तंत्रदर्शन-३

शरद's picture
शरद in जनातलं, मनातलं
18 Sep 2014 - 5:29 pm

तंत्र आणि लोकायत

तंत्र आणि लोकायत ही दोन दर्शने व भारतातील त्यांचे संबंध एवढ्यापुरताच आजचा लेख मर्यादित आहे. खरे म्हणजे लोकायत या आपल्या ग्रंथांत श्री देविप्रसाद यांनी या दोघांमधील जो संबंध दाखवला आहे त्यावरचे माझे मत येथे मांडले आहे. प्रथम श्री. देविप्रसाद काय म्हणतात ते बघू; तंत्राचे साध्य बघू व नंतर मला श्री. देविप्रसाद यांचे मत का पटत नाही ते बघू.
श्री. देविप्रसाद हे कम्युनिस्ट विचारसरणीचे विचारवंत. त्यामुळे त्यांचा वर्गविद्रोह हा आवडीचा विषय. त्यांना लोकायत दर्शन हे भारतातील आदी जमातीचे व तंत्रही त्यांचेच अशी मांडणी करावयाची आहे. व ही दोन दर्शने आक्रमक आर्यांच्या विरोधातील हे सिद्ध करावयाचे आहे.
त्यांची रचना अशी :
(१) भारतातील लोक कृषीप्रधान होते व आर्य गोपालक होते. हा आर्यपूर्व समाज मातृसत्ताक होता. मातृसत्ताक समाजातच स्वैर लैंगिक स्वातंत्र्य मिळू शकते. आर्यांच्या पितृसत्ताक पद्धतीत नाही.
(२) या मातृसत्ताक समाजात तंत्राचा विकास झाला.. तंत्र अवैदिक आहे.
(३) तंत्र स्त्रीप्रधान आहे. सांख्य प्रकृतीला प्राधान्य देतात. सांख्य जडवादी आहेत. सांख्य व तंत्र यांच्यातील साम्यामुळे तंत्र जडवादी ठरते. (४) पंचमकारादि साधनांमुळे तंत्र भोगवाद व सुखवादाकडे झुकते.
(५) अवैदिक परंपरा,, जडवाद, वेदविरोध यांमुळे लोकायत व तंत्र एकच.
श्री . देवीप्रसाद म्हणतात
There are two basik trends in Indian culture, Vedik and non-vedik, a pre-dominant, if not the most conspicuous, feature of the later is Tantrism.
हा झाला पूर्वपक्ष.

