भा.रा.तांबे यांच्या निवडक कविता -२. कळा ज्या लागल्या जीवा

धोंडोपंत's picture
धोंडोपंत in जे न देखे रवी...
16 Dec 2007 - 2:32 pm

कळा ज्या लागल्या जीवा...

कळा ज्या लागल्या जीवा मला कीं ईश्वरा ठाव्या !
कुणाला काय हो त्यांचे ? कुणाला काय सांगाव्या ?

उरीं या हात ठेवोनी उरींचा शूल का जाई ?
समुद्रीं चौंकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही,

जनांच्या कोरड्या गप्पा, असे सारे जगद्बंधू !
हमामा गर्जनेचा हो, न नेत्रीं एकही बिंदू.

नदीला पूर हा लोटे, न सेतू ना कुठे नावा
भुतांची झुंज ही मागे, धडाडे चौंकडे दावा.

नदी लंघोनी जे गेले तयांची हाक ये कानीं,
इथे हे ओढिती मागे मला बांधोनी पाशांनी.

कशी साहूं पुढे मागे जिवाला ओढ जी लागे?
तटातट काळिजाचे हे तुटाया लागती धागे.

पुढे जाऊं ? वळूं मागे ? करूं मी काय रे देवा ?
खडे मारी कुणी, कोणी हसे, कोणी करी हेवा !

राजकवि भास्कर रामचंद्र तांबे
लेखनकाल -३० जानेवारी १९२२, अजमेर

कविताआस्वाद

प्रतिक्रिया

केशवसुमार's picture

16 Dec 2007 - 2:41 pm | केशवसुमार

धोंडोपंत..
हि अप्रतिम कविता येथे दिल्या बद्दल मनापासून धन्यवाद..!!

(आभारी)केशवसुमार
अवंतर.. मालकांची सध्यांची मनस्थिती ह्या कविते गत असावी असे वाटले..

प्रकाश घाटपांडे's picture

16 Dec 2007 - 3:54 pm | प्रकाश घाटपांडे

जनांच्या कोरड्या गप्पा, असे सारे जगद्बंधू !
हमामा गर्जनेचा हो, न नेत्रीं एकही बिंदू.

विशेष भावलले कडवे
प्रकाश घाटपांडे

धनंजय's picture

16 Dec 2007 - 7:03 pm | धनंजय

भा रा तांब्यांच्या कविता या निमित्ताने वाचायला मिळत आहेत. आनंद आहे.

चित्तरंजन भट's picture

17 Dec 2007 - 12:00 pm | चित्तरंजन भट

तांब्यांच्या कविता या निमित्ताने वाचायला मिळत आहेत. आनंद आहे.
असेच वाटते. येऊ द्या धोंडोपंत.

प्राजु's picture

16 Dec 2007 - 9:04 pm | प्राजु

उरीं या हात ठेवोनी उरींचा शूल का जाई ?
समुद्रीं चौंकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही,

काय अप्रतिम आहे हि ओळ. पाणीच पाणी चहूकडे असूनही पिण्याला थेंब नाही..
खूप सुंदर.

- प्राजु.

ऋषिकेश's picture

16 Dec 2007 - 9:44 pm | ऋषिकेश

व्वा! धन्यवाद धोंडोपंत.. याच्या तुमच्या खास शैलीमधील रसग्रहणाच्या प्रतिक्षेत.. :)
-ऋषिकेश

सुनील's picture

16 Dec 2007 - 10:39 pm | सुनील

मूळ कविता वाचण्यास मिळवून दिल्याबद्दल धोंडोपंत तुमचे आभार!

वर्षानुवर्षे ऐकलेल्या गाण्यात कडव्यांची किंचित थारेपालट केल्याचे आता समजले. कदाचित चालीत बसण्याकरता असेल.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विसोबा खेचर's picture

17 Dec 2007 - 11:52 am | विसोबा खेचर

पंत,

तांब्यांच्या कविता इथे देण्याचा जो उपक्रम आपण सुरू केला आहे, त्या अंतर्गत त्यांची ही दुसरी कविता इथे दिलीत त्याबद्दल आभारी आहे, परंतु हिचं रसग्रहणही इथे अवश्य लिहावे ही नम्र विनंती!

तात्या.

स्वाती दिनेश's picture

17 Dec 2007 - 12:44 pm | स्वाती दिनेश

तांब्यांच्या कविता इथे एकत्रित वाचायला मिळतील हे आनंददायक आहे,ह्यावर वरील प्रतिसादांशी सहमत.
ह्या उपक्रमासाठी तुम्हाला धन्यवाद आणि शुभेच्छाही!
स्वाती