तंत्र भाग २. भारतातील तंत्रविकास
आजच्या भागात आपण भारतात तंत्राचा विकास किंवा प्रसार कसा झाला ते पाहू. तंत्र ही सज्ञा
तन् (विस्तारणे, वृद्धी करणे) या धातूवरून आली आहे. वैदिक कालात यज्ञ हा एकच धर्म होता व अर्चनेचे साधन होते. जनसामान्यांच्या अर्चनेच्या कल्पनांना वाव देण्यासाठी जास्त विधींची गरज होती व तंत्राने त्याला वाव दिला. पहिल्या भागात पाहिल्याप्रमाणे स्त्रीसृजनतेचा पगडा जनांवर होताच. तो भागही तंत्रात सामावला गेला. पण तेथे जाण्याआधी आपण यज्ञसंस्थेतील तंत्र पथम पाहू
यज्ञवेदीला यज्ञ(अग्नि)चिती म्हणतात. यज्ञचितीची आकृती व संबंधित फळ यां बाबत शूल्बसूत्रांमध्ये माहिती मिळते. उदा.
अग्निचितीचा प्रकार भौमितिक आकृती संबंधित फळ
श्येन चिती ससाण्याच्या आकाराची स्वर्गप्राप्ती
प्रउरा चिती त्रिकोणाकृती भाऊबदांचा नाश
रथचक्र चिती रथचक्रासारखी शत्रू- " "
कूर्म चिती वर्तुळाकार ब्रह्मलोक
थोडक्यात हा तंत्रातील "यंत्र" या भागाचा आविष्कार आहे, ठराविक भौमितिक आकृतीचे ठराविक फळ
वैदिक मंत्र हे निरनिराळ्या "छंदा" मध्ये रचलेले आहेत. आता छंद व त्याचे फळ यांचा संबंध पाहू. छंद अक्षर संख्या फळ
गायत्री २४ तेज
अनुष्टुभ ३२ स्वर्गप्राप्ती
पंक्ती ४० यश
हाही तंत्राचा प्रभाव.
सुफलीकरण विधी
यज्ञातील चारू म्हणजे नैवेद्य तूप व तांदुळ यांचा असावा तूप हे स्त्री रजाचे तर तांदूळ हे पुरुष वीर्याचे प्रतिक आहे.
यज्ञात सामगान मह्त्वाचे आहे. साम ची फोड अशी ऋक म्हणजे सा म्हणजे स्त्री अम म्हणजे पुरुष ऋक आमास म्हणाली आपण प्रजोत्पादनार्थ रतिक्रीडा करू..सा आणि अम संयुक्त झाले. अशा प्रकारे साम शब्दाचे नामकरण झाले.
अश्वमेधामधील रतिक्रीडा ही ही सांकेतिक मैथुनाचा भाग आहे.
आर्यांवरही तंत्राचा पगडा होता हे दाखविण्यास एवढे पुरे.
वैदिक कालापासून चालू असलेल्या तंत्रामध्ये सात आचार सांगितले आहेत. उदा. वामा म्हणजे स्त्री. ज्या साधनेत स्त्रीचा उपयोग केला जातो ती साधना वामाचार. "वामा भुत्वा यजेत परम् " हे मूळ सूत्र. सुफलीकरणच्या विधीतूनच हे वामाचारात घुसले.. प्रत्येकाचे दोन विभाग, हार्द व बाह्य. विभाजन कादी व हादी अशा दोन विद्यांमध्येही केले जाते. धर्म-पंथांनुसार बौध्द, जैन, शैव, शाक्त, वैष्णव अशा वेगवेगळ्या चूली आहेतच. आता तुमच्या लक्षात आले असेल की तंत्राची ग्रंथसंपत्ती, त्यांचे आचार्य, व त्यातील लोकाचार शब्दश: अगणित कां म्हणतात. तंत्राला लाभलेला ५००० वर्षांचा काल हाही एक महत्वाचा घटक.
आपण आता सुरवातीला सर्व पंथांत सार्वजनिक असलेल्या महत्वाच्या गोष्टी बघू.
