विष्णुगुप्त - १

पुष्कर's picture
पुष्कर in जनातलं, मनातलं
18 Dec 2007 - 10:59 am

सकाळची सूर्याची कोवळी किरणं डोळ्यांवर येण्यापूर्वीच विष्णु झोपेतून जागा झाला. अजून सूर्योदय व्हायचा होता, तरी थोडासा उजेड होता. समोरच्या रस्त्यावर फार काही वर्दळ नव्हती. गवळ्यांचे पाय गोरसदोहनाकरिता गोठ्याकडे वळले होते. काही गृहिणी कमरेवर घागर घेऊन पाण्यासाठी सिंधूतीरावर निघाल्या होत्या. काही नागरिक सूर्यदर्शनाकरिता घराबाहेर पडले होते. कोंबड्याच्या आरवण्याखेरीज इतर पक्ष्यांनीही आपल्या कूजनाने सूर्योदयाची चाहूल दिली होती. त्या थोड्याश्या नीळसर तांबूस प्रकाशानेही रात्री चमकणार्‍या तारामंडलांना आकाशातून नाहीसं करून टाकलं होतं. दूर पश्चिम क्षितिजावर अजूनही चंद्र फिकट मंद दिसत होता.

पण विष्णूला या कशाचच काही नव्हतं. कशाने तरी झपाटल्यासारखा तो उठला. आपल्या अंगावरची वस्त्रं हातानेच वरच्यावर झाडल्यासारखी केली. बरोबर आणलेल्या तुटपुंज्या सामानाची झोळी त्याने खांद्यावर टाकली आणि तडक त्या धर्मशाळेच्या बाहेर पडला. आजूबाजूला एकवार नजर टाकून त्याने दिशांचा अंदाज घेतला आणि पश्चिम दिशेच्या रोखाने वाट फुटेल तशी पावलं टाकू लागला. इतर नगरजनांसाठी ती सकाळ नेहमीसारखीच होती,पण विष्णूच्या आयुष्यातला हा एक महत्त्वाचा दिवस होता. इतका अपार आनंद, एवढा उत्साह आणि इतकी पराकोटीला गेलेली उत्सुकता त्याने यापूर्वी कधीच अनुभवली नव्हती. शेवटी न राहवून त्याने समोरून येणार्‍या गृहस्थाला विचारलं,"महाशय, कृपया मला तक्षशिला विद्यालयाकडे कोणता मार्ग जातो, ते दाखवाल का?"

त्या गृहस्थाने एकदा विष्णूला डोक्यापासून पायापर्यंत न्याहाळलं. अनेक दिवसांच्या प्रवासाने शिणलेली काया, जीर्ण वस्त्र, खांद्यावर अडकवलेली तुटपुंज्या सामानाची झोळी पण चेहरा मात्र अत्यंत तेजस्वी, शोधक नजर असलेले बोलके डोळे, तरतरीत नाक, मोठ्ठं कपाळ आणि डोक्यावरून रुळणारी शेंडी अश्या त्या किशोरवयीन मुलाला पाहून त्या गृहस्थाला मोठी गंमत वाटली. लगेचच योग्य त्या दिशेला त्याने अंगुलीनिर्देश केला. "धन्यवाद महाशय", विष्णु म्हणाला. "शुभास्ते पंथानः", त्या पथिकाने जाता जाता आशिर्वाद दिला. पण ते ऐकायला विष्णूला वेळ कुठे होता? त्याचा अंगुलीनिर्देश पाहताच विष्णूने त्या दिशेने झपाझप पावले टाकायला सुरुवातही केली होती.

