ना प्रसिद्ध -
'गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा...'
तसंच काहीसं असतं हे.
सटक, परवा रात्री लिहून काढली. तशीच इथे पोस्ट केलीयं.
29 Jun 2015 - 9:26 pm | सटक
सुंदर!! अशी कविता ती ही एकटाकी!! व्वा!! जियो!
30 Jun 2015 - 10:45 am | रातराणी
वा!टू गुड!
30 Jun 2015 - 11:43 am | शब्दबम्बाळ
सहज सुंदर!
मनाची तरलता अगदी छान उमटली आहे!
30 Jun 2015 - 8:52 pm | एक एकटा एकटाच
Classss!!!!!!!!
1 Jul 2015 - 1:42 am | वॉल्टर व्हाईट
कविता वाचनीय आहे, पुन्हा पुन्हा वाचायला आवडेल.
जशी कविता लिहिली तसेच कवितेतल्या बाकी गोष्टींना किंवा आख्या कवितेलाच बकेट लिस्ट मानुन एकेक पुर्ण करा.
1 Jul 2015 - 3:59 am | स्रुजा
वाह, वाह ! नवर्याकडुन अशा अनेक म्हणलं तर सांगायच्या राहुन गेलेल्या पण तरीही मला कळलेल्या गोष्टी आठवल्या. मला त्यातल्या काही कळल्या आहेत हे पण कविता वाचतानाच जाणवलं :)
1 Jul 2015 - 6:20 am | एस
धन्यवाद वॉल्टर आणि स्रुजा!
स्वतःच्या हृदयाचे ठोके स्टेथोस्कोप लावून स्वतः ऐकावेसे वाटावेत असे क्षण फार दुर्मिळ असतात. मग तसा माहौल, तो समाँ जमून आला की ते ठोके कागदावर उतरतात ते कधी कुंचल्यातून नाहीतर लेखणीतून. ते जसे येतात तसेच झरझर उतरतात आणि तयार होते एक तरल, सूचक चित्रण. त्यातल्या न भरलेल्या, न रंगवलेल्या अपूर्ण जागा ह्या जास्त महत्त्वाच्या, बोलक्या असतात. आणि एकदा ते रंग, ती शाई वाळली आणि स्टेथोस्कोप काढून व्यवहारी जगाचा सदरा चढवला की मग त्या अभिव्यक्तीला तिथेच, तसेच सोडून देणेच इष्ट असते.
पाहूया. परत तशी ती रात्र फिरून आली तर अजून भरेन रंग किंवा अजून एखादे रेखाटन.
आणि हो, बकेट लिष्टात नेमके काय काय आयटम भरायचे राहून गेलेत हे आठवायला बायकोला शरण गेल्याशिवाय गत्यंतर नाही. मग त्यासाठी ती बकेटलिष्ट हिला आधी दाखवायला लागेल. मग ती शांतपणे आधी एक करुणार्द्र आणि मग एक तुच्छ असा कटाक्ष टाकेन अन् म्हणेल, "काल वाणसामानाची लिष्ट करायला बसला होता ना, ती आधी पूर्ण करा. मग बघू या यादीचं." :-D
1 Jul 2015 - 6:35 am | कवितानागेश
खूपच आवडले.... :)
2 Jul 2015 - 3:54 am | नेत्रेश
आवडली!
2 Jul 2015 - 3:54 am | नेत्रेश
आवडली!
2 Jul 2015 - 6:29 am | सस्नेह
हळव्या तरल भावना पोचल्या.
रच्याकने रोखठोक अन रांगड्या मराठीतल्या शब्दातून अशा अभिव्यक्ती दुर्मिळ ! तो मिका एक तसलाच +)
2 Jul 2015 - 7:15 am | श्रीकृष्ण सामंत
कविता आवडली
2 Jul 2015 - 8:52 am | खेडूत
वाह!
2 Jul 2015 - 9:22 am | प्यारे१
Swaps भौ कविता भारीए!
तिकडे डॉक्टर गद्यात् आणि तुम्ही पद्यात् वाचकांच्या काळजाला हात घालू रहायले ना भौ.
2 Jul 2015 - 5:39 pm | एस
काय नाय वो, त्ये काळीज चाचपडून र्हायलो सोताचं उगीच जरा.
2 Jul 2015 - 9:36 am | अमितसांगली
खुप आवडली....
2 Jul 2015 - 12:18 pm | क्रेझी
फारच सुंदर आहे कविता :) ... शब्दांमधे व्यक्त करणं तेंव्हाच जमू शकतं जेंव्हा मन इतकं संवेदनशीलरित्या सगळं टिपून घेतं...