आचार्य वा गुरू : अगणित पण काही मह्त्वाचे (कंसांत त्यांचे ग्रंथ) गौडपादाचार्य (शुभगोदवस्तुती,श्रीविद्यारत्नसूत्र, लक्ष्मणदेशिक (शारदातीलक, ताराप्रदीप), शंकराचार्य (प्रपंचसार, सौंदर्यलहरी), पृथ्वीधराचार्य (भुवनेश्वरीरहस्य), पुण्यानंद (कामकलाविलास) ब्रह्मानंद(शाक्तानंदतरंगिणी व तारारहस्य), गोरक्ष (महार्थमंजिरी), भास्करराव(सौभाग्यभास्कर), अप्पय दीक्षित(सौभाग्यकल्पद्रुम) च्या..काय करावयाची ही यादी !
तांत्रिक देवता : शैव, शाक्त, गाणपत्य इ. संप्रदायांच्या तांत्रिक देवता वेगवेगळ्या आहेत.
शैव ..आदिनाथ महाकाल त्याची विविध रुपे क्षेत्रपाल व भैरव. महाकालाच्या आधी यांची पूजा.(वाराणसी किंवा महाराष्ट्रात हरीहरेश्वराला गेला असाल तर तुम्हाला याची कल्पना असेलच) काही ठिकाणी भैरव व काली यांची पूजा असते.
गाणपत्य .. महागणपती त्याची विविध रूपे, काही रूपे अभिचारकर्मासाठी पुजिली जातात.
सौर ..फार विविधता नाही, सूर्याबरोबर चंद्र, मार्तंडभैरव व अग्नी असतो.
वैष्णव विष्णु व त्याचे अनेक अवतार.लक्ष्मीवासुदेव वा लक्षीनारायण, हरीहर, राम, कृष्ण, नृसिंह, दधिवामन, हयग्रीव, गोपालकृष्ण
शाक्त विद्या व नित्या असे देवतांचे दोन प्रमुख प्रकार. काली, तारा, भैरवी, मातंगी इ. दहा विद्यादेवता. महात्रिपुरसुंदरी, कामेश्वरी, भगमालिनी इ.१२ नित्यादेवता. कालीचे काली, भद्रका॒ली, सिद्ध्काली, कामकलाकाली इ. भेद आहेत. शाक्त तंत्रात कुमारीपूजेचे महत्व असते. कुमारी म्हणजे सर्व शक्ती देवतांचे मूर्त स्वरूप.. आदीशक्तीची ही विविध रुपे आहेत.
जैन तंत्र निवृत्तीवादी जैन धर्मात तांत्रिक साधनेची शक्यता नव्हती. पण मंत्रसाधनेच्या द्वारा चमत्कार दाखविण्याची प्रवृत्ती वाढली. देवतांना तिर्थकराच्या सेविका म्हटल्याने तीर्थकरांचा मान राखला गेला. जैन शक्तीसिद्धांत मानतात.प्रत्येक पदार्थात शक्ती आहे. आत्म्यात अक्षय व अपरिमित शक्ती आहे. ध्यानाच्या बळावर देवदेवतेचे मनात मूर्त स्वरूप होते व त्या मूर्तीतून मनात शक्ती निर्माण होते व तिच्या बळावर तुम्ही अद्भुत कृत्ये करू शकता. इथे देवीच्या उपासनेत ध्यान, विचार व भाव या तीन गोष्टींवर भर दिला आहे. जैन तंत्र व इतर तंत्रांत साम्य आहे. गुरूचे महत्व,मंत्र, बीज,मुद्रा न्यास इ. मान्य आहे. मात्र पंचमकार सर्वस्वी वर्ज आहे. इ.स.च्या पहिल्या शतकापासून आधुनिक काळापर्यंत अनेक तांत्रिकांचा व त्यांच्या ग्रंथांचा, चमत्कारांचा बोलबाला आहे. जैन तांत्रिकांचे सर्व बीजमंत्र ह या अक्षराने सुरू होतात म्हनून जैन तंत्राला हादीमत म्हणतात. सरस्वती, अंबिका, कुबेरा, पद्मावती, इंद्राणी वगैरे इथल्या देवता. अभिचारावर भर असला तरी बाराव्या शतकातील प्रसिद्ध ग्रंथकार हेमचंद्र याने हठयोगाचे वर्णन केले आहे.