तक्षशिला विश्वविद्यालय जसं जवळ येत चाललं तशी विष्णूच्या मनातली उत्सुकता आणखीनच वाढायला लागली. पावलांबरोबरच हृदयाच्या ठोक्यांची गतीही वाढली. डोळ्यांमध्ये एक वेगळीच चमक दिसू लागली."तक्षशिला! माझं किती दिवसांपासूनचं स्वप्न! या विश्वविद्यालयात केवळ आर्यावर्तातूनच नव्हे तर इतर राष्ट्रांमधूनही अनेक विद्यार्थी विद्यार्जनासाठी येतात म्हणे. इथले आचार्यसुद्धा अतिशय कुशल, बुद्धिवान, अनेक विषयांमध्ये पारंगत. कशी असेल इथली शिक्षणव्यवस्था? कसे असतील इथले विद्यार्थी? त्यांच्यामध्ये आपल्यासारखेच विचार असलेले, आपल्याशी मिळताजुळता स्वभाव असलेले मित्र आपल्याला मिळतील का? ह्या विद्यालयात सर्व चौदा विद्या आणि चौसष्ठ कलांचं शिक्षण एका वेळी कसं चालत असेल? इथे आचार्य तरी किती असतील?" अश्या कितीतरी प्रश्नांनी विष्णूच्या मनात काल रात्रीपासून कोलाहल माजवला होता आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळण्याची वेळ समीप येऊन ठेपली होती.

चालता चालता विष्णू नगराच्या बर्‍यापैकी बाहेरच्या बाजूला आला. त्याला आता बाकी कशाचं भानच राहिलं नव्हतं. आता त्याला समोर दिसत होतं ते फक्त एक मोठ्ठं प्रवेशद्वार आणि त्याच्यापुढे दाट झाडीतून गेलेली एक छोटीशी पायवाट. भराभर पावलं टाकत तो त्या प्रवेशद्वारापाशी येऊन थबकला.

त्याला पाहून द्वारपालांनी त्याला हटकलं, "काय रे, काय नाव तुझं?". पण विष्णूचं त्यांच्याकडे लक्षच नव्हतं. समोरच्या दाट झाडीतून पलिकडे दूरवर तिमजली इमारतीच्या दिसणार्‍या एका कळसाकडे तो टक लावून बघत होता. द्वारपालांच्या त्या प्रश्नावर त्याच्याही नकळत त्याच्या भुवया उंचावल्या गेल्या, अभावितपणे ओठ उघडले आणि शब्द बाहेर पडले, "माझं नाव 'चाणक्य'. मी मगध देशातून इथे उच्चशिक्षणासाठी आलो आहे."

कथाइतिहास

प्रतिक्रिया

अवलिया's picture

18 Dec 2007 - 2:37 pm | अवलिया

आपण अतिशय सुंदर विषय निवडला आहे.

चाणक्य मालिके मुळे ही व्यक्तिरेखा अनेक लोकांना माहित झाली असली तरी तिचे कार्य व त्याचे आजही असलेले अपरंपार महत्व ब-याच लोकांना उमजत नाही.

चाणक्याचे अर्थशास्त्रावरील अनेक मते आज लोकांना कदाचित पटणार नाहित कारण चलन स्वरुपातील पैसाच श्रेष्ठ मानण्याची अमेरीकन अर्थशास्त्रज्ञांचीच री आज जग ओढत आहे. त्यातुनच अमेरीकेचे उखळ पांढरे होत आहे ही गोष्ट अलाहिदा.

परंतु सोने नाणे यासहीत चल अचल संपत्ती तसेच पशुपक्षी हे सजीव या सर्वांना मिळुन वित्त संबोधावे तसेच कमीतकमी किंमत मोजुन बाहेरिल वस्तु देशात याव्या व देशातील वस्तु बाहेर जातांना त्यांना जास्तीत जास्त किंमत मिळावी. याचबरोबर देशांतर्गत व्यवहार स्वयंपुर्ण असावा याचा आग्रही चाणक्य ....
विचार करा ..भारतीय चाणक्याचे विचार अमेरीकनांनी उचलले व इतर जगाला उल्लु बनविले.

आपण त्याच्या अर्थशास्त्रीय पैलुवर काही लेखन केले तर ते नक्कीच उपयक्त ठरेल असे मला मनापासुन वाटते.

शुभेच्छा

नाना

विसोबा खेचर's picture

18 Dec 2007 - 3:40 pm | विसोबा खेचर

नानासाहेबांचा प्रतिसाद आवडला...

