मला आवडलेले संगीतकार :- १. मदनमोहन

शशांक कोणो's picture
शशांक कोणो in जनातलं, मनातलं
9 Jun 2015 - 9:16 am

संगीतकार madnmohn

हिंदी चित्रपटसृष्टीला ज्या अनेक संगीतकारांनी सजविले त्या प्रत्येकाची शैली स्वतंत्र होती. मदनमोहन यांचे वेगळेपण अगदी ठळकपणे डोळ्यात भरते. मदनमोहन हे आर्मीमध्ये काही वर्षे सर्विस केल्यामुळे शिस्तप्रिय आणि अचूक कामासाठी प्रसिद्ध होते. गजलसम्राट म्हणून ते ओळखले जायचे. अनेक नितांतसुंदर अजरामर गाणी विशेषत गजल्स त्यांनी आपल्याला दिलीत.

हिंदी चित्रपट गीते आवडत नाहीत असे म्हणणारा विरळाच. जसे मला आंबा आवडत नाही असे म्हणणारा असेल इतकी ही गाणी आपल्या आयुष्याचा अविभाज्य अंग होऊन बसलेली असतात. आणि त्यातून आपल्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंगावर, घटनेवर पूरक गाणी असल्यामुळे ती आपल्याला आवडीची वाटतातच. विशेषता तारुण्यात पदार्पण करताना प्रत्येकजण चित्रपटातील प्रसंगात, गाण्यात स्वताला शोधत असतो. एखादा तरुण मग आपल्या मनातील स्वप्नसुंदरीला साद घालताना कदाचित हे गाणे म्हणेल “ हर तरफ अब यही अफसाने है ! हम तेरी आखोंके दिवाने है !” एखादी अल्लड नवतरुणी आपल्या मनात उठणारी हुरहूर अन भावना या शब्दात व्यक्त करेल “ नगमा और शेर की सौगात किसे पेश करू?” मीनाकुमारीने या गाण्यात जी अदाकारी दाखवली आहे ती निव्वळ अप्रतिम.

आणि जेव्हा दोन प्रेमी एकमेकाला भेटतात तेव्हा त्यांच्या भेटीतून जो स्वर्ग फुलतो त्याचे ही अप्रतिम वर्णन मदनमोहन यांच्या अनेक गाण्यातून दिसून येते. वानगीदाखल माझ्या आवडीची काही गाणी इथे देत आहे. प्रियकराने आपल्या प्रेमाचा स्वीकार केल्यानंतर प्रेयसी त्याला कृतज्ञेतेने म्हणते “ आपकी नजरोने समझा प्यार के काबिल मुझे ! दिल की ए धडकन ठहर जा मिल गई मंझिल मुझे ! “ पहिल्या मिलनाच्या वेळी आतुर पण लज्जित ती त्याला विनवते की “ बैय्या न धरो ओ बलमा , ना करो मोसे रार “ किंवा एखादी प्रेमविव्हळ ललना जिला आता समोर असलेला प्रेमाचा क्षण भरभरून जागून घ्यायचा आहे. कल क्या हो किसे पता ती आपल्या प्रियकराला बाहू पसरून मिठीत येण्यासाठी पुढे सरसावते आणि म्हणते “ लग जा गले के फिर ये हसीन रात हो न हो ! शायद फिर इस जनममें मुलाकात हो न हो ! “ तर कधी दोघेही एखाद्या लॉंग ड्राईव्ह ला निघताना गाडीत “ तुम जो मिल गये हो तो ये लगता है के जहां मिल गया ! “ नक्कीच गुणगुणतात. आणि जर तो पाउस सखा नेमक्या वेळी धावून आलाच तर सोनेपे सुहागा. आणि मग त्या सोनेरी आठवणी उरलेल्या संपूर्ण आयुष्यात सोबत करतात.

आयुष्यात मनाजोगते प्रेम मिळाल्यानंतर ती त्याला एक आश्वासन देते की आयुष्यात तू कुठेही असलास तरी मी तुझ्या सोबत आहे. हे सांगताना ती म्हणत असते “ तू जहा जहा चलेगा मेरा साया साथ होगा ! “ आयुष्यात आपली साथ देणारे आपली कायम काळजी करणारे कुणीतरी आहे ही जाणीवच खूप मोठी असते. आयुष्यातल्या अनेक प्रसंगातून निभावून जाण्याचे बळ ती देते.

आणि जेव्हा आयुष्यात कधी कर्तव्यापोटी त्याला तिच्यापासून दूर व्हावे लागले तर तो म्हणतो “ होके मजबूर मुझे उसने भुलाया होगा ! जहर चुपकेसे दवा जानके खाया होगा ! “ तर कधी गैरसमजुतीमुळे ताटातुटीचे प्रसंग येतात तेव्हा तिला असे वाटते की “ जाना था हमसे दूर बहाने बना लिये ! अब तुमने कितनी दूर ठिकाने बना लिये ! “

कधी ही ताटातूट संपून पुन्हा पेमीजीव एकत्र येत. तर कधी उरलेले आयुष्य एकमेकाविना काढताना तिच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंतून तिच्या जखमा उघड्या पडत जेव्हा ती म्हणत असे “ नैना बरसे रिमझिम रिमझिम ! पिया तोरे आवन की आस ! “ मनात एक वेडी आशा घेऊन ती जगत असते की तो कधीतरी परत येईल. तर तो तिकडे उदास तलतच्या आवाजात हळुवार आपले दु:ख सांडत असतो. “ फिर वही शाम वही गम वही तनहाई है ! दिल को समझाने तेरी याद चली आई है ! “ किंवा एखादा तिच्याविना जगणे व्यर्थ आहे असे म्हणत वेडा होऊन रानोमाळ भटकत असतो अन म्हणतो “ ये दुनिया ये महफिल मेरे काम की नही ! “

अशा तऱ्हेने आयुष्य पुढे सरकत जाते. विरहाची अनेक वर्षे जगताना तिच्यात एक अबोलपणा आलेला असतो. जगाच्या व्यवहाराकडे अलिप्तपणे पहात ती जगत असते. तिच्या आजूबाजूचे तिला बोलते करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि अचानक एक दिवशी ती म्हणते. “उनको ये शिकायत है के हम कुछ नही कहते ! अपनी तो ये आदत है के हम कुछ नही कहते ! “ आयुष्यातले अनेक बरे वाईट प्रसंगातून गेल्यानंतर अनेक भावभावनांचे कडूगोड आठवणींच्या मनात उठणाऱ्या लाटा मनातच दाबून जगणाऱ्या लोकांचे ती प्रतिनिधित्व करते. त्यांना ती आपली वाटते. प्रत्येकाचेच आयुष्य कमीअधिक फरकाने असेच असते. पण अनेकजणांना त्या त्या वेळी व्यक्त होऊन मोकळेपणाने जगणे जमत नाही. अशावेळी मदनमोहनची गाणी मनाला खूप दिलासा देऊन जातात. जगात आपल्यासारखेच अनेक जण आहेत याची जाणीव करून देतात.

कोणतेही गाणे गीतकाराने आपले संपूर्ण कसब लावून लिहिलेले असते. पण त्या गाण्याला योग्य संगीतात सजवून गायकाच्या गळ्यातून परीणामकपणे गाऊन घेण्याचे कसब हे संगीतकाराचे असते. त्यामुळे कोणत्याही गाण्याच्या चांगले किंवा वाईट ठरण्यात मोलाचा वाटा हा संगीतकाराचा असतो.

