लोकहो,
वृत्तबद्ध काव्य ज्यांना लिहायचे आहे त्यांनी एक एक वृत्तावर प्रभुत्व मिळवावे. एकदम भाराभर वृत्ते समोर घेऊन बसू नये. त्यातही तीन पायर्या आहेत.
सर्वप्रथम
१) छंदांवर प्रभुत्व मिळवावे.
त्यानंतर
२) छंदात लिहिणे जमू लागले की जातींमध्ये लिहायला सुरूवात करावी.
आणि शेवटी
३) जातींमध्ये लिहिता यायला लागले की मग अक्षरगणवृत्तात लिहिण्याच्या पायरीवर जावे.
एकदम सुरूवातच मालिनी किंवा शार्दूलविक्रीडित सारख्या वृत्तांची निवड केल्यास जमणार काहीही नाही आणि त्यातून फ्रस्ट्रेशनमात्र भरपूर येईल. एवढं येईल की ते आयुष्यभर पुरेल. म्हणून पायरीपायरीने वृत्तबद्ध काव्य लिहिण्याचा सराव करावा.
वर उल्लेख केलेला छंद म्हणजे नेमके काय? छंद म्हणजे अक्षरांच्या संख्येचे वृत्त. एका ओळीत किती अक्षरे यावीत? याचे विविध नियम बनवून वेगवेगळे छंद निर्माण झाले आहेत. यामध्ये केवळ अक्षरांच्या संख्येला महत्व आहे. लघुगुरू क्रम किंवा मात्रा छंदात विचारात घेतल्या जात नाहीत. केवळ अक्षरसंख्या.
छंदातील प्रत्येक अक्षर हे गुरू समजले जाते. त्याचे उच्चारण साधारणपणे दीर्घ असते. या विविध छंदांपैकी एक अत्यंत सोपा आणि अत्यंत मधुर छंद म्हणजे देवद्वार छंद. ज्ञानेश्वरांच्या हरिपाठात हा छंद आहे. हरिपाठाच्या पहिल्या अभंगाची सुरूवात "देवाचिये द्वारी , उभा क्षणभरी' अशी आहे. त्यामुळे या छंदाला "देवद्वार छंद" असे नाव आहे.
या छंदाच्या रचनेत प्रत्येक चरण म्हणजे ओळ ही सहा अक्षरांची असते. पहिल्या तीन ओळी सहा अक्षरांच्या आणि चौथी ओळ ही चार अक्षरांची. म्हणजे देवद्वार छंदाचे नोटेशन असे लिहावे लागेल.
६....६.....६.....४
यात दुसर्या आणि तिसर्या ओळीचा यमक असतो. हे नीट लक्षात ठेवावे. उदाहरणार्थ हरिपाठाचा अभंग पहा
देवाचिये द्वारी
उभा क्षणभरी
तेणे मुक्ती चारी
साधियेल्या ||
काही ठिकाणी पहिल्या तीन ओळीचे यमक जुळवले जाते. जसे ज्ञानेश्वर महाराजांनी वरच्या चरणात केले आहे. आमचे स्नेही श्री. इलाही जमादार यांनीही पहिल्या तीन ओळींचा यमक त्यांच्या कवितेत घेतला आहे. उदाहरणार्थ
चंदनाची काया
सुगंधाची छाया
अत्तराचा फाया
माझी प्रिया ||
पण या छंदात लिहितांना तसे करणे आवश्यक नाही हे लक्षात ठेवावे. केवळ दोन व तीन या ओळींचा यमक पुरेसा आहे. कवीने त्याची हौस म्हणून पहिल्या तीन ओळींचा यमक जुळविल्यास उत्तम. पण ते अपरिहार्य नाही. दुसर्या व तिसर्या ओळीचा यमक अपरिहार्य आहे. ग्रेसची देवद्वार छंदातली ही कविता पहा.
उठा दयाघना
लावा निरांजने
देहातले सोने
काय झाले?
