कॉफी, समुद्र, कोर्ट, आणि बरंच काही...

समीरसूर's picture
समीरसूर in जनातलं, मनातलं
5 May 2015 - 9:25 pm

गेल्या दीड-दोन महिन्यात जरा चंगळच केली. तशी नाटक-सिनेमाच्या बाबतीत आम्ही ती नेहमीच करत असतो पण गेल्या दीड-दोन महिन्यात जरा जास्तच केली. सिनेमा-नाटक माझं पहिलं प्रेम! कुठल्याही वेळेला चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघणे किंवा नाट्यगृहात जाऊन नाटक बघणे हा माझा सगळ्यात आवडता छंद. प्रत्येक चित्रपट किंवा नाटकाच्या बाबतीत लेख लिहिणे शक्य नाही म्हणून काही नाटक-चित्रपटांविषयी थोडं लिहिण्याचा हा एक प्रयत्न.

कॉफी आणि बरंच काही...

एक छान, गोड प्रेमकथा. हळूवार फुलत जाणारी. आजच्या काळाला अनुसरून असणारी गोष्ट. वैभव आणि प्रार्थना हे एकाच पुणे-स्थित सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरी करत असतात. पर्सिस्टंट सिस्टिम्स या कंपनीमधले बहुतांश चित्रीकरण आहे. वैभव हा प्रार्थनाचा मॅनेजर असतो. प्रार्थना त्याला आवडायला लागते. आणि प्रार्थनाच्याही मनात तो हळूहळू घर करायला लागतो. पण प्रार्थना प्रेमाच्या बाबतीत खूप फिल्मी असते. वैभवने खाली लवून गुलाबपुष्पाचा वर्षाव करून प्रपोज करावे अशी तिची अपेक्षा असते. वैभवला आपण नेमके प्रेमात पडलो आहोत का हे उमजत नाही. दरम्यान प्रार्थनाला भेटायला एक लग्नाळू तरुण त्याच्या कुटुंबासोबत येतो. प्रार्थना खिन्न होते. वैभव अजून प्रपोज करत नाही म्हणजे त्याचे आपल्यावर प्रेम नाही असा तिचा समज होतो. प्रार्थनाची बहीण तिला आपल्याला कुणीतरी प्रपोज केले आहे असं खोटंच वैभवला सांगण्याचा सल्ला देते. प्रार्थना एका कॅफेमध्ये भेटून तसं वैभवला सांगते जेणेकरून त्याने अधीर होऊन तिला चटकन प्रपोज करावं. पण घडतं उलटंच. प्रार्थनाला तो मुलगा आवडला आहे असा वैभवचा समज होतो आणि तो प्रार्थनापासून दूर जाण्याचा विचार करतो. शेवटी दोघांनाही आपले प्रेम व्यक्त करण्याची गरज वाटते आणि मग पुण्यातल्या झेड ब्रिजवर दोघे एकमेकांना प्रपोज करतात.

चित्रपट खूप साधा असला तरी फ्रेश वाटतो. वैभव आणि प्रार्थना या दोघांनी सुरेख अभिनय केला आहे. प्रार्थनाची धाकटी बहीण नेहा महाजन सुरेख दिसते, हसते, आणि अभिनय करते. छोट्या छोट्या प्रसंगांमधून नायक-नायिकेमधले प्रेम फुलवण्यात दिग्दर्शक यशस्वी झालेला आहे. गाणी फारशी लक्षात राहण्याजोगी नाहीत.

चित्रपट यशस्वी झाला आणि मला वाटते अजून चित्रपटगृहात सुरू आहे. चित्रपट पाहून झाल्यावर मन प्रसन्न झाले. अधून-मधून विनोदाचा शिडकावा चित्रपटाचा मूड कायम फ्रेश ठेवतो.

