स्पष्टवक्ता की भ्रष्टवक्ता ?

Primary tabs

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
10 Mar 2015 - 3:26 pm

आधीच "सुखी" असलेले स्पष्टवक्ते "स्पष्टवक्ता सुखी भव" या म्हणीमुळे आणखीनच सुखावतात आणि त्यांना चेव चढतो.
ही म्हण तयार करणारांनी फक्त एकतर्फी विचार केलेला आहे. म्हणजे त्यांनी या तथाकथित स्वयंघोषित स्पष्टवक्ते लोकांच्या बोलण्याची शिकार झालेल्या बिचार्‍या बापुड्या श्रोत्यांचा विचार केलेलाच नाही.
म्हणून सर्वप्रथम मी ही अपूर्ण म्हण पूर्ण करतो ती अशी:
"स्पष्टवक्ता सुखी भव । कष्टश्रोता दु:खी भव ।"
स्पष्टवक्ते लोकांच्या बोलण्याची शिकार झालेल्या आणि त्यामुळे दु:खी कष्टी झालेल्या बिचार्‍या बापुड्या श्रोत्यांना आपण "कष्टश्रोता" म्हणूया! आता मुख्य मुद्दा असा की या लोकांना स्पष्ट बोलण्याचा जन्मजात ठेका आणि अधिकार कुणी दिला?
ते लोक स्पष्ट बोलतात याचा अर्थ ते सत्यच बोलत आहेत असा होत नाही. स्पष्टवक्ता हा सत्यवक्ता असेलच असे जरूरी नाही. बहुतेक वेळा असत्यवक्ता हा स्पष्टवक्तेपणाचा बुरखा घालून आपले असत्य पुढे दामटण्याचा आणि सत्यात रूपांतर करण्याचा प्रयत्न करत असतो.
स्पष्टवक्ता बरेचदा इतरांचे दुर्गुण त्यांच्यासमोर स्पष्ट करून सांगतो. पण दुर्गुण सांगताना उफाळून येणारा यांचा स्पष्टपणा गुण सांगताना कुठे जातो? येथेच स्पष्टवक्ता चूक करतो. तो इतरांचे फक्त दुर्गुण लक्षात आणून देण्याचा आपल्याला जन्मजात परवाना मिळाल्यासारखा वागतो आणि त्यालाच स्पष्टवक्तेपणा समजतो.इतरांचा आत्मविश्वास असूयेपोटी आणि द्वेषापोटी कमी करण्यासाठी तो "स्पष्टवक्तेपणाचे" हत्यार वापरतो. मग त्याला स्पष्टवक्ता न म्हणता भ्रष्टवक्ता म्हणणे योग्य ठरेल आणि त्या श्रोत्यांना त्रस्तश्रोते म्हणूया.
कुणीही परिपूर्ण नसतो. मग हे स्पष्टवक्ते तरी परिपूर्ण असतात का? मग त्यांचे दुर्गुण त्यांना कोण सांगणार?
बिचारे सर्वच लोक हे लगेचच स्पष्टवक्त्यांसारखे "आले मेंदूतून आणि सुटले जिभेतून" असे करत नाहीत. सगळेच लोक स्पष्टवक्ते झाले तर भांडणे होतील आणि वाद विवाद माजतील. इतर लोक स्पष्ट बोलत नाहीत याचा अर्थ त्यांच्यात स्पष्ट बोलण्याची हिंमत नसते असे नाही, तर ते समोरच्याच्या मनाचा दहा वेळा विचार करतात, म्हणून ते गप्प असतात. तुम्ही तुमच्या आजूबाजूला असलेल्या अशा स्वत:ला स्पष्टवक्ते म्हणवून घेणाऱ्या लोकांचा अभ्यास करा आणि पहा. तुमच्या एक लक्षात येईल की ते फक्त स्वत:च स्पष्ट बोलतात. दुसऱ्याला स्पष्ट बोलू देत नाहीत. काही स्पष्टवक्ते (भ्रष्टवक्ते) अधिकाराने किंवा वयाने मोठे असल्याच्या कारणाखाली इतर स्पष्टवक्त्यांचा स्पष्ट बोलण्याचा अधिकार हिरावतात किंवा त्यांची मुस्कटदाबी करतात. अशा स्पष्ट वक्ते लोकांची आपण निंदा करायला हवी आणि त्यांना स्पष्ट बोलून त्यांची जागा दाखवायलाच हवी. आपण स्पष्ट वक्ते नसलो तरी तेवढ्यापुरते स्पष्ट बोलून त्यांना नामोहरम केलेच पाहिजे.
"भ्रष्टवक्ता निंदनीय भव | त्रस्तश्रोता वंदनीय भाव ||"
स्पष्टवक्तेपणा असावा पण तो पूर्वग्रहदूषित नसावा आणि तो फक्त कटूपणाकडे, टीकेकडे न झुकता तो "कटू/सत्य/टीका आणि गोड/सत्य/कौतुक" याचे संतुलन असावा अथवा तो नसलेलाच बरा!

