जॉर्डनची भटकंती : ०४ : मदाबा गाव आणि केराक किल्ला

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
22 Aug 2014 - 3:37 pm

===================================================================

जॉर्डनची भटकंती : ०१... ०२... ०३... ०४... ०५ (मिपा दिवाळी अंक २०१४)... ०६... ०७... ०८ (समाप्त)...

===================================================================

...मध्यपूर्वेत स्थापना झालेल्या दोन मोठ्या धर्मांच्या सुरुवातीच्या काळाशी संबद्ध असल्याचा दावा असलेल्या ठिकाणाची आणि तेथील अवशेषांची ओळख बरोबर घेऊन आमचा प्रवास पुढच्या आकर्षणाच्या दिशेने सुरू झाला.

मदाबा गाव

अम्मानच्या दक्षिणेला ८६ किमीवर मदाबा नावाचे गेल्या ४,५०० वर्षांपासून अस्तित्वात असलेले गाव आहे. याचा बायबलमध्ये "मोआबाईट लोकांचे मदाबा" असा उल्लेख आहे. अनेक शतकांच्या मोआबाईट आणि नेबॅतियन राजसत्तांनंतर रोमन सम्राट ट्राजानने हा भूभाग रोमन सत्तेच्या अरेबिया प्रांताचा भाग बनवला.

ख्रिश्चन धर्मविरोधी असलेल्या '(पश्चिम) रोमन' साम्राज्यात (Western Roman Empire) विरोध व छळ होत असूनही पहिल्या शतकात ख्रिश्चियानिटी येथे जोमाने वाढत होती. चवथ्या शतकात सम्राट काँस्टंटाईनने ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर मात्र तो धर्म राजमान्य आणि अर्थातच सर्व साम्राज्यभर प्रबळ झाला. हा नंतरचा काळ 'पूर्व रोम' अथवा 'बायझांटाईन' साम्राज्याचा (Eastern Roman / Byzantine Empire) काळ समजला जातो. हा काळ मदाबाचा सुवर्णकाळ होता. या परिसरात सापडणार्‍या रंगीत दगडांचे तुकडे वापरून ६ ते ८ व्या शतकात वैशिष्ट्यपूर्ण मोझेईक कलाकृती असलेली अनेक चर्चेस येथे बांधली गेल्यामुळे हा भाग नावारूपाला आला. इ स ७४९ मध्ये झालेल्या जबरदस्त भूकंपाने हे गाव जमीनदोस्त होऊन जवळ जवळ हजार एक वर्षे ओसाड झाले.

इ स १८९७ मध्ये शेजारच्या केराक नावाच्या शहरातून काही ख्रिश्चन कुटुंबांनी या ओसाड पडलेल्या गावात स्थलांतर केले. ते परत वसविताना, नवीन इमारती बांधण्यासाठी खणताना, अनेक जुन्या इमारती, चर्चेस आणि मोझेईकचा खजिना जगाच्या नजरेला आला. इथल्या नवीन नागरिकांनी मोझेइकची कला पुढे आणून मदाबाला आधुनिक काळातले जागतिक पर्यटक आकर्षण बनविले आहे.

इ स १९९६ पासून आजतागायत येथे टोरोंटो युनिव्हर्सिटी (कॅनडा) तर्फे उत्खनन केले जात आहे.

चला तर मारूया फेरफटका या एका वेगळ्या प्राचीन कलाकारीसाठी प्रसिद्ध असलेल्या गावाचा...


मदाबा : ०१ : एक रस्ता

.


मदाबा : ०२ : एक रस्ता

.


मदाबा : ०३ : मोझेईक चित्रे व चिनी मातीच्या वस्तू

.


मदाबा : ०४ : लाकडावरील मोझेईक कला

.


मदाबा : ०५ : मोझेईक कलाकृती

.


मदाबा : ०६ : मोझेईक चित्रे

सेंट जॉर्ज ऑर्थॉडॉक्स चर्च आणि पवित्र भूमीचा मोझेईक नकाशा

बाजारपेठेतून फिरत फिरत आम्ही सेंट जॉर्ज ऑर्थॉडॉक्स चर्चला पोहोचलो. गावाच्या मध्यभागी असलेल्या या प्राचीन चर्चमध्ये इ स ५६० मध्ये बनवलेला पवित्र जमिनीचा (होली लॅंडचा) मोझेईक नकाशा आहे. इ स १८९७ मध्ये या जागेवर नवीन चर्च बनविण्यासाठी खणताना हा अमोल प्राचीन खजिना सापडला.

मूळ नकाशा १५.७ x ५.७ मीटर आकाराचा होता. २० लाख रंगीत दगडांच्या तुकड्यांनी बनवलेल्या या नकाश्यात उत्तरेकडील (आधुनिक लेबॅनॉनमधील) टायर आणि सायडॉन या शहरांपासून दक्षिणेकडील इजिप्तपर्यंत, तर पश्चिमेकडील भूमध्य समुद्रापासून पूर्वेकडील अरबस्थानापर्यंत इतक्या विशाल आवाक्याचा समावेश आहे. नकाश्याच्या मध्यभागी असलेल्या जेरुसलेम शहराची आणि त्यातील महत्त्वाच्या (Church of the Holy Sepulchre, कॉर्डो मॅक्सिमस, कोलोनेड असलेले रस्ते, इ) भागांची मांडणी आश्चर्यकारक वाटावी इतकी अचूक आहे. त्याशिवाय त्यात अनेक डोंगर-दर्‍या, शहर-गावे, नाईल नदीचा त्रिभुज प्रदेश, इत्यादी १५७ महत्त्वाच्या जागा त्यांच्या नावासकट दाखविलेल्या आहेत. त्या नावांमध्ये मदाबा व केराक या आजच्या सफरीतल्या दोन गावांचाही समावेश आहे.


मदाबातले सेंट जॉर्ज ऑर्थॉडॉक्स चर्च : ०१ : मार्गदर्शक खमीस मोझेईक नकाशाचा फोटो वापरून त्याची माहिती देताना

.


मदाबातले सेंट जॉर्ज ऑर्थॉडॉक्स चर्च : ०२ : मोझेईक नकाशा

.


मदाबातले सेंट जॉर्ज ऑर्थॉडॉक्स चर्च : ०३ : मोझेईक नकाशा

.


मदाबातले सेंट जॉर्ज ऑर्थॉडॉक्स चर्च : ०४ : अंतर्भाग

.

त्याबरोबरच अनेक चर्चेसमध्ये आणि मदाबातील इतर ठिकाणीही मोझेईकमध्ये बनवलेल्या पाने-फुले, प्राणी-पक्षी, मासे, शेती, दंतकथा आणि सर्वसामान्य जीवनातल्या अनेक गोष्टींची चित्रे आहेत. त्यातील हिप्पोलायटस या एका महालातील सुंदर मोझेईक बर्‍याच सुस्थितित आहे...


मदाबा हिप्पोलायटस हॉलमधले मोझेईक

.

गावात फिरायला मिळालेल्या मोकळ्या वेळात भटकताना "इंस्टिट्यूट ऑफ मोझेईक आर्ट अँड रिस्टोरेशन" समोर आली. बाजारहाटीत फारसा रस नव्हताच त्यामुळे उरलेला वेळ तेथे घालवला. तेथे प्रवेशासाठी फी भरावी लागते. पण तेथे अजून काही प्राचीन मोझेईकचे नमुने बघायला मिळाले...

.


मोझेईक इंस्टिट्यूट : ०१

.


मोझेईक इंस्टिट्यूट : ०२

.

मोझेईक इंस्टिट्यूट : ०३

.

मोझेईक इंस्टिट्यूट : ०४

.

मदाबातून बाहेर पडून दक्षिणेकडील केराकच्या दिशेने आमची सफर परत सुरू झाली. आताचा सगळा प्रवास रखरखीत वाळवंटातून होता. भर वाळवंटात मधूनच एखादे झाड नजरेस पडत होते...


मदाबा ते केराक रस्ता : ०१

आणि रस्त्याशेजारच्या एका वस्तीमध्ये चक्क हिरवाई आणि फुले दिसली...


मदाबा ते केराक रस्ता : ०२

मध्येच एका डोंगरावर आम्ही थांबा घेतला. तेथून आजूबाजूच्या परिसराचे विहंगम दृश्य पहायला मिळाले. तपकिरी रंगाच्या असंख्य छटांचे वाळवंटी डोंगर आणि दर्‍या-खोरी, त्यातून नागमोडी वळणे घेत सापासारखा वळवळणारा काळा टार्मॅकचा रस्ता, त्या रखरखीत पार्श्वभूमीच्या मध्येच पाण्याने भरलेले राजा हुसेन धरण आणि धरणापुढच्या दरीत कोरडे पडलेले जॉर्डन नदीचे पात्र. रणरणत्या उन्हातला हा देखावा तेवढासा सुखकारक नसला तरी काही काळ खिळवून ठेवणारा नक्कीच होता...


मदाबा ते केराक रस्ता : ०३

पर्यटक हमखास थांबण्याचे ठिकाण असल्याने एका स्थानिक गालिचे विक्रेत्याने ती निर्जन मोक्याची जागा काबीज करून तिच्या कठड्यांवर आपले दुकान उघडले होते...


मदाबा ते केराक रस्ता : ०४

रस्त्याने पुढे निघालो आणि परत एकदा गाडीतून धरण आणि त्याच्या परिसराचे विहंगम दर्शन झाले...


मदाबा ते केराक रस्ता : ०५

केराकला पोहोचेपर्यंत पोटात कावळे ओरडू लागले होते. सर्वप्रथम पोटोबा करून मग किल्ल्याच्या दिशेने निघालो.

केराक गाव व केराक किल्ला

केराक शहर अम्मानच्या दक्षिणेला १४० किमीवर आहे. केराकच्या जागी कमीत कमी लोहयुगापासून तरी मानववस्ती असल्याचे पुरावे सापडले आहेत. बायबलमध्ये या गावाचा उल्लेख अस्सिरियन साम्राज्याचा भाग असलेले 'केर हारेसेथ' किंवा 'मोअबचे किर' असा केलेला आहे. उत्तर पॅलेस्टाईनमध्ये स्थिरावण्याआधी ज्या जागी सिरियन लोक गेले तो हा भाग असल्याचा Books of Kings व Book of Amos या पुस्तकांत उल्लेख आहे.

पहिल्या शतकात हा भाग नेबॅतियन साम्राज्याचा भाग बनला. त्यानंतर रोमन, बायझँटियन आणि अरब अश्या सत्तांनी त्याच्यावर हक्क प्रस्थापित केला. ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मातल्या क्रूसेड्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युद्धांमध्ये इथला किल्ला ख्रिश्चनांनी अखेरपर्यंत ४६ वर्षे लढवला. पण अखेरीस इ स ११४८ मध्ये तो सालादीनच्या हाती पडला. दमास्कस व इजिप्त मधला व्यापारी मार्ग आणि दमास्कस-मक्का हा धार्मिक यात्रेचा मार्ग हे दोन मार्ग या किल्ल्यावरून जात असल्याने तो सतत एक महत्त्वाचे ठाणे राहिला आहे.

नामवंत अरब वैद्य इब्न अल् कफ् याचे केराक गाव जन्मस्थान आहे. त्याच्या शल्यचिकित्सेवरील पुस्तकांची गणना अरब जगतातील त्या विषयावरील पहिल्या काही पुस्तकात केली जाते.

समुद्रसपाटीपेक्षा १००० मीटर उंचीवरचा केराक किल्ला ट्रान्स्जॉर्डन विभागातल्या मोठ्या तीन किल्ल्यांपैकी एक आहे. त्यातला हाच एकटा आधुनिक जॉर्डनमध्ये आहे इतर दोन किल्ले आधुनिक सिरीयात आहेत.

शहरात शिरण्याअगोदर उंचावर असलेला हा किल्ला आपल्या नजरेस पडतो...


केराक किल्ला : ०१ : दुरून झालेले पहिले दर्शन

.


केराक किल्ला : ०२

.


केराक किल्ला : ०३ :

.


केराक किल्ला : ०४

.

उंच कड्यांमुळे मिळणार्‍या नैसर्गिक संरक्षणाचा अभाव असलेल्या किल्ल्यांवर हल्ला करताना पूर्वीच्या काळी त्यांच्या भिंती चढून जाण्यासाठी अनेक प्रकारच्या शिड्यांचा वापर केला जात असे...


किल्ल्याची भिंत चढण्यासाठी वापरल्या जाणार्‍या शिडीचा एक प्रकार (चित्रात डावीकडे) (चित्र जालावरून साभार)

अश्या शिड्या किल्ल्याच्या तटापर्यंत पोहोचू शकणार नाहीत इतक्या तिरक्या कोनात टेकडीच्या उताराचे बांधकाम करून संरक्षणातली ही कमी भरून काढली आहे...


केराक किल्ला : ०५

हा किल्ला क्रूसेड्सच्या शेवटापर्यंत अजिंक्य राहण्यात या अभियांत्रिकी युक्तीचा सिंहाचा वाटा होता.

.

केराक किल्ल्याच्या फेरफटक्यानंतर आम्ही या सहलीचे मुख्य आकर्षण असलेल्या पेत्रा दरीच्या दिशेने निघालो.

(क्रमशः )

===================================================================

जॉर्डनची भटकंती : ०१... ०२... ०३... ०४... ०५ (मिपा दिवाळी अंक २०१४)... ०६... ०७... ०८ (समाप्त)...

===================================================================

प्रतिक्रिया

अजया's picture

22 Aug 2014 - 3:53 pm | अजया

वाचतेय.पुभाप्र.पेत्रासाठी!

कुसुमावती's picture

22 Aug 2014 - 4:00 pm | कुसुमावती

छान चाललीये सहल.

पेत्राच्या प्रतिक्षेत.

शिद's picture

22 Aug 2014 - 5:46 pm | शिद

+१...असेच म्हणतो.

केराक किल्ला क्रूसेड्सच्या शेवटापर्यंत अजिंक्य राहण्यात या अभियांत्रिकी युक्तीचा सिंहाचा वाटा होता. >>> युक्ती आवडली. पण तरीही त्यावर सैनिकांना चढून जाणे इतके अवघड दिसत नाही. कदाचित त्यांच्याकडे घोरपडी नसाव्यात. :-P (ह. घे.) :-)

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Aug 2014 - 6:23 pm | डॉ सुहास म्हात्रे

पण तरीही त्यावर सैनिकांना चढून जाणे इतके अवघड दिसत नाही.
त्याच्या तळाला असलेल्या रस्त्यावरच्या माणसांचा आकार पाहिल्यास मत बदलेल असे वाटते :)

एस's picture

22 Aug 2014 - 6:31 pm | एस

आपलं शिंव्हगडाचा तीनशे मीटरचा कडा रात्रीत चढून गेलेल्या मावळ्यांना आठवून म्हणालो हो. हे तर कैच नै. :-D

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Aug 2014 - 6:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

पण त्यांच्याकडे घोरपडी नव्हत्या... बहुतेक त्या सर्वभक्षी लोकांनी फार पूर्वीच घोरपडींना गट्टम केले असावे ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Aug 2014 - 6:23 pm | डॉ सुहास म्हात्रे

अजया, कुसुमावती आणि शिद : धन्यवाद !

वाचतीये..आता पेत्रा दरीच्या प्रतिक्षेत...

खटपट्या's picture

22 Aug 2014 - 11:44 pm | खटपट्या

मस्त फोटो !! धरणाचे फोटो मीपा स्पर्धेत द्यायला हरकत नाही .

मोझेईक कलाकृती अद्भूत आहेत.
किल्ला, तटबंदी खूपच सुरेख.
रखरखाट मात्र प्रचंड आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Aug 2014 - 11:27 am | डॉ सुहास म्हात्रे

इशा१२३, खटपट्या आणि वल्ली : धन्यवाद !

टवाळ कार्टा's picture

23 Aug 2014 - 11:49 am | टवाळ कार्टा

मस्तच

प्रभाकर पेठकर's picture

24 Aug 2014 - 11:25 am | प्रभाकर पेठकर

मस्तं छायाचित्रं आणि वर्णन.

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Aug 2014 - 12:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

टवाळ कार्टा आणि प्रभाकर पेठकर : धन्यवाद !

सस्नेह's picture

24 Aug 2014 - 3:19 pm | सस्नेह

तुमची प्रवासवर्णने अन वल्लींची शिल्पवर्णने यामधून त्या त्या ठिकाणांचे नुसते दर्शनाच होत नाही, तर त्यासोबत तिथली सांस्कृतिक सामाजिक वैशिष्ट्ये, तिथले जनजीवन, इतिहास अन भूगोल यांचा समग्र अभ्यास घडतो.
सर्व एपिसोड्स प्रतीसादवीत नसले तरी लक्षपूर्वक वाचत (अन पहात) असत्ये, हे नमूद करते.
या सर्व ठिकाणांचा घरबसल्या प्रवास घडवत असल्याबद्दल मन:पूर्वक आभार !

दिपक.कुवेत's picture

24 Aug 2014 - 6:07 pm | दिपक.कुवेत

असेच म्हणतो. मस्त सफर सुरु आहे. मदाबा फार आवडलयं.

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Aug 2014 - 2:18 am | डॉ सुहास म्हात्रे

स्नेहांकिता आणि दिपक.कुवेत : अनेक धन्यवाद !

विलासराव's picture

25 Aug 2014 - 11:03 pm | विलासराव

मीही आपल्या प्रत्येक सहलीत हजर असतो.
पण प्रतिसाद देतोच असे नाही.
मस्त चाललीये सहल.