समुद्र

नुकतेच भरत नाट्य मंदिरला 'समुद्र' हे नाटक पाहिले. मिलिंद बोकीलांच्या कादंबरीवर आधारित हे नाटक आहे. चिन्मय आणि स्पृहा हे एक सुखी जोडपं आहे. लग्नाला बरीच वर्षे झालेली आहेत. त्यांचा राजू नावाचा मुलगा बोर्डिंगमध्ये राहतो. हे दोघे फिरायला म्हणून समुद्रावरील एका रिसॉर्टवर येतात. गप्पा मारता मारता चिन्मयच्या मनात असलेले काही अनुत्तरीत प्रश्न चर्चेला येतात. स्पृहा गंभीर होते. शेवटी मनाचा हिय्या करून ती चिन्मयला खरं सांगते. गणेश राजोपाध्ये नावाच्या एका परपुरुषाशी तिची मैत्री होती असं ती त्याला सांगते. नंतर अपराधभावनेतून ती गणेशशी आपले शरीरसंबंध आल्याचे देखील कबूल करते. चिन्मय भडकतो. आपल्यात असं काय कमी होतं असं तो तिला विचारत राहतो. लग्नाच्या आणि नवरा-बायकोच्या भूमिकेपलिकडे आपलं एक स्वतंत्र अस्तित्व आहे आणि आपण ते जपायला हवं असं स्पृहाचं म्हणणं असतं. या शरीरसंबंधांकडे चिन्मयने केवळ तिचा एक वेगळा अनुभव म्हणून बघावं असा तिचा आग्रह असतो. या मैत्रीमुळे आणि शरीरसंबंधांमुळे आपल्या लग्नात काहीही बाधा पडलेली नाही असं तिचं म्हणणं असतं. लग्नाचा आणि तिच्या त्या मैत्रीचा काहीही संबंध नाही असं ती वारंवार समजावून सांगते आणि चिन्मयला ते अजिबात पटत नाही. स्पृहा एकदाही चिन्मयला सॉरी म्हणत नाही कारण तिच्या मते तिने काही चूक केलेली नसते. आपल्याला समजून घेणारा एक मित्र आपल्याला भेटला आणि आपण त्याच्याशी मैत्री केली आणि शरीरसंबंध हा त्या मैत्रीचाच एक भाग होता अशी तिची ठाम समजूत असते. त्यामुळे ती कधीच चिन्मयला सॉरी म्हणत नाही. शेवटी चिन्मय तिचे स्पष्टीकरण स्वीकारतो आणि दोघे पुन्हा एकत्र येतात.

बरेच प्रश्न उभे करणारे हे नाटक आहे. स्पृहा वागली ते चूक की बरोबर? लग्नाबाहेर अशी मैत्री असणं योग्य आहे का? लग्न म्हणजे नवरा-बायको एवढ्याच भूमिका एका पुरुषाने आणि स्त्रीने पार पाडणं अपेक्षित आहे का? या परीघाबाहेर दोघांचं स्वतंत्र असं अस्तित्व असू शकतं का? आणि अशा स्वतंत्र अस्तित्वामध्ये विवाहबाह्य शरीरसंबंध असणं चूक की बरोबर? अशाने स्वैराचार वाढणार नाही का? मनाला भावणार्‍या प्रत्येक व्यक्तीसोबत शरीरसंबंध ठेवणे नैतिकदृष्ट्या कितपत योग्य आहे? अशा कित्येक प्रश्नांची जंत्री निर्माण करणारे हे नाटक आहे. एका अतिनाजूक प्रश्नावर चर्चा करणारं नाटक म्हणून 'समुद्र'कडे बघता येईल.

चिन्मय मांडलेकरने नाट्यरुपांतर सहज आणि नेटके केले आहे. चिन्मय आणि स्पृहा जोशी या दोघांनी दमदार अभिनय केला आहे. राजन भिसेंचे नेपथ्य सुरेख आहे. समुद्राचा आभास निर्माण करण्यात ध्वनिसंयोजन यशस्वी झालेले आहे. नाटक बघतांना एक क्षणदेखील कंटाळा येत नाही.

कोर्ट

वीरा साथीदार या अभिनेत्याने पहिल्याच चित्रपटात इतका जबरदस्त अभिनय केला आहे की 'कोर्ट' बघतांना त्यांनी अभिनय केला आहे असे वाटतच नाही. एक लोकजागृती करणारा शाहिर गाण्यांचे कार्यक्रम करून लोकांचं प्रबोधन करत असतो. एका गटार सफाई कामगाराच्या आत्महत्येसाठी या शाहिराला जबाबदार ठरवून पोलीस अटक करून घेऊन जातात. केस उभी राहते. एक गुजराती वकील शाहिराची केस लढतो. सरकारी वकीलाची भूमिका गीतांजली कुळकर्णीने साकारली आहे. दीडशे वर्षापूर्वीचे कायदे आणि कलमं लावून शाहिराला २० वर्षे डांबून ठेवण्याचा खटाटोप सरकारी वकील करत असतात. शाहिराचे वकील कोर्टाला शाहिराचे निर्दोषत्व पटवून देण्याचा प्रयत्न करतात. अतिशय साधी कथा. दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणेंनी एक अतिशय वेगळा विषय निवडला आहे.

