अनंतचतुर्दशी

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जनातलं, मनातलं
8 Sep 2014 - 7:11 pm

"इट्स डन "
******************************************************************************

साधारण १४ -१५ वर्षांपुर्वीची गोष्ट . अनंतचतुर्दशीचा दिवस ! महादरे तळ्याच्या काठावर विसर्जनासाठी तुडुंब गर्दी ओसंडली होती. तळ्याकाठच्या घाटावर लोक गणेशमुर्तींची आरती करत होते. पायर्‍यांवर उदबत्त्यांचा , निर्माल्याचा , चिरमुरे बत्ताशे फुटाणे वगैरे नैवेद्याच्या गोष्टींचा खच जमु लागला होता . छोट्या मोठ्या मंडळांच्या ढोलताशांच्या आवाजात सगळा परिसर दुमदुमुन निघत होता. तळ्याकडेच्या गणेशमंदीराच्या कळसावर सुरेख रोषणाई करण्यात आलेली होती. त्या दिव्यांच्या मंद प्रकाशात जवळपास संपुर्ण तळेच उजळुन निघत होते . तळ्याच्या दुसर्‍या बाजुला , यवतेशवरच्या जंगलाच्या बाजुला मात्र घनदाट शांतता होती. नेहमी पोहायला गेलो की उड्या मारायला तिकडे गर्दी करणारी पोरे आज एक तर धोलताशांच्या पथकात होती तर काही तळ्यात पोहत पोहत विसर्जनाला मदत करत होती . (बरेच जण गुढघाभर पाण्यात मुर्ती नेवुन विसर्जित करत होते अन ही पोरं त्या मुर्ती तळ्याचा मध्यापर्यंत नेवुन सोडत होती.)
गणपती बाप्पा मोरया... मंगलमुर्ती मोरयाच्या गजरात हा सारा सोहळा जोरदारपणे चालु होता ...

"दादा , ह्या पोरांकडे बघ रे , खाली येवु देवु नको कोणाला . मी विसर्जन करुन येतो . "
असे बोलुन मामाने ७-८ चिल्लीपिली भावंडे माझ्याकडे सोपविली. आमची नुकतीच गणपतीची आरती करुन झाली होती , नाना शांतपणे पुजेचे ताम्हण अन प्रसादाच्या पिशव्या घेवुन उभे होते अन मी त्यांच्या बाजुला ! मी जरा प्रेमाने तर जरा दटावुन पोरांना कठड्यापासुन दुर उभे केले . सगळ्यात धाकट्या छकुच्या तर डोळ्यात पाणी आले होते बाप्पा जाणार म्हणुन... तिला अलगद कडेवर उचलुन घेतले.

" ए वेडुले रडायचं काय ? बाप्पा परत येणार ना पुढच्या वर्षी ! "
"पन मग तो चाललायच कछाला ? त्याला सांग ना थांबायला "
"अगं त्याला त्याच्या आईची आठवण येत असेल ना , तुला येते कीनई तशीच म्हणुन चाललाय तो "

पोरगी मुसमुसत खांद्यावर डोके ठेवुन पडली , इतर टवाळ कारटी तिला हसत होती त्यांना जरा दटावुन शांत केले.
नाना हे सारं शांतपणे पहात होते .त्यांनी माझ्याकडे पाहुन हलकेसे स्मितहास्य केले , त्यांच्या चेहर्‍यावरचा निर्विकार भाव पाहुन मला कोड्यात पडल्या सारखे वाटत होते ... इतका मोठ्ठा झाले तरी मलाही कुठे तरी बाप्पा जाणार ह्या विचाराने कसे तरीच व्हायचे , उणीपुरी दहा दिसांची सोबत पण घरी इतका मोठ्ठा कार्यक्रम असायचा , सकाळी अभिषेक , दुपारी आवर्तने , संध्याकाळी आरत्या वगैरे ! बाबांकडे दीडदिवसाचा गणपती विसरजन झाले की आम्ही ताबडतोब मामा कडे सुटायचो ते अगदी अनंतचतुर्दशी पर्यंत ! त्यात ही चिल्लीपिल्ली मामेभावंडं अन मग इतका दंगा असायचा की काय सांगु ! अन त्यात हा बाप्पा आमच्यातलाच एक होवुन रहायचा जणु ! मग विसर्जनाच्या वेळेला का बरे डोळ्यात पाणी नाही येणार ?

