हिमालय. त्याचं वेड लागतं.
नशीबाची साथ असेल तर नेहमीचं चाकोरीबद्ध आयुष्य जगताना कधीतरी तुम्हांला हिमालयाच्या परिसरात चलण्याची संधी मिळते. ट्रेकसाठी. सोबत कोणी असेल की नाही, आपल्याला जमेल की नाही, सुट्ट्या मिळतील की नाही, बाकी घरी आपण नसताना काही अडचण तर होणार नाही, हे आणि असे अनंत व्यर्थ प्रश्न मनात उभे राहतात. खरं तर कोणाचंच काहीच अडत नसतं, पण तरीही हिमालयापेक्षाही अडचणींचे पहाड पार करुन जाणं कठीण वाटायला लागतं.. तरीही अखेरीला सर्व काही जमून येतं आणि हिमालयाचं प्रथम दर्शन होतं! आणि मग हिमालयाचं वेड लागतं.
हिमालय. भव्य हा शब्दही खुजा वाटेल, असं त्याचं रुपडं. जणू काही एखादा भव्य दिव्य ध्यानस्थ पुराण पुरुष. एकदा हिमालयाच्या वाटा चालल्या की तिथून मन काढून घेणं महाकठीण.
कधी खळाळत वाहणारे झरे, कधी घनगंभीर नाद करत वाहणारे जलप्रपात, ऐसपैस पसरलेली हिरवीगार पठारं, त्यांचं सौंदर्य वाढवणारी रानफुलं, एकाच वेळी मनात धडकी भरवणारे आणि त्याचबरोबर रौद्र रुपाची भुरळ घालणारे करकरीत कडे आणि पहाड. घनदाट जंगलं. खोल दर्या. कधी मैलोगणती केवळ मोठमोठ्या पत्थरांचे मार्ग. झुळझुळणार्या झुळूका, सोसाटणारा बोचरा वारा, हिमवादळं. सणाणणारा पाऊस! सोनेरी पहाटवेळा, अंगार ओकणार्या दुपारवेळा. हळूहळू सभोवताल शांतवत येणार्या आणि आसमंतावर आपल्या स्निग्ध, चंदेरी प्रकाशाची चादर ओढणार्या रात्री. आकाशगंगेचं दर्शन. तुटणारे तारे. पहाडाच्या टोकावर जाऊन जरासा हात उंचावला, तर हाताला लागेल असा भला मोठा चंद्र. आभाळाच्या भाळावरचा चंदेरी टिळा.. इतकं पुरेसं नाही म्हणून ह्या सार्याला व्यापून उरणारी आणि तरीही अजूनही थोडी उरणारी प्रगाढ शांतता. अनेकविध रुपं दाखवत हिमालय चकित करुन सोडत राहतो. घेत असलेला अनुभव अजब वाटावा, तोवर पुढचा अनुभव अर्तक्य वाटत राहतो. हिमालयाची वाट चालता, चालता हळूहळू पण सातत्याने अंतर्मन हे सारं सारं टिपत जातं आणि सभोवतालच्या भव्यतेच्या जाणीवेने विनम्र बनत जातं. थोडसं दबतं, क्वचित घाबरतंही. स्वतःच्या नगण्यतेची जाणीव होते. हिमालयाला शरण जाण्याखेरीज पर्याय नसतो. एका कोणत्या तरी क्षणी हिमालयाशी आपली नाळ जुळते. खूण पटते. हिमालय त्याच्या भव्य दिव्य, क्वचित विक्राळ रुपासकटही आश्वासक भासू लागतो. आपलासा वाटतो. ह्याचसाठी तर सगळा अट्टाहास केलेला असतो! अजून काय हवं?
त्याच्या सान्निध्यात काही दिवस फार फार सुखात जातात. कसल्याही चिंता आठवत नाहीत, भेडसावत नाहीत. आनंदडोह भरुन वाहतो. तुम्हीं हो बंधू, सखा तुम्हीं हो... शब्द सरतात. सगळं नुसतं पहायचं आणि अनुभवायचं. बस्स!