आपण त्याच्या अर्थशास्त्रीय पैलुवर काही लेखन केले तर ते नक्कीच उपयक्त ठरेल असे मला मनापासुन वाटते.

पुष्कररावांनी या गोष्टीवर अवश्य विचार करावा असे वाटते!

तात्या.

पुष्कर's picture

26 Dec 2007 - 9:16 am | पुष्कर

प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
"आपण त्याच्या अर्थशास्त्रीय पैलुवर काही लेखन केले तर ते नक्कीच उपयक्त ठरेल असे मला मनापासुन वाटते."
नक्कीच. मी सुरुवातीला वर्णनात्मक अंगाने हे लिखाण करायचं ठरवलं होतं, पण अश्या विषयावर लिहिताना आणखीन जबाबदारीने लिहिण्याची गरज आहे असं वाटतं. मला कौटिलीय अर्थशास्त्राबाबतीत आणखीन अभ्यासाची गरज आहे. तुमचं मार्गदर्शन मिळालं तर बरंच होईल.

पुन्हा एकदा धन्यवाद.

सृष्टीलावण्या's picture

26 Mar 2008 - 8:53 am | सृष्टीलावण्या

हा आपला चणुकबुवा म्हणतो... पैसा हेच पैश्याला खेचून आणणारे खरे नक्षत्र आहे व त्यासाठी
आकाशातील नक्षत्रे पाहाणे हा बालीशपणा आहे...

>
>
मराठियांची पोरे आम्ही, नाही भिणार मरणाला ।
सांगून गेला तो शिवराया, हे अवघ्या विश्वाला ।।

अप्पा जोगळेकर's picture

3 Jul 2010 - 11:40 am | अप्पा जोगळेकर

परंतु सोने नाणे यासहीत चल अचल संपत्ती तसेच पशुपक्षी हे सजीव या सर्वांना मिळुन वित्त संबोधावे
याचा अर्थ आज वस्तुविनिमय आणावा असा तर नाही ना. म्हणजे एक कोंबडी द्या आणि पसाभर धान्य आणा. एक हार्डडिस्क द्या आणि बदल्यात एक आयपॉड आणा असं झालं तर अवघड होईल.

चलन स्वरुपातील पैसाच श्रेष्ठ मानण्याची अमेरीकन अर्थशास्त्रज्ञांचीच री आज जग ओढत आहे.
इसवी सनपूर्व ३३० च्या आगेमागे जे जे करणे योग्य होते उत्तम होते ते चाणक्याने केले, चंद्रगुप्ताने केले. म्हणूनच ते थोर आहेत. त्यांनी तेंव्हा जे लिहिले ते त्रिकालाबाधित सत्य कसे असेल? आज चलन स्वरुपातील पैसा श्रेष्ठ मानू नये तर काय श्रेष्ठ मानावे. नुसता गोंधळ झालाय. तुम्हाला काय म्हणायचे आहे ते जरा अधिक नीट स्पष्ट कराल का?

विसोबा खेचर's picture

18 Dec 2007 - 3:31 pm | विसोबा खेचर

छान लिहिले आहे. पुढील भागांची उत्सुकता आहे..
सध्याच्यापेक्षा थोडे मोठे भाग लिहिलेत तर अधिक बरे होईल...

अवांतर -

गवळ्यांचे पाय गोरसदोहनाकरिता गोठ्याकडे वळले होते.

दूध काढण्याला 'गोरसदोहन' म्हणतात, हे माहीत नव्हते!

असो,

आपला,
(मुंबई विद्यापिठात शिकलेला!) तात्या.

पुष्कर's picture

26 Dec 2007 - 9:22 am | पुष्कर

तात्या. तुमचा प्रतिसाद वाचून हुरूप आला.