"नाना , इतका मोठ्ठा झालो तरी मला हे अजुनही उमगत नाहीये !" मी हळुच नानांना म्हणालो .
नाना म्हणाले " काय उमगत नाहीये ? अन कोण मोठ्ठा झाला ? "
"मीच की ! मीच मोठ्ठा झालोय...पण मलाही अजुन ह्या विसर्जनामागचे कोडे सुटत नाहीये "
नाना हसले " लेका अजुन अंड्यातुन बाहेर आला नाहीस अन म्हणे मोठ्ठा झालो , अजुन खुप वेळ आहे समजुन घ्यायला "
"नाही नाना . ही काय ७-८ पोरं मला दादा म्हणताहेत, मी मोठ्ठा झालोय, मला हे समजुन घ्यायचंय , मला कळालं नाही तर ह्या पोरांना मी काय सांगणार ? मला सांगा ना ह्या गणेशोत्सवामागचा नक्की उद्देश काय ? दहा दिवस आपण गणपती घरी आणतो इतक्या जिवाभावाने पुजा करतो अन मग दहाव्या दिवशी विसर्जन ...हे का ? दहा दिवस 'दास रामाचा वाटपाहे सदना' म्हणायचे अन दहाव्या दिवशी त्याला पाण्यात विसरजन करुन टाकायचे ... दहा दिवस ज्या मुर्ती वर प्रेम केले भक्ती केली तीच मुर्ती अकराव्या दिवशी तळ्याचा काठाशी मोडक्यातोडक्या अवस्थेत उध्वस्त पडलेली पहायची हे काही मला उमगत नाही , ही कसली भक्ती ?"

मी प्रश्नांच्या गुंत्यात अडकलो होतो , रादर अजुनच खोलखोल रुतत चाललो होतो....खुप विचार करुनही माझी मला उत्तरे सापडत नव्हती .

मामा विसर्जन करुन , भिजलेले धोतर सावरत पायर्‍या चढुन वर आला होता , तळ्यातले पाच खडे ताम्हणात घेतले होते. आमच्या पुढे येवुन तो नानांना म्हणाला

"इट्स डन "

नाना हसुन म्हणाले " नॉट येट ! तु ह्या पोरांना घेवुन पुढे हो , मला जरा दादाशी गप्पा मारायच्यात, मी दादाला घेवुन येतो थोड्यावेळाने "

मामा हसला . त्याने नानांकडुन प्रसादाची पिशवी घेतली . छकुला माझ्या खांद्यावरुन घेतले अन बाकीच्या पोरांना सोबत घेवुन घरी निघुन गेला .

"इथे जरा जास्तच दंगा आहे , आपण जरा पलीकडच्या कठड्यावर जाऊन बसुयात गप्पा मारत " नाना बाकी काही न बोलता पलीकडच्या कठड्याच्या दिशेने चालु लागले अन मी त्यांच्या मागेमागे.

*********************************************************************
तळ्याच्या पलिकडच्या काठावरुन विसर्जनाचा सोहळा अगदी वेगळा भासत होता . तळे बर्‍यापैकी मोठेठे असल्याने ह्या इथे ढोलताशांचा दंगा तितकासा कर्कश्श ऐकु येत नव्हतो उलट काजवे रातकिडे ह्यांचाच किर्किर आवाज जास्त होता ...पलिकडच्या काठावरील मंदीराची रोषणाई , पाण्यात उतरुन गणपति विसर्जन करणारी पोरं अन त्या मागे दिसणारी अजिंक्यतार्‍याची अस्पष्ट आकृती ... अगदी कोणा चित्रकाराने चित्र काढावे असे दृष्य होते !
मी आणि नाना तळ्याच्या कढड्याच्या बाजुला असलेल्या पायर्‍यांवर बसलो होतो...

नाना शांत गंभीरस्वरात म्हणाले
"अरे जे जालेंचि नाहीं | त्याची वार्ता पुससी काई | तथापि सांगों जेणें कांहीं | संशय नुरे ||"

" नाना ??"