झोपेतले जीव
झोपेतच मेले
आभाळची गेले
पंखापाशी
इथे नागव्याने
शोधावा आचार
जैसा व्यभिचार
जोगिणीचा
गोंजारून घे ना
माझे हे लांछन
रक्ताला दूषण
देण्यासाठी
हा अत्यंत सोपा छंद आहे. विलक्षण गोड आणि मोहक आहे. वृत्तबद्ध लेखनाचा अभ्यास या छंदापासून केल्यास उत्तम पकड काव्यावर यायला मदत होईल.
या छंदातील आमच्या एका शृंगारिक कवितेतील दोन कडवी :-
मीलनाचा मंत्र
जपे सांजवेळ
प्रीतिचे मोहोळ
उठलेले
देही चमकते
वासनेची वीज
सुनी सुनी शेज
तुझ्याविना
निर्दोष काव्यलेखनासाठी शुभेच्छा.
धोंडोपंत
प्रतिक्रिया
8 Nov 2008 - 4:04 pm | सहज
धोंडोपंत सांगे
साधत यमक
मात्राही अचुक
काव्य करा
छंद आणी मात्रा
सांगे सर्वजना
डोलवत माना
करु काव्य
लागलाहो आता
वृत्ताचा हा छंद
बघा मतिमंद
लिहताहे
आवडला लेख
गद्य करी पद्य
देतो हा नैवेद्य
धोंडोपंता
:-)
8 Nov 2008 - 5:13 pm | घाटावरचे भट
नाही आम्हा ठावे
वृत्त आणि छंद
आणि ताळेबंद
गण मात्रा
केला हरीपाठ
कितीक वेळेला
छंद ना दिसला
त्यात काही
धोंडोपंतें मात्र
स्वच्छ केली धूळ
दाखविलें मूळ
देवद्वार
धोंडोपंत ज्ञानी
'सहज' लिहिती
माझी सहमती
भटू म्हणे
-(किंचित कवी) भटोबा :)
8 Nov 2008 - 7:07 pm | धोंडोपंत
वा वा वा वा,
झकास. आमचे लेखन सार्थकी लागले.
आपला,
(संतुष्ट) धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com
(जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)
11 Nov 2008 - 11:22 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लागलाहो आता
वृत्ताचा हा छंद
बघा मतिमंद
लिहताहे
हा हा हा हहपुवा =))
लिहित राहा. छंदा ,मात्रा च्या कवितेसाठी हार्दिक शुभेच्छा !!!
-दिलीप बिरुटे
(कोणताच छंद नसलेला )
8 Nov 2008 - 5:04 pm | मनीषा
माझ्यासारख्या हौशी कविता करणार्याना (...पण त्यातले फारसे काही न कळणार्यां साठी) खूपच उपयोगी !
तुमच्या पुढील धड्याची वाट पहात आहे .
8 Nov 2008 - 7:00 pm | धोंडोपंत
या देवद्वार छंदातील आमची एक कविता. ही कविता पूर्वी मराठी संस्थळावर प्रसिद्ध झाली आहे. आम्ही कोकणी कसे?????? तर आम्ही असे
आम्ही ही कोकणी
माणसे सामान्य
नको असामान्य
जीणे आम्हा
हवी आम्हां फक्त
थंडीला शेकोटी
गांडीला लंगोटी
आम्ही सुखी
भोजना मिळू दे
दोन वेळा भात
पान आणि कात
थुंकायला
आनंदाचा क्षण
येता जरी पहा
पिऊ अर्धा चहा
टपरीत
नाही परदेशी
केले पर्यटन
आमुचा कोकण
आम्हा प्यारा
रेवस पावस
खेड चिपळूण
लांजा मालवण
स्वर्ग आम्हा
गरम चहाचा
कप अंगणात
हगावे बागेत
पोफळीच्या
किर्र किर्र वाजे
खळ्यात रहाट
नागमोडी वाट
समुद्राची
अथांग सागर
कोकणा लाभला
जगाला वाटला
हेवा त्याचा
समृद्धी सुबत्ता
येई ना कोकणा
हाचि परगणा
दुष्काळाचा
पुरेनाच अन्न
भूक वरदान
तरी समाधान
चित्तालागी
जसे शांतपणे
आलो या जगात
जाऊ ही स्वर्गात
शांतपणे
आपला,
(कोकण्या) धोंडोपंत
टीप -- वरील कवितेत आलेले दोन ग्राम्य शब्द हे असेच कोकणात बोलले जातात. त्यामुळे ते तसेच्या तसेच आले आहेत. अर्थात संपूर्ण कविता किंवा ती दोन कडवी पटावरून उडविण्याचा अधिकार संपादक मंडळाला आहे आणि आम्ही तो मानतो.
आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com
(जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)
8 Nov 2008 - 7:06 pm | मदनबाण
व्वा पंत,,सुंदर रचना... अजुनही परत परत वाचावे वाटते.
मदनबाण.....
हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर
8 Nov 2008 - 7:20 pm | मीनल
मराठी व्याकरणाची उजळणी झाली. विसरायलाच झाले होते.
खूप आवडले.
अजून खूप उजळणी बाकी आहे. येऊ द्या.
मीनल.
8 Nov 2008 - 7:25 pm | अवलिया
अतिव सुंदर
पंताचे लेखन
करुन वाचन
धन्य झालो
कराया घेतली
छोटीशी रचना
करुनी वंदना
धोंडोपंता
नाना म्हणे पंता
मनीची कामना
करता लेखना
पुर्ण झाली
नाना
8 Nov 2008 - 7:39 pm | मदनबाण
भय्येच दिसती
मज सर्वत्रच
हाणा एकत्रच
या सर्वासी
वसुन इथेच
करी घाण फार
आता तरी तार
मुंबईस
चालु यादव हा
करी बोंबा बोंब
पेटलाच डोंब
मुंबईत
हाकलावे यांस
त्वरित इथुन
काठीच घालुन
पेकाटात
राज म्हणे आज
योग्यच ही रीत
आम्ही नाही भीत
या लोकांसी
माझाही एक क्षुद्र प्रयत्न...
मदनबाण.....
हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर
8 Nov 2008 - 7:44 pm | धोंडोपंत
अप्रतिम. चालू द्या.
मजा येतेय एकाहून एक सरस कविता वाचायला.
(गद्याचे तुकडे करून त्याला कविता समजून चघळण्याची तिडीक असलेला) धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com
(जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)
8 Nov 2008 - 7:48 pm | विनायक प्रभू
मी पण कविता करु का? इतके दिवस भिती वाटायची. पंताचे गाईड असेल तर मी पण कविता करीन म्हणतो. विषय काय घ्यावा बरे?
वी.डी.(की वेडा) प्रभु
9 Nov 2008 - 9:55 pm | ब्रिटिश
जल्ला कोंबडीचे पीसावर बसाला जमत आसल त कवीता म्हन्जे डाव्या हातचा मळ
हि परतीक्रिया तात्याला ईचारून टाकलीय
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)
8 Nov 2008 - 9:56 pm | बेसनलाडू
आणि माहितीपूर्ण मारदर्शनपर लेखन पंत!
(विद्यार्थी)बेसनलाडू
8 Nov 2008 - 10:08 pm | धोंडोपंत
धन्यवाद बेला,
काही वर्षांपूर्वीचा "त्या तिकडे" केलेला प्रयोग आठवत असेलच. इथे मिपा वर लेखन सुरक्षित राहील कारण हे आपलेच घर.
तुम्ही विद्यार्थी कसले तुम्ही दिग्गज. आधी छंद मग जाती मग वृत्ते असा हा विषय घेऊन जायचा मनसुबा आहे.
तुमचा सक्रीय सहभाग या विषयात अपेक्षित आहे.
आपला,
(छंदवेडा) धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com
(जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)
9 Nov 2008 - 2:24 am | बेसनलाडू
छंदशिक्षण आणि वृत्तशिक्षणाचा हा बेत आवडला पंत.