यावरचे माझे मत :: श्री. देविप्रसाद यांचे मत पूर्वग्रहदूषित आहे व त्यांना त्यांचे वाममार्गी मत मांडावयाचे असल्याने त्यांनी सत्याकडे दुर्लक्ष केले आहे.
एक एक मुद्दा घेऊ.
(१)भारतातील समाजावर आर्यांनी आक्रमण केले. हे मत प्रथम पाश्चिमात्य पंडितांनी मांडले, काळ दिला इ.स.पूर्व १५०० ते २०००.या वेळच्या हडप्पा इ. शहरे, जी येथील समाजाची होती, त्यांचा विध्वंस आर्यांनी केला. नवीन पुरावे सांगतात हे साफ खोटे आहे. श्री. शं.बा दीक्षित ऋग्वेदातील एका ऋचेचा काळ आकाशातील तार्‍याचा उल्लेखावरून इ.स.पूर्व ३००० ठरवतात. म्हणजे त्यापूर्वी आर्य भारतात स्थिर होऊन आकाश निरीक्षण करत होते. उत्खननात सापडलेल्या अश्वाच्या हाडांच्या निरिक्षणावरून त्या पाळीव अश्वाचा काळ इ.स.पूर्व ३००० इतका धरला आहे. आर्य व अश्व यांची जवळीक पहाता आर्य त्या वेळी भारतात होते. (श्री. चंद्रशेखर यांचे तीन उत्कृष्ट लेख उपक्रमवर आहेत.) भांडारकर प्राच्य विद्येतील डॉ. ढवळीकर यांनीही पुरावे देऊन ह्या वेळी आर्य भारतात होते हे सिद्ध केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की आर्य बाहेरून आलेले नाहीत. ते येथीलच आहेत. हडप्पा आदि शहरे ओस पडली ती आक्रमणामुळे नाहीत तर नैसर्गीक कारणांनी हे ही निर्विवाद सिद्ध झाले आहे. आर्यांना कृषिविद्या माहीत होती याचे पुरावे ऋग्वेदात आहेत. ( ऋग्वेद ४.५.७८, १०.३४.१३,, यजु.वाजसनेयी संहिता १८.९, १८.१०. १८.१४, १५.९७.२.१०२ वगैरे) थोडक्यात आर्यांचे आक्रमण हा मुद्दा निकालात निघतो. बौद्ध धर्म चीन, जपान आदि देशात पसरला. कोणीही आक्रमण केलेले नाही. तीच परिस्थिती या काळी असावी. म्हणजे युद्द्धे नव्हतीच का ? असणारच. पण आर्य आपापसात लढत तसेच. आर्यांच्या आपापसातील युद्धात अनार्यही दोन्ही बाजूंनी भाग घेत असत. महाभारत हे एक उदाहरण. आर्य व सर्वच समाज सुरवातीला मातृसत्ताकच होते. स्वैर लैंगिक स्वातंत्र्य मातृसत्ताक समाजातच असते असेही नाही. सुरवातीला आज अनैतिक वाटेल असे सैंगिक स्वातंत्र्य पूर्वी आर्यांतही होते. सत्यकाम जाबाली, विश्वामित्र-मेनका, गंगा-शंतनू, सत्यवति-पराशर , किती उदाहरणे पाहिजेत ?
(२) वेदांमध्ये तंत्र किती रुजलेले होते ते आपण मागील भागात पाहिले आहे. तंत्र अवैदिक म्हणावयास आधार नाही.
(३) तंत्रामध्ये स्त्रीला महत्व असले तरी ते साध्य म्हणून नव्हे. स्त्री साधन म्हणूनच वापरली आहे. कापालिक आणि कालमुख हे जवळजवळचे शैव तांत्रिक पंथ. कर्नाटकातील पंचलिंग मंदिरातील एक शैव कालमुख तांत्रिक लकुलिश पंडित याला जमीन दिल्याचा उल्लेख असून शिलालेखात त्याला " लोकायताचा महावृक्ष कापणारी धारधार करवत " असे म्हटले आहे. म्हणजे लोकायत व शैवतंत्र एकमेकाचे विरोधी होते. लॉरिन्ज़न म्हणतो की " तंत्रमार्गी साधनेतील मद्य व मांस यांचे सेवन भोगवादसदृश्य असले तरी त्याचा जडवादाशी अर्थाअर्थी संबंध नाही. भोगवादातून जाणार्‍या या साधनेचा अंतिम उद्देश मुक्ती प्राप्त करणे हाच आहे." लोकायतच्या विरुद्ध.
(४) जर पंचमकारादी उपयोगाचे अंतिम ध्येय मोक्ष मिळवणे हेच असेल तर तंत्राला भोगवादी/जडवादी म्हणता येणार नाही.
(५) अवैदिक परंपरा व जडवाद नाही म्हटल्यावर उरला वेदविरोध. तंत्रात वेदविरोधाचा मुद्दा उगाळलेला दिसत नाही. व जर उपनिषदे वेदाला "फुटकी नौका " म्हणत असतील तर लोकायत व वेदांतही एकच म्हणावयाचे का ?
शेवटी लोकायत व तंत्र यातील विरोधाचा एक महत्वाचा फरक म्हणजे तंत्रातील सर्व पंथात शैव, शाक्त, .. अगदी बौद्ध आणि जैन देखील देव -देवता आहेतच देवाला निकराने नाकारणार्‍या लोकायताची व तंत्राची सांगड कशी घालणार ?
वरील सर्व विवेचनाला पुरावे उपलब्ध आहेत. इथे खोलात शिरण्याचे कारण नाही

कम्युनिस्ट विचारसरणीत वर्गविद्रोह आलाच पाहिजे. आर्यपूर्व समाज व आर्य यांतील संघर्ष प्रस्थापित करण्यासाठी श्री. देविप्रसादांनी सगळा खटाटॊप केला आहे.