"दादा , अरे ह्या गोष्टी अशा झटकन लक्षात नाही येणार , आधी खुप वाचावे लागेल मग चिंतन करावे लागे ...हळु हळु उमगायला लागतील ह्या गोष्टी ! तु कधी ना कधी असे प्रश्ण विचारणार हे ठाऊकच होते आजचा बरा मुहुर्त साधलास लेका !

हे बघ , आपल्यातले कोणतेही मोठ्ठे उत्सव पाहिलेस तर ते १० दिवसांचेच असतील , गणेशोत्सव म्हण की नवरात्र म्हण रामाचे नवरात्र. खंडोबाचे नवरात्र वगैरे सगळेच ! नऊ दिवसांचा उत्सव अन दहाव्या दिवशी विसर्जन !हे सगळे आपल्या नवविधाभक्तिराजपंथाचे प्रतिक आहेत.
आपण गणेशचतुर्थीला काय करतो तर एक मातीची मुर्ती घरी आणतो , म्हणजे खरेतर शाडु पीओपी वगैरेची पण पुजेत तरी पार्थिव महागणपतयेनमः म्हणतो , ही मुर्ती खरेतर मातीची असणे अपेक्षित आहे पण काळ बदलला तशा पध्दती बदलत जाणार , ते असो .
तर आपण ही मुर्ती घरी आणुन प्राणप्रतिष्ठापना करतो ... शब्द बघ किती छान वापरलाय ज्याने पुजा विधी लिहिणार्‍याने ! कारण द्गडामातीत कुठला आलाय रे देव ...
धातु, पाषाण, मृत्तिका । चित्रलेप, काष्ठ देखा । तेथे देव कैचा मूर्खा । भ्रांति पडिली ।
तर हे सारे आपल्या कल्पनेचे आहे , आपल्या मनाची धारणा आहे , त्या मुर्तीमधे आपण आता देव आहे अशी धारणा करतो ... नातुडे मुख्य परमात्मा म्हणोनि करावी लागे प्रतिमा !!
इथुनपुढचा प्रवास जी की बाह्यांतरी उपासना आहे साधना आहे तीच अभ्यंतरीचे मननचिंतन निजध्यासन आहे.

श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम् ।
अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम्

नऊ दिवस , नऊ भक्ती ! दररोज एकएक पायरी वर सरकत जायचे आहे आपल्याला , किंव्वा असे म्हण की एक एक पायरी खोल मनाच्या गाभार्‍यात उतरत जायचे आहे !
आधी श्रवण करायचे मग कीर्तन मग स्मरण वगैरे वगैरे , तुला रस्ता माहीत आहेच ... पण ह्या बरोबरच अंतरीचा प्रवासही , सुक्ष्माचा प्रवासही करायचाय !
ही माती , पाणी रंग वगैरे म्हणजे देव आहे का ? की ह्या दुर्वा , फुले म्हणजे देव आहे ? जे पिंडी तेच ब्रह्मांडी ... किंव्वा जे ब्रह्मांडी तेच पिंडी मग ह्या हिशोबाने विचार कर पाहु , हे हात पाय कान नाक डोळे म्हणजे तु आहे आहेस का ? जेव्हा माझे हात माझे पाय माझे कान नाक डोळे असे आपण म्हणतो तेव्हाच ह्यातला माझे म्हणणारा ह्यांपासुन वेगळा अलिप्त असा कोणी तरी आहे हेच अधोरेखित होत नसते काय ? "

मी गुंग होवुन सारे ऐकत होतो ... "पण मी विचार करतो , मी अनुभव घेतो , मला आनंद दु:ख वगैरे जाणवते म्हणजे मी असा कोणी तरी नक्की असणारच "

"करेक्ट , अरे पण तो मी कोण हे सारे जाणुन घेण्यासाठीच तर हा येवढा सोहळा मांडला ना आपण ! तर आपल्याला असा संतांच्या शब्दात सांगायचे तर नवविधाभक्तिराजसोपान चढुन जायचाय . अन शेवटच्या पायरीवर नवव्या पायरीवर पोहचलो की तुझ्या लक्षात येईल की ही पार्थिव अशी गणेशाची मुर्ती आपण निर्माण केली त्यात प्राणप्रतिष्ठापना केली , देव त्याच्यापेक्षा प्रचंड विशाल आहे अन ज्याला आपण माझे माझे म्हणतो तो मी देखील ह्या हात पाय कान नाक मन बुध्दी अहंकार ह्या सगळ्यांच्या परे आहे , त्याच्यात अन ह्या देवाच्यात काहीच फरक नाही.

