पुणेरी.......

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
18 Oct 2014 - 9:14 pm

पुणेरी????????????? ह्ये काय म्हणायचं हो आता तुमचं नविन??? नेहेमीचं पुणं..पुणं..नावाचं नवं रडगाणं? कि बघा आमच्या पुण्याचं हे ठिकाण...म्हणून वाजवलेलं पिपाणं? की आणखि काही?

तर नाही बरं का तसलं काही. पुणेरी हे आमच्या पुण्याच्या आत्म्यात वसलेलं एक छोटेखानी सूखं होतं. आणि होतं म्हणायचं म्हणजे अता त्याला बंद होऊन चार वर्ष झाली. तुंम्ही म्हणाल कित्ती छळ करताय आढे आणि वेढे घेऊन..? सांगा कि लवकर काय ते!? तर सगळं कळायला जरा तुंम्हाला माझ्या वेदपाठशालिन(किंवा कालिन!) जीवनात घेऊन जातो. (आलं कि नै ..पहिलं पुणेरी श्टाइलचं वाक्य! चवथ्या मिनिटाला? ) तर..मी जेंव्हा तांबड्या जोगेश्वरीजवळच्या पुणे वेदपाठशाळेत शिकायला होतो. तेंव्हा या खर्‍या पुणेरी ठिकाणाची मला ओळख झाली. एखादे दिवशी पाठशाळेत शिकवणारे आमचे गुर्जी आले नाही तर,सकाळच्या भुकेच्या वेळी आंम्ही हळूच खादाडीला जायचो,त्या तिन/चार ठिकाणांपैकी हे ही एक. तसं पुणे वेदपाठशाळेचं (परंपरासिद्ध ) अधिकृत खादाडी ठिकाण म्हणजे गणपति चौकातल्या काकाकुवा मेनशन इमारतीच्या दारातला सकाळी ७ ते ११ असणारा शंकरराव वडेवाला! त्याच्याकडे चरलेला नाही...असा पुणे वेदपाठशाळेतला माझ्यासह गेल्या दोन पिढ्यातला एकही पुणेरी गुर्जी या पुण्यं'चराचरात तुंम्हाला सापडायचा नाही.(अता तो वडेवाला आहे.पण त्याची चव साफ गेलीये! )

पण एक दिवस शंकरराव नव्हता आणि आम्ही एक दोघे जणं "चला आता आपट्याकडली उपासाची मिसळ नायतर रतनकडले सामोसे/कचोरी असं कायतरी चरू.." या विचारात असताना,पलिकडनं आमच्या अट्टल पुणेरी गुरुजींपैकी एक बापमाणूस( सदर व्यक्ति,हे एक चित्रच आहे,एकदम बहुढंगी आणि रंगी सुद्धा! सांगेन कधितरी सवडीनी.) तिथनं चालला होता..आणि तो ही त्याच्याहून सवाई दोस्ता बरोबर. (हे ही प्रकरण खत्तरनाक आहे! ) त्यांनी आंम्हाला एक कचकाऊन हाक दिली.

ते:-काय रे? ..आज गुर्जी आलेले नै दिसत पाठाला?
आंम्ही:-(घाबरलेल्या अवस्थेत..) हो...म्हणजे नाही!
ते:- तरीच चरायला पालथे* पडलात इकडे! (हे या माणसाचं *नॉर्मल बोलणं आहे हां लोकहो! :D )
आंम्ही:- ..... (ओळखिच्या पोलिसाकडून दम-बसल्यासारखे - गप्प!!! )
ते:-आणि आज शंकरराव नै वाट्टं आलेला!?
आंम्ही:- (त्याच...गप्प'च्या हबिनयात! :D )
ते:- मग चला आज..आमच्या अण्णांकडे..नै तरी आमचं आजचं दुपारचं श्राद्ध चुकलेलच आहे!!!(??? :-/ )
आंम्ही:- (लॉटरी लागल्याच्या आनंदात,परंतू तो आनंद मिळावा म्हणून त्याच सुतकी पोझ मधे..) हो..येतो..चला.