कोर्टाच्या कामकाजात काय काय गमती-जमती घडतात, सरकारी वकील कुठली कुठली विनोदी कलमे लावून एका निर्दोष शाहिराला शिक्षा ठोठावण्याची पराकाष्ठा करतात, कोर्टाचं कामकाज किती संथ पद्धतीनं चालतं, कोर्ट कसं निर्गुण निराकार असतं, इत्यादी पैलूंना अर्थपूर्ण स्पर्श करत कोर्ट पुढे सरकतो.

चित्रपट कुठेही टिप्पणी करत नाही. कुठलेच पात्र कोर्टाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढत नाही; उद्विग्न होत नाही. कामकाज संथपणे चालत राहते. न्यायाधीश हे बुद्धीची आणि न्यायदानाच्या कर्तव्याची चाड ठेवून न्याय करणारे पद असते. चित्रपटातला न्यायाधीश मात्र अंधश्रद्धाळू दाखवला आहे.

गुजराथी वकील उच्चभ्रू वर्तुळातला असतो. सरकारी वकील मध्यमवर्गीय असते. त्यांचं नेहमीच अलिप्त आयुष्य एकंदरीत सिस्टीममधले विरोधाभास अधोरेखित करतं. कोर्ट हे असंच अलिप्त असतं. कुठल्याच भाव-भावना न जाणणारं, कुणाच्याच हालअपेष्टांना न जुमानणारं, पाषाणहृदयी असं हे 'कोर्ट' दिग्दर्शकाने अतिशय खुबीने रंगवलं आहे. व्यावसायिक करमणूक नसलेला हा चित्रपट एक वेगळ्या प्रकारची करमणूक करतो. चित्रपट कुठेच कंटाळवाणा होत नाही. अर्थातच पिटातल्या प्रेक्षकांना न पचणारा हा चित्रपट आहे हे खरे. चित्रपट संथ असल्याने बहुतेक प्रेक्षकांना कंटाळवाणा वाटण्याची शक्यता आहे; पण थोडे अधिक लक्ष देऊन पाहिले असता हा चित्रपट हळूवार चिमटा काढत निखळ मनोरंजन करतो.

गीतांजली कुळकर्णींना याआधी आपण 'अगं बाई अरेच्चा' मध्ये पाहिलं आहे. स्वतःच्या विश्वात मग्न राहून कविता करणार्‍या एका युवतीची भूमिका त्यांनी 'अगं बाई अरेच्चा' मध्ये वठवली होती. कोर्टमधल्या सरकारी वकीलाची भूमिका गीतांजलींनी सुरेख वठवलेली आहे. प्रदीप जोशींनी न्यायाधिशाची भूमिका चोख केली आहे. असं वाटतं की खरंच कुठले निवृत्त न्यायाधीश या भूमिकेसाठी निवडले असावेत.

एकदा निवांत बसून बघण्यासारखा हा चित्रपट आहे हे नक्की.

रानभूल

प्र ल मयेकर लिखित 'रानभूल' हे नाटक नवीन संचात आलेलं आहे. संजय नार्वेकर, भाऊ कदम, विजय पटवर्धन यांचा दमदार अभिनय आणि देखणं दिग्दर्शन हे या नाटकाचे मुख्य आधारस्तंभ! फिरत्या रंगमंचाची किमया भुरळ पाडते. नेपथ्य अतिशय सुरेख.

लुबाडणूक करू पाहणार्‍या नाट्यलेखक, अभिनेता, आणि अभिनेत्री या त्रिकुटाच्या कचाट्यात सापडलेली एक निष्पाप तरुणी आणि तिला सोडवण्यासाठी प्रयत्न करणारा संजय असे या नाटकाचे कथानक होते.

संजय नार्वेकर, भाऊ कदम, आणि विजय पटवर्धन यांनी अफलातून अभिनय केला आहे. नाटक बघतांना मजा आली आणि थरार अनुभवता आला.

