होतोय गोंधळ.. नक्की होतोय गोंधळ!
कुणाचा? कुणा कुणाचा?
माझा!
नक्कीच होतोय गोंधळ!!
समोरून अनोळखी येताच मी
आतून भेदरतो, तोंडदेखलं हसतो
अंदाज घेतो
लपवलेल्या बंदुकीने हा घालणार तर नाहि ना गोंधळ!!
समोरून ओळखीचा येताच मी
वरून सावरतो, आतून बावरतो
अंदाज घेतो
याच्याकडच्या एखाद्या बातमीने उडणार नाहि ना गोंधळ!!
समोरच ते बाळ
आतून बाहेरून कीती निश्चिंत आहे
घरातून आक्रोश
याच्या बालपणातच उडाला नसु दे रे देवा एक भयंकर गोंधळ!!
कालच बघितलं होतं तिला झाडाच्या पाठी त्याच्याबरोबर
त्याला डोळ्यांतून वेधणारी ती
आज शोधतेय
जमवतेय आपल्याच हृदयाचे तुकडे, ज्यात मावत नाहिये गोंधळ!
तो बघा ....
"तरी सांगत होते.. येतो मी म्हणावं" ... एक हंबरडा मांडतोय गोंधळ!
एकुलत्या एक मुलाच्या रक्ताळलेल्या ब्रीफकेसमधून डोकावतो आहे गोंधळ!
शवागराबाहेरच्या जिवंत माणसांच्या मेलेल्या डोळ्यात दिसतोय गोंधळ!
"बाबा कधी येणार?" या बोबड्या प्रश्नाला उत्तर देताना उडतोय गोंधळ!
मी संतापलो आहे.....भ्यायलो आहे
उसळलो आहे...ढेपाळलो आहे
रडलो आहे...भडकलो आहे
माझा!... माझा....
नक्कीच होतोय गोंधळ!!
प्रतिक्रिया
29 Nov 2008 - 8:01 pm | भाग्यश्री
:(
तुमच्या भावनांशी सहमत. असेच वाटते आहे..
http://bhagyashreee.blogspot.com/
29 Nov 2008 - 9:01 pm | बिपिन कार्यकर्ते
भीषण वास्तव...
नेमकं मांडलं आहेस.
बिपिन कार्यकर्ते
30 Nov 2008 - 7:43 am | विसोबा खेचर
शवागराबाहेरच्या जिवंत माणसांच्या मेलेल्या डोळ्यात दिसतोय गोंधळ!
"बाबा कधी येणार?" या बोबड्या प्रश्नाला उत्तर देताना उडतोय गोंधळ!
जबरा कविता..!!
30 Nov 2008 - 8:38 am | प्राजु
ऋषी,
तुझी ही कविता मी जेव्हा पहिल्यांदा वाचली होती तेव्हा... माझाही खूप गोंधळ झाला होता. नक्की काय प्रतिक्रिया लिहावी समजत नव्हती.
इतकंच म्हणेन की, योग्य गोंधळ मांडताना शाब्दिक गोंधळ घातला नाहियेस.
खूप आवडली कविता.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
30 Nov 2008 - 1:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
इतकंच म्हणेन की, योग्य गोंधळ मांडताना शाब्दिक गोंधळ घातला नाहियेस.
खूप आवडली कविता.
ऋषी असेच म्हणतो !
-दिलीप बिरुटे
(सध्या लैच गोंधळलेला)
30 Nov 2008 - 1:50 pm | स्वाती दिनेश
तुझ्या कवितेतून कटू वास्तव दिसते आहे रे,
कविता आवडलीच पण अशी परिस्थिती का आली? ह्या प्रश्नाने उडाला आहे गोंधळ.
स्वाती
30 Nov 2008 - 2:08 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
याच मनःस्थितीत आहे मी पण!
:-|
30 Nov 2008 - 6:59 pm | दत्ता काळे
सहमत.
1 Dec 2008 - 12:02 am | लिखाळ
खरंच.. सगळा गोंधळ :(
-- लिखाळ.