एक छोटासा किस्सा. पूर्वीच्या संगीतकारात सुध्दा आपसात स्पर्धा होतीच. पण ती फक्त आपापल्या कामाच्या दर्जाबाबत होती. इतर बाबतीत सगळ्यांच्यात खेळीमेळीचे वातावरण असे. अनेक प्रसंगात तर ते एकमेकांना मदत सुध्दा करत. नौशाद आणि मदनमोहन यांच्यात सुध्दा खूप चांगली मैत्री होती. नौशाद साहेब नेहमी मदनजीना म्हणायचे की तू मला “अदालत” ची गाणी दे. बदल्यात मी माझी सगळी गाणी तुला देऊन टाकतो. इतके नौशाद साहेबांना मदनमोहन यांचे काम आवडत असे.

जाता जाता एक साईट मदनमोहन यांना समर्पित आणि संकलित केलेली. मदन मोहन यांच्या चाहत्यांसाठी खूप काही आहे इथे. http://www.madanmohan.in एकदा नक्की भेट द्यावी अशी.

मला आवडलेले संगीतकार :- २ सी रामचंद्र

कलासंगीतलेख

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

9 Jun 2015 - 9:42 am | श्रीरंग_जोशी

मदनमोहन यांची गाणी ऐकतच रहाविशी वाटतात. एखाद्या संगीतकाराच्या मृत्यूनंतर अनेक वर्षांनी त्याच्या पूर्वी न वापरल्या गेलेल्या चालींच्या व्यावसायिक वापराचे उदाहरण म्हणजे वीर झारा या २००४ सालच्या चित्रपटाचे संगीत.

क्यु हवा आज यूं हे गीत मला सर्वाधिक आवडणार्‍या गीतांपैकी एक आहे.

पुढील भागांच्या प्रतिक्षेत.

शशांक कोणो's picture

9 Jun 2015 - 10:57 am | शशांक कोणो

श्रीरंग जोशी
धन्यवाद. खूप थोड्या लोकांना माहित आहे की मदन मोहन यांचे "तुझे क्या सुनाऊ मै दिलरुबा" हे गाणे सज्जाद साहेबांच्या "ये हवा ये रात ये चांदणी" वरूनच आले आहे. तो संपूर्ण किस्सा पुन्हा कधी तरी.

मुक्त विहारि's picture

9 Jun 2015 - 9:49 am | मुक्त विहारि

पुभाप्र...

शशांक कोणो's picture

9 Jun 2015 - 10:58 am | शशांक कोणो

मुक्त विहारि
धन्यवाद.

किसन शिंदे's picture

9 Jun 2015 - 10:22 am | किसन शिंदे

मदनमोहन यांचे वीरझारासाठी घेतलेले संगीत आवडले होते. त्यांच्याबद्दल आणखी विस्तृतपणे वाचायला आवडेल.

शशांक कोणो's picture

9 Jun 2015 - 10:59 am | शशांक कोणो

किसन शिंदे
धन्यवाद. पण शक्यतो इतके ठीक आहे. खूप विस्तुत झाले की वाचणार्याचा पेशन्स संपतो.

विशाल कुलकर्णी's picture

9 Jun 2015 - 10:29 am | विशाल कुलकर्णी

छान लेख. पण थोडक्यात आटोपल्यासारखा वाटला. पुढील लेख जरा विस्तृत येवू द्यात.

लष्कराच्या शिस्तीने माणसे कठोर बनतात, पण मदनमोहनच्या संगीतावर मात्र त्या वातावरणाचा परिणाम नाही होवू शकला. कधीकधी मला प्रश्न पडतो की लताबाईंच्या दैवी आवाजामुळे मदनमोहनच्या चाली खुलायच्या की मदनमोहनच्या हॉंटींग मेलडीमुळे लताबाईंचा आवाज अधीक गुढगंभीर वाटायचा. मी फ़ार विचार करत नाही, माझं मत बिनधास्त मदनमोहनच्या पारड्यात टाकून रिकामा होता. पण हे ही तितकंच सत्य आहे की लताबाई आणि तलतमिया यांच्याशिवाय मदनमोहन नावाचा अध्याय अधूरा आहे. लता आणि तलत हे मदनमोहनच्या संगीताचे अविभाज्य घटक होते जणुकाही. त्यांच्याशिवाय मदनमोहनच्या गाण्यांचा विचारही करवत नाही. आणि या दोघांच्या गाण्यांतून मदनमोहनचं संगीत काढून टाकलं की फ़टक्यात त्यांचं पारडं जमीनीपासून खुप वर जातं...

मदनमोहनचं वैशिष्ठ्य म्हणजे या माणसाला कवितेची खुप चांगली जाण होती. राजा मेहन्दी अली खाँ, राजेन्द्रकृष्ण, मजरुह सुलतानपूरी, कैफ़ीसाब, साहीरमिया अशा शायरांच्या वेदनेने भरलेल्या गझला घेवून त्यांना लताबाई, तलत तर कधी रफ़ीसाहेबांच्या मधाळ स्वरांमध्ये रंगवणे यात मदनजींचा हातखंडा होता.
मदनमोहनने अनेक गाणी दिली. पण माझे आवडते गाणे आहे त्याने रफ़ीसाहेबांकडून गाऊन घेतलेले ..

"तू मेरे सामने है, तेरी जुल्फे है खुली, तेरा आंचल है ढला "

चित्रपट होता १९६४ साली आलेला ’सुहागन’ आणि शब्द होते ’हसरत जयपूरी’ यांचे. रफी आणि मदनमोहनने हिन्दी चित्रपट संगीतात जी क्लासिक गाणी दिली त्यापैकी एक महत्वाचे गाणे म्हणजे "तु मेरे सामने है".

मदनमोहन मुळातच गायकाची प्रकृती, गाण्याची पार्श्वभुमी या सार्या गोष्टी पाहुन गाणे देणारा संगीतकार. "हर तरफ अब यही अफसाने है" या "हिन्दुस्तान कि कसम" मधल्या गाण्यासाठी मन्नाडे ची निवड मदनमोहनने अतिशय विचारपूर्वक केली होती. सैन्यातल्या अधिकार्यासाठी (राजकुमार) मन्नाडेचा सरळसोट आवाज त्याला चपखल वाटला. या पार्श्वभुमीवर 'तू मेरे सामने है' या गाण्याचा विचार केला तर रफीसाहेबांची निवड अगदी चोख ठरते.

'दस्तक' मधलं 'माई री मै कासे कहू" हे देखील असंच अविस्मरणीय गाणं. या गाण्यात मदनमोहनचा आवाज आहे. हकीकत मधलं रफीने गायलेलं "मै ये सोचकर उसके दरसें उठा था" आठवतय का कुणाला? कैफीसाहेबांचे शब्द, मदनमोहनचं संगीत आणि रफीचा दैवी आवाज, त्याला चित्रपटातली युद्धाची पार्श्वभूमी सगळंच अफाट होतं. हकीकतमधली सगळीच गाणी भन्नाट होती. 'होके मजबूर..', 'जरा सी आहट होती है' आणि शेवटचं अंगावर रोमांच उभे करणारं "कर चले हम फिदा" ! _/\_

मदनमोहनच्या गाण्यांवर लिहायचं म्हणलं तर दिवसच्या, दिवस लिहीत बसता येइल. या माणसाने आपल्याला इतकं भरभरून दिलय की बस्स...