कहानी में ट्विस्ट

राकेश सारंग (निर्माता) यांनी 'रोमांचालाही रोमांच आणणारे नाटक' असे या नाटकाचे वर्णन केले होते. मोठ्या अपेक्षेने मी हे नाटक बघायला गेलो. गिरीश ओक, सौरभ गोखले, आणि प्राची दातार यांच्या भूमिका असणारे हे रहस्यमय नाटक सुरू होतं तेव्हा अपेक्षा उंचावतात. गिरीश ओकांचा अभिनय जबरदस्त असल्याने काहीतरी जबरदस्त बघायला मिळणार असं वाटायला लागतं. बराच वेळ निघून गेल्यानंतर मात्र नाटकाची पकड ढिली होत जाते. केवळ तीन पात्रांमध्ये खूप जबरदस्त रहस्य निर्माण करणे अवघड होतेच. शेवटी फारसे न पटणारे रहस्योद्घाटन करून नाटक संपते.

गिरीश ओकांचा अभिनय वगळता नाटक फारसे परिणामकारक वाटले नाही. कथा तितकीशी प्रभावी वाटली नाही. नाटक बर्‍याचदा कंटाळवाणे होते.

डिटेक्टीव्ह ब्योमकेश बक्षी

दिबाकर बॅनर्जी हा माझा आवडता दिग्दर्शक आहे. 'खोसला का घोसला' या माझा ऑल टाईम फेवरेट चित्रपट आहे. त्यामुळे 'ब्योमकेश बक्षी' बघायचाच होता. आणि चित्रपट मला खूप आवडला.

दुसर्‍या महायुद्धाच्या दरम्यानचे धुमसते कलकत्ता शहर. एक कारखान्यात नोकरी करणारा माणूस अचानक गायब होतो. ब्योमकेश बक्षी या केसवर काम सुरू करतो. मोठ्या गुंतागुंतीचे रहस्य उलगडण्यात ब्योमकेश यशस्वी होतो.

चाळीसच्या दशकातले कलकत्ता सुंदर उभे केले आहे. कथा-पटकथा निव्वळ लाजवाब! रहस्याचा गुंता असा बेमालूम विणला होता की बुद्धीला चालना दिल्याशिवाय आणि बारीक लक्ष देऊन चित्रपट पाहिल्याशिवाय चित्रपट कळणे अशक्यच! असे चित्रपट मला भयंकर आवडतात. म्हणूनच की काय 'जॉनी गद्दार', 'तलाश' वगैरे चित्रपट माझ्या खास आवडीचे आहेत.

सुशांत राजपूतने ब्योमकेश बक्षी साक्षात उभा केलेला आहे. बाकी सगळ्या अभिनेत्यांनी बावनकशी अभिनय केला आहे. अगदी चुकवू नये असा चित्रपट! अर्थात असे दिमागला कामाला लावणारे चित्रपट आवडत असतील तरच!

बदलापूर

अतिशय डेंजरस चित्रपट! वरूण धवन आणि नवाजुद्दीन सिद्दिक्की यांच्या अभिनयाला तोड नाही. हुमा कुरेशी, राधिका आपटे, दिव्या दत्ता यांचा अभिनयदेखील नेटका. मानवी स्वभावाची काळीकुट्ट बाजू अतिशय प्रभावीपणे माडणारा चित्रपट! सूडबुद्धी कुठल्या थराला जाऊ शकते हे पहायचे असेल तर 'बदलापूर' अवश्य बघा. हा 'जॉनी गद्दार'च्या दिग्दर्शकाचा चित्रपट आहे (श्रीधर राघवन). फक्त आणि फक्त प्रौढांसाठी! सहकुटुंब अजिबात बघू नका. पण चित्रपट बघण्यासारखा आहे हे नक्की.

लेख तसा त्रोटक झालेला आहे पण प्रत्येक चित्रपटावर किंवा नाटकावर डिट्टेलवार लेख लिहिणे अवघड आहे म्हणून एक संक्षिप्त ओळख देण्याचा हा प्रयत्न आहे. जसे जमेल तसे अजून लिहित राहीनच...

नाट्यचित्रपटआस्वाद

प्रतिक्रिया

आदूबाळ's picture

5 May 2015 - 10:02 pm | आदूबाळ

ये बात! झकास लिहिलंय.

गेल्या दीड-दोन महिन्यात जरा चंगळच केली. तशी नाटक-सिनेमाच्या बाबतीत आम्ही ती नेहमीच करत असतो पण गेल्या दीड-दोन महिन्यात जरा जास्तच केली. सिनेमा-नाटक माझं पहिलं प्रेम!