परिचयाच्या रचना गुणगुणल्याने संबंधित छंद/वृत्त इ. अधिक जवळचे वाटू लागते, हे सोदाहरण स्पष्ट केलेलेही आवडले.
(छंदवेडा)
सक्रीय सहभागी व्हायला नक्कीच आवडेल. त्या दृष्टीने काय करायचा बेत आहे, हे सांगावे.
(उपक्रमी)बेसनलाडू
9 Nov 2008 - 9:13 am | धोंडोपंत
सुरूवातीस छंदांबद्दल लेखन करू. एकदा छंद झाले की मग जाती घेऊ आणि शेवटी वृत्त. अशा रितीने वाटून घेऊ. देवद्वार झाला. पुढील छंद आपण घ्यावा.
धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com
(जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)
9 Nov 2008 - 7:34 pm | बेसनलाडू
उपक्रमात सहभागी व्हायची संधी मिळवून दिल्याबद्दल धन्यवाद.
(आभारी)बेसनलाडू
दिवसा-दोन दिवसात अनुष्टुभ छंदाबद्दल लिहायचा मानस आहे. लेखनात काही त्रुटी आढळल्यास संपादकीय अधिकार किंवा प्रतिसाद माध्यमाचा वापर करून दूर कराव्यात ही नम्र विनंती.
(छंदवेडा)बेसनलाडू
8 Nov 2008 - 10:16 pm | ऋषिकेश
माझाहि एक प्रयत्न:
--------------------
झाली हो दिवाळी
कंदिल काढुया
कामास लागुया
नित्यनेमे
पुन्हा ते ऑफीस
तो रामरगाडा
नेहेमीचा पाढा
चालु झाला
एकाएकी पुन्हा
उजळली रात्र
थरारले गात्र
आनंदाने
जागोजागी मग
रोषणाई झाली
स्वरांची दिवाळी
पुन्हा आली
भारताचे रत्न
संबोधी शासन
जाहला पावन
पुरस्कार
स्वरांचा भास्कर
राहो तळपत
इच्छा ही मनात
सदोदित
अवांतर:
जाहला आनंद
धन्यु! धोंडोपंत
जुनी माझी खंत
दूर केली
-(छंदी ;)) ऋषिकेश
8 Nov 2008 - 10:22 pm | धोंडोपंत
वा छान.
लिहीत रहा. शब्द आपोआप येतील.
तो पहा लागला अर्थ बोलायला
शब्द येतील त्यांना पुकारू नये
नाव माझे फुलांनी विचारू नये
नाव सांगेन तेव्हा शहारू नये
---सुरेश भट
आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com
(जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)
9 Nov 2008 - 8:27 pm | ऋषिकेश
वा! बहोत खुब!
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
8 Nov 2008 - 10:17 pm | धोंडोपंत
कोणत्याही वृत्ताचा , छंदाचा अभ्यास करतांना आपल्याला माहित असलेल्या त्या छंदातील रचना सतत गुणगुणाव्या, म्हणजे ते वृत्त अंगी भिनते.
एकदा त्या छंदाची लय रक्तात भिनली की भविष्यकाळात सुचणार्या कविता आपोआप स्वत:चे नेमके वृत्त घेऊनच येतात. त्यासाठी काही खटाटोप करावा लागत नाही. ते काव्य जिवंत असतं. कारण ते थेट हृदयातून कागदावर उतरतं.
गुणगुणण्याच्या सरावासाठी देवद्वार छंदातील काही अत्यंत लोकप्रिय उदाहरणे.
१)
ओंकार स्वरूपा
सद्गुरू समर्था
अनाथांच्या नाथा
तुज नमो......
