क्षमा

आतिवास's picture
आतिवास in जनातलं, मनातलं
28 Aug 2014 - 2:01 pm

“तू माझी क्षमा मागितली पाहिजेस”, ती म्हणाली.
डोळ्यातले अश्रू लपवत तो “आय अ‍ॅम सॉरी” म्हणाला.
“सॉरी नाही, क्षमा माग”, ती तिच्या शब्दावर ठाम होती.
“मला क्षमा कर,” तो थरथरत्या आवाजात म्हणाला.

“तूही क्षमा मागितली पाहिजेस”, शेजारच्या उदास स्त्रीकडे वळून ती त्याच स्वरांत उद्गारली.
“मी तुझी क्षमा मागते,” म्हणताना त्या स्त्रीला हुंदका आवरता आला नाही.

तिथे आता सुन्न शांतता होती.
एकदाही मागे वळून न पाहता, अगदी सावकाश ती छोटी मुलगी खोलीच्या बाहेर गेली.

“हं! तर आता तुमच्या पाच वर्षांच्या मुलीचा ताबा कोणाकडे असावा याबाबत आपण बोलू ....” वकील म्हणाली.

लाडक्या लेकीची क्षमा मागताना कोसळलेले आई-बाप पुन्हा दोन स्वतंत्र माणसं झाली.

* शतशब्दकथा

कथाआस्वादअनुभव

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

28 Aug 2014 - 2:11 pm | विजुभाऊ

जिंदगी तेरे नाम आज रोना आया.
क्या कहने आज हर इक नाम पे रोना आया

प्रभाकर पेठकर's picture

28 Aug 2014 - 2:13 pm | प्रभाकर पेठकर

सर्वच गुन्हे क्षमा मागून माफ करता येत नाहीत.
'Sorry' can not make a dead man alive. असे म्हणतात ते खरेच असते.
कथा आवडली कसे म्हणू? घटनेचे सादरीकरण चांगले परिणामकारक झाले आहे. असं घडायला नको होतं हा आणि ५ वर्षाच्या मुलीच्या उध्वस्त भावविश्वाचा विचार मनाला एक अनाम अस्वस्थता देऊन जातो.

एस's picture

28 Aug 2014 - 2:22 pm | एस

नेहमीइतकी नाही आवडली. कथेऐवजी फक्त एक घटना वाटली. आणि या घटनेबद्दल काहीच लिहायचं नाहीये.

आतिवास's picture

28 Aug 2014 - 3:18 pm | आतिवास

:-)

कथेतून काय पोचवायचं आहे ते समजलं आहे, पण पाच वर्षाची मुलगी अशी बोलेल, हे फारसं पटलं नाहीये, त्यामुळे नेहमीइतकी आवडली नाही. अशा प्रसंगांत मुलं इतक्या ठामपणे बोलू शकतील तो सुदिन! त्याहीपेक्षा असे प्रसंग कोणत्याही मुलांवर येणार नाहीत तो दिवस दसरा- दिवाळी. (म्हणजे पटत नसलेल्या विवाहितांनी वेगळे होऊच नये असे नाही, पण वेगळे होतानाही मुलं असतील तर त्यांच्यावर अशा घटनांचा कमीतकमी नकारात्मक परिणाम होईल हे पाहिले जावे, असे म्हणायचे आहे. मुलांची मने जपली जावीत.)

:-)
कंसातल्या मजकुरावर बरंच काही लिहिता येईल.
पाच वर्षांची मुलगी असं ठामपणे बोलेल का? - ही शंका रास्त आहे; पण प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असतात हाही भाग आहेच.

कंसातल्या मजकुरावर बरंच काही लिहिता येईल. >> पूर्ण सहमत आहे. त्याबद्दल प्रश्न नाही.
हो, प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात. खरं आहे..