शरद

.

संस्कृतीमाहिती

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

18 Sep 2014 - 6:18 pm | प्रचेतस

लेख आवडला.
लकुकीश आमच्या जिव्हाळ्याचा विषय.

मस्त लेख. कम्युनिस्ट लोकांना ओढूनताणून विशिष्ट मांडणी करायची असते, त्यासाठी ते कुठल्याही थराला जातात. त्याचा पर्दाफाष आवडला.

प्रसाद गोडबोले's picture

18 Sep 2014 - 9:00 pm | प्रसाद गोडबोले

कम्युनिस्ट लोकांना ओढूनताणून विशिष्ट मांडणी करायची असते, त्यासाठी ते कुठल्याही थराला जातात.

हे शतप्रतिशत सत्य आहे !

बाकी लेख आवडला ... तंत्र हे लोकायता पेक्षा वैदिकांनाच जास्त जवळचे आपलेसे आहे हे पाहुन आनंद वाटला )

काउबॉय's picture

18 Sep 2014 - 9:56 pm | काउबॉय

तंत्र आणि लोकायत ही दोन दर्शने व भारतातील
त्यांचे संबंध एवढ्यापुरताच आजचा लेख मर्यादित
आहे.

पहिले दोन भाग कमकुवत होते. हां भाग कुतुहल शांत होण्याइतपत रेफ़रन्स देत असल्याने वाचनीय झाला आहे.

पाश्चात्य पाणपोईचे पाणी पिऊन तयार झालेल्या तथाकथीत विद्वानांची पुस्तके वाचुन आपण आपल्या विचारांना साशंकीत करण्या पेक्षा त्यांना तीन हात दुरुन नमस्कार केलेले बरे.
आपण जर ह्या जन्मात आपले वैदिक वाङ्ग्मय वाचायला घेतलीत ती मरे पर्यंत संपणार नाहीत, पुर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, भामती, खण्डनखण्डखाद्यम् इत्यादी.
थोडक्यात तो चुकीचा आहे हे ठरवण्यात वेळ घालवण्या ऐवजी तो वेळ ज्ञानार्जनात उपयोगी आणावा असे माझे वैयक्तीक मत आहे.

कवितानागेश's picture

19 Sep 2014 - 12:45 am | कवितानागेश

वाचतेय...
पण जर उपनिषदे वेदाला "फुटकी नौका " म्हणत असतील > हे नवीनच आहे. असं कोण म्हणतं?

शरद's picture

20 Sep 2014 - 8:27 pm | शरद

प्लवा हये ते अदृढायज्ञरुपा
अष्टादशोक्तमवरं येषु कर्म !
एतच्छ्रेयो ये भिनन्दन्ति मुढा
जरामृत्यु ते पुनरेवापि यान्ति !!
मुण्डक उपनिषद
अठरा प्रकारची साधने असलेले (सोळा ऋत्विज,यजमान व यजमान पत्नी ही अठरा साधने आहेत) यज्ञकर्म हे फुटक्या (चंचल) नौकेसारखे अस्थिर व नाशवंत आहे. असे हे यज्ञकर्म श्रेयस्कर मानणारा जन्म-मृत्यूच्या फेर्‍यात सापडतो.

यज्ञ, त्यामुळे मिळणारा स्वर्ग ह्या कल्पना त्या वेळच्या विचारवंतांना पटत नव्हत्या. त्यातूनच उपनिषदे जन्माला आली. इतरांनी वरील इतक्या शब्दात वेदांचा निषेध केला नसला तरी उपनिषदांचा मार्ग वेगळा. खरे म्हणजे यावर एक निराळाच लेख लिहला पाहिजे, पण इथे फार लोकांना वाचनीय होणार नाही हे खरेच

शरद

पोटे's picture

20 Sep 2014 - 5:51 pm | पोटे

त्रयो वेदश्च कर्तारो धूर्त भंड निशाचरो.

तीन वेदांचे कर्ते घूर्त लबाड व चोर होते