किसन शिंदे's picture

9 Jun 2015 - 10:31 am | किसन शिंदे

_/\_

विशाल कुलकर्णी's picture

9 Jun 2015 - 10:38 am | विशाल कुलकर्णी

"तलत + मदनमोहन" हे माझं व्यसन आहे रे भावड्या. :)

क्या बात है विशाल!सुरेख प्रतिसाद.

शशांक कोणो's picture

9 Jun 2015 - 12:50 pm | शशांक कोणो

अजया
:)

शशांक कोणो's picture

9 Jun 2015 - 11:09 am | शशांक कोणो

विशाल कुलकर्णी
सर, मूळ लेखापेक्षा तुमची प्रतिक्रिया जास्त सुंदर आणि मला खूप आवडली. मदन मोहन यांच्याबद्दल इतके लिहिले गेले आहे कि मला त्यांच्या गाण्यांबद्दल लिहिणे जास्त संयुक्तिक वाटले. हाच प्रकार नौशाद, ओपी, एसडी यांच्याबद्दल पण होतो. मी पुढे एसडी यांच्याबद्दल लिहीन तेव्हा तो संपूर्ण वेगळा लेख असेल याची खात्री आहे मला.
मदन मोहन यांच्या गाजलेल्या गाण्यांना आपल्या जीवनाशी सांगड घालून मी थोडेसे वेगळेपण देण्याचा प्रयत्न केला आहे. पुढील भाग सी. रामचंद्र मग अनिल बिश्वास. त्यांच्याबद्दल थोडे लिहिताना असेच त्यांच्या गाण्यांचा उहापोह करायचा प्रयत्न केलाय. मग पुढे सज्जाद हुसेन, गुलाम मोहम्मद, हंसराज बहेल, जमाल सेन, हेमंतकुमार, चित्रगुप्त, जयदेव, एन. दत्ता आणि रवी अशी क्रमवारी आहे.
दर तीन दिवसांनी टाकेन एक एक भाग. नक्की वाचून अभिप्राय द्या. धन्यवाद........

मूळ लेखापेक्षा प्रतिक्रिया भारी! अजून लिहा विकु.

आजची म्हण- नवरदेवापेक्षा करवला श्रेष्ठ!
इस्पष्टवक्ता दमामि

शशांक कोणो's picture

9 Jun 2015 - 12:52 pm | शशांक कोणो

दमामि
मीच स्वत: ते मान्य केलय.

स्रुजा's picture

9 Jun 2015 - 10:54 pm | स्रुजा

क्या बात हे ! मदन मोहन नी इतकं का पछाडलंय हे कोडं आज तुम्ही सोडवलं . हाँटींग मेलडी सुद्धा प्रचंड आवडलं.

धागा पण छान च पण थोडं विस्ताराने लिहा , आम्ही कंटाळणार नाही. उलट आवडेल आम्हाला.

विनोद१८'s picture

11 Jun 2015 - 12:59 am | विनोद१८

.कधीकधी मला प्रश्न पडतो की लताबाईंच्या दैवी आवाजामुळे मदनमोहनच्या चाली खुलायच्या की मदनमोहनच्या हॉंटींग मेलडीमुळे लताबाईंचा आवाज अधीक गुढगंभीर वाटायचा. मी फ़ार विचार करत नाही, माझं मत बिनधास्त मदनमोहनच्या पारड्यात टाकून रिकामा होता. पण हे ही तितकंच सत्य आहे की लताबाई आणि तलतमिया यांच्याशिवाय मदनमोहन नावाचा अध्याय अधूरा आहे. लता आणि तलत हे मदनमोहनच्या संगीताचे अविभाज्य घटक होते जणुकाही. त्यांच्याशिवाय मदनमोहनच्या गाण्यांचा विचारही करवत नाही. आणि या दोघांच्या गाण्यांतून मदनमोहनचं संगीत काढून टाकलं की फ़टक्यात त्यांचं पारडं जमीनीपासून खुप वर जातं...

आपण प्रतिसाद चांगला दिला आहे वरील काही मुद्द्यांबाबत लिहीताना आपण खरोखरच काहीच विचार केलेला दिसत नाही म्हणुन हा माझा प्रतिसाद.

श्री. मदनमोहनजी हे त्याकाळचे 'हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णयुगाचे' एक खंदे मानकरी होते यात वादच नाही, एकापेक्षा एक अप्रतिम अशी शेकडो गाणी देणारे असे संगीतकार याबाबत दुमत नाहीच, परंतु भा. लताबाईंबद्दल लिहिताना त्यांच्यावर अन्याय झाला असे वाटते विषेशता पहिल्या परिच्छेदातील शेवटची ओळ ( आणि या दोघांच्या गाण्यांतून मदनमोहनचं संगीत काढून टाकलं की फ़टक्यात त्यांचं पारडं जमीनीपासून खुप वर जातं...). जी माझ्या वरच्या परिच्छेदात ठळकपणे ती ओळ मी दाखविली आहे. यावर मी काही अधिक विस्ताराने लिहावे असे नाही, आपण जाणकार दिसताय विचार करा म्हणजे मी काय म्हणतोय ते समजुन येइल. लताबाई त्यांच्याही पुर्वीपासुन अनेक संगीतकारांकडे गात होत्या व एकापेक्षा एक हिट गाणी देत होत्या. लताबाईंच्यासाठी म्हणुन विशेष अशा कठिण चाली तेव्हा रचल्या जायच्या कि ज्या केवळ त्या आणि त्याच गाऊ शकत. त्यांच्या गाण्याबददल मी अधिक काही लिहावे असे काही नाही, आपण सगळे अगदी आपल्या अगोदरच्या दोन पिढ्यांपासून त्यांना एकत आलो आहोत. तुमच्या त्या ओळीतुन असे ध्वनीत होते की "जर मदनमोहनांकडे जर लताबाई त्याकाळी गायल्या नसत्या तर त्या इतक्या मोठ्या झाल्याच नसत्या किंवा त्यांना नंतर तशी मोठी गायिका होण्याची संधीच मिळाली नसती किंवा दुसर्‍या शब्दात असे म्हणता येइल की त्या केवळ मदनमोहनांकडे गायल्या म्हणुन आज या उंचीवर पोहोचल्या".

पहा विचार करून मी म्हणतो तसा त्याचा अर्थ निघतो की नाही ते ?? कोणाचा गैरसमज होउ नये म्हणुन हे इतके लिहीले.

मित्रहो's picture

9 Jun 2015 - 11:15 am | मित्रहो

ह्या जोडीने अवीट गोडीची गाणी दिली. आज कित्येक वर्षानी सुद्धा मदनमोहनच्या गाण्याची गोडी कमी होत नाही हे खरोखरच त्या संगीतकाराचे यश आहे. माझ्या आवडीची मदनमोहनची गाणी
बय्या ना धरो
आ लग जा गले
माइ रे मै कासे कहू
आपकी नजरोने समझा
तुम जो मिल गये हो

कितीही लिहीले तरी कमी आहे.

शशांक कोणो's picture

9 Jun 2015 - 1:18 pm | शशांक कोणो

मित्रहो
मदन मोहन यांच्याबद्दल लिहावे तितके थोडेच आहे. आणि माहितीपर लिहावे तर त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी लोकांना माहित आहेतच. तसे अप्रकाशित संगीतकार मी पुढे घेईन चौथ्या भागापासून. सज्जाद हुसेन यांच्यापासून

वाचतो आहे.. पुढील भागांच्या प्रतिक्षेत!!