पण आंम्हा तिघा पोरांपैकी २ जणं गुरुजिंना कळेल, या (नाहक) भितीपाई आले नाहित.आणि मीच एकटा त्यांच्यासह गेलो.आधी तुळशीबागेतून मंडईमधे.आणि नंतर तिथून मंडईच्या (१२महिने १३काळ फेम..) समाधान हॉटेलावरून पुढे गेलं..की उजव्या हताला वळल्यावर ज्ञानेश्वरी वाचन मंदिरा आलिकडे होतं. ते आमचं हे पुणेरी!.. पुणेरी हे ठेवलेलं नाव मुळीच नाही. तर ते त्याचं खरच असलेलं नाव होतं. तिथे मिळणार्‍या नाष्ट्याच्या पदार्थांवरुनही ते सिद्ध व्हायचं. म्हणजे इतर कोणत्याही साध्या उपहारगृहात उपासाची म्हणून फारतर खिचडी-ठेवलेली असते.आणि फारतर शेंगदाण्याचा लाडू! पण पुणेरी मधे उपासाच्या पदार्थांचाही साज असायचा. म्हणजे साबुदाण्याची खिचडी/शेंगालाडू तर असणारच.पण त्याशिवाय उपासाची बटाट्याची भाजी,अख्ख्या शेंगदाण्यांची आमसुल सारात केलेली ऊसळ, वेगळं(काढलेलं) दही, बटाटा चिवडा..हे ही सगळं असायचं. शिवाय पोहे,उप्पीट,सामोसे,इडली हे तर असायचच.पण पुणेरीची खासियत म्हणजे यातल्या हव्या त्या पदार्थांचं काँम्बिनेशन इथे जसं मिळायचं तसं मी तरी फारसं कुठे पाहिलं नाही. म्हणजे हल्ली पोहे सांबार हे मिश्रण बरेच ठिकाणी दृष्टीला पडतं. पण पुणेरी ते पुणेरीच! असं म्हणावं अशी त्याची अफलातून चव असायची.

झालं...... उपहारगृहाबद्दल खूप बोललो.पण आता (मुख्य) सांगायला पाहिजे ते हॉटेल चालवणार्‍या आमच्या अण्णांबद्दल. हो..चालवणार्‍याच! कारण मला ते त्यांच्या वागण्यातून तिथे कधीही मालक असल्याचे जाणवले नाहीत.नेहमी-चालकच! त्या जागेचे ते मालक होते का नाही? हे मला आजही माहित नाही.पण अण्णा ते हॉटेल खरच चालवायचे! (तिथले पदार्थांचे क्वॉलिटी लक्षात घेता असलेले दर ज्यांनी पाहिलेत त्यांना तर हे सहज पटेल.) एरवी आपण पुणेरीपणाचे लाख्खो किस्से ऐकत असतो. किंबहुना त्यावरच (हयात असलेलं)पुणेरीपण टीकून आहे,असं म्हणलं तरी बिल्कुल अतिशयोक्ती होणार नाही. पण अण्णांचं वागणं म्हणजे याचं दुसरं टोक! आतिथ्यशीलपणा हा शब्द मला जर कधी आठवला,तर त्याला १०० टक्के मॅच होणारा माणूस म्हणून मला अण्णांचं व्यक्तिमत्वच आठवेल! आणि हे सुरवातीलाच सांगून ठेवायला पाहिजे की हा काही अण्णांचा व्यावसाईक-स्वाभाव नव्हता. म्हणजे मला तरी तो तसा कधिही वाटला नाही.हॉटेलाशिवायही इतरत्र तुमची त्यांची भेट झाली. तरी अगदी हात हतात घेऊन...या हो..काय म्हणताय..बरेच दिवसांनी भेटलात! अशी अत्यंत आगत्यानी चौकशी करून मगच हा माणूस आपल्याशी बोलणार. मला व्यक्तिशः त्यांचं नावगाव काय? वगैरे काहिही माहित नाही. माझी त्यांची अगदी जानपेहेचानंही नाही. आणि मला त्याची कधी गरजही वाटली नाही. पण माणूस असा आहे...की खट्टकन लक्षात रहाणारा!!!