प्रभाकर पेठकर's picture

28 Aug 2014 - 3:49 pm | प्रभाकर पेठकर

माझ्या मते, आपण आपल्या मुलांना ह्या जगात आणले आहे. आपल्या वेगळे होण्याने त्यांच्या मनावर आयुष्यभराकरीता अनिष्ट परीणाम होणारच. पती-पत्नीत, दोघांपैकी कमीत कमी एक तरी दोषी असू शकतो पण मुलांचा काय दोष? त्यांना शिक्षा देण्याचा (स्वतःच्या सुखासाठी) आपल्याला काय अधिकार? पती-पत्नीने एकमेकांशी (आपल्या मुलांचा विचार करून) जमवून घ्यावे असे मला वाटते. सतत भांडत एकत्र राहण्यातही अर्थ नसतो. घरातील अशांतीचाही मुलांच्या मनांवर वाईट परीणाम होतो. मुलांना दोघेही एकत्र हवे असतात.
मुले नसतील तर, आपापसात न पटणार्‍या जोडप्याने जरूर विभक्त व्हावे.
लग्नानंतर मुले होऊ देण्याची घाई करू नये. ४-५ वर्षे एकत्र राहून आपापसात पटतंय की नाही हे जोखावे आणि काय तो निर्णय घ्यावा. पण एकदा का, एक जरी, मुल झाले तरी विभक्त होण्याचा विचार सोडून पडते/नमते घेऊन दोघांनीही मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने एकत्र राहणेच योग्य ठरते. ह्यात दोघांनाही भयंकर मनस्ताप होतो पण ती आपल्या चुकीचीच शिक्षा आहे असे मानून ती भोगावी.

लग्नानंतर मुले होऊ देण्याची घाई करू नये. ४-५ वर्षे एकत्र राहून आपापसात पटतंय की नाही हे जोखावे आणि काय तो निर्णय घ्यावा.

पेठकरकाका, सध्या लग्न होण्याचे मुलांचे वय ~३०, मुलींचे २५-२६. त्यामुळे ४-५ वर्षे थांबणे जास्त होते. ३/४ वर्षे थांबुन नंतर मुल होत नाही म्हणुन डॉक्टरकडे खेपा मारणारे आणि केवळ या कारणामुळे आधीचे ३/४ वर्षे चांगले जमत असुनही नंतर वादावादी होणारे बरेच मित्र आणि काही नातेवाईक माहीत आहेत.
अर्थात मुल जन्माला घालुन विभक्त होण्यापेक्षा मुल न होता एकत्र राहणे केव्हाही बरे. पण हा वेगळाच विषय होईल म्हणुन थांबतो.

अतिवास ताई, कथा भावली.

होबासराव's picture

28 Aug 2014 - 3:08 pm | होबासराव

सुन्न झालो..... आपला लेख फेसबुक वर प्रकाशित करु शकतो का? किंवा आपण केला असल्यास प्लीज लिंक द्यावी.

आतिवास's picture

28 Aug 2014 - 3:21 pm | आतिवास

धन्यवाद.
'मिपा'ची (या लेखाची) लिंक जरूर द्या आपण फेसबुकवर.

कवितानागेश's picture

28 Aug 2014 - 3:29 pm | कवितानागेश

हम्म..
५व्या वर्षी हे नक्कीच कळत असतं... फक्त हल्लीची मुले बोलूनही दाखवतात.

असं काही वाचलं की पोटात तुटतं. अमेरिकेला नावे ठेवत ठेवत भारतही त्याच मार्गावर आहे असे ऐकून आहे. सिद्ध करण्यासाठी विदा मात्र नाही.

दुर्दैवाने काही लोकांना अशी किंवा तशी किंमत मोजावीच लागते; त्यामुळे काही निर्णय वेदनादायी असले तरी अटळ असतात. 'घटस्फोट घ्यायचाय' अशा उद्देशाने कुणीच लग्न करत नाही हे लक्षात घेतलं की ब-याच गोष्टी आपल्याला "दिसायला" लागतात!

आदूबाळ's picture

28 Aug 2014 - 5:45 pm | आदूबाळ

मलाही नाही पटलं.

म्हणजे पाच वर्षांच्या मुलीला हे कळत नसेल असं नाही. तिला नक्कीच कळत असेल.