पदार्थ मनें काया वाचा| मी हा अवघाचि देवाचा |
जड आत्मनिवेदनाचा| विचार ऐसा |
|

ही झाली नववी पायरी पण अजुन बरेच आहे ... अजुन जसा जसा मोठ्ठा होत जाशील तेव्हा तुझ्या लक्षात येत जाईल

पदार्थ मनें काया वाचा| मी हा अवघाचि देवाचा |
जड आत्मनिवेदनाचा| विचार ऐसा ||
चंचळकर्ता तो जगदीश| प्राणीमात्र तो त्याचा अंश |
त्याचा तोचि आपणास| ठाव नाहीं ||
चंचळ आत्मनिवेदन| याचें सांगितलें लक्षण |
कर्ता देव तो आपण| कोठेंचि नाहीं ||
चंचळ चळे स्वप्नाकार| निश्चळ देव तो निराकार |
आत्मनिवेदनाचा प्रकार| जाणिजे ऐसा ||
ठावचि नाईं चंचळाचा| तेथें आधीं आपण कैंचा |
निश्चळ आत्मनिवेदनाचा| विवेक ऐसा ||
तिहिं प्रकारें आपण| नाहीं नाहीं दुजेपण |
आपण नस्तां मीपण| नाहींच कोठें ||

पाहातां पाहातां अनुमानलें| कळतां कळतां कळों आलें |
पाहातां अवघेंचि निवांत जालें| बोलणें आतां ||

नाना बोलता बोलता शांत झाले ...अन् मीही . बर्‍याच गोष्टी डोक्यावरुन गेल्या होत्या ;ज्या थोड्या फार डोक्यात शिरल्या होत्या तेवढ्याच आता आठवत होत्या.

" पण नाना मला अजुनही एक गोष्ट लक्षात येत नाहीये दहाव्या दिवशी विसर्जन का ? ठीक आहे तुम्ही आत्मनिवेदनाच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहचलात पण मग विसर्जन कशासाठी ? "

नाना हसुन म्हणाले " अरे आपण पारायणाच्या शेवटी काय म्हणतो आठव की

जालें साधनाचें फळ । संसार जाला सफळ ।
निर्गुण ब्रह्म तें निश्चळ । अंतरीं बिंबलें ॥
हिसेब जाला मायेचा । जाला निवाडा तत्वांचा ।
साध्य होतां साधनाचा । ठाव नाहीं
स्वप्नीं जें जें देखिलें । तें तें जागृतीस उडालें ।
सहजचि अनुर्वाच्य जालें । बोलतां न ये ॥

एकदा जे साध्य होते ते साधले की साधनांची काय गरज ? ज्यागणेशाचे स्वरुप जाणुनघेण्यासाठी ही मातीची मुर्ती स्थापिली , त्या गणेशाचे स्वरुप लक्षात आल्यावर ह्या मुर्तीची तरी काय गरज ? आता सगळीकडे तोच तो आहे मग त्याला ह्या शुल्लक मुर्तीपुरता का मर्यादित करा ? पायात लोखंडाची बेडी होती ती तोडुन आपण सोन्याची घातली अरे पण ती सोन्याचीही बेडीच आहे हे लक्षात आल्यावर ती तरी कशाला ... तीही सोडुन देता आली पाहिजे म्हणुन विसर्जन ... जो मुळात अनंत होता त्याला केवळ आपण आपल्या आकलनासाठी मुर्तीमधे कल्पिला , अन आता तो अनंत आहे हे लक्षात आल्यावर त्याला अनंतातच विलिन होवुन जाऊदे ...म्हणुन अनंतचतुर्दशी ! परत जे ब्रह्मांदी तेच पिंडी ! जो न्य्याय परम्यात्माला तोच अंतरात्म्याला ! एकदा विसर्जन झाले की संपले ! मग ती मुर्ती अन् तो देह कोठेही जाओ अथवा राहो , आपल्याला त्याच्याशी काय ? आता आपण मोकळे !