म्हणीसमाजजीवनमानतंत्रविचार

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

10 Mar 2015 - 3:47 pm | आनन्दा

वा वा.. आवडले.

-- एक त्रस्तश्रोता

भिंगरी's picture

10 Mar 2015 - 3:55 pm | भिंगरी

"आले मेंदूतून आणि सुटले जिभेतून"
आजच चेपूवर वाचले,"जिभ जेंव्हा ओव्हरटाईम करत असेल तर मेंदू नक्की संपावर आहे."

अन्या दातार's picture

10 Mar 2015 - 4:05 pm | अन्या दातार

एक लंबर!!

निमिष सोनार, मला तुमचे लेख लै म्हन्जे लै म्हन्जे लैच आवडतात. पुलेशु.

निश's picture

10 Mar 2015 - 5:24 pm | निश

लेख चांगला आहे.

अत्रन्गि पाउस's picture

10 Mar 2015 - 5:42 pm | अत्रन्गि पाउस

सुरेख ...

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Mar 2015 - 6:09 pm | डॉ सुहास म्हात्रे

चांगले विचार !

सद्या राजकारण आणि समाजकारण करण्याच्या बुरख्याखाली अश्या स्पष्टवक्त्या कांगावाखोरांची फौज तयार झाली आहे. पण त्याला कारण आपण सर्वसामान्य जनताच आहोत. आपल्यातला स्वार्थीपणा स्वतःचा स्वार्थ साधला जात आहे असे वाटले तर अश्या कांगाव्याचे दृश्य अथवा लूक राहून समरथन करत असतो. सर्वसामान्य मानसाचा हा दुटप्पीपणा थांबला तर कांगावाखोर स्पष्टवाक्तेपणाची दुकाने आपोआप बंद होतील. तोपर्यंत हे सगळे असेच चालू होते, चालू आहे आणि चालू राहील :(

पॉइंट ब्लँक's picture

10 Mar 2015 - 11:25 pm | पॉइंट ब्लँक

स्पष्टवक्ते पणाला तुम्ही फार स्पष्टवक्तेपणे विरोध केला आहे. त्यामुळे लेखातील निकष लेखाला लागू करून, त्याच्या हेतूवर प्रश्नचिन्ह लावता येइल. (लावावेच असे म्हणत नाही.)
मुद्दा असा आहे की, स्पष्टवक्तेपणा आणि गोड बोलने ही दोन्ही कौशल्य आहेत. त्याचा उपयोग कसा होतो हे संदर्भावर अवलंबून आहे. त्यामुळे मांड्णीच्या पलिकडे जावून, एखाच्या वक्तव्याचा/विचाराचा न्यायनिवाडा जर करता नाहि आला तर स्पष्ट्वक्ते आणि गोड बोलणारे अशा दोन्ही प्रकारचे लोक आपली फसवणूक करू शकतात.

निमिष सोनार's picture

11 Mar 2015 - 6:57 am | निमिष सोनार

मी लेखाच्या शेवटी म्हटले आहे की:
"अशा स्पष्ट वक्ते लोकांची आपण निंदा करायला हवी आणि त्यांना स्पष्ट बोलून त्यांची जागा दाखवायलाच हवी. आपण स्पष्ट वक्ते नसलो तरी तेवढ्यापुरते स्पष्ट बोलून त्यांना नामोहरम केलेच पाहिजे."
मी या लेखातून तेच तर केले आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

11 Mar 2015 - 8:07 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

चांगल्या गोष्टींच्या बाबतीत स्पष्टवक्ता असणं खुप चांगलं असतं. मी स्वतः स्पष्टवक्ता आहे. कितीतरी वेळा स्पष्टवक्तेपणामुळे फायदा व्हायच्या ऐवजी तोटाही होतो, लोकही दुखावले जातात हे मला समजतं. पण हा स्वभाव मला बदलायची इच्छाही नाही आणि मी ठरवलं तरीही बदलता येणार नाही.

कांगावाखोर स्पष्टवक्त्या लोकांबद्दलचं तुमचं मत पटलं.

सत्यं ब्रूयात प्रियं ब्रूयात न ब्रूयात सत्यमप्रियम्.

निमिष सोनार's picture

11 Mar 2015 - 6:51 pm | निमिष सोनार

अर्थ सांगा ना!