उंटावरचे शहाणे की सरस्वतीची लेकरं?
शेती हा विषयच मोठा विचित्र आहे. या विषयात जितके खोलवर अध्ययन करत जावे तितके गुंते वाढत जातात. एक गुंता सोडवायला बघावं तर तो गुंता सुटायच्या आतच नवे दहा गुंते निर्माण व्हायला लागतात. शेतीच्या उभारणीत साहित्यविश्वाचे काय योगदान असेल याचा आज थोडासा अंदाज घ्यायला निघालो तर चिंतनाची गाडी पहिल्याच पायरीवर अडखळली. शेतीची दहापट अधोगती घडवून एकपट प्रगती झाल्याचं आज जे ठसठशीतपणे जाणवत आहे त्याला बर्यापैकी शेतीशी संबंधीत साहित्यविश्व आणि एकंदरीतच सृजनशीलतेची अपरिपक्व मोघमता कारणीभूत आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि शरद जोशी यांच्याखेरीज शेतीविषयाची नाडच कुणाला कळली नाही. रोगाचे योग्य निदान न करताच केले जाणारे औषधोपचार जसे रोग्याच्या जिवावर उठतात, कधीकधी चुकीच्या उपचारपद्धतीने जसा रोगी दगावतो अगदी तसेच शेतीमध्ये घडले आहे. शेतीच्या अधोगतीचे कारणच न कळल्याने साहित्यिकांनी जरी शुद्ध भावनेने शेतीच्या उन्नतीसाठी साहित्य निर्माण केले असले तरी ते काही तुरळक अपवाद सोडले तर अन्य साहित्यिकांचे शेतीविषयक किंवा शेतीसंबंधित साहित्य हे शेतीसाठी तारक कमी आणि मारकच जास्त ठरले आहे.
महात्मा ज्योतिबा फुले, शरद जोशी आणि काही तुरळक अपवाद वगळता शेतीविषयाला लाभलेले साहित्यिक, लेखक आणि शेतकीतज्ज्ञच मुळात उंटावरून शेळ्या हाकलणारे असल्याने ते शेती विषयाला न्याय देऊ शकलेले नाहीत, हे विधान मी अत्यंत जबाबदारी आणि सर्वांचा रोष पत्करण्याची मानसिक तयारी ठेवून करत आहे. शेती हा एकमेव विषय असा झाला आहे की, उठसूठ जो-तो स्वतःच्या पात्रतेचा अथवा आवाक्याचा विचार न करताच शेतीविषयक सल्ला द्यायला उतावीळ असतो. शेती विषयाचे आपल्याला प्रचंड ज्ञान आहे आणि त्यावर आपले मतप्रदर्शन करण्याचा जन्मसिद्धच अधिकार आहे, अशाच आविर्भावात प्रत्येक मनुष्य वावरत असतो. शेती हा कदाचित एकमेव विषय असेल जेथे सल्ला ऐकणार्यांची संख्या नगण्य आणि सल्ला देणार्यांची संख्या प्रचंड आहे.
एखाद्या रोगाची साथ आली तर जो-तो उठसूठ आपापले उपचारविषयक ज्ञान पाजळत फिरत नाही. आरोग्य शास्त्रातले तज्ज्ञ बोलतात आणि बाकीचे ऐकतात. कायदेविषयक गुंता असेल तर कायदेविषयक तज्ज्ञ बोलतात आणि बाकीचे ऐकतात. व्यापारामध्ये यशस्वी व्यापार्याचा शब्द प्रमाण मानला जातो. मात्र शेतीमध्ये अगदीच उलट आहे. शेतीमध्ये यशस्वी असलेल्या शेतकर्याला मूर्ख, अज्ञानी असे गृहीत धरून ज्याने कधीच शेती केली नाही, केली असेल तर निव्वळ शेतीच्या भरवशावर निदान सुपरक्लासवन अधिकार्याच्या तोडीचे जीवनमान उंचावून दाखवता आले नाही किंवा ज्याला भुईमुगाला शेंगा कुठे लागतात हे सुद्धा माहीत नसते तो सुद्धा स्वतःला शेतकीतज्ज्ञ समजून शेतकर्याचे प्रबोधन करायला अत्यंत उतावीळ असतो.