नाना शांतपणे उभे राहिले , माझ्याकडे पाहुन म्हणाले

"आतां होणार तें होईना कां| आणि जाणार तें जाईना कां |
तुटली मनांतील आशंका| जन्ममृत्यूची ||

संसारीं पुंडावें चुकलें| देवां भक्तां ऐक्य झालें |
मुख्य देवासि ओळखिलें| सत्संगेंकरूनी ||
"

नानांनी पाण्यामधे सुर मारला , मीही नानांच्या मागे मागे तळ्यात उडी मारली , पोहत पोहत विसर्जनाच्या काठावर पोहचलो , काठावरच्या गणेशमंदीरात देवाला नमस्कार केला .
*******************************************************************************

घरी पोहचलो तेव्हा गणपतीच्या मुर्तीच्या जागी घरातल्या गणेशाची प्रतिमा ठेवली होती , आरती जवळपास संपत आली होती, पोरांचा प्रसाद वाटण्यावरुन किलकिलाट चालु होता , ज्याला त्याला उकडीचे मोदक खायचे होते सर्वात आधी . मी कपडे बदलुन देवघरात आलो तेव्हा नाना शांतपणे डोळे मिटुन अथवशीर्ष म्हणत बसले होते.
मी देवाला जाऊन नमस्कार केला आरती घेतली अन मग मामाला नमस्कार केला , मामाने हसत हसत पाठीवर थाप मारली अन म्हणाला " नाऊ ,

" इट्स डन !"

*********************************************************************************

धर्मशिक्षणप्रतिभा

प्रतिक्रिया

प्यारे१'s picture

8 Sep 2014 - 7:19 pm | प्यारे१

___/\___

माऊली, माऊली... शिरसाष्टांग नमन.
>>> सहजचि अनुर्वाच्य जालें । बोलतां न ये
अगदी अगदी असंच झालंय लेख वाचून.

टवाळ कार्टा's picture

8 Sep 2014 - 7:50 pm | टवाळ कार्टा

+१११

मूकवाचक's picture

8 Sep 2014 - 7:57 pm | मूकवाचक

+१

तिमा's picture

8 Sep 2014 - 7:57 pm | तिमा

ज्यागणेशाचे स्वरुप जाणुनघेण्यासाठी ही मातीची मुर्ती स्थापिली , त्या गणेशाचे स्वरुप लक्षात आल्यावर ह्या मुर्तीची तरी काय गरज ?

असे जर असेल तर दर वर्षी गणपती का बसवायचा ? पहिल्या वर्षीच ते स्वरुप जाणल्यावर पुढच्या वर्षी जरुर काय ?
लेख वाचला व आवडला. पण आत्मज्ञान प्राप्त करायला हाच एक मार्ग आहे असे वाटत नाही.

प्रभाकर पेठकर's picture

9 Sep 2014 - 1:50 am | प्रभाकर पेठकर

सहमत.

कवितानागेश's picture

9 Sep 2014 - 11:58 am | कवितानागेश

आपण रोज २ वेळेला जेवतो तसंच दरवर्षी गणपती बसवतो.

गणपती बसवण्याची सर्वांची गरज ही जेवण्याइतकी ष्ट्राँग असते का? नै म्हणजे तसं अ‍ॅझम्प्षन जाणवतंय.

अनुप ढेरे's picture

9 Sep 2014 - 12:04 pm | अनुप ढेरे

ज्यांची असते ते बसवतात. ज्यांची नसते त्यांना न बसवायचा ऑप्शन आहे.

येस. पण अंमळ युनिव्हर्सलिष्ट क्लेम्स जाणवले इतकंच. असो.

आतिवास's picture

8 Sep 2014 - 9:01 pm | आतिवास

लेख आणि विशेषतः त्यातलं नानांचं चिंतन आवडलं.

कवितानागेश's picture

8 Sep 2014 - 10:10 pm | कवितानागेश

येस. :)

थोडी अवांतर आणि ऐकीव माहिती
गणपतीच्या दिवसात पेरण्या वगैरे झालेल्या असतात. शेतातील बरीच कामे उरकलेली असतात. शेतकऱ्यांकडे मोकळा वेळ भरपूर असतो. या मोकळ्या वेळात ते दारू/जुगार या सारख्या वाम मार्गाला लागू नयेत व त्यांनी भजन कीर्तनात वेळ व्यतीत करावा म्हणून घरगुती गणेश उत्सव चालू झाला.
खरे खोटे देवाला माहिती.

