रात्ररंग..
चांदण्यांचे तेज सारे श्यामरंगी रंगले
मोगरीचे चांदणेही भूवरी या गंधले
शीळ घाली दाट रानी चांदवेडे पाखरू
क्षेम* द्यावी चांदण्याला स्वप्न त्याचे भंगले
सावळेसे होत पाणी बिंब दावी सावळे
काठसोडूनी जळी ते वृक्षही डोकावले
डोंगरांनी त्या नभाच्या शीर अंकी * ठेवले
ते उशाला चांदण्याचा हात घेण्या गुंतले
पिंपळाचा पार भासे होत बैरागी कुणी
सावळासा भार त्याचा ध्यान त्याचे सावळे
रानगंधाने जरी ही रात्र सारी दाटली
रातराणी हासली नी गात्र सारे धुंदले
(क्षेम : मिठी, अंकी : मांडीवर)
- प्राजु
प्रतिक्रिया
23 Nov 2008 - 10:01 am | मदनबाण
रानगंधाने जरी ही रात्र सारी दाटली
रातराणी हासली नी गात्र सारे धुंदले
मस्त... :)
मदनबाण.....
हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर
23 Nov 2008 - 10:05 am | मनिष
आणि "धुंद होते शब्द सारे" च्या चालीवर म्हणता पण येते. सुरेख कविता प्राजु!
23 Nov 2008 - 12:29 pm | जयवी
प्राजु....ऐकतच नाहियेस अगदी.... एकदम सुसाट निघालीयेस :)
डोंगरांनी त्या नभाच्या शीर अंकी * ठेवले
ते उशाला चांदण्याचा हात घेण्या गुंतले
......... क्या बात है !!
अख्खीच्या अख्खी आवडली..... अप्रतिम !!
23 Nov 2008 - 3:42 pm | आपला अभिजित
कवितेचं गाणं झाल्याखेरीज आपल्याला त्यातलं घंटा काही कळत नाही. तरीपण कविता गेय वाटली. छान आहे.
तू एखादा संग्रह का काढत नाहीस प्राजु?
(अवांतर : बंदुकीतलंही मला ओ की ठो कळत नाही!)
- अभिजित.
http://www.abhipendharkar.blogspot.com/
23 Nov 2008 - 6:11 pm | मीनल
रानगंधाने दाटलेल्या रात्री ढगांच्या मांडीवर चांदण्याची उशी करून झोपलेले डोंगर आवडले.
मीनल.
23 Nov 2008 - 9:54 pm | टवाळचिखलू
क्रुष्णाचा प्रभाव आहे का ?
23 Nov 2008 - 10:03 pm | सागरलहरी
कवितेत रूमानी झांक आहे, तरल कल्पनारम्य कविता
(पिंपळाच्या फांदीवरचा लहरी बैरागी) सागर
24 Nov 2008 - 3:43 am | नंदन
>>> ते उशाला चांदण्याचा हात घेण्या गुंतले
- क्या बात है!
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
24 Nov 2008 - 9:43 am | प्राजु
सर्वांचे मनापासून आभार.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
24 Nov 2008 - 10:03 am | विसोबा खेचर
सावळेसे होत पाणी बिंब दावी सावळे
काठसोडूनी जळी ते वृक्षही डोकावले
पिंपळाचा पार भासे होत बैरागी कुणी
सावळासा भार त्याचा ध्यान त्याचे सावळे
वा! क्या बात है..
प्राजू, जियो..!
तात्या.
24 Nov 2008 - 12:14 pm | राघव
शीळ घाली दाट रानी चांदवेडे पाखरू
क्षेम* द्यावी चांदण्याला स्वप्न त्याचे भंगले
सुंदर! सगळी कविताच अतिशय बोलकी आहे!
मुमुक्षु
25 Nov 2008 - 10:52 am | विसुनाना
सावळेसे होत पाणी बिंब दावी सावळे
काठसोडूनी जळी ते वृक्षही डोकावले
पिंपळाचा पार भासे होत बैरागी कुणी
सावळासा भार त्याचा ध्यान त्याचे सावळे
ही कडवी अप्रतिम. कविता खूप आवडली.
डोंगरांनी त्या नभाच्या शीर अंकी * ठेवले
ते उशाला चांदण्याचा हात घेण्या गुंतले
कल्पना आवडली. शब्दरचना थोडी अनघड वाटली.
25 Nov 2008 - 11:18 am | दत्ता काळे
डोंगरांनी त्या नभाच्या शीर अंकी * ठेवले
ते उशाला चांदण्याचा हात घेण्या गुंतले
वा, वा काय सुंदर कल्पना आहे.
प्राजुताई,
खरंच "जे न देखे रवी", ते तुम्ही पाहीले
25 Nov 2008 - 5:20 pm | चतुरंग
सावळेसे होत पाणी बिंब दावी सावळे
काठसोडूनी जळी ते वृक्षही डोकावले
डोंगरांनी त्या नभाच्या शीर अंकी * ठेवले
ते उशाला चांदण्याचा हात घेण्या गुंतले
हे खासच!
चतुरंग
25 Nov 2008 - 7:43 pm | शितल
प्राजु,
रानगंधाने जरी ही रात्र सारी दाटली
रातराणी हासली नी गात्र सारे धुंदले
सुंदर रचले आहेस. :)
25 Nov 2008 - 7:47 pm | लिखाळ
संपूर्ण कविता आवडली..
>ते उशाला चांदण्याचा हात घेण्या गुंतले<
फार सुंदर..
-- लिखाळ.
25 Nov 2008 - 8:33 pm | वाटाड्या...
कवितेच्या बाबतीत अगदीच औरंगजेब असण्यार्या मला सुद्धा कविता आवडली...विशेषतः ...
रानगंधाने जरी ही रात्र सारी दाटली
रातराणी हासली नी गात्र सारे धुंदले
अगदी डोळ्यासमोर रात्रराणी उभी राहीली...
मुकुल...