पण खरी मेख त्याही पुढे आहे. विशेषज्ञ डॉक्टरचा पेशा डॉक्टरकीच असतो. नामवंत कायदेतज्ज्ञाचा पेशा कायदेविषयाशीच संबंधीत असतो. शिक्षणतज्ज्ञ हा शिक्षणक्षेत्रातील वाटसरू असतो. किर्तन-पारायण करणारे तर प्रत्यक्ष संत बनून संतत्वाला साजेसे वर्तन करण्याचा प्रयत्न करतात. तद्वतच या सर्वांच्या उपजीविकेचे साधनसुद्धा त्यांच्या कार्यक्षेत्राशी संबंधितच असते. त्याच प्रमाणे या विषयातील साहित्यनिर्मिती करणारे, मार्गदर्शन करणारे अथवा उदबोधन करणारे त्या-त्या विषयातीलच कर्मयोगी असतात. ट्रकचा वाहनचालक आरोग्यशास्त्राशी संबंधीत पुस्तक लिहीत नाही. ढोलकीवादक कायदेविषयक पुस्तक लिहीत नाही, एखादी नृत्यांगना विद्यापीठाचा अभ्यासक्रम ठरवत नाही किंवा मासोळ्या विकून पोट भरणारा किर्तन करत नाही. शेती वगळता अन्य सर्व विषयामध्ये "आधी स्वतः करून दाखवले मग सांगितले" हेच सूत्र असताना शेतीत मात्र अगदी विपरित घडत असते.
विशेषज्ञ मास्तर उंटावरून शेळ्या हाकत नाही; हाती खडू घेऊन फळ्यावर लिहून दाखवतो. विशेषज्ञ डॉक्टर उंटावरून शेळ्या हाकत नाही; हाती कात्री घेऊन शस्त्रक्रिया करून दाखवतो, विशेषज्ञ वकील उंटावरून शेळ्या हाकत नाही; स्वतः न्यायाधीशासमोर बाजू मांडतो, विशेषज्ञ उद्योजक आपल्या उद्योगात प्रत्यक्ष सहभागी असतो. शेतीविषयात मात्र नेमके याच्या उलट घडत असते. शेती हा विषयच मोठा विचित्र आहे, इथे प्रत्यक्ष शेती कसणारा शेतकरी सोडून अन्य व्यवसायावर किंवा आयत्या शासकीय अनुदानावर उपजीविका करणारेच शेतकी तज्ज्ञ होतात. शेतीवर ज्याची उपजीविका अवलंबून नाही तो शेती साहित्याची निर्मिती करतो. ज्याला शेती करून स्वतःचे पोट जगवण्यात कधीच यश आले नाही तो "शेतीविषयक मार्गदर्शन’’ शिबिरात मार्गदर्शक म्हणून लांबलचक भाषण ठोकून देतो आणि मानधनाच्या स्वरूपात अर्थार्जन करून स्वतःचे पोट भरणारा इतरांना निसर्गशेतीचे सल्ले देत फिरतो. शेतकी तज्ज्ञ किंवा शेतकीविषयावर लिहिणारा साहित्यिक आपल्या हातात नांगर धरत नाही, विळा हातात घेऊन खुरपणी करत नाही, पाठीवर फवारा घेऊन फ़वारणी करत नाही. विशेषज्ञ डॉक्टर डॉक्टरकी करून जगत असतो, विशेषज्ञ वकील वकिली करून जगत असतो. विशेषज्ञ उद्योजक उद्योग करून जगत असतो त्याच न्यायाने स्वतः गहू, धान, बाजरी, दाळी, कापूस, सोयाबीन, कांदा यापैकी एखाद्या पिकाची शेती करून, त्याच शेतीवर आपला उदरनिर्वाह करून आणि इतर सर्व शेतकर्यांपेक्षा अधिक मिळकत मिळवून दाखवणारा शेतकरी तज्ज्ञ या संपूर्ण भारत देशात एकही सापडत नाही. झाडून सारेच्या सारे शेतकीतज्ज्ञ सरकारी पगारावर जगत असतात. त्यामुळे शेतकी तज्ज्ञ आणि शेतीसंबंधित साहित्यिक हे उंटावरचे शहाणेच असतात, असे थेट विधान केले तरी ते फारसे चुकीचे ठरणार नाही. शेतीचे विशेष आणि वास्तविक ज्ञान असल्याशिवाय उच्च प्रतीची आणि वास्तवाचे भान असणारी साहित्यनिर्मिती होऊ शकत नाही. हे आज ना उद्या, उद्या ना परवा, कधी ना कधीतरी सर्वांना मान्य करावेच लागेल आणि तो दिवस उजाडेपर्यंत शेतीला चांगले दिवस येण्याची हातावर हात ठेऊन प्रतिक्षा करत बसावे लागेल.