बौद्ध खरे म्हणजे बौद्ध धर्मात तंत्राला अजिबात वाव नाही. पुढील कारणांनी तंत्र आत घुसले. एक बौद्ध साधना कठीण असल्याने संघजीवनात गुह्यसमाज नावाची गुप्त संघटना सुरू झाली व तिने निर्वाणासाठी भोगमय जीवनाचा स्विकार केला. दोन : काही बौद्ध आचार्य आपला वैयक्तिक महिमा वाढवावयास व लोकांना आकर्षित करण्यास लोकोत्तर शक्तीचे प्रदर्शन करू लागले. खुद्द बुद्धही थोडासा तांत्रिक होताच त्याचे म्हणणे इद्धीची (सिद्धीची) प्राप्ती करून घेणे उचित पण तिचे प्रदर्शन नको..असो. इ.स.च्या पहिल्या शतकापासून बौद्ध साहित्यात तांत्रिक तत्वांची विशेष चर्चा सुरू झालेली दिसते. मंजुश्रीमूलकल्प हा पहिला महत्वाचा ग्रंथ. त्यात मंत्रसाधना, यक्ष-यक्षिणी, साधनेतील स्त्रीचे महत्व, मुद्रा, अभिषेक, अभिचार इत्यादींचे विवेचन आहे. असे दिसते कीं पहिल्यापासून बौद्ध तंत्रावर शैव तंत्राचा प्रभाव होता..बौद्ध तांत्रिकांनी शिव व विष्णू या दोन्ही देवतांचा स्विकार केला आहे. या नंतरचा महत्वाचा ग्रंथ म्हणजे तथागतगुह्यकतंत्र. हा चौथ्या शतकातील ग्रंथ. यात शून्यवाद व विज्ञान यांच्या अधिष्ठानावर बौद्ध तंत्रमताचे स्वरूप निश्चित केले. हिंदू तांत्रिकांच्या कवचाप्रमाणे बौद्ध तांत्रिकांचे धारिणीसंग्रह आहेत. वरील ग्रंथांपैकी अनेकांचा तिबेटीव चिनी भाषांमध्ये अनुवाद झाला आहे.
प्रमुख संप्रदायांनंतर तंत्रसाधनेची मूलतत्वे बघू. तंत्रात साधनेला महत्व दिले आहे. प्रत्येक संप्रदाय मानवप्रकृती लक्षात घेऊन साधनेत फरक करतो. तरी गुरू, मंत्र व देवता या तीन गोष्टी सर्व संप्रदायात मूलतत्वे म्हणून स्विकारल्या आहेत.
गुरू साधकाला सर्वप्रथम कुणाची गरज असेल तर ती गुरूची. त्याच्याशिवाय साधनेत पुढचे पाऊलच पडत नाही. आदिनाथ शंकर हा सर्वश्रेष्ठ गुरू.पण तो सर्वांना मिळणे शक्य नाही. तेंव्हा गुरू हा शंकराचा पृथ्वीवरील प्रतिनिधी. गुरू केवळ आगमादी शास्त्रे जाणणारा असून चालत नाही; तो योगमार्गी, साक्षात्कारी आणि आपली साक्षात्करण शक्ती शिष्याला देण्यास समर्थ असलेला पाहिजे. गुरूचे महात्म्य एवढे की कबीर म्हणतो "गुरू आणि गोविंद समोर आले तर प्रथम वंदन गुरूला. " काही संप्रदायांत दीक्षेच्या वेळी गुरू शिष्याला तीन दिवस आपल्या सन्निध ठेवतो. जणु शिष्याला तो आपल्या गर्भात प्रविष्ट करतो व पुनश्च पुत्ररुपाने जन्म देतो. साधकाला सिद्धी प्राप्त होताच गुरू-शिष्यातले द्वैत मावळते.गुरू प्रमाणेच शिष्याला आवश्यक असलेले गुण सांगितले असून बाल, वृद्ध, अडाणी इ. शिष्यांकरिता गुरू त्यांना झेपतील असे सोपे मार्गच सुचवितो.