लिखाणाच्या जोडीला जालावर उपलब्ध असणारे फोटो आणि गाण्यांचे व्हिडीओ दिले तर आणखी मजा येईल.

वर उल्लेखलेली गाणी ऐकत ऐकत लेख वाचताना एक चांगला आणि वेगळा इफेक्ट येईल.

शशांक कोणो's picture

9 Jun 2015 - 1:21 pm | शशांक कोणो

मोदक
तुम्ही म्हणता आहे ते खरे आहे. पण ही गाणी बहुश्रुत आहेत. त्यामुळे लिंक द्यायची गरज वाटली नाही मला. पुढील भागांपासून जिथे आवश्यक आहे तिथे लिंक दिलेली असेलच........

अन्या दातार's picture

9 Jun 2015 - 11:49 am | अन्या दातार

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये जसे काही निवडक प्रसंग उत्सुकता चाळवण्यासाठी म्हणून दाखवतात तसा वाटला लेख. प्रसिद्ध ४ गाण्यांची जंत्री देउन मदनमोहन यांची ओळख करुन दिली म्हणजे झालं का? गाण्यांची, गायकाची वैशिष्ट्ये, माहिती असलीच तर काही ट्रिव्हिया-अ‍ॅनेक्डोट्स इ. लिहा. मुळात हातचं राखून लिहू नका हो शशांकजी.

विशाल, तु मेरे सामने है.. पेक्षा मला मै निगाहे तेरे चेहरेसे जास्त आवडते. जरासी आहट वगैरे मध्ये लताबाईंच्या आवाजाचा अप्रतिम वापर केलाय.

शशांक कोणो's picture

9 Jun 2015 - 1:34 pm | शशांक कोणो

अन्या दातार
ट्रेलर आवडला का ? हे नाही सांगितलत तुम्ही. मुळात मदनमोहन यांच्याबद्दल वेगळी माहिती काढण्यासाठी सोर्सेस खूप कमी आहेत. बाकी अनेक गोष्टी तर सगळ्यांना माहित आहेत. त्यामुळे त्यांची गाजलेली गाणी आपल्या जीवनातील प्रसंगांना जोडण्याचा प्रयत्न केला आहे. पुढे काही अप्रकाशित संगीतकारांबद्दल लिहीन तेव्हा त्यांची माहिती आणि गाण्याच्या लिंक देईनच की. आणखी बरेच काही लिहिता येण्यासारखे आहे प्रत्येक संगीतकाराबद्दल पण तितके वाचायला वाचकांचा पेशन्स पण हवा. त्यामुळे थोडक्यात गोडी असलेली बरी. नाही का?

जरासी आहट आणी वो चुप रहे तो मेरे दिल के दाग जलते हे .. मास्टर पीस मदन मोहन आणि लता दिदींचे.

विशाल कुलकर्णी's picture

10 Jun 2015 - 12:56 pm | विशाल कुलकर्णी

सहमत, 'निगाहे' सुद्धा खासच आहे. खरेतर इथे डावे उजवे करताच येणार नाही. इतकी सुंदर गाणी दिलीयेत मदनमोहनने.

चौकटराजा's picture

9 Jun 2015 - 1:35 pm | चौकटराजा

श्री शशांक, आपण ९० च्या दशकात कॉलेजला होतात मात्र आपला हिंदी चित्रपट संगीतातील रस हा अनिल विश्वास यांच्या कारकीर्दी पर्यंत मागे जातो आहे याबद्द्ल आपले अभिनंदन. तिमीर बरन आर सी बोराल खेमचंद्र प्रकाश, पंकज मलिक, गुलाम हैदर हे संगीतकारही त्या त्या काळात उत्तम काम करून गेलेयत. पण खरे ट्रेंड सेटर म्हणजे शंकर जयकिशन, ओपी नय्यर व आर डी बर्मन. त्या त्या काळात यानी चित्रपट संगीताची जातकुळीच बदलली. आपण संगीतकार हा बेस धरून लेखमालिका लिहिणार आहात .संगीतकार होण्यासाठी माझ्या मते चाली सुचण्याची प्रतिभा लागते. चाली चोरण्याचीही प्रतिभा लागते तसेच भारतीय शास्त्रीय संगीताचा अभ्यास, लोकगीतांचा अभ्यास व वेस्टर्न कलासिक चा अभ्यास जरूर असतो. असे भांडवल ज्याच्याकडे ज्या प्रमाणात होते त्यानी त्या त्या प्रमाणात चित्रपट संगीतात राज्य केले आहे असे आपल्याला आढळेल.
गीत हे शब्द,वाद्यमेळ, आवाज व चाल या चार घटकामुळे बनते. त्यात चाल ही सर्वात श्रेष्ठ. वाद्यमेळ व चाल हे संगीतकाराचे प्रांत. त्यामुळे संगीतकार हा पाया घेतला तर लेखामधे त्या अर्थाने अभ्यास दिसावा. उदा. नय्यर म्हटले की सतार सारंगी डबल बेस हे ( होटोंपे हसी - सावन्की घटा )आलेच. शंकर जय म्हटले की काउंट्टर मेलडी वाद्यमेळ आलाच ( दिलकी गिरह खोल दो).रोशन म्हटले की एक ओळ पुन्हा वेगळ्या चालीने म्हणण्याची शैली आलीच.(जो बात तुझमे है ) सलीलदा व मदन मोहन आले की पास्च्यात्य वायलिन चा ताफा,पिकोलो ई ई आलेच.( आहा रिमझिमके ये प्यारे व तेरी ओंखोंके सिवा ई _) व आण्णा चितळकर आले की लिरिकल चाल आलीच.( मुहब्बत ऐसी धडकन है )
बर्मनदा आलो की चित्रपटातील सिच्वेशनला महत्व आलेच ( उदा होटोमे ऐसी बात ज्वेल थीफ).

मदनमोहनजींचे न जमलेले गाणे शोधूनच काढावे लागेल. लता बाई मदन चे गाणे आहे म्हटल्यावर आपल्या कंठातील सर्वात अमूल्य कोपरा खुला करत असल्या पाहिजेत.मैने रंगली आज चुनरिया, कोन रोकेगा अब प्यारका रास्ता , छायी बरखा बहार ,जिया ले गयो रे मेरा सावरिया, चला है कहा ई गीतांची आठवण त्यांच्या गझल टाईपच्या गाण्यांबरोबर यायलाच हवी. मदनजीनी आशा भोसले. ( सबा से य कह दो, थोडी देरके मेरे हो जा, शोख नजर की बिजलिया ) गीता दत्त ( ए दिल मुझे बात दे ) किशोरकुमार ( जरूरत है, सिमटीसी शरमायीसी ) मना डे ( कौन आया मेरे मनके द्वारे) या इतर गायकांबरोबरही उत्तम काम केलेय. पण मस्त भट्टी जमली ती लता व रफी बरोबर. यानिमिताने मदनजींच्या आठवणीना उजाळा व अगदी लवून कुर्निसात.

शशांक कोणो's picture

9 Jun 2015 - 2:21 pm | शशांक कोणो

चौकटराजा
तुम्हांला ही मनापासून धन्यवाद. तुमचे म्हणणे योग्य आहे. प्रत्येक संगीतकाराची शैली वेगळी. त्यांच्या कामाची पद्धत, त्यांचे स्ट्रोन्ग पोइंट वेगवेगळे. माझा थोडाफार अभ्यास आहे याबद्दल. पण इथे तो अजिबात दाखवून द्यायचा नाही मला. माझा उद्देश वेगळा आहे. त्याबद्दल बोलेन एकदा.