आनन्दा's picture

9 Sep 2014 - 12:24 pm | आनन्दा

असहमत.
गणेशोत्सवाला उत्सवी स्वरूप टिळकांच्या काळात आले, त्यापूर्वी तो इतका मोठा उत्सव होता असे वाटत नाही. नपेक्षा काहीतरी ऐतिहासिक संदर्भ मिळालेच असते नाही का? पूर्वी २ दिवसांचा गणपती होता, असे माझे आपले मत आहे.

पैसा's picture

9 Sep 2014 - 12:31 pm | पैसा

कोकणात पूर्वीपार गौरीबरोबर विसर्जन करतात.

खटपट्या's picture

14 Sep 2014 - 11:12 am | खटपट्या

बरोबर, टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु करायच्या आधी कोंकणात घरगुती गणेशोत्सव होताच कि. यात सर्वजण सर्वांच्या घरी आरतीला जातात. रोज एका घरात सर्व गावकरी मिळून भजन करतात. आणि हे शेकडो वर्षे चालले आहे.

स्पंदना's picture

9 Sep 2014 - 6:12 am | स्पंदना

फारच सुरेख लिहीलय प्रसाद गोडबोले.

इनिगोय's picture

9 Sep 2014 - 8:47 am | इनिगोय

अतिशय सुंदर लेख.
गणेशोत्सवामधलं.. किंबहुना कोणत्याही उत्सवामधलं हे सत्त्व दुर्दैवाने आता नाहीसंच झालंय.

@तिमा, झालेली ही जाणीव ताबडतोब, कायमसाठी स्थिर होतेच असं नाही, म्हणून तिचं पुनःपुन्हा स्मरण असं म्हणता येईल. आत्मज्ञान प्राप्त करायला हाच एक मार्ग नसला तरी हाही एक असू शकेलच.

प्यारे१'s picture

9 Sep 2014 - 1:16 pm | प्यारे१

>>> @तिमा, झालेली ही जाणीव ताबडतोब, कायमसाठी स्थिर होतेच असं नाही, म्हणून तिचं पुनःपुन्हा स्मरण असं म्हणता येईल. आत्मज्ञान प्राप्त करायला हाच एक मार्ग नसला तरी हाही एक असू शकेलच.

+१
हा एकच मार्ग आहे असं लेखात तरी कुठंही म्हटलेलं नाही असं माझं आकलन.

आत्मा वा अरे, श्रोतव्यो मन्तव्यो निदीध्यासितव्यो...
पुन्हा पुन्हा ऐकावं, मनन करावं, निदीध्यासन करत रहावं. स्मरण करत रहावं.ह्याचं कारण म्हणजे जाणीव पक्की लगेच होत नाही, झाली तरी इतर कारणांनी व्यक्तीचं अधःपतन होतं.
अर्थात उपासना, भक्ती अथवा एकंदरच धर्म हा वैयक्तिक विषय आहे असं गृहीत धरुनच बोलतोय. त्याला उत्सवी स्वरुप (असण्याची गरज असलीच तर) उंबरठ्याबाहेर तर वैयक्तिक जीवनाशी जोड उंबरठ्याच्या आत असावी.

भक्तीचं शास्त्र (त्याच्या अ‍ॅप्लिकेशन मेथड्स) समजून घेऊन त्याप्रमाणं उपासना केली की निश्चित जिथं न्यायचं तिथं नेऊन सोडते. एका मार्गाचं म्हणाल तर कुठल्याही एका अथवा एकाच वेळी अनेक मार्गांनी ध्येय गाठलं जावं. ध्येय पोचलं गेलं नाही तर उपयोग नाहीच असं नाही पण उपयोग कमी.

असो! पुन्हा ते तेच लिहून ताजमहालाला विटा नकोत.

विटेकर's picture

9 Sep 2014 - 5:55 pm | विटेकर

उपयोग नाहीच असं नाही पण उपयोग कमी.