2 Jul 2015 - 12:30 pm | प्रमोद देर्देकर
पण त्या होडीत बसून
तुझं मन कुठल्या प्रवासाला जातं निघून
वॉव क्या बात! मस्त आवडलं.
2 Jul 2015 - 6:08 pm | सूड
अतिशय सुंदर!! वाचनखूण साठवून ठेवलीये.
2 Jul 2015 - 9:04 pm | सव्यसाची
खूपच आवडली. :)
2 Jul 2015 - 9:11 pm | अरवीन्द नरहर जोशि.
फारच सुंदर आणि सत्य आहे.
3 Jul 2015 - 12:31 pm | मदनबाण
केवळ अप्रतिम ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- حلا الترك و مشاعل بنيتي الحبوبة
3 Jul 2015 - 12:45 pm | खटपट्या
खूप तरल आणि हळूवार...
3 Jul 2015 - 1:35 pm | भुमी
..निव्वळ अप्रतिम... खुप सुंदर कविता...
3 Sep 2016 - 9:04 am | रेवती
सुरेख कविता.
3 Sep 2016 - 9:42 am | झेन
एकदम वरिजनल कविता. डायरेक्ट ह्र्द्यापासून अन् ते जिच्यावर लिहिली तिला न दाखवण अजूनच रोम्यांटिक. जिओ एस भावू जिओ.
3 Sep 2016 - 9:42 am | नंदन
कविता आवडली.
बोरकरांच्या एका कवितेतल्या या दोन ओळींची किंचित आठवण झाली:
3 Sep 2016 - 10:34 am | रातराणी
कितीही वेळा वाचली तरी तेवढीच टोचनारी जीवघेणी कविता.
3 Sep 2016 - 10:50 am | अमरप्रेम
छोट्या छोट्या गोष्टींनी जीवनात मोठा आधार दिलेला असतो.
खूपच सुंदर !!!
3 Sep 2016 - 11:00 am | सिरुसेरि
अप्रतिम कविता
3 Sep 2016 - 11:58 am | नीलमोहर
प्रेमावर विश्वास नसलेल्या माणसाचीही प्रेमात पडायची इच्छा होईल इतके सुंदर लिहिलेय,
'वटवृक्ष त्याला लपेटलेल्या त्या वेलीच्याच आधाराने तर आहे उभा
शिकतोय हळूहळू तोही तिच्याकडून लवचिकपणा'
- हे तर खासच..
3 Sep 2016 - 12:02 pm | कैलासवासी सोन्याबापु
अब्बा!!! इने तो सब्बीच कामा कर लेते यारों!! क्या बात हैगी उस्ताद! मान गये तुमकू
_________/\_____________
3 Sep 2016 - 3:06 pm | महासंग्राम
देवा कैच्या कै भारी झालीये कविता
'वटवृक्ष त्याला लपेटलेल्या त्या वेलीच्याच आधाराने तर आहे उभा
शिकतोय हळूहळू तोही तिच्याकडून लवचिकपणा
हे अगदी जबरदस्त.
3 Sep 2016 - 4:48 pm | अभिजीत अवलिया
सुंदर !!
3 Sep 2016 - 5:17 pm | खेडूत
अतिशय सुंदर कविता एस!
(त्यावेळी कशी मिसली काय माहीत.)
3 Sep 2016 - 6:31 pm | जव्हेरगंज
वाहवा!!!
3 Sep 2016 - 6:39 pm | अभ्या..
मस्तच हो एसमास्टर.
आवडली कविता
3 Sep 2016 - 7:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आणि तितकीच आवडली. थँक्स.
-दिलीप बिरुटे
4 Sep 2016 - 11:56 pm | पद्मावति
+१
3 Sep 2016 - 11:17 pm | रुपी
इतकं सुंदर असूनही
हे वाचायचं राहूनच गेलं..
फारच छान :)
3 Sep 2016 - 11:26 pm | मुक्त
कविता आवडली.
वेलीच्या आधाराने वड उभा आहे हे काही समजले नाही.
3 Sep 2016 - 11:26 pm | मुक्त
कविता आवडली.
वेलीच्या आधाराने वड उभा आहे हे काही समजले नाही.
4 Sep 2016 - 11:50 am | मिसळलेला काव्यप्रेमी
एसभौ, हे वाचलं नव्ह्त.. फारच सुंदर..
4 Sep 2016 - 10:21 pm | एस
सर्व वाचक व प्रतिसादकांचा आभारी आहे. खफवरही कविता आवडल्याचे कळवणाऱ्यांनाही धन्यवाद! :-)
5 Sep 2016 - 12:13 am | अलका सुहास जोशी
बेेहतरीन!