बालपण

Hrushikesh Marathe's picture
Hrushikesh Marathe in जनातलं, मनातलं
3 Jun 2015 - 10:13 pm

असंच एकदा मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलो. चालता चालता नजर रस्त्याबाजूच्या एका छोटयाश्या इमारतीवर गेली. ती छोटी इमारत दुसरं तिसरं काही नव्हे तर एक शाळा होती. शनिवारचा दिवस होता, अर्थात सकाळची शाळा. तो तास खेळाचा होता बहुतेक. छोटयाश्या मैदानाच्या एका कोपऱ्यात काही मुली घोळका करून उन्हात उभ्या होत्या, काही उत्साही मुलं शाळेच्या आवाराची साफसफाई करत होते. काही जण झाडांना पाणी घालत होते. तर काही मुलं आबाधुबीच्या नावाखाली आपले हात साफ करत होती. हे सगळं पाहताना दोन क्षण सुखावलो. स्तब्ध, एकाग्रतेने त्या बालपणातल्या निरागस हालचालींच निरीक्षण करत असताना मी काहीसा भूतकाळात गेलो.

मलाही आठवले माझे जुने शाळेचे दिवस आणि तेही शनिवारच्या सकाळच्या शाळेचे. शुक्रवारी रात्री कपडे इस्त्री करून ठेवायचे म्हणजे सकाळी गडबड नको. सकाळी उठलो, आन्हीकं उरकली आणि चहा मधून बिस्किट खाल्लं की जायला मोकळे. घाईत नेहमी चहा तसाच रहात असे, त्याची गरज काय तर फक्त बिस्किटापुरती. सायकल घेऊन मित्राच्या घराजवळ येऊन थांबायचो आणि सायकलची घंटी स्वतःला कंटाळा येईपर्यन्त वाजवायचो. शेवटी तो आला की निघाली दोघांची स्वारी शाळेला. सकाळची शाळा आणि त्यात सायकलची सवारी दोन्ही आवडीच्या गोष्टी. शाळेत पोचलो की परिपाठ सुरु व्हायचा. परिपाठाचं आणि मुलांच काय नातं होतं कोणास ठाऊक, तो चालू झाला आणि आम्ही शांत राहिलो असं कधी झालंच नाही आणि विशेष म्हणजे कोणाला त्या वेळी हसा असं सांगाव लागत नसे.

नंतर सुरु व्हायचे तास.. मराठी, संस्कृत, इंग्रजी, गणित असे आवडीचे तास झाले की अवसान संपत असे. मग वेळ येई ती इतिहास भूगोल आणि विज्ञान या विषयांची. हे विषय मार्क मिळवून पास होण्यासाठी असतात या पुढे जाऊन मी त्यांचा विचार कधी केलाच नाही. (मी बरोबर होतो कदाचित.) त्या तासांना मी बोनस तास म्हणून समजत असे, आवडीच्या विषयांचा कंटाळा येऊ नये म्हणून थोडासा विरंगुळा. शनिवारचं विशेष पर्व म्हणजे शा.शि.च्या तासाला आवारातल्या लाकडांची शेकोटी आणि त्यासोबत रंगत जाणाऱ्या गप्पा. "बाळू मगाशी ती तुझ्याकडे बघत होती", "गण्या ती तुला खुन्नस देत होती" अशा बऱ्याच अफवा त्याच वेळी पसरतही असत आणि शेकोटीसोबत विरतही असत. त्या अफवा असायच्या खऱ्या पण त्यातही एक वेगळीच मजा होती. शेकोटी संपली की क्रिकेटच्या टीम पाडणे, आपण हव्या त्या टीम मधे यायला पाहिजे म्हणून लपून रहाणे, खेळताना थोडी केलेली भांडणं - तंटा हया गोष्टी नैसर्गिक असत. आबाधुबी हे एक अजबच साधन होत, एखाद्या गोष्टीचा राग किंवा मत्सर, फ्रस्ट्रेशन, टेंशन या गोष्टी माहित नसूनही तत्सम भावना व्यक्त करण्यासाठी खेळला गेलेला खेळ म्हणावं का त्याला? कदाचित हो..कदाचित नाही.. प्रश्न अनुत्तरित.

शाळेत एक झाड होतं, आंब्याचं.. त्याचे वापर खुप, त्यावर बसून केलेली खलबतं असो, तिथे बसून बघितलेली कॉलेजची हिरवळ असो, का पावसात त्याच्याच बुंध्याशी बांधलेलं धरण असो, सारं काही मस्त होतं. मधली घंटी झाली की शनिवार स्पेशल खाद्य "वडापाव" साठी गर्दी होत असे. एक दोन वडापाव झाले की आत्मा तृप्त, कधी कोण पैसे विसरलाच तर वडापावची केलेली समान वाटणी हा त्यावरचा तोडगा.