सध्याच्यापेक्षा थोडे मोठे भाग लिहिलेत तर अधिक बरे होईल...
हम्म्म. खरंय तुमचं. मलापण हा भाग जरा छोटाच वाटला. पण वेळ मिळत नसल्याकारणाने अनेक दिवस कंटाळून शेवटी तयार झालेला छोटाच भाग प्रकाशित करून टाकला. बघा ना, आता तुमच्या प्रतिसादाला उप-प्रतिसाद द्यायलाही मी किती वेळ लावला! आम्च्या नशिबात 'मोकळा वेळ' आणि 'आंतरजाल सुविधेची उपलब्धता' ह्या दोन्ही गोष्टी एकत्र येणं तसं दुर्मिळच.

पुढचे भाग प्रकाशित करण्यापूर्वी तुमच्या सूचनेचा नक्कीच विचार करीन.

सागर's picture

18 Dec 2007 - 6:41 pm | सागर

पुष्कर महोदय,

खूपच सुंदर विषयास तुम्ही हात घातला आहे. मी देखील चाणक्य भक्त आहे.
पुढील भागांची उत्सुकतेने वाट पहात आहे. असेच छान लिहीत रहा.

तुम्ही योग्य ती तयारी आणि अभ्यास केला असेलच. तरी आवडीचा विषय असल्यामुळे थोडीशी भर टाकू इच्छीतो
पुढील ग्रंथ तुम्हांस मिळाले तर संदर्भासाठी त्याचा नक्की चांगला उपयोग होईल आणि तुमची ही सुंदर कथा अधिक अर्थपूर्ण होईल.
बारीकसारीक तपशीलांनी कथानकास विद्वत्तेचा साज चढतो असे मी मानतो.

कौटिलीय अर्थशास्त्र - ब.रा. हिवरगांवकर (यांच्याइतका अधिक उपयोगी दुसरा ग्रंथ कौटीलिय अर्थशास्त्रावर उपलब्ध नाही.)
अशोक आणि मौर्यांचा र्‍हास - शरावती शिरगांवकर
भारतवर्षाचा इतिहास - गुंडोपंत हरिभक्त
चाणक्य (कादंबरी) - आनंद साधले
चाणक्य (कादंबरी) - भा.द.खेर
आर्य चाणक्य (कादंबरी) - लेखकाचे ओठावरचे नाव विसरलो :(

असो... वाटले म्हणून लिहीले...
(चाणक्यभक्त ) सागर

पुष्कर's picture

26 Dec 2007 - 9:09 am | पुष्कर

सागर साहेब, आपला मनापासून आभारी आहे. तुमचा या विषयावरचा व्यासंग खूप मोठा आहे असं दिसतंय. तुम्ही दिलेल्या यादीमधली "आर्य चाणक्य" ही भा.द.खेरांची कादंबरी मी वाचली आहे. हिवरगांवकरांचं "कौटिलीय अर्थशास्त्र" मी खूप दुकानांमध्ये शोधलं. मिळालं नाही.

तुमच्याकडून मला या विषयावर आणखी माहिती मिळवायला नक्कीच आवडेल.

-पुष्कर

पुष्कर,

ब.रा. हिवरगांवकर यांचे कौटिलिय अर्थशास्त्र विकत घ्यावयाचे झाल्यास पुण्यात अप्पा बळवंत चौकात रसिक साहित्य वा उज्वल ग्रंथ भांडार यांच्याकडे नक्की मिळेल.
आणि ग्रंथालयात हवे असेल तर पुणे मराठी ग्रंथालय व पुणे नगर वाचन मंदीर या दोन्ही ग्रंथालयात हे पुस्तक नक्की आहे (मी सदस्य असताना हे पुस्तक पहिल्यांदा नगर वाचन मंदीरातूनच घेतले होते).
तुम्ही मुंबईत असाल तर मुंबईच्या बर्‍यापैकी जुन्या वा मोठ्या ग्रंथालयात हे पुस्तक मिळेल असे वाटते.
या माहितीचा कदाचित उपयोग होईलसे वाटते...
धन्यवाद
सागर

अप्पा जोगळेकर's picture

3 Jul 2010 - 11:33 am | अप्पा जोगळेकर

उत्तम लिखाण चालू आहे. 'सहा सोनेरी पाने' आणि रोमिला थापर यांचे 'अर्ली हिस्टरी ' पण उपयोगी पडू शकेल. आणि अर्थातच पंडित नेहरुंचे 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' सुद्धा.