कोणालाही क्षमा मागायला लावणे - विशेषतः क्षमा मागायच्या शब्दांबाबत आग्रही असणे - हे इगोचं लक्षण आहे. अशा प्रकारचा इगो पाच वर्षांच्या मुलीत असेल का?

आणि त्याहून आपल्या भविष्याबाबतची असुरक्षितता, आई किंवा बाबा - कोणातरी एकापासून दूर रहायला लागणार म्हणून दु:ख, घटस्फोटाला कारणीभूत ज्या गोष्टी घडल्या त्याचा त्या लहानगीने लावलेला अन्वय, या भावना जास्त नैसर्गिक वाटतात.

शब्द अनेकदा केवळ आग्रह म्हणून वापरले जातात - त्यामागे भावना काय असते हे वापरण्याला व्यक्तीलाही अनेकदा माहिती नसतं असं वाटतं. अनुभव अनेकदा आपल्या अपेक्षांच्या चौकटीतले नसतात हेही आहेच.

अधिक स्पष्टीकरण लेखकाने देऊ नये या माझ्या नेहमीच्या मताशी सुसंगती राखत थांबते.
पण तुम्हा अनेकांचे प्रतिसाद वाचून या विषयावर एक दीर्घकथा मनात आकार घ्यायला लागली आहे खरी ;-)

आयुर्हित's picture

29 Aug 2014 - 3:29 am | आयुर्हित

हे इगोचं लक्षण आहे. अशा प्रकारचा इगो पाच वर्षांच्या मुलीत असेल का?

हे वयावर नाही तर(गुरुच्या)राशीवर अवलंबून नक्किच असेल.

टवाळ कार्टा's picture

29 Aug 2014 - 12:39 pm | टवाळ कार्टा

हे वयावर नाही तर(गुरुच्या)राशीवर अवलंबून नक्किच असेल.

किती भोळसटपणा असावा...

सध्या अश्याच ऐका केस मध्ये डोक लढवत आहे.26 ची ती आणी 28 तो. तो दुसर विवाह करुन बसलाय आणी तिला सोडुन दिलय. 1 वर्षाच मुल आहे.हे पण विसरलाय हरामखोर.

आन्जीइतकी प्रान्जळ नाही वाटली ही लहानगी !

अकाली प्रौढ व्हावं लागलंय ना तिला..
आंजीचं विश्व जितकं सुखरूप आहे, तितकं ते हिच्या वाट्याला आलेलं नाही.

आतिवास, छान लिहिता तुम्ही. लवकरच तुमच्या शतशब्दकथांचं पुस्तक प्रकाशित होवो ही शुभेच्छा.

आयुर्हित's picture

29 Aug 2014 - 3:25 am | आयुर्हित

पण हे नक्किच टाळता आले असते!
त्या ५ वर्षाच्या मूलीच्या द्रुष्टीने पाहिल्यास मी आजही म्हणेन, अजुनही वेळ गेलेली नाही!!!

विअर्ड विक्स's picture

29 Aug 2014 - 9:30 am | विअर्ड विक्स

कथा आवडली...
आजकाल ५० शीच्या पुढच्या माणसांना चतुर भ्रमण ध्वनी हाताळता येत नाही. याउलट माझे १-३ वर्षाचे पुतणे लीलया हाताळतात.
शब्दांपेक्षा भाव महत्वाचे असतात. माझ्यामते तरी त्या मुलीचा 'क्षमा' या शब्दासाठीचा आग्रह हा कथेचा परिणाम गडद करण्यासाठी वापरला आहे त्यावरून कथेतील मुलीचा बुद्ध्यांक मोजू नये.
अर्थात, हे माझे वैयक्तिक मत, लेखक आणि आपणा सर्वास हे पटेलच असे नाही नि पटवून द्यायचा आग्रह हि नाही.
प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे मुलांसाठी विभक्त होऊ नये या विचारसरणीचे दिवस गेले. कारण रथाला दोन चाके असतात. एक लंगडे झाले तर ते तसेच फरफटत नेण्यात काय point ?

यशोधरा आणि इतर काहीजणांशी सहमत. पाच वर्षांची मुलगी इतकी ठासून दोघांकडून माफी मागणे हे जरा अनरियालिस्टिक वाटलं. शिवाय या स्टेजला ती दोघांवरही इक्वली रुष्ट असणं हेही थोडं दुर्मिळ वाटलं. जनरली मुलं एका कोणातरीकडे झुकलेली असतात.

आणि वकिलाच्या त्या एकाच वाक्याची रचना अत्यंत पुस्तकी आहे. ती अन्य कथेत खपली असती. पण अतिवासच्या अत्यंत रियलिस्टिक शब्दरचनेची सवय पडल्यावर हे वाक्य खूपच वाचकांना कमीतकमी शब्दांत जास्तीतजास्त माहिती देणारे मालिकेतले किंवा कादंबरीतले संवाद असतात तसे वाटले.

----

"हं! तर आता तुमच्या पाच वर्षांच्या मुलीचा ताबा कोणाकडे असावा याबाबत आपण बोलू ....” वकील म्हणाली

हे ते डिस्क्रिप्टिव्ह वाक्य. पाच वर्षे वय दर्शवण्यासाठी वेगळी योजना केली असती तर दोन वाक्ये जास्तीची येऊन कदाचित शब्दसंख्येचे गणित बिघडले असते पण जास्त वास्तव वाक्यरचना झाली असती.

बाकी आवडले म्हणून प्रतिसाद देतोय. लोभ असावा.

पोटे's picture

29 Aug 2014 - 11:19 am | पोटे

आमच्या मुलीला तिसर्‍याच वर्षी समज आलेली आहे

'''''''''लाडक्या लेकीची क्षमा मागताना कोसळलेले आई-बाप पुन्हा दोन स्वतंत्र माणसं झाली.''''''''
हे अगदी नेमकं बोललात.

थोड्या शब्दात नेमका संदेश देणारी कथा .

काहीवेळा मोठी माणसं स्वतःत इतकी मश्गुल असतात , ़की आपणच आपल्या मुलांचं नुकसान करतो आहोत हेच त्यांच्या ध्यानात येत नाही .

तिमा's picture

29 Aug 2014 - 7:20 pm | तिमा

कथा नेहमीपेक्षा वेगळी पण तरीही आवडली.त्यातून जो संदेश द्यायचा आहे तो व्यवस्थित पोचला आहे.
घटना बहुधा सत्य असावी असे वाटले.

पैसा's picture

29 Aug 2014 - 8:25 pm | पैसा

घटना इतकी हलवणारी आहे की तपशिलांबद्द्ल विचार करावा असे वाटले नाही!

लहान मुलाचे उद्ध्वस्त होणारे भावविश्व ही कल्पनाही नकोशी वाटते. आईबापाचे पटत नाही यात त्याचा काय दोष?

दशानन's picture

29 Aug 2014 - 9:24 pm | दशानन

मागे पण मी लिहिले होते, हा जो नवलेखन प्रकार आहे, जो तुम्ही सातत्याने हाताळत आहात.. हा खरोखर उच्च कोटीचा आहे. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय पोचणे गरजेचे असते ते या कथेत देखील पूर्ण होत आहे. पण वरील काही प्रतिसाद व त्यांचा सूर थोडा मला देखील योग वाटत आहे. इतक्या लहान वयातील मूल एवढे स्पष्ट निर्णय घेणे मनाला पटत नाही आहे.

आतिवास's picture

30 Aug 2014 - 10:30 pm | आतिवास

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार.
प्रत्येक प्रतिसादावर मी काही लिहिलं नसलं, तरी सर्व प्रतिसाद मी वाचले आहेत आणि त्यातील मतांची नोंद घेतली आहे याची खात्री असावी. "लेखन आवडलं" असं सांगणारे प्रतिसाद उत्साह वाढवतात म्हणून महत्त्वाचे असतात; तसेच 'लेखन आवडलं नाही' हे सांगणारे प्रतिसादही - कारण त्यातून अनेकदा नवा दृष्टिकोन आणि विचार मिळतात.
पुनश्च आभार.