तांबुस परंतू दाट गोरा वर्ण,जाडही नाही नी सडपात्तळही नाही असा बसका देह.(आणि देहबोली सुद्धा) आवाजात जन्मजात विनम्रपणा असं साधारण त्यांचं वर्णन करता येइल. सकाळच्यावेळी ८ च्या पुढे पुणेरीत आपण गेलो की काऊंटरच्या भोवतीनी ..ही गर्दी उसळलेली असायची. मागनं अण्णा आणि त्यांच्या (मला वाटतं) भावाचे संयुक्त आवाज येत असायचे. पण हा भाऊ म्हणजे मात्र अगदी नेहमीचं पुणेरी रूप! त्यामुळे त्याचा सूर हा नेहमी हॉटेलच्या गर्दीला वैतागलेला असाच! इकडे अण्णा म्हणजे :- "या हो..या..! काय खिचडी देऊ? उसळ टाकयची का दही नुस्तं? मागे तुम्हाला सामोसा मोडून पाहिजे का? सांबारशेव टाकायची ना?" पलिकडे नोकराला..."एssss पाणि आणायला जा.. आणि वर उप्पीट पाठवायला सांग" असं सगळं चाललेलं असायचं आणि हे भाऊ साहेब म्हणजे..त्यांच्या इनबिल्ट वैताग मोड मधे किंचितश्या नाकातल्या आवाजात:- "एं ssssssssss अरें ती तांटली उचल नां तिथनं!" हे नोकराला..आणि ग्राहकांशी :- "आओं थांबा हो..देतो ना पोंहें...कितीं घाई लागलीये तुंम्हाला???" "चटणी संपली..नुस्ता सामोसां आंहें" अता चटणी संपली,म्हणजे कायमची नव्हे!!! तर वर ज्या घरातनं या तयार पदार्थांचा सप्लाय होतोय..तिकडनं अजून आलेली नाही...इतका त्यात दडलेला गहन आशय त्या बिच्चार्‍या गिर्‍हाइकाला कसा कळणार??? मग गिर्हाइकंही चिडूनः- "हाssssssssss...चटणी संपली तर काय नुसता सामोसा देता का?..आयला..पैशे तर सगळे घेनार!!!" असं सुरु व्हायच...पण हेच अण्णा असतील तर??? त्याच माणासाला:- " सामोसा चटणी का?..बसा हं पाच मिनिटं.चटणी येतीचे..आणायला गेलाय माणूस..बसा" असं करून त्या माणसाला आसनस्थ करायचे.

मला ज्या दिवशी त्या आमच्या गुरुजिंनी तिथे नेलं.त्या दिवसापासून मी ४ वर्षांपूर्वी हे उपहारगृह बंद होइपर्यंत अनेकदा तिथे खायला गेलो. पण वाड्याच्या जुन्या जागेतनं नव्या अपार्टमेंटच्या इमारतीत हे दुकान आलं..तरी पहिल्या नजरेत ओळखू येइल अशीच आतली मांडणी जुन्या धाटणीची राहिलेली होती. सर्व काहि साधं आणि सहज हा या उपहारगृहाचा स्वभावधर्म. मग ती तिथल्या पोहे/उप्पीटाची चव असो किंवा सामोसा सांबार शेवचा लज्जतदारपणा असो! उपासाच्या पदार्थांना मी माझ्या ह्या भटजी'च्या धंद्यामुळे विटलेला असल्यामुळे मी तिथे त्यांची चव कधिही घेतली नाही..पण एकदा ती शेंगदाण्याची (आमसुल रसातली) उसळ खाल्ली होती.कारण ती नेहमीच्या आंम्हाला दिल्या जाणार्‍या उपासांच्या पदार्थांना ऑफबीट,आणि त्यादिवशी बाकिचे बिगरौपासी पदार्थच संपलेले होते..म्हणूनही मी ती खाल्ली.पण माझ्या तिथल्या आवडणार्‍या दोन डीश मात्र १ नंबर होत्या. पहिली सामोसा(मोडून)त्यात सांबार+शेव आणि दुसरी उप्पीट डबल-सांबार शेव.(उप्पीटातल्या हिरव्यागार मस्त मटारासह!) चव साधी पण अंतरमनात रहाणारी.तिथे येणारी लोकंही अनेक प्रकारची कॉम्बिनेशन करूनच तिथे खात असत.अण्णाही त्यांना सुचवत असावे. म्हणजे साबुदाण्याची खिचडी,दही आणि त्या शेंगदाण्याच्या उसळचा नुसता रस्सा! (हे कॉम्बिनेशन खाणारे लोक तर कमीत कमी दोन प्लेट तरी उडवत असत) पोहे/सांबार शेव ..दही पोहे शेव..सांबार उप्पीट शेव..अनेक प्रकार ..पण चव अगदी A1

आणि हा चवीबरोबरच उपहारगृहातलाही साधेपणा मुद्दाम आज सांगायचं कारण म्हणजे,...हल्ली पुण्यात हॉटेलं आणि अश्या छोट्या उपहारगृहांना जाणूनबुजुन सांस्कृतीक नाव द्यायची आणि आतलं ईंटी-रियर करायची,आणि त्याहून भयानक मिनु छापायची...जी गाढव चढा-ओढ लागलीये...ते!!! आणि ते पहाता हे ही सांगायला हवं की संस्कृतीची खूण किंवा ओळख ही नुसती नावं देऊन होत नाही..आधी तिचे दोन/चार थेंब आपल्या अंतरीही रुजलेले असायला लागतात. तेंव्हा ती संस्कृती तुमच्या हॉटेलात आणि नावात असल्याची जाणवेल. (टिव्ही वरच्या तथाकथीत कौटुंबिक आणि सांस्कृतीक मालिकांची नावं..हा देखिल एक असलाच अचरट्पणा आहे. आणि पंचतारांकित हॉटेलांमधून तर मी चमचे पुसयचीही पद्धत पाहिलेली आहे.यांच्या संस्कारीत-सेवा-शि'क्षणात त्या वेटरवर्गाला ग्रहकांशी हसायलाही बहुधा शिकवत असावेत!... सर्व काही कृत्रीम आणि अभिनय संपृक्त!)