मंत्र "मननात त्रायते इति मंत्र: "(मननाने जो तारतो तो मंत्र ) ही मंत्राची व्याख्या.ध्वनी हा सृष्टीचा आद्य स्पंद असून्तोच जीवाच्या चिच्छक्तीचाच सूक्ष्म भाग अस्तो. देहात प्राणवायूच्या संचारामुळे ध्वनीच्या लाटा उत्पन्न होतात. या ध्वनीतून वर्णात्मक शब्द आणि मग मंत्र निर्माण होतो. मंत्रात अचिंत्य शक्ती वास्तव करते. प्रत्येक मंत्रात प्रणव, बीज व देवता अशी तीन तत्वे विहित असतात.गुरू ज्या मंत्राची दीक्षा देतो त्या मंत्राच्या जपाने इष्ट देवतेची सिद्धी होते सहसा दीक्षाविधीत बीजमंत्राचा उपदेश केला जातो बीज मंत्राला व्यावहारिक अर्थ नसतो. मंत्र हे पूं, स्त्री व नपूंसक असे असतात.पूं मंत्राच्या शेवटी हूं, फट् , स्त्री मंत्रांच्या शेवटीठं, स्वाहा हे वर्ण तर नपुंसक मंत्रांच्या शेवटी नम:.मंत्रार्थ व मंत्रचैतन्य यांना महत्व आहे. अन्यथा नुसती घोकंपट्टी फुकट.
देवता देवता म्हणजे परमेश्वर वा परमेश्वरी यांच्या विशिष्ट शक्ती असतात.मंत्रांद्वारे साधकाने त्यांच्याशी संबंध प्रस्तापित करावयाचासत्य, ज्ञान आणि आनंद यंच्याकडे जाण्यासाठी देवता साहाय्य करतात. प्रत्येक देवतेलावेगवेगळे स्वरूप असते. तिचे ध्यान, तिचा वर्ण व तिचे वाहन ठरलेले असते.तिचा एक परिवारही असतो.
तंत्रशास्त्र म्हणते की "गुरूदेवतामंत्रानामैक्यम्".
भावत्रय भाव म्हणजे मनोवस्था. ज्या जीवाच्या ठिकाणी अविद्येचे आवरण दाट असते, अद्वैतज्ञानाचा लवलेशही नसतो पशुभाव.या ज्ञानाचा थोडासा साक्षात्कार झाला की तो साधक वीरभावात प्रवेश करतो. तुम्ही त्याला मुमुक्षु म्हणावयास हरकत नाही. वीरभाव पुष्ट झाला की साधक दिव्यभावात प्रवेश करतो. साधक सुसंस्कृत, गंभीर व सात्विक असतो. तंत्रशास्त्र प्रत्येक भावाप्रमाणे निरनिराळी उपासनापद्धती सांगते.
सात आचार तंत्रशास्त्रात सात आचार सांगितले आहेत . वेदाचार, वैष्णवाचार, शैवाचार, दक्षिणाचार, वामाचार,सिद्धांताचार कौलाचार. हे क्रमाक्रमाने श्रेष्ठ मानले आहेत.प्रत्येक आचारात साधकाने कसे वागावे याची तत्वे सांगितली आहेत. संतांनी धिक्कारलेला व सर्वांना साधारणत: माहित असलेला असलेला आचार म्हणजे "वामाचार".वामाचाराचे वर्नन पुढीलप्रमाणे
पंचतत्वै:खपुष्पं च पूजयेत् कुलयोषितं !
वामाचारो भवेत् तत्र वामाभुत्वा यजेत् पराम् !!