२)
वेदांसी कानडा
श्रुतींसी कानडा
विठ्ठल उघडा
पंढरीये
३)
काया ही पंढरी
आत्मा हा विठ्ठल
नांदतो केवळ
पांडुरंग
४)
रात्रंदिन आंम्हा
युद्धाचा प्रसंग
अंतर्बाह्य जग
आणि मन
५)
इंद्रायणी काठी
देवाची आळंदी
लागली समाधी
ज्ञानेशाची
मागे पुढे दाटे
ज्ञानाचा उजेड
अंगणात झाड
कैवल्याचे
उजेडी राहिले
उजेड होऊन
निवृत्ती सोपान
मुक्ताबाई
आपला,
(सोदाहरण) धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com
(जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)
9 Nov 2008 - 2:21 am | सुवर्णमयी
वा कविवर्य,
या उपक्रमाबद्दल आणि माहितीबद्दल धन्यवाद. मिपावरील छंदोबद्ध लेखन करणार्यांना / करण्याची इच्छा असणार्या सर्वांना या माहितीचा उपयोगच होईल. माझ्या वृत्तबद्ध लेखन करण्याच्या धडपडीची सुरुवात झाली आणि त्यात सुधारणा व्हाव्यात असे वाटून मला मित्रमंडळींनी आपणहून मार्गदर्शन केले.
धोंडोपंत,
मनोगतावर वृत्ताच्या माहितीची आणि तुम्ही दिलेल्या प्रतिसादांची मुद्रणे अजूनही माझ्याकडे आहेत. अष्टाक्षरी मध्ये मी काही कविता केल्या पण त्या अष्टाक्षरीची नेमकी ओळख धोंडोपंतानी करुन दिली त्याचा इथे उल्लेख केलाच पाहिजे. माझे तोडके मोडके लेखन वाचून त्यांनी नेहमी प्रोत्साहन दिले आणि मार्गदर्शन केले आहे. त्यांचे असेच मार्गदर्शन सर्व मिपाकरांनाही मिळो.
-सोनाली
माझ्या ओठी यावे
देवा तुझे नाव
देवराया धाव
लवकरी!
9 Nov 2008 - 9:16 am | धोंडोपंत
धन्यवाद सोनाली,
छंदशास्त्राच्या दिंडीत स्वागत. छंदोबद्ध काव्य रुजविण्यासाठी हा यज्ञ आहे. तुमच्याकडूनही समिधा अपेक्षित आहेत.
आपला,
(याज्ञिक) धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com
(जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)
9 Nov 2008 - 4:45 pm | विसोबा खेचर
हे काय? इतक्यातच मिपावर पुन्हा फेर्या सुरू?
अजून पुढल्या दिवाळीला बराच वेळ आहे! :)
धोंड्या, दे रे बाबा एखादा लेख पुढल्या दिवाळी अंकाकरता! :)
आपला,
(दयाळू कोकणी!) तात्या देवगडकर.
8 Nov 2008 - 11:45 pm | पद्मश्री चित्रे
छान आणि सोप्प्या भाषेत छंद समजावला आहे.
मी एकदम अक्षर गण वृतात लिहिण्याचा प्रयत्न करत होते, कदाचित त्यामुळेच "जमत नाही" असं मलाच वाटत होतं... (आणि ते प्रयत्न पण बंद झाले हळू हळू..)
आता असा प्रयत्न करून पाहीन..
9 Nov 2008 - 9:17 am | धोंडोपंत
धन्यवाद. लेखनासाठी शुभेच्छा.
धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com
(जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)
8 Nov 2008 - 11:49 pm | कपिल काळे
एकलेंचपणा
संपेलच आतां
जाईन भारतां
माझ्या गावां
अमेरिका वारी
एकाकी जीवन
कसलें मरण
पैशापोटीं.
माझ्या लेखनाने
दिली मला साथ
करितोहो बात
मनासवें.
मित्रही लाभले
उत्तम अनेक
हिरा हा प्रत्येक
पारखिलां.
कपिलच्या मना
ओढ ही लागते
मायभूं दिसते
स्वप्नांमध्यें.
पिंजरा सोनेरी
टाळू येणे कसें
मन वेडेपिसें
करितोहां
माझ्या ब्लॉग नक्की वाचा
http://kalekapil.blogspot.com/
9 Nov 2008 - 12:05 am | धोंडोपंत
वा कपिलराव,
उत्तम छंदबद्ध पद्धतीने भावना मांडल्या आहेत तुम्ही. खूपच प्रभावी लेखन. छंदातील काव्य वाचायला किती छान वाटतं.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com
(जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)
9 Nov 2008 - 9:47 am | विसोबा खेचर
पंतांचे कौतुक
करावे तितुके
असेचि थोडके
तात्या म्हणे!