शेतीला केंद्रस्थानी ठेऊन विचार केला तर साहित्यविश्व परिपूर्ण नाही, हे विधान करताना मला अजिबात संकोच वाटत नाही. शेतीव्यवसायाचा सर्वांगीण विचार करणारे साहित्यच लिहिले गेलेले नाही. समजा एखाद्या नवतरुणाला नव्याने शेती करायची असेल तर त्याला सर्वंकश मार्गदर्शन करू शकेल किंवा शेती करताना त्याला साहित्याचा आधार घेऊन दमदारपणे वाटचाल करता येईल असे साहित्य उपलब्ध नाही. ज्या साहित्याचा शेतीच्या व्यावहारिक पातळीवर उपयोग नाही असे साहित्य मात्र साहित्य विपुल प्रमाणात लिहिले गेले आहे. शेती करायची असेल तर मशागत कशी करावी, कष्ट कसे करावे, आधीच गळत असलेला घाम आणखी कसा गाळावा, बियाणे कोणते वापरावे, फ़वारणी कोणती करावी एवढेच नव्हे तर राष्ट्रीयकृत बँकेतून कर्ज काढून आणखी कर्जबाजारी कसे व्हावे, याविषयी मार्गदर्शन करणारी, दिशानिर्देश देणारी पुस्तके रद्दीच्या भावात घाऊकपणे विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत; मात्र बँकेकडून कर्ज काढून बियाणे घेऊन ते मातीत पेरल्यानंतर, खते जमिनीत ओतल्यानंतर, कीटकनाशके फवारून हवेत गमावल्यानंतर जर अतिपावसाने किंवा कमी पावसाने शेतातील उभे पीक नेस्तनाबूत झाले आणि बँकेतून कर्जरुपाने आणलेले पैसे जर मातीत गेले, पाण्यात गेले किंवा हवेत गेले तर मग बँकेचे कर्ज फेडायला पैसे कुठून आणायचे याचे उत्तर देणारे एकही पुस्तक शेतकी तज्ज्ञांना आणि सरस्वतीच्या लेकरांना आजतागायत लिहिता आलेले नाही. शेतमालाचा उत्पादनखर्च कसा काढावा, कोणत्या पिकाचा उपादनखर्च किती येतो, कोणते पीक घेतले तर खर्च वजा जाता कीती रक्कम शिल्लक असू शकते याचा शास्त्रशुद्ध ताळेबंद उपलब्ध करून देणारे एकही पुस्तक आज उपलब्ध नाही.