आणि कधीतरी हे आनंदपर्वही संपुष्टात येतं. नेहमीच्या चाकोरीत परतायचा दिवस समोर येऊन वाकुल्या दाखवतो. नको, नको वाटतं. इलाज नसतो. डोळे पाणावल्याशिवाय रहात नाहीत. सुरु असलेल्या आनंदपर्वातून एकदम धाडकन फेकून दिल्यासारखं वाटतं! भिरभिरलेली अवस्था असताना कधीतरी लक्षात येतं की हिमालय कधीचाच मनात वस्तीला आलेला असतो. हिमालयापासून दूर जाण्याची भीती आता इतकी भेडसावत नाही. नेहमीच्या रुक्ष जगात परतण्याचा त्रास जरासा कमी होतो. कळतं, हे परतणं तात्पुरतं आहे, पुढल्या भेटीचा योग येईतोवरच. हिमालय नक्कीच पुन्हा साद देणार असतो. साद ऐकू आली की पुन्हा एकदा नगाधिराजाच्या दर्शनाची तीच बेचैनी उरी घेऊन ह्या पंढरीची वाट चालू लागायची.. अजून काय....
“There is no such sense of solitude as that which we experience upon the silent and vast elevations of great mountains. Lifted high above the level of human sounds and habitations, among the wild expanses and colossal features of Nature, we are thrilled in our loneliness with a strange fear and elation – an ascent above the reach of life's expectations or companionship, and the tremblings of a wild and undefined misgivings.."
*****
सप्टेंबर २०१३ मध्ये मी काश्मीरमध्ये सोनमर्गच्या पुढे हिमालयामध्ये एक ट्रेक केला, त्या दरम्यान काढलेल्या प्रकाशचित्रांपैकी काही.
प्रतिक्रिया
29 Jan 2014 - 9:24 am | म्हैस
सुंदर. विशेष म्हणजे आमच्या ऑफिस च्या PC वर हि सगळी चित्रे दिसली.
29 Jan 2014 - 7:58 pm | यसवायजी
सुपर्ब!!
29 Jan 2014 - 8:55 pm | वडापाव
मस्त वर्णन आणि जबरदस्त फोटो!!!!!!!!!!
29 Jan 2014 - 9:22 pm | कंजूस
गंगामाई हे तुमचे स्वगतही फार आवडले होते .
30 Jan 2014 - 3:57 pm | बिपिन कार्यकर्ते
_/\_ _/\_ _/\_
31 Jan 2014 - 3:03 pm | इशा१२३
सुरेख फोटो आहेत..
19 Jun 2015 - 6:01 pm | बॅटमॅन
पुन्हा एकदा धागा पाहिला, आणि डोळ्यांचे पारणे पुनरेकवार फिटले.
19 Jun 2015 - 6:45 pm | कंजूस
या धाग्यावरचे फोटो किती एमबीचे आहेत?
20 Jun 2015 - 7:27 am | यशोधरा
आता लक्षात नाही, पाहून सांगेन.
20 Jun 2015 - 8:57 am | कंजूस
ओके धन्यवाद!
दुसय्रा। साइटवर तीन एमबीचे असले तरी इकडे ते 640x480 होऊन आले की फारच सामान्य होतात परंतू तुमचे फोटो फारच स्पष्ट आणि सुरेख दिसताहेत.
19 Jun 2015 - 10:21 pm | पद्मावति
तुमची वर्णन करायची शैली आणि फोटो...तारीफ करायला शब्द नाहीत माझ्याजवळ. अप्रतिम......
20 Jun 2015 - 8:30 am | एक एकटा एकटाच
निव्वळ अप्रतिम
सगळच आवडलं
लेख ही आणि फ़ोटो ही.....
तुमच फ्रेम सिलेक्शन मस्तच आहे....
20 Jun 2015 - 9:50 am | उगा काहितरीच
वा ! क्या बात है !! अतिशय सुंदर लेख व त्यापेक्षा सुंदर फोटो .
20 Jun 2015 - 10:11 am | अमितसांगली
फोटो अप्रतिमच...