वर्गातली सगळ्यात अजब कथा म्हणजे मुलं आणि मुली यांच "शीतयुद्ध". काही अपवाद वगळता कधी कोणाशी स्वतःहून बोलणं नाही. खरं पाहता कोणी कोणाचं काय बिघडवलं होतं देवास ठाऊक की एकत्र असूनही शत्रूसारखे वागायचो. चुकून एखादी मुलगी कोणाशी बोललीच तर त्या मुलाला चिडवायला तयार असायचे सगळे. कदाचित त्या भीतीनेच सगळे गप्प असायचे. बेंचवर खेळतानाचा पेन मुलींच्या बेंच खाली गेला की त्या पेनला त्या दिवशी सुट्टी मिळे. पेन गेम असो किंवा चिंचोक्याचे चटके, ५ खडयांचा खेळ असो वा म्हातारीचं घर सगळे खेळ मजेदार होते.

दुपारच्या जेवणाचे एक्सचेंज केलले डबे किंवा मित्राकडे पुस्तक नसताना आपले पुस्तक त्याला देऊन स्वतः खाल्लेला मार दोन्ही तितकेच रुचकर लागत.

इतक्यात मी भानावर आलो, तसाच घरी आलो विचार केला तो मी आज जगत असलेल्या लाईफचा.

हल्ली इस्त्रीही धूळ खाते आहे, पाच रुपयांत एक शर्ट इस्त्री करून जो मिळतो. आता सकाळच्या चहाचं गणितहीे स्टेटस आणि स्ट्रेसनुसार बदलत चाललेलं दिसतं. इंजिनीअरींग कॉलेज मधला विद्यार्थी टपरीवर, सरकारी नोकरीतला माणूस ऑफिसच्या कैंटिनमधे आणि कॉर्पोरेट व्यक्ती "Smoking Zones" मधे आणि हो - फक्त चहा नव्हे बरं! सोबत हवेत विरणाऱ्या अगरबत्या अर्थात सिगारेट्स. फरक मात्र इतकाचं की आता बिस्किटांची जागा सिगरेट्स ने घेतली आहे. सकाळी ऑफिसला बाइकवरुन जातानाची ट्रॅफिक झेलत केलेली कसरत असो किंवा ऑफिसच्या बसमधे काढलेली एक पेंग दोन्हीही गोष्टी काहीश्या मनाविरुद्धच, पण अंगवळणी पडलेल्या. सोबत येणारा साधा एक मित्र नसतो आजकाल, आधीसारखं मित्रासाठी थांबणं सोडा साधं सिग्नलवर दोन मिनिटं थांबायला आपल्याकडे वेळ नसतो. शेकोटीच्या गप्पा आणि अफवांच्या जागी, गॉसिप्स, नाईटआउट्स अन् पार्टीज होऊ लागल्यांत. आंब्याच्या झाडाची जागा आता मॉल्स, पब्स आणि हॉटेल्स ने घेतलेय, सारी हिरवळ तिकडेच, अनुभव तोच: पण ती मजा नाही. कामाचे असो वा कोणतेही टेंशन असो, फ्रस्ट्रेशन, बॉस वरचा राग असो किंवा Onsite टीम बद्दलचा द्वेष, कशालाच व्यक्त करायला मार्ग नाही, (आबाधुबीसारखा), सारं काही आतल्या आत सुरु राहतं. हल्ली हास्य क्लब जॉइन करणारे लोक पाहून परिपाठाचे क्षण आठवतात. कधी साधं एकत्र भेटणं अवघड होतं आजकाल, त्या साठीही प्लान्स आणि विनवण्या कराव्या लागतात, कधी लंच किंवा डिनरला भेटलोच तर Buy 1 Burger and Get 1 Burger Free प्रकारच्या ऑफर्स मुळे वाटून खाण्याची वेळच येत नाही. हा एक मात्र आहे मुलं आणि मुली यांतली दरी कमी होऊन ते एकमेकांशी बोलतात, वीकएंड प्लान्स करतात, चक्क डेट वरही जातात. ती मैत्री असेल वा प्रेम किंवा त्याच्याही काहीसं पुढे...

खरचं यापेक्षा बालपण कितीतरी पटीने भारी होतं. कदाचित त्या कवीलाही असंच काहीस वाटलं असणार म्हणून तो ही म्हणाला की "बालपण देगा देवा"..

हृषीकेश मराठे

____________________________
(साहित्य संपादन केले आहे.)

मौजमजाविचारलेख

प्रतिक्रिया

सामान्य वाचक's picture

3 Jun 2015 - 11:01 pm | सामान्य वाचक

जे लोक गेल्या दिनां बद्दल गळे काढत राहतात ते न वर्तमानात सुखी राहतात ना भविष्य काळात

परिवर्तन हां जगाचा आणि जगण्याचा नियम आहे
अशाच तक्रारी तुमच्या मागचि पिढी अणि त्या मागचि पिढी पण करत होती
आणि त्यातून ही तुम्हाला हवे तसे जगयाचा मार्ग आहेच की
तुम्हाला कुणी सक्ति केली आहे असेच जगा म्हणून
तुम्ही छान पैकी इस्त्री करा , वाटून खा, काहीही करा की

प्रत्येक माणुस परीवर्तनाला सामोर जात असतोच पण आपल्या आधीच्या वेळी जी मजा केली ती मजा कामामुळे वेळेअभावी करायला मिळाली नाही की हे असं सुचतचं याला गळे काढण म्हणत नाहीत..