स्वाती दिनेश's picture

18 Dec 2007 - 8:23 pm | स्वाती दिनेश

चाणक्यावर वाचायला नक्कीच आवडेल.
सुरूवात छान झाली आहे,पुढील भाग लवकर टाका.
स्वाती

ऋषिकेश's picture

18 Dec 2007 - 8:37 pm | ऋषिकेश

वा वा! पुढिल लेखन ललित अंगाने जाऊन अर्थशास्त्रातील कठिण तत्त्वांवर/सिद्धांतांवर सुलभतेने भाष्य करेल ही अपेक्षा. पुढिल लेखनास अनेक शुभेच्छा!
(उत्सुक) ऋषिकेश

सुनील's picture

18 Dec 2007 - 8:57 pm | सुनील

सुरुवात छान झाली आहे. पुढील भागांच्या प्रतीक्षेत...

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सहज's picture

19 Dec 2007 - 7:24 am | सहज

सहमत

पुष्कर's picture

26 Dec 2007 - 9:26 am | पुष्कर

स्वाती, ऋषिकेश, सुनील आणि सहज, तुमचा उत्साहवर्धक प्रतिसाद वाचून खूप बरं वाटलं. आता पुढचे भाग लवकरच टाकतो.

-(उत्साही) पुष्कर

देवदत्त's picture

18 Dec 2007 - 10:50 pm | देवदत्त

छान विषय निवडलात.
ह्यावर वाचनास मजा येईल. येउ द्या मस्त लिखाण ह्यावर.

एक शंका:
काही गृहिणी कमरेवर घागर घेऊन पाण्यासाठी सिंधूतीरावर निघाल्या होत्या. काही नागरिक सूर्यदर्शनाकरिता घराबाहेर पडले होते.
नेमके शब्द काय असावेत ते आठवत नाही पण ह्यात गृहिणी व नागरिक हे शब्द काहिसे विसंगत वाटतात. हे दोन शब्द आजकालच्या जगातील दृष्ये दाखविण्यात जास्त हातभार लावतात असे वाटते, राजाच्या काळात विसंगत वाटतात.

जुना अभिजित's picture

20 Dec 2007 - 2:06 pm | जुना अभिजित

नागरिक ठीक आहे पण तरीही प्रजाजन चपखल वाटला असता.

घागरः घडे

ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

अवलिया's picture

27 Dec 2007 - 6:04 pm | अवलिया

नागरिक ठीक आहे पण तरीही प्रजाजन चपखल वाटला असता.

पौरजन व जानपद हे त्याकाळचे प्रचलित शब्द आहेत

नाना

पुष्कर's picture

26 Dec 2007 - 9:41 am | पुष्कर

छान विषय निवडलात.
धन्यवाद.

येउ द्या मस्त लिखाण ह्यावर.
लवकरच आणतो.

नेमके शब्द काय असावेत ते आठवत नाही पण ह्यात गृहिणी व नागरिक हे शब्द काहिसे विसंगत वाटतात.
तुमची शंका योग्य आहे. पण माझ्या मते हे शब्द बरोबरच आहेत. तक्षशिला नगरात राहणारे ते 'नागरिक'. यालाच 'नगरजन' असाही शब्द आहे. सध्या आपण ''स्वतंत्र भारताचे नागरिक" हा शब्दप्रयोग वापरून वापरून चोथा केला आहे. त्यामुळे कदाचित तो शब्द आपल्याला काल-विसंगत वाटत असावा.
त्याच प्रमाणे 'गृहस्थ आणि गृहिणी' हे शब्दही जुने आहेत. आपण सध्या फक्त नोकरी न करणार्‍या स्त्रियांना 'गृहिणी' म्हणतो. तो अर्थ इथे अभिप्रेत नाही. 'गृहस्थाश्रमी स्त्री' अर्थात 'गृहिणी'.