असूया वाटलेली आहे. बाकी लेख नेहमीप्रमाणेच उत्तम..

मला वाटलं हा बदलापूर म्हणजे आमच्या बदलापूर बद्दल काहीतरी असेल. ;)

बदलापूरवर एक ओताविचा प्रयत्न मात्र आहे:

http://badalapur.blogspot.co.uk/

द-बाहुबली's picture

5 May 2015 - 10:30 pm | द-बाहुबली

ब्योमकेश बक्षी:- जासुस..? काफी पुराना लगता है. डिटेक्टीव..? बात कुछ जमी नही. इसिलिए मै हुं सत्यांवेशी. सत्य की खोज करनेवाला. हा संवाद आहे मुळ ब्योमकेश बक्षी सिरीअल मधला. त्यामुळे डिटेक्टीव्ह ब्योमकेश बक्षी हे नावचं वाचता क्षणी खटकलं.

तसेही लोकप्रिय व्यक्तीरेखांचे सस्पेंस थ्रिलर चित्रपट बनवताना ते स्स्पेंन्स अ‍ॅक्शन थ्रिलर का बनवले जातात, महायुध्द का घुसडले जाते देवच जाणॉ. म्हणून मुळ व्यक्तिरेखेसोबत केलेली प्रतारणा म्हणून हा चित्रपट पसंतिला उतरला नाही. ब्योमकेश बक्षी वगळुन बघितला तर एकदा कसाबसा... पहावा.

बदलापूर

बदलापूर अतिशय डेंजरस चित्रपट! नवाजुद्दीन सिद्दिक्की, हुमा कुरेशी यांच्या अभिनयाला तोड नाही. कथाच जबरदस्त. तसा कथेचा काहीच संबंध नाही पण द प्रेस्टीज चित्रपटात जसे स्पर्धा जिवघेणे वळन घेते आणी बदला अतिशय खालच्या पातळीवरील स्पर्धेमधे परावर्तीत होतो तसेच काही बदलापुर अनुभवायला देतो. हा अनुभव म्हणजे बदला न्हवे... तर बदल... कथेच्या प्रमुख व्यक्तिरेखांमधला.

छान लेख.

समीरसूर's picture

6 May 2015 - 8:48 pm | समीरसूर

पटले

समीरसूर's picture

6 May 2015 - 9:14 pm | समीरसूर

ब्योमकेश मात्र आवडला मला. लक्षपूर्वक बघावा लागतो. आणि रहस्य चांगले गुंफले होते...

बदलापूर (न्याशनल हायवे १०), ब्योमकेश हे शिनेमे चांगले असले तरी माझ्या यादीतून बाद! नाटके बघता येणार नाहीत पण टाईमपास २ वाईट असल्याचे तुम्ही सांगितल्यावर आता नवं काही येतय की नाही असे वाटत होते. कोर्ट व कॉफीचा सिनेमा हे जालावर आल्यास पाहू शकेन. हा धागा आवडला. सगळी माहिती एकदम हातात.

अत्रुप्त आत्मा's picture

6 May 2015 - 12:24 am | अत्रुप्त आत्मा

छान परिचय.. विशेषतः नातक हा विषय अ‍ॅडवल्यामुळे आवडले.

चित्रगुप्त's picture

6 May 2015 - 12:34 am | चित्रगुप्त

लेखनाचा हा प्रकार आवडला. पैकी तूर्त 'बदलापूर' जालावर असेल तर बघावे म्हणतो.

रुपी's picture

6 May 2015 - 4:00 am | रुपी

या लेखनावरुन "कोर्ट" पाहावासा वाटत आहे..

श्रीरंग_जोशी's picture

6 May 2015 - 4:33 am | श्रीरंग_जोशी

विविध चित्रपट व नाटकांची थोडक्यात ओळख आवडली.

गेल्या महिन्यात आमच्या शहरातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सौजन्याने एक हजाची नोट हा चित्रपट पाहता आला. शेतकर्‍यांच्या जीवनाचं कटू वास्तव कुठल्याही भडकपणाशिवाय चित्रित केलंय. वर्‍हाडी बोलीभाषा एवढी उत्तमपणे प्रथमच मराठी चित्रपटात ऐकायला मिळाली. ग्रामीण लोकजीवन कुठल्याही नाटकीपणाशिवाय परिणामकारकपणे दाखवलं आहे.