कपिलमुनी's picture

9 Jun 2015 - 3:39 pm | कपिलमुनी

मदनमोहन यांची प्रतिभा अलौकिक होती. मदनमोहन + गीता दत्त हे देखील अफलातून काँबीनेशन आहे.

शशांक कोणो's picture

9 Jun 2015 - 4:23 pm | शशांक कोणो

कपिलमुनी
खर आहे. मदनमोहन यांच्याकडे गायलेल्या प्रत्येकाचे एक वेगळे रूप पाहायला मिळते. मग ती लता असो वा गीता.

कपिलमुनी's picture

9 Jun 2015 - 4:54 pm | कपिलमुनी

प्रत्येक प्रतिसादावर एक उपप्रतिसाद देउ नका ! टेंपोत बशिवला जाईल

तुम्ही मेंशन केलेली गीते शाळा-कॉलेजात असताना बेला के फूल मधे ऐकलेली आठवत आहेत. सुंदर संगीत.

शशांक कोणो's picture

9 Jun 2015 - 4:29 pm | शशांक कोणो

पद्मावति
धन्यवाद.

खेडूत's picture

9 Jun 2015 - 6:18 pm | खेडूत

आवडला.
तरीही …………त्रोटक वाटला. मदनमोहनजीनी इतकं काम करून ठेवलंय की एका लेखात आढावा घेणं कठीण आहे.

''रस्में उल्फत को निभाये तो निभाए कैसे '' हे कसं विसरून चालेल?

लैला मजनू (१९७७) चे काम सुरु असताना त्यांचं निधन झालं त्यामुळे असेल- श्रेयनामावलीत त्यांच्याबरोबर जयदेव यांचं नावही दिसतं. चित्रपट कसाही असला तरी संगीत कायम लक्षात राहील असं आहे . त्यातली ही गाणी त्यांचा ठसा असल्याने वेगळी जाणवतात !
'बरबाद मुहोब्बत की दुवा साथ लिये जा' आणि 'हुस्न हाजीर है' !

खटपट्या's picture

9 Jun 2015 - 6:41 pm | खटपट्या

वा, सुंदर लेख, आणि त्यावर विशाल यांचा सुंदर प्रतिसाद. मी आणि माझी ताई आम्ही लतादीदींचे आंधळे भक्त. लतादीने गायलेली गाणी कोणी लीहीली, संगीतबध्द केलीत याचा आम्ही फारसा विचार करीत नसू. जुन्या फिरवायच्या कॅसेट अजुनही माझ्याकडे आहेत. जाम झाल्या असतील.
या लेखामुळॅ जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

पैसा's picture

9 Jun 2015 - 7:54 pm | पैसा

लेख छान आहे. विशालची प्रतिक्रियाही फार सुरेख आहे! मदनमोहनचं प्रत्येक गाणं खासच असतं. अगदी स्टॉक लोकसंगीताची सिच्युएशन असली तरी मदनमोहन आणि लता त्यात कशी जादू आणायचे हे बघा!

शिव कन्या's picture

9 Jun 2015 - 9:25 pm | शिव कन्या

लेख सुंदर. पण आम्हाला माहित नसणारे अन तुम्हाला माहित असणारे किस्से लिहा.

जुइ's picture

9 Jun 2015 - 11:38 pm | जुइ

मदनमोहन यांचे मला आवडलेले एक गीत म्हणजे:-

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 Jun 2015 - 11:46 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

चांगल्या लेखांवर मिपाकर पडी घेत नाहीत. त्यामुळे तुम्ही अगदी सविस्तर लिहा. चांगलं लिहित आहात.

नाखु's picture

10 Jun 2015 - 11:59 am | नाखु

सहमत
निगुतीने केलेल्या पदार्थाला नावं ठेवणारे नाहीत मिपाकर!!

जयन्त बा शिम्पि's picture

10 Jun 2015 - 12:58 am | जयन्त बा शिम्पि

व्वा ! क्या बात है ? तुमचा लेख सरळ वाचताच आला नाही. कारण जेथे गाण्यांच्या ओळी आल्या , तेथे संपुर्ण गाणेच म्हटले जायचे , त्यानंतरच पुढची ओळ वाचावयाची ! असा क्रम करीत करीत लेख वाचुन काढला.
खुपच सुन्दर . असेच लिखाण येवू द्या.

मदनमोहन यांनी उगा चढ्या उंच आवाजाच्या ताना न घेता अतिशय मधूर संगीत निर्माण केलं. माझ्या मुलीच्या मते दॅट श्रिल व्हॉइस असलेली वुमन मदनमोहन यांच्या संगितात अतिशय सुरबद्ध होउन जाते. सॉफ्ट मनमोहक संगीत. कितीही ऐका, डोक उठत नाही.

'दॅट श्रिल व्हॉइस असलेली वुमन' म्हणजे लता का? __/\__
जुन्या संस्थापकांना भोवळ आली असती हे वाचून :-)

सदस्यनाम's picture

10 Jun 2015 - 1:59 pm | सदस्यनाम

चांगला ले़ख. अभ्यासू मिपाकरांकडून तेव्ढ्याच दर्दी प्रतिक्रीया.
छान. लगे रहो.
अशा जुगलबंदीतच छान छान लेख येतील. शुभेच्छा.

तिमा's picture

10 Jun 2015 - 2:21 pm | तिमा

मदनमोहन यांची अनेक गाणी सर्वांपर्यंत पोचली नाहीत.
१. ना हंसो हमपे जमानेसे
२. सजना लगन तेरी
३. बडी बरबादियाँ लेकर
४.बैरन नींद न आये
५.जा जा रे जा साजना
६. बदलीसे निकला है चाँद
७. वो जो मिलते थे कभी
८. मेरी आँखोंसे कोई
९. खेलोना मेरे दिलसे
१०. वो चुप रहे तो मेरे
११. दिल तुमको उठाके दे दिया
१२.है तेरे साथ मेरी वफा
१३.हम है मताए कुचाओ
१४.तेरे बिन सावन
१५. कदर जाने ना
१६. मुझे याद करनेवाले
१७. तुमसे बिछडके चैन
आणि ते अजरामर
१८. चाँद मद्ध्म हैं आँसमाँ चुप है

आणि अशी अनेक.
बाय द वे, लताला श्रिल आवाजाची म्हणणारे या जगांत आहेत हे वाचून खरंच भोवळ आली.

सिरुसेरि's picture

10 Jun 2015 - 5:05 pm | सिरुसेरि

छान लेख. मदन मोहन , एस डी बर्मन , अनिल विश्वास या परिचित संगीतकारांबद्दल आजपर्यंत बरयाच ठिकाणी लिहुन आले आहे . काही तुलनेने अपरिचित संगीतकारांबद्दल वाचायला मिळाले तर अधिक आवडेल . जसे की - चिक चोकोलेट , विनोद .

प्रदीप's picture

10 Jun 2015 - 6:02 pm | प्रदीप

लेख त्रोटक व वरवरचा वाटला.

प्रथम मदन मोहनच्या मला आवडलेल्या गाण्यांची जंत्री देतो. नंतर माझ्या परीने त्याच्या कारकीर्दीचा आढवा घेण्याच्या प्रयत्न करतो.