मोठा डॉन उर्फ अभिजीतने सुचवलेला 'प्रजाजन' हा शब्दही बरोबर आहे. तुम्हाला 'नागरिक' आवडला नसेल तर 'नगरजन' किंवा 'प्रजाजन' असं वाचा.

बेसनलाडू's picture

18 Dec 2007 - 11:07 pm | बेसनलाडू

आणि छान सुरुवात.
पुढील भाग वाचायची उत्सुकता वाढली आहे.
(उत्सुक)बेसनलाडू

पुष्कर's picture

26 Dec 2007 - 9:42 am | पुष्कर

तुमचा आभारी आहे. पुढचे भाग लवकरच टाकतो.

धनंजय's picture

19 Dec 2007 - 12:45 am | धनंजय

आणि तपशीलवार प्रसंगवर्णनासाठी कल्पनाविलास लागतो, हे आहेच. काही कल्पना कालबाह्य असतील, पण फार बाऊ करून घेऊ नका. थोडी काळाजी घेतली तरी पुरते. काही केले तरी या साहित्यप्रकारात रंजकता हरवता कामा नये. ते ध्यानात ठेवून ऐतिहासिक नेमकेपणा काही प्रमाणात दुय्यम मानावा. (बायकांनी पोलकी घातली तरी काही हरकत नाही, वगैरे, वगैरे.)
लगे रहिए.

पुष्कर's picture

26 Dec 2007 - 9:47 am | पुष्कर

हेच डोक्यात आहे माझ्या. तुम्ही अगदी नेमकं ओळखलंत. पुढचे भाग तयार करता करता आणखीन अभ्यासही चालू आहे ह्या विषयावर.

(बायकांनी पोलकी घातली तरी काही हरकत नाही, वगैरे, वगैरे.)

हे वाक्य खूप आवडलं. :-)

-(चावट) पुष्कर

प्राजु's picture

19 Dec 2007 - 1:35 am | प्राजु

आनंद झालाय एकदम..
खूप दिवसांनी मिपावर काहीतरी चांगले वाचायला मिळाले आहे. पुढील भागांच्या प्रतिक्षेत.
लवकर लिहा. तात्यांसारखे ( आळशीपणा )करू नका...

- प्राजु.

पुष्कर's picture

26 Dec 2007 - 9:50 am | पुष्कर

खूप दिवसांनी मिपावर काहीतरी चांगले वाचायला मिळाले आहे.
माझं अहोभाग्य.

पुढील भागांच्या प्रतिक्षेत.

तुम्हाला फार प्रतिक्षा करायला लावणार नाही.

तात्यांसारखे ( आळशीपणा )करू नका...
खरंय, पण मी सुद्धा थोडा आळशी आहे बरं का. :-)

-(आळशी) पुष्कर

जुना अभिजित's picture

19 Dec 2007 - 9:11 am | जुना अभिजित

कथा साधारण माहित असली तरी पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या लेखकांच्या नजरेतून वाचण्याची मजा काही औरच असते.

छान लिहीताय. पुढचे भाग येऊ द्या पटापट.

ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Dec 2007 - 9:35 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पुढील भागाच्या प्रतिक्षेत !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुधीर कांदळकर's picture

27 Dec 2007 - 5:29 pm | सुधीर कांदळकर

पुढील भागांची वाट पाहात आहे.

बापु देवकर's picture

26 Mar 2008 - 11:58 am | बापु देवकर

पुढील भागांची आतुरर्तेने वाट पहात आहे.....

राज....

पुष्कर's picture

2 Jul 2010 - 11:26 am | पुष्कर

सर्व प्रथम मी सर्वांची क्षमा मागतो, कारण दुसरा भाग प्रकाशित करायला मी दीड वर्ष घालवलं. सुचत नव्हतं हे पहिलं कारण, आणि सुचलं तेव्हा वेळ मिळेना हे दुसरं कारण. आता दुसरा भाग टाकला आहे. वाचून बघणे - विष्णुगुप्त - २