अर्थ : साधकाने पंचमकारानेरजस्वलेचे रज व कुलस्त्री यांची पूजा करावी.असे केल्याने वामाचार होतो. ही पूजा आपण स्वत: वामा (शक्तिदेवता) आहोत या भावनेने करवयाची असते. पंच मकाराचे प्रत्यक्ष, अनुकल्प, आणि दिव्य या प्रकारांनी होणारे अर्थ असे
मकार प्रत्यक्ष अनुकल्प दिव्य
मद्य मदिरा नारळाचे पाणी भगवंताचे उन्मादन ज्ञान
मांस पशुमांस लसुण, मीठ, आले, सर्व वस्तु अंतर्यामी ईश्वराला
तीळ, गव्हाच्या लोंब्या समर्पण करणे
मत्स्य मासा लाल मुळा, वांगे श्वास व प्रश्वास सुषुम्नेत
प्रवाहित करणे
मुद्रा लाह्या तांदुळ सत्संगाच्या गोष्टी
मैथुन परस्त्रीशी रतिकर्म पुष्पसमर्पण सहस्रार्चक्रात शिव-शक्तीचे
मीलन
जरी तांत्रिक भोंदू जरी प्रत्यक्ष प्रमाण वापरत असले तरी तरी तो पशुभाव आहे. साध्य दिव्यभावच आहे.
कौलाचार सर्वसंगाचा त्याग केलेल्या साधकाने पंचमकार म्हणजे पंचमहाभुते मानून शिवाशी एकात्म्य साधण्याचा प्रयत्न करणे हा कौलाचार. निर्वाण वा मोक्ष मिळवणे हेच ध्येय.
तंत्रदर्शनाचे साध्य तंत्रदर्शनात घुसलेल्या विकृती सोडल्या तर तंत्राचे साध्य हे मोक्ष मिळवणे हेच आहे. शैव वा नाथपंथातील साधकांनी तंत्रमार्गाच्या साधनेने प्राप्त झालेल्या सिद्धी त्याज्यच मानल्या आहेत. शंकराचार्य वा निवृत्ती-ज्ञानदेव एका अर्थाने तांत्रिकच. पण त्यांना या विकृतींचा स्पर्शही झालेला नाही. मराठी संतांच्या अथक प्रयत्नांनी महाराष्ट्र या विकृतींपासून मुक्तच राहिला. नाथपंथाचे दीक्षित असूनही माऊलींनी सोज्वळ विठ्ठलच निवडला याचे रहस्यही हेच.
बर्याच गोष्टी सांगावयाच्या राहूनच गेल्या. लेखाची लांबी फार वाढली हे मान्य. पण हे एक महत्वाचे दर्शन राहून गेले अशी खंत बरेच दिवस होती. असो. सर्वमेतत क्षमस्व !
शरद
प्रतिक्रिया
10 Sep 2014 - 9:11 am | प्रचेतस
लेख आवडला.
ह्याचा संदर्भ मिळू शकेल काय? नेमक्या कशा प्रकारे ह्या देवता स्वीकारल्या गेल्या? मी तरी असे पाहिले नाही.
10 Sep 2014 - 9:26 am | सवंगडी
आज पन "रावण संहिता " बाजारात भेटते. एकदा ती घ्यायची पण विच्छा झालती.
पन खरच अशी ईद्या असते हे आमच्या गावाकडच्या अनुभवातून सांगू शकतो त्यामुळे ती विच्छा,विच्छाच राह्यली.
अन नंतर जादूटोणा कायदा आला अन पुस्तक डिस्प्ले मधून गायब झाले.
10 Sep 2014 - 2:26 pm | काउबॉय
पण पुस्तकात सर्व सत्य छापलेआहे असे कधीच वाटत नाही.
@शरद सर बाकी अश्वमेधामधील रतिक्रीडा न उल्लेखिलेलेच बरे नाही का ? अत्यंत विवादास्पद प्रकार आहे तो अन असा यज्ञ केलेला आज मुलाखातिला उपलबध्द नाही पण ज्यांनी तो केल्याचे उल्लेख पुराण देते ते तो करू धजले असावेत असे वाटत नाही अथवा मला याची चुकीची माहिती कानावर आली असेल. असो.
आपण हा लेख लिहित आहात त्यानुशंगाने आपली ऑथोरिटी व प्रयोजन काय आहे ?
10 Sep 2014 - 11:36 am | आदूबाळ
भारीच. आवडला लेख.
10 Sep 2014 - 1:12 pm | प्रसाद गोडबोले
सुंदर लेख !
( पुढे क्रमशः आहे का अजुन ? )