१९५१:

अदा: सांवरी सुरत भाई:लता
मदहोशः मेरी याद मे तुम ना आंसू बहाना :तलत

१९५२:

आशियाना: मुख मोड न देना, साजना: लता
आशियाना: तुम चाँद के साथ चले जाना: लता

१९५३:

धूनः बडी बरबादीयाँ लेकर : लता

१९५५:

रेल्वे प्लॅटफॉर्म: चाँद मध्धम है, आसमाँ चूप है: लता
रेल्वे प्लॅटफॉर्म: बस्ती बस्ती, परबत परबत गाता जाये बंजारा: रफी

१९५६:

भाई भाई: कदर जानेना : लता
भाई भाई: ऐ दिल मुझे बता दे :गीता दत
फिफ्टी फिफ्टी: चल दिया दिल तोड के :लता
पॉकेटमारः ये नई नई प्रीत है: लता व रफी

१९५७:

देख कबीरा रोया: कौन आया मेरे मन के द्वारे: मन्ना डे
देख कबीरा रोया: तू प्यार करे या ठुकराये: लता
देख कबीरा रोया: जारे बदरा बैरी जा: लता
गेट वे ऑफ इंडिया: दो घडी वोह जो पास आ बैठे: लता, रफी
गेट वे ऑफ इंडिया: ना हँसो, हम पे जमाने के है ठुकराये हुवे: लता
गेट वे ऑफ इंडिया: सपने मे सजन से दो बातें: लता
समुंदर : चैन नही आये: लता
शेरू: नैनों मे प्यार डोले: लता

१९५८:

अदालतः जा जा रे जा साजना: लता
अदालतः जा जा रे जा साजना: आशा
अदालतः जान था हम से दूरः लता
अदालतः उन को ये शिकायत है: लता
अदालतः यूं हसरतों के दाग़ : लता
अदालतः जमी से हमें आसमाँ परः लता व रफी

१९५९:

बाप बेटे: दिल उनको उठा के दे दिया: लता
बँक मॅनेजरः कदम बहके बहके, जिया धडक धडक जाये: लता
बँक मॅनेजरः सबॉं से ये कह दो: आशा
चाचा झिंदाबादः बैरन नींद न आये: लता
छोटे बाबू: तेरी चमकती आँखो के आगे ये सितारे कुछ भी नही: लता व तलत
दुनिया ना माने: हम चल रहे थे: मुकेश
दुनिया ना माने: हम चल रहे थे: लता
दुनिया ना माने: सजना लगन तेरी सोने न दे: लता
मिनीस्टरः उन आँखों को चैन कहाँ, जिन आँखो के प्रीतम दूर बसे: लता
मोहरः तुम हो साथ रात तो हंसी है: लता
निर्मोही: दुखियारे नैना: लता

[अपूर्ण]

प्रदीप's picture

10 Jun 2015 - 6:22 pm | प्रदीप

१९६०:

बहाना: जारे बदरा बैरी जा: लता
(* वरील जंत्रीत हे गीत चुकून 'देख कबीरा रोया' मधे समाविष्ट झालेले आहे)

१९६१:

संजोगः भूली हुई यादें: मुकेश
संजोगः चला है कहॉं: लता
संजोगः वो भूली दास्ताँ: लता

१९६२:

अनपढः आप की नझरों ने समझा: लता
अनपढः है इसी मे प्यार की आबरू: लता
अनपढः जिया ले गयो, जी मोरा साँवरीया: लता
अनपढः रंग बिरंगी राखी लेकर आयी बहना: लता व कोरस
अनपढः वो देखो जला घर किसी का: लता
मनमौजी: चंदा जा, चंदा जा रे जा: लता
मनमौजी:मै तो तुमसंग नैन मिलाते हार गयी सजना: लता
मनमौजी: मुर्गे ने झूट बोला: कमल माथूर
मनमौजी:जरूरत है, जरूरत है: किशोर कुमार

१९६३:

अकेली मत जईयो: वो जो मिलते थे कभी: लता

१९६४:

आप की परछाईयॉं: अगर मुझ से मोहब्बत है: लता
आप की परछाईयॉं: मै निगाहे, तेरे चेहरे से: रफी
गझलः मेरे मेह्बूब कहीं ऑर मिला कर मुझ से: रफी
गझलः नग्मा और शेर की सौगात किसे पेश करूं: लता
गझलः रंग और नूर की बारात किसे पेश करूं: रफी
हकीकतः खेलो ना, मेरी झुल्फें: लता
हकीकतः जरा सी आहठ होती है: लता
हकीकतः मै ये सोचकर उसके दर से चला था: रफी
हकीकतः कर चले हम फिदा जानो तन साथियों: रफी व कोरस
हकीकतः होके मजबूर मुझे उसने भोलाया होगा: भूपेंद्र, रफी, तलत
जहाँ आरा: फिर वोही शामः तलत
जहाँ आरा:वो चूप रहे तो मेरे दिल के दाग जलते है: लता
पूजा के फूलः मेरी आँखों से कोई नींद लिये जाता है: लता
शराबी: सावन के महिने ने मे: रफी
सुहागनः भीगी चॉंदनी: लता, रफी
सुहागनः इक बात पूछती हूं: लता
सुहागनः तू मेरे सामने है: रफी
वो कौन थी: आप क्यूं रोये: लता
वो कौन थी: लग जा गले: लत
वो कौन थी: छोडकर तेरे प्यार का दामनः लता, महेंद्र कपूर

[अपूर्ण]

प्रदीप's picture

10 Jun 2015 - 7:14 pm | प्रदीप

१९६५:

नया कानूनः जो देखता है कहता है, हसरत खुदा की है: रफी
नीला आकाशः मेरे दिल से आप लिपट गयी: महेंद्र कपूर, लता
नीला आकाशः ना आसमाँ, ना सितारे फरेब देते हैं: लता
रिश्ते नाते: खनक गयो हाय बैरी कंगना: लता
रिश्ते नाते: मुझे याद करने वाले: लता

१९६६:

दुल्हन एक रात की: एक हंसी शाम को: रफी
दुल्हन एक रात की: सपनों मे, अगर मेरे तुम आओ, तो सो जाऊं: लता
मेरा साया: मेरा साया साथ होगा: लता
मेरा साया: नैनों मे बदरा छाए: लता
मेरा साया: झुमका गिरा रे: आशा
नींद हमारी ख्वाब तुम्हारे: कोई शिकवाँ भी नही; लता

१९६७:

जब याद किसी की आती है: तेरे बिन सावन कैसे बिता, तू क्या जाने बालमा: लता
नौनिहाल: तुम्हारी झुल्फ की साये मे: रफी

१९६८:

एक कली मुस्कायी: न तुम बेवफा हो, न हम बेवफा है: लता
एक कली मुस्कायी: प्यार क्या होता है: लता

१९६९:

चिरागः चिराग दिल का जलाओ: रफी
चिराग: तेरे आँखो के सिवा दुनिया में रखा क्या है: रफी
चिराग: तेरे आँखो के सिवा दुनिया में रखा क्या है: लता

१९७०:

दस्तकः बैंयाँ ना धरो: लता
दस्तकः हम है, मताएं कुचाओं बाजार की तरहः लता
हीर रांझा: दो दिल टूटे: लता
हीर रांझा: डोली चढ के हीर ने बैन किये: लता
हीर रांझा: मेरी दुनिया में तुम आये: रफी
हीर रांझा: मिलो न तुम तो, हम घबराये: लता
हीर रांझा: तेरे कूचे मे तेरा दिवाना: रफी
हीर रांझा: ये दुनिया, ये महफिलः रफी
महाराजा: तुम से बिछड के चैन कहाँ हम पायेंगे: लता

१९७२:

बावर्ची: भोर आयी गया अंधियारा: मन्ना डे
बावर्ची: मोरे नैना बहाये नीरः लता

[अपूर्ण]

प्रदीप's picture

10 Jun 2015 - 7:31 pm | प्रदीप

१९७३:

दिल की राहें: आप की बातें करे या: लता
दिल की राहें: रस्मे उल्फत को निभायें : लता
एक मुठ्ठी आसमानः हर कोई चाहता है: मन्ना डे
हस्ते जखमः आज सोचा तो आंसू भर आये: लता
हस्ते जखमः बेताब दिल की तमन्ना यही है: लता
हस्ते जखमः तुम जो मिल गये हो: रफी
हिंदुस्तान की कसमः दुनिया बनाने वाले: लता
हिंदुस्तान की कसमः है तेरे साथ मेरी वफा: लता
हिंदुस्तान की कसमः हर तरफ अब यही अफसाने है: लता
प्रभात: साकिया करीब आ: आशा

१९७५:

मौसमः दिल धूंडता है: भूपिंदर व लता
मौसमः दिल धूंडता है: भूपिंदर
मौसमः रूके रूके से कदम: लता

१९७६:

लैला मजनू: इस रेशमी पाजेब की झनकार की सदके: लता
लैला मजनू: होके मायूस तेरे दर से सवाली न गया: रफी, अझीझ नाझा, शंकर शंभू
लैला मजनू: तेरे दर पे आया हूं: रफी
लैला मजनू: कोई पत्थर से ना मारेमेरे दिवाने को: लता
लैला मजनू: अब अगर हम से खुदाई भी खफा हो जाए: लता, रफी
लैला मजनू: बरबाद मुहब्बत की दुवा साथ लिये जा: रफी

१९७७:

साहिब बहाद्दूरः मुश्किल है जीना : लता

२००४:
वीर झारा: तेरे लिये: लता, रूपकुंवर राठोड
वीर झारा: दो पलः लता, सोनू निगम
वीर झारा: हम तो भी जैसे हैं: लता
वीर झारा: आया तेरे दर पे दिवाना: अहमद हुसैन, मह्मद हुसैन...

[संपूर्ण]

(साल व चित्रपट नक्की ठाऊक नाही):

कैसे कटेगी जिंदगी, तेरे बगैरः रफी
खिले कंवल तेरी काया: लता
मेरे अश्कों का गम न कर ऐ दिलः लता

सस्नेह's picture

10 Jun 2015 - 7:40 pm | सस्नेह

Marvelous collection !!!
Dhanyavaad !

सस्नेह's picture

10 Jun 2015 - 7:40 pm | सस्नेह

Marvelous collection !!!
Dhanyavaad !

गरजू पाटिल.'s picture

10 Jun 2015 - 8:16 pm | गरजू पाटिल.

अख्खा लेख, बरोबर अख्ख्या प्रतिक्रिया सगळ्या॑निच भन्नाट लिहलय॑, विशेष विकु, ज॑त्री.......... मला आवडणारी गाणी
दिल ढु॑ढ्ता है फिर वहि फुरसत के रात दिन.... (मौसम),
आपकी नजरो॑ने समजा प्यार के काबील (अनपढ),
लग जा गले के फिर ये हसी॑ रात हो, (वो कौन थी?)
तु जहा॑ चलेगा मेर साया,.. झुमका गिरा रे (मेरा साया)............. अजुन बरी॑च...
आवडले आहे त्यामुळे अजुन वचायला आवडेल.

प्रदीप's picture

10 Jun 2015 - 8:42 pm | प्रदीप

हिंदी चित्रपटगीतांत मदन मोहनने स्वतःचे आगळे स्थान निर्माण केले ते प्रामुख्याने त्याच्या गझलांच्या अनोख्या पेशकारीमुळे. ह्यातील बहुसंख्य गझला लताने गायिलेल्या आहेत, इतर अनेक रफी व तलत ह्यांनी.

मला त्याच्या हळव्या सुरावटींमुळे तो आवडतोच, पण त्याच्या बाबतीत असेही जाणवते की, त्याचे संगीत एकाच टप्प्य्यावर स्थिर झाले नाही, ते नेहमीच स्वतःच्या शैलीने विकसित होत राहिले. वर्षांनूवर्षे संगीत देऊनही त्याच्या समकालीन काही संगीतकार ठराविक, सांचलेले संगीत देत राहिले. मदनमोहन पुढील वाटा धुंडाळत राहिला. आणि त्या वाटा आमच्यासारख्या सामान्य श्रोत्यांना भुरळ पाडणार्‍या ठरल्या.

त्याच्या सुरूवातीच्या संगीतात माधुर्य वगैरे होते, पण त्यात, तालवाद्याचा-- विशेषतः ढोलकचा थोडा रूटिन वापर होता. संगीतकाराने तालवाद्यांचा उपयोग इतका जोशपूर्ण व नाविन्यपूर्ण करावा, की त्यावर त्याची मोहोर उमटावी. ते तसे वादन त्याच्या संगीताचे एक महत्वाचे बलस्थान(cornerstone) ठरावे- जसे शंकर जयकिशन, ओ. पी. नय्यर, सी. रामचंद्र, लक्ष्मीकांत- प्यारेलाल व आर. डी. ह्यांनी आपापल्या परिने केले. अथवा मग संगीतकाराच्या निर्मीतीत तालाचे स्थान केवळ लय सांभाळणारे, इतपतच रहावे. त्याची बलस्थाने मेलडी, ऑर्केस्ट्रेशन इत्यादी इतरस्त्र रहावीत. वरील जंत्री पहाता आपणांस जाणवावे, की १९५१ ते सुमारे १९५८- ५९ पर्यंत मदन मोहन ढोलकचा वापर करतो ('सांवरी सुरत मन ब्बाई रे पिया','कदर जानेना','कौन आया मेरे मन के द्वारे', 'ऐ दिल मुझे बता दे', 'चैन नही आये', 'नैनों मे प्यार डोले' इत्यादी). पण ह्या ढोलकमध्ये तसे काही खास नाविन्य नाही. हळूहळू, साधारण 'अदालत' पासून तो तबल्यावरील गाणी विशेष बसवतो. हा तबला मात्र बहारीचा आहे ('यूं हसरतों के दाग', 'जिया ले गयो', 'चंदा जा, 'मै तो तुमसंग', 'न हसों हम पे' वगैरे). तसेच आता तो लयीशी थोडी कठीण हरकती करू लागलेला आहे. 'है इसी मे प्यार की आबरू' च्या सुरूवातीचे (prelude) संगीत ज्या तर्‍हेने उठते, व त्याचा शेवट होतो, तितका कठीण रूपक मी हिंदी चित्रपटसंगीतात (१९९० पर्यंतच्या) कधीच ऐकलेला, अनुभवलेला नाही. आता मेलडीही विशेष तयार होत आहे, तेव्हा ढोलकचे महत्व त्याच्या संगीतातून कमीकमी होत चाललेले आहे. मधूनच 'खनक गयो' सारखे एखादे गीत येते, ज्यातून अब्दुल करीमचा भन्नाट ढोलक आपल्या कानी पडतो. पण आता दिशा वेगळी आहे, ढोलकच्या कुबड्या घेण्याची त्याच्या सगीतास आता जरूरी नाही.