या चित्रपटाची कथा व पटकथा प्रसिद्ध स्तंभलेखक तंबी दुराई यांनी लिहिली आहे.

खरंच चंगळ केली आहे की तुम्ही :) बदलापूर पाहिलाय. जबरदस्त आहे पण एकूणच अंगावर येतो. त्यातील हिंसा मला पाहवली नाही.. वरुणचे काम सुरेख झाले आहे.

कोर्ट बघायचाच आहे.

समीरसूर's picture

6 May 2015 - 9:13 pm | समीरसूर

डोक्याचा, मनाचा ताबा घेतो अगदी...जॉनी गद्दार सारखा...मजा आता हैं...कुछ तो दिमाग लगाना पडता हैं..

मस्त परिक्षण.कॉफी सुरेख आहे.नायक अन नायिका दोघांचाहि वावर छान वाटतो.आवडला.
समुद्र कादंबरी वाचलीये. नाटक बघायला हव.बाकि इतर जालवर पहाण्याय येइल.

मृत्युन्जय's picture

6 May 2015 - 11:34 am | मृत्युन्जय

बदलापूर बद्दल इतक्यात बर्‍याच लोकांनी चांगली प्रतिक्रिया दिली (बायकोबरोबर बघता येइल पण फॅमिली बरोबर नाही असा सावध सल्लाही दिला).. चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली आहे हे नक्की. पाहण्यात येइल.

कॉफी आणि कॉर्ट तर पहायचे आहेतच,

सानिकास्वप्निल's picture

6 May 2015 - 4:31 pm | सानिकास्वप्निल

बदलापूर - थोडा हिंसक आहे तरी आवडला.
डिटेक्टीव्ह ब्योमकेश बक्षी, एन एच १० हे ही चित्रपट आवडले.
समुद्र पुस्तक वाचले आहे, नाटक कधी मिळेल बघायला माहित नाही..
टीपी- २ आता ऑनलाईन आलाच तर बघणे होईल.
कोर्ट, कॉफी बघायची इच्छा आहे.

तुमचा लेख नेहमीप्रमाणेच मस्तं .

अत्रुप्त आत्मा's picture

6 May 2015 - 7:33 pm | अत्रुप्त आत्मा

आज गेलो होतो कोर्टात!

आजपर्यंत मी पाहिलेल्यातला हा एक अत्यंत वेगळया म्हणजे वेगळ्या धाटणीचा चित्रपट आहे. सगळा चित्रपट म्हणजे कोर्टाशी संबंधीत असलेलं एक रुटीन लाइफच आपण एकत्रित पहातो..या पेक्षा अधिक काहिही नाही. शाहीर पोवाड्यांचे कार्यक्रम करत असतो. एका कार्यक्रमातील एका पोवाड्याच्या काहि ओळी या गटारात जीव देलिल्या कामगाराने ऐकलेल्या असतात. आणि कामगारांनो जीव द्या तुम्ही अश्या त्या ओळींच्या आशयानी प्रेरीत होऊनच त्यानी जीव दिलाय ,असं पोलिस आणि सरकारी वकिलीण बाईचं म्हणणं असतं. ती या गोष्टीला सिद्ध करण्यासाठी आरोपीच्या पूर्वायुष्याचे दाखले हास्यास्पद आणि केस स्ट्राँग करायला देत असते. साध्या कोर्टातून पुढच्या कोर्टात येथेपर्यंतचाच प्रवास यात दाखविला गेलेला आहे. पुढच्या कोर्टातलं (चारपाच हियरींगपैकी)एक हियरींग संपत. न्यायाधीश पुढची तारीख सुनावतो. कोर्टाचं कामकाज थांबतं .नंतर सगळे उठून निघून जातात. सेवक एकेक लाइट बंद करुन कोर्टरूमचा दरवाजा लाऊन घेतो..आणि निघून जातो. अंधुक प्रकाशातील कोर्टरूम आपल्याला दिसत राहते. आणि काहि क्षणांनंतर दिग्दर्शकाचं नाव झळकून चित्रपट संपतो. पुढचा कोर्टकेस अनेक वर्ष लोंबकाळत चालण्याचा भाग आपण कल्पनेनी ओळखायचा. या नोटवर शिनूमा खतम!
संपूर्ण चित्रण पहाताना एकसलग कथा असली तरी आपल्याला ती अत्यंत कंटाळवाणी होऊन जाते. मला वाटतं या न्यायपद्धतीच्या फेर्‍यात अडकल्यानंतर आपलं काय होऊ शकतं? याचा जीताजागता अनुभव कुठलाच मीठमसाला न लावता,आणि कसलाही परिणाम-साधायला न जाता,तो दिग्दर्शकानी आपल्याला दिलेला आहे. त्यामुळे 'आपण कोर्टकचेरीच्या फेर्‍यात अडकलो,तर आपल्या मनाला ते किती झेपेल? याचा प्रत्येकाला अनुभव घेण्यासाठी हा चित्रपट अगदी आदर्श आहे. त्यामुळे आपापल्या पचनशक्तीनुसार याचा प्रत्येक प्रेक्षकाचा अनुभव हा निराळाच होणार..हेच या चित्रपटाचं वेगळेपण आहे. मी आज दुपारी जेंव्हा हा चित्रपट बघितला,तेंव्हा मी बराचसा कंटाळलो. माझ्या हिशेबी मसालेभात खाणार्‍याला आजार्‍याची खिचडी मिळाल्यासारखी गत झाली. काही प्रेक्षक वैतागले..काही उठून गेले..काहि जण कचकाऊन कॉमेंट्स टाकून एंजॉय करून घेऊ लागले.. काहि जण बघूच आता..शेवटी तरी काहि असेल्,म्हणून बसून राहिले. पण शांतपणे पाहून समाधानी मनानी आमच्यापैकी जवळपास एकंही जण उठला नाही! हे या उत्कृष्ट भारतीय चित्रपट पुरस्कार विजेत्या चित्रपटाच यश आहे. आंम्हा उत्सवप्रीय भारतीयांना असा चित्रपट,अशी मांडणी मनापासून आवडायला अजून शंभर वर्ष तरी नक्की आहेत.

