रुतलेल्या सहस्त्र जखमा
मी सांभाळतो उराशी
रुदनाचे सोयर तुटले
मज खंत ना जराशी
आक्रोश ना कदापी
ना द्रोह जीवनाशी
अजुनी सजीव आहे
ना राग हा तुझ्याशी
गाऊ नको वॄथा तू
माझी मलाच गाणी
वांझोट्या स्वप्नांनीही
मानले रिक्त हे पाणी
जा सोड इथेच आता
चल मोह पाश तोडू
झेपेना स्पर्ष हताचा
खपली नकोस काढू
प्रतिक्रिया
6 Nov 2008 - 12:28 pm | राघव
झेपेना स्पर्श हाताचा
खपली नकोस काढू
या ओळी छान आहेत.. पण एकंदरीत कविता आणखी सोपी केलीत समजायला तर चांगले होईल. :)
मुमुक्षु
11 Nov 2008 - 8:15 pm | भास्कर केन्डे
मुमुक्षु,
प्रतिसादाबद्दल आभार! आपल्या मागणीनुसार यापुढे सोपे लिहायचा प्रयत्न करीन. या कवितेबद्दच्या आशयाबद्दल...
एका दुखावलेल्या मनाची व्यथा सांगताना कवीला म्हणायचे आहे की जरी त्याला अनेक जखमा झालेल्या असल्या तरी तो रडत बसलेला नाही वा खंतही करत नाही... (पहिले कडवे)
सगळे त्रास सहन करत मी अद्याप जिवंत आहे हा तुझ्यावर राग नाही असे म्हणताना तो असे दर्शवतो आहे की तिने त्याला असे काही झिडकारले आहे की जणू त्याला मरण हाच योग्य न्याय होईल (दुसरे कडवे).
ते मन पूर्वी स्वप्नाळू होते, अशावादी होते जे अजूनही त्याला आशा/स्वप्न दाखवण्याचा प्रयत्न करते आहे. तेव्हा हा त्या मनाला म्हणतो की उगीच ही खोटी आशा आता मला तू दाखवू नको. "व्यथा" हा शब्द व्यर्थ या अर्थाने वापरला आहे (कडवे तिसरे).
जगण्याचे सगळे मोह पाश तोडून मुक्त होण्याचा निर्धार व्यक्त करताना तो आता म्हणत आहे की उगीच सांत्वन करायचा प्रयत्न करु नकोस. त्याने आठवणी जाग्या होऊन दु:खावरची खपली निघाल्यासारखे होते (अंतिम कडवे).
11 Nov 2008 - 9:16 pm | कपिल काळे
व्यथा एवजी वॄथा चालले असते का?
व्यथा मुळे... तू तुझी व्यथा सांगू नकोस... माझी गाणी मला पुरेशी आहेत असं काहिसं वाटतंय
http://kalekapil.blogspot.com/
18 Nov 2008 - 9:52 pm | भास्कर केन्डे
हो नक्कीच चालले असते. सल्ला मनापासून आवडला. योग्य तो बदल केला आहे.
आपला,
(आभारी) भास्कर
आम्ही येथे वसतो.
6 Nov 2008 - 3:54 pm | मनीषा
आक्रोश ना कदापी
ना द्रोह जीवनाशी
अजुनी सजीव आहे
ना राग हा तुझ्याशी ... छान आहे!