आज आण्णा आणि त्यांचं उपहारगृह तुमच्या समोर मांडण्याची बुद्धी झाली.कारण गेल्या अठवड्यात आंम्ही इथलीच काही दोस्त मंडळी एका पुस्तकाच्या दुकानात असताना,मला तिथे अण्णा भेटले.(त्यांच्या त्या भावासह! )

यातले पहिले अण्णा(पांढरा शर्ट) आणि शेजारी तो (निळ्या शर्टात्)त्यांचा भाऊ.
https://lh6.googleusercontent.com/-BJE-1_FLk5A/VDtk005_t_I/AAAAAAAAGfQ/Ls_7gzbKux4/w326-h580-no/IMG_20141012_184255251%7E2.jpg
मी त्यांना पाठमोरं पाहिलं पण त्या वात-अनुकूलीत दुकानात मोठ्ठ्यांदी सोडाच,पण साधी हाक मारायलाही बिचकलो. (हे आवाजाचं सोवळं..तसल्या दुकानांमधे पाळायलाच लागतं!) मग म्हटलं जरा फिरु द्यावं त्यांनाही आणि मग हळूच जवळ जाऊन 'आवाज द्यावा'.मग काहि मिनिटं गेल्यावर मी त्यांच्या मागे जाऊन उभा राहिलो. पण त्यांचं ते ही कादंबरी ते पुस्तक असं चाललं होतं. मग जरा वेळानी त्याच दुकानाच्या एका भागात फिरताना.. मला योग्य वेळ वाटली आणि मी जवळ जाऊन (मागून)म्हणालो.. नमस्कार अण्णा एका क्षणात (त्यांच्या स्वत:च्याही नकळत) ते वळले आणि अगदी माझे हात हतात घेऊन..."अरे...!!या हो या... बोला काय म्हणताय?" असे सहज ओपन झाले.मग मी ही त्यांना "नाही..मित्रांबरोबर जरा पुस्तकं वगैरे घेतोय" असं पहिलं (काहिच न सुचल्यामुळे) वाक्य टाकून जरा बोलायची तयारी केली.वास्तविक मला त्यांनी पुणेरी..हे रिटायर्डमेंटच्या वयात ते आल्यामुळे,त्यांनी ते बंद केलय,असा अंदाज आलावता पण तरिही मी न रहावून त्यांना:- "आण्णा आपलं पुणेरी बं...दच ना आता?" असं बोललो. माझ्या प्रश्नातलं जे ओळखायचं ते ओळखून त्यांनी तितक्याच सहजतेनी आणि त्यांच्या निसर्गदत्त विनम्रपणानी सांगितलं..."हो...आता बंदच!!!" हा बंद शब्द मी इतका आशयपूर्ण बरेच दिवसानी ऐकला. त्या बं....द'तला एक जिवंत फुल...स्टॉपही अनुभवला...मनात साठवलाही.आणि पुढचा कुठलाही..."चला भेटू परत" अश्या आशयाचा औपचारिक डायलॉग न होता.. ते ही पुस्तकांकडे वळले..आणि मी ही!
....................................................=========================......................................................

संस्कृतीसमाजविरंगुळा

प्रतिक्रिया

किसन शिंदे's picture

18 Oct 2014 - 9:33 pm | किसन शिंदे

बुवा, पुण्यातल्या खाण्याच्या ठिकाणार एक मस्त पुस्तक अपेक्षित आहे तुमच्याकडून!

दशानन's picture

18 Oct 2014 - 9:34 pm | दशानन

A1 लेखन!
शेवट तर क्लास!!

खटपट्या's picture

18 Oct 2014 - 10:15 pm | खटपट्या

संस्कृतीची खूण किंवा ओळख ही नुसती नावं देऊन होत नाही..आधी तिचे दोन/चार थेंब आपल्या अंतरीही रुजलेले असायला लागतात.

क्या बात है !!!

पाषाणभेद's picture

19 Oct 2014 - 1:14 am | पाषाणभेद

+१
छान लेखन.