अनुप ढेरे's picture

6 May 2015 - 8:26 pm | अनुप ढेरे

सेवक एकेक लाइट बंद करुन कोर्टरूमचा दरवाजा लाऊन घेतो..आणि निघून जातो. अंधुक प्रकाशातील कोर्टरूम आपल्याला दिसत राहते. आणि काहि क्षणांनंतर दिग्दर्शकाचं नाव झळकून चित्रपट संपतो.

अर्धवट पाहिला काय सिनेमा. कारण तो लाइट बंद होण्याचा सीन शेवटचा नाही. त्यानंतरही साधारण ५ मिनिटाचा सिनेमा आहे आणि ती ५ मिनिटंही अफलातून आहेत.

अत्रुप्त आत्मा's picture

6 May 2015 - 8:38 pm | अत्रुप्त आत्मा

हाइल्ला! सच क्या?

आम्ही आपले ती मंद लाइट मधली कोर्ट रूम आणि दिग्दर्श्काचं नाव आल्या आल्या उठलो!
सांगा ना पुढे काय आहे ते! प्लीज!!!!

समीरसूर's picture

6 May 2015 - 9:11 pm | समीरसूर

त्यानंतर न्यायाधीश सहलीला जातात; ज्योतिषविषयक सल्ले देतात आणि मग चित्रपट संपतो...

अत्रुप्त आत्मा's picture

6 May 2015 - 11:09 pm | अत्रुप्त आत्मा

अरे हो..हो! रैट्ट. तो न्यायाधीश बागेत सकाळी पेंगत असतो. मुलं येऊन "भ्भो" करतात.मग तो त्यांच्यातल्या एकाला मारतो.. आणि मग संपतो शिनूमा. मी इसरूनच गेलो होतो.. म्हटलं ना आपल्या सिनेमॅटीक माईंडसेटपच्या बाहेरचा सिनेमा आहे. मला शेवट म्हणून ही श्टोरी आर्धी र्‍हायल्या सारखा प्रसंग एंडिंगला आहे..हे रिकलेक्टच नाही झालं. :(

स्वाती दिनेश's picture

6 May 2015 - 7:58 pm | स्वाती दिनेश

घाऊक माहिती हातात आलेली आहे ह्या लेखाच्या रुपात.. आता जमेल तसे पाहते.
स्वाती

प्यारे१'s picture

6 May 2015 - 9:40 pm | प्यारे१

छान लेख खु(समीर)सूराण्णा. ;)