ह्याच सुमारास, अगदी थेट सांगायचे तर, १९६४ च्या 'पूजा के फूल' च्या वेळेपासून रईस खान त्याच्या व त्यामुळे आमच्याही आयुष्यात येतो. 'पूजा के फूल' मधील 'मेरी आँखो से कोई नींद लिये जाता है' प्रथम रेकॉर्ड झाले त्यात ते सितारीचे अप्रतिम तुकडे नव्हतेच. रईस खानने रेकॉर्डिग ऐकल्यावर मदन मोहनला त्यातील prelude व interludes मधील तुकडे त्याने कसे वाजवले असते, ते प्रत्यक्ष वाजवून दाखवले. मदन मोहन त्यावर लुब्ध झाला, व त्या गीताचे री-रेकॉर्डिंग झाले- जे आपणासमोर आहे ते. इथून मदन मोहन व रईस खान ह्यांचा समप्रवास आपण काही गीतांतून अनुभवतो--'वो चूप रहे तो मेरे दिल के दाग जलते है', 'खनक गयो हाय बैरी कंगना', 'सपनोंमे अगर मेरे', 'नैनों मे बदरा छाए', 'तू क्या जाने बालमा', 'बैंयाँ ना धरो', 'मोरे नैना बहाए नीर' आणि 'रस्मे उल्फत को निभाये' इत्यादी.

पण नंतर काही वैयक्तिक कारणांवरून मदन मोहन व रईस खान ह्या दोघांत तेढ आली. दोघेही मनस्वी कलाकार असल्याने, दोघांनीही माघार घेतली नाही. हे झाल्याने मदन मोहनच्या संगीतातून सतार हद्दपार झाली. पण आता, त्याचे संगीत पाश्चिमात्य ठेक्यांचे, गिटारचे स्ट्रोक्स, व जाझसारख्या संगीतप्रकारांच्या प्रवासास लागले होते. 'मेरी दुनिया मे जो तुम आये' ही त्याची पहिली ठळक व विलक्षण झलक होती. 'मौसम'ची सगळीच गीते, तसेच 'साहिब बहादूर्' मधील 'मुश्किल है जीना' हे अनोख्या परिणामाचे गीत, ह्याची साक्ष देतात.

मदन मोहनला भारतीय शास्त्रीय संगीताची तीव्र जाण होती, गझलेचा त्याचा अभ्यास सखोल होता-- अगदी अख्तरीबाईंबरोबर उठबस करण्याइतपत तो त्यात मुरलेला होता, ह्याची साक्ष त्याच्या अनेक गझला पटवतात. उत्तमसिंग ह्या हिंदी चित्रपट संगीताच्या क्षेत्रातील अत्यंत नामवंत व्हायोलिनवादकाने एकदा म्हटले आहे, की त्यांच्या समोर वादक वाजवण्यास घाबरत असत. दिलेल्या सुरावटींत चूक झालेली त्याला पटकन समजे व ती स्वतःस आवडलेली नाही, ही तो त्याच्या सैनिकी तर्‍हेने दर्शवून देई. गीताची चाल झाल्यावर त्याचे अ‍ॅरेंजर सर्वश्री मास्टर ओमी, श्यामजी घनश्यामजी इ. ती सजवण्याच्या कामी लागत, पण त्यावर शेवटचा हात तो स्वतः फिरवी.

'एकेक गीताच्या तो अनेक चाली करीत असे, आणि आमच्या अंगावर त्या तो सोडी' असे सांगून लता पुढे म्हणते की' मग मी त्याला सांगे, मदनभैय्या, जरा आहिस्ता ले लीजिये, इतना सारा मै कैसे संभाल लूंगी?' काही वर्षांपूर्वी त्याचा सुपुत्र संजीव कोहली ह्याने पुढाकार घेऊन एह.एम. व्ही. तर्फे त्याच्या गीतांच्या चार सी.डीजचा आल्बम प्रकाशित केला होता, त्यात ह्याची झलक दिसते. 'है इसीमे प्यार की आबरू' ची एक वेगळीच चाल त्याच्याकडे तयार होती, ती तो स्वतः अत्यंत प्रगल्भ तयारीने गातांना ऐकल्यावर काहीतरी अप्रतिम निसटून गेल्याची खंत उरात रहाते.

प्रदीप's picture

10 Jun 2015 - 8:58 pm | प्रदीप

हे असे सगळे असले, तरीही शेवटी मदन मोहन एक स्वतःचे आगळेवेगळे स्थान निर्माण केलेला, 'निश' संगीतकारच राहिला. अत्यंत गंभीर, हलवून सोडण्यार्‍या चाली त्याने बांधल्या, अत्यंत परिणामकारक दु:खगीते त्याने निर्मीली, हे सगळे मान्य. पण तरीही तो अनेक प्रकारच्या व्यक्तिमत्वांसाठी -- उदा. गुरूदत्त ते जॉनी वॉकर--गाणी परिणामकारक बांधतांना आपल्या नजरेत पडत नाही. तसेच तो किती झटपट चाली बांधून देई, ह्याविषयी काही माहिती नाही. आणि अनेकानेक सिच्युएशन्समधील गाणी तो देई का, ह्याबद्दलही मी थोडा साशंक आहे. ह्यामुळे त्याच्याकडे चित्रपट कमी दिले जात असावेत. सर्वसाधारणपणे आपण ह्यास उपहासाने 'बाजारी' वगैरे संबोधतो. ते चुकीचे आहे. तो व्यवसाय लोकांचा पोटापाण्याचा, पैसा मिळवण्यासाठी केलेला व्यवसाय होता, तेव्हा बाजारी असणे ही तेथील अत्यंत महत्वाची जरूरी होती.

त्याच्या प्रकाशित संगीतातील थोडे, मला खटकणारे गीतच सांगायचे झाले तर मी 'गझल' मधील साहिरच्या 'ताजमहल' चा उल्लेख करेन. सचिनदेव बर्मनच्या हातात ह्याचे सोने झाले असते. मदनमोहनने साहिरचे ते रोखठोक शब्द (माझ्या मते, विनाकारण) भावूक केलेले वाटतात.

कलाकाराच्या कलाकृतींचा होता होईल तितका समग्र आढावा घेण्याच्या दृष्टीने हे लिहीले. असो.

पैसा's picture

10 Jun 2015 - 9:17 pm | पैसा

प्रदीपदा, तुमच्या प्रतिसादाचीच वाट बघत होते. :)

श्री. कोणो, इथे लिहिताना असं अभ्यासपूर्ण लिहावं लागेल. अर्थात, तुम्हाला लेखासाठी धन्यवाद आहेतच, कारण त्यामुळे प्रदीपदांनी मुद्दाम वेळ काढून इतका सुंदर प्रतिसाद लिहिला आहे.

एक चांगल्या 'सांगितीक लेखमलेबद्दल' त्यनिमित्ताने तुम्हाला शुभेच्छा.

@....श्री. प्रदीप यांस, खरे सांगायचे तर अगदी मूळ लेखापेक्षाही उत्तम व अप्रतिम अभ्यासपूर्ण अशी प्रतिक्रीया त्याबद्दल धन्यवाद.