पैसा's picture

3 Jun 2015 - 11:28 pm | पैसा

चांगलं मुद्देसूद लिहिलंत. सगळंच पटलं नाही. म्हणजे स्वतःला सीमारेषा आपणच आखून घेतो. लहान सहान गोष्टीत कोणी अडवलेलं नसतं. वेळेअभावी काही गोष्टी रोज करता येणार नाहीत पण त्यासाठी रविवार असतो, सुट्ट्या असतात. आणि खरे तर ज्या गोष्टी रोज करता येत नाहीत त्यांचंच अप्रूप वाटतं. आपल्याला चुलीवरचा, पाटावरवंटा वापरून केलेला स्वयंपाक लै भारी वाटतो, विहिरीवरून कळशीने पाणी आणणं लै रोमँटिक वाटतं. पण आमच्या गावातल्या कामकरी बायांना विचाराल तर एक मिक्सर आणि दारात नळ मिळाला तर त्या जगातल्या सर्वात सुखी बायका असतील!

पण लिखाण एकूणात चांगलं आहे. अजून लिहा!

gogglya's picture

4 Jun 2015 - 1:00 pm | gogglya

+१

Hrushikesh Marathe's picture

3 Jun 2015 - 11:36 pm | Hrushikesh Marathe

धन्यवाद

अमित खोजे's picture

4 Jun 2015 - 1:49 am | अमित खोजे

अहो हृषीकेशराव, लेखन चांगले लिहिले आहेच. परंतु येणार्या प्रतिक्रीयांचे वाईट मानुन न घेता लिहित रहा. मिपाकर इथे अगदी मनमोकळेपणाने बोलतात.

बाकी झालंय असं की असे शाळेच्या अशा आठवणींचे आणि जुन्या मित्रांचे एवढे मेसेजेस ते मोबाईलवर येतात कि शेवटी शेवटी आता याला गळे काढणे असेच म्हणावेसे वाटू लागले आहे. सामान्य वाचकांनी लिहिलेले उत्तर तसे पाहिले तर मला बरोबर वाटते. ते सुद्धा मी इथे येऊनच शिकलो.
'रम्य ते बालपण' असे आता वाटते पण लहानपणीसुद्धा कधी एकदाचे मोठे होतोय आणि आपल्याला हवी तेवढी चॉकोलेट्स खाता येतात, असेच विचार मनामध्ये यायचे आणि लहान तोंड अजूनच लहान होउन जायचे. :(

जुन्या आठवणी छानच परंतू वर्तमानही तेवढेच सुंदर आहे. याच निमित्ताने असाच एक मेसेज आठवला.

मरून वर गेल्यावर देवाने विचारले, "मग, कसा काय वाटला स्वर्ग?"

श्रीरंग_जोशी's picture

4 Jun 2015 - 6:52 am | श्रीरंग_जोशी

लेखन आवडलं.
मिपावर स्वागत आहे.

मुक्त विहारि's picture

4 Jun 2015 - 7:30 am | मुक्त विहारि

आवडले...

Hrushikesh Marathe's picture

4 Jun 2015 - 12:17 pm | Hrushikesh Marathe

Thanks:)

शि बि आय's picture

5 Jun 2015 - 3:42 pm | शि बि आय

खूप छान… जुने दिवस आठवले.
काळानुसार आपल्यातही फरक झाला आहे ह्या अनुशंगाने इथे मान्य करावेसे वाटते. आपणही एखाद्या संध्याकाळी बागेत जाण्यापेक्षा मॉल्सला पसंती देतो.
रानमेवा चाखाण्यापेक्षा कुरकुरे किंवा वेफरची निवड करतो. थोडा थांबून विचार केला तर बर्याच गोष्टी आपल्या हातात आहेत असे दिसेल फक्त बदलण्याची तयारी हवी.

थोडंस हातात आहे तोवर परत ते जगूया,
सगळच निसटण्या आधी डोळ्यात साठवूया,
पुढचा ठावं न कळे मजला,
वर्तमान भूत भाविष्यासह जगूया….

Hrushikesh Marathe's picture

5 Jun 2015 - 6:06 pm | Hrushikesh Marathe

Exactly:)

सदस्यनाम's picture

5 Jun 2015 - 6:57 pm | सदस्यनाम

थोडंस हातात आहे तोवर परत ते जगूया,
सगळच निसटण्या आधी डोळ्यात साठवूया,
पुढचा ठावं न कळे मजला,
वर्तमान भूत भाविष्यासह जगूया….

हे असलं कायतरी लिहिणार्‍यांचं अन तसेच वागायचं ठरवणार्‍यांचं लै कवतिक वाटतं ब्वा.
जगा, जगा.