वरच्या यादीतले ब्योमकेश बक्षी नि बदलापूर पाहिलेत. ब्योमकेश ची प्रिन्ट फारशी सुखद नव्हती त्यामुळं नो कमेन्ट्स.
बदलापूर चित्रपटाची सुरुवात फार आवडली.
आवडली म्हणजे असं हे असं डोळ्यासमोर काहीतरी घडतंय इतकं नैसर्गिक वाटत राहतं.
दोन भिन्न विश्वांमधल्या व्यक्तींची योगायोगानं नि त्यांच्या दुर्दैवानं गाठ पडावी काहीतरी अतर्क्य नि कधी विचारच न केलेलं घडावं आणि त्यातून पुढचं सूडचक्र सातत्यानं सुरु रहावं असं काहीसं कथानक.
सगळ्यात वाईट म्हणजे नायक वागतो ते चित्रपट पाहताना फारसं खटकत नाही त्यामुळं नायकाबरोबर प्रेक्षक म्हणून आपण त्याच्या वागण्याचं नकळत समर्थन करत जातो. कथाभाग सांगावासा वाटत नाही तरीही पाच दहा मिनिटाच्या अवधीत होत्याचं नव्हतं होऊन आपली माणसं सोडून गेल्यावर बसणारा धक्का माणसाला कुठल्या पातळीवर नेऊ शकतो याचं सुंदर चित्रीकरण केलंय. काही भाग अंगावर येतो. त्यात समर्थनीय काही नसलं तरी स्वीकारार्ह आहे असंच मानावं लागतं.

बाकी शेवटच्या 'टायटल्स सॉन्ग' ;) द्वारे वरुण धवन आपल्याला 'मी अजून तरुण आहे हो' हे सांगून जातो.
(मला ते अनावश्यक वाटलं)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

7 May 2015 - 3:06 pm | निनाद मुक्काम प...

हंटर नाही का हो पाहिला
अमोल पालेकरांनी ७० ८० च्या दशकात ज्या जातकुळीचे सिनेमे दिले त्याच धाटणीचा मराठमोळ्या वातावरणात घडलेला मराठी कलाकारांच्या अभिनयाने समृद्ध व सफाईदार सरळ सध्या भाषेत मंदार पोक्षेचे गोष्ट पाहण्यासाठी हंटर नक्की पाहावा.
कोर्ट व हंटर च्या निमित्ताने दोन तरुण मराठी दिग्दर्शकांचे २०१५ ला इंडस्ट्री मध्ये दमदार पदार्पण झाले आहे.

कॉफी आणि बरंच काही... पाहिला. छान आहे. विषय नेहमीचाच असला तरी फ्रेश वाटतो. कुठेही कंटाळा येत नाही.

नाखु's picture

7 May 2015 - 4:36 pm | नाखु

रानभूलचे प्रयोग होत नाहीत कारण हे नाटकात जी भूमिका नार्वेकर करतो तीच स्व्.विनय आपटे करीत असे ऐकले आहे.
ख.खो.जा.प्रे.जा.
रामकृष्ण मोरे नाट्यागृहातील खोगीर भरती कारेक्रमांनी कावलेला
नाखु
आम्च्या भागात नाट्यगृहे नाहीत पण "राजकीय नाटकंच" फार चालतात.

हो .. मी पण दर शनिवारी पेपर मध्ये बघतो रामकृष्ण मोरे ला आहे का कुठले नाटक काय दरवेळेस मुड ऑफ

आता रानभूल बघितलेच पाहिजे असे वाटते.. तुम्ही थोडक्यात पण व्यवस्थीत सांगितले आहे.

कोर्ट पहायचा राहिला तो राहिला.. चुकुन या शनिवार- रविवारी असला थेटर मध्ये तर पाहिन.
ब्योमकेश बक्षी चांगला आहे हे मला आता कळाले... पाह्यला पाहिजे होता.. तेंव्हा fast and furious ७ पाहिला. तो पण मस्त होता
टीव्ही-लेपटॉप वर पिक्चर पहाणे मला आवडत नसल्याने कित्येक पिक्चर मी पाहिलेले नाहीत
विशेष वाटेल मी अजुल दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे आणि हम आपके है कोन हे पिक्चर पाहिलेले नाहीत ...
DDLG चा योग आला होता मुंबई सेंट्रल ला पण राहिला..