नाय वो जेवढाचा तेव्ह्ढा ब्यालन्स क्यारी फोरवर्ड होतो...

क्यारी फॉरवर्ड म्हणजे पुढच्या जन्माची निश्चिती! नको राव. किती वेळा जन्मा यावे कितीदा व्हावे फजित?

आज रोख उद्या उधार असलं काही तर सांगावं म्हणून तसं 'कमी उपयोग' म्हणालो.

योगी९००'s picture

9 Sep 2014 - 9:31 am | योगी९००

फारच सुरेख..!!

असे नाना सगळ्यांना मिळावेत ही गणरायाच्या चरणी प्रार्थना..!!

>>असे नाना सगळ्यांना मिळावेत ही गणरायाच्या चरणी प्रार्थना..!!
असेच म्हणतो.

बॅटमॅन's picture

9 Sep 2014 - 11:22 am | बॅटमॅन

मस्त विवेचन मांडले आहे. आवडलेच!

मदनबाण's picture

9 Sep 2014 - 11:48 am | मदनबाण

सुरेख लेखन ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राजधानी.. गुंडगिरीची!

छान लेखन!
अगदी रसाळ विवेचन!

पैसा's picture

9 Sep 2014 - 12:02 pm | पैसा

असं नेहमी लिहीत जा रे! फारच छान. मातीची मूर्ती मातीला परत करायची. आणि काय!

सविता००१'s picture

9 Sep 2014 - 12:10 pm | सविता००१

सुंदर लेख

प्रसाद प्रसाद's picture

9 Sep 2014 - 12:16 pm | प्रसाद प्रसाद

नानामृत आवडले.

समीरसूर's picture

9 Sep 2014 - 12:20 pm | समीरसूर

खूप आवडला. अगदी समोर सारे घडते आहे असे भासले. वाचून खूप छान वाटले.

बाकी, मी कोण, माझा जन्म झाला नसता तर माझे अस्तित्व काय असते, अस्तित्व असते का, मी मेल्यानंतर माझे काय होणार, मी या पृथ्वीवर जगतो म्हणजे नेमके काय असे बरेच प्रश्न नेहमी पडतात मला. उत्तरे सापडत नाहीत हे ही खरे...असो. ती उत्तरे मिळण्यासाठी फार मोठे संचित लागते. मज पामराजवळ काय आहे हेच मला कळत नाही. ही इतकी गहन उत्तरे काय डोंबल मिळणार. :-)

काळा पहाड's picture

9 Sep 2014 - 6:13 pm | काळा पहाड

मी कोण

उर्जेचा एक छोटा भाग.

माझा जन्म झाला नसता तर माझे अस्तित्व काय असते

त्यानं फरक पडत नाही. उर्जेला स्वतःची जाणीव नसते. मानव शरीरात ही जाणीव असणे हा सुद्धा एक भ्रम आहे. तुम्ही एक मशीन आहात आणि तुम्हाला अशी जाणीव असणं म्हणजे तुमच्या मशीनमधले सेन्सर्स ठीक काम करतायत एवढंच.

अस्तित्व असते का, मी मेल्यानंतर माझे काय होणार

तुमचं आस्तित्व एक उर्जा म्हणून असतं. या उर्जेला स्वतःची जाणीव मेल्यानंतर नसते.

मी या पृथ्वीवर जगतो म्हणजे नेमके काय

अपघात. तुम्ही जगताय कारण तुम्ही अशा एका विश्वाचा भाग आहात जिथे जीवन (ज्याला खरं तर काहीच कार्यकारणभाव, उद्दिष्ट वगैरे नाहीये) आस्तित्वात असू शकतं. जर विश्वाचं एकही परिमाण उदा: प्लॅन्कचा स्थिरांक थोडाजरी वेगळा असता तरी तुम्हीच काय पण हे विश्व आस्तित्वात आलं नसतं. अर्थात अशी अनेक विश्वे आस्तित्वात असावीत ज्यात हा स्थिरांक वेगळा असणार आणि ते विश्व केऑटीक असेल ज्यात जीवन वाढू शकत नाही. थोडक्यात, तुमचं जीवन आणि तुमच्या आजूबाजूला चाललेलं सगळं हा अपघात आहे.