संजय क्षीरसागर's picture

18 Oct 2014 - 10:43 pm | संजय क्षीरसागर

मजा आली.

आदूबाळ's picture

18 Oct 2014 - 11:24 pm | आदूबाळ

एकच नंबर!

श्रीरंग_जोशी's picture

18 Oct 2014 - 11:59 pm | श्रीरंग_जोशी

खूप आवडलं.

विलासराव's picture

19 Oct 2014 - 12:13 am | विलासराव

बुवा जायला लागले आनी हळूहळु अण्णांना गाशा गुंडाळावा लागला असंच ना?

बोका-ए-आझम's picture

19 Oct 2014 - 12:18 am | बोका-ए-आझम

अपना घर असं हिंदी नाव असलेला पण प्रत्यक्षात सगळे मराठी पदार्थ देणारा एक फर्मास् प्रकार होता. डेक्कन जिमखान्यावरुन लकडी पुलाकडे जाताना एका इमारतीच्या तळघरासारख्या जागेत असायचाि आण तिथे साबुदाणा खिचडी, पोहे, शिरा, सांजा, मिसळ आणि ताक एवढे आणि एवढेच प्रकार मिळायचे. बसायला साधी बाकडी आणि मिसळ मागवलीत तर समोर टेबलासा साधारण थाट असायचा पण चव माशाल्ला! तशी खिचडी - गरम, खरपूड नाही, शेंगदाणा बारीक कुटून, मिरची चवीपुरती आणि हायलाइट म्हणजे वर भुरभुरलेले खोबरे! ही खिचडी ही हेराॅइन, कोकेन यांच्या तोडीचा अंमली पदार्थ होता.
हा प्रकार आहे का अजून? केवळ त्याच्यासाठी पुण्याला जायची अापली तयारी आहे.

भावलं शब्दचित्र. किती सहज लिहिता बुवा !

प्रचेतस's picture

19 Oct 2014 - 12:31 am | प्रचेतस

सुरेख लेखन.
कर्मधर्मसंयोगाने आम्हीसुद्धा अण्णांना पुस्तकांच्या दुकानातच पाहिलं. :)

अत्रुप्त आत्मा's picture

19 Oct 2014 - 12:54 am | अत्रुप्त आत्मा

@बोका-ए-आझम
अपना घर असं हिंदी नाव असलेला पण प्रत्यक्षात सगळे मराठी पदार्थ देणारा एक फर्मास् प्रकार होता.>>> आहे अजून..पण जरा माझ्याही ही जागा विस्मृतीतच गेली होती. नव्या पेठेत रहायला होतो.तेंव्हा अनेकदा त्याच्याकडे खायला गेलेलो आहे. जातो आता उद्या सकाळी सकाळीच. ७ वाजता. आणि नाव हिंदी कारण तो माणूस आर्यसमाजी आहे.म्हणून दुकानचं नाव राष्ट्रभाषेत(असा माझा आपला एक अंदाज!)

@वल्ली
कर्मधर्मसंयोगाने आम्हीसुद्धा अण्णांना पुस्तकांच्या दुकानातच पाहिलं.>>> *mosking* अरेच्चा..!आपणंही होतात का तिथं? मला वाटलं की फक्त धन्या आणि मीच! *mosking*

प्रचेतस's picture

19 Oct 2014 - 9:05 am | प्रचेतस

काय सांगताय काय?
धन्या पण होता काय तुमच्याबरोबर तेव्हा?

बाकी तुमच्याकडून तुळशीबागेतल्या जोशी मिसळीवर एक फर्मास लेख येऊ द्यात.

अत्रुप्त आत्मा's picture

19 Oct 2014 - 10:12 am | अत्रुप्त आत्मा

:)

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Oct 2014 - 12:31 am | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर लेख... भावपूर्ण शेवट !!

प्रभाकर पेठकर's picture

19 Oct 2014 - 12:46 am | प्रभाकर पेठकर

मनांत रेंगाळणार्‍या अवीट आठवणी आणि मनावर कोरलेल्या त्या अफाट चवी आपल्या आयुष्याला समृद्ध करतात आणि निरस जीवनातही सुखद झुळूक अनुभवायला मिळते.

किती छान लिहिलय्त गुर्जी!
संस्कृतीची खूण किंवा ओळख ही नुसती नावं देऊन होत नाही..आधी तिचे दोन/चार थेंब आपल्या अंतरीही रुजलेले असायला लागतात.
खरच!