पंत, अतिशय स्तुत्य उपक्रम..!
आपण मिपावर सुरू केलेला हा उपक्रम काव्याचा काही अभ्यास करू पाहणार्यांना निश्चितच सहाय्यभूत होईल असा आमचा विश्वास आहे...
मनापासून शुभेच्छा, अभिनंदन आणि कौतुक..!
तात्या.
9 Nov 2008 - 11:24 am | अरुण मनोहर
थोर धोंडोपंत
छंद उकलले
तात्यांनाही दिले
काव्यमंत्र!
अगोदर आम्ही
कविता मानून
केले छंद खून
पाप भारी!
शहाणे करून
आम्हा सगळ्यांना
केले चारोळ्यांना
दोषमुक्त!
बाकिही हुन्नर
शिकवा आम्हाला
मानूहो तुम्हाला
गुरूस्थानी!
10 Nov 2008 - 11:51 am | दिपोटी
मिसळपावाचा
किती हा आनंद
छंदांचा हा छंद
असे भारी !
सारे करी यत्न
करुनी वंदन
आणिक नमन
धोंडोपंतां !
छंदबध्द काव्य
भारीतसे मन
एकच कवन
अमुचेही !
- दिपोटी
10 Nov 2008 - 2:02 am | तुषार जोशी
प्रकल्प फार आवडला
(कधीतरीच येणारा)
तुषार
11 Nov 2008 - 10:53 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
देवोनिया हाळी
जागवतो रात
झोंबतो गारवा
शेतामधे
जोडोनिया नाते
सांधली चिंधोटी
गणगोत माझे
मिपावर
माझीया मराठी
आवडे जगाला
संस्कृत बोलतो
कोण आता
लिहुन अभंग
दिला होता इथे
वाचक नव्हते
माझ्याघरी
छंदाचा, मात्रांचा
कंटाळा आम्हाला
गुरुजी आमुचे
धोंडोपंत
घालितो टाके
फाटले आयुष्य
पडतो आता
आरामात
सदरील छंदातील कविता थेट स्पर्धेत टाकली होती, परिक्षकांनी पाहण्याअगोदर आमच्या मित्रांनी सांगितले की जरा यमकात भानगड राहिली आहे, त्यामुळे तिकडून काढून इथे टाकली आहे. :)
11 Nov 2008 - 11:25 am | llपुण्याचे पेशवेll
पुण्याचा हा पोर
करोनी विचार
धरोनिया धीर
काव्य करें
पंते दावियेला
मार्ग हा सुकर
प्रकट विचार
मांडण्याचा
शब्दी जोडूनियां
शब्द हा वेगळा
अर्थही निराळा
स्फुरविल
पूर्वी अभ्यासिले
काव्य हे पुष्कळ
काहीच आकळ
तरिही ना
परि आता आस
अभ्यासिण्या छंद
अध्ययनानंद
निखळ हा
-पुण्याचे पेशवे
11 Nov 2008 - 5:03 pm | मानसी मनोज जोशी
खुप छान कल्पना आहे हि कविताही खुप छान आहेत
12 Dec 2008 - 10:50 pm | मिपाशुतोष
माझाही प्रयत्न!
पंती उघडले
'देवद्वार' आज
दाखविला मज
छंदमार्ग
गुरुंची पौर्णिमा
काव्याची साधना
शिष्य मज माना
धोंडोपंत
प्रतिक्रिया जरा
देतोय उशिरा
तरी माफ करा
एकवेळ
आता छंदांसवे
गिरकी घेईन
नेमेचि येईन
मिपावरी
आज फक्त आपला छंदकाव्यावरचा एक लेख वाचला.
आवडला, भावला
आणि गमला
पुढील लेख नक्की वाचेन!
आपला (शिष्योत्तम)
आशुतोष
4 Mar 2011 - 8:04 pm | गंगाधर मुटे
सुंदर लेख. धन्यवाद धोंडोपंत.
प्रा. बिरुटे सरांनी लिंक दिल्यामुळे देवद्वार या छंदाची आज ओळख झाली.
यापुर्वीही या छंदात काही रचना केल्या आहेत, छंदाचे मात्र नाव आणि नियम माहित नव्हते.
उदा.
बळीराजाचे ध्यान ....!!
या कवितेत नियम माहित नसल्यामुळे
६....६.....६.....४ हा नियम गडबडला आहे.
सुंदर ते ध्यान उभे बांधावरी
नांगर खांद्यावरी घेवोनिया..॥१॥
कासे पितांबर ते फ़ाटके धोतर
टायरचे खेटर पायामधी..॥२॥
तुळशीहार जणू घामाचीच धार
उन्हाला आधार पगडीचा..॥३॥
कवच-कुंडले छातीच्या बरगड्या
पोटीच्या आतड्या नृत्य करी..॥४॥
नैवेद्य-प्रसाद कांदा भाकरीचा
चेंदा मिरचीचा तोंडी लावी..॥५॥
आरतीला नाही त्याची रखुमाई
चारतसे गाई माळरानी..॥६॥
राजा शेतकरी बळीराज यावे
संघटित व्हावे अभयाने..॥७॥
गंगाधर मुटे
..............................................
त्याच प्रमाणे या खालील कवितेचे कोणत्या छंदाची साम्य आहे,
याविषयी कुणाला माहिती असेल तर अवश्य माहिती द्यावी.
सजणीचे रूप ...!!
रुपये पाहता लोचनी।
सुखी झाली ती साजणी ॥१॥
म्हणे व्यापारी बरवा।
म्हणे पगारी बरवा ॥२॥
शेती बागा त्याचे घरी।
परी नको शेतकरी ॥३॥
ऐसे सजणीचे रूप।
पदोपदी दिसे खूप ॥४॥
अभय म्हणे कास्तकारा।
डोहामधी डुबक्या मारा ॥५॥
गंगाधर मुटे
............**........... **............
मात्र खालील कविता/अभंग देवद्वार छंदामध्ये निर्दोष असावा असे वाटते.
१) शुभहस्ते पुजा : अभंग
प्रथम पुजेला । लालदीवा मस्त ॥
सत्ताधारी हस्त । कशाला रे ॥१॥
त्यांचे शुभ हस्त । कसे सांगा देवा ॥
हरामाचा मेवा । चाखती ते ॥२॥
लबाड लंपट । तयांची जमात ॥
माखलेले हात । रक्ताने गा ॥३॥
पाय तुझे कैसे । नाही विटाळले ॥
मन किटाळले । कैसे नाही ॥४॥
म्हणा काही देवा । आहे साटेलोटे ॥
अभयास वाटे । शंका तशी ॥५॥
गंगाधर मुटे
………… **………….. **…………
२) पंढरीचा राया : अभंग
पंढरीच्या राया । प्रभू दीननाथा ॥
टेकितो मी माथा । तुझे पायी ॥१॥
युगे किती उभा । एका विटेवरी ॥
येवुनी बाहेरी । पाहा जरा ॥२॥
बदलले जग । आणि माणसेही ॥
तशा देवताही । बदलल्या ॥३॥
कनकाच्या भिंती । सोन्याचे कळस ॥
सोन्याची हौस । देवालाही ॥४॥
त्यांचे भक्त बघा । विमानाने जाई ॥
आम्हा का रे पायी । बोलावतो ॥५॥
देव गरिबाचा । तू राहिला गरीब ॥
भक्तही गरीब । ठेविले तू ॥६॥
आम्हां का रे असा । गरिबीचा शाप ॥
असे काय पाप । आम्ही केले? ॥७॥
अभयाने देवा । करा नियोजन ॥
जेणे भक्तजन । सुखी होती ॥८॥
गंगाधर मुटे
………… **………….. **………….