4 Jul 2015 - 1:20 am | स्रुजा
काय सुरेख धागा आहे यशो. फोटोज चं, लेखाचं, तुझ्या सैनिकांवर्च्या प्रतिसादांचं कशा कशाचं कौतुक करु? पहिल्यांदा वाचला तेंव्हा आवर्जुन प्रतिसाद देत नव्हते. आता हा एवढा चांगला धागा वर काढल्याशिवाय राहवत नाहीये.
21 Jan 2016 - 9:05 pm | मयुरMK
फोटोवरून नजर नाही हटत ... फोटोच सर्व सांगून जातात
22 Jan 2016 - 11:38 am | भावना कल्लोळ
यशो, खरेच हेवा वाटतो ग या बाबतीत मला तुझा. मी कधी त्या हिमालयाचे दर्शन घेईन काय माहित? पण तुझ्यामुळे चित्ररूपाने का होईना ते सौंदर्य पाहायला मिळाले. खूप सुंदर धागा आणि फोटो.
23 Jan 2016 - 3:54 pm | निशाचर
वर्णनही खूप सुंदर!!
23 Jan 2016 - 6:48 pm | कैलासवासी सोन्याबापु
सुंदर प्रकाशचित्रे आहेत!!
हिमालयाबद्दल तुम्ही मांडलेले भाव मला तंतोतंत पोचले! कारण तुम्ही अकादमी मधे वाचले असेलच! हिमालय प्रथम पाहिला की अक्षरशः हरखून जायला होते, पण हळू हळू त्याचा कल्पनेपालिकडला अवाका लक्षात यायला सुरुवात होते. २००३-०७ दरम्यान युथ हॉस्टल एसोसिएशन ऑफ़ इंडिया समवेत कैंप लीडर म्हणून काम केले आहे मी,त्याचे प्रशिक्षण हिमाचल मधे सेवबाग़ मधे झाले होते, त्या ट्रेनिंग ला ट्रेनर ने सांगितलेले वाक्य आजही मनावर कोरलेले आहे त्याने खड्या आवाजात पहिलेच वाक्य उच्चारले होते ते म्हणजे
"Leaders, always remember , mountains are not luxury" ये बात हमेशा के लिए अपने दिल में छाप लो!.
एकंदरित हिमालय भुरळ घालणारा प्रकार आहे फार जास्त एखाद्या क्लियर दिवशी एखाद्या vantage point वर बसल्यास आपला पर्वत त्याच्या पलीकडे अजुन एक मग अजुन एक पलीकडे एक असे किती डोंगर दिसतात देव जाणे! शब्दातीत अनुभव असतो तो!! टाळी लागते संध्याकाळी !
23 Jan 2016 - 6:50 pm | कैलासवासी सोन्याबापु
Mountains are not for luxury
असे वाचण्यात यावे
23 Jan 2016 - 6:57 pm | यशोधरा
अगदी,अगदी! हिमालयात जाऊन विनम्रतेची भावना मनात न आलेली व्यक्ती विरळा!
27 Mar 2017 - 3:43 pm | अनिंद्य
अस्त्युत्तरस्यां दिशि देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराजः ......
तुमच्या शब्दांमध्ये आणि चित्रांमध्ये चढाओढ आहे हो, एकापेक्षा एक सरस !
29 Mar 2017 - 9:13 pm | सही रे सई
धन्यवाद हा धागा वर काढल्याबद्दल.
मन प्रसन्न झालं यातील फोटो पाहून आणि वर्णन वाचून.
यशो, तु नुकतीच जाऊन आलेल्या ट्रीप बद्दल पण लिही याच धाग्याचा दुसरा भाग म्हणून..
29 Mar 2017 - 10:56 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
@यशोताई,
अ प्र ति म आलेत सग़ळेच्या सगळे फोटो.
25 Jun 2024 - 11:10 am | वेल्लाभट
हिमालयात ट्रेक ला जाण्यासाठी वाजवी किम्मत असलेले उत्तम बूट कुठले?
केचुआ
सीटीआर - कोस्टर्स
युनिस्टार
वेन्ब्रेनर
वूडलेंड
की आणि कुठ्ले?
हे अर्थात बजेट पर्याय समजावेत.
25 Jun 2024 - 11:48 am | Bhakti
सुंदर!