एका अकृत्रिम दुकानाची आणि त्यामागच्या साध्या परंतु ओतप्रोत आपलेपणाने भरलेल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख तितक्याच आपुलकीच्या भाषेत करुन देणं सोपं नाही! अतिशय आवडले.

-रंगा

यशोधरा's picture

19 Oct 2014 - 5:21 am | यशोधरा

लेख आवडला.

जेपी's picture

19 Oct 2014 - 5:48 am | जेपी

फर्मास लेख.

छानच ओळख करुन दिली आहे .हाॅटेल बंद पडलं नसतं तर एकदा समोसा सांबार शेव खाऊन पाहिलं असतं!

ज्ञानोबाचे पैजार's picture

19 Oct 2014 - 10:27 am | ज्ञानोबाचे पैजार

मस्त, मजा आली वाचून.

पैजारबुवा,

प्रमोद देर्देकर's picture

20 Oct 2014 - 8:43 am | प्रमोद देर्देकर

मिपावरील सर्व ठि़काणी मिळणार्या पदार्थांवरिल लेखांचे मी ५ पाने भरुन प्रिन्टऑउट्स काढले आहेत. त्यातल्या वेगळ्यावेगळ्या ठिकाणाच्या मिसळपाव स्थळांनीच २ पाने भरली आहेत.
आता पुण्याला मेव्हण्यांकडे आलो की हे सगळे पदार्थ खावुन बघणार आहे.

बाकी लेख नेहमीप्रमाणे झकास हां आत्मुदा.

हाडक्या's picture

10 Nov 2014 - 5:03 pm | हाडक्या

अर्रे वा.. आमाला पण ती लिष्ट व्यनि करता का हो ? शोध कार्याचा त्रास वाचवण्यासाठी विचारतोय. :)

समीरसूर's picture

20 Oct 2014 - 3:02 pm | समीरसूर

आवडला! छान लिहिले आहे.

अपना घरमधून मी बर्‍याचदा खिचडी, मिसळ घेऊन गेलेलो आहे. अप्रतिम चव! खिचडी निव्वळ जबरा! :-)

अत्रुप्त आत्मा's picture

20 Oct 2014 - 3:43 pm | अत्रुप्त आत्मा

@ अप्रतिम चव! >>> येस्स!
आणि ते छोट्या ग्लासात(च) मिळणारं, कसलासा फ्लेवर दिलेलं ताकंही मस्त असतं.

मदनबाण's picture

20 Oct 2014 - 3:08 pm | मदनबाण

लेख आवडला...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Maharashtra and Haryana poll victories will give Narendra Modi a tremendous boost to pursue economic reforms

मृत्युन्जय's picture

20 Oct 2014 - 4:05 pm | मृत्युन्जय

लेख आवडला. हे तुळशीबागेतले मिसळवाले जोशी कोण म्हणे? आम्हाला फक्त श्रीकृष्ण माहिती आहे. तेच का हे?

प्रचेतस's picture

20 Oct 2014 - 4:35 pm | प्रचेतस

तेच ते.
जोशी यांची श्रीकृष्ण मिसळ.

मिसळीत पोहे असलेलं ना? ते माझ्या भावाला आवडतं आणि मला नाही.

पोहे टाकतात का नाही ते नीटसं लक्षात नाही. पण त्यांच्याकडचा रस्सा जाम भारी. फ़रसाण आणि त्यावर शेव त्यावर बटाट्याचे काप मसाला भुरभुरलेले आणि मग रस्सा खोबरं घातलेला. हा रस्साच चवीला एकदम अफ़लातून. नुसता प्यावा. अफाट चव लागते.

एकच वाईट, रस्सा अजून हवा असेल तर एक्स्ट्रा पैशे द्यावे लागतात.

रेवती's picture

20 Oct 2014 - 9:53 pm | रेवती

हम्म...

अनुप ढेरे's picture

23 Oct 2014 - 8:10 pm | अनुप ढेरे

रस्सा अजून हवा असेल तर एक्स्ट्रा पैशे द्यावे लागतात.

हा ड्यांबिसपणा बेडेकरांनीही सुरु केलाय.

प्रचेतस's picture

23 Oct 2014 - 8:20 pm | प्रचेतस

हायला.
बाकी तशीही बेडेकरांची गोडमिट्ट मिसळ आवडत नसल्याने काही फरक पडणार नाही म्हणा.

आजच काही मिपाकरांसमवेत सकाळी शनवाराताल्या रामदास कडे जाऊन मस्त चमचमीत मिसळ खाऊन आलो.

आईग्ग! मी फक्त ती एकच गोडसर मिसळ खाऊ शकते आणि त्यांनी असे करावे ना!
बेडेकर यू टू? ;)

इशा१२३'s picture

20 Oct 2014 - 4:09 pm | इशा१२३

सुंदर लेख.आवडला.