विटेकर's picture

10 Sep 2014 - 2:55 pm | विटेकर

काहीही कळले नाही, पण या धाग्यावर नको चर्चा. फार सुन्दर धागा आहे हा... उगाच ठीगळ नको...
लोकांनी बहुधा म्ह णू नच प्रतिसाद दिले नसावेत.

(रच्याकने सध्या मिपावर सन्क्षी स्टाइल लिहायची फ्याशन आली आहे काय? )

काळा पहाड's picture

10 Sep 2014 - 3:03 pm | काळा पहाड

मी उत्तर देताना प्रतिसाद देण्याची अपेक्षा करत नाही. पण तुमचा मुद्दा बरोबर आहे. फिलॉसॉफी चा धागा असताना फिजिक्सचा प्रतिसाद द्यायला नको होता. कदाचित मी स्वतःच यावर एखादा लेख लिहीन.

मराठी_माणूस's picture

10 Sep 2014 - 4:54 pm | मराठी_माणूस

तुमचा प्रतिसाद रोचक आहे. ह्यावर एक लेख लिहाच.

प्यारे१'s picture

10 Sep 2014 - 4:58 pm | प्यारे१

लिहाच.

विटेकर's picture

9 Sep 2014 - 3:58 pm | विटेकर

आवडला लेख.
तुमची परवानगी आहे समजून वितरित करतो.

अनुप ढेरे's picture

9 Sep 2014 - 4:04 pm | अनुप ढेरे

छान लिहिलय!

सूड's picture

9 Sep 2014 - 4:15 pm | सूड

आवडलं!!

नि३सोलपुरकर's picture

9 Sep 2014 - 5:12 pm | नि३सोलपुरकर

सुंदर लेख...आवडलं!!

प्रचंड आवडल्या गेले आहे

vikramaditya's picture

10 Sep 2014 - 4:58 pm | vikramaditya

मनाला भावला.

प्रमोद देर्देकर's picture

11 Sep 2014 - 5:01 pm | प्रमोद देर्देकर

खुप सुंदर लेख...आवडल. सहमत.

@ इनिगोय - १००% सहमत

लेखात उल्लेखलेल्या १/१२, ते १० दिवसाच्या हेतु संबंधी अजुन एक शिकवण बाप्पाकडुन मिळते. या स्थापनेमध्ये आणि विसर्जानामागे एक तत्वाज्ञान आहे.
ज्या प्रमाणे निर्जिव पार्थिवामध्ये मंत्र उच्चारुन प्राणप्रतिष्ठापना केल्यावर त्यामध्ये चैतंन्य येतं आणि मग १० दिवस त्या मुर्तिची पुजाअर्चा केली जाते अणि परत १० व्या दिवशी पुन्हा मंत्र उच्चारुन (उत्तरपुजा) त्या मुर्तितले प्राण काढुन घेवुनती मुर्ती पार्थिव होते. मग तिची विटंबना होवु नये म्हणुन पाण्यात विसर्जन केले जाते.

तव्दतच आपल्या मानवी देहाचं आहे कि या जड देहामध्ये एका क्षणी प्राण फुंकला जातो. जो पर्यंत प्राण आहे तोपर्यंत नंतर त्याचं पार्थिवच होणार आहे, त्याच्याही विसर्जनाचा एक दिवस येणार आहे. हे आपल्याला बाप्पा सांगत असतो.

तेव्हा या मधल्या काळात चांगलं सत्कर्म करत, अहंकारमुक्त, नितीने, सकारात्मक जीवन जगा.
हाच संदेश आहे बाप्पाचा सगळ्यांना.
पण लक्षात कोंण घेतो.

बोला ! गणपती बाप्प्पा मोरया!

मुक्त विहारि's picture

11 Sep 2014 - 10:32 pm | मुक्त विहारि

लेख आवडला..

अतिशय सुंदर लेख व मौलिक मार्गदर्शन!!

मनापासुन धन्यवाद.

चित्रगुप्त's picture

29 Sep 2023 - 6:07 am | चित्रगुप्त

हा जुना लेख आजही तितकाच वाचनीय आहे.

कर्नलतपस्वी's picture

29 Sep 2023 - 10:44 am | कर्नलतपस्वी

आवडला