शेती वगळता अन्य कोणताही व्यवसाय केला आणि व्यवसायावर जर कोणत्या कारणाने विपत्ती आली आणि मुद्दलसुद्धा नष्ट झाले तर विमाकंपनी कडून भरपाई मागावी, कोणता, कुठे आणि कसा फ़ॉर्म भरावा याची शिकवण देणारी पुस्तके आहेत. शेतीसाठी मात्र अशी पुस्तके उपलब्ध नाहीत. जर शेती वगळता अन्य कोणताही व्यवसाय कुठल्याही कारणाने पूर्णपणे तोट्यात गेला, दिवाळं निघालं तर त्याला दिवाळखोरी/व्यवसाय आजारी किंवा नादारी घोषित करायचा कायदेशीर मार्ग सांगणारी आणि त्या बिगरशेती व्यावसायिकाला संरक्षण देणारी कायद्याची चिक्कार पुस्तके उपलब्ध आहेत. मात्र सर्वांना समान न्यायाचं तत्त्व सांगणारी कायद्याची पुस्तके सुद्धा शेतकर्याच्या बाजूने उभी राहायला तयार नाही.
कल्पनाविश्वात रमणार्या आभासी शेतीसाहित्याचा प्रत्यक्ष शेतीक्षेत्राशी काहीही संबंध उरलेला नाही. साहित्यविश्व व शेतीमधली वास्तविकता यांचा कुठेही ताळमेळ बसत नाही. ज्या देशात बहुतांश जनतेचे उदरनिर्वाहाचे आणि उपजीविकेचे साधन शेती हेच आहे, त्याच देशात सर्वात जास्त उपेक्षा शेतीचीच व्हावी, हा दुर्दैवविलास आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक या क्षेत्राबरोबरच साहित्य क्षेत्रातही शेती क्षेत्राची पीछेहाट व्हावी, हे सुद्धा अत्यंत लाजिरवाणेच आहे. साहित्यातून समाजाच्या सामुहिकमनाचे वास्तव प्रतिबिंबित व्हायला हवे; पण मागील काही वर्षाचा साहित्यिक आढावा घेतला तर ते सुद्धा होताना दिसत नाही. गेल्या १५-२० वर्षांमध्ये लाखो शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत; पण त्याची दखल साहित्यक्षेत्राने घेतलेली नाही किंवा त्याचे प्रतिबिंब काही साहित्यात उमटलेले नाही. एक खैरलांजी प्रकरण झाले तर त्यावर शेकडो पुस्तके लिहिली गेली. दिल्लीत एका मुलीवर बलात्कार होऊन खून करण्यात आला तर शेकड्यांनी पुस्तके लिहिली जातात, मात्र; लाखो शेतकर्यांच्या आत्महत्या दखल घेण्याइतपतही साहित्यक्षेत्राला महत्त्वाच्या वाटत नाही. कारण काय? शेतकरी गरीब असतो म्हणून? की त्याच्याकडे पुस्तके विकत घेण्याची ऐपत नसते म्हणून? या दोन्ही प्रश्नाची उत्तरे ’होय’ अशीच येत असतील व ”खपणार तेच विकणार" हाच सरस्वतीच्या उपासकांचा अंतरस्थ हेतू असेल तर "साहित्य म्हणजे समाजाचा आरसा" ही उक्ती प्रत्यक्षात उतरेलच कशी? शेतकरी आत्महत्यांवर सर्वंकश प्रकाश टाकणारे, खोलवर अभ्यासपूर्ण मांडणी करून शेतकरी आत्महत्यांच्या कारणांचा शोध घेणारे आज एकही पुस्तक उपलब्ध नसणे ही बाब साहित्यक्षेत्र आणि सरस्वतीची लेकरं यांची पात्रता आणि प्रतिभेची उंची अजूनही अत्यंत खुजी आहे, हे स्पष्ट व्हायला पुरेसे आहे.
शेतीतील गरिबीचे, ग्रामीण भारतातील दुर्दशेचे खरेखुरे कारण सांगणारे आणि तशी अभ्यासपूर्ण मांडणी करून योग्य मूल्यमापन करणारे शरद जोशींचे लेखन वगळता काहीही अन्य लेखन साहित्यक्षेत्रात उपलब्ध नाही, ही उणीव साहित्यक्षेत्रात राहिलेली आहे, हे सत्य आहे. शेतीच्या दुर्दशेचे कारण सांगताना शेतकरी आळशी आहे, त्याला तंत्रज्ञानाचा योग्य वापर करता येत नाही, तो अज्ञानी आहे, तो व्यसनाधीन आहे अशा कांगावखोर आणि शास्त्रशुद्ध अर्थवादाचा लवलेश नसलेल्या लेखनापलीकडे साहित्याच्या महामेरूंना काही लिहिताच आलेले नाही. योग्य कारणाचा वेध घेऊन अभ्यासपूर्ण लेखन करण्यात साहित्यक्षेत्राने कुचराई केली ही पहिली चूक आणि जे लिहिले ते निखालस खोटे, अशास्त्रीय लिहिले ही दुसरी चूक.
असे गैर ती आत्महत्या कधीही, म्हणे कास्तकारास समजावुनी
परी कारणांचा जरा शोध घ्यावा, अशी सुज्ञता दाखवेना कुणी
शेतीला भाकड शेतकीतज्ज्ञांचा आणि शेती साहित्यिकांचा शून्य उपयोग आहे. कारण ह्या साहित्यिकांचे, लेखकांचे लेखन आणि मार्गदर्शन फ़ारतर विषाच्या बाटलीपर्यंत किंवा गळफ़ासाच्या दोरापर्यंत शेतकर्यांना पोहचवून देऊ शकते. शेतकर्यांच्या मुक्तीची गुरुकिल्ली यांनाच अजून गवसलेली नाही मग या मंडळींचे लेखन शेतकर्यांना मुक्तीचा मार्ग कसा दाखवू शकेल? तरीही शेतकर्यांना फुकटाचा नको तो सल्ला देणार्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. एक उंटावरचा शहाणा शेतकर्यांना उच्च तंत्रज्ञान वापरायला सांगतो, दुसरा उंटावरचा शहाणा शेतकर्यांना निसर्गशेती करायला सांगतो, तिसरा उंटावरचा शहाणा शेतकर्यांना जोडधंदे करायला सांगतो, चवथा उंटावरचा शहाणा शेतकर्यांना मार्केटिंग कशी करावी हे शिकवू पाहतो. त्यामुळे शेतकरी गोंधळतो एवढेच नव्हे तर या चारही प्रकारच्या उंटावरच्या शहाण्यांचे सल्ले तद्दन फालतू, फडतूस आणि अव्यवहार्य असल्याने शेतकर्यांनी ते वापरायचा प्रयत्न केल्यास त्यांची शेती आणखी घाट्यांत जाते. त्यामुळे या चारही प्रकारच्या उंटावरच्या शहाण्यांचे पहिले तोंड बंद केले पाहिजे. बर्या बोलाने ऐकत नसेल तर त्यांच्या कानाखाली आवाज काढला पाहिजे जेणेकरून निदान तोंड तरी बंद होईल. शेतकरी मरत असेल तर मरू द्या पण उंटावरच्या शहाण्यांनो प्रथम तुमचे तोंड आवरा, तुमच्या लेखण्या थांबवा. शेतकर्यांसाठी तुम्ही काहीच करण्याची गरज नाही. फक्त शेतकरी देशोधडीस लागावा म्हणून शासकीय पातळीवरून होणार्या कटकारस्थास तुम्ही जो प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हातभार लावता आहात, तेवढा बंद करा. शेतकरी स्वतःचे स्वतःच बघून घेईल. तुम्ही काहीच करण्याची गरज नाही फक्त शेतकर्यांच्या छातीवरून उठा. तुम्ही छातीवरून उठलात तर शेतकरी स्वतःच स्वतःचा मार्ग शोधण्यास समर्थ आहे. त्याला तुमच्या भाकड सल्ल्याची आवश्यकता तर नाहीच नाही.
आता काही मिनिटातच वर्षे २०१४ मावळणार आहे आणि नवे वर्ष येणार आहे. हे नववर्षा! जुने जाऊदे मरणालागुनी....... बळीराजासाठी काहीतरी नवीन घेऊन येरे बाबा!!
- गंगाधर मुटे
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया
5 Jan 2015 - 4:39 pm | प्यारे१
अरण्यरुदन हा शब्द इथे अस्थानी वाटतो आहे.
जंगलात रडून उपयोग होत नाही.
इथं रडणारा खरं रडत नाहीये असा संशय आहे.
5 Jan 2015 - 5:26 pm | सूड
ओके !!
। इति लेखनसीमा ।
5 Jan 2015 - 4:47 pm | नाखु
त्यांनी एकमेका साह्य करू केलं तर चालत परस्पर पाठखाजव.
आणि तसेही मिपावाचक डायरेक आभाळातून पडल्येत.
(त्यांच कुणीही शेतकरी नाही) असा जावईशोध सर्वश्रुत आहेच.
5 Jan 2015 - 7:49 pm | प्रसाद गोडबोले
मुटेजी धागा अत्यंत आवडला .
ही भाषा पाहुन , आपण एकदा म्हणाला होतात ना की , आपण ज्ञानेश्वरी पारायण ज्ञानयज्ञ वगैरे आयोजित करता , त्या वर एकदम १००% विश्वास बसला :)
बाकी तुमचा वांगमय शेतीच्या जोडीला सुरु असलेला वाङमय शेतीचा धंदा बरा सुरु आहे असे दिसते . असे लालपंथीय वादग्रस्त लेखन करुन लवकरच शेतीला चांगले दिवस येतील ... किमान गाजराच्या/ बीटाच्या / पोकळ्याच्या शेतीला तरी येतीलच ;) !
पुनश्च एकदा अभिनंदन !
6 Jan 2015 - 5:35 pm | विशाल कुलकर्णी
;)
6 Jan 2015 - 5:23 pm | अद्द्या
मुटे साहेब
एकही प्रतिसादाला तुम्ही प्रतिसाद्कर्त्याचि अक्कल न काढता उत्तर दिल्याचं दिसत नाही . असं का बरं ?
स्वतःलाच सगळं कळतं आणि मीच काय तो शेतकऱ्यांचा तारणहार कि काय ते हे दाखवून द्यायचा खटाटोप (अट्टाहास ?? )
कि समोरच्या माणसाला सुद्धा काही गोष्टी कळू शकतात हे सहनच होत नाही ?
7 Jan 2015 - 8:44 am | नाखु
कदाचीत तुम्हाला इथे फुकट फौजदारीचा खरा उद्देश मिळण्यास मदत होइल.
6 Jan 2015 - 5:34 pm | अन्या दातार
इतर (तुमच्यालेखी निर्बुद्ध व उंटावरच्या शहाण्या) लोकांशी वाद घालण्यापेक्षा आणि ग्राहकांनाच दूषणे देण्यापेक्षा शेतकर्याची शेती फायद्यात कशी येईल याचा विचार जास्त चांगला, व्यवहार्य वाटत नाही का?
तसं असेल तर माझ्या या प्रतिक्रियेबद्दल आपले विचार वाचण्यास उत्सुक आहे. :)
6 Jan 2015 - 6:00 pm | अद्द्या
आमच्या घरा कडचा एक मेकानिक म्हणतो .
"तुमची गाडी पूर्ण चांगली केली तर माझा धंदा कसा चालणार ? "
6 Jan 2015 - 6:01 pm | कपिलमुनी
मी मात्र शेतीविषयी बोलू शकतो ! सरकारचे धोरण आणि पॅकेज दोन्ही चुकीचा आहे आणि शेतकरी संघटना हे मढ्याच्या टाळूवरचा लोणी खाणार्या आहेत हे पण सांगतो . ७०-८० च्या दशकामधल्या कामगार चळवळीसारखा झालेला आहे .
बाकी इमेल द्या ७/ १२ मेल करतो .
6 Jan 2015 - 11:39 pm | अत्रुप्त आत्मा
मी शंभरावा! :-D
(मी पयलाच्या धर्तीवर नवा ग्रुप :P )
6 Jan 2015 - 11:48 pm | सतिश गावडे
अता तुमची खरडवही बालिश खरडींनी भरुन वाहणार. बॅटमॅनच्या खरडवहीसारखी :D
7 Jan 2015 - 12:01 am | अत्रुप्त आत्मा
=)))))