स्पा's picture

20 Oct 2014 - 4:21 pm | स्पा

ओके

सूड's picture

20 Oct 2014 - 5:36 pm | सूड

+१

स्वाती दिनेश's picture

20 Oct 2014 - 5:21 pm | स्वाती दिनेश

'पुणेरी' आवडलं,
स्वाती

निमिष ध.'s picture

20 Oct 2014 - 9:48 pm | निमिष ध.

पुणेरी बंद झालेले आहे हे वाचून खूप वाईट वाटले. कॉलेजच्या दिवसांमध्ये मित्र शुक्रवार पेठेत मंडईच्या मागे राहायचा. त्याच्या सदनिकेत मुक्कामाला असलो की सकाळी पुणेरीत पोहे सांबर शेव आणि शेंगदाणे खाऊनच निघायचो कॉलेजला जायला. आण्णा एकदम आपुलकीने चौकशी करायचे. तो तर नेहमीचाच असल्यामुळे त्याची दररोजची ओळख होती. कुठे २-३ दिवस गेला नाहीत तर काय रे बाहेर घरी गेला होता का असे अवर्जून चौकशी करायचे. त्यांच्या बोलण्यात खवचटपणा अजिबात नव्हता. शुक्रवारात राहणार्यांना तो बर्याच लोकांमध्ये दिसायचा त्याला आण्णा अपवाद होते. पुणेरीतील पदार्थांबद्दल तर गुरुजींनी बरेच सांगितले आहे. पोहे खाल्ल्यानंतर परत सामोसा घेऊन खाणे म्हणजे सुख असायचे आणि कॉलेजच्या दिवसात जिथे स्वस्त आणि पौष्टिक खाणे ते आमचे आवडते असायचे. आता त्या वेळेस असलेली बरीच ठिकाणे बंद होताना आठवण होऊन त्रास होतो. लकी, मेहेनाझ बंद झाले आता पुणेरी पण - रविवार पेठेतील मिसळीची गाडी पण आता दिसत नाही. बदल हाच जीवनाचा स्थायीभाव आहे !

धन्यवाद आत्मु गुरुजी.

प्रचेतस's picture

20 Oct 2014 - 10:52 pm | प्रचेतस

महानाझ अजूनही चालू आहे ओ. ताबूत स्ट्रीट वर आहे आता.

निमिष ध.'s picture

21 Oct 2014 - 12:09 am | निमिष ध.

पुढच्या भारतवारीत कट्टा करुयात तिकडे!!

त्या एवढ्याशा गल्लीला नाव दिलेले आहे????

रच्याकने...पूर्वी ते जर महानाझ असेल तर आता सूक्ष्मनाझ म्हणणे पण अवघड आहे...

त्या एवढ्याशा गल्लीला नाव दिलेले आहे????

रच्याकने...पूर्वी ते जर महानाझ असेल तर आता सूक्ष्मनाझ म्हणणे पण अवघड आहे...

आदूबाळ's picture

10 Nov 2014 - 1:37 pm | आदूबाळ

त्यात काय?

बॅ. गाडगीळ स्ट्रीट असं दनकट नाव असलेल्या रस्त्यावरुन एका वेळी २ चारचाक्या जाऊ शकत नाहीत ;)

आदूबाळ's picture

20 Oct 2014 - 11:15 pm | आदूबाळ

लकीत (-१ व्या मजल्यावर) बसून खिडकीतून लोकांचे पायच बघायला मज्जा यायची. कॉलेजच्या मर्यादित पैशाच्या काळात लकी आणि पॅरेडाईज*** पट्ट्यातलं वाटायचं. गुडलक आणि सनराईज परवडायचं नाही.

मध्यंतरी मित्राने जुन्या पाकिटात सापडलेलं लकीचं बिल दाखवलं होतं. इ.स. २००१ मधलं. एक चिकन हंडी, चपात्या आणि वन-बाय-टू कुल्फी रु. १८५. यात आम्ही दोन बकासुर जेवलो होतो, आणि उर्वरित पंधरा रुपयांत पानबिडीही झाली होती. गेले ते दिन...

लकी बंद झालं त्याचा लय आघात झाला होता. माझ्यापुरता णिषेढ म्हणून बरेच दिवस आर डेक्कनमध्ये गेलो नव्हतो.

***हे सुदैवाने आहे अजून

अत्रुप्त आत्मा's picture

20 Oct 2014 - 11:38 pm | अत्रुप्त आत्मा

@धन्यवाद आत्मु गुरुजी.>> *YES* धन्यवाद.

@लकी, मेहेनाझ बंद झाले आता पुणेरी पण -
रविवार पेठेतील मिसळीची गाडी पण आता दिसत नाही. >>> हे सगळं बंssssssssssद होतं. कारण याच्या पुढे शाखा निघू शकत नाहीत.अश्या प्रकारच्या जागा ह्या त्या व्यक्तिंच्या प्रवृत्तीधर्माशी सुसंगत असतात..त्यांचा एक भाग असतात.म्हणूनच त्या त्यांच्याबरोबर बंद होतात. मला वाटतं,इतर अनेक पुणेरी दुकानांबाहेर असलेली, आमची कुठेही शाखा नाही. ही पाटी, मूळची अशी आतल्या भावनांचं प्रकटीकरणच समजायला हवी. (काहि पाट्यांच्या बाबतीत,अपवादानी हा अहंकाराचाही भाग असू शकतोच!) पण त्या शिवाय मी असा अर्थही घेतो,की कदाचीत त्याहून अधिक चांगलं/वेगळं असं दुसरं काही जन्माला येइल.पण, तसं नाही.
म्हणून........ "आमची कुठेही शाखा नाही!" असे आंम्ही अट्टल पुणेरी! :)

निमिष ध.'s picture

21 Oct 2014 - 12:07 am | निमिष ध.

+१

@ "आमची कुठेही शाखा नाही!" असे आंम्ही अट्टल पुणेरी!>> बरोबर आहे तुमचे!

एस's picture

21 Oct 2014 - 4:13 pm | एस

लोकांना पुणेरीपणाची ही बाजू माहीतच नसते. पण काही म्हणा, पुणे ते पुणेच! बाकीचं जे काय असेल ते असेल, पण 'पुणे' नसेल.

सौंदाळा's picture

21 Oct 2014 - 9:42 am | सौंदाळा

मस्त लेख
सर्व प्रतिसादसुद्धा आवडले.
वर कोणीतरी म्हटल्याप्रमाणे बुवांकडुन पुण्यातील खाण्याच्या अनवट ठिकाणांच्या लेखची नव्हे तर लेखमालेची वाट बघत आहे

Maharani's picture

21 Oct 2014 - 3:46 pm | Maharani

मस्त लेख..आवडला....

अनुप ढेरे's picture

23 Oct 2014 - 8:09 pm | अनुप ढेरे

मस्तं लेख. आवडला!

सिरुसेरि's picture

10 Nov 2014 - 1:26 pm | सिरुसेरि

लेख खुपच आवडला . पुर्वी अलका थिएटरच्या समोरही एक इराणी हॉटेल होते . आता बहुतेक ते एका उडप्याने घेतले.

अत्रुप्त आत्मा's picture

10 Nov 2014 - 3:56 pm | अत्रुप्त आत्मा

@पुर्वी अलका थिएटरच्या समोरही एक इराणी हॉटेल होते . >>> हम्म्म... ते हॉटेल खैबर ..!

आँ? खैबर डेक्कन जिमखान्यावर होतं ना? (की अजून आहे?) तुम्ही म्हणताय ते दरबार की कायसे असेल्....नक्की नाव आठवत नाही.

अलका टॉकीजसमोरचा इराणी म्हणजे "रीगल". सुहास शिरवळकरांच्या चहात्यांना (म्ह० पुस्तक वाचणार्‍यांना) आठवत असेल, कॉलेजमधल्या पहिल्या राड्यानंतर दिग्या श्रेयसला घेऊन रीगलमध्येच जातो.

आता रीगल उडप्याने चालवायला घेतलं आहे.

दरबार त्याच लायनीत होतं. मोटर स्कूलजवळ.

खैबर डेक्कन जिमखान्यावर होतं ना? (की अजून आहे?)

आहे आहे अजुन, लई महाग झालय हो.

अच्छा. मी कधी गेले नाहीये त्या हाटिलात. तिथल्या बष्टॉपवर उभी असायचे म्हणून माहित होते. असो, महागाई कश्याला म्हणावे किंवा कशाला म्हणू नये यावर दोन तास आईबाबांशी सकाळीच बोलून झाले आहे. हुश्श्य!

वेल्लाभट's picture

10 Nov 2014 - 5:57 pm | वेल्लाभट

मस्त लिहिलंयत ! वाह ! छान (आणि वाईटही) वाटलं वाचून.
पण ते असं पदार्थांची नावं आणि वर्णनं... वाट लावतात वाचणा-याची.

जिवंत फुलस्टॉप........